डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

फ्रॅन्सिस पर्किन्स : एक दलित कैवारी (1980-1965)

फ्रॅन्सिस पर्किन्स या अमेरिकेतील एक सामाजिक कार्यकर्त्या. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे मालक-मजूर संघर्षात तडजोड घडवून आणून समझौत्याचे वातावरण निर्माण करणे. त्यांची कार्यक्षमता पाहून प्रे. रूझवेल्ट प्रभावीत झाले व त्यांनी फ्रॅन्सिसना मजूरमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात घेतले. त्यांच्या जीवनाची समग्र माहिती देणारा हा लेख.

सूसन बी. अँथनी हिच्या 60 वर्षे चाललेल्या स्त्रीहक्काच्या चळवळीचा उच्चांक म्हणजे 1920 साली अमेरिकेत स्त्रीला राजकीय क्षेत्रात प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. त्या संधीचा भरपूर फायदा घेऊन स्वतःच्या उपजत गुणांचा विकास करून राजकीय व सामाजिक क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती करून त्यावेळचे लोकप्रिय राष्ट्रपती फ्रॅन्कलीन डी. रुझवेल्ट ह्यांच्या मंत्रिमंडळात पहिली स्त्री मजूरमंत्री म्हणून 1933 ते 1945 पर्यंत 12 वर्षे काम करण्याचा मान फ्रॅन्सिस पर्किन्स हिला मिळाला होता.

फ्रॅन्सिसचा उत्साह काम करताना नेहमीच समुद्राच्या लाटांवरील फेसासारखा उसळून येत असल्याने तिच्या मैत्रिणींनी तिचे टोपणनाव 'पर्क' असे ठेवले होते. तत्कालीन समाजाच्या दृष्टीने फ्रॅन्सिसही खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून गणली जाई. लग्न होऊन एका बालकाला जन्म देऊनसुद्धा तिने आपले माहेरचे नाव कायम ठेवले होते. ज्या वेळी अमेरिकेच्या मजूर संघटनेची सारी सूत्रे पुरुषांच्याच हाती होती त्या वेळी ह्या महत्त्वाकांक्षी स्त्रीने त्यांच्या नेतृत्वावर उघडपणे टीका करून साऱ्या अमेरिकेचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. (मला पर्किन्सचे चरित्र वाचत असताना हिंद मजदूर सभेच्या एकवेळच्या अध्यक्ष श्रीमती मणीबेन कारा ह्यांची अगदी हटकून आठवण झाली.)

1911 मध्ये न्यूयॉर्क शहरात हजारो परदेशी स्त्रिया कपडे शिवणाऱ्या शेकडो दुकानांत दिवसरात्र मजुरी करत. त्यांना एवढे कष्ट करूनही पुरेशी मजुरी मिळत नव्हती. त्याशिवाय ह्या बहुसंख्य अशिक्षित स्त्रिया जेथे काम करीत तेथील वातावरणही सुरक्षित नव्हते. त्या वर्षी तेथील शर्टवेस्ट कंपनीत एकाएकी आग लागून 146 मुली मृत्युमुखी पडल्या. 47 मुलींनी 7 व्या मजल्यावरून उड्या मारल्याने त्याही मरण पावल्या. त्या सर्वांची रक्तलांच्छित शरीरे रस्त्यावरील फरशीवर जेव्हा ठेवण्यात आली तेव्हा तो भयंकर देखावा पाहून न्यूयॉर्ककरांची डोकी तापली. त्याबाबत संपूर्ण चौकशी करण्याची त्यांनी तात्काळ मागणी केली. मालकांनी सुरक्षिततेचे सारे नियम धाब्यावर बसविले होते. त्याशिवाय 3 महिन्यांपासून संपावर गेलेल्या मजुरांचा संप फोडण्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चौकशी होऊनही हे गब्बर मालक निर्दोष म्हणून सुटले! ही भयंकर घटना व त्यावर चौकशी समितीने दिलेला निर्णय ह्यांचा खोल ठसा पर्किन्सच्या मनावर उमटला.

1980 मध्ये बॉस्टन शहरात जन्मलेल्या ह्या मुलींचा संप, टाळेबंदी व त्यांमधून उत्पन्न होणाऱ्या हिंसात्मक कृत्यांचा परिचय अगदी लहानपणापासूनच झाला होता. लहानपणी फ्रॅन्सिस अगदी बाहुलीसारखी गोड व गुबगुबीत दिसे. त्यावेळी तिचा आवडता छंद होता बडबड! शालेय जीवनात त्याचे रूपांतर वादविवाद व अखंड चर्चा ह्यांत झाले. कधी कधी दुसऱ्याला चिडवण्यासाठी ती विरूद्ध बाजू घेत असे. पण फ्रॅन्सिस बोलकी असुनही शालेय जीवनात अत्यंत लाजाळू होती. तिच्या स्वतंत्र प्रज्ञेला तिच्या काही शिक्षकांनी उत्तेजन दिले. अनेक शिक्षकांचा सल्ला न जुमानता तिने रसायनशास्त्र हा विषय निवडला. पण कॉलेजात शिकताना राष्ट्रीय ग्राहक संघाच्या (नॅशनल कन्झ्युमर्स लीग) फ्लॉरेन्स केली ह्या प्रभावी कार्यकर्तीने फॅक्टरीत काम करणाऱ्या लहान मुलांच्या हलाखीची रंगविलेली हृदयद्रावक वर्णने ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी आले. ह्या गरिब मुलामुलींसाठी काहीतरी करण्याची प्रतिज्ञा तिने त्याच वेळी मनात करून टाकली. कॉलेज शिक्षण पूर्ण करून तिने काही महिने शिक्षिकेचे काम केले. पण तिचा आत्मा धाव घेत होता सामाजिक कार्याकडे. त्याकरिता उच्च शिक्षण मिळवण्यासाठी ती शिकागोला गेली. तेथील गलिच्छ व कंगाल वस्तीत तिला दु:ख दारिद्र्य व हालअपेष्टा ह्यांचा पहिला पाठ मिळाला. पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष परिस्थिती ह्यांच्यातील तफावत तिला आपल्या डोळ्यांनी पहावयास मिळाली. तेथेच तिला, इंग्रजी भाषा येत नसल्याने मजुरांचा मालक कसा भरपूर फायदा करून घेतात ह्याचाही अनुभव आला. 1907 साली फ्रॅन्सिस शिकागोहून ऐतिहासिक फिलाडेल्फिया शहरांतील गरीब वस्तीत काम करण्यास दाखल झाली. आपण सामाजिक शिक्षणाचा पाया घालित आहोत ह्याची तिला त्या वेळी अंधुक ही कल्पना नव्हती. तेथील पोलीस अधिकारी व काही राजकीय नेत्यांच्या मदतीने तिने गरिब कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. ह्याचा परिणाम म्हणजे ती आपल्या कामात हळूहळू तरबेज होत गेली. सामाजिक प्रश्न सोडविण्याची तिची भूमिका अगदी व्यावहारिकच वाटे. ठोकळेबाज सिद्धांत नित्याचे प्रश्न सोडविण्यात कसे असमर्थ व लंगडे होऊन जातात ह्याचा अनुभव तिला तिथेच आला. फिलाडेल्फिया शहरात मिळविलेल्या मौल्यवान अनुभवाचा फायदा पुढे न्यूयॉर्क शहरातील ग्राहक संघात काम करताना व तेथील सामाजिक प्रश्नाचा आढावा घेताना तिला झाला. तेथील सुप्रसिद्ध कोलंबिया विश्वविद्यालयात तिने राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. पदवीधर होऊन तिने न्यूयॉर्कच्या ग्राहक संघाच्या कामात पून्हा स्वत:ला झोकून दिले. तिची कामाची तडफ, कुशाग्र बुद्धिमत्ता व संघटनकौशल्य लक्षात घेऊन न्यूयॉर्क चे तत्कालीन राज्यपाल फ्रँकलिन डी. रूझवेल्ट ह्यांनी आपल्या राज्ययंत्रणेत अत्यंत उच्च पदावर तिची नेमणूक करून न्यूयॉर्कच्या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याची संधी तिला दिली.

न्यूयॉर्क, बॉस्टन व फिलाडेल्फियासारख्या मोठ्या शहरात कामे करून फ्रॅन्सिने अव्वल दर्जाचा अनुभव व राजकीय कौशल्य प्राप्त करून घेतले होते. त्यानंतर तिने न्यूयॉर्क राज्याच्या अल्बनी ह्या राजधानीत एक प्रभावितकार (लॉबिस्ट) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत मिळविलेल्या अनुभवांतून ती एक महत्त्वाची गोष्ट शिकली होती. ती म्हणजे सार्वजनिक जीवनात काम करताना नेत्याला दोन्ही बाजू सरकार व जनतेला पटवून देण्यासाठी किती संशोधन प्रथम करावे लागते! किती बोलके आकडे एकत्र करावे लागतात! त्याशिवाय वाटाघाटींच्या वेळी नेत्यांचा व ग्राहकांचा अहंकार लक्षात घेऊनच पुढचे पाऊल टाकावे लागते, हे तिला प्रकर्षाने जाणवले.

आपली बाजू अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडून व वकिली तंत्राचा उपयोग करून तिने सरकारी अधिकारी व कायदेमंडळाला प्रभावित केले. तिने मांडलेले मुद्दे बिनतोड असतात व तिच्या आकड्यांत गफलत होणार नाही असा निर्वाळा न्यूयॉर्कच्या कायदेमंडळाच्या काही सभासदांनी तिच्या कार्याबाबत दिला होता. 18 वर्षांहून लहान असलेल्या मुलीच्या कामाचे तास 10 तासापर्यंतच मर्यादित करण्यात यावे यासाठी फ्रॅन्सिसने दिलेल्या प्रभावी जबानीचा परिणाम म्हणजे त्यांचे तास आठवड्याला 54 पर्यंत करण्यात आले. तिचा हा प्रचंड विजय होता.

पण त्या वेळी न्यूयॉर्क विधानसभेत प्रभावितकार म्हणून काम करणारे सारेच पुरुष. ती एकटीच स्त्री प्रभावितकार असल्याने आपल्याबरोबर काम करणाऱ्या मित्रांचा अहंकार दुखावला जाणार नाही याची ती नेहमी खबरदारी घेई. त्यासाठी ती एखाद्या आदर्श मातेला साजेसा पेहराव करी. त्याशिवाय तिच्या डोक्यावरील त्रिकोणी टोपी सर्वपरिचित झाली होती. आपले विचार विधानसभेत मांडताना ती आक्रमक पवित्रा कधी धारण करीत नसे. कारण समितीचे सारे सभासद नेहमीच पुरुष असल्याने आपल्या उद्दिष्टाला कुठे तडा जाणार नाही ह्याची तिला नेहमी दक्षता बाळगावी लागे. मानसशास्त्राचा उपयोग तिने आपल्या ध्येयपूर्तीसाठी भरपूर करून घेतला. त्याचा परिणाम म्हणजे तिच्या कार्यक्रमाला समिती नेहमी मंजुरी देई. तिचे विधानसभेचे कार्य एवढे प्रभावी होते की त्यावेळचे न्यूयॉर्क राज्यपाल अँड स्मिथ हे तर फ्रॅन्सिसचे चाहते बनले. त्यांनी तिला मजूर आयोगाचे अध्यक्षस्थान देऊन तिचा गौरव केला. 1919 मध्ये तिच्या नेतृत्वाची व वाटाघाटीतील कौशल्याची खरोखर परीक्षाच झाली.

त्या वर्षी न्यूयॉर्क राज्यातील रोम शहरात 5 हजार कामगारांनी संप पुकारल्याने तेथील वातावरण तंग होऊन कित्येक ठिकाणी हिंसा झाली. रोमच्या मेयरने राज्यपालांकडे मदतीसाठी धाव घेतली. अॅल स्मिथ पुढे फ्रॅन्सिसचे नाव चमकले. पण एका स्त्रीला धोक्याच्या ठिकाणी पाठवून तिचे काही बरेवाईट झाले तर? फ्रॅन्सिसने हे आव्हान हसतमुखाने स्वीकारले. ट्रेनने ती जेव्हा रोमला आली तेव्हा त्या शहरात खून झाल्याने वातावरण अधिकच तापले होते. काही डोकेफिरू मजुरांनी एका मिलमालकाला खुनाची धमकीही दिली होती. त्या मालकाने संपात भाग घेणाऱ्या इटालियन मजुरांना जातीवरून शिव्या वाहिल्याने ते अपमानित झाले होते. फॅक्टरीकडे जाणारे रस्ते शस्त्रधारी मजुरांनी रोखले होते. फ्रॅन्सिस मोठ्या हिमतीने टॅक्सीमधून उतरून फॅक्टरीच्या ऑफिसकडे निघाली, मजुरांनी तिला प्रतिकार केला नाही. दोन दिवस तिने मजूर व मालकांशी प्रदीर्घ वाटाघाटी करून व एकमेकांविषयीचे गैरसमज दूर करून समझौता घडवून आणला. त्याशिवाय फॅक्टरीचे  मालक रोज 8 तासांच्या मजुरांच्या मागणीला कबूल झाल्याने तिचे वाटाघाटीचे कार्य अधिक सुलभ झाले. पण युनियनला आपण आज मान्यता दिली तर हे कामगार आपल्याच डोक्यावर बसतील अशी वेडी समजूत मालकवर्गाची होऊन बसली होती. पण मानवी स्वभावाची फ्रॅन्सिसला चांगली जाणीव असल्याने हा भीतीचा ब्रह्मराक्षस मालकांच्या पाठीवर कुणी बसवून दिला ह्याची कल्पना तिला चौकशीनंतर लवकरच आली. ही भीती निर्माण करणारी व्यक्ती होती जैम्स स्पॅरगो. हा माणूस अत्यंत खुनशी व तिरसट होता. ह्या मालकाला युनियन डोळ्यांत सले, अन् मजुरांना तो नको होता. त्यात पुन्हा राज्यपालांच्या हुकुमाने रोममध्ये शस्त्रधारी घोडेस्वार मुक्तपणे पहारा करीत असल्याने आगीत तेल पडल्यासारखे झाले. अशा भडकलेल्या आगीला फ्रॅन्सिस शांत कशी करणार? काही मजुरांनी, काही ठिकाणी पोलिसांनी मजुरांवर शस्त्रे चालविल्याने फॅक्टरीच्या आजूबाजूला सुरुंग पेरून ठेवले. फ्रॅन्सिसने गोडीगुलाबीने काम करून मजुरांना प्रथम फॅक्टरीतील सुरुंग काढून घेण्याची सूचना केली. ती मान्य झाल्यावर तिने राज्यपालांच्या मदतीने शस्त्रधारी पोलिसांना रोममधून परत पाठविले.

आयोगाच्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या साक्षी होऊ लागल्या. पण मालक पेटले होते. जेम्स स्पॅरगोने कामगारांच्या तोंडावर सिगारचा धूर टाकीत उघडपणे ऐकविले- 'तुम्ही व तुमच्या मागण्या खड्ड्यात गेल्या!' झाले! आता मजूरही भडकले. अशा वेळीच स्पॅरगोने मजुरांचा अपमान करणारे लिहिलेले पत्र फ्रॅन्सिसच्या हातात आले. तिने ते पत्र सभेत वाचण्यास सुरुवात केली तेव्हा फॅक्टरीच्या काही मालकांना हे खरेच वाटेना. आपल्याच एका सभासदाने असे लज्जास्पद पत्र पाठविले ह्यावर प्रथम त्यांचा विश्वासच बसेना. मालक मंडळीने ह्या घटनेबद्दल मजुरांची माफी मागितल्याने मजूर-मालकांत 'सौहार्दा'चे वातावरण निर्माण झाले. वाटाघाटी यशस्वी होऊन मजूर-मालक व राज्यपाल ह्यांनी फ्रॅन्सिसची पाठ थोपटली. तिच्या कार्याचे गौरव करणारे लेख साऱ्या वर्तमानपत्रांत आल्याने तिचे नाव न्यूयॉर्करांच्या तोंडी आले. पण स्वभावाने प्रसिद्धिपराङ्मुख असल्याने फ्रॅन्सिसने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. प्रसिद्धीची भपकेबाजी ती नेहमी टाळी.

1928 मध्ये फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे न्यूयॉर्कचे राज्यपाल म्हणून निवडून आले. फ्रॅन्सिसने त्या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जरी काम केले होते तरी रूझवेल्ट ह्यांना तिच्या यशस्वी कारकीर्दीचा व कौशल्याचा चांगला परिचय असल्याने त्यांनी तिला आपली सल्लागार म्हणून निवडले. राज्यपाल रुझवेल्ट व सल्लागार फ्रॅन्सिस ह्यांची जोडी साऱ्या राज्यात लोकांच्या परिचयाची झाली. पुढील वर्षी रूझवेल्ट जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी फ्रॅन्सिसला आपल्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री म्हणून निवडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अमेरिकन सरकारच्या राष्ट्रपतीच्या मंत्रिमंडळात सन्मानाने नियुक्त झालेली फ्रॅन्सिस पर्किन्स ही पहिली स्त्री सभासद होती. वृत्तपत्रे तिचा उल्लेख 'मॅडम सेक्रेटरी' म्हणून करू लागली. फ्रॅन्सिसने आपल्या विभागात अत्यंत कार्यक्षम माणसांची निवड केली. पण त्यावेळच्या डेमोक्रॅटिक पक्षात पैशाच्या जोरावर कोणतेही पद मिळविणार्‍या बाजारबुणग्यांचा अगदी सुळसुळाट झाला होता. आपल्याला अनुकूल असे कायदे पास करवून घेण्यात हे स्वतःची अक्कल व पैसा खर्च करीत. फ्रॅन्सिसने अशा उपटसुंभांना चार हात दूरच ठेवल्याने अनेकांनी राष्ट्रपतींकडे तिच्याबाबत तक्रार केली. पण राष्ट्रपतींचा तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. लोकांचा जबरदस्त विरोध असूनही फ्रॅन्सिसने सामाजिक सुरक्षितेचे बिल (सोशल सिक्युरिटी बिल) हे काँग्रेसमधून मंजूर करवून घेऊन लाखो, निराधार, उतारवयीन जनतेचे आशीर्वाद घेतले. अनेक वर्षे काबाडकष्ट करूनही ह्या लोकांना जीवनाच्या संध्यासमयी कोणताही आर्थिक आधार मिळत नसे. त्यासाठी राष्ट्रपती रूझवेल्ट व मजूर मंत्री फ्रॅन्सिसने देशभर दौरे करून लोकमत तयार केले होते. सामाजिक सुरक्षिततेचे बिल हे समाजवादी व्यवस्थेची नांदी आहे अशी कोल्हेकुई तिच्या विरोधकांनी केली. आज 60 वर्षांनंतरही फ्रॅन्सिसने पुढाकार घेऊन जे बिल मंजूर करवून घेतले होते त्याबद्दल लाखो म्हातारे तिला दुवा देत आहेत. पण त्या वेळी प्रगतिवादी न्यूयॉर्क टाइम्सनेसुद्धा ह्या बिलाला कडाडून विरोध केला होता. हा कायदा म्हणजे तिच्या इतक्या वर्षांच्या सामाजिक कार्याला आलेले गोड फळ होते.

अशाच प्रकारे मजुरांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जनरल मोटर्ससारख्या कंपनीच्या मालकांना फ्रॅन्सिसने वटणीवर आणले. पण तिच्या वाढत्या यशाबरोबर तिच्या शत्रूंची संख्याही वाढत गेली. काहींनी तिच्यावर ‘साम्यवादी’ असा शिक्का मारला. टेक्सास राज्यांतील एका करोडपतीने तिच्यावर देशद्रोहाचा आरोप करत तिच्या बडतर्फीची मागणी केली. कधीकधी अशा अर्थशून्य टीकेला ती कंटाळून जाई. तिने राष्ट्रपतीकडे त्रासून दोनदा आपला राजीनामा पाठवून दिला. पण राष्ट्रपतींनी तो कधीच स्वीकारला नाही.

1939 साली जपानने अचानकपणे अमेरिकेवर आक्रमण केल्याने राष्ट्रपतींनी तात्काळ जपानशी युद्ध जाहीर करताच शांतता पुरस्कर्ती फ्रॅन्सिस व त्यांच्यात उघडपणे मतभेद झाले. त्यांत पुन्हा रूझवेल्ट ह्यांनी गुप्त पोलीसखात्याचा प्रमुख म्हणून नेमलेल्या जे. एडगर व्हूवर ह्यांचे अधिकार फ्रेन्सिसने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रपतींचे व तिचे मतभेद शिगेला पोहोचले. 

थोर नेत्याचे अनेक गुण असूनही एक स्त्री म्हणून फ्रॅन्सिसचे पुरुषप्रधान देशात व्हावे तसे चीज झाले नाही. स्त्रीने पुरुषासारखे वागावे अशी त्या लोकांची समजूत असते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीपुरुषांना मोजण्याचे दंडमापकही निराळे असतात. हेच खरे!

रुझवेल्टची पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवड झाली तेव्हा फ्रॅन्सिसने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ती न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विश्व विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागली. 1946 मध्ये तिने 'मला माहीत असलेला रूझवेल्ट' नावाचे एक पुस्तक लिहिले. तिच्या राजकीय व सामाजिक कार्याचे मूल्यांकन करताना एका वृत्तपत्रकाराने मोठ्या गौरवाने लिहिले, 'फ्रॅन्सिस ही मोठी विचारवंत कधीच नव्हती; तिने सरकार व समाजावर गलेलठ्ठ ग्रंथ कदाचित वाचलेही नसतील. पण तिची स्वयंप्रेरणा एवढी विश्वसनीय होती की सरकारी प्रश्नांवर तिने घेतलेली भूमिका क्वचितच चुकीची ठरत असे!'

Tags: साम्यवादी जैम्स स्पॅरगो न्यूयॉर्क फ्रॅन्कलीन डी. रूझवेल्ट मजूर मंत्री फ्रॅन्सिस पर्किन्स Communist James Spargo New York Franklin D. Roosevelt Labor Minister Frances Perkins weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके