डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

2010 च्या 26 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजता, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा एम. ए. चा. विद्यार्थी हरेश शेळके याचा फोन आला, " चौकटीबाहेरचे जग या सात दिवसांच्या व्याख्यानमालेतील उद्याचे  नियोजित व्याख्याते पोपटराव पवार यांचा निरोप आलाय की, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकत नाहीत. कार्यक्रमाला तर अनेक विभागांतील विद्यार्थी येणार असल्याने, तुफान गर्दी होणार आहे. तर आता ऐनवेळी असा कोण वक्ता मिळेल, जो आल्यामुळे ( झालेला बदल ऐनवेळी कळल्यावर ) तरुणाई निराश होणार नाही,  गर्दी अजिबात कमी होणार नाही?"

पुणे शहरात वक्त्यांची कमतरता नाही, पण वेळ आणि परिस्थितीचा काही क्षण अंदाज घेऊन त्याला म्हणालो,  " एकच हुकुमाचे पान मला दिसते आहे, डॉ. दाभोलकर! ते उद्या सकाळी साताऱ्याहून पुण्यात बसने 11 वाजता येणार आहेत. आल्याबरोबर त्यांना विद्यापीठात घेऊन जाण्याची व्यवस्था करा. मात्र आत्ता लगेच त्यांना फोन करायला तुमचे विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव यांना सांगा. डॉक्टरांना फोनवर तुमची अडचण प्रांजळपणे सांगा. कारण त्यांच्यासाठी प्रश्न मान सन्मानाचा नसेल, पण हातातली कामे बाजूला सारून ऐनवेळी आलेले निमंत्रण स्वीकारायला ते तयार होणार नाहीत. शिवाय, तुमच्या विद्यापीठातच इतके वक्ते असताना, इतक्या ऐनवेळी मी कशाला, असे ते म्हणू शकतील."

हरेशने तो निरोप जाधव सरांना दिला, त्यांनी रात्री 11 वाजता डॉ. दाभोलकरांना फोन करून परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी प्रश्न विचारला, 'भाषणाला विषय काय घ्यायचा?' जाधव सर म्हणाले, 'सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा.'

दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा मी साधना कार्यालयात आलो तर, विद्यापीठातील भाषण संपवून डॉक्टर साधनात येऊन पुढील कामाला लागले होते...नंतर तीन वर्षांनी डॉक्टरांची हत्त्या झाली. त्यानंतर काही काळाने त्या भाषणाची  ऑडिओ  फाईल मागवून घेतली आणि तिचे शब्दांकन करवून घेतले, हेच ते ( पाच हजार शब्दांचे ) भाषण...!

…संपादक

मित्रहो, ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा : स्वरूप, कारणे आणि उपाय’ याविषयी मी बोलावं, असं आपले विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी सांगितलं आहे. ते मला म्हणाले की, ‘‘खरं म्हटलं तर ‘शिक्षितांची अंधश्रद्धा’ असा विषय पाहिजे होता. कारण शिक्षणाच्या मागं ‘सु’ लावणं हाच त्याचा अपमान आहे.’’ त्यांनी स्वत:च असं उत्तर दिलं की, ‘‘एकूण अंधश्रद्धा वाईटच, पण शिक्षितांची अधिक वाईट! कारण ते त्या अंधश्रद्धांचं समर्थन करतात.’’ खरं आहे ते. गेली पंचवीस वर्षं मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे, त्यामुळे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांबद्दल तुम्हाला रंजक वाटतील, अशा किती तरी गोष्टी सांगू शकतो आणि ‘काय हे सुशिक्षित!’ असं म्हणू शकतो. पण तसं मांडण्याचा माझा अजिबात इरादा नाही. शिक्षित किंवा सुशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा का राहिल्या, त्या दूर होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्या मर्यादा  काय आहेत, याचं मला जाणवणारं एक आकलन तुमच्यापर्यंत पोहोचवणं, असं माझ्या विवेचनाचं स्वरूप राहणार आहे.

साधारणपणे 1982 मध्ये मी माझा पूर्ण वेळ चालणारा वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्ण वेळ कार्यकर्ता बनलो. त्या वेळी काही लोक मला एक गोष्ट सांगत, आजही सांगतात. त्यांचं म्हणणं असं असतं की, ‘शहरामध्ये तुमच्या कामाची काही गरज नाही. अंधश्रद्धा ग्रामीण भागामध्ये आहेत, अशिक्षितांमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करा.’ काही जणांचं असं म्हणणं असतं की, ‘अहो दाभोलकर, या शिक्षणाचा काही उपयोगच होत नाहीये. माणसं सुशिक्षित होतायत, परंतु ती विविध प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडतायत. त्यामुळे माणसं शिक्षित झाल्यानंतरदेखील आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं सुशिक्षित झाल्यानंतर- देखील एवढ्या अंधश्रद्धांना बळी का पडतात, याचं विवेचन करा.’ तेच करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

मी या चळवळीमध्ये उतरलो तेव्हा असं सांगितलं जात होतं की, ‘माणसं अंधश्रद्ध असतात, कारण माणसांचं अज्ञान!’ अज्ञान हे अंधश्रद्धेचं एक महत्त्वाचं कारण आहे, याबद्दल शंकाच नाही. 100 वर्षांपूर्वी माणसाला ताप यायचा, अंगावर फोड यायचे; ताप जायचा, अंगावरचे फोड जायचे. पण त्या फोडाच्या खपल्या पडल्यानंतर एखाद्या ठोक्याचं तपेलं असावं तसं तोंड दिसायचं. त्यावर लोक असं म्हणायचे की, ‘हा देवीचा कोप आहे.’ म्हणून त्या रोगाला नाव पडलं ‘देवी’. आज जर असं म्हटलं की, ‘देवीचा रोगी दाखवा आणि एक कोटी रुपये मिळवा!’ तरीदेखील कुणालाही देवीचा रोगी दाखवता येणं शक्य नाही. कारण देवीचा रोग हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होतो आणि जगातली सगळी माणसं आता देवीमुक्त झालेली असल्यामुळे फक्त प्रयोगशाळेमध्ये देवीच्या प्रयोगासाठी देवीचे जंतू शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे देवीच्या कोपाने हा रोग होतो आणि विद्रूपता पदरी येते हे अज्ञान, ‘देवीचा रोग कशामुळे होतो?’ याचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्याबरोबरची अंधश्रद्धाही गेली.

आज जी अंधश्रद्धा शिल्लक आहे, पण उद्याच्या शतकामध्ये जाईल अशी आशा आहे ती म्हणजे भूतबाधा किंवा देवी अंगात येणे. कालपर्यंत अतिशय चांगली असणारी व्यक्ती अचानकपणे जर वेगळी वागायला लागली, तासन्‌तास घुम्यासारखी बसायला लागली, स्वत:चे नैसर्गिक विधी विसरायला लागली किंवा एखादा सामान्य माणूस थकून जाईल एवढं काम करायला लागली, स्वत:चे डोळे कधी मिटायला लागली व कधी उघडायला लागली, तिचा आवाज बदलला, तिचा चेहरा बदलला, ती चुटक्या वाजवायला लागली, स्वत:भोवती गिरक्या घ्यायला लागली... तर आजदेखील पहिली शंका येते- ‘हिला बाहेरची बाधा झाली असली पाहिजे.’ कारण ‘मन असतं’ आणि ‘अचानक ताप यावा, तसं मन अचानक आजारी पडतं’ हे ज्ञान अजून विद्यार्थ्यांपर्यंतदेखील पोहोचलेलं नाही. ‘मनाचं चित्र काढ’ असं जर कुठल्याही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याला सांगितलं, तर तो न चुकता ‘एक बदाम आणि त्यातून गेलेला एक बाण’ काढतो. मन मेंदूत असतं आणि ते आजारी पडतं, हे माहीतच नसल्यामुळे त्याला स्वाभाविकपणे भूतबाधा किंवा अंगात देवीचा संचार झाला असं म्हटलं जातं. त्यामुळे हे अज्ञान होतं आणि अंधश्रद्धेचं कारणही होतं.

नव्या गतिमान समाजजीवनामध्ये अनेक अन्य कारणं आली. पहिलं- अदृष्टाची भीती. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मृत्यूची एक सनातन भीती बसलेली असते. म्हणजे ‘मरणकल्पनांशी थांबे । तर्क जाणत्यांचा। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही ग.दि.माडगूळकरांची लोकप्रिय काव्यपंक्ती आहे; पण ‘मला मृत्यू कधी येणार?’ या अदृष्टाची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये वसत असते. तिच्यापासून मुक्तता मिळावी, म्हणून कुणी असं म्हणालं की, ‘तू अमुक-तमुक गंडा घाल’, ‘अमुक- तमुक ताईत घाल’, ‘हा-हा मृत्युंजयाचा जप कर’; तर मृत्यू ही अत्यंत अकल्पित गोष्ट असल्यामुळे ‘करून बघायला काय हरकत आहे?’ हा विचार कुणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. आज अशा अदृष्टाच्या भीतीचं क्षेत्र कितीतरी वाढलेलं आहे. म्हणजे ‘मी निर्व्यसनी आहे, माझा मुलगा निर्व्यसनी राहावा अशी इच्छा आहे. पण तो शिकायला मुंबईला आहे. तिथे तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात व्यसनाधीनता आहे. त्यामुळे मनातल्या संकल्पाबद्दल जरा कच्चा असलेला माझा मुलगा जर उद्या व्यसनी झाला तर...’ ही अदृष्टाची भीती सतत पोखरत असते आणि मग आई एखादा नवस बोलते. त्यामुळे ‘अदृष्टाची भीती’ हे पहिलं कारण.

दुसरं म्हणजे, अगतिकता आणि अस्थिरता. आजचं समाजजीवन कमालीचं अस्थिर आणि कमालीचं अगतिक झालेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी जेवढ्या खर्चामध्ये माझं भागत होतं, तेवढ्या खर्चामध्ये या वर्षी महागाई वाढल्याने माझं घर चालत नाही. मी आत्तापर्यंत सरकारी जागेमध्ये राहत असतो, आता माझी नोकरी संपायची वेळ येते आणि मला आज जागा घेणं परवडण्याच्या पलीकडचं असतं. त्यामुळे आणखी सहा महिन्यांनंतर ‘राहण्याचं काय?’ ही अगतिकता असते. माझ्या घरी तरणीताठी मुलगी असते. समोरच्या झोपडपट्टीतले गुंड मुलींची रोज छेड काढत असल्याचं मला दिसत असतं. माझी मुलगी रोज रात्री कामावरून परत येते. त्यामुळे मुलीला काही होऊ नये, ही मनातली अगतिकता असते. शेजारच्या गावामध्ये अल्पसंख्याकांची घरं पेटवली जातात आणि माझ्या गावात मी अल्पसंख्याक असतो. त्यामुळे उद्या माझ्यावरच ही वेळी येण्याच्या भीतीने मी अगतिक असतो. म्हणजे एका बाजूला- सर्वसामान्य माणसाच्या पदरी येणारी अगतिकता हे अंधश्रद्धेमागचं एक कारण झालं. दुसऱ्या बाजूला- समाजजीवनामध्ये अनेक कारणांनी वेढून राहिलेली अस्थिरता हे अंधश्रद्धेमागचं दुसरं कारण आहे. कितीही चांगला खेळाडू असला, तरी दुसऱ्या दिवशी तो शून्यावर बाद होणार असतो का, ते त्याला माहीत नसतं. कितीही चांगला अभिनेता असला, तरी त्याचे क्रमाने येणारे सिनेमे फ्लॉप जाण्यामागचं कारण त्याला माहीत नसतं. उद्योग-व्यवसाय कितीही उत्तम असला, तरी त्या व्यावसायिकाच्या गावात उद्या स्फोट झाला आणि त्यात त्याचं दुकान उद्‌ध्वस्त झालं, तर तो काय करेल, हे त्यालाही माहीत नसतं. जीवनामधली ही अस्थिरता हे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेचं आणखी एक कारण आहे.

तिसरं कारण म्हणजे, ‘अतृप्त कामनांची पूर्ती’. दररोज आपण जितका वेळ दूरदर्शनसमोर बसलेले असतो किंवा वृत्तपत्र वाचतो, त्यातून एक प्रचंड चंगळवादी जग आपल्या नजरेसमोर प्रत्येक क्षणी आणून टाकलं जातं. आपल्याला ते अत्यंत लोभस वाटत असतं, पण त्या सगळ्याच गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असल्याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. मग आपल्याला असं वाटतं- मी जर बाबाकडे गेलो, त्यांनी मला कृपाशीर्वाद दिला आणि त्याच्या कृपेने मला जर लॉटरीचं तिकीट लागणार असेल प्रत्यक्षात लागलं किंवा नाही तरी त्यामुळे निदान माझ्या अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची एक शक्यता निर्माण होणार असेल... तर मी त्याच्याकडे जातो.

चौथं कारण म्हणजे, अपराधी भावना. आजच्या जीवनामध्ये आपल्याला (इच्छा असो वा नसो) अनेकदा अनैतिकतेनं जगावं लागतं. तुम्ही लाच द्यायची का नाही, हे तुमच्या हातामध्ये राहत नाही. समजा- तुम्ही पोलीस अधिकारी असाल आणि तुमच्या खालचा व वरचा असे दोन्ही अधिकारी पैसे खात असतील, तर तुमच्या पैसे न खाण्याला काही अर्थ राहत नाही. अनेकदा तुम्हाला मिळणारे पैसे दोन नंबरचे असतात. त्याची तुम्हाला टोचणी लागते. ती दूर होण्यासाठी तुम्ही काही तरी मार्ग शोधायला लागता. त्यासाठीच्या सगळ्यात सोप्या उपायांबद्दल आपण ऐकलेलं असेल. तिरुपती बालाजीच्या मंदिरात पैशाच्या पेटीमध्ये पावतीशिवाय लोक कोट्यवधी रुपये आणून टाकतात. ही मंडळी काय करतात, माहिती आहे का? व्यापारामध्ये फसवणूक केलेल्या अपराधाची मनाला टोचणी लागू नये म्हणून, धंद्यामधले चार पार्टनर्स तिरुपतीच्या बालाजीला पाचवा पार्टनर करतात. म्हणजे लोकांना गंडवून झालेल्या नफ्यापैकी पाचवा हिस्सा बालाजीला रुजू केला की,  आपल्या मनातली अपराधीपणाची भावना कमी होते. कारण साक्षात देवच आपला पार्टनर आहे आणि देवाचं जे देणं असतं, ते त्याला देऊन टाकलं असं मानलं जातं.

म्हणजे, जेव्हा सुशिक्षितांची अंधश्रद्धा केवळ अज्ञानावर आधारित होती, तेव्हा ती ज्ञानाच्या आधारे जाईल अशी शक्यता होती. पण ज्या वेळेला या अंधश्रद्धेला अदृष्टाची भीती, अगतिकता, अस्थिरता, अतृप्त कामनांची पूर्ती, अपराधी भावना अशा अनेक बाबी जोडल्या गेल्या, त्या वेळी ही व्यूहरचना आणखीच अवघड बनली.

मराठीचे विद्यार्थी असल्याने तुम्ही कविता वाचत असणार. मंगेश पाडगांवकरांचा ‘उदासबोध’ नावाचा एक कवितासंग्रह आहे. समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ लिहिला आणि सध्याची स्थिती पाहून उदास वाटत असल्याने पाडगांवकरांनी ‘उदासबोध’ लिहिला. सध्याच्या परिस्थितीमध्ये जे-जे पाहून त्यांना उदास वाटतं, ते-ते त्यांनी लिहिलं. दासबोधामध्ये जसे समास आहेत, तसेच उदासबोधातही आहेत. मी आत्ता आपल्याला सांगितलेली प्रक्रिया त्यांनी त्यातल्या ‘बुवाबाजी’ या समासामध्ये फार छान पद्धतीने मांडली आहे. ती माझी आवडती कविता असल्याने या विषयाशी संबंधित असलेल्या तिच्यातल्या ओळी अशा-

माणसे खपाट खंगलेली। आतून आतून भंगलेली।।

अदृश्य दहशतीने तंगलेली। आधार पाहिजे।।

प्रत्येकास येथे हवा। कोणीतरी जबरी बुवा।।

जो काढेल साऱ्या उवा। मनातल्या चिंतेच्या।।

आधी म्हणे जय साई। मगच अधिकारी लाच खाई।।

अजून पकडला गेला नाही। कृपा म्हणे बाबांची।।

आपण शोधायचे नाही। आपण लढायचे नाही।।

आपण भिडायचे नाही। आयुष्याला।।

कणा झिजून गेला पार। शिरजोरीपुढे सर्व लाचार।।

बुवा नामजपाचा उच्चार। नशा देई।।

म्हणजे, एका बाजूला मी अंधश्रद्धेकडे ढकलला जातो आणि दुसऱ्या बाजूला नशा केल्यानंतर जी चुकीची, पण प्रासंगिक शांतता व आधार मिळतो, असं मला वाटतं; त्याच स्वरूपाची शांतता, आधार सुशिक्षितालाही मिळतो. हे या अंधश्रद्धेचं व्यक्तिगत पातळीवरचं स्पष्टीकरण झालं. समाजपरिवर्तनाची प्रक्रिया असं सांगते की, कुठल्याही घटनेला जसं व्यक्तिपरिवर्तनाचं अंग असतं, तसंच समाजव्यवस्थेचं अधिक महत्त्वाचं अंग असतं. आज अंधश्रद्धेकडे शिक्षित वा सुशिक्षित ढकलले जाण्यामागचं महत्त्वाचं कारण या व्यापक समाजरचनेमध्ये अपरिहार्यपणे तयार झालेल्या व्यवस्थेमध्ये आहे, असं मला वाटतं. ही व्यवस्था त्याला अंधश्रद्धेकडे ढकलत असते. तुम्ही अंधश्रद्धांचे कुठलेही प्रकार बघितलेत, तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे प्रकार, उपचार करणाऱ्या बाबांचे असल्याचं तुमच्या लक्षात येईल.

‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या पुस्तकामध्ये मी त्याची क्रमाने उदाहरणं दिली आहेत. त्यातील काही अशी-

1. एक पाचवी-सहावी शिकलेला, 25-26 वर्षांचा पोरगेलासा अस्लमबाबा अल्लाच्या कृपेनं स्वत:च्या बोटांनी पोट फाडून ऑपरेशन्स करायचा आणि पोटाची ऑपरेशन्स कमी म्हणून की काय, हृदयाच्या झडपादेखील रिप्लेस करायचा. त्याच्याकडून हे करवून घ्यायला रोज जवळजवळ 1000  लोकांची गर्दी असायची, असं दै. सकाळने ‘बागलकोटचा रिपोर्ट’मध्ये छापलेलं आहे. या बाबाची प्राथमिक फी 500 रुपये होती. 500  गुणिले 1000म्हणजे पाच लाख रुपये एवढी पुण्यातल्याच नव्हे, तर भारतातल्यासुद्धा कुठल्याही डॉक्टरची एका दिवसाची प्रॅक्टिस नाही.

2. भावनगरमध्ये (गुजरात) काही वर्षांपूर्वी एक पार्वती माँ होती. निपुत्रिक स्त्रीच्या पोटावरून ती हात फिरवायची आणि तीन वेळा ‘बालका शांती’ असं म्हणायची. त्यानंतर त्या निपुत्रिक स्त्रीला दिवस जायचे, असं या माँचं म्हणणं होतं. महाराष्ट्रातला एकही तालुका असा नाही, जिथून पार्वती माँकडे जायला गाड्या सुटल्या नाहीत. एवढं कशाला, आजही नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक फरशीवाला बाबा आहे. त्याची स्पेशालिटी म्हणजे- त्याच्याकडे कुठल्याही आजाराचा माणूस घेऊन गेलात, तरी तो त्याच्या डोक्यावर दत्ताच्या पादुका असलेली फरशी ठेवतो आणि आजारावर उपाय करतो. एवढंच नव्हे, तर आजपर्यंत जे विज्ञानाला सापडलेलं नाही, तेही त्याने शोधून काढलंय. एखादा माणूस फार आजारी असल्याने त्याला बाबाकडे नेता आलं नाही, तरी तुम्ही आजारी माणसाचे कपडे घेऊन जाऊ शकता. त्याच्यावर फरशी ठेवूनदेखील तो त्या आजाराचं निदान करू शकतो, इतका तो भारी डॉक्टर आहे!  

या उदाहरणांनी तुम्हाला हसू आलं असलं, तरी मला मात्र वेदना होतात. कारण गेल्या सात वर्षांपासून जिवाच्या आकांताने लढून, याबद्दल कायदा असून, बोगस डॉक्टर कारवाई ॲक्ट असून, हर तऱ्हेने प्रयत्न करूनही मी या फरशीवाल्या बाबाचं दुकान अजून बंद करू शकलेलो नाही. आजही तुम्ही त्याच्याकडे जाऊन पाहिलंत, तर दोनशे-तीनशे लोकांची रांग असते. एकाला तो सरासरी 400 रुपयांचं औषध देतो आणि हे सगळं सातवी नापास असलेला माणूस करतो!

यामागची अंधश्रद्धा सोडा, पण हे सगळं होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, या देशातली अर्थव्यवस्था अत्यंत महागडी झालेली आहे. जर तुम्ही क्रमश: मागील बजेट काढत गेलात, तर लक्षात येईल सरकारने आरोग्य- व्यवस्थेमधून स्वत:चं अंग काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला ज्या-ज्या वेळी गरज लागते, त्या-त्या वेळी योग्य प्रकारची आरोग्यव्यवस्था उपलब्ध नसेल, तर मी अपरिहार्यपणे अंधश्रद्धांचा आधार घेतो. अंधश्रद्धांचा असा आधार घेणं योग्य नाही, पण क्षम्य आहे. कारण शेवटी तो माणूस आहे. तो असं म्हणू शकत नाही की, ‘वाट्टेल ते झालं तरी चालेल, पण मी बाबाकडे जाणार नाही.’ त्याला बिचाऱ्याला जे शक्य असतं, ते तो करतो. असो.

विद्यार्थिदशेत आम्हाला दोन गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. समाज बदलायचा असेल, तर वर्गसंघर्ष करायला पाहिजे. समाजामध्ये ‘नाही रे’ वर्ग मोठ्ठा असतो आणि ‘आहे रे’ वर्ग छोटा असतो. ‘आहे रे’ वर्ग ‘नाही रे’चं शोषण करत असतो. हा वर्गसंघर्ष करायला पाहिजे. त्याच्या आड येणाऱ्या धर्मकल्पनांना आणि जातकल्पनांना दूर करायला पाहिजे. त्यामुळे वर्गसंघर्षाच्या लढाईमध्ये धर्म आणि जात यांच्यामधल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होण्याची एक सुप्त शक्यता होती. तुमच्यासारखे विद्यार्थी असतानाच जयप्रकाशजींच्या चळवळीमधून आम्ही ‘जयप्रकाशजी का है अरमान। ब्राह्मण भंगी एकसमान।।’, ‘जानवं तोडा, माणसं जोडा’ हे शिकलो. म्हणजे ब्राह्मण्याची खूण असलेलं जानवं हे जर माणसामाणसामध्ये भेद करण्याचं प्रतीक असेल तर मी गळ्यातलं जानवं तोडून माणसं जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, अशी ही शिकवण होती. ही गोष्ट 1975 ची आहे.

मात्र 2008-2009 मध्ये शहाण्या असलेल्या पुण्याची प्रगती काय? तर दोन लाख ब्राह्मण जमतात आणि त्या संमेलनामध्ये पुण्यातल्या मराठीच्या एक विदुषी, प्राध्यापिका ‘ब्राह्मण्य केवळ जानव्यामध्ये, गंधामध्ये नाही’ हे सांगतात, तेव्हा त्यांना बिनशर्त माफी मागावी लागते; आणि याबद्दल ब्र उच्चारला जात नाही. ब्राह्मण म्हणणार, ‘दाभोलकर, जानवं घालणं हा आमचा प्रश्न आहे. त्याबद्दल बोललात तर खबरदार!’ खानदानी मराठ्यांमध्ये बाईला पुनर्विवाहाची परवानगी नाही. मी ज्या साताऱ्या जिल्ह्यातून येतो, तिथे मराठ्यांचं प्रमाण 40  ते 45 टक्के आहे. सैन्यामध्ये असलेल्या मराठ्यांचं प्रमाण भरपूर आहे. सैन्यामध्ये जे जवान मरतात, त्यांच्या बायका काय करतात? जन्मभर बिचाऱ्या तशाच जगतात. कारण त्यांनी लग्न केलं, तर त्यांचं खानदान बुडतं. त्याविषयी बोलायची परवानगी नाही. धनगरांकडे गेलात आणि त्यांना म्हणालात, ‘तुम्ही यात्रेमध्ये पशुहत्या का करता?’ तर ते म्हणतात, ‘खबरदार! ही पशुहत्या नाहीये. हा आमचा वनभोजनाचा कार्यक्रम आहे. तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काही कारण नाही.’ मातंग समाजाकडे गेलात आणि म्हणालात, ‘शेंदऱ्याच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता? गळ टोचून घेणं, ही अनेक अंगांनी अंधश्रद्धा आहे. कदाचित त्यातून एड्‌स होऊ शकतो.’ तर ते म्हणतात, ‘तुम्हाला फक्त आम्हीच उरलोय का शहाणं करायला?’ म्हणजे, धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट-धारदार-टोकदार करण्याचा कार्यक्रम चालू आहे, त्या समाजामध्ये अंधश्रद्धांचं निर्मूलन होणार कसं?

मी एकदा नगर जिल्ह्यामधल्या एका महविद्यालयात भाषणासाठी गेलो होतो. भाषणाआधी मॅनेजमेंटच्या लोकांना म्हणालो, ‘‘काय बोलू?’’ तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, ‘‘डॉक्टर, तुम्ही काहीपण बोला, पण एका गोष्टीबद्दल मात्र बोलाच.’’ मी म्हणालो, ‘‘कुठल्या?’’ तो म्हणाला, ‘‘गेली पाच वर्षं आमच्या गावामध्ये फक्त दोनच गोष्टींसाठी लोकवर्गणी जमा होते. एक- मोठ्यातला मोठा हरिनाम सप्ताह घालणं, दुसरी- देवळाचा जीर्णोद्धार करणं किंवा नवं देऊळ बांधणं. त्यामुळे गावाचा रस्ता असो, गावाचं पाणी असो, गावाचा विकास असो... दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी पैसे मागायला वाव राहतच नाही.’’ म्हणून मी नंतर कार्यकर्त्यांना एक सर्वेक्षण करायला सांगितलं. (हवं तर तुम्हीही ते करून बघा.)

सर्वेक्षणाचा विषय होता, ‘गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये लोकवर्गणीतून पैसे कशा करता जमले?’ उत्तर आलं- देऊळ बांधणं, देवळाचा जीर्णोद्धार करणं, जास्तीत जास्त मोठा सप्ताह घालणं यासाठीच पैसे जमले. म्हणजे ज्या समाजामध्ये जातीय आणि धार्मिक अस्मिता टोकदार करण्याचा भाग चालतो, त्या समाजामध्ये सुशिक्षित किंवा अशिक्षित यांपैकी कुणाचंच अंधश्रद्धा निर्मूलन एवढं सोपं नसतं. ‘धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे’, असं भारतीय संविधानानं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे संसदेलादेखील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या अकरा जणांनी दिलेला निर्णय आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्षता’ हा या देशाच्या संविधानाचा मूलभूत भाग आहे.

मात्र आज या देशामध्ये धर्माचं जमातीकरण करणं आणि त्याबरोबरच जास्तीत जास्त सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं, असा एक पद्धतशीर कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. उदाहरणार्थ- आम्ही लहान होतो, त्या वेळेला गणपती उत्सव साजरा व्हायचा. पुढं तो हळूहळू खेडेगावापर्यंत पोहोचला. मग तो कमी पडायला लागला, म्हणून आपण नवरात्र आणलं. पण त्यामध्ये तेवढी मजा येईना, म्हणून आपण गरबा आणला. नंतर ऑगस्टमध्ये कृष्णाष्टमी असते, असं आपल्या लक्षात आलं. मग आपण दहीहंडी लावून ती फोडायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात डिसेंबरमध्ये येणाऱ्या दत्तजयंतीला वॉर्डा-वॉर्डामध्ये दत्ताचे पाळणे हलायला लागले. महाशिवरात्रीला शंकराची प्रचंड मोठी पोस्टर्स लागायला लागली आणि त्याच्या रथयात्रा निघायला लागल्या. एप्रिल महिना आला की, रामनवमी साजरी व्हायला लागली. पाठोपाठ हनुमान जयंती साजरी व्हायला लागली. ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतचे सगळे महिने संपले, तरी मधला मार्च महिना राहिल्याचं आपल्या लक्षात आलं. मग मार्चमध्ये गुढीपाडवा असल्याचं आपल्या लक्षात आलं आणि गुढीपाडवा हा आपला नवा वर्षदिन आहे. पण नवा वर्षदिन एक जानेवारीला सुरू होतो, असं आता बहुतेक लोक मानतात. पण आपण मंडळी तशी हार जाणारी नाहीत. आपण म्हणालो, ‘हरकत नाही. एक जानेवारीला जो सुरू होतो, तो नववर्षदिन पिण्यासाठी आणि गुढीपाडवा हा सणासाठी!’ महाराष्ट्र एकदम एवढा धार्मिक झाला काय? एकदम? तेवढं पुरेसं नाही.

सात-आठ वर्षांपूर्वी मार्गशीर्षामधलं ‘वैभव महालक्ष्मीचं व्रत’ होतं काय हो? आता तुम्ही महानगरापासून खेडेगावापर्यंत कुठेही जावा, पर्यावरणाची ऐशी की तैशी करत झाडाची फांदी तोडून सगळ्या बायका ते कलश, त्यावर ती फांदी आणि ते वैभव महालक्ष्मीचं व्रत... असं सगळं चालू असतं. हे व्रत करून वैभव मिळत असतं, तर आपण थेट अर्थमंत्र्याला किंवा पंतप्रधानालाच बसवलं असतं ना या व्रताला!

या सगळ्यातून या देशामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी आणि धर्मसापेक्ष जमातवादासाठी धर्माचं व्यापारीकरण, धर्माचं बाजारीकरण, धर्माचं विकृतीकरण आणि धर्माचं राजकारण पद्धतशीरपणे करण्याचं कटकारस्थान गेल्या 15-20  वर्षांमध्ये वाढलं. लोकांची धार्मिकता हा एक अत्यंत आदर करण्याचा भाग आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो, पण महाराष्ट्रातले सगळ्या संतांनी व समाजसुधारकांनी लोकांची धार्मिकता नैतिकतेकडे  वळवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या सांस्कृतिक राष्ट्रवादी मंडळींनी लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. याचं कारण त्यांना धर्माचं नुसतं व्यापारीकरण पुरेसं वाटत नव्हतं, तर त्यांना त्याचं बाजारीकरण करायचं होतं. काही दिवसांनी तेही त्यांना पुरेसं वाटेना. म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळी उच्च न्यायालयाने नवरात्रीच्या गरब्यामध्ये रात्री दहानंतर आवाज करण्यावर बंदी घातली, त्या वेळी लोक हसले. ते म्हणाले, ‘तुम्ही आमच्यावर बंदी घालून काय कराल?’ मग त्यांनी 70  हजार चौरस फुटांचा एक मंडप केला आणि सगळाच्या सगळा मंडप साऊंडप्रूफ करून टाकला. ‘तुमची बंदी कायम, आमचा गरबा कायम!’ हे झालं धर्माचं बाजारीकरण.

पण तेवढ्यावर ते भागलं नाही, तर ते धर्माच्या विकृतीकरणापर्यंत गेलं. म्हणजे आपण जे काही करतो, ते कशासाठी करतो? त्यातून आपण कुठल्या शक्ती बळकट करतो? धर्म काय संदेश देतो आणि आपण काय आचरण करतो? मी महाराष्ट्रामध्ये सतत फिरत असतो. सार्वजनिक कार्यकर्ता असल्यामुळे सतत पैसेही मागत असतो. असाच एका ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी माझ्या मित्राने हनुमान जयंतीचा मोठा कार्यक्रम केला होता. तो त्या भागातला तसा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता होता. मी त्याला विचारलं, ‘‘अरे, तू दर वेळेला एवढे मोठमोठे कार्यक्रम करतोस. तुला एवढे पैसे कुठून मिळतात रे? तू एवढा हा हनुमान जयंतीचा घाट घातलायस... केवढा तो मंडप आणि हे सगळं! तुला किती पैसे गोळा करायला लागतात? कसे गोळा करतोस एवढे पैसे?’’ तो माझ्याकडे बघून हसत म्हटला, ‘‘नरेंद्र, मला काही पैसे वगैरे गोळा करायला लागत नाहीत, मला लोक पैसे देतात. आता हा एवढा सगळा खर्च मला एका माणसाने दिलाय.’’ मला थोडं कुतूहल वाटलं. त्याला म्हणालो, ‘‘हा जर एवढा दानशूर माणूस असेल, तर तो मलापण मदत करेल.’’

पुढे म्हणालो, ‘‘कुणी तुला पैसे दिले? तू जरा सांग. मीपण त्याला विचारतो की, तो माझ्या  चळवळीला काही मदत करू शकतो का?’’ तो म्हणाला, ‘‘नाही, तुला चालणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘सांग तर माणूस कोण आहे ते!’’ मग त्याने हसत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या परमिट रूम बिअर बारकडे बोट दाखवलं. म्हणजे तुम्ही हनुमान जयंती साजरी करता; पण हनुमानाचं वर्णन काय करतात? ‘मनोजवम्‌ मारुततुल्य वेगम्‌। जीतेंद्रियम्‌ बुद्धिमताम्‌ वरिष्ठम्‌।।’ म्हणजे ज्याने स्वत:च्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे आणि जो बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे. त्याची जयंती दारू पिऊन इंद्रियांवरचा ताबा घालवणाऱ्या आणि बुद्धीला मूठमाती देणाऱ्या माणसाकडून पैसे घेऊन साजरी केली जाते. यात चूक म्हणायचीदेखील सोय राहिलेली नाही!

म्हणून सुशिक्षितांची अंधश्रद्धा हा केवळ विज्ञानप्रसाराचा भाग नाही, विज्ञानप्रसाराने तो जाण्यासारखा नाही. ज्या समाजवास्तवामध्ये आपण काम करतो, त्या समाजवास्तवाची राजकीय घडी स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांच्या धर्मभावना उद्दीपित करण्याच्या उद्देशाने जर बसवण्यात आली असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन हे फारसं सोपं राहत नाही. म्हणजे कारखानदार कच्चा माल घेतो, त्याच्यावर यंत्राने प्रक्रिया करतो, त्यातून पक्का माल बाहेर काढतो. याच पद्धतीने या मंडळींनी धर्माचं राजकारण करताना ‘लोकांची धार्मिकता’ हा कच्चा माल घेतला. त्यावर धर्माभिनिवेशाची, धर्मविद्वेषाची, धर्मांधतेची प्रक्रिया केली आणि मताच्या पेटीमधून सत्तेचा पक्का माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजामध्ये एवढं मोठं प्रतिकूल वास्तव असतं, तिथे सुशिक्षितांचं अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ प्रबोधनाच्या चळवळीतून होत नाही.

कुठल्याही लोकशाही समाजामध्ये समाज बदलण्याच्या प्रक्रियेची प्रमुख जबाबदारी राजकीय पक्षांची असते. त्यासाठी त्यांनी भूमिका घेणं आवश्यक असतं. आज राजकीय पक्षांनी स्वत:च्या मागे लोकांना आणण्याऐवजी, लोक ज्यामागे आहेत तिकडे जाण्याचा एक नवा फंडा सुरू केलेला आहे. लोक अमक्या-तमक्या बाबाकडे जात असतील, तर तेही त्याच्याकडे जातात. लोक ‘लिटिल चॅम्प्स’चा कार्यक्रम पाहत असतील, तर तेही तो पाहतात. समाजबदलाचं स्वत:चं असं काहीएक तत्त्वज्ञान असतं आणि त्याचा आग्रह धरण्यासाठी सत्ता मिळालेली असते, हेच आपली राजसत्ता विसरून गेलेली आहे.

एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात. आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो, ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’ मी म्हणालो, ‘‘साहेब, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही, तुम्ही राज्यकर्ते आहात. तुमच्याकडे आज घडीला 20,000 माध्यमिक शाळा आहेत. 80,000 प्राथमिक शाळा आहेत. 2,200 कॉलेजेस आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या शिक्षकांची संख्या 6 लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 कोटी 10  लाख आहे. कॉलेजमध्ये 10 लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ 1 लाख प्राध्यापक आहेत. या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात, मूल्यशिक्षणात, तसंच भारतीय संविधानातही ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा’ असं लिहिलेलं आहे. यातलं काहीच तुम्ही करत नाही, म्हणून आम्हाला करावं लागतं.’’

यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, समाज बदलण्याचं जे व्यापक परिप्रेक्ष्य आहे, त्यातल्या मोडकळीला आलेल्या आरोग्यव्यवस्थेमुळे, वर्गसंघर्षाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या जातीय व धार्मिक अस्मितेमुळे, उघडपणे चालू असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादामुळे, राजसत्तेने सोडून दिलेल्या परिवर्तनाच्या भूमिकेमुळे आणि प्रसार- माध्यमांच्या करंटेपणामुळे समाजाच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन हे अधिक बिकट झालेलं आहे. प्रसारमाध्यमं ‘राज पिछले जनम का’ अशा प्रकारचे कार्यक्रम दाखवणार असतील, तर ‘अहो, ते संमोहन खरं असतं का हो? ते केल्यावर मागच्या जन्मात जाता येतं का  हो? मागच्या जन्मात गेल्यावर ते जे सांगतात ते खरं असतं का हो?’ असंच लोक आम्हाला विचारणार.

वास्तविक, जगातल्या अनेक देशांमध्ये संमोहनाचे प्रयोग करायला कायदेशीर परवानगी नाहीये, कारण हा फ्रॉड आहे. पण आपल्या देशामध्ये यातलं काहीही चालू शकतं. अनेक चॅनेल्सवर मृतात्मा कोर्टात येऊन साक्ष दिल्याचं, त्याच्यामुळे आरोपीला शिक्षा झाल्याचं आणि पुन्हा तो आत्मा अंतर्धान पावल्याचं दाखवलं जातं. हे का होतं, कसं होतं, हे मात्र विचारायचं नाही. कारण ते म्हणतात, ‘हा आमचा धंदा वाढवण्याचा भाग आहे आणि आमच्या धंद्याबद्दल कोणी बोलायचं नाही.’

म्हणजे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेची कारणमीमांसा करताना एक बाजू व्यक्तिगत पातळीवरची आहे. ती म्हणजे, अज्ञान, अदृष्टाची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती, अस्थिरता, अगतिकता आणि अपराधी भावना. तर दुसरी बाजू समाजवास्तवाच्या पातळीवरची आहे. जिच्यात इथली आरोग्यव्यवस्था, इथले टोकदार झालेले जातीय व धार्मिक आग्रह, इथले धर्मसापेक्ष राजकारण, राजकीय पक्षांनी सोडून दिलेली भूमिका आणि इथल्या प्रसारमाध्यमांनी घेतलेली बोटचेपी भूमिका या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. याच्यावरचा उपाय काय आणि हे असं का घडलं? या प्रश्नाच्या पहिल्या व्यक्तिगत बाजूवर उपाय होऊ शकतो. दुसऱ्या बाजूवरचा म्हणजे समाजवास्तवावरचा उपाय मात्र व्यापक राजकारणाचा भाग आहे. ते राजकारण करण्याची माझी इच्छा असली, तरी आज ते करणं माझ्या आवाक्यात नाही. त्यामुळे यातल्या पहिल्या बाजूवरचा उपाय जर मी यशस्वीपणे केला, तर कदाचित सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये आणि एकंदर अंधश्रद्धेमध्ये परिणामकारक हस्तक्षेप करू शकेन, असं मी मानतो.

आपण नेहमी असं म्हणतो की, भारतामध्ये आता  विज्ञानाचं युग अवतरलेलं आहे. परंतु युरोपमध्ये ज्या वेळी विज्ञानाचं युग आलं, त्या वेळी तिथे जशी घुसळण झाली, तशी भारतामध्ये अजिबात झालेली नाही. युरोपमध्ये जवळजवळ चार-पाच शतकं ही घुसळण चालू होती. 1214 ते 1294 हा रॉजर बेकनचा कालखंड आहे. बेकन म्हणाला होता, ‘धर्मग्रंथात काय सांगितलं असेल ते असेल, पण माझ्या अनुभवाला आणि तर्काला जे पटेल, तेच मी मानेन.’ धर्मगुरू असलेल्या बेकनला 20 वर्षांची अंधारकोठडी सोसावी लागली. तसंच ब्रुनो म्हणाला होता, ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असं दिसत असलं; तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे मला माहीत आहे.’ रोममध्ये खांबाला बांधून ब्रुनोला जिवंत जाळण्यात आलं. गॅलिलिओने हेच सांगितल्यावर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. म्हणजे युरोपमध्ये सगळ्या बाजूंनी प्रबोधनाची एक घुसळण झाली. या घुसळणीत शोधकता होती, कृतिशीलता होती आणि निर्भयता होती. तसंच ही एक बहुआयामी घुसळण होती. एका बाजूला वैज्ञानिक सत्य सांगत होते; दुसऱ्या बाजूला देकार्तसारखा तत्त्ववेत्ता म्हणत होता, ‘I think. Therefore I am’ (मी विचार करू शकतो, म्हणूनच मी माणूस आहे).

तिसऱ्या बाजूला अनेक कलावंत चर्चला धुडकावून लावून स्वत:च्या चित्रकलेचा, संगीतकलेचा, शिल्पकलेचा आविष्कार करत होते. अनेक प्रोटेस्टंट म्हणत होते, ‘आमचं जे काही असेल, ते आम्ही येशूशी बघून घेऊ. त्यासाठी आम्हाला पोपची गरज नाही.’ अनेक साहित्यिकही असेच होते. त्यामुळे युरोपमध्ये चार ते पाच शतकं एक वैचारिक रणधुमाळी चालली. त्यातून युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं जनमानस घडलं.

भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ब्रिटिश साम्राज्यशाहीची आनुषंगिक पैदास म्हणून आला. ब्रिटिशांना आवश्यक होतं तेवढं तंत्रज्ञान आणि विज्ञान त्यांनी इथे आणलं. या ठिकाणच्या भांडवलशाहीला भांडवल-संचय करावा लागला नाही. एका बाजूला दलाली, सावकारी आणि दुसऱ्या बाजूला फार मोठी सरंजामशाही यामुळे त्यांचा भांडवल-संचय होता, तसंच ब्राह्मण/बनियांच्या वरिष्ठ जातींच्या हातात ज्ञानसत्ता होती. त्यामुळे या देशामध्ये ज्या वेळी वैज्ञानिक दृष्टिकोन आला, त्या वेळी फक्त शोधकता आली; निर्भयता आणि कृतिशीलता यांचा संबंधदेखील आला नाही. त्यामुळे अंधश्रद्धेवर प्रहार करणं अशक्य असल्याचं मानलं जायला लागलं आणि ही अशक्यता गृहीत धरूनच लोक आचरण करायला लागले. यासाठी मी दोन उदाहरणं देतो.

महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे. या सत्यशोधकी चळवळीतलं एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. ते कणखर सत्यशोधक होते. अनेक ठिकाणी भाषणं द्यायचे. एका गावामध्ये त्यांचं भाषण झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या देवळातले चांदीचे डोळे चोरीला गेले असल्याचं लक्षात आलं. नानांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कोणी तरी ते डोळे चोरले असल्याची लोकांना खात्री होती. मात्र ते देवस्थान अतिशय प्रखर आणि जागृत होतं. त्यामुळे देवाचे डोळे चोरलेला माणूस ‘चीं चीं’ करत येईल आणि डोळे परत देईल, असा लोकांचा विश्वास होता. एक महिना गेला, दीड महिना गेला, दोन महिने गेले... पण डोळे काही परत आले नाहीत. तीन-चार महिन्यांनी पुन्हा एकदा नाना त्याच गावात भाषणाला आले. त्याच देवळात उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘हा देव जागृत आहे, असं तुम्ही म्हणता. त्याचे डोळे चार महिन्यांपूर्वी चोरीला गेले. खरं तर ते चोरीला गेले नाहीत, मीच काढून नेले होते.’’ असं म्हणून त्यांनी स्वत:च्या खिशातून डोळे काढून दाखवले. ते पुढे म्हणाले, ‘‘जर तुमच्या देवाने माझं काहीही केलं नाही, तर तो जागृत कसा काय असेल?’’ हे महाराष्ट्रामध्ये 60 -70  वर्षांपूर्वी कृतिशीलपणे विचारलं गेलं. पण शोधकता आणि कृतिशीलता यांची आजची स्थिती काय आहे?

तुम्हाला गंमत वाटेल, पण चळवळीतला एक खरा किस्सा सांगतो. आधुनिक म्हणून आपल्या सगळ्यांना वेळेचं फार महत्त्व असतं. वेळ पाळायला पाहिजे, हे बरोबरच आहे. पण या देशातली माणसं अनेक ठिकाणी वेळ वाया घालवतात, त्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे स्मशान! ‘मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवावा’ याची पिंडदानाच्या दिवशी 50 -100 माणसं तरी वाट बघतात की नाही? त्यात वेळ किती जातो? तर ते स्वत:च्या घरापासून निघतात, स्मशानात जातात, पिंड ठेवतात आणि कावळा शिवेपर्यंत सगळे जण वाट बघत राहतात. त्याच्यामागची कल्पना तुम्हाला माहीत आहे का? पिंड ठेवलेल्या जागी मेलेल्या माणसाचा आत्मा बरोब्बर दहाव्या दिवशी येऊन थांबतो. खरं म्हटलं तर मेलेल्या माणसाचा आत्मा स्वर्गाला जायला पाहिजे, पण दहाव्या दिवशी त्याला परत ड्युटीवर आणतात आणि तो बिचारा येऊन पिंडाच्या बाजूला उभा राहतो. मात्र पिंडाच्या बाजूला आलेला मेलेल्या माणसाचा आत्मा त्याच्या प्रिय जनांपैकी कुणालाही दिसत नाही, कावळ्याकडे मात्र special ability असल्याने त्याला तो दिसतो. बरं, तो नुसताच दिसतो असं नाही, तर तो आनंदी आहे की दु:खी, हेही कावळ्याला दिसतं. म्हणजे जिवंत माणसाच्या चेहऱ्यावरूनसुद्धा तो आनंदी असावा की दु:खी याचा अंदाज येत नाही. एखाद्या वेळेला मनातून दु:खी असणारा माणूस चेहऱ्यावरून आनंदी असेल किंवा मनातून आनंदी असणाऱ्या माणसाचा चेहरा दु:खी असेल. पण कावळ्याला मात्र सगळं कळतं. म्हणजे तो आत्मा आनंदी असेल, तर कावळ्याला ते लगेच कळतं आणि तो पटकन पिंडाला शिवतो. सगळे लोक म्हणतात, ‘सुटलो!’. पण जर तो आत्मा दु:खी असल्याचं कावळ्याला दिसलं, तर तो पिंडाला शिवत नाही.

मग नातेवाइकांपैकी कुणी तरी म्हणतं, ‘अरे, त्याच्या मुलीचं लग्न राहिलंय. त्याची काळजी असणार.’

त्यावर दुसरा कुणी तरी म्हणतो, ‘काळजी करू नकोस. तुझ्या मुलीचं लग्न लावून देऊ.’

किंवा आणखी कुणी तरी म्हणतं, ‘त्याच्या मुलाला नोकरी नाही. घरी दुसरा आधार नाही.’

‘तुझ्या मुलाला नोकरी लावून देऊ, असं म्हणा.’ असं कुणी तरी सुचवतं.

हे बोलणं त्या आत्म्याला ऐकू जातं! कसं- ते विचारायचं नाही, पण ऐकू जातं. मग त्याचा चेहरा आनंदी होतो, तो कावळ्याला दिसतो आणि कावळा पिंडाला शिवतो. मग सगळे म्हणतात, ‘चला, पिंडाला कावळा शिवला.’ सगळे आपापल्या घरी जायला मोकळे आणि कावळा पुढच्या पिंडाला शिवायला मोकळा! तुम्ही हसलात ना?

पण यावर आमच्या एका कार्यकर्त्याने खरोखर एक गंमतशीर प्रयोग केला. जिवंत असताना त्याने बायको-मुलांना स्मशानात नेऊन स्वत:चाच पिंड ठेवला. आता सांगा, कावळ्याने शिवावं का शिवू नये? अहो, शिवला की पटकन येऊन कावळा! जन्मभर शाकाहारी असलेल्या माणसाचा झणझणीत बोंबलाचा पिंड ठेवला, तर कावळा शिवेल की शिवणार नाही? कावळ्याने खरं तर येऊन त्याला टोच मारायला हवी होती. ‘मी जन्मभर शाकाहारी राहिलो आणि माझा मांसाहारी पिंड ठेवतो होय!’, असं म्हणायला हवं होतं, पण तसं काही झालं नाही. मग दुसऱ्या शाखेला वाटलं, ‘कार्यक्रम बरा आहे.’ त्यांनीपण जाहीर पिंडदानाचा कार्यक्रम केला. त्यावर लगेच धर्मवादी खवळले. ते म्हणाले, ‘आमच्या हिंदू धर्माची चेष्टा लावली काय तुम्ही!’ म्हणजे ‘पिंडाला कावळा शिवल्याने’ यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होत नाही, पण ‘पिंडाला कावळा शिवतो का?’ याची चर्चा करून यांच्या हिंदू धर्माची चेष्टा होते. हे महाराष्ट्रातलं आजचं वास्तव आहे.

म्हणून सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये केवळ शोधकता उपयोगी नाही, तर निर्भय कृतिशीलतादेखील महत्त्वाची आहे. ज्या प्रमाणात ही निर्भय कृतिशीलता अंगीकारली जाईल, त्या प्रमाणात सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होईल. आपल्यापैकी अनेकांनी संतोषीमातेची पत्रकं बघितली असतील. एके काळी हा प्रकार जास्त होता, अजूनही तो काही प्रमाणात आहे. ‘अशी 500 पत्रकं छापून वाटलीत, तर तुमचं कल्याण होईल. मात्र हे पत्रक फेकून दिलंत, तर तुमची काही खैर नाही. तुमचं कुणी तरी मरेल, तुमचा आर्थिक तोटा होईल’, वगैरे वगैरे सांगणारी ही पत्रकं असतात. एके दिवशी एका तालुक्याच्या गावीही अशीच पत्रकं आली होती. तिथे शिक्षक असलेला आमचा एक कार्यकर्ता होता. पत्रकं आलेल्या दिवशी वर्गात गेल्यानंतर तो मुलांना म्हणाला, ‘‘आज सकाळी मला असं पत्रक आलंय’’. त्याने पत्रक काढून दाखवलं. मुलांकडेही ते पत्रक आलं होतं आणि तीही ते घेऊन आली होती.

मुलांना प्रश्न- ‘आता गुरुजी काय करणार?’ ते पत्रक गुरुजींनी वाचून दाखवलं आणि मुलांच्या समोर फाडून टाकलं! मुलांना धक्का बसला. मग तो शिक्षक म्हणाला, ‘‘आता पुढचे पंधरा दिवस माझ्यावर लक्ष ठेवा. संतोषीमाता माझं काही वाईट करते की नाही, ते तुम्ही बघा.’’ नंतर त्याने मला सांगितलं की, ‘‘डॉक्टर, त्या पंधरा दिवसांमध्ये एकदा माझ्या मुलाला दोन दिवस ताप आला, तरी मी त्याला शाळेत पाठवलं. त्याला पाठवलं नसतं, तर उगीच लोक म्हणाले असते, ‘संतोषीमातेने काही तरी केलं...’’ त्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी मुलांच्या दप्तरांमधली पत्रकं बाहेर आली आणि त्यांनी ती फाडून टाकली.

थोडक्यात, महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये समाजसुधारकांची अतिशय उज्ज्वल परंपरा असूनदेखील आपण शोधकतेला निर्भय कृतिशीलतेची जोड देण्याचं विसरून गेलो आहोत. ही कृतिशील निर्भयतेची जोड का गरजेची आहे? मार्क्सचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘ज्या वेळी विचार जनसमुदायाची पकड घेतात, त्या वेळी ते भौतिक शक्ती बनतात.’ भौतिक शक्ती काही फक्त 440 व्होल्ट विजेच्या बल्बमध्ये नसते, फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते. ‘आम्ही हे करू’ असं ज्या वेळी समाज एकवटून ठरवतो, त्या वेळी भौतिक शक्ती निर्माण होते. ‘एक धर्मस्थळ पाडून दुसरं धर्मस्थळ उभारणं’, या चुकीच्या विचाराने जर समाजाची पकड घेतली, तर देशाचं राजकारण बदलतं आणि सत्तापालट होतो. विचाराचा प्रभाव एवढा प्रचंड असतो!

याच न्यायाने जर विवेकवादी विचारांनी इथल्या जनसमुदायाच्या मनाची पकड घेतली, तर स्वाभाविकपणे आज ना उद्या या देशातल्या सरकारला आरोग्यासाठी जास्त तरतूद करावी लागेल, लोकांच्या प्रश्नांचे खरे लढे होतील, धर्म आणि जात यांच्या अस्मिता मागे पडतील, सांस्कृतिक राष्ट्रवाद मागे पडेल आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा प्रभावी होईल, लोकांचं प्रतिनिधित्व करणारी राज्यसंस्था अधिक प्रामाणिकपणे स्वत:ची भूमिका बजावेल, ती इथल्या प्रसारमाध्यमांना योग्य भूमिका घ्यायला लावेल. कारण शेवटी लोकच समाज निर्माण करत असतात आणि लोकच समाज बदलत असतात. जे सुशिक्षित असतात, त्यांनी हे करण्याची गरज अधिक असते. म्हणून ते ज्या वेळी अंधश्रद्धेला बळी पडतात, त्या वेळी त्याची वेदनाही अधिक असते. त्यामुळे हा समाज विचारांच्या आधारे बदलू शकतो. हा विश्वास ज्या समाजाने गमावलेला आहे, तो विश्वास पुन्हा एकमेकांना देऊन योग्य त्या मूल्यांसाठी समाज बदलावा म्हणून संकल्प करणारे आपण समसंवादी कार्यकर्ते होऊ या, अशी मी आपल्याला मन:पूर्वक विनंती करतो.

(शब्दांकन : भाग्यश्री भागवत)  

पुणे विद्यापीठातील मराठी विभागात ‘चौकटीबाहेरचे जग’ या व्याख्यानमालेत 27 फेब्रुवारी 2010 रोजी केलेले भाषण.

Tags: अंधश्रद्धा चौकटीबाहेरचे जग भाग्यश्री भागवत नरेंद्र दाभोलकर superstition chaukatibaherche jag bhagyshree bhagwat narendra dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

1 नोव्हेंबर1945 - 20 ऑगस्ट 2013

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे  भूतपूर्व संपादक.


Comments

 1. Shinde Hanumant- 01 Nov 2020

  खुपच सुरेख व डोळे उघडणारा लेख

  save

 1. SHIVAJI PITALEWAD- 01 Nov 2020

  अत्यंत सोप्या भाषेत अंधश्रद्धा दाखवून प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची सवय लावणारे विचार. अप्रतिम...... डॉ दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन!!!

  save

 1. Anjani Kalkar- 11 Jan 2021

  आगदी खर आहे व्यक्ती म्हणून आपण सुरुवात करणे गरजेचे आहे.

  save

 1. Ramesh Donde- 14 Jan 2021

  हे भाषण शालेय अभ्यासक्रमात घातले पाहीजे .

  save

 1. Subhash Athale- 14 Jan 2021

  राजकारणावर समाजाचे नेतृत्व करण्याच्या ऐवजी जनतेचे लांगुलचालन करण्याची पाळी का येते याचा जरा जास्त अभ्यास केला पाहिजे. इतर देशातील राजकीय नेते जनतेचे लांगूलचालन न करता देखील आपल्या विचारसरणीचा वापर राजकारणात करण्यासाठी कसे काय निवडून येतात?

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके