डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुबळ्यांना मदत करतात त्यांना अशा गोष्टींमुळे मनस्वी वेदना होणे स्वाभाविक असते. मात्र सामाजिक आणि आर्थिक दडपणाखाली दुबळा माणूस किती अधिक दुबळा होऊ शकतो याचा अंदाज घेतला तर अशा घडामोडीचे फारसे आश्चर्य वाटत नाही.

अहमदाबादेतील बेस्ट बेकरी आता देशभर कुख्यात झाली आहे. त्यात तयार होणाऱ्या ब्रेडसाठी नव्हे, ब्रेडऐवजी तो करणारी माणसेच तेथे मारली गेली यासाठी. या संबंधातला खटला नव्याने मुंबईत आता चालू आहे. खटल्यातील मुख्य साक्षीदार जाहिरा शेख हिने दिलेल्या वेगवेगळ्या जबान्यांपैकी कोणती खरी मानावी असा प्रश्न न्यायालयासमोर आहे. गुजरातेतल्या जातीय दंगलींच्या वेळी पोलिसांनी तपास करताना जाहिराची जबानी घेतली. अशी जबानी शपथेवर नसते. पण ती साक्षीदाराची उलटतपासणी करताना वापरता येते. दुसरी जबानी जाहिराने अहमदाबादच्या न्यायालयात दिली. अहमदाबादच्या न्यायालयाने आरोपींना पुरावा नसल्यामुळे सोडून दिले. नंतर जाहिराने आपल्यावर दडपण आल्यामुळे आणि आपल्याला धमक्या आल्यामुळे न्यायालयात आपण काही सांगितले नाही. वस्तुतः आपण गुन्हा पाहिला आहे, असे सांगायला सुरुवात केली.

तिने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आणि आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. जाहिरानेही तेथे खटला पुन्हा चालवला जावा व तोही गुजरातच्या बाहेर, अशी मागणी केली. जाहिराला काही स्वयंसेवी संघटना या कामी मदत करीत होत्या. श्रीमती तिस्ता सेटलवाड या सामाजिक कार्यात रस घेणाऱ्या एक वकील जाहिरातर्फे काम करीत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडणारा गुजरात न्यायालयाचा निकाल बाजूला सारून हा खटला पुन्हा चालवला जावा, असा निर्देश दिला. साक्षीदारावर दडपण येऊ नये व फिर्यादीची बाजू व्यवस्थित मांडली जावी यासाठी गुजरातच्या बाहेर, महाराष्ट्रात हा खटला चालवला जावा असाही आदेश दिला. त्यानुसार खटला मुंबईत सुरू झाला आहे. आता जाहिराने आपली भूमिका पुन्हा बदलली आहे आणि आपण गुन्हेगारांना पाहिलेच नाही, असे न्यायालयात सांगितले आहे. आपली पूर्वीची अहमदाबादच्या न्यायालयातील जबानीच बरोबर आहे, असे ती आता म्हणत आहे.

या सर्वांपेक्षा अधिक गंभीर गोष्ट म्हणजे आपल्या वकील श्रीमती तिस्ता सेटलवाड यांनी आपल्याला धमक्या दिल्या म्हणून आपण मानवाधिकार आयोग आणि इतरत्र तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयात गेलो; चुकीच्या तक्रारी केल्या व तशी शपथपत्रे दिली असे आता जाहिरा म्हणते आहे. हे तिचे म्हणणे खरे अगर खोटे यांचा निर्णय न्यायालय करणार आहे. त्यामुळे जाहिराच्या या म्हणण्याविषयी आज विचार करण्याचे अगर मतप्रदर्शन करण्याचे कारण नाही; पण दुसराच एक महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण होतो, त्याचा मात्र विचार केला पाहिजे.

समाजातील दुबळ्या घटकांना कित्येक वेळा कायद्याचे मिळणारे संरक्षण, घटनेने दिलेले हक्क उपभोगता येत नाहीत. बलवान घटकांचे दडपण आणि आर्थिक दुर्बलता या दोन कारणांमुळे पुस्तकातील संरक्षण प्रत्यक्षात येत नाही. अशावेळी काही व्यक्ती आणि संघटना या दुबळ्या घटकांना मदत करू पाहतात. ज्या पदाधिकाऱ्यांची, संस्थांची अशा पीडितांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांना जागे करतात. आवश्यक ते संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.

भागलपूरला कैद्यांचे डोळे फोडण्यात आले, तेव्हा ते प्रकरण न्यायालयासमोर आणण्यासाठी अशीच मदत मिळाली. आदिवासींचे पुनर्वसन झाले नाही, त्यावेळी त्यांना न्यायालयासमोर उभे करायला अशीच मदत देण्यात आली. वसुधा धागमवारांपासून मेधा पाटकरांपर्यंत अनेक व्यक्ती आणि काही संघटना सरकार आणि न्यायालयापर्यंत दुबळ्यांचा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.

एखाद्या दुबळ्या व्यक्तीला किंवा समाजघटकाला कोणी मदत करतो, तेव्हा ज्याला साहाय्य होते तो मदत करणाराबद्दल निदान कृतज्ञ असेल अशी आपण अपेक्षा करतो. कृतज्ञ राहिला नाही तरी निदान आपल्या हितकर्त्यांविरुद्ध तो काही करणार नाही अशी आपण अपेक्षा करतो; पण नेहमीच असे घडत नाही. दुबळ्यांचे दुबळेपण कित्येक वेळा उपकारकर्त्यांविरुद्ध अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभे राहण्याला त्याला भाग पाडते. गुलामगिरीविरुद्ध झालेल्या अमेरिकन यादवीयुद्धात गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या दक्षिणी संस्थांच्या बाजूने दक्षिणेतल्या काही गुलामांना लढावे लागलेच ना? अन्याय करणाऱ्या शक्तींनी त्याला सर्व बाजूने एवढे घेरलेले असते, की पुन्हा एकदा त्यांच्या दडपणाला त्याला बळी पडावे लागते. काही वेळा आर्थिक दारिद्र्यामुळे तो प्रलोभनाला बळी पडतो आणि उपकारकर्त्यांच्याविरुद्ध उभा राहतो.

पुरोगामी चळवळीतला माझा एक मित्र छोटेसे साप्ताहिक चालवत होता. एका पोलीस अधिकाऱ्याने काही गरीब लोकांना विनाकारण मारहाण केली. या मारहाणीबद्दलची तक्रार पोलीस ठाण्यात कोणी घेत नव्हते. त्यांतली काही मंडळी या संपादक मित्राला भेटली. त्यांनी आपली कथा त्याला सांगितली. अन्याय होऊनही कोणी दखल घेत नाही हे पाहून संपादकाला सात्त्विक संताप आला. त्याने ही सगळी हकीगत आपल्या जळजळीत प्रतिक्रियेसह लिहून काढली. योगायोगाने त्या दिवशी मी त्या गावात दुसऱ्या काही कामासाठी गेलो होतो. एका मित्राच्या घरी मी बसलो असताना हा संपादकमित्र तेथे आला आणि सगळी हकीकत सांगून त्याने आपण लिहिलेला लेखही दाखविला.

लेखात लिहिले होते ते सत्य असावे. परंतु पुढे काय अडचणी येऊ शकतात याचा मला थोडा अंदाज येत होता.

समाजाच्या दुबळ्या घटकातले ते लोक होते, म्हणूनच पोलीस अधिकाऱ्याने त्यांना अशी विनाकारण मारहाण करण्याची हिंमत केली होती. लेख छापला गेल्यानंतर पुन्हा तो पोलीस अधिकारी दडपण आणून अगर त्यांना विकत घेऊन आपली जबानी फिरवण्याला सांगू शकत होता आणि नंतर संपादकच अडचणीत आला असता. 'असा लेख छापण्यापूर्वी फार काळजी घेतली पाहिजे. शक्य तर अशी तक्रार करणाराची शपथपत्रे तुझ्याजवळ पाहिजेत. तसेच या तक्रारीच्या खरेपणाविषयी तू स्वतः खात्री करून घेतली पाहिजेस, असा मित्रत्वाचा सल्ला मी त्याला दिला. परंतु साप्ताहिकाचा अंक दुसऱ्याच दिवशी निघणार होता. तक्रार करणारे लोक आपापल्या गावी निघून गेले होते. पुढच्या अंकापर्यंत वाट पाहायची संपादकाची तयारी नव्हती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तो उतावळा असणे स्वाभाविक होते. माझा सल्ला त्याने ऐकून घेतला, पण तो त्याला पटलेला मात्र दिसला नाही. 

त्याचदिवशी संध्याकाळी मी माझ्या गावी परत आलो. त्या साप्ताहिकाचा आकार आणि प्रसार दोन्हीही फार लहान होते. ते मला वाचावयास मिळत नव्हते. मित्राची भेट मी विसरून गेलो. पुढे दोन-चार महिन्यांनंतर ते संपादकमित्र भेटावयाला आले. त्यांनी एका न्यायालयीन तक्रारीची प्रतही सोबत आणली होती. संपादकांविरुद्ध न्यायालयात बदनामीची फिर्याद दाखल झाली होती आणि पोलीस अधिकाऱ्याने दाखल केलेल्या या फिर्यादीत मारहाण झालेले लोकच फिर्यादीचे साक्षीदार झाले होते. न्यायालयाचे समन्स मिळाल्यानंतर ज्यांची बाजू त्याने मांडली होती त्यांना संपादक भेटावयास गेला तर त्यांनी फिर्यादी पोलीस अधिकाऱ्याने आमच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली आहेत. आता आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले. सद्यःकाळात न शोभणारा भोळेपणा व निष्काळजीपणा दाखवल्यामुळे संपादकमित्र अडचणीत आला होता. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांची क्षमा मागून ते प्रकरण मिटवावे लागले. दुबळ्यांच्या साहाय्याला जाताना, त्यांना खऱ्या तक्रारीबद्दलही मदत करताना निःस्वार्थी कार्यकर्त्यानेही काळजी घेतली पाहिजे हा धडा त्या मित्राला मिळाला होता. 'अन्याय घडो कोठेही, धावून तिथेही जाऊ' असा स्वभाव असलेल्या त्या मित्राच्या त्स्वाभाविक उत्साहावर या घटनेमुळे थोडेसे विरजण पडले होते.

असे प्रसंग फक्त संपादकावरच येतात असे नाही. ते वकिलावरही येतात. अन्यायाविरुद्ध गळा काढणाराच थोडा काळ गेल्यानंतर असे काही घडलेच नव्हते, असे सांगायला पुढे येऊ शकतो. साक्षीदार जबानी बदलतात हे तर सोडा, फिर्यादीसुद्धा कधी-कधी बाजू बदलतात आणि इतरांना अडचणीत आणतात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुबळ्यांना मदत करतात त्यांना या गोष्टीमुळे मनस्वी वेदना होणे स्वाभाविक असते. मात्र सामाजिक आणि आर्थिक दडपणाखाली दुबळा माणूस किती अधिक दुबळा होऊ शकतो याचा अंदाज घेतला तर अशा घडामोडीचे फारसे आश्चर्य वाटत नाही.

उपकारकर्त्यावरच कधी कधी असा उलटवार होतो, हे खरे. पण म्हणून कार्यकर्त्यांनी, सेवाभावी संस्थांनी आपले काम सोडून द्यावे काय? एखाद्या वकिलाच्याविरुद्ध त्याचा अशील उलटण्याचा प्रकार घडला तर वकिलांनी आपले काम सोडून द्यावे काय? अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी सोडून द्यावे काय? या प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारार्थी आहेत. एक तर असे प्रकार क्वचितच घडतात. परंतु घडतात ते त्रासदायक असतात हे खरे. म्हणून काळजी घ्यावी लागते. एखाद्या तक्रारदाराचे शपथपत्र करून जवळ ठेवले तरी ते शपथपत्रसुद्धा दडपण आणून करून घेतले आहे असे म्हणायला तो मोकळा असतो. परंतु अशा वेळी आपली बाजू थोडीशी बरी होते.

भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी कोणी बोलले तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. एखादा गैरप्रकार उघडकीस आणला तर त्यात तोच सामील आहे अशी उलट तक्रारसुद्धा होते. समाजात कुणीही चांगले नाही, असे ठरले म्हणजे आपल्याला धोका नाही असे गैरप्रकार करणारांना वाटत असावे. समाजातली सज्जनशक्ती खच्ची करणे हे गुन्हेगारांचे उद्दिष्ट असणे स्वाभाविक आहे.

मदत करणारालाच गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा त्याला मनःस्ताप भोगावा लागतो. अन्याय करणाऱ्या शक्तींच्याविरुद्ध लढणाऱ्यांवर असे प्रसंग येणारच. पण म्हणून आपले काम सोडायचे नसते. मात्र अतिउत्साह आणि आपल्यालाच अडचणीत आणू शकणारा भोळेपणा सोडून द्यावा लागतो. अन्यथा हाती घेतलेल्या कामाचे तर नुकसान होतेच, पण आपणही अडचणीत येतो. दुसरा एक तोटा म्हणजे लोकसेवा करणारे लोक ढोंगी किंवा खोटेपणा करणारे असतात, असा चुकीचा समज पसरतो. अन्यायाविरुद्धच्या चळवळीतसुद्धा काही अप्रामाणिक किंवा हितसंबंधी लोक दाखल होऊ शकतात. परंतु जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत असे घडते. त्यामुळे चांगल्या माणसांनी आपले काम सोडून द्यायचे नसते. आग विझवताना विझवणाराचे हातसुद्धा कधी कधी पोळतात. म्हणून आग विझवण्याचे काम थांबवायचे नसते.

Tags: संपादक साप्ताहिक समाजसेवा जातीय दंगली खटला सर्वोच्च न्यायालय मुंबई अहमदाबाद Editor Weekly Social Service Ethnic Riot Case Supreme Court Mumbai Ahmedabad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरेंद्र चपळगावकर,  औरंगाबाद, महाराष्ट्र
nana_judge@yahoo.com

निवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद पीठ.  वैचारिक लेखक.   न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख. 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके