डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपल्यापैकी कुणीही त्याचं उत्तर द्या. प्रश्न असा: नंबर एक- घटनेमध्ये नागरिकांचं कर्तव्य म्हणून ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर दोन- शिक्षणाच्या गाभाघटकामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाच्या निर्मिती’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर तीन- मूल्यशिक्षणामध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा समावेश केलेला आहे. नंबर चार- तुम्ही ज्या विज्ञानयुगात जगता, त्याचा पाया ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे. आणि नंबर पाच- तुम्ही विज्ञानाचं जे शिक्षण घेतलंत, त्याचं तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हेच आहे. तर, एवढा महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हे मला एका शब्दात कोण सांगेल? 

मी 1970 मध्ये एमबीबीएस झालो. सन 1982 पर्यंत मी माझे दोन दवाखाने आणि रुग्णालय चालवलं. मी माझे दोन्ही दवाखाने आणि रुग्णालय 1982 मध्ये बंद केलं आणि तेव्हापासून मी ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी’चा पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. मी जेव्हा माझा पूर्ण वेळचा आणि चांगला चालणारा व्यवसाय बंद करून चळवळीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता बनलो, त्या वेळी मला जो प्रश्न लोक विचारत असत आणि आजही विचारतात; तो प्रश्न म्हणजे- ‘डॉक्टर, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्यासाठी स्वतःचा चांगला चालणारा व्यवसाय बंद करण्याची गरज आहे का?’ त्याचं उत्तर ‘गरज आहे.’

का गरज आहे? लक्षात घ्या- अंधार असलेल्या हॉलमध्ये जर मेणबत्ती लावली, तर प्रकाश पडतो; मेणबत्तीऐवजी पेट्रोमॅक्स लावला, तर आणखी प्रकाश पडतो; पेट्रोमॅक्सऐवजी ट्यूबलाईट लावली, तर त्याहून जास्त प्रकाश पडतो; आणि जर दिवस उगवला, सूर्य माथ्यावर आला, चारही बाजूंनी सूर्याची किरणं जर आतमध्ये घुसली- तर अंधार नाहीसा होतो. जसजसा प्रकाश येतो, तसतसा अंधार जातो. मानवी जीवनात शिक्षण व विज्ञान या दोन्हींचा प्रकाश जसजसा येईल आणि जसजसा त्यांचा प्रसार होईल, तसतसा अज्ञान व अंधश्रद्धा यांचा अंधकार नाहीसा होईल. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, अशा स्वरूपाचा विचार प्रश्नकर्त्यांच्या मनात आहे.

पण असं जर झालं असतं, तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता; वस्तुस्थिती काय आहे? मी आपल्याला फक्त दोन उदाहरणे देतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. भारतातली पहिली रेल्वेगाडी मुंबईहून ठाण्याला 1853 मध्ये सुटली. तोपर्यंत गाडी, घोडा, हत्ती, बैल यांसारख्या कुठल्याही पशूशिवाय एक वाहन शेकडो माणसांना इकडून तिकडं घेऊन जाऊ शकतं, असा विचारच या देशातल्या लोकांनी केलेला नव्हता. म्हणजे, त्या वेळी शाळेत ‘साहेबाचं पोर लयी अकली रं/ बिनबैलाची गाडी कशी हाकली रं’ अशा प्रकारच्या कविता म्हटल्या जायच्या. त्या वेळी ठाण्याहून मुंबईला बैलगाडीने यायला तब्बल 24 तास लागायचे. हा वेळ बघता, रेल्वेगाडी ही अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त सोय होती. त्या वेळेला या रेल्वेगाडीत बसण्यासाठी तिकीट नव्हतं; उलट लोकांनी गाडीत बसावं म्हणून गोरासाहेबच लोकांना एक रुपया देत असे. कारण लोक या गाडीत बसायला तयार नव्हते. ती गाडी म्हणजे, लोकांना काही तरी चेटूक वाटत असे. ‘या गाडीत बसवून हे गोरे आपल्याला मुंबईला नेणार. मुंबईला यांनी अनेक बांधकामं काढलेली आहेत. या बांधकामांच्या पायापाशी चिरडून हे आपल्याला मारणार. म्हणून लोक हो, या गाडीत बसू नका’, असे फतवे तेव्हा निघाले होते.

लोकांनी गाडीत बसावं म्हणून गाडीत बसणाऱ्यांना त्या काळी एक रुपया दिला जायचा. त्या वेळी एक रुपया ही नक्कीच मोठी रक्कम होती. मग लोक हळूहळू गाडीत बसायला लागल्यानंतर ती रक्कम आठ आणे केली गेली. मग ती चार आणे झाली. मग प्रवास मोफत केला गेला आणि मग या प्रवासासाठी तिकीट लावायला सुरुवात झाली; पण रेल्वेगाडीबाबतची त्या वेळची भावना अशी चेटुकाची असल्याने गाडी जेव्हा मुंबईहून ठाण्याला किंवा ठाण्याहून मुंबईला सुटायची- तेव्हा प्रत्येक वेळी सुवासिनी यायच्या, गाडीला ओवाळायच्या, गाडीच्या इंजिनाला हळद-कुंकू वाहायच्या आणि त्याला लिंबू-मिरची व उलटी काळी बाहुली बांधायच्या. हे मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा श्रोतृवर्गातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर हास्याची स्मितरेषा पाहतो. पण मला खरं सांगा- आजही आपल्या घरी किंवा आपल्या शेजाऱ्याच्या घरी दोन चाकी वाहन किंवा चार चाकी वाहन आलं, तर आपण हेच करतो ना? याचा अर्थ असा की- आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही! विज्ञानाची करणी घेतली, पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही.

आम्ही मध्यंतरी पुण्यामधल्या वीस हजार रिक्षांचं सर्वेक्षण केलं. प्रत्येक अमावस्येला अठरा हजार रिक्षांना लिंबू-मिरची आणि काळा बिब्बा बांधला जातो. आता, लिंबामध्ये अतिशय चांगलं असं ‘क’ जीवनसत्त्व असतं आणि ते पोषणाला अतिशय उपयुक्त असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. या देशात पोषणाचे अनेक प्रश्न आहेत. अशा वेळी एकट्या पुणे शहरामध्ये दर महिन्याला अठरा हजार लिंबांमधलं ‘क’ जीवनसत्त्व आपण वाया घालवतो! म्हणजे आपण कधी असा विचार केला का की, 150 वर्षांपूर्वीची कोणती गोष्ट आपण ठेवली? आपण 150 वर्षांपूर्वीचे कपडे घालून वावरत नाही, आपण 150 वर्षांपूर्वीचं अन्न खात नाही, आपण 150 वर्षांपूर्वीचं शिक्षण घेत नाही, आपण 150 वर्षांपूर्वीची वाहनं वापरत नाही; मग 150 वर्षांपूर्वीची लिंबू-मिरची आणि काळी बाहुली आपण का ठेवली? ती ठेवली याचं कारण, आपण विज्ञान वापरायला शिकलो; वैज्ञानिक दृष्टिकोन शिकलोच नाही!

पण ही गोष्ट आपल्याला वाटते, त्यापेक्षा अधिक गांभीर्याने घेण्याची आहे. मी आपल्याला चळवळीतलं एक उदाहरण देतो. अलीकडेच सत्यसाईबाबा निवर्तले. सत्यसाईबाबा म्हणत, ‘My  miracle is my visiting card’. चमत्कार करण्याची शक्ती मला त्या जगन्नियंत्याने दिलेली आहे. कारण तुमच्या उद्धारासाठी चमत्कार करणारा तो महापुरुष मीच, याची खात्री तुम्हाला पटावी.’’ त्यामुळे तुम्ही जर सत्यसाईबाबांना भेटायला गेलात, तर ते हवेमधनं हात फिरवायचे आणि तुमच्या हातावर अंगारा ठेवायचे; हवेमधनं हात फिरवायचे आणि तुमच्या हातावर सोन्या-चांदीची अंगठी ठेवायचे; आणि हवेमधनं हात फिरवून भेटायला आलेल्यांना त्यांनी सोन्याचं लॉकेट किंवा रत्नाचे हार दिल्याच्या कहाण्याही अस्तित्वात आहेत! आता लक्षात घेण्यासारखी बाब ही की- तुमच्या- माझ्यासारखा सामान्य माणूस भेटायला गेला, तर ते त्याला अंगारा द्यायचे; कुणी आमदार-खासदार भेटायला गेला, तर त्याला सोन्या-चांदीची अंगठी द्यायचे; कुणी राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा बडा भांडवलदार भेटायला गेला, तर त्याला किंवा त्याच्या लेकीला सोन्याची चेन द्यायचे! म्हणजे बाबादेखील भक्ताला त्याच्या लायकीप्रमाणेच देत असतो. आपली लायकी अंगारा घ्यायची; पण अंगारा याचा अर्थ राख. ती राख फक्त बाबांच्या पवित्र हातामधनं आली, म्हणून तिला ‘विभूती’ किंवा ‘अंगारा’ म्हणायचं. असो.

तर, असे हे सत्यसाईबाबा लातूर जिल्ह्यामधल्या चाकूरला येणार होते आणि त्यांच्या जिवंतपणीच त्यांचं एक भलं मोठं मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं. त्या वेळी लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम चालवत होतो. आत्ता मी जे बोललो, ते मी ठिकठिकाणी जाऊन जाहीर भाषणांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सांगत होतो. ज्या दिवशी सत्यसाईबाबा चाकूरला आले, तो दिवस महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा पहिला दिवस होता. खरं म्हणजे, त्या वेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधीमंडळात उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण ते सत्यसाईबाबांच्या दर्शनाला चाकूरला आले. प्रचंड मोठा जनसमुदाय होता. आम्ही मंडळी निदर्शनं करणार होतो. म्हणून लातूर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमधल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी 48 तास आधीच गजाआड केलेलं होतं. कार्यक्रम सुरू झाला आणि सत्यसाईबाबांनी भाषण सुरू केलं. भाषण सुरू केल्यानंतर पाच मिनिटांनी ते अचानक थांबले. त्यांनी आपला डावा हात हवेतनं फिरवला, एक सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्र्यांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांना दिली. (आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे.) पुन्हा त्यांनी भाषण सुरू केलं, वीस मिनिटं गेली, पुन्हा भाषण अचानक थांबवलं. मग उजवा हात हवेतनं फिरवला, एक सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना दिली. (आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे.) आणि भाषण संपवत असताना बाबांनी पुन्हा खालनं हात फिरवला, त्या हातामधनं अंगारा काढला आणि जमलेल्या बाया-बापड्यांना वाटला. म्हणजे जे आम्ही सांगत होतो, ते ‘याचि देही-याचि डोळा’ लोकांनी बघितलं.

माझ्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे संघर्ष वर्णिले आहेत, त्याच्यामध्येच मी आपल्याला आत्ता सांगितलेला हा किस्सा लिहिलेला आहे. पण गंमत खरं म्हणजे पुढेच आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव पटेल यांचं मला एकदा पत्र आलं. ते पत्र काय होतं?- ‘कळवण्यास आनंद होतो की, तुमच्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळालेला आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी आपण 25 नोव्हेंबरला औरंगाबादला यावं.’ यावर मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं, ते माझ्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. माझ्या त्या पत्रामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण एक अधिक गंभीर ओळ लिहिलेली आहे. ती अशी- ‘भारतीय संविधानाशी विसंगत वर्तन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून मी माझा पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही.’ आता मी काही एवढा उद्धट कार्यकर्ता नाही की, कुणी जर आपलं कौतुक करत असेल, तर ‘जाऽ मी नाही तुझ्याकडून कौतुक करून घेत!’, असं म्हणीन.

मी असं का लिहिलं? याचं कारण, 25 जानेवारी 1950 रोजी मला जी घटना मिळाली, त्यात फक्त नागरिकांचे हक्क होते. म्हणजे मला संचार-स्वातंत्र्याचा हक्क आहे. मी देशामध्ये कुठेही फिरू शकतो. मला अभिव्यक्तीचा हक्क आहे, मी पाहिजे ते बोलू शकतो. मला मालमत्ता धारण करण्याचा हक्क आहे, मी मालमत्ता खरेदी करू शकतो. परंतु घरामध्ये जसं आपण मुलं मोठी झाल्यावर त्यांना सांगतो की, ‘तुम्हाला हक्क मिळतील, पण तुम्हाला कर्तव्यंही पार पाडावी लागतील’, त्याच पद्धतीने 1976 मध्ये देशाच्या घटनेमध्ये वाढ करून, तिच्यामध्ये नागरिकांच्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे- it’s a duty of every Indian citizen to promote scientific temperament म्हणजे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा (सायंटिफिक टेंपरामेंटचा) विचार, प्रसार आणि अंगीकार करणं, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या- नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार ‘करावा की करू नये’, असं त्याला विचारलेलं नाहीये. ते त्याचं कर्तव्यच आहे. एवढंच नव्हे, तर त्याच्यानंतर 1987 मध्ये देशाचं नवं शैक्षणिक धोरण आलं. या शैक्षणिक धोरणामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ या महत्त्वाच्या गाभाघटकाचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मूल्यशिक्षण शिकवलं जातं. शालेय मूल्यशिक्षणामध्येही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जोपासनेची नोंद केलेली आहे.

आपण सगळे जण विज्ञानयुगात जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकही गोष्ट विज्ञानाच्या साह्यावाचून करू शकत नाही. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण ‘टूथब्रश’वर ‘टूथपेस्ट’ घेतो आणि ‘वॉशबेसिन’चा नळ सोडतो. लक्षात घ्या- यांपैकी एकही गोष्ट 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हती. ना टूथब्रश होता, ना टूथपेस्ट होती, ना वॉशबेसिन होतं. त्या वेळी तुम्हाला झाडाची काडी घेऊन विहिरीचं पाणी शेंदावं लागलं असतं! आणि आपल्यापैकी अनेक जण तर विज्ञानाचे पदवीधर असतील. आता हे सगळं महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांमध्ये सांगितल्यानंतर मी एक साधा प्रश्न विचारतो आणि दहा सेकंद थांबतो. आपल्यापैकी कुणीही त्याचं उत्तर द्या. प्रश्न असा: नंबर एक- घटनेमध्ये नागरिकांचं कर्तव्य म्हणून ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर दोन- शिक्षणाच्या गाभाघटकामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाच्या निर्मिती’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर तीन- मूल्यशिक्षणामध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा समावेश केलेला आहे. नंबर चार- तुम्ही ज्या विज्ञानयुगात जगता, त्याचा पाया ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे. आणि नंबर पाच- तुम्ही विज्ञानाचं जे शिक्षण घेतलंत, त्याचं तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हेच आहे. तर, एवढा महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हे मला एका शब्दात कोण सांगेल?

म्हणजे जसे तिसरी-चौथीत आपल्याला प्रश्न असतात की, समानार्थी शब्द लिहा. मग ‘पाणी’ हा शब्द असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो- ‘जल.’ ‘सूर्य’ हा शब्द असेल असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो- ‘रवी.’ ‘चंद्र’ हा शब्द असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो- ‘शशी.’ तसं माझं भाषण ऐकताना क्षणभर आपणही विचार करा आणि समानार्थी शब्द लिहा- ‘वैज्ञानिक दृष्टिकोन.’ माझा असा अनुभव आहे की, महाराष्ट्रामधल्या 99 टक्के महाविद्यालयांमध्ये 99 टक्के वेळेला याचं उत्तर येत नाही आणि आलं, तर चूक येतं. वैज्ञानिक दृष्टिकोन याचा एका शब्दामध्ये अर्थ- कार्यकारणभाव तपासणं! नंबर एक- प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. नंबर दोन- ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. नंबर तीन- जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही; पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजतं. आणि नंबर चार- यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे!

वैज्ञानिक दृष्टिकोन कळेपर्यंत माणूस या सृष्टीमधला दुबळा प्राणी होता. ‘माझ्या आयुष्यामध्ये जे-जे काही घडतंय; ते-ते घडण्यामागे देव आहे, दैव आहे, नशीब आहे, प्राक्तन आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे, कर्मविपाक आहे, मागच्या जन्मीचं पाप-पुण्य आहे, जन्माची वेळ आहे.’ अशा अनेक गोष्टी कार्यकारणभाव कळत नव्हता तोपर्यंत माणसाला वाटत होत्या. माणसाला कार्यकारणभाव कळला आणि जो माणूस परतंत्र होता, तो स्वतंत्र झाला; जो पराधीन होता, तो स्वाधीन झाला. आणि लक्षात घ्या, मानवी इतिहासामधली ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय रोमांचकारी घटना आहे! या पृथ्वीवरचा सगळ्यात दुबळा प्राणी म्हणून माणूस जन्माला आला, याचा आपण कधी तपशीलवार विचार केला आहे का? माणसाला साधं चिमणीप्रमाणे हवेमध्ये उडता येत नाही. माणसाला माशाप्रमाणे पाण्यात चोवीस तास राहता येत नाही. माणसाची आणि हरणाची पळण्याची शर्यत लावली, तर हरिण माणसाच्या तिप्पट वेगाने पळतं. कारण हरणाच्या पायांचे स्नायू माणसाच्या पायांच्या स्नायूंपेक्षा तिपटीने बळकट आहेत. हत्तीला आणि गेंड्याला निसर्गाने अपरंपार ताकद दिलेली आहे. त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. वाघ व सिंहाला तीक्ष्ण नखं आणि तीक्ष्ण दात दिलेले आहेत. त्यामुळे ते कच्चं मांस पकडू शकतात, फाडू शकतात, खाऊ शकतात. माणसाला हे अजिबात शक्य होत नाही. थंडीमध्ये माणूस कुडकुडतो, पण निसर्गाने अस्वलाला उबदार केसाळ कातडीचा कोट दिलेला आहे. त्यामुळे ते हिमप्रदेशातही मजेत राहतं. अंधारामध्ये बॅटरी घेतल्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही, पण मांजराचं पिलू अंधारामध्ये जाऊ शकतं. माकडाचं पिलू या झाडावरनं त्या झाडावर मजेत उड्या घेतं, मात्र माणसाला ते शक्य नसतं.

घरामध्ये जर दोन-तीन महिन्यांचं गोजिरवाणं बाळ असेल आणि जर तुम्ही त्याला हौसेने उचललंत, तर घरातल्या वयस्क बायका सांगतात- ‘मोठ्या हौसेने लेकराला उचललंय, पण त्याच्या मानेखाली हात घाला.’ माणसाच्या तीन महिन्यांच्या मुलाला स्वतःची मान सावरता येत नाही आणि तीन महिन्यांचं बैलाचं खोंड मात्र ढुशा देताना आवरत नाही. आपल्यापैकी अनेकांनी गाईचं नुकतंच जन्मलेलं वासरू बघितलं असेल. गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर बारा तासांमध्ये पाय झाडत उभं राहतं आणि माणसाचं पिल्लू बारा तास नव्हे, बारा दिवस नव्हेत, बारा आठवडे नव्हेत, बारा महिन्यांनी उभं राहिलं, तरी आम्ही टाळ्या पिटून म्हणतो, ‘बाळ्या उभा राहिला, कुणी नाही पाहिला!’

तर विचार असा केला पाहिजे की, माणूस नावाचा एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा? लोक असं म्हणतात, ‘तो सृष्टीचा स्वामी झाला, कारण त्याने आपली विचारशक्ती आणि बुद्धी वापरायला सुरुवात केली.’ मग मी त्यांना असं विचारतो, ‘सगळ्यांनाच बुद्धी आहे- हत्तीला बुद्धी आहे, म्हणून तो सर्कशीमध्ये काम करतो; कुत्र्याला बुद्धी आहे, म्हणून तो पोलीस खात्याला उपयोगी पडतो; डॉल्फिन माशाला तर चौथीतल्या पोराएवढी अक्कल आहे, तो पाणसुरुंग शोधून काढतो, बोटींना मार्ग दाखवतो; मग माणूसच बुद्धिमान कसा?’

लक्षात घ्या- माणूस या जगामध्ये फक्त पाच लाख वर्षांपूर्वी आला. माणसाचं शास्त्रीय नाव आहे, ‘मॅन द होमो सेपियन!’ खरं तर त्याचं पूर्ण शास्त्रीय नाव आहे, ‘मॅन द होमो सेपियन सेपियन.’ आता ‘होमो’ म्हणजे ‘प्राणी’, ‘सेपियन’ म्हणजे ‘शहाणा.’ मग इतका दुबळा प्राणी शहाणा झाला कसा? माणूस निर्माण झाला पाच लाख वर्षांपूर्वी. माणसाचा पूर्वज असलेला गोरिला किंवा ओरांगुटा, चिंपँझी, एप हे निर्माण झाले दीड कोटी वर्षांपूर्वी. ज्या प्राण्यांमध्ये मादी पिलाला जन्म देते आणि दुग्धाद्वारे त्याचं पोषण करते ते हत्ती, वाघ, सिंह यांसारखे सस्तन प्राणी निर्माण झाले तीन कोटी ऐंशी लाख वर्षांपूर्वी. अंदाजे चार कोटी वर्षांपूर्वी हत्ती निर्माण झाला आणि त्याचं वजन आहे 4000 किलो आणि फक्त पाच लाख वर्षांपूर्वी माणूस निर्माण झाला अन्‌ त्याचं वजन आहे 60 किलो. मग ‘तुलनात्मकरित्या’ कुणाचा मेंदू मोठा असला पाहिजे?’ असा प्रश्न विचारल्यानंतर लोक विचारात पडतात. कारण त्यांना माहीत असतं की, माणसाच्या मेंदूचं वजन साधारणपणे 1350 ग्रॅम ते 1500 ग्रॅम म्हणजे दीड किलो आहे आणि त्याच्या शरीराचं वजन 60 किलो आहे. म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये एक ते दीड टक्का एवढं माणसाच्या मेंदूचं वजन आहे; आणि 4000 किलो वजन असलेल्या हत्तीच्या मेंदूचं वजन आहे फक्त चार किलो! म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणामध्ये 1/10 टक्के!

आता आपल्यासमोरचा खरा प्रश्न असा की, हत्तीपेक्षा माणसाचा मेंदू इतका मोठा झाला कसा? मी जर असं म्हटलं की, माणूस हा देवाचा अत्यंत लाडका प्राणी आहे. त्याने रोज झाडाखाली बसून देवाची प्रार्थना केली की, ‘हे देवा- अक्कल दे, अक्कल दे, अक्कल दे’ आणि मग देव प्रसन्न झाला, त्याने माणसाला अक्कल दिली आणि माणसाचा मेंदू हळूहळू वाढला; तर तुम्ही सगळे जण हसाल. पण तुम्ही श्री गणपतीला मानता. गजानन हा बुद्धीचा देव आहे, असं मानता. त्याचं मस्तक हत्तीचं आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मग बुद्धीचा देव असलेल्या गजाननाने हत्तीला बुद्धी न देता माणसाला बुद्धी दिली, याचं इंगित काय आहे?

कशामुळे माणसाचाच मेंदू वाढला आणि अन्य कुठल्याही प्राण्यांचा मेंदू वाढला नाही? याचं उत्तर असं की, उत्क्रांतीमध्ये- (लक्षात घ्या, माणूस हा एक प्राणीच आहे. त्यामुळे आपण ‘मनुष्यप्राणी’ असं म्हणतो. सगळ्या प्राण्यांसारखेच माणसालाही पंजे आहेत) माणसाचा अंगठा सुटा झाला, माणसाच्या पंज्याची बोटं सुटी झाली, माणूस आपला अंगठा आपल्या बोटांवर टेकवायला लागला, त्याने स्वतःच्या दहा बोटांचं हत्यार किंवा अवजार केलं आणि आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. ही प्रक्रिया करता-करता त्याचा मेंदू वाढत गेला. या प्रक्रियेत काही हजार वर्षं गेली. मग माणसाने खालचा दगड उचलला. उचललेल्या दगडाला धार लावली. धार लावलेल्या दगडाला झाडाची फांदी तोडून जोडली आणि ‘कुऱ्हाड’ नावाचं प्राथमिक हत्यार केलं. नंतर हे हत्यार हळूहळू विकसित झालं. प्रक्रिया करण्याची माणसाची क्षमता वाढली आणि त्यामुळे त्याच्या मेंदूचा आणखी विकास झाला. मग काही हजार वर्षं गेली. माणसाने धातू शोधून काढला. नंतर त्याने धातूची अवजारं तयार केली. त्या अवजारांच्या आधारे प्रक्रिया करण्याची माणसाची क्षमता आणखी सुधारली. त्याचा मेंदू आणखी वाढला. लक्षात घ्या- श्रमाच्या द्वारे माणूस निसर्गावर प्रक्रिया करू लागला आणि त्याचा मेंदू वाढला.

माणसाची व्याख्या ‘विचार करणारा प्राणी’ अशी नाही, कारण सगळेच प्राणी विचार करतात. माणसाची व्याख्या आहे- Man is tool making animal माणूस हा ‘हत्यार’ किंवा ‘अवजार’ निर्माण करणारा प्राणी आहे- नंबर एक. आणि नंबर दोन- माणसासकट सगळेच प्राणी आधी चार पायांवर होते; मनुष्य नंतर दोन पायांवर आला. त्याने पुढच्या दोन पायांचं हातांत रूपांतर केलं आणि त्या हातांच्या आधारे निसर्गावर प्रक्रिया सुरू केली. पण ज्या वेळेला तो ताठ झाला, इरेक्ट झाला; त्या वेळेला त्याचं स्वरेंद्रिय वर सरकलं. माणसाच्या स्वरेंद्रियाची जेवढी कंपनं होतात, तेवढी कंपनं अन्य कुठल्याही प्राण्याच्या स्वरेंद्रियाची होत नाहीत. त्यामुळे माणसाने भाषा शोधून काढली. मग एका बाजूला श्रमांद्वारे निसर्गाशी संवाद आणि दुसऱ्या बाजूला भाषेद्वारे माणसांशी संवाद यामुळे माणसाचा मेंदू वाढला; कुठल्याही देवाची पूजा-अर्चा करून, जप- जाप्य करून, यज्ञयाग करून त्याचा मेंदू वाढला नाही.

त्यामुळे ज्या वेळेला आपण अंधश्रद्धेला बळी पडतो, त्या वेळेला काय घडतं? तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडलात, म्हणून नरेंद्र दाभोलकर किंवा ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चं काहीच बिघडत नाही. कुणाचं बिघडतं? लक्षात घ्या- मी जर तुमच्या घरी आलो आणि तुमचं घर बघून म्हटलं, ‘‘अरे वा! किती छान घर आहे! एवढं मोठं घर इतक्या लवकर बांधायला तुम्हाला कसं काय जमलं?’’ तुम्ही म्हणता, ‘‘अहो, हे मी नाही बांधलेलं, माझ्या वडलांनी बांधलेलं आहे. मला ते सांभाळायचं काम फक्त करायचं आहे.’’ आईच्या मैत्रिणीने आईच्या अंगावर जर खूप दागिने बघितले आणि मैत्रीण जर म्हणाली, ‘‘अगं, तुला इतके सोन्याचे दागिने! इतक्या लहान वयात इतके दागिने घ्यायला तुला कसं काय जमलं?’’ त्यावर आई म्हणते, ‘‘नाही- नाही, हे मी नाही घेतलेले. हे सासूबाईंनी दिलेले आहेत.’’ किंवा आई म्हणते, ‘‘ते माझ्या आईने दिलेले आहेत. हे स्त्रीधन आहे. ते मला सांभाळायचंय.’’ एका पिढीच्या पूर्वीपासून आलेलं घर किंवा स्त्रीधन तुम्ही ‘धन’ म्हणून सांभाळता; मग हा जो तुमचा मेंदू आहे, हे ‘धन’ यायला माणसाच्या किमान 50 हजार पिढ्या जायला लागल्या. पाच लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या गुहेमध्ये सापडलेल्या कवट्यांमध्ये 750 ग्रॅमचा मेंदू बसेल, एवढीच पोकळी आहे. आज तुमचा मेंदू 1500 ग्रॅमचा झाला आहे. तुम्ही ज्या वेळी त्याला विसरता आणि अंधश्रद्धेला बळी जाता, त्या वेळी जणू काही तुम्ही ‘शहाणा माणूस’ ही स्वतःची बिरुदावलीच गमावता. हा झाला पहिला भाग.

पण लक्षात घ्या- माणसाचं शास्त्रीय पूर्ण नाव आहे, ‘मॅन द होमो सेपियन सेपियन.’ म्हणजे शहाणा- आणि अतिशहाणा नाही- आणि अधिकाधिक शहाणा होत चाललेला माणूस. मग माणसाला शहाणं बनवणारा हा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आधुनिक अर्थाने आपल्या देशामध्ये कधी आला? जगामध्ये कधी आला? खरं म्हणजे, आपल्याकडे चार्वाक आणि बुद्धांच्या काळापासून प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकारणभाव अस्तित्वात होताच; पण आधुनिक कालखंडाचा विचार करता आणि आधुनिक अर्थाने साधारणपणे 400 ते 500 वर्षांपूर्वी युरोपमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आला. त्याला ‘कोपर्निकस रिव्होल्यूशन’ म्हणतात, हे आपल्याला माहीत असेल.

कोपर्निकसने गणित मांडून पहिल्यांदा असं दाखवलं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं वाटत असलं, तरी पृथ्वीच खरं तर सूर्याभोवती फिरते. ही गोष्ट आर्यभट्टाने कोपर्निकसच्या आधी 1000 वर्षं भारतात सांगितलेली होती, मात्र ती आपण टिकवून धरू शकलो नाही; पुढं नेऊ शकलो नाही; आर्यभट्टाला मान देऊ शकलो नाही. आर्यभट्टानंतर जवळजवळ 1000 वर्षांनी कोपर्निकसने ही गोष्ट सांगितली. त्याच्याकडे युरोपमध्ये लक्षच देण्यात आलं नाही; परंतु गॅलिलिओ निर्माण झाला आणि गॅलिलिओने 1609 मध्ये दुर्बीण शोधून काढली. त्या वेळी तो शोध अत्यंत क्रांतिकारी होता. दूर समुद्रामध्ये असलेली जहाजं या दुर्बिणीमुळे जवळ आल्यासारखी दिसायची. ‘या माणसाने असा विलक्षण शोध लावलेला आहे की, शत्रूचं जहाज लांब असतानादेखील जवळ आल्यासारखं दिसेल’, असं देशोदेशीच्या राजदूतांनी आपल्या राजाला कळवायला सुरुवात केली. गॅलिलिओचं कौतुक झालं; पण गॅलिलिओला एक दुर्बुद्धी झाली. त्याने ती दुर्बीण वर आकाशाकडे वळवली आणि लोकांना दाखवायला सुरुवात केली की- ‘लोकहो, बघा, मी तुम्हाला दाखवतो- चंद्र हा काही सुंदरीच्या मुखासारखा नाहीये, त्याच्यावर दऱ्या- खोऱ्या आहेत. लोकहो, मी तुम्हाला दाखवतो- सूर्य अम्लान नाहीये, त्याच्यावर काळे डाग आहेत. लोकहो, या आणि बघा, मी तुम्हाला दाखवतो- चंद्राला जशा कला आहेत, तशा शुक्राला कला आहेत. लोकहो, या आणि बघा, मी तुम्हाला दाखवतो- चंद्र हा जसा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याप्रमाणे गुरू या ग्रहाला तब्बल तीन उपग्रह आहेत.’

मला खात्री आहे की, माझं हे भाषण ऐकणाऱ्यांपैकी बहुधा एकाने किंवा फारच थोड्यांनी गुरूचे उपग्रह बघितलेले आहेत, शुक्राच्या कला बघितलेल्या आहेत, सूर्यावरचे डाग बघितलेले आहेत किंवा चंद्रावरच्या दऱ्या- खोऱ्या बघितलेल्या आहेत. हे गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी सांगितलं, पण गॅलिलिओचं कौतुक झालं नाही. ख्रिश्चन धर्मपीठाचा सर्वोच्च गुरू म्हणजे पोप. त्या पोपनी गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मपीठासमोर हजर राहण्याची आज्ञा केली. त्या पोपचं नाव होतं- आठवा अर्बन. तो गॅलिलिओचा मित्र होता. पोप स्वतः शास्त्रज्ञ होता. ही आज्ञा गॅलिलिओपर्यंत पोहोचली, त्या वेळी गॅलिलिओ आजारी होता आणि म्हणून गॅलिलिओने विनंती केली, ‘मी बरा झाल्यानंतर येतो’; पण शास्त्रज्ञ असलेल्या आणि मित्र असलेल्या पोपनी आज्ञा केली, ‘तुला जर येता येत नसेल, तर साखळबंदांनी जेरबंद करून, घोड्यावर टाकून तुला हजर करावं लागेल, इतका तू केलेला गुन्हा गंभीर आहे.’

मग गॅलिलिओ व्हॅटकिनमध्ये पोहोचला. ख्रिश्चन धर्मसभा भरली. सगळे बिशप आणि कार्डिनल बसलेले होते. पोप बसलेला होता. समोर गॅलिलिओला उभं करण्यात आलं आणि गॅलिलिओवर दोन आरोप ठेवण्यात आले. पहिला आरोप- ‘तू खोटारडा आहेस.’ खोटारडा का? कारण ‘आम्ही रोज बघतो की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तू मात्र सांगतोस की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे तू खोटारडा आहेस.’ दुसरा आणि अधिक गंभीर आरोप म्हणजे- ‘तू पाखंडी आहेस.’ पाखंडी याचा अर्थ, खऱ्या धर्मश्रद्धेला न मानणारा. खरी धर्मश्रद्धा म्हणजे बायबलमध्ये लिहिलेली आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ‘आकाशातल्या दयाळू बापाने माणसाला दिवसा प्रकाश मिळावा म्हणून सूर्य आणि रात्री शीतल चांदणं मिळावं म्हणून चंद्र अशी सूर्य-चंद्राची दोन झुंबरं आकाशामध्ये लटकवलेली आहेत.’ आणि युरोपमध्ये 17 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे शिकवलं जात होतं.

लक्षात घ्या- त्या वेळी युरोपमध्ये विज्ञानाचा प्रसार जरी बऱ्यापैकी झालेला असला, तरी त्या वेळी ॲरिस्टॉटलचं वाक्य युरोपमध्ये प्रमाण मानलं जात होतं. असं म्हटलं जायचं की, Aristotle was the master of all who knows ज्यांना ज्यांना जे काही कळतं, त्या सगळ्यांच्या बुद्धीचा समन्वय हा शेवटी ॲरिस्टॉटलपर्यंत जाऊन पोहोचतो. ॲरिस्टॉटलने दोन कारणं सांगितलेली होती. त्यांपैकी एक होतं- efficient cause म्हणजे ‘कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न’; परंतु दुसरं होतं- final cause आणि फायनल कॉज होतं- ‘आकाशातल्या बापाची इच्छा.’ त्यामुळे गॅलिलिओला सांगण्यात आलं की, ‘तू बायबलच्या विरोधी बोलतोयस. त्याच्यामुळे तू माफी माग.’

हा प्रसंग भाषणांमध्ये सांगितल्यानंतर मी अनेकदा विचारतो, ‘‘तुमची माहिती काय आहे? गॅलिलिओने माफी मागितली की मागितली नाही?’’ आणि लोक बहुधा सदिच्छेपाटी सांगतात, ‘गॅलिलिओने माफी मागितली नाही.’ इतिहास असं सांगतो, ‘गॅलिलिओने गुडघे टेकले. बिनशर्त माफी मागितली. त्याने स्वतःच्या तोंडात मारून घेतलं आणि म्हणाला, ‘‘माझं चुकलं. पुन्हा मी असं वेडंवंगाळ बोलणार नाही. तुम्ही म्हणता, तेच खरं आहे. सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो.’’ आता आज आपण पहिलीमधल्या विद्यार्थ्याला शिकवतो की, जरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग हे सिद्ध करणाऱ्या गॅलिलिओने माफी का मागितली? कारण त्याच्या आधी फक्त 25 वर्षं ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला हेच बोलल्याबद्दल आणि बोललेलं म्हणणं मागे न घेतल्याबद्दल खांबाला बांधून जिवंत जाळून मारण्यात आलेलं होतं. गॅलिलिओची तेवढी हिंमत नव्हती. गॅलिलिओने माफी मागितली, म्हणून तो आजन्म कारावासाच्या शिक्षेवर सुटला. शेवटची सात वर्षं तर तो आंधळा होता आणि त्याला एकान्त कारावासाची शिक्षा देण्यात आलेली होती.

आपण विचार करा की, हे का घडलं? हे घडलं याचं कारण, गॅलिलिओ धर्ममार्तंडांच्या विरोधामध्ये बोलत होता, हे खरंच आहे; पण त्याच्याहीपेक्षा खोल जाऊन आपण विचार केलात, तर आपल्या लक्षात येईल की, गॅलिलिओ जगाचा नवा कार्यकारणभाव सांगत होता. तोपर्यंत जगाचा कार्यकारणभाव एकच होता. तो म्हणजे, ‘आकाशातल्या बापाची इच्छा!’ आणि गॅलिलिओ म्हणत होता की, ‘आकाशातल्या बापाची इच्छा काय असेल ती असेल; परंतु सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो असं दिसणार आणि प्रत्यक्षात पृथ्वी हीच सूर्याभोवती फिरणार, चंद्रही असाच फिरणार. आकाशातल्या बापाची इच्छा काय आहे, याच्याशी त्याचा काही संबंध नाही.’ कार्यकारणभावाचा विचार करून आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचा शोध घेण्याची एक नवी दिशा त्याच्या या शोधामुळे जगाला मिळाली. त्यामुळे आधीच्या 4,99,600 वर्षांमध्ये मानवजातीची जेवढी प्रगती झाली नाही, तेवढी ती गेल्या 400 वर्षांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ कळल्यामुळे झाली आहे.

आता या सगळ्याचा संबंध आपल्या देशाशी आहे की नाही? मला वाटतं, या सगळ्याचा आपल्या देशाशी फार घनिष्ठ संबंध आहे. कारण आपल्या देशामध्ये, देशाच्या धार्मिक तत्त्वज्ञानामध्ये ‘कर्मविपाकाचा सिद्धान्त’ आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त म्हणजे, ‘या जन्मी मी जे काही सोसतो, याचं कारण मी मागच्या जन्मी केलेलं पाप असतं आणि या जन्मी मी जे काही चांगलं करीन, त्याचं फळ मला मिळणार आहे पुढच्या जन्मी!’ त्यामुळे मी संपूर्णपणे पराधीन बनतो. म्हणजे जगातल्या बाकीच्या बँक्स म्हणतात, ‘आज रोख, उद्या उधार’ आणि कर्मविपाकाची बँक म्हणते, ‘आज उधार उद्या रोख!’ आणि याचं आपल्या मनाच्या पटलावर अजूनही किती गारूड आहे! किती कौतुक आहे!- गीतरामायणामधलं ग. दि. माडगूळकरांचं सुधीर फडकेंनी गायलेलं सगळ्यात लोकप्रिय गीत कुठलं?-

‘दैव ज्यात दुःखे भरता । दोष ना कुणाचा।

पराधीन आहे जगती । पुत्र मानवाचा।

माय कैकेयी ना दोषी । नसे दोषी तात।

राज्यत्याग काननयात्रा । सर्व कर्मजात।

खेळ चाललेला माझ्या पूर्वसंचिताचा।

पराधीन आहे जगती । पुत्र मानवाचा।’

म्हणजे माझ्या हातामध्ये काहीच नाहीये. मला जे काही सोसावं लागतंय, तो सगळा माझ्या प्राक्तनाचा व प्रारब्धाचा खेळ आहे आणि माझं हे प्रारब्ध माझ्या मागच्या जन्मीच्या पापावर ठरलेलं आहे. म्हणजे मी मागच्या जन्मी काय केलं होतं, हे कळण्याचा कुठलाच मार्ग नाही आणि मी या जन्मी काय केलं असता, पुढच्या जन्मी मला काय मिळणार आहे, हेही कळण्याचा मार्ग नाही. म्हणजे खरं म्हटलं, तर कर्मविपाकाचा सिद्धान्त कार्यकारणभावाच्या थेट विरोधी जातो.

आजही परिस्थिती अशी आहे- मुलगा जर शिकला, चांगल्या गुणांनी पास झाला, ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तिथं पहिल्याच फटक्यात त्याला चांगली नोकरी मिळाली; तर घरातले लोक म्हणतात, ‘पोराचं नशीब चांगलं बरं का! शिकलं रे शिकलं की लगेच चिकटलं!’ आणि समजा मुलगा शिकला, चांगल्या गुणांनी पास झाला, आई- वडिलांनी नोकरीसाठी पैसे भरायची तयारी ठेवली, आमदार-खासदारांच्या चिठ्‌ठ्या-चपाट्या घेऊन मुलगा इकडं-तिकडं फिरला आणि दोन-चार वर्षं जर त्याला नोकरीच लागे ना; तर घरचे लोक म्हणतात, ‘पोराचं नशीबच वाईट! आम्ही सगळे प्रयत्न करतोय, पण याच्या नशिबातच नाही, तर आम्ही काय करणार!’

तसंच समजा- मुलगी शिकली, चांगल्या गुणांनी पास झाली, चांगल्या स्थळी दाखवली, जिथं दाखवली तिथं पहिल्याच फटक्यात पसंत पडली, कमी खर्चामध्ये लग्न ठरलं; तर घरचे लोक म्हणणार, ‘पोरीचं नशीब चांगलं बरं का! आई-बापाला अजिबात त्रास दिला नाही.’ आणि जर याच्या उलट झालं- म्हणजे जर आई-बापानं दोन-चार वर्षं चपला झिजवल्या आणि कुठं लग्नच जमेना; तर म्हणणार, ‘काय मेलीला बाशिंगबळच नाही! आम्ही सगळे प्रयत्न करतोय, पण शेवटी कपाळावर विवाहाचा योग लिहिलेला पाहिजे की नाही!’

मी गमतीने भाषणामध्ये अनेकदा असं विचारतो- विशेषतः महाविद्यालयांमध्ये की- ‘‘समजा, दहा जणांची एक जीप आहे. त्यातनं तुम्ही प्रवासाला निघालाय. जीपला गंभीर अपघात झाला. तिच्यातले नऊ जण जखमी झाले आणि तुम्हीच एकटे वाचलात, तर तुमचं...’’ आणि मग मुलं एक सुरात म्हणतात ‘नशीब!’ आणि मग मी असं म्हणतो- ‘‘जीपला गंभीर अपघात झाला. नऊही जण बचावले आणि तुम्हीच एकटे गंभीर जखमी झालात, तरी तुमचं...’’ मुलं पुन्हा उत्तर देतात, ‘नशीब!’ मग मी त्यांना गमतीने म्हणतो, ‘असं होऊ नये, पण समजा- विद्यापीठाच्या आत्ताच्या वार्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी कमी गुण मिळाले आणि कमी गुण मिळाल्याने जर वडील घरी गेल्यावर तुम्हाला ओरडले आणि म्हणाले, ‘अरे, तुमच्या शिक्षणासाठी आम्ही एवढ्या खस्ता खातो, प्राध्यापक एवढे परिश्रम घेऊन तुम्हाला शिकवतात आणि तुम्हाला एवढे कमी गुण कसे मिळतात?’ तर, त्यांना आपण म्हणायचं, ‘त्याचं काय आहे पिताजी- तुम्ही खस्ता खाणं तुमच्या नशिबात, परिश्रम घेऊन शिकवणं प्राध्यापकांच्या नशिबात आणि एवढे गुण पडणं आमच्या नशिबात! ज्याच्या-त्याच्या नशिबाचा मामला!’

उलट लक्षात ठेवायला पाहिजे की, माझ्या जीवनात जे काही घडतं; त्याच्यामागे देव नाही, त्याच्यामागे दैव नाही, त्याच्यामागे नशीब नाही, त्याच्यामागे प्रारब्ध नाही, त्याच्यामागे संचित नाही, त्याच्यामागे प्राक्तन नाही, त्याच्यामागे कर्मविपाक नाही, त्याच्यामागे मागच्या जन्मीचं पापपुण्य नाही, त्याच्यामागे माझी जन्मवेळ नाही. माझ्या आयुष्यात जे-जे काही घडतं, त्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे. ते कारण मला शोधता येतं, आणि मला शोधता येतं म्हणून ते मला बदलता येतं.

त्यामुळे ज्या वेळी तुम्ही ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ विसरता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्यांच्या हातामध्ये देता. तुम्ही ज्या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ स्वीकारता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेता. आणि हे दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे! महात्मा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी प्रश्न विचारला, ‘प्रत्येक मुहूर्त बघून लढाई करणारी पेशवाई बुडाली आणि कुठल्याही लढाईला मुहूर्ताशिवाय बाहेर पडणारे गोरे साहेब जिंकत गेले; हे कशामुळे घडलं?’ महात्मा फुलेंनी पुढचा प्रश्न विचारला, ‘आमच्या आया- बहिणींची लग्नं 36 गुणांची पत्रिका जमून होतात आणि तरीही त्यांच्या कपाळी अकाली वैधव्य येतं. गोऱ्या मडमिणी मात्र कुठलीच पत्रिका न बघता लग्न करतात आणि त्यांचे संसार सुखाने चालतात; हे कशामुळे घडतं?’ लक्षात घ्या- दीडशे वर्षांपूर्वी युद्धाचा आणि वैधव्याचा रोकडा कार्यकारणभाव महात्मा फुले सांगत होते.

ज्या वेळी दोन सैन्यं एकमेकांच्या समोर येतात; त्या वेळी युद्धाचा निकाल दोन्ही सैन्यांचं शस्त्रबल, त्यांचं मनोबल आणि त्यांचं सैन्यबल यांच्यावर लागतो. आकाशामधले ग्रह-गोल-तारे आणि चंद्र-सूर्य-वारे यांच्या स्थानांना अनुसरून हा निकाल लागत नाही. तसं जर असतं, तर मुहूर्तावर लढाई सुरू करायला म्हणून पंचांगावरनं मुहूर्त काढून देणारे भटजी प्रत्येक सैन्याने आपल्या लष्करामध्ये बाळगले असते. महात्मा फुलेंच्या काळी तर सहा-सात वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा अशी लग्नं व्हायची. सावित्रीबार्इंचं लग्न दहाव्या वर्षी झालं, तर त्या काळात त्यांना ‘घोडनवरी’ म्हणायला लागलेले होते. बालमृत्यूंचं प्रमाण आजही महाराष्ट्रात प्रचंड आहे. त्या वेळी ते महाप्रचंड होतं. अशा वेळेला महात्मा फुले म्हणतात, ‘तुम्ही लग्नाचं वय वाढवा आणि बालमृत्यू रोखा. तसं जर झालं, तर 36 गुणांची पत्रिका जमली वा न जमली, तरी आमच्या आया-बहिणींच्या कपाळी अकाली वैधव्य येणार नाही.’

हे दीडशे वर्षांपूर्वी सांगितलं गेलं, त्या महाराष्ट्राची आजची स्थिती- माझ्यावर विेशास ठेवा- भीषण आहे! जवळजवळ दर आठवड्याला मला महाराष्ट्रातनं कुठनं तरी फोन येतो. कधी मुलगा बोलतो, कधी मुलगी बोलते, कधी मुलाचे आई-वडील बोलतात... आणि प्रत्येक वेळेला तीच कथा असते! म्हणजे माझा मोबाईल वाजला आणि जर मुलगा बोलत असेल, तर फोन उचलल्यानंतर तो म्हणतो, ‘‘हा दाभोलकरांचा फोन आहे का?’’ मी म्हणतो, ‘‘हो.’’ तो म्हणतो, ‘‘तुम्हीच बोलताय का?’’ मी म्हणतो, ‘‘हो.’’ तो म्हणतो, ‘‘तुम्हाला जरा वेळ आहे का? मला तुमच्याशी सविस्तर बोलायचंय.’’ मी म्हणतो, ‘‘हो. मला वेळ आहे. मी हाच धंदा करतो. तू बोल.’’ मग तो सांगतो, ‘‘मी आयटी इंजिनिअर आहे. मी एक मुलगी बघितलेली आहे आणि ती मुलगी मला आवडलेली आहे. ती मुलगी डॉक्टर आहे. मुलीलाही मी आवडलेलो आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायची इच्छा आहे. माझ्या घरचे मुलीच्या घरी जाऊन आले. त्यांनी मुलीचं सगळं घरदार बघितलं, पै-पाहुणे बघितले, नातेसंबंध बघितले. त्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत. त्यानंतर मुलीकडचे आमच्याकडे आले. त्यांनी आमचं घरदार, पै-पाहुणे, नातेसंबंध बघितले. त्यांनाही या सगळ्या गोष्टी मान्य आहेत.’’ मग एवढं सांगून झाल्यावर मी त्याला म्हणतो, ‘‘यात माझा संबंध काय आला? लग्न करून टाका ना!’’ तो म्हणतो, ‘‘अहो डॉक्टर, तिथेच अडचण आलीये ना! एवढं सगळं लग्न ठरत आलं असताना आमच्या एका पाहुण्यांनी उगीचंच आमच्या दोघांची पत्रिका घेतली आणि एका ज्योतिषाला दाखवली. तो ज्योतिषी आता असं म्हणतोय की, ‘हे लग्न अजिबात होता कामा नये, कारण यांच्या पत्रिका अजिबात जुळत नाहीत. त्या इतक्या जुळत नाहीत की, यांच्या पत्रिकेमध्ये मृत्युखडाष्टक योग आहे. त्यामुळे हे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत मुलगा किंवा मुलगी यांपैकी कोणा तरी एकाचा बाप नक्की मरण पावणार’!’’

आता मी महाविद्यालयामध्ये भाषणासाठी गेलो असेन, तर बोलताना मी मुलांना विचारतो, ‘‘असं जर तुमच्याबाबतीत सांगण्यात आलं, तर तुम्ही काय कराल? लग्न कराल का करणार नाही?’’ मी त्यांना हेही सांगतो की, ‘‘तुम्ही माझ्यावर विश्वास  ठेवून बिनधास्तपणे लग्न करा.

तुमच्या आई-वडिलांना काही होणार नाही, हे मी तुम्हाला बाँडपेपरवर लिहून द्यायला तयार आहे. याचं साधं कारण असं की- माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव पत्रिकेच्या आधारे वर्तवणं याला काडीचाही आधार नाही, हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे.’’ त्यामुळे ‘मला आवडलेल्या मुलीशी मी लग्न करावं की करू नये याबद्दल पत्रिका काय सांगते, याच्यावर स्वतःच्या जीवनाचा निर्णय अवलंबून न ठेवणं,’ याचा अर्थ स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेणं.’’

त्यामुळे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ तुम्हाला एक नवी जाणीव देतो. तो प्रख्यात शेर तुम्हाला माहीत आहे का?

खुद हि को कर बुलंद इतना

की हर तकदीर से पहले

खुदा बंदे को खुद पूछे

बता, तेरी रजा क्या है?

म्हणजे, ‘तुझा आत्मविश्वास तू एवढा प्रबळ कर की, तुझ्या भवितव्याचं प्रत्येक अक्षर साक्षात तो परमेश्वर जरी लिहीत असेल, तरी त्यानेदेखील ते तुझ्या इच्छेप्रमाणेच लिहिलं पाहिजे.’ थोडक्यात जीवनाकडे बघण्याचा, यशस्वी होण्याचा, अधिक चांगला माणूस होण्याचा दृष्टिकोन म्हणजे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन!’’ आपण हा दृष्टिकोन बाळगला; तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, समूहाच्या जीवनामध्ये, समाजाच्या जीवनामध्ये आणि राष्ट्राच्या जीवनामध्येही आमूलाग्र बदल घडू शकतो. तो घडवून आणण्याचा संकल्प आपण करावा, अशी माझी मनोमन विनंती आहे!

(शब्दांकन : भाग्यश्री भागवत) 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 2012 मध्ये ध्वनिमुद्रित झालेल्या दहा भाषणांच्या दोन सीडींचा संच उपलब्ध आहे. त्यात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर दोन भाषणे आहेत. त्यातील पहिल्या भाषणाचे शब्दांकन इथे प्रथमच प्रसिद्ध होत आहे.

Tags: भाग्यश्री भागवत वैज्ञानिक दृष्टीकोन नरेंद्र दाभोलकर गॅलिलिओ महात्मा फुले galileo mahatma phule Scientific Temperament Narendra Dabholkar Vaidnyanik Drushtikon weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

1 नोव्हेंबर1945 - 20 ऑगस्ट 2013

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे  भूतपूर्व संपादक.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके