डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हमीद दलवाईंच्या निधनानंतर - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य - सहा वर्षांच्या कार्याचा धावता आढावा

हमीद दलवाईना समाज परिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा, असेही त्यांना वाटत नव्हते. मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद झालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून, तलाकपीडित महिलांचा  प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते.

गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुन:पुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय ? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. त्या मावळल्या शक्तीचा विजय फार काळ टिकणारा नसतो. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. पराभव दलवाईचा होणार 'नसून परंपरा- वाद्यांचा होणार आहे. भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. - 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सेक्रेटरी सय्यदभाई, संस्थापक हमीद दलवाई आणि अध्यक्ष बाबूमिया बैंडवाले : मंडळाच्या पायातील दगड 

मार्च 22, 1970 ला पुण्यातील साधनेच्या आन्तर भारती सभागृहात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. मुस्लिम समाजात विवेकशीलतेचा एक प्रवाह सुरू व्हावा, अशी त्या मागची कल्पना. त्याआधी हमीद दलवाई भारतातील मुस्लिम प्रश्नांचा चिकित्सक अभ्यास करत होते. पुस्तके वाचत होते. देशभर हिंडत होते. लोकांशी चर्चा करत होते. चिंतन करत होते. लेखा-भाषणांतून आपले मनोगत व्यक्त करत होते. त्यांच्या नवनिर्माणशील विचारांनी खळबळ माजत होती. काही संप्रदायवादी मंडळी त्यांचा दुस्वास करीत होती तर बिन-सांप्रदायिक वृत्तीच्या लोकांना नवा दिलासा मिळत होता. नवा विचार माणसाला स्वस्थ बसूच देत नाही. जीभ आणि पाय चालवायला तो भागच पाडतो. हमीदचेही तसेच झाले. पाच वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर पोटापाण्याचा धंदा सोडून तो पूर्ण वेळ या कामासाठीच देऊ लागला. त्याला काळवेळेचे, श्रमाचे कसले कसले म्हणून भान नसे.

शतकापूर्वी आसूड घेऊन उभे राहिलेल्या महात्मा फुले यांच्याप्रमाणे त्याचाही आवेश असे. त्यांच्याशी न कळत त्याचे नाते जमले आणि त्यातूनच मुस्लिमांमधला हा सत्यशोधकी प्रवाह सुरू झाला. मुस्लिम सत्यशोधक मंडळ हे नाव त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. त्यानंतर कामाचा वाढता व्याप आणि ढासळती प्रकृती दोन्ही सांभाळता सांभाळता हमीदची तारांबळ होऊ लागली, पण त्याच्या तळमळीच्या प्रयत्नांमुळे एका बाजूला बाबूमिया बैडवाले यांच्यासारखे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूला कळकळीच्या, तडफदार तरुण स्त्री-पुरुषांचा संचही त्याच्या भोवती गोळा होऊ लागला.

1975 साली देशात आणीबाणीचे पर्व सुरू झाले आणि सर्वच सार्वजनिक कामांना ओहोटी लागली. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही अत्यंत जपून पावले टाकावी लागत होती. पण त्यांच्या कामाची दिशा निश्चित होती. मुसलमानांना आपल्या अडचणी जागवत होत्या, पण त्याची वाच्यता करण्याची हिंमत त्यांना होत नव्हती. सती प्रथेतील अमानुषता जाणवत असूनही धर्माच्या भयाने हिंदू माणसे शंभर वर्षांपूर्वी कुचंबत होती तशीच काहीशी अवस्था मुस्लिम समाजाचीही होती. हमीद दलवाईमुळे एक निर्भयतेचा प्रवाह सुरू झाला. हमीद दलवाईच्यासारा खंबीर नेता पाठीशी आहे या जाणिवेमुळे तरुण मंडळी काम करू लागली होती. पण हमीदच्या जीवघेण्या आजारामुळे ती चिंताक्रांत होती.

मुस्लिम समाजाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी घटना असा ज्या घटनेचा उलेख करावा अशी घटना  नोव्हेंबर 23,1975 रोजी महात्मा फुल्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात घडली. तलाकपीडित मुस्लिम महिलांची परिषदही ती घटना होय. शंभरावर तलाकपीडित मुस्लिम स्त्रिया संप्रदापवाद्यांचे दडपण झुगारून या परिषदेला हजर राहिल्या. प्रा. कुलसुम पारीख यांनी परिषदेचे उद्घाटन केले. मंडळाच्या तडफदार कार्यकर्त्या अॅडवहोकेट नअमा शेख अध्यक्षस्थानी होल्या. प्रा. कुसुम पारीख यांनी हमीद दलवाईचा गौरव करताना सांगितले, "आजचा बंडखोर हा उद्याचा पैगंबर ठरतो. हमीद दलवाईही हा या कोटीतले कार्यकर्ते आहेत!" आजारामुळे हमीद दलवाई परिषदेला हजर राहू शकले नाहीत, तरी सैय्यदभाईसारख्या कार्यकर्त्यांच्या  नेतृत्वाखाली पुण्यातील मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या संचाने जो पराक्रम केला. त्यामुळे हमीदभाई तृप्त झाले. आपल्यानंतरही हे काम असेच पुढे चालू राहील असा विश्वास त्यांना वाटू लागला.

तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांनी त्या ठिकाणी ही आपबीती बयान केली त्यामुळे ज्याचे हृदय हेलावले नसेल असा माणूस असणेच शक्य नव्हते. एक नसच नेमकी हाती लागली. सांप्रदायिक मुसलमानांनाही तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांचे होणारे हाल नाकबूल करणे शक्य नव्हते. सुधारणेच्या या प्रवाहाशी मिळते जुळते घेणे त्यांना भाग होते. धर्माच्या चौकटीत राहूनही या दुःखाचा परिहार करता येईल असे म्हणणे त्यांना भाग पडू लागले गावोगावी ह्या घटनेची चर्चा सुरू झाली. वृत्तपत्रांनी या परिषदेची योग्य ती दखल घेतली. देशभर ह्या घटनेचे पडसाद उमटले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी अशा परिषदा झाल्या. नगर, सातारा, कोल्हापूर भागात परिषदा झाल्या, पण सर्वात मोठी परिषद अमरावतीला वीर पटेल यांच्या पुढाकाराने झाली. सातशेवर मुस्लिम स्त्रिया परिषदेला हजर होत्या ! सर्वच समाजसुधारकांचा प्रारंभ जमात स्त्री-अत्याचार निवारणातून झाल्याचा इतिहास आहे. मुस्लिम समाजात तेच घडत होते.

हमीद दलवाईचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची मृत्यूशी निकराने झुंज चालू होती, पण सद्य:स्थितीचा विचार क्षणभरही त्यांच्या डोळ्याआड होत नव्हता. सावध असतील तेव्हा मित्रांशी चर्चा करत होते, ग्लानी आली की निपचित पडून रहात होते ! आणीबाणी संपुष्टात आली. कोंदटलेले वातावरण खुले झाले. पण त्यातून  जे नवे प्रवाह हगोचर होत होते ते चिंताक्रांत करणारे होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रवाहाला अपायकारक ठरणारे होते. संप्रदायवादी शक्ती संगनमताने सुधारणेच्या मार्गात खीळ घालतील अशी चिन्हे दिसत होती. हमीद दलवाईची मूत्यूपूर्वीची एक मुलाखत या पटीने फार महत्वाची आणि पुढील कामाच्या दृष्टीने अत्यंत मार्गदर्शक ठरली. हमीदभाई म्हणाले, "1970 च्या निवडणुकांचे खास महत्व आहे. सार्वभौम जनतेला एक नवा आत्मविश्वास आला आहे आणि राज्यकर्त्यांना तिने एक इशाराही देऊन ठेवला आहे की चुकीच्या मार्गाने जाल तर सिंहासन खाली करावे लागले !... यावेळी सदैव सत्तेला धरून राहण्याची आपली परंपरा मुसलमानांनी सोडल्यासारखे दिसले, ही घटना ही स्वागतार्ह आहे. 

मुस्लिमांनी मुस्लिम म्हणून गठ्ठा  पद्धतीने नव्हे तर नागरिक म्हणून व्यक्तिशः मतदान करावे, असे घडायला हवे होते. आणि राजकीय मतांनुसार मुस्लिम नागरिकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांबरोबर काम करायला हवे होते. राजकीय क्षेत्रात धर्मगुरूंची लुडबुड सुरू होणे हे निकोप लोकशाही सेक्युलर राजकारणाला उपकारक नाही .. धर्मगुरू जात पंचायती यांचा अधिकार मान्य झाला तर सेक्युलर राजकारणच संपुष्टात येईल आणि जातीजमातीपायी देश पुनरपि शतखंड होईल. धार्मिक नेत्यांना राजकारणात किती महत्व द्यायचे याचा विवेक बाळगला पाहिजे. धार्मिक व जातीय नेत्यांनी पत्रके काढून अमक्या वा तमक्याला आपल्या जमातीने मते द्यावी असे सांगणे आणि त्याला राजकीय पक्षांनी सामाजिक स्वार्थासाठी प्रोत्साहन देणे उचित ठरणार नाही.

"लोकसंख्या वाढ नियंत्रित न ठेवली तर भारत समृद्ध आणि सुदृढ होऊच शकणार नाही. कुटुंब नियोजनाबाबत विवेकाने वागले पाहिजे. देवी, कॉलरा-प्लेग यांच्या साथीच्या वेळी अशी विवेकी सक्ती करावी लागते. सर्वाना सक्तीने लस टोचण्यात येते. तसे धोरण ठेवावे लागेल. भारतासारख्या मागासलेल्या देशात लोकसंख्या वाढीला परिणामकारक आळा घातला गेला नाही तर दारिद्ररेषेखालच्या सत्तर टक्के लोकांना त्या रेषेच्यावर देण्याचीदेखील कधीच आशा नाही, तेव्हा याबाबत लोकांचे सतत शिक्षण झाले पाहिजे. त्यांना वैज्ञानिक व  बुद्धीजीवी दृष्टी दिली पाहिजे. अंध विश्वास, अपसमज दूर केले पाहिजेत. मुस्लिम समाज आता कुठे या प्रश्नाचे स्वरूप ध्यानी घेऊ लागला आहे. आपले दारिद्रय, मागासलेपण की लोकसंख्या विषयक अज्ञानातून उगम पावले  आहे, हे आता कुठे तो समजून घेऊ लागला आहे.

समान नागरी कायद्याशिवाय समान नागरिकत्वाची भावना लोक मानसात रुजणार नाही, या प्रश्नाबाबातही   सतत लोकशिक्षण होत राहिले पाहिले. लोकानुनयाला मर्यादा असली पाहिजे. मागासलेल्या देशातील लोकांची मनेही मागासलेली असतात. केवळ लोकानुनय करीत राहिले तर असे देश कायमचेच मागासलेले राहतील, अभिक्रमशील राजकारणात केवळ लोकानुनय पुरेशा नसतो. समान नागरिकत्वाच्या पायावरच राष्ट्रीय एकात्मतेची इमारत उभी राहील." मे 3, 1970  या दिवशी हमीद दलवाईनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांची ही मुलाखत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी ठरली. हमीद दलवाईचे निधन हा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचा एक भीषण असा आघात होता, परंतु त्यातून ते लवकर सावरले. मंडळाच्या कार्यात सुरवातीपासून हमीद दलवाईना साथ करणारे लोक या कामी खूपच उपयोगी पडले, प्रा. अ. मि. शहा, प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते वैगेरे मित्रांचा या संदर्भात निर्देश करावा लागेल.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अभिमंत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर ही केंद्रे  प्रभावी करण्याचा कसोशीचा प्रयत्न सतत्याने चालवला. पुढे जळगावसारख्या केंद्राची ही त्यात भर पडली. मुस्लिम समाजाला वास्तवाचे भान करून द्यायचे व विचाराला प्रेरित करायचे, हा कामाचा मध्यबिंदू आणि त्या दृष्टीने आवश्यक तेथे लेखन-भाषण, सभा संमेलने, निदर्शने-प्रदर्शने, रचनात्मक कार्य व प्रसंगी संघर्ष असे राचनात्मक कार्य व प्रसंगी संघर्ष असे मार्ग कार्याकार्त्यांनी चोखाळले, अमरावतीला शेख वजीर पटेल आणि त्यांचे स्त्री-पुरुष सहकारी, मंबईला श्रीमती मेहेरुन्निसा दलवाई व महंमद दलवाई आणि त्यांचे सहकारी, कोल्हापूरला हुसेन जमादार, त्यांच्या पत्नी आयेशा जमादार व त्यांचे सहकारी, जळगावला रजिया पटेल व तिचे छात्र युवा संघर्ष वाहीनीतले मित्र यांची कामे डोळ्यांत भरण्याइकी चांगली होती. 

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व वयोवृद्ध कार्यकर्ते बाबूमिया बँडवाले व त्यांचे कुटुंबीय सतत आघाडीवर राहिले. याशिवाय प्रा. विसायत शेख, प्रा. मामती मुमताम रहिमतपुरे, प्रा. कु. तसनिम पटेल, राष्ट्र सेवा दलातील सिराज शेख व इतर मित्र आपल्या लेखातून व संस्थातून कार्याचा विस्तार करायला सहाय्य करीत होते. प्रा. श्रीमती कुलसुम पारीख आपल्या वयाची तमा न बाळगता मार्गदर्शनाला सदैव तत्पर असत. व्याख्यानांची निमंत्रणे घेऊन जात ही मंडळी आपले चिकित्सक विचार मांडतच, पण कुठे कोणी अत्याचार पिडीत आहे असे काढले की तत्परतेने धावून जात, अमरावती, इंदौर,  गुलबर्गा, हैद्राबाद, अलीगड, दिल्लीपर्यंत कार्यकर्त्यांनी वैचारिक मुलुखगिरी केली. मुस्लीम सत्यशोधक पत्रिका चालवण्याची धडपड कार्यकर्त्यांनी केली. वजीर पटेल अत्यंत चिकाटने ‘बागवान' नावाचे उर्दू साप्ताहिक चालवतात आणि वैचारिक हल्ल्यांचा समाचार घेतात. 

मराठी वृत्तपत्रांतून नियमित लेखन करणारी मंडळी ही त्यांच्यात आहेत. मुसलमानांना आपण तट बंदीच्या आत (इनशुलेटेड) आहोत असे वाटते. तर बिगर मुसलमानांना खिजगणतीत नाहीत असे वाटते. ह्या कल्पना मोडून काढणे फार महत्वाचे आहे. भारतातील कोणत्याही समाजघटकांची समस्या केवळ ही त्याची एकट्याची कधीच नसते, ती आपल्या भारताची समस्या असत, अशी जाणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतत बाळगली, अश्पृश्तेयचा प्रश्न हिंदूंचा ते पाहून घेतील, तलाक-सवत हा मुसलमानामा अंदरुनी मामाला, त्याचा निरास ते करतील, मिसाक-बरात हा   बोहाऱ्याचा सवाल, ते तो सोडवतील असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कधीच माणले नाही, समतेच्या सर्व चळवळी ह्या एकाच व्यापक चळवळीचे अंग आहेत असे मानून शक्य तेथे इतर समता चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या समता चळवळीत इतरांना सामील करून घेण्याचा सतत प्रयत्न  केला.

हमीद दलवाई म्हणत, "ज्या हिंदुना मुस्लिम जातिवादाचा प्रतिकार करायचा आहे ते हिंदुना सनातनी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ज्या हिंदूना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्याने न्यावयाचे आहे ते मुस्लिम जातिवाद्यांना मिठ्या मारीत आहेत. हे दृश्य बदलले पाहिजे. मुस्लिम जातिवादाचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंच्या मी बाजूचा आहे, पण हिंदुना सनातनी बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचा विरोधक आहे. त्याचबरोबर हिंदुना आधुनिक बनवणारांना माझा पाठिंबा आहे, परंतु मुस्लिम जातीवादाचा प्रतिकार न करण्याच्या त्यांचा धोरणाचा मी विरोधक आहे ..या देशाचे झपाट्याने सेक्युलर इंटिग्रेशन करण्याने काम सुरू करू या. तोच तथाकथित हिंदू-मुस्लिम प्रश्न मिटवण्याचा प्रमाण मार्ग आहे. असा विचार होऊ लागल्यास मुस्लिम आधुनिक विचारांचा नवा प्रवाह अधिक बळकट होईल, कारण त्याला आता परिस्थिती अनुकूल आहे. आता मुस्लिमांच्या हाती सत्ता नाही, सत्तेविना मुस्लिम सनातनीपणा हा दात काढलेल्या सापासारखा असतो. याचे शेपूट तेवढे वळवळत राहील. त्या वळवळत्या शेपटाचा आपण फारसा विचार करू नये."

दलवाईच्या विचारांची शिदोरी घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते सतत धडपडत राहिले. अडचणीची तमा न बाळगता धडपडत राहिले, अपराजित हदयाने व भविष्यकाळ आपला आहे या विश्वासाने धडपडत राहिले. मंडळाचे पुण्याचे कार्यकर्ते जिद्दीने व मिळून-मिसळून काम करणारे, मंडळाची स्थापना पुण्यात झालेली आणि त्यांचा सहानुभूतिदारांचा वर्ग मोठा. त्यामुळे कार्याची वाढ, क्वचित मतभेदांचे सावट आले तरी, होतच राहिली. 1970 च्या सप्टेंबरमध्ये एक इदुल फित्रचा मोका साधून इदगाहजवळच मंडळाने एक कार्यक्रम आयोजित केला. 'ईदचा आनंद करताना आपल्या तलाक दिलेल्या मजलूम मुस्लिम भगिनी व त्यांची मुलेबाळे यांच्या दुःखांचीही आठवण ठेवा असे फलक घेऊन मदत जमा करण्यात आली आणि 'जिहादे तलाक’ अशी पत्रके वाटण्यात आली. 'धर्माच्या नावाने चालणाऱ्या अधर्माला साथ देणार काय ? असा सवाल विचारण्यात आला. बाशी ईदला सारस बागेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम स्त्रीच्या गुलामीची दास्तान मुस्लिम स्त्रियांना ऐकवली व सुटकेचा रस्ता कोणता तेही सांगितले.

हमीद दलवाईच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी जिल्हाधिकारी कचेरीवर मुस्लिम स्त्री-पुरुषांचा मोर्चा नेऊन समान नागरी कायदा करून मुस्लिम स्त्रीला समतेचे अधिकार त्वरित द्यावे, अशी मागणी करण्यात आली. दलवाईच्या दुसऱ्या पुण्यतिथीला जिल्हाधिकारी कचेरीसमोर मुस्लिम स्त्री-पुरुषांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून शरीयत कायद्यात काळानुरूप व घटनेच्या आधारभूत तत्त्वांना धरून ताबडतोब बदल करावे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर मध्यावधी निवडणुका आल्या आणि मताच्या मतलबासाठी जमातवाद्यांना राजकीय पक्ष कुरवाळू लागले आणि त्याचा नाजायज फायदा उठवून जातिवादी शुक्तींनी मंडळाविरुद्ध रान पेटवण्याला सुरवात केली. फौजदारी कायद्याच्या 125 व्या कलमाप्रमाणे इतर स्त्रीयांप्रमाणेच फारकत दिलेल्या मुस्लिम स्त्रीलाही पोटगी मिळाली पाहिजे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे सैयद शहाबुद्दीन यांच्यासारखे सेक्युलर पक्षाचे कातडे पांघरलेले खासदार हे कलम रद्द करण्यासाठी संसदेत खटपट करू लागले. त्याविरुद्ध मंडळाने आणि इंडियन सेक्युलर सोसायटीने लोकमत तयार करण्याची चळवळ हाती घेतली.

ऑक्टोबर 11, 1981 रोजी मंडळाचे खंदे पाठीराखे प्रा. अ. भि. शहा यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले व मंडळावर आघात झाला. नोव्हेंबर 1981 मध्ये सातारा, कराड, वाई, लोणावळा, खंडाळा, खोपोली, सासवड, बारामती, फलटण या ठिकाणी मुस्लिमांच्या सभा व बैठका घेऊन, मंडळाच्या कार्याची माहिती देऊन तरुणांना कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न सैयदभाईनी केला. जून 13, 1982 रोजी विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात 50 मुस्लिम कार्यकर्त्यांचा एक दिवसाचा मेळावा घेऊन कार्याची आखणी करण्यात आली. ऐन मुस्लिम मोहल्यात मंडळाला 1982 साली डॉ. देशपांडे यांच्या आन्तर भारती केंद्रात जागा मिळाली. आबाबेन देशपांडे या मंडळाच्या पाठीराख्या होत्या. केंद्राच्या बागेत रोज सायंकाळी साडेपाच ते सात या वेळात मुस्लिम महिला-सल्ला व मदत केंद्र सुरू झाले, तलाक, सवत, पोटगी इत्यादी सामाजिक प्रश्नांवर व वकिली सल्ला उपलब्ध होऊ लागला. अॅडव्होकेट स्वामी व अॅडव्होकेट सुपेकर न्यायलयात मोफत कामे पाहतात. या केंद्रामुळे मंडळाच्या कामाचा प्रभाव वाढू लागला.

1983 च्या प्रजासत्ताक दिनाला पुणे जिल्हा मुस्लिम तलाक पीडित महिला परिषद अहिल्याश्रमात घेण्यात आली. ग्रामीण भागातून या वेळी मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. परिषद मोडण्यासाठी गडबड माजवणाऱ्याचा बंदोबस्त या महिलांनीच केला ! प्रश्नांची सरबत्ती करून त्यांची भंबेरी उडवून दिली. परिषदेपूर्वी जिल्ह्यातील सर्व तालूक्यांच्या ठिकाणी बैठका झाल्या होत्या. जनतंत्र समाजाच्या अहमदाबाद अधिवेशनात मुस्लिम स्त्रियांच्या सामाजिक स्थानाबद्दल पाहाणी करावी असा प्रस्ताव सैयदभाई व अन्वर राजन यांनी मांडला आणि तो मान्य होऊन न्या. कृष्णा अय्यर समिती नेमण्यात आली. सर्व देशभर खळबळ माजलेले एक काम पुणे केंद्राने एप्रिल 1, 1983 रोजी केले. पहिली पत्नी हयात असताना चुकीच्या पद्धतीने दुसरे लग्न लावायला उद्यूक्त झालेल्या एका लग्नाला खो घालण्यासाठी महर्षिनगरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काझीसाहेबांना मंडळाची भूमिका योग्य वाटली व त्यांनी निकाह लावण्याला नकार दिला. परंतु पोलिसांना मंडळाच्या 26 कार्यकर्त्यांना सबंधित नवऱ्याच्या बायकोसह अटक केली व अन्याय्य लग्नाची वाट मोकळी करून दिली !

जून 4-5, 1983 महाराष्ट्राचे वैचारिक शिबिर हमाल पंचायतीच्या मध्य बागेत भरले. अडीचशे मंडळी सहभागी झाली होती. स्त्रिया आधिक संख्येने हजर होत्या. याच वेळी मंडळाचे अध्यक्ष बाबूमिया बँडवाले व धडाडीचे कार्यकर्ते वझिर पटेल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी संप्रदायवादी मुसलमानांनी मंडळाविरोधी खोटानाटा प्रचार करून निदर्शने केली, परंतु त्याचा उलटा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. जुलै 30-31, 1983 असा दोन दिवसांचा मुस्लिम कार्यकर्त्यांचा मेळावा पुण्यात घेण्यात आला. मुस्लिम तरुणांशी संपर्क साधून नवे कार्यकर्ते मिळवण्यासाठी नौशाद शेख, अश्रफ तांबोळी, एम. एम्. तांबोळी हे तरुण प्रयत्न करणार आहेत. अॅडव्होकेट नजमा शेख, बशीरद्वय, बाबामिया, डॉ. शेख, लॉ-कॉलेजची विद्यार्थिनी मुन्ना इनामदार वगैरे कार्यकर्ते वरील तरुणाप्रमाणे केंद्राचे काम मोठ्या धडाडीने करीत आहेत.

मुंबई केंद्राचे काम हमीदच्या पत्नी मेहेरुन्निसा दलवाई व महमद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली चालते. हमीदच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर मंडळाचे ध्येयधोरण व मागण्या यांची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. मे 12, 1983 ला इंडियन सेक्युलर सोसायटीच्या सहकार्याने अलीगड मुस्लिम विद्यापीठावर एक चर्चासत्र रुइया कॉलेजात आयोजित करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये अंधेरीतील गरजू मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. आता हा नित्यक्रम झाला आहे. चेंबूर महिला समाजा- तर्फ मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नावर मेहेरुन्निसा दलवाईंचे भाषण झाले नंतरची चर्चा चांगलीच रंगली. आन्तर राष्ट्रीय बालक वर्षानिमित्त 160  मुस्लिम मुलांची आरोग्यविषयक पाहाणी करून त्यांना सल्ला देण्यात आला. डिसेंबर 30-31, 1980  व जानेवारी 1, 1981 असे तीन दिवसांचे विश्व महिला संमेलन पवनारच्या ब्रह्म विद्या मंदिरात झाले. 

मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर मेहेरुन्निसा दलवाईंनी विचार मांडले. जानेवारी 16, 1980  रोजी शीव भगिनी समाजातर्फे मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर मेहेरुन्निसा दलवाईचे भाषण झाले. मार्च 20-23, 1980 या काळात लातूर येथे झालेल्या विषमतानिर्मूलन शिबिरात मेहेरुन्निसा बाईनी मुस्लिम स्त्रियांना बसणाऱ्या विषमतेच्या चटक्यांचा आलेख सर्वांपुढे ठेवला. मार्च 22, 1980 रोजी मंडळाच्या स्थापना दिनी श्रीमती शहाबादी हकीम यांचे 'मुसलमानांचे शैक्षणिक प्रश्न' या विषयावर व्याख्यान झाले. दलवाईच्या पुण्यतिथीनिमित्त साईट्स ऑफ इंडिया सोसायटीत डॉ. अल्. दस्तूर यांचे 'इस्लामिक फंडामेंटलिसम अँड इंडियन मुस्लिम’ या विषयावर मंडळातर्फे उद्बोधक व्याख्यान झाले.

बाँबे सोशल रिफॉर्म असोसिएशन व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक झाली व संयुक्तपणे हाती घेता येण्यासारख्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. ऑगस्ट 1980 मध्ये ठाणे जिल्ह्यात सफाळा येथे ‘इस्लामचा इतिहास आणि भारतीय मुसलमानांच्या राजकीय प्रश्नांची पार्श्वभूमी' या विषयावर मेहेरुन्निसा दलवाईचे भाषण व उद्बोधक प्रश्नोत्तरे झाली. महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने मुस्लिम प्रश्नां संबंधी दलवाई बाईंचे भाषण झाले. मंडळाच्या स्थापना दिनी 1981 साली चंदावरकर शैक्षणिक प्रश्नांवर बोलले. नागपूरच्या स्त्री  अत्याचार विरोधी परिषदेचे उद्घाटन श्रीमती मेहेरुन्निसा दलवाईंनी केले व अत्याचारपीडित मुस्लिम स्त्रियांच्या गाऱ्हाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई केंद्रातर्फे कायदेशीर मदत मुस्लिम स्त्रियांना मिळवून दिली जाते. मुस्लिम महिलांना शिलाईचे शिक्षण व नंतर काम देण्यात येते. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग चालवण्यात येतात व आर्थिक मदत करण्यात येते.

मेहरुन्निसा दलवाई यांच्या वैशिष्टयपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी आन्तर भारतीतर्फे त्यांना न्या. नथवानी यांच्या हस्ते सूसन बी. अँथनी पुरस्कार मुंबईत देण्यात आला. आचार्य दादा धर्माधिकारी, एस. एम. जोशी, पा.  कुलसुम पारेख, बाबूमिया बँडवाले व न्या. नथवानी यांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. 1981 च्या दलवाई पुण्यतिथीनिमित्त ‘इस्लाम धर्म व संस्कृती' या विषयावर प्रा. अ. मि. शहा यांचे भाषण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादरमधील सभागृहात आयोजित करण्यात आले होते. मे 16, 1981 रोजी ईंदौरच्या अभ्यासमंडळाच्या व्याख्यान मालेत मेहेरुन्निसा दलवाई यांचे झालेले भाषण गाजले आणि मध्यप्रदेशात त्यामुळे मंडळाच्या कार्याची ओळख झाली, याशिवाय वाईच्या वसंत व्याख्यानमालेतही त्या बोलल्या. सावित्रीबाई फुले यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त मुंबईतील माध्यमिक शाळा मुख्याध्पापिकांच्या शिबिरामधील त्यांच्या भाषणाने तर एक वादळ उठवले.

सातारा जिल्ह्यात तीन दिवसांचा मेहेन्निसाबाईंचा व्याख्यान दौरा 1981 च्या ऑक्टोबर महिन्यात झाला. बुद्धिप्रामाण्यवादी मंचचे पुणे संमेलन व जनतंत्र समाजाचे दिल्लीतील चर्चासत्र यातही त्या सहभागी झाल्या होत्या. मुस्लिम सत्यशोधक मंचाच्या बाराव्या वर्धापन दिन महाराष्ट्र विधान सभेवरील मोर्च्याने स्मरणीय झाला. 'समान नागरी कायदा झालाच पाहिजे, 'अन्याय्य सिनेमाबंदी तोड दो, ''मुस्लिम औरत जाग उठी हे, मुस्लिम पंचायतीच्या मुद्यांना वठणीवर आणा' अशा घोषणांनी फोर्ट भाग दुमदुमला. हमीद दलवाईंच्या  पाचव्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. साळुंखे व असगरली इंजिनिअर यांची दोन भाषणे झाली. मलकापूरच्या ज्ञानप्रसार विचार संघा तर्फे ‘भारत की नारी, कितनी बेचारी !' या विषयावर दलवाईंचे भाषण, जातीयवादी शक्तीचे अडथळे न जूमानता, ठणकावून झाले. शहाबुद्दीन यांच्या संकल्पित विधेयकाला विरोध करण्या साठी संसद सदस्यांना मंडळातर्फे निवेदन पाठवण्यात आले. लीग और सोशल जस्टिसच्या शिबिरात दळवाई बाईनी  मुस्लिम स्त्रीची परिस्थिती समजावून सांगितली आणि हुंडाविरोधी मंचपुढेही चित्र प्रस्तुत केले.

1983 चा मंडळाचा वाढदिवस व दलवाईंची पुण्यतिथी वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांनी मानली. अहमदाबादला जून 11-12, 1982 या दिवशी मुस्लिम महिला व पुरुष यांच्याशी मंडळाचे कार्य सुरू करण्याबद्दल दलबाईनी चर्चा केली. अनेकांनी सहकार्याचे  आश्वासन दिले. हमीद दलवाईच्या कोल्हापूर भागातील दौऱ्यानंतर मंडळाच्या कामाला कोल्हापूर, सांगली, मिरज भागात हुसेन जमादार व त्यांच्या  मित्रांनी सुरवात केली. कोल्हापूरला भरलेली मुस्लिम शैक्षणिक परिषद बरीच गाजली. 'जिहादे तलाक' परिषद  नोव्हेंबर 2, 1985 रोजी झाली, 100 महिला उपस्थित होत्या. मोफत कायदा सल्ला केंद्र याच वेळी सुरू करण्यात आले. नोव्हेंबर 15, 1905 रोजी तलाकपिडीत महिलांच्या शिष्टमंडळाने सांगलीला मुख्यमत्र्यांची भेट घेतली आणि 'जबानी तलाक’ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

मे 23 ते जून 2, 1977 असे दहा दिवसांचे मुस्लिम महिलांचे शिबिर कोल्हापूरला झाले. 20 मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. वैचारिक प्रबोधनाबरोबरच शिकण-भरत काम, बालसंगोपन, आहारशास्त्र इत्यादींचे  प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. समाजवादी महिला सभेचे सहकार्य होते. जून 1, 1978 ला साताऱ्याला  दीडशे तलाकपिडीत मुस्लिम महिलांची ‘जिहादे तलाक’ परिषद झाली. मे 3, 1978 हमीद दलवाई पुण्यतिथीनिमित्त सेक्टर कचेरीवर मोर्चा नेला व 1979 साली लाक्षणिक उपोषन करण्यात आले. मे 1979   मध्ये नेरूळला मुस्लिम तरुणांचे अभ्यासशिबीर झाले. 20 तरूणानी 10  दिवस अभ्यास केला. न्या. पटवर्धन,न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, नरहर कुरुंदकर, कुलसुम पारीख इत्यादीनी अभ्यासवर्ग घेतले. जून 1982  पासून 'मुस्लिम प्रबोधन संवाद' हे मराठी नियतकालिक कोल्हापूरहून सुरू करण्यात आले. 

डिसेंबरमध्ये इचलकरंजी येथे मुस्लिमांचे चर्चा शिबिर झाले. त्यात 80 शिबिरार्थी होते, त्यापैकी 35  स्त्रिया होत्या. जानेवारी 26, 1983 पासून तलाकपीडित महिलांच्या मुलांसाठी एक वसतिगृह कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आले आहे. अरबांकडून मिरजमध्ये मुस्लिम स्त्रीयांची जी लांडगेतोड होते त्याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  मोहीम काढली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याव्यतिरिक्त पुणे, नगर, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपुर, मुंबई, सातारा, बेळगाव, दिल्ली, अलीगड, रत्नागिरी भागातही हुसेन जमादार यांनी मंडळाच्या कामाचे लोण पोचवण्यात मदत केली.

अमरावतीचे शेख वजीर पटेल यांनी चालवलेले मंडळाचे कार्य विशेष प्रशंसनीय म्हणावे लागेल. त्यांचा जीव घेण्याचा वा त्यांना कायम जायबंदी करण्याचा जातीयवादी मुसलमानांचा प्रयत्न होता. त्यांचा हात तोडण्याचा अमानुष प्रकार करण्यात आला. पण तरीही न डगमगता, सर्व गोष्टीना तोंड देऊन ते हीरीरीने काम करीत आहेत. कुटुंबनियोजनासाठी स्त्री-पुरुषांची जाहीरपणे शिबिरे घेऊन यांनी या देशात एक उच्चांक प्रस्थापित केला आहे. लोकसंख्यावाढीला आळा घालण्याबाबत मुसलमानांनी अंगचुकारपणा करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर थोंडा पाडून घेणे आहे हे ते परोपरीने सांगतात. पुण्याला त्यांचा सत्कार झाला त्याच्या उत्तरी त्यांनी जे भाषण, बाहेर निदर्शनांची धमाल चालू असताना केले, ते त्यांच्या तळमळीची साक्ष देणारे होते. 
इंदिरा काँग्रेसच्या पुण्याईवर पदे संपादन करायची आणि त्यांच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला दगाफटका करायचा हा जो प्रकार पुण्याचे आमदार अमीनुद्दीन पेनवाले, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व मंत्री असीर आणि आमदार अजहर हुसेन करीत आहेत त्यावर ते तुटून पडले, कुरान, हदीस यांचा लोकसंख्या वाढ आटोक्यात ठेवण्याला पाठिंबा असल्याचे ते दाखवून देतात. लोकसंख्येला आळा न घातल्यामुळे मुसलमान स्त्रियांची व मुलांची जी दैना व परवड होते ती त्यांना पाहवत नाही. शेकडो मुस्लिम पुरुषाच्या व स्त्रियांच्या नसबंदी शल्यक्रिया यांनी घडवून आणल्या आहेत आणि प्रभावीपणे त्याचा प्रचारही ते करतात. त्यांनी अनेक स्त्री-पुरुष कार्यकर्ते या कामासाठी तयार केले आहेत.

जबानी तलाक व सवत यांमुळे मुस्लिम कुटुंबांची होणारी वाताहत ते रोज पाहातात व निस्तारण्याचा प्रयत्न करतात. तलाकपीडित मुस्लिम महिलांची त्यांनी घेतलेली परिषद हा एक उच्चांक होता. त्यांनी चालवलेले वाचनालय हे प्रबोधनाचे एक जिवंत केंद्र आहे. मंडळाच्या कामाला इतके स्त्री- पुरुष कार्यकर्ते त्यांनी मिळवले आहेत की त्याचा कोणलाही हेवा वाटावा. कार्यकर्ते तयार करण्याची त्यांची हातोटी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुस्लिम स्त्रियांसाठी त्यांनी एक उद्योग प्रशिक्षण व उत्पादन केंद्र चालवले आहे. शिवणकाम-भरतकाम शिकणाऱ्या  स्त्रीयांच्या एकेकीची आपबीती म्हणजे एक हृदयद्रावक कहाणीच आहे ! सर्वस्थी निराश झालेल्या स्त्रियांच्या जीवनात आशेचा दीप त्यांनी लावला आहे. इस्लाम विषयक साहित्याचा त्यांचा व्यासंग चांगला असल्याने वादविवादात त्यांच्यापुढे कोणाचा टिकाव लागत नाही !

मतलोभी राजकारणी, गैर मार्गाने पैसे मिळवणारे गुंड, जातिवादाला पाठीशी चालणारी नोकरशाही आणि सर्वसामान्य मुसलमानांतील अंधश्रद्धा, अज्ञान, दैववाद अशा चतुरंग सेनेशी मुकाबला करीत त्यांचे कार्य जोमाने चालू आहे. मुस्लिम संप्रदायवाद्यांइतकाच बिंदू संप्रदायवाद्यांचाही त्यांना उपद्रव होत असतो. रजिया पटेल ही राष्ट्र सेवा दल व छात्र युवा संघर्ष वाहिनीतील एक चिनगारी आहे. जळगाव जिल्ह्यात सिनेमाबंदी विरूद्ध केलेल्या चळवळीने ती प्रकाशात आली. ठोस तात्विक विचारांच्या आधारे तिचे काम चालू आहे. मुस्लिम स्त्रियांचे गाऱ्हाणे तिने जगाच्या वेशीवर टांगले. मे 28-29, 1983  ला मुंबईत मुस्लिम कार्यकर्योचे एक शिबिर आयोजित करून तिने एक संयोजन समिती स्थापन केली आहे. मंडळाच्या कार्याला तिचे काम पूरक आहे. 

हमीद दलवाईच्या पाचव्या पुण्यतिथीला ‘इस्लामचे भारतीय चित्र' हे हमीद दलवाईंच्या लेखांचे पुस्तक तिच्या हस्ते पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत प्रसिद्ध झाले, 'चाहूल' हे तिचे पुस्तकही चटका लावणारे आहे. त्याचा हिंदी अनुवाद 'रजिया पटेल, समता की चाह' या नावाने प्रसिद्ध झाला असून हिंदी परदेशात तो पोचला आहे. 'मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय’ या हमीद दलवाईंच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रा. नरहर कुरुंदकरांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाली असून मुस्लिम प्रश्नांची त्यातील चिकित्सा मूलभूत स्वरूपाची आहे. 'मुस्लिम सत्य शोधक मंडळ, उद्देश आणि भूमिका' या पुस्तकात प्रबोधनाची व मंडळाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. मुस्कपरस्त यांचे ‘तवारीख' हे पुस्तक 1977 ते 1979 या वर्षातील भारतीय मुस्लिम समाजातील विविध प्रश्नांचा मागोबा घेणारे आहे. 

मुसलमानांनी प्रादेशिक भाषांतून व्यवहार करणे त्यांच्या हिताचे आहे ही मंडळाची भूमिका किती अचूक होती त्याचा प्रत्यय जमातवादी मुसलमानांनाही प्रदेश-भाषांचा आश्रय घ्यावा लागतो, त्यावरून येईल. हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या रूपाने जी मशाल पेटवी ती त्यांच्या निधनामुळे विझलेली तर नाहीच, पण अनेक मशाली तिच्यावरून पेटलेल्या असून त्या मार्ग प्रकाशित करीत आहेत. महाराष्ट्रा लगतच्या गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, कर्नाटक, गोवा राज्यात कामाचे लोण पोचले आहे. इतरत्रही ते पोचल्यावाचून राहाणार नाही.

Tags: तलाक रत्नागिरी अलीगड दिल्ली बेळगाव सातारा मुंबई चंद्रपुर वर्धा नागपूर अमरावती नगर पुणे सांगली कोल्हापूर इंदिरा गांधी भाई वैद्य बाबा आढाव रजिया पटेल मेहरुन्निसा दलवाई बाबूमिया बैंडवाले हमीद दलवाई सय्यदभाई मुस्लिम सत्यशोधक मंडळ नरहर कुरुंदकर Divorce Ratnagiri Aligad Delhi Belgao Satra Mumbai Chandrapur Wardha Nagapur Amarawati Nagar Pune Sangali Kolhapur Indira Gandhi Bhai Waidy Baba Adhaw Rajiya Patel meharunnisa Dalwai Babubhai Bandwale Hamid Dalawai Sayyadbhai Muslim Satyshodhak samaj Narahar Kurundkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरहर कुरुंदकर

1932 - 1982

विचारवंत लेखक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके