डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

चेतना देणारे आणि पेटवणारे साने गुरुजींचे अश्रू

दुःख पाहवत नाही म्हणून जे रडतात, ते रडतात हे खरे असले तरी ते दुःखाचे मूळ शोधत नाहीत. म्हणून हे अश्रू ओसंडून आले तरी वाहून जातात; ते समाजात रूजलेल्या दुःखांना उत्तर शोधीत नाहीत. दुःखाचे कारण शोधणे, त्याचे उत्तर शोधणे आणि दुःख संपवण्यासाठी समर्पण बुद्धीने संघर्षाला सिद्ध होणे ही क्रिया साध्या भूतदयेपेक्षा निराळी आहे.

प्रा. नरहर कुरुंदकर यांनी मिरज येथे केलेले मूलग्राही विवेचन

मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने गेली 51 वर्षे वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदा या वसंत व्याख्यानमालेत संस्थेचे एक कार्यकर्ते व सिद्धहस्त चित्रकार श्री दत्तोपंत आपटे यांनी मिरज विद्यार्थी संघाकरता स्वतः तयार केलेले साने गुरुजी यांचे चित्रही अनावरीत करावयाचे होते. गुरुजींच्या सहवासात दीर्घकाळ राहिलेल्या व्यक्तींनीसुद्धा या चित्रातील कलात्मकतेची मुक्त कंठाने स्तुती केलेली आहे. विशेषतः साने गुरुजींच्या डोळ्यांतील करुणा भावाचे जे आलेखन या चित्रात झालेले आहे त्याला इतरत्र क्वचितच तोड सापडेल.

कार्यक्रमाला आरंभ गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म’ या गीताने झाला. गुरुजींच्या चित्राचे अनावरण करण्याची विनंती श्री स. भा. जोशी यांनी केली. या निमित्ताने प्रा. नरहर कुरुंदकर यांनी चित्रातील गुरुजींच्या डोळ्यांत असणाऱ्या करुणा भावाच्या स्पष्टीकरणापासून व्याख्यानास आरंभ केला.

साने गुरुजींचे अश्रुंवर फार प्रेम होते. किंबहुना अश्रू हे त्यांचे सर्वस्व होते. पण सर्वसामान्यपणे आपण माणसाच्या डोळ्यांत जो अश्रू पाहतो त्या अपेक्षा गुरुजींच्या डोळ्यांतील अश्रुंचे स्वरूप अगदी निराळे होते. गुरुजींच्या डोळ्यांतील अश्रूंचा संबंध ज्या करुणा भावाशी होता, त्या करुणा भावाची परंपरा आपल्याला भगवान बुद्धापासून महात्मा गांधींपर्यंत सतत असलेल्या मानवी जीवनातील एका प्रबल प्रवृत्तीत शोधावे लागेल. हा करुणा भावही आपण सामान्यपणे ज्याला भूतदया आणि सहानुभूती म्हणतो त्यापेक्षा निराळा असतो. सामान्य माणसाच्या डोळ्यांत जेव्हा अश्रू उभे राहतात तेव्हा त्याची कारणे दोन असतात– एकतर माणूस वेदना सहन होत नाही, दुःख आवरत नाही म्हणून शोक करतो, अगर दुसऱ्यांचे दुःख पाहवत नाही म्हणून तो सहानुभूतीने व्यक्त होतो. अशा दोन्ही वेळी पाहवल्या, साहवल्या न जाणाऱ्या शोकाचा अश्रू हा प्रतिनिधी असतो. या अश्रूंमध्ये स्वतःचेही दुबळेपण व्यक्त झालेले असते. इतरांचेही मन दुबळे करणारा हा अश्रू असतो. तो दुबळेपणातून जन्माला येणारा आणि दुबळेपण जन्माला घालणारा असा एक जलबिंदू असतो,– जो हताश, विकल आणि दुर्बल अशा सर्व पराभवसामुग्रीला एकत्र गुंफणारा असतो. ही भूतदया असेल पण हा करुणाभाव नव्हे. गुरुजींच्या डोळ्यांतील अश्रूंची जात ही नव्हती.

कदमा भावाची बैठक

गुरुजींच्या डोळ्यांतील अश्रू हे वेगळ्याच धर्माचे होते. या अश्रुंचा परिणाम चेतना देणारा आणि पेटवणारा होई. या अश्रूंनी सहस्रावधींना संघर्षाची प्रेरणा दिलेली आहे. या अश्रूंमुळे नेहमीच एक सामर्थ्य उदयाला येत गेले. एक संघर्ष उग्र होत गला. कारण याचा उदय ज्या प्रवृत्तीच्या मनात होतो ती मानवी मनातील सर्वात बलवान प्रवृत्ती आहे. समाजाच्या कल्याणात आपले सर्वस्व विलीन झाल्यानंतर जो पुरुष समाजमय होतो त्याला व्यक्तीचे सुखदुःख फारसे उरलेलेच नसते. व्यक्तिगत जीवनातील वैयक्तिक आशाआकांक्षांचा निरास झाल्यानंतर जे शुद्ध लोककल्याणकारी मन एका अनासक्त तपस्याच्या देहाच्या आश्रयाने व्यक्त होते, या मनाला फक्त समाजाच्या कल्याणाची एक आस शिल्लक राहिलेली असते. असे समाजाच्या कल्याणाशी एकरूप झालेले मन दुःखाचे मूळ शोधू लागते आणि सामाजिक दुःख समूळ नाहीसे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून संघर्षाला उभे राहते. या मनातील प्रमुख प्रवृत्तीला करुणाभाव असे म्हणतात.

करुणा भावाचे मूलसूत्र

दुःख पाहवत नाही म्हणून जे रडतात, ते रडतात हे खरे असले तरी ते दुःखाचे मूळ शोधत नाहीत. म्हणून हे अश्रू ओसंडून आले तरी वाहून जातात; ते समाजात रूजलेल्या दुःखांना उत्तर शोधीत नाहीत. दुःखाचे कारण शोधणे, त्याचे उत्तर शोधणे आणि दुःख संपवण्यासाठी समर्पण बुद्धीने संघर्षाला सिद्ध होणे ही क्रिया साध्या भूतदयेपेक्षा निराळी आहे. भगवान बुद्ध जेव्हा दुःख आहे. दुःखाला कारण आहे, आणि दुःखाला उत्तर आहे असे सांगतात त्यावेळेला ते जणू करुणा भावाचे मूलसूत्र स्पष्ट करत असतात. हा करुणाभाव ज्यावेळी वत्सल मनाचा गाभा असतो त्यावेळी समाजातील प्रत्येक शल्य आणि दुःख योग्याच्या डोळ्यांतील अश्रूंचा आकार घेते. असे अश्रू हे सामर्थ्यातून जन्मलेले व सामर्थ्याला जन्म देणारे असतात. गुरुजींच्या अश्रूंचा हा व्यापक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे.

अश्रू अश्रूतील अंतर

गुरुजींसाठी अश्रू ही अगदी सहज आणि नित्य बाब होती. ते केव्हा कोणत्या कारणामुळे गहिवरून जातील हे सांगता येणे कठीणच असे. पण गुरुजींच्या भोवताली जी सहकाऱ्यांची आणि अनुयायांची प्रभावळ उभी होती ती मात्र प्रकृतीने तशी नव्हती. गुरुजींच्या सहकार्यात अगर त्यांच्या अनुयायांत आपण शोध घेतला तर असे दिसेल की प्रायः ही सर्व मंडळी अतिशय खंबीर मनाची आणि सहसा अश्रूंना वाव न देणारी अशी होती. ही माणसे मनाने निष्ठुर होती असे नाही. तीही समाजाच्या कल्याणासाठी संघर्षाला उभी राहिलेली जिद्दीची माणसेच होती, पण या मंडळींचे सामाजिक चिंतन कार्यक्रमात रूपांतरित होई, त्यामुळे ध्येयवाद ठरे, पण यांच्या डोळ्यांत अश्रू उभा रहात नसे.

साने गुरुजींच्या भोवताली असणारी ही माणसे बुद्धिनिष्ठ होती. आपण गुरुजींच्या अश्रूंचा अर्थ विचारताना कधी कधी हाही प्रश्न विचारला पाहिजे की जे कधी रडले नाहीत, ज्यांना अश्रूंचा संकोच वाटला असता, अशी सर्व जिद्दीची, त्यागी आणि कर्ती मंडळी, ह्या क्षणोक्षणी डोळ्यांत अश्रू उभ्या ठेवणाऱ्या माणसावर इतकी लुब्ध का होती? त्यांच्या अश्रूंतून यांच्या बुद्धीला आकार आणि कर्तृत्वाला बहर कसा येत होता? एका हसण्यापेक्षा दुसरे हसणे निराळे असते. एका अश्रू पेक्षा दुसरा अश्रू निराळा असतो. सगळेच अश्रू एकसारखे नसतात. पेटलेल्या मनाचा प्रतिनिधी असणारा, वणवा पेटवणारा अश्रू हा अगदी निराळाच असतो. त्याचे रहस्य आपण शोधले तरच गुरुजी आपल्या अश्रूंना अश्रूनारायण का म्हणत हे कळू शकेल.

चुकीच्या अपेक्षा

साने गुरुजी हे संत होते, कलावंत नव्हते त्यांच्या मनोधर्मातील संतत्व, त्यांच्या जीवनातील साधुत्व या बाबी अशा होत्या की ज्यामुळे त्यांनी इच्छा केली तरी त्यांना कलावंत होणे जमू शकले नसते. एकाच माणसाकडून आपण सर्व अपेक्षा करण्यात अर्थ नसतो. गायक चांगला स्वैपाकी असलाच पाहिजे आणि संत हा श्रेष्ठ कलावंत असलाच पाहिजे, या दोन्हीही अपेक्षा गारख्याच चुकीच्या आहेत! संत प्रवृत्तीचा माणूस एकतर स्वतःच्या एका स्वप्नसृष्टीत वावरत असतो. जग जसे असावे असे आपल्याला वाटते तसे ते खरोखरी अस्तित्वात नसते, पण संतांचे वैशिष्ट्य असे की ते असे स्वप्नांनी भारलेले असतात. जे असावे ते जणू आहेच, असे गृहीत धरून ही संत मंडळी वावरत असतात.

कलावंताला त्याचा आधार सोडून चालत नाही आणि संत प्रवृत्तीचा माणूस स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखापासून अनासक्त झाला की तो समाजाशी एकरूप व्हायला लागतो. कलावंताला आवश्यक असणारी तटस्थता संताकडून अपेक्षिता येणार नाही. कलावंत हा जीवनाच्या विविधतेचा तटस्थ साक्षीदार आणि या विविधतेचे सत्य निर्लेपपणे रंगवणारा असावा लागतो. आणि म्हणून कलावंतांना जीवनातील अमंगलाची जाण अतिशय चांगली असावी लागते. रामावर श्रद्धा असणे, रामायण लिहिण्यासाठी पुरत नाही. तुम्हाला रावणही सर्वसामर्थ्याने व्यक्त करावा लागतो. रावणाची बलवान व्यक्तिरेखा ज्यांना शब्दांतून उभी करता आली नाही त्याचे रामायण एक कलाकृती म्हणून पायातच दुबळे असणार हे उघड आहे.

साने गुरुजींच्या सर्व ललित वाङ्मयाची ही अडचण आहे. त्यांना सज्जनांचा सञ्जनपणा अनुभवाने ज्ञात आहे. पण दुष्टांचा दुष्टपणा कल्पनेनेही जाणता येत नाही! त्यांना सज्जनांचा काही प्रमाणात रंगवता येतो, पण दुर्जनांचे सामर्थ्य त्यांना चित्रित करताच येत नाही आणि शिवाय साने गुरुजी हे एक अनासक्त मन होते. ते निष्कलंक, व्रती, ब्रह्मचर्य होते. त्यांना शृंगार रंगवणे शक्य नव्हते. साने गुरुजींच्या वाङ्मयातील वाङ्मय म्हणून असणाऱ्या उणिवा यांचा संबंध त्यांच्या जीवनातील संत म्हणून असणाऱ्या सामर्थ्याशी आणि शुचित्वाशी आहे. हा सांधा समजून घेतला म्हणजे आपण त्यांच्या वाङ्मयाचे वाङ्मयीन मूल्यमापन केलेच पाहिजे, असा अट्टाहास आपण धरणार नाही.

साने गुरुजींकडे असे पहावे

ललित वाङ्मयाला जीवनात महत्त्व असते. हे कुणीच नाकारण्याचे कारण नाही. पण वाङ्मय ही जीवनाची एकमेव कक्षा नव्हे. जीवनाच्या गरजा अनंत आणि व्यापक आहेत. गीतारहस्य ही कविता नव्हे हा काही आपण त्या ग्रंथाचा दोष समजत नाही. गुरुजींच्या वाङ्मयाचा विचार ललित वाङ्मयाच्या कसोट्यांच्या संदर्भात करणेच बरोबर नाही. या वाङ्मयाचा विचार, कुमारांच्या आणि तरुणांच्या मनांवर संस्कार करण्याची जी क्षमता त्यात आहे. त्या संदर्भात करायला हवा. विद्यार्थ्यांचे मन घडवताना आपण पुढच्या पिढीचे मन घडवत असतो. असा पिढीचे मन घडवणारा लेखक म्हणून तरुण वयात जीवनव्यापी श्रद्धांची उभारणी करून देणारा देखक म्हणून आपण गुरुजींकडे पहायला पाहिजे. बहुतेक या पद्धतीने या वाङ्मयाचा गाभा आपण अधिक नेमकेपणाने समजावून घेऊ शकू. विसावे शतक जरी झाले तरी याही शतकाला महाराष्ट्राचे मन घडवणारे संत आहेत. अशा संतांत साने गुरुजींचे नाव घेतल्याशिवाय नव्या महाराष्ट्राचा अर्थच आपल्याला कळणार नाही.

वृत्तीचा विचार महत्त्वाचा

गुरुजींचा पिंड मूलतःच अध्यात्मिक होता. बुद्धीच्या जोरावर चिंतन करून एखाद्या निश्चित निर्णयावर येणारा असा त्यांचा पिंड नव्हता. ते वाचत पुष्कळ, लिहित पुष्कळ पण त्यांचे विचार या वाचनाने बनलेले आहेत असे दिसणार नाही. वाचनाच्या योगाने फारतर त्यांच्या हाती आपली मते मांडण्याचे साधन आले. त्यांच्या पिंडाची घडण भावनेच्या अंगाने घडत गेली आहे. त्यांच्या युक्तिवादातूनसुद्धा त्यांची भावनाच बोलत असते. आणि म्हणून गुरुजींचा विचार करताना एखाद्या मताचा, एखाद्या विचाराचा विचार करणे बरोबर होणार नाही, तो एका वृत्तीचाच विचार आहे. ज्या वृत्तीचा मी उल्लेख करत आहे ती मानसशास्त्रज्ञांनी नोंदवलेली मानवी इतिहासातून सिद्ध होणारी अशी वृत्ती आहे. तिचा आपण अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

पशुत्वाच्या व्यवस्थेचा प्रश्न

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मानसशास्त्राच्या अभ्यासाचे नवे नवे प्रभावशाली पंच उदयाला आले. याच कालखंडात शास्त्रीय समाजवादाची मांडणी करणारा मार्क्सही जन्माला आला. माणसातील विविध संप्रदायांपैकी एका संप्रदायाचा जनक डॉ. फ्राइड हा होता. तपशील आणि तांत्रिक बाबी सोडल्या तर फ्राइडच्या संशोधनाचे सार आपण थोडक्यात हे सांगू शकतो की मानवी जीवनात कामवासना अतिशय प्रबल आहे. तिला योग्य तो वाव मिळाला नाही तर ती मन विकृत करते, आणि मार्क्सच्याही विवेचनाचा थोडक्यात आशय हाच नाही काय की भूक ही अतिशय प्रबल आहे, तिची योग्य व्यवस्था झाली नाही तर ही प्रबल प्रेरणा समाज विकृत करून टाकते. वेगवेगळ्या बाजूने झालेला पण मानवी जीवनातील प्रभावी अशा पशुत्वाचा हा शोध आहे. हा पशुत्याचा शोध मानवी जीवनात पशुत्वाचे महत्व सांगून त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी नसतो. त्या शोधाचे कारण हे आहे की या पशुत्वाची व्यवस्था जर लावली नाही तर संस्कृतीचा विध्वंस होतो. माणसातील माणूसपण जर जतन करायचे असेल तर त्याच्यातील पशूची व्यवस्था लावणे भाग आहे असा याचा अर्थ आहे. हीच भूमिका आपण अर्थशास्त्राच्या परिभाषेत समाजवाद म्हणून ओळखतो.

अध्यात्माचा अर्थ

फ्राइडनंतरच्या काळात अ‍ॅडलरने मानवी मनाचा आणखी वेगळ्या पद्धतीने शोध घेतला. माणूस हा निव्वळ जनावर नव्हे, त्याने आपले एक व्यक्तिमत्व सिद्ध केलेले आहे. ज्यात त्याच्या प्रतिष्ठेच्या कल्पना गुंतलेल्या आहेत. या प्रतिष्ठेच्या कल्पना एका बाजूने अहंगंड न्यूनगंडाच्या मुळाशी असतात तर दुसऱ्या बाजूने गुन्हा, भीती याच्याशी निगडित असणाऱ्या गंडांचाही संबंध येथे येतो. अ‍ॅडलरचे संशोधन आपल्याला जीवशास्त्रीय पातळीवरून उचलते आणि सांस्कृतिक पातळीवरच्या पशुत्वापर्यंत घेऊन जाते. पण मानवी मनाची अजून एक बाजू आहे. जिच्याकडे युंग या तिसऱ्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने लक्ष वेधले.

स्वतःच्या स्वार्थाच्या कोषातून बाहेर पडून समूहाच्या स्वार्थात स्वतःला विलीन करून घेणे ही एक मानवी मनाची प्रेरणाच आहे. समाजासाठी बलिदान करावयाची प्रवृत्ती या प्रेरणेतून येते. स्वार्थरहित, अनासक्त मन जन्माला घालणे आणि त्या मनाने लोककल्याणाचा सतत विचार करणे हा या प्रवृत्तीचाच भाग आहे. मानवी जीवनातील अध्यात्मिक प्रवृत्ती असेल तर ती ही आहे. स्वेच्छेने स्वतःच्या स्वार्थाच्या कोषातून बाहेर पडण्याची जी जिद्द मानवी इतिहासात दिसते ती ही अध्यात्मिक प्रवृत्ती आहे. भावनेच्या अंगाने या प्रवृत्तीचा सहजसिद्ध आविष्कार झालेला आपल्याला साने गुरुजींच्या जीवनात दिसतो म्हणून त्यांचा अश्रूही आपल्याला स्वार्थाच्या परिघाच्या बाहेर घेऊन जातो. गुरुजींच्या डोळ्यांतील करुणेचा अर्थ हा आहे. हा त्या कारुण्य भावाचा गाभा आहे.

अश्रूतील विश्व

प्राचीन काळापासून साधुसंतांचा प्रयत्न नेहमी हाच राहिला की माणूस स्वार्थाच्या परिघातून बाहेर कसा काढता येईल. जनावरांमधून विकसित होत माणूस हा माणूस झाला. तो जनावरापेक्षा निराळा झाला, पण वारसाहक्काने त्याला आपले पशुत्व मिळालेलेच आहे. भूक, भीती आणि कामवासना ही निसर्गतःच त्याच्याकडे चालत येते. हा एक स्वार्थाचा कोष आहे. या स्वार्थाच्या कोषातून माणूस बाहेर काढणे आणि त्याच्या मनाची नैतिक मांडणी करणे हा युगानुयुगे साधुसंतांचा संकल्प राहिला आहे.

विसाव्या शतकात आपण एक विराळा प्रयत्न करीत आहोत. सुटा सुटा माणूस नव्हे तर संपूर्ण समाजच एकाच वेळी स्वार्थाच्या परिघातून बाहेर काढून संपूर्ण समाजव्यवस्थेची नैतिक मांडणी करता येईल काय, असा आजचा आपला प्रयत्न आहे. सर्वांच्याच प्राथमिक गरजांची हमी देणारी म्हणजेच सर्वांच्या पशुत्वाचे व्यवस्थापन करणारी एक समाजव्यवस्था निर्माण करून पूर्ण मुक्त माणूस साकार करण्याचा संकल्प आपण सोडलेला आहे. अशा वेळी बुद्धीने समाजवादी, मनाने संत आणि वृत्तीने वत्सल असणारा गुरुजींच्यासारखा पुण्यपुरुष हाच सर्वांच्या स्वप्नपूर्तीचा नेता असतो. त्यांच्या अश्रूत शास्त्रज्ञांना करुणाभाव दिसतो. अनुयायांना उद्याचे फुललेले जीवन दिसते.

Tags: साने गुरुजी नरहर कुरुंदकर Sane Guruji Narhar Kurundkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरहर कुरुंदकर ( 68 लेख )

1932 - 1982

विचारवंत लेखक, समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके