डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

बुद्धिप्रामाण्यवादी नानासाहेब

नानासाहेब निखळ बुद्धिप्रामाण्यवादी होते. विचार स्वच्छ, स्पष्ट, धारदार होते. आता ईश्वराची गरज उरलेली नाही अशा त्यांची धारणा होती. प्रचलित धर्म त्यांना निरर्थक अडगळीसारखे वाटत होते. बुद्धि शरणं गच्छामि हाच त्यांना परिवर्तनाचा राजमार्ग वाटत होता.
 

आठवणीत राहिलेले नानासाहेब प्रथम भेटले, ते आणीबाणीत. त्या आधी दुरूनच परिचय होता. आणीबाणी चालू होती आणि साताऱ्याला भाषणासाठी ते आले होते. भाषणाआधी काही काळ माझ्या घरी थांबले होते. वेळ सायंकाळची होती. आणि तेवढ्यातही माझ्या घराच्या जिन्यातील प्रकाशव्यवस्था अपुरी आहे, ती सुधारण्याची सूचना त्यांनी दिलेली आठवते. एका खाजगी क्लासमध्ये शंभरएक जणांसमोर भाषण झाले. बाहेर श्रोता म्हणून रेंगाळणारा साध्या वेषातील पोलीस आहे याची कुजबूज भाषण चालू असताना सुरू झाली. नानासाहेब शांतपणे म्हणाले. 'त्याला आतच बोलवा, त्याचेही प्रबोधन करून टाकू.'

यानंतर नानासाहेब या ना त्या कार्यक्रमानिमित्ताने भेटतच राहिले. मनावर ठसा उमटवत राहिले. भारतीय संविधानांवर आम्ही त्यांची दोन व्याख्याने साताऱ्याला घेतली. दुसरे व्याख्यान झाल्यावर, रात्रीच त्यांना पुण्यात पोचावयाचे होते. स्वतंत्र गाडी करण्याची ऐपत त्यावेळी आमच्यात नव्हती. ऐंशीच्या आसपास वय असलेले नानासाहेब ज्या शांत, सहजपणे आरक्षण नसलेल्या साध्या बसमध्ये चढून रात्री नऊ वाजता निघाले ते आम्हा कार्यकर्त्यांना अचंबित करणारे वाटले. छात्रभारतीच्या युवासंकल्प मेळाव्याला त्यांना आम्ही बोलावले होते. 'मी हुंडा घेणार नाही' हा संकल्प आमच्या संकल्प पत्रात नव्हता. त्याबाबत हात वर करण्याचे आवाहन करून नानासाहेबांनी समोरच्या कॉलेज विद्यार्थ्यांची चांगली परीक्षा घेतली. 88 साली नानासाहेब अमळनेरला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शिबिरासाठी आले होते. ती वेळ साधून आमदार गुलाबराव पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला होता. त्यामध्ये नानासाहेब अनपेक्षितपणे 'आता बरेच वय झाले, पुन्हा अमळनेरला येऊन तुमची भेट घेणे होणार नाही. त्या अर्थाने ही भेट शेवटची' असे बोलून गेल्यावर अनेकांचे डोळे पाणावलेले मी पाहिले.

पण या सर्वांपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक गतिमान झाल्यावर त्यांचा संबंध अधिक निकटपणे येत गेला. माझ्या या विषयावरील 'भ्रम आणि निरास' या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याच्या विनंतीपत्राला त्यांनी अमेरिकेतून तत्पर पत्र पाठवले. भारतात पोचल्यावर पहिल्या आठवड्यातच त्यांनी प्रस्तावना लिहून दिली. ती चळवळीला खूप मार्गदर्शक ठरकी. माझ्या आणखी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला नियोजित पाहण्यांना येणे शक्य होणार नाही हे अगदी प्रकाशनाच्या दिवशी मला साताऱ्याला कळले. त्या पाहुण्यांच्या पेक्षा सर्वार्थाने ज्येष्ठ असलेल्या नानासाहेबांना ऐन वेळी, तेही साताऱ्याहून फोन करून निमंत्रित करण्याचे औद्धत्य मी केले. 'नरेंद्र, तुझ्या कामासाठी मी कोठेही येईन' असा दिलासा देत स्वतः रिक्षा करून नानासाहेब त्या कार्यक्रमाला आले. नानासाहेबांचा माझ्याबद्दल व चळवळीबद्दलचा हा हुकमी अनुग्रह फार मोलाचा ठरला. मुळात मी व्यापक चळवळीचा कार्यकर्ता, भाववाढीपासून झोपडपट्टीपर्यंत आणि महारवतनी जमिनीपासून ग्राहकतक्रार निवारणापर्यंत सर्वत्र काम करणारा, अंधथदा निर्मूलनाच्या कार्यात अधिक ओवला गेल्यावर अन्य कामांकडे दुर्लक्षच झाले. अनेक मित्रांना हे रुचले नाही. त्यांना ते चुकीचे वाटले. अशा वेळी या चळवळीला मान्यता देण्यात नानासाहेबांचा वाटा फार महत्त्वाचा होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे असो वा स्वतःला मिळालेल्या फाय फाऊंडेशन पुरस्कारातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यालय घसघशीत मदत करणे असो, नानासाहेब या चकवळीच्या सदैव साथीला राहिले. त्यांची विचारसंपन्नता विशाल असल्याने या विषयावर नानासाहेबांची अनेक व्याख्याने मी ऐकली. तरी एकासारखे दुसरे झाले नाही. प्रत्येक भाषणात काही वेगळी मांडणी, वेगळी उदाहरणे, वेगळे मुद्दे आढळावयाचे.

नानासाहेब निखळ बुद्धिप्रामाण्यवादी होते. विचार स्वच्छ, स्पष्ट, धारदार होते. आता ईश्वराची गरज उरलेली नाही अशी त्यांची पक्की धारणा होती. प्रचलित धर्म त्यांना निरर्थक अडगळीसारखे वाटत होते. बुद्धिं शरणं गच्छामि हाच त्यांना परिवर्तनाचा राजमार्ग वाटत होता. राजकारणातील अपरिहार्यतेने कधी तडजोड करावी लागलीही असेल पण असे अपवाद वगळता उक्ती आणि कृती यांमध्ये कमालीची सुसंगती बाळगण्यावर त्यांचा कटाक्ष होता. या भूमिकेतूनच धर्मनिरपेक्ष शासनाची त्यांची धारणाही बनलेली होती, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतून या विषयावर व्यापक जनसंवाद, प्रत्यक्ष कृती याचा प्रारंभ होईल असे त्यांना वाटत होते.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा देवधर्माशी उठता बसता संबंध येतो. आम्ही देव बुडवायला, धर्म तुडवायला, परंपरा उखडायला निघालेलो आहोत अशी एक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरीकडे आमच्या चळवळीची अधिकृत भूमिका 'आम्ही देवाधर्माबद्दल तटस्थ आहोत' ही मित्रांना गोंधळात टाकणारी वाटते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम 'मूले कुठारः' पद्धतीने करण्यासाठी देव आणि धर्म या कल्पनांवर ज्या परखडपणे हल्ला चढवावयास हवा तो आम्ही करत नाही याची त्यांना खंत व राग वाटतो.

देव-धर्माबद्दलची आमची भूमिका काही जणांना सोयिस्करवादी वाटते, तर काहींना आमची चळवळ फक्त बुवाबाजी सदृश ढोबळ अंधश्रद्धांच्या पुरती सीमित करणारी वाटते. वस्तुस्थिती अशी नाही. सूत्ररूपाने सांगावयाचे तर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मानसिक गुलामगिरीतून व्यक्तींनी, समाजाने बाहेर पडावे यासाठी जनसंवाद सुरू करते, कृतिकार्यक्रम देते. विधायक कठोर धर्मचिकित्सा करू इच्छिते आणि या सर्वांतून व्यापक परिवर्तनाशी आपले नाते जोडू इच्छिते. आज हे काम प्राथमिक पातळीवर आहे ते अधिकाधिक सकस व परिणामकारक आम्ही करू इच्छितो.

येथे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो असा की व्यापक परिवर्तनाशी नाते जोडू पाहणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वा कोणत्याही सामाजिक चळवळीने धर्माबाबत कोणती भूमिका घ्यावी यासाठी नानासाहेबांच्या विचारांतून काय मार्गदर्शन मिळते? नानासाहेबांचे लिखाण, भाषण, व्यक्तिगत चर्चा यांमधून त्यांना या संदर्भात जे मांडावयाचे आहे असे मला वाटते ते थोडक्यात असे. 'धर्म आणि देव' या संस्थांच्या कल्पनांची कालबाह्यता, व्यर्थता, अनावश्यकता पुरेशी सिद्ध झाली आहे. सुखी संपन्न माणसाचे स्वप्न आज विज्ञानाने कवेत आणले आहे. या विज्ञानाशी सुसंवादित्व बाळगून, त्याला मूल्य विचाराची जोड देऊन नैतिक पायावर जगाची रचना करणे इष्ट आहे, शक्य आहे व तोच योग्य मार्ग आहे. या नैतिक जाणिवांच्यासाठी झगडत असताना ज्या व्यक्तींना स्वतःच्या समाधानासाठी धर्माची, देवाची गरज लागते त्यांचेही सहकार्य घ्यावे, त्यांच्याशी वाद करावा, वैर नको. ही मनोभूमिका जनमानसात रुजविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उपयुक्त आहे.याचाच व्यवहारातला अर्थ असा की अंधश्रद्धा निर्मूलन वा तत्सम अन्य सामाजिक चळवळीचा पाया धर्मसुधारणेचा न ठेवता धर्म नाकारण्याचा, त्याला पर्याय देण्याचा, (जो विज्ञानाने उपलब्ध केला आहे) आणि ज्यांना हे पूर्वसंस्काराने जमणार नाही त्यांना उदार अंतःकरणाने (क्षमा करून) सामावून घेण्याचा असावा.

धर्मभावनेचे हे आकलन पुरेसे आहे की अपूर्ण आहे? यामध्ये धर्मभावनेचे आणि त्याआधारे होणाऱ्या जीवनव्यापी व्यवहारांचे आकलन सुलभपणे करण्याचा दोष तर येत नाही ना? जे व्यापक समाजपरिवर्तन आपणांस अभिप्रेत आहे. त्यासाठी ही भूमिका पूरक आहे, तारक आहे की मारक? महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांनी (आगरकरांचा अपवाद वगळता) धर्मसुधारणेची चळवळ चालविली ही त्यांची वैचारिक मर्यादा होती की प्रगल्भता? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेमहाराज यांच्यानंतरच्या जवळपासच्या गेल्या अर्धशतकात महाराष्ट्रात धर्मभावनेविषयी जनसामान्यांच्या मनाशी होणारा संवाद थांबला, कृतिकार्यक्रम तर दूरच राहिला हे परिवर्तनवादी शक्तीच्या दृष्टीने इष्ट का अनिष्ट?

नानासाहेब व त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्या, ज्या सर्वांच्यापासून आम्ही वैचारिक मार्गदर्शन घेतले, ते सर्वजण याबाबत आधी नमूद केल्याप्रमाणे निःसंदेह होते. आज चळवळीत असलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना हे आकलन प्रश्नचिन्हांकित करावे असे वाटते. त्यांचे मत थोडक्यात असे की, 'प्रतिगामी शक्तीचा पायाभूत आधार धर्मच आहे अशी मांडणी बहुतेक सर्व परिवर्तनवादी करत आले आहेत. स्वाभाविकच तर्काच्या आधारे धर्म निरर्थक ठरवून कोट्यवधी माणसांच्या मनातून त्याचे अस्तित्व पुसून काढण्याची या किमान निरर्थक ठरवण्याची महत्वाकांक्षा बाळगली गेली. धर्माचा एकूण व्यवहार हा प्रतिगामी राहिल्याने ती मांडणी काही मर्यादेपर्यंत पटतही होती. परंतु जनमानसाची धार्मिकता समजून घेण्यात अपुऱ्या आकलनाने झालेली ही चूक होती काय? या भूमिकेमुळे पुरोगाम्यांनी (अभिमानाने) धर्माकडे पाठ फिरविली; आणि लोकांनी (स्वाभाविकपणाने) त्यांच्याकडे पाठ फिरवली. धार्मिक जनमानस ज्यांच्या तावडीत मग सापडले त्यांना ते विकृत बनवणे व त्याआधारे आपले हितसंबंध साधणे शक्य झाले. लोकजीवनाचे नियमन लोकमानसात ज्या धार्मिक नीतीकडून होते तिचे स्वरूप खुप गुंतागुंतीचे असते. त्यामध्ये प्रथा, रूढी, चालीरिती, वैयक्तिक व सामूहिक उपासना, व्रतवैकल्ये यांबरोबरच नैतिक मूल्ये, आदर्श, उच्चतमश्रेया विषयीची‌ कल्पना, शाश्वताचा शोध, अतीताची ओढ अशा अनेक घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा एकमेकांशी मिलाफ होऊन जनमानसात मुरलेली नीती या स्वरूपात लोकांची धार्मिकता विधायक अंगाने व्यक्त होते किंवा व्यक्त होणे शक्य असते. कोणत्याही धर्माचा मूलभूत अस्सल आशय हा शोषणविरोधी व मानवतावादी असाच होता. ही खरी धार्मिकता पद्धतशीरपणे बाजूला सारून धर्मविधींचे पोकळ पालन, मूल्वविवेकाचा पूर्ण अभाव, अहंकारी हिंसक आक्रमकता हे धर्मकल्पनेचे मुख्य लक्षण बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे.जनसमूहाच्या पातळीवर याचा मुकाबला कसा करावयाचा? खऱ्या धार्मिकतेचे वेगळेपण मान्य करून, संवर्धन करून की धर्म नाकारून? प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनाचा असो, जमातवादाच्या मुकाबल्याचा असो, की धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभारणीचा असो त्यासाठी धर्मभावनेचे सखोल चिंतन व त्याआधारे अधिक अर्थपूर्ण (केवळ व्यवहारी नव्हे) कृतिकार्यक्रम महत्त्वाचा ठरत नाही काय? 

नानासाहेब अकाली गेले नाहीत पण अकस्मात गेले. या विषयांवर त्यांच्याशी वादसंवाद करण्याची निकड वाढत असताना विपरीत घडले,याची उणीव व रुखरुख आता कायमची जाणवत राहणार. 

Tags: भ्रम आणि निरास. नानासाहेब अमनेळ नरेंद्र दाभोळकर delusion and despair Nanasaheb Amanel #Narendra Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

1 नोव्हेंबर1945 - 20 ऑगस्ट 2013

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे  भूतपूर्व संपादक.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके