डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माणूस नावाचा एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा? लोक असं म्हणतात, ‘तो सृष्टीचा स्वामी झाला, कारण त्याने आपली विचारशक्ती आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी वापरायला सुरुवात केली.’ मग मी त्यांना असं विचारतो, ‘सगळ्यांनाच बुद्धी आहे - हत्तीला बुद्धी आहे, म्हणून तो सर्कशीमध्ये काम करतो; कुत्र्याला बुद्धी आहे, म्हणून तो पोलीस खात्याला उपयोगी पडतो; डॉल्फिन माशाला तर चौथीतल्या पोराएवढी अक्कल आहे; तो पाणसुरुंग शोधून काढतो आणि बोटींना मार्गही दाखवतो; मग माणूसच बुद्धिमान कसा?’

महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव पटेल यांचं मला एकदा पत्र आलं. ते पत्र काय होतं?- ‘कळवण्यास आनंद होतो की, तुमच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळालेला आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी आपण 25 नोव्हेंबरला औरंगाबादला यावं’. यावर मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं, ते माझ्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. माझ्या त्या पत्रामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण एक अधिक गंभीर ओळ लिहिलेली आहे. ती अशी - ‘भारतीय संविधानाशी विसंगत वर्तन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून मी माझा पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही’. आता मी काही एवढा उद्धट कार्यकर्ता नाही की, कुणी जर आपलं कौतुक करत असेल, तर ‘जा! मला नको तुझं कौतुक!’, असं म्हणीन.

मग मी असं का लिहिलं? याचं कारण, 25 जानेवारी 1950 रोजी मला जी घटना मिळाली, त्यात फक्त नागरिकांचे हक्क होते. म्हणजे मला संचार-स्वातंत्र्याचा हक्क आहे, मी देशामध्ये कुठेही फिरू शकतो. मला अभिव्यक्तीचा हक्क आहे, मी पाहिजे ते बोलू शकतो. मला मालमत्ता धारण करण्याचा हक्क आहे, मी मालमत्ता खरेदी करू शकतो. परंतु मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांना जसं सांगतो की, ‘तुम्हाला हक्क मिळतील, पण तुम्हांला कर्तव्यंही पार पाडावी लागतील’, त्याच पद्धतीने 1976 साली देशाच्या घटनेमध्ये वाढ करून, तिच्यामध्ये नागरिकांच्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे - It is a duty of every indian citizen to promote scientific temperament. म्हणजे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा (सायंटिफिक टेंपरामेंटचा) विचार, प्रसार आणि अंगीकार करणं, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या, नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार ‘करावा की करू नये’, असं त्याला विचारलेलं नाहीये; ते त्याचं कर्तव्यच आहे. एवढंच नव्हे, तर त्याच्यानंतर 1987 साली देशाचं नवं शैक्षणिक धोरण आलं. या शैक्षणिक धोरणामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ या महत्त्वाच्या गाभाघटकाचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मूल्यशिक्षण शिकवलं जातं. शालेय मूल्यशिक्षणामध्येही वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जोपासनेची नोंद केलेली आहे.

आपण सगळे जण विज्ञानयुगात जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकही गोष्ट विज्ञानाच्या साहाय्यावाचून करू शकत नाही. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण ‘टूथब्रश’वर ‘टूथपेस्ट’ घेतो आणि ‘वॉशबेसिन’चा नळ सोडतो. लक्षात घ्या, यांपैकी एकही गोष्ट 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हती. ना टूथब्रश होता, ना टूथपेस्ट होती, ना वॉशबेसिन होतं. त्या वेळी झाडाची काडी घेऊन विहिरीचं पाणी शेंदावं लागत असे! आज आपल्यापैकी अनेक जण विज्ञानाचे पदवीधर असतील. आता, वर सांगितलेलं सगळं महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांमध्ये सांगितल्यानंतर मी एक साधा प्रश्न विचारतो आणि दहा सेकंद थांबतो. प्रश्न असा - नंबर एक, घटनेमध्ये नागरिकांचं कर्तव्य म्हणून ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर दोन, शिक्षणाच्या गाभाघटकामध्ये ‘वैज्ञानिक मनोभावाच्या निर्मिती’चं महत्त्व सांगितलेलं आहे. नंबर तीन, मूल्यशिक्षणामध्ये ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’चा समावेश केलेला आहे. नंबर चार, तुम्ही ज्या विज्ञानयुगात जगता, त्याचा पाया ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ आहे. आणि नंबर पाच, तुम्ही विज्ञानाचं जे शिक्षण घेतलंत, त्याचं तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हेच आहे. तर, एवढा महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, हे मला एका शब्दात कोण सांगेल?

म्हणजे जसे तिसरी-चौथीत आपल्याला प्रश्न असतात की, समानार्थी शब्द लिहा. मग ‘पाणी’ हा शब्द असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो - ‘जल’ ‘सूर्य’. हा शब्द असेल असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो - ‘रवी’. ‘चंद्र’ हा शब्द असेल, तर आपण समानार्थी शब्द लिहितो - ‘शशी’. तसं माझं भाषण ऐकताना क्षणभर आपणही विचार करा आणि समानार्थी शब्द लिहा - ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’. माझा असा अनुभव आहे की, महाराष्ट्रामधल्या 99 टक्के महाविद्यालयांमध्ये 99 टक्के वेळेला याचं उत्तर येत नाही आणि आलं, तर चुकीचं येतं. वैज्ञानिक दृष्टीकोन याचा एका शब्दामध्ये अर्थ - कार्यकारणभाव तपासणं! नंबर एक, प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. नंबर दोन, ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. नंबर तीन, जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही; पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजतं. आणि नंबर चार, यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे!

वैज्ञानिक दृष्टीकोन कळेपर्यंत माणूस या सृष्टीमधला दुबळा प्राणी होता. ‘माझ्या आयुष्यामध्ये जे-जे काही घडतंय; ते-ते घडण्यामागे देव आहे; दैव आहे; नशीब आहे; प्राक्तन आहे; संचित आहे; प्रारब्ध आहे; कर्मविपाक आहे; मागच्या जन्मीचं पाप-पुण्य आहे; जन्माची वेळ आहे...’ अशा अनेक गोष्टी कार्यकारणभाव कळत नव्हता, तोपर्यंत माणसाला वाटत होत्या. माणसाला कार्यकारणभाव कळला आणि जो माणूस परतंत्र होता, तो स्वतंत्र झाला; जो पराधीन होता, तो स्वाधीन झाला. आणि लक्षात घ्या, मानवी इतिहासामधली ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय रोमांचकारी घटना आहे!

या पृथ्वीवरचा सगळ्यात दुबळा प्राणी म्हणून माणूस जन्माला आला, याचा आपण कधी तपशीलवार विचार केला आहे का? माणसाला चिमणीप्रमाणे साधं हवेमध्ये उडता येत नाही. माणसाला माशाप्रमाणे पाण्यात चोवीस तास राहता येत नाही. माणसाची आणि हरणाची पळण्याची शर्यत लावली, तर हरिण माणसाच्या तिप्पट वेगाने पळतं. कारण हरणाच्या पायांचे स्नायू माणसाच्या पायांच्या स्नायूंपेक्षा तिपटीने बळकट आहेत. हत्तीला आणि गेंड्याला निसर्गाने अपरंपार ताकद दिलेली आहे. त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. वाघ आणि सिंहाला तीक्ष्ण नखं आणि तीक्ष्ण दात दिलेले आहेत. त्यामुळे ते कच्चं मांस पकडू शकतात; फाडू शकतात; खाऊ शकतात. माणसाला हे अजिबात शक्य होत नाही. थंडीमध्ये माणूस कुडकुडतो, पण निसर्गाने अस्वलाला उबदार केसाळ कातडीचा कोट दिलेला आहे. त्यामुळे ते हिमप्रदेशातही मजेत राहतं. अंधारामध्ये बॅटरी घेतल्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही, पण मांजराचं पिल्लू अंधारामध्ये जाऊ शकतं. माकडाचं पिल्लू या झाडावरनं त्या झाडावर मजेत उड्या घेतं, मात्र माणसाला ते शक्य होत नाही.

घरामध्ये जर दोन-तीन महिन्यांचं गोजिरवाणं बाळ असेल आणि जर तुम्ही त्याला हौसेने उचललंत, तर घरातल्या वयस्क बायका सांगतात, ‘मोठ्या हौसेने लेकराला उचललंय, पण त्याच्या मानेखाली हात घाला’. माणसाच्या तीन महिन्यांच्या मुलाला स्वतःची मान सावरता येत नाही आणि तीन महिन्यांचं बैलाचं खोंड मात्र ढुशा देताना आवरत नाही. आपल्यापैकी अनेकांनी गाईचं नुकतंच जन्मलेलं वासरू बघितलं असेल. गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर बारा तासांमध्ये पाय झाडत उभं राहतं आणि माणसाचं पिल्लू बारा तास नव्हेत, बारा दिवस नव्हेत, बारा आठवडे नव्हेत, बारा महिन्यांनी उभं राहिलं, तरी आम्ही टाळ्या पिटून म्हणतो, ‘बाळ्या उभा राहिला, कुणी नाही पाहिला!’

तर विचार असा केला पाहिजे की, माणूस नावाचा एवढा दुबळा प्राणी या सृष्टीचा स्वामी झाला कसा? लोक असं म्हणतात, ‘तो सृष्टीचा स्वामी झाला, कारण त्याने आपली विचारशक्ती आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी वापरायला सुरुवात केली.’ मग मी त्यांना असं विचारतो, ‘सगळ्यांनाच बुद्धी आहे - हत्तीला बुद्धी आहे, म्हणून तो सर्कशीमध्ये काम करतो; कुत्र्याला बुद्धी आहे, म्हणून तो पोलीस खात्याला उपयोगी पडतो; डॉल्फिन माशाला तर चौथीतल्या पोराएवढी अक्कल आहे; तो पाणसुरुंग शोधून काढतो आणि बोटींना मार्गही दाखवतो; मग माणूसच बुद्धिमान कसा?’

(28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस, या निमित्ताने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘विवेकाचा आवाज’  या पुस्तकातून वरील भाग पुनर्मुद्रित केला आहे.- संपादक)

विवेकाचा आवाज हे पुस्तक अमेझॉन तसेच किंडलवर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: विवेकाचा आवाज विज्ञान दिन संपादकीय नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा विज्ञान narendra dabholkar books superstitions narendra dabholkar on science science day science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक होते तसेच साधना साप्ताहिकाचे संपादक ही होते.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके