डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेतकरी आत्महत्येच्या आंदोलनांचे बैल पांगले?

वीरूगिरी करणारी आंदोलने वाढत गेली आणि माध्यमांनी त्यांची सातत्याने दखल घेतली तर सनदशील मार्गाने होणाऱ्या आंदोलनांवरून या देशातील नागरिकांचा विश्वासच उडून जाईल. हा विश्वास गमवायचा नसेलतर अशा आंदोलनांचे घातक परिणाम राज्यकर्त्यांसह आंदोलकांनीही समजून घ्यावयास हवेत. अन्यथा, लोकशाहीवर विश्वास नसलेले आणि वैचारिकतेचा आभाव असणारे हे सर्व नवनक्षलवादीच ठरतील.

आज रोजी विदर्भातील शेतकरी इतका अगतिक, वैफल्यग्रस्त झाला आहे की, तो आता स्वत:च्या जीवावरही उदार झाला आहे. नाकर्त्या राज्यकर्त्यांवरून त्याने आपली सोन्यासारखी जिंदगी ओवाळून टाकली आहे. क्रिकेटच्या स्कोअरसारखी वाढत जाणारी आत्महत्यांची संख्या नियोजनकर्त्यांची झोपमोड करण्यात असमर्थ ठरली आहे. आजच्या राजकीय नेत्यांमध्ये, सत्ताधाऱ्यांमध्ये इतके कोडगेपण कशामुळ आले? शेतकरी आत्महत्येच्या जनआंदोलनाची दिशा भरकटली, की या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांचे बैल पांगले?

तीन दशकांपूर्वी विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या साहेबराव पाटील यांची झाली होती. तेव्हा साहेबराव पाटील हे विदर्भातील साहित्यक, विचारवंतांच्या लिखाणाचा विषय झाले होते. तेव्हा एका कवीने म्हटले होते...
‘आता कापूस जवारी पेरसान त लेकहो हराममौतीनं मरसान
आता पेरा तासातासानं लोखंडी दगडी गोटे
चारी मेरीनं बाभुईचे खम्मन काटे...’’

या परिस्थितीची तत्कालीन राज्यकर्त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर आज आत्महत्येची जखम इतकी चिघळली नसती.
1990 च्या दशकापासून विदर्भाचा शेतकरी कंगाल होत गेला. लागत खर्च जास्त आणि उत्पादन मूल्य कमीअसे शेतीचे तंत्रच बदलून गेले. उत्पादनावर आधारित शेतीला रास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून हेच शेतकरी कधीकाळी मोठ्या अपेक्षेने रस्त्यावर उतरले होते. पुढे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाकडून मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला आणि संघटनेच्या वैचारिक गोंधळापायी कार्यकर्त्यांची एकपिढी वाया गेली. राजकारणात जुन्या नेतृत्वाला शह देऊन नवनवे नेतृत्व अगदी स्थानिक पातळीवरही उभे राहिले. प्रस्थापित नेतृत्वाला शह देऊन ग्रामीण भागात हे नेतृत्व उभे करण्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा राहिला. गाव तेथे शाखेच्या पाट्या उभारून आपणच उद्याचे तारणहार अशा थाटात गावोगावी शिवसेनेचे छावे उभे राहिले. कोणत्याही प्रश्नावर राडा करणे, वर्गणी गोळा करून आपली दुकानदारी चालविणे, चार-दोन विधायक कामे करणे, त्यातही कुठे मोठ्या नेत्याच्या वाढदिवसाला रक्तदान कार्यक्रम, कधी दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप, कधी गरीब मुलांना वह्या वाटप अशा उपक्रमांमधून त्यांनी फक्त प्रसिद्धीच मिळविली. स्थानिकवृत्तपत्रांमध्ये बातमी व फोटो छापण्यापुरताच या आंदोलकांचा कालपर्यंत सहभाग रहायचा, पण आता तालुका पातळीवर ही इलेट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपलब्ध झाल्याने आपल्या आंदोलनाची खबर एक-दोन तासात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचते, वृत्तवाहिन्यांवर बातमी आली म्हणजे वृत्तपत्रवाले दखल घेतातच हा समज दृढ होत गेला. रातोरात हिरो बनण्यासाठी, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी विविधांगी आंदोलनांच्या युत्या या नव्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी शोधून काढल्या.

‘शोले’ चित्रपटात वीरू (धमेंद्र) गावातील उंच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या काही मागण्या गावकऱ्यांसमोर मांडतो. संपूर्ण गावालाच तो वेठीस धरतो. हीच विरूगिरी (हिरोगिरी) आजच्या अनेक आंदोलनांमध्ये गावोगावी दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे चार पोट्टे उठतात व उंच पाण्याच्या टाकीवर चढून कापडी फलक लावतात. पोलीस येण्याच्या आधी दहा-पंधरा मिनिटात खाली उतरतात... संपूर्ण देशभर बातमीच्या रूपात झळकतात... विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी ते अगोदरच सोबत घेऊन येतात... वाहिन्यांचे प्रतिनिधी सांगतील तसे बाईट देतात... यातूनच ‘प्रहार’ सारखे आततापीयपणाचे आंदोलन उभे राहते.

टिळक, गांधी, भगतसिंग, आंबेडकर, डांगे, दादासाहेब गायकवाड, फर्नांडिस, गोदावरी परूळेकर, एन.डी.पाटील अशा अनेक महान नेत्यांनी आंदोलने, सत्याग्रह केले; पण त्यांना जे प्रसिद्धीचे तंत्र जमले नाही ते तंत्र आजच्या युवा पिढीला, नेत्यांना मात्र नक्की जमले आहे. आजचे आंदोलन महर्षी त्या अर्थाने महात्मा गांधींच्याही पुढे दोन पावले गेले आहेत. आजच्या आंदोलनांची, सत्याग्रहांची दिशाच बदललेली दिसते. निवेदन, आमरण उपोषण, जनजागरण यात्रा, बैठा सत्याग्रह, निदर्शने, घेराव, मौनव्रत, मूकमोर्चा, निषेध मोर्चा, प्रेतयात्रा, शासनाची तेरवी इत्यादी आंदोलनांची जागा शासकीय संपत्तीची जाळपोळ, दगडफेक, राडा, लूटमार, मारामारी, तोंडाला काळे फासणे, कार्यालयात घाण आणून टाकणे, कोरड्या विहिरीत बसणे, टॉवरवर चढणे, मंत्र्यांच्या दालनात पेटवून घेणे, आत्मदहन करणे आणि आता चक्क जाहीर विषप्राशन करणे ही बदलत्या आंदोलनाची आजची दिशा आहे.

बुधवार दि. 8 डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ‘प्रहार’चे तालुका प्रमुख बाळ जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रहार’च्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आत्मघातकी आंदोलनाद्वारे विषप्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्वी-देऊरवाडा रस्त्यावरील भोईपूर पुनर्वसित गावातील समाज मंदिरात प्रहारच्या दहा कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केले. या आत्मदहन आंदोलनाची रीतसर नोटीसही जिल्हा प्रशासनाला प्रहारच्या वतीने देण्यात आली होती. या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आष्टी व कारंजा हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा, या भागातील प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना आर्थिक मदत द्यावी, नापिकीमुळे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, इत्यादी रास्त मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

आमदार बूच्चू कडू यांची ‘प्रहार’ ही संघटना. बूच्चू कडू हे कधीकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख होते. व्यक्तिगत आंदोलनामुळे शिवसेनेत गोची झाल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले. नव्या-जुन्या मित्रांना सोबत घेऊन त्यांनी स्वत:ची ‘प्रहार’ नावाची राजकीय, सामाजिक संघटना उभी केली. 2005 मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 2009 च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ते प्रचंड मतांनी पराभूत झाले. आताच्या विधानसभेत ते रिडालोसच्या पाठिंब्याने पुन्हा निवडून आले. जनसामान्यांच्या प्रश्नांवर विविधांगी तथा लक्षवेधी आंदोलन करण्यात ते इतर आमदारांच्या तुलनेत नेहमीच पुढे असतात. या आंदोलनाचे बाळकडू त्यांना शिवसेनेतून मिळालेले दिसते.

या आंदोलनकर्त्यांनी विष प्राशन केले ही बातमी ‘प्रहार’चे आमदार बूच्चू कडू व आमदार दादाराव केचे यांनी विधानसभेला दिली. मात्र त्यानंतरही घटनास्थळी धाव घेण्याची सुहृदयता सोडून त्याच दिवशी सायंकाळी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या जवळपास सर्व नेत्यांनी नागपुरातील व्ही.सी.ए. मैदानावर भारत-श्रीलंका टेंव्टी-20 सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. या घटनेतून सर्वच राजकीय नेत्यांचा निगरगट्टपणा दिसून आला. बूच्चू कडूंना कोणीतरी सांगितले पाहिजे- तू किससे ‘रीयाद कर रहा है दोस्त, उस कुर्सीपर बैठा शख्स बहरा है...

जाहीर विषप्राशन करून आत्मदहन करणाऱ्या या आंदोलना मागील आंदोलनकर्त्यांची तीव्र भावना आम्ही समजू शकतो, ज्याचे जळते त्यालाच कळते, परंतु जाहीर विष प्राशन करणे हा आंदोलनाचा मार्ग होऊ शकतो काय? कालच्या ‘प्रहार’च्या या आंदोलनातील दहाही युवकांना वैद्यकीय मदत उशीरा मिळाली असती तर या पस्तिशीच्या आतील सर्वांचे चिेल्ले-पिेल्ले रस्त्यावर आली असती. राजकीय पक्षांनी आर्थिक मदतही दिली असती, पण लहान मुलांना त्यांचा बाप, काका, मामा, भाऊ, दादा तसेच वृद्ध आई-वडिलांच्या आयुष्याचा आधार असणारा पोरगा देता आला असता काय? ज्या आत्महत्याग्रस्त घराती लतरुण मुली आज विधवांचे आयुष्य जगत आहेत, त्यांना एकदा तरी विचारा, पती निधनाचे दु:ख काय असते? म्हाताऱ्या आई-बापांना विचारा पोरगा गेल्याने कोणते स्वप्न भंगते?
आज विविधांगी आंदोलने जरूर व्हावीत, ती झालीच पाहिजेत, कारण ती लोकशाहीतील साचलेपण धुवून काढण्याचे साधन आहे. परंतु जर आंदोलनच आंदोलनकर्त्यांचा जीव घेत असेल तर त्याचे समर्थन कसे करता येईल?

‘‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है की, यह सुरत बदलनी जाहिए’’- असा दुर्दम्य आशावाद घेऊन आंदोलने करणारी एक जाज्वल्य नेत्यांची पिढी आपल्या लोकशाहीने पाहिली आहे. आजच्या या आंदोलनाद्वारे कोणती परिस्थिती कशी बदलणार आहे? की फक्त तात्पुरते आश्वासन घेऊन हा विद्रोह, ही चीड शांत केली जाणार आहे. अशा स्टंटबाजी करणाऱ्यांजवळ खरं तर या दीर्घकालीन प्रश्नांची समर्पक उत्तरेच नसतात.

एकीकडे आंदोलक जशी टोकाची भूमिका घेतात तसेच प्रशासनातील नोकरशाही ही राज्यकर्त्यां प्रमाणेच संवेदनहीन झालेली दिसते. थोड्याही दु:खाची, सहानुभूतीची छोटीशी छटाही त्यांच्यात जाणवत नाही. ज्यामध्ये कमिशन नाही अशा कामांमध्ये आजच्या नोकरशाहीला आवड नाही- अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. राज्यकर्ते संवेदनशील नाहीत, नोकरदार संवेदनशील नाहीत, माध्यमेही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तितकीशी गंभीर नाहीत, गांधींच्या तीन बंदराचे सोंग राज्यकर्त्यांनी सद्यपरिस्थितीत चांगलेच वठविले आहे.

वीरूगिरी करणारी आंदोलने वाढत गेली आणि माध्यमांनी त्यांची सातत्याने दखल घेतली तर सनदशील मार्गाने होणाऱ्या आंदोलनांवरून या देशातील नागरिकांचा विश्वासच उडून जाईल. हा विश्वास गमवायचा नसेलतर अशा आंदोलनांचे घातक परिणाम राज्यकर्त्यांसह आंदोलकांनीही समजून घ्यावयास हवेत. अन्यथा, लोकशाहीवर विश्वास नसलेले आणि वैचारिकतेचा आभाव असणारे हे सर्व नवनक्षलवादीच ठरतील.
 

Tags: bacchu kadu prahar vidharbhacha shetkari shetkari atmhatya narendra lanjekar Shetkari atmhatyechya andolanache bail pangale बूच्चू कडू प्रहार विदर्भाचा शेतकरी शेतकरी आत्महत्या नरेंद्र लांजेवार शेतकरी आत्महत्येच्या आंदोलनांचे बैल पांगले? weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके