डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मते सांगणारा तो ‘गुरू’ नव्हता. तर विचार कसा करावा याचे अधिक मूलभूत शिक्षण देणारा तो एक ‘आचार्य’ होता. असे सांगतात की, एकदा देवीसमोर प्रश्न उपस्थित केला गेला की, सर्वांत शहाणा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरी देवीने असा कौल दिला की, सर्वांत शहाणा सॉक्रेटिस आहे. हा सॉक्रेटिस सर्वांत शहाणा काय म्हणून? त्याच्या जवळ सर्वांत जास्त ज्ञान आहे म्हणून तो शहाणा नाही, तर त्याची आपल्या अज्ञानाची जाणीव सर्वांत स्वच्छ आणि नेमकी आहे म्हणून तो शहाणा.

सॉक्रेटिस हा प्राचीन काळातील ग्रीस देशाचा एक तत्त्वज्ञ. युरोपच्या सर्व ज्ञान-विज्ञानाचा महान उगम म्हणून ज्या ॲरिस्टॉटलकडे पाहिले जाते, त्याचा गुरू प्लेटो आणि प्लेटोचा गुरू सॉक्रेटिस होता. सॉक्रेटिसाचे तत्त्वज्ञान नेमके काय होते ते सांगता येणे शक्य नाही. कारण आपणासमोर सॉक्रिटिसाचे म्हणून जे तत्त्वज्ञान उभे आहे, ते सारे प्लेटोच्या संवादातून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. या संवादांच्यामध्ये प्लेटोने टाकलेली भर कोणती, आणि सॉक्रेटिसाची मूळची मते कोणती, हे नक्की सांगता येणे कठीण आहे. सॉक्रेटिसाची मते नेमकी कोणती हे जरी कळले नाही, तरी तो सतत चर्चा करणारा माणूस होता असे या संवादांच्यामधून आपल्याला जाणवत राहते.

असे म्हणतात की, नक्की ठरलेली मते जगाच्या समोर ठेवणे यात सॉक्रेटिसाचे मोठेपण नव्हतेच. त्याचे मोठेपण पूर्वसिद्ध ठरलेले विचार समाजाला पटवून देण्यात नव्हते; तर   समाजाला विचार करायला शिकविणे यात होते. मते सांगणारा तो ‘गुरू’ नव्हता. तर विचार कसा करावा याचे अधिक मूलभूत शिक्षण देणारा तो एक ‘आचार्य’ होता. असे सांगतात की, एकदा देवीसमोर प्रश्न उपस्थित केला गेला की, सर्वांत शहाणा कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरी देवीने असा कौल दिला की, सर्वांत शहाणा सॉक्रेटिस आहे. हा सॉक्रेटिस सर्वांत शहाणा काय म्हणून? त्याच्या जवळ सर्वांत जास्त ज्ञान आहे म्हणून तो शहाणा नाही, तर त्याची आपल्या अज्ञानाची जाणीव सर्वांत स्वच्छ आणि नेमकी आहे म्हणून तो शहाणा.

अशा या सर्वांत शहाण्या माणसाला सगळ्यांशी चर्चा करण्याची खोड होती, जो भेटेल त्याच्याशी सॉक्रेटिस चर्चा करी. प्रश्नोत्तर रूपाने चर्चा करताना सॉक्रेटिस समोरच्या माणसाला त्याच्या विचारांतील विसंगती पटवून देत असे. तुमचे विचार काय असावेत याबाबत सॉक्रेटिसचा आग्रह नव्हता. पण तुमचे जे कोणते विचार असतील, ते तर्कसंगत आणि स्पष्ट असावेत असा त्याचा आग्रह होता. या त्याच्या चर्चांमुळे एकेका माणसाला जर काही ज्ञान मिळत असेल तर प्रामुख्याने त्याचे स्वरूप आपल्या विचारांत चुका कोणत्या आहेत, हे होते.

या सॉक्रेटिसला त्याच्या देशाची जनता- निदान त्याच्या देशातील सत्ताधारी वर्ग लवकरच कंटाळला. देवाच्या विरुद्धचा बंडखोर आणि धर्मद्रोही म्हणून त्याच्यावर खटला रचण्यात आला आणि ॲथेन्सच्या न्यायालयाने त्याला देहांताची शिक्षा फर्मावली. त्याने हेमॉलक नावाचे विष प्यावे आणि आपले अस्तित्व नष्ट करावे, हा त्या शिक्षेचा आशय होता. प्राणदंडाच्या शिक्षेत नवीन असे काहीच नाही, जगातल्या सर्व देशांत वेळोवेळी निरनिराळ्या मंडळींना प्राणदंडाची शिक्षा दिली गेली आहे. पण ॲथेन्सच्या सुसंस्कृत नगरीने प्राणदंडाच्या शिक्षेला एक पर्याय ठेवला होता; तो म्हणजे काही दंड भरून सुटण्याचा व देशत्याग करण्याचा. सॉक्रेटिसने मेलेच पाहिजे असा ॲथेन्सचा आग्रह नव्हता. आग्रह हा होता की, त्याने मरण तरी पत्करावे किंवा गुन्हा मान्य करून दंड भरावा व दुसऱ्या नगरीत जाऊन जिवंत राहावे.

सॉक्रेटिसच्या खटल्याचा वृत्तांत संपूर्णपणे विश्वसनीय असा नाही. कारण या वृत्तांताप्रमाणे पाहता सॉक्रेटिसने देवद्रोह केलेला आहे की नाही, याबाबत न्यायालयाचे मत निश्चित नव्हते. आपण देवद्रोह केलेला नाही; जे सर्व ॲथेन्सच्या नागरिकांना पूज्य वाटते ते आपणालाही पूज्य वाटते; त्यांना जे निंद्य वाटते ते आपणालाही निंद्य वाटते; त्यांना जे रास्त वाटते ते आपणालाही रास्त वाटते, असे जर सॉक्रेटिस म्हणाला असता तर त्याची सुटकाही झाली असती. पण सॉक्रेटिसाचे म्हणणे असे की आपण धर्मद्रोह करीत नसून, देवद्रोहही करीत नसून, फक्त मुद्दा समजावून देत आहोत, मुद्दा समजावून घेत आहोत. न्यायालयाने हा बचाव अमान्य ठरवून त्याला शिक्षा दिली, पण गुन्हा कबूल असल्यास जगण्याची संधीही दिली. सॉक्रेटिसच्या खटल्याला महत्त्व आलेले आहे ते यामुळे की त्याने गुन्हा कबूल करून जिवंत राहण्याच्या ऐवजी मृत्यू पत्करला. आपल्या विचार करण्याच्या हक्कासाठी हौतात्म्य पत्करणारा सॉक्रेटिस हा थोर माणूस आहे, यावर दुमत होण्याचे कारण नाही.

पण सॉक्रेटिसचे विचार तरी तर्कसंगत होते काय? माहिती असे सांगते की त्याने काही नवस केले होते, ते फेडायचे राहिले होते. आपण जरी मृत्यू पत्करीत असलो तरी आपल्या शिष्यांनी न चुकता हे नवस फेडावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. देवतांना नवस करणारा आणि ते नवस फेडण्याची काळजी घेणारा सॉक्रेटिस स्वत:च्या जीवनात किती तर्कशुद्ध असेल याविषयी प्रथमच शंका येऊ लागते आणि जेव्हा आपणास हे कळते की सॉक्रेटिस आत्म्याचे अमरत्व मान्य करीत होता, आत्म्याच्या अमरत्वावर त्याची अविचल श्रद्धा होती; तेव्हा तर त्याच्या तर्कशुद्धपणाविषयी आलेली शंका बळकट होऊ लागते... माणूस म्हणजे शरीर नव्हे, माणूस म्हणजे आत्मा, हा आत्मा अमर आहे. अज्ञानी न्यायालय सॉक्रेटिसाच्या शरीराला नष्ट करून सॉक्रेटिस नष्ट झाला, या भ्रमात आनंद व्यक्त करीत आहे; तर अज्ञानी प्लेटो सॉक्रेटिसाचे शरीर नष्ट झाल्यामुळे सॉक्रेटिस नष्ट होत आहे हे दु:ख सहन न होऊन रडत आहे... असे म्हणत शरीराला माणूस समजण्याची चूक करणाऱ्या अज्ञानाची कीव करीत ‘आपण अमर आहोत’ याची ग्वाही देत स्थिर मनाने सॉक्रेटिसने मृत्यू पत्करला.

या हौतात्म्याची भव्यता मान्य केली तरी या विचाराचा तर्कशुद्धपणा मान्य करता येणे कठीण आहे. जो माणूस आपण जन्माला येण्यापूर्वी जन्मलो होतो; मरणानंतरही अस्तित्वात राहणार आहोत; मुळात आपण जन्मलेलो नाही, आपण मरणार नाही, आपण कधी लहान नव्हतो कधी वाढलो नाही, आपण जन्मजात म्हातारेच होतो किंवा ही साठी संपल्याच्या नंतरही आपण तरुणच आहोत असे मानतो तो मोठा तर्कशुद्ध विचार करणारा आहे हे पटणे कठीण आहे. आत्म्याच्या अमरत्वाचे तत्त्वज्ञान ज्या  भारतीयांनी अतिशय खात्रीने आणि आग्रहाने मांडले आहे, त्या भारतीयांची तर्कावर कधीच श्रद्धा नव्हती. अंधारातून उजेडात जाण्याची खात्रीची काठी म्हणून त्यांना तर्काचा आधार कधीच वाटला नव्हता. फार तर एक प्रकारच्या अज्ञानाचे दुसऱ्या प्रकारच्या अज्ञानजन्य तर्काने विध्वंसन करता येईल इतकेच त्यांना तर्काचे स्वरूप मान्य होते, पुन: पुन्हा बाधित होणे आणि कुठेच स्थिर न राहणे हे ज्या तर्काचे मूळ रूप, त्या तर्काच्या आधारे अजर, अमर आत्म्याचा सिद्धांत प्रस्थापित करण्याचा उद्योग भारतीय आत्मवाद्यांनी वर्ज्य मानला.

त्यांच्या दृष्टीने आत्म्याच्या अस्तित्वाला पुरावा श्रुतींचा होता आणि श्रुतींच्या बिनचूकपणाला पुरावा पुन्हा श्रुतींचाच होता. तर्कशुद्ध विचार करण्याची जबाबदारी मानणारा, इतरांना तर्कशुद्ध होण्याची विनंती करणारा सॉक्रेटिस आत्म्याचे अस्तित्त्व कोणत्या बिनतोड तर्काच्या आधारे सिद्ध करीत होता, हे सांगता येणे कठीण आहे. तर्कशुद्ध व सुसंगत विचारांचा आग्रह धरणारे लोक स्वत:च्या जीवनात तर्कशुद्ध व सुसंगत विचार करणारे असतीलच असेही सांगता येत नाही. आणि तर्कशुद्धता ही तत्त्वज्ञानाच्या विश्वसनीय सत्यतेची ग्वाही नव्हे असे सांगणारे दुसऱ्यांच्या विचारांचे तर्कशुद्ध खंडन करण्याचा निष्कारण प्रयास करणारच नाहीत अशीही खात्री देता येणार नाही. काशीत जाण्याची इच्छा नित्य असावी, म्हणजे एक ना एक दिवस माणूस काशीला जातो असे म्हणतात. तसे काहीसे तर्कशुद्धतेचे स्वरूप दिसते. आपण सुसंगत व तर्कशुद्ध असावे, सर्व समाजाचे चिंतन सुसंगत व तर्कशुद्ध करावे; हा आग्रह धरता धरताच एक दिवस आपणही आपल्या विचारांतील विसंगती टाळू शकू या श्रद्धेवर स्वत:ला व इतरांना तर्कशुद्ध करण्याचा खटाटोप सुरू असतो. त्याचे कारण तर्कशुद्ध असणे हे नाही तर तर्कशुद्ध नसल्यामुळे माणूस तर्कशुद्ध होण्याची इच्छा करतो हे दिसते. या इच्छेलाही महत्त्व आहे.

आणि माणूस जास्त शहाणा झाला म्हणजे जास्त सज्जन होईल, या भूमिकेला तर्कशास्त्रात आधार कुठून शोधावयाचा; शहाणपणा जर सज्जनपणाची हमी देत नसेल तर ज्ञानाला सद्‌गुण तरी का मानायचे; आणि ज्ञानाच्या वाढीमुळे माणूस जास्त सुखी होईल असे तरी का म्हणायचे?

सॉक्रेटिस मोठा सुसंगत विचार करीत होता असेही मला वाटत नाही. सर्व समाजाला सुसंगत विचार करण्याचा तो जो आग्रह धरीत होता तो आग्रह मोठा समर्थनीय होता असेही मला वाटत नाही. कारण जीवनात  जशी तर्कशुद्धतेची एक कक्षा आहे; तर्काच्या अधिराज्याचा एक प्रदेश आहे, तसा तर्काच्या पलीकडचाही एक प्रदेश आहे. आजचा लाभ आणि उद्याचा तोटा यापेक्षा नित्याचा लाभ जास्त महत्त्वाचा आहे, तो पत्करावा ही शहाण्या स्वार्थाची बाजू तर्काच्या आधारे एकवेळ पटवून देता येईल. पण नि:स्वार्थ बलिदानाची गरज तर्काच्या आधारे पटवून देता येईल असे मला वाटत नाही. तरीही सॉक्रेटिसचे महत्त्व मला मान्य आहे. इतर कुणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणे चांगले, असेच मीही मानतो. सॉक्रेटिसला टाळून इतर कुणाच्या सहवासात सुखी होण्यापेक्षा, सॉक्रेटिसच्या सहवासात तर्कशुद्ध होण्याचा प्रयत्न करून आपले दु:ख स्वत:वर ओढवून घेणे हे मला जास्त श्रेयस्कर वाटते. कारण सॉक्रेटिसचे विचार बरोबर असोत की चूक असोत, त्याचा विचार करण्याचा हक्क आणि तो हक्क प्रस्थापित करताना त्याने पत्करलेले उदात्त मरण मला विलोभनीय वाटते.

पण माझ्या मनात सॉक्रेटिसइतकाच आदर त्याला देहांताची शिक्षा देणाऱ्या न्यायासनाविषयी आहे. कारण या न्यायासनाला सॉक्रेटिसने आपला गुन्हा मान्य करणे ही गोष्ट जितकी महत्त्वाची वाटते, तितकी महत्त्वाची गोष्ट मरण वाटत नाही. सॉक्रेटिस जिवंत राहण्याला न्यायासनाला आक्षेप नाही. स्वतंत्र विचार करण्याचा हक्क जर सॉक्रेटिसने सोडला, तर मग न्यायालयाचा आक्षेप नाही. त्यामुळे येशूला सुळावर देणाऱ्या पॅलेस्टाईनच्या न्यायालयापेक्षा ॲथेन्सचे न्यायालय अधिक सुसंस्कृत आहे. येशूच्या समाजाला बाराबास मोकळा सुटला तरी चालतो; पण त्यांना येशूचे मरण पाहून निर्माण होणारा आनंदाचा उन्माद भोगायचा आहे. हा सूड केवळ येशूने विचारांची चूक मान्य केल्यामुळे उपशमित होणारा नाही. ॲथेन्सच्या नागरिकांना सॉक्रटिसच्या मरण्यात रस नाही. त्यांचे मुख्य भांडण विचारांशी आहे. विचारांशी भांडण म्हणजे ते विचार बाळगणाऱ्या शरीराशी भांडण! नुसता विचार संपून चालणार नाही, नुसता विचार मोडून चालणार नाही, शरीरही मोडले पाहिजे, मनही मोडले पाहिजे; असा आततायीपणा ॲथेन्सच्या न्यायालयात नाही.

वैचारिक चर्चा करणाऱ्या वादसभेप्रमाणे या न्यायालयाला वैचारिक जय महत्त्वाचा वाटतो, नाश महत्त्वाचा वाटत नाही. या न्यायालयापेक्षा मला परम आदर वाटतो तो ॲथेन्सच्या जनतेविषयी. या जनतेविषयी मला सॉक्रेटिसविषयी वाटतो त्यापेक्षा जास्त आदर वाटतो; कारण ॲथेन्स हे एक असे शहर होते की ज्या शहरातील समाजजीवनाला विचारांचा धक्का बसणे शक्य होते. कोणत्याही कृतीची गरज नाही; फक्त नवा विचार आला, की जो समाज त्या नव्या विचारामुळे मुळापासून हादरतो, तो सर्वोच्च सुसंस्कृतांचा समाज आहे असे मला वाटते. विचार मान्य केलेच पाहिजेत असे नाही; विचार खोडून काढले पाहिजेत असेही नाही. विचारांना फाशी देण्याचा एक साधा सोपा मार्ग असतो तो म्हणजे त्यांची उपेक्षा करणे. मी ज्या देशात राहतो त्या देशात शतकानुशतके अनेक विचारवंत आले आणि गेले, बहुतेकांचे विचार समाजाच्या दृष्टीने उपेक्षेला पात्र होते. उपेक्षेच्या वृक्षावर या सर्व चिंतनाला राजरोस फाशी देण्यात आले, त्यांची खंत वाटण्याजोगे प्रौढ मनच आपल्यापाशी नव्हते.

यांपैकी काही विचार उपेक्षा करण्याच्याऐवजी वंदनीय मानले, म्हणजे त्यात काही फरक पडतो असे नाही. विचारांनी न हादरणाऱ्या समाजात पटलेल्या वा मान्य केलेल्या वंदनीय विचारांची देवघरात समाधी मांडलेली असते, तिथेही विचार गाडलेलेच असतात. पटलेल्या आणि न पटलेल्या अशा सर्व चिंतनाचा खून करून आपली स्थितिमानता टिकविणाऱ्या या देशात विचारांचे हादरे जाणवणारा समाज कसा असतो, ही कल्पना करणेही कठीण आहे. ॲथेन्समध्ये एक असा समाज निर्माण झाला होता जो विचारांची उपेक्षा करू शकत नव्हता, विचारांनी हादरत होता, चवताळत होता. त्यामुळे तो समाज मला सर्वांत पूज्य वाटतो.  

निवडक नरहर कुरुंदकर : खंड- एक : व्यक्तिवेध (देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स, पुणे) या पुस्तकातून...                        

Tags: दिवाळी अंक सॉक्रेटीस व्यक्तिवेध नरहर कुरुंदकर Socrates vyaktivedh narahar kurundkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरहर कुरुंदकर

(१५ जुलैइ.स. १९३२ - १० फेब्रुवारीइ.स. १९८२) मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, समाजचिंतक आणि  प्रभावी वक्ते होते.प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते..


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके