साने गुरुजींच्या वैचारिक वाङ्मयात प्रामुख्याने जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे स्नेह-भाव, सेवा करण्याचे महत्त्व. जीवनातल्या सगळ्याच सौंदर्यावरचे प्रेम आणि जीवनात ज्या ज्या ठिकाणी उदात्तता दिसेल त्याच्या समोर नम्र होण्याची प्रवृत्ती. सगळया विकृत माणसांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांना सौंदर्याविषयी अनास्था असते आणि विकृतीमध्ये सौंदर्य दिसते. साने गुरुजींच्या लेखनात ही तऱ्हा दिसणार नाही.
साने गुरुजी जवळपास वयाच्या पंचविशीपासून ते अखेरपर्यंत सतत लिहीत होते. हे जे सतत लिहीत राहिले ते एक प्रकारचे त्यांचे प्रकट ‘चिंतन’ (लाउड थिंकिंग) होते. माणूस लिहीत असताना स्वत: सेल्फ-पासून अलग असूच शकत नाही. त्याचे राग-लोभ-विचार-विकार इत्यादी विशिष्ट मनोधर्म कळत नकळत त्याच्या लिखाणात प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहात नाहीत. शिवाय साने गुरुजींचे जे सगळे लिखाण आहे ते वैचारिक स्वरूपाचे नाही. त्यांचा तो पिंडच नाही. गुरुजींनी स्वतः वैचारिक स्वरूपाचे लिहायचे ठरवले तरी ते भावनात्मक होतात. आणि कथा सांगायची योजिली तरी तिथेही ते भावनात्मक लिहितात.
साने गुरुजींच्या साहित्याचे स्थूलमानाने तीन गट पडतात पहिल्या गटात त्यांचे वैचारिक स्वरूपाचे लिखाण येते. उदाहरणार्थ, ‘भारतीय संस्कृती’; हा अशा प्रकारच्या त्यांच्या लिखाणाचा उत्तम नमुना.
दुसऱ्या गटात त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या येतात. आणि तिसऱ्या गटात गुरुजींनी केलेले अनुवाद येतात. या अनुवादांना विशेष महत्व अशासाठी आहे की, त्यावरून त्यांची आवडनिवड, टेस्ट लक्षात येते. या टेस्टच्या दृष्टीने आपण साने गुरुजींच्या वाङ्मयाकडे पाहायला लागलो तर आपल्याला प्रामुख्याने असे दिसते की, जगातले भावनाप्रधान वाङ्मय साने गुरुजींना आवडलेले नाही. साने गुरुजींनी जे जे वाङ्मय अनुवादासाठी घेतले आहे ते प्रामुख्याने वैचारिक, धार्मिक महत्व असलेले आहे; किंवा हार्ड रिअॅलिझम सांगणारे आहे.
त्यांनी ‘कुरल’ची जशी अनुवादासाठी निवड केली तशीच हार्डीच्या कादंबरीचीही केली आहे. व्हिक्टर ह्युगोची ‘ला मिझरेबल’ (दुःखी) आहे. ‘सिलासमारनर’ आहे. भोळे-भाबडे जीवन रंगवणारी कादंबरी त्यांना रुचलेली नाही. त्यांना आवडलेली कादंबरी हार्ड रिअॅलिझम दाखवणारी, जीवनातील सुख-दुःखे सांगणारी नॉर्म्यालिटीची कादंबरी आहे. कुठल्याही विकृतीची कादंबरी नाही. ह्या कादंबरीची कथा लहान मुलांना सांगताना ती ते साधी-भोळी करून सांगतील, पण त्यांची टेस्ट आणि आवड नेहमी जीवनातील खरीखुरी सुख-दुःखं पाहणारे जे लेखक आहेत, ज्यांनी जीवनातील सुख-दुःखं पाहून काही उदात्ततेचा स्पर्श तिथे ठेवलेला आहे, अशा वाङ्मयाकडे त्यांची ओढ दिसते.
साने गुरुजींच्या वैचारिक वाङ्मयात प्रामुख्याने जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे स्नेह-भाव, सेवा करण्याचे महत्त्व. जीवनातल्या सगळ्याच सौंदर्यावरचे प्रेम आणि जीवनात ज्या ज्या ठिकाणी उदात्तता दिसेल त्याच्या समोर नम्र होण्याची प्रवृत्ती. सगळया विकृत माणसांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांना सौंदर्याविषयी अनास्था असते आणि विकृतीमध्ये सौंदर्य दिसते. साने गुरुजींच्या लेखनात ही तऱ्हा दिसणार नाही.
साने गुरुजींच्या ललित वाङ्मयामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी जाणवतात. साने गुरुजी जेव्हा कथा रचतात तेव्हा त्यावरून त्यांना काय काय कळते, काय काय कळत नाही, कशाचे आकर्षण आहे व कशाचे अनाकर्षण आहे ह्या कथानकातल्या बाबी आणि दुसऱ्या भाषाशैलीतल्या बाबी लक्षात येतात. कथानकामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, स्त्री प्रेमात पडते म्हणजे काय, हे साने गुरुजींना माहीत नाही. साने गुरुजींच्या प्रत्येक कादंबरीमध्ये स्त्री प्रेमात पडते, ती लग्न करते, नवऱ्याबरोबर संसार करते. पण हे सगळं कथानक चाललं असताना त्यांना कधीही स्त्री प्रेमात पडते म्हणजे काय,- हे सांगता आलेलं नाही.
त्यांच्या मिरीनं मुरारीला असं पत्र लिहिलं की, ‘आज संध्याकाळी गावाबाहेर सूर्यास्ताच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावर तू ये. त्या ठिकाणी माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मी सांगेन.’ -कोणतीही स्त्री अशा प्रकारचं पत्र लिहिणार नाही. एक तर ती आपलं प्रेम बसलेलं आहे हे न सांगता भेटीचं निमित्त हुडकून काढील आणि प्रेमाच्या आणाभाका झाल्या असतील तर पत्रामध्ये फक्त त्याचेच उल्लेख व पुनरावृत्ती आढळेल. प्रेम सांगण्यासाठी गावाच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची जी कल्पना आहे ती स्वप्नाळू आहे.
साने गुरुजींनी इथंसुद्धा असं म्हटलेलं नाही की, ‘अर्ध्या रात्री परसामध्ये सर्वांना चोरून तू ये; कारण अंधारात आपण दिसणार नाही.’ त्यांनी हे ठिकाण निवडलेलं नाही, तर गावाबाहेर, समुद्राच्या किनारी, सूर्य मावळत असताना- याची निवड केली आहे; म्हणजे सौंदर्य, उदात्तता, मोकळेपणा आणि जाहीर रीतीने प्रेमाची मिरीला कबुली द्यायची आहे.
आपण यावरून जास्तीत जास्त एवढेच म्हणू शकू की, प्रेमप्रकरणं कशी चालतात हे गुरुजींना माहीत नाही; स्त्री प्रेम कसं करते हे त्यांना माहीत नाही, पुरुष कसं प्रेम करतो हे त्यांना माहीत नाही; पण त्यांच्या मनामध्ये प्रेम नावाच्या कल्पनेविषयी आदर आहे. प्रेम नावाची भावना त्यांनी स्वतः भोगलेली नाही आणि कोणत्याही प्रकारची विकृती ही भावना न भोगल्याच्या अभावाने तेथे निर्माण झालेली नाही. गुरुजींनी सर्वत्र स्त्रिया रंगविलेल्या आहेत त्या प्रेयसी या स्वरूपात आहेत. त्या पहिल्यांदा प्रेम करतात, नंतर लग्न करतात, आणि त्यानंतर त्या नवऱ्यावरचे प्रेम मुलाकडे वळवतात. गुरुजींची गृहिणी ही कर्तबगार गृहिणी आहे. त्यांचा पुरुष दुष्ट असतो, पण शेवटी तो सज्जन होतो. साने गुरुजींची स्त्री कधीही दुष्ट नसते ती सहनशील असते. शेकडो प्रेमप्रसंग त्यांनी लिहिले आहेत, पण याच्याबाहेर जाण्याची गरज काही त्यांना वाटलेली नाही.
यावरून आपण असं म्हणू की, गुरुजींच्या समोरचं जीवनाचं चित्र अत्यंत साधंभोळं होतं. जीवनातील गुंतागुंत त्यांना कळत नव्हती. आपण हे म्हणू की, ते भोळेपणाने जीवनाकडे गेले. पण आपण हे नाही म्हणू शकणार की, त्यांच्या कथानकात विकृतीचा वास आहे. कथानकातून जे चोरले जाते ते उलट्या रीतीने उमटते. कारण वाङ्मयाचे व व्यक्तिमत्त्वाचे संबंध साक्षात सरळ कधीच नसतात. उदाहरणार्थ, गडकरी. गडकरी हे अतिशय भित्रे होते. म्हणून गडकऱ्यांच्या वाङ्मयामध्ये आत्यंतिक शूर माणसांची चित्रे नाहीत. सतत अंधाराचे प्रसंग आहेत. सतत स्मशानाचे प्रसंग आहेत. अपघाताचे प्रसंग आहेत. कारण त्यांच्या स्वतःच्या मनात भीती आहे; त्यामुळे भीती चित्रित करण्यातच ते रंगतात. साने गुरुजींच्या जीवनात सर्वत्र तुम्ही जर पाहिले तर पुनरावृत्ती कोणत्या प्रसंगाची येते,- तर प्रेम, निष्ठा, सेवा, सहकार्य, उदात्तता यांचीच. कथानकातून जी विकृती चोरता येते ती भाषाशैलीतल्या अलंकारात व्यक्त होते.
गडकऱ्यांचंच एक प्रसिद्ध उदाहरण आहे. प्रेमसंन्यास नाटकामध्ये कमलाकर भूतमहालाकडे चाललेला आहे. तेथे त्याच्या तोंडी असे एक वाक्य आहे : ‘दिवसभर चालून चालून छाती फुटून, रक्ताच्या गुळण्या टाकून सूर्य मरून पडलेला आहे. सायंकाळी सायंतारा अंधाराचा शेणकाला रस्त्यावरून पुसून हे सगळं दृश्य मिटवून टाकील. प्रेताच्या उशाला ठेवलेल्या समईप्रमाणे दक्षिणेला एकच अगस्तीचा तारा आहे. काय रमणीय संध्याकाळ आहे !’ -कुठं तरी अशी विकृतीची, वेडसरपणाची झाक कोणत्या तरी कल्पनाविलासामध्ये येते.
साने गुरुजींच्या सर्व वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडेल की, त्यांचा सगळा जो कल्पनाविलास आहे तो पुन्हा सौंदर्य शुचिर्भूतता, मांगल्य यांच्याशी निगडित आहे. साने गुरुजींच्या संपूर्ण हजारो पानांच्या वाङ्मयामध्ये सातत्याने ते लिहिताहेत, बोलताहेत, स्वतः कलाकृतीचे सृजन करताहेत, अनुवाद करताहेत- त्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जर त्यांचे स्टार्व्हेशन दिसत नसेल, पर्व्हर्जन दिसत नसेल, विकृती दिसत नसेल तर इलेव्हेटेड पर्सन आहे इतकंच आपण म्हणू शकतो. यापलीकडे तो विकृत आहे असं म्हणण्याचं कारण राहात नाही. जर एखाद्या माणसाच्या जीवनातील अशी कुठलीही विकृती, ओपन बुक-सारखं त्याचं जीवन असतानाही सापडत नसेल, तर त्याला आमच्या जीवनात ही गोष्ट आम्हाला शक्य वाटत नाही त्या अर्थी एक तर गुरुजींची भानगड दाखवा नाही तर ते विकृत आहेत, असे म्हणणे म्हणजे आपण जीवन साधे करून पाहतो आहोत, जीवनातील व्हरायटी आपण लक्षात घेत नाही असा अर्थ होतो.
आता गुरुजींच्या कविता. गुरुजींच्या ज्या कविता आहेत या कविता नाहीतच. गुरुजींच्या कविता ही सरळ साधी प्रचारगीतं आहेत,- ‘शेतकरी बाया आम्ही कामकरी बाया-’ अशी या प्रकारची गीतं. ‘खरा तो एकची धर्म- जगाला प्रेम अर्पावे- या सगळ्या कवितांचे स्वरूप कसे आहे तर साने गुरुजींनी आपले सगळे विचार लयबद्ध पद्यामध्ये मांडलेले आहेत. कविता म्हणत असताना त्या कवितेमध्ये असणारी भावनेची सूक्ष्मता त्यांचा कल्पनाविलास किंवा त्यामध्ये असणारी त्यांच्या अनुभवांची जिद्द असे काहीही त्या कवितेत नाही. ती सगळी कविता एकसुरी आहे.
साने गुरुजींचा सगळा कल्पनाविलास, प्राधान्याने ते ज्या वेळी ललित लिखाण करतात तिथं येतो. गुरुजींना कादंबरी रचता येत नाही; कारण स्त्री-पुरुष संबंधांची जाणीव त्यांना फारशी नाही. गुरुजींना लघुकथाही त्यामुळेच लिहिता येत नाहीत. ते लिहिताना कुठे तरी अत्यंत भावनाशील होऊन जायला लागतात. पण ज्या कोण्या एका ठिकाणी गुरुजी एक विचार मांडतात तो विचार भावुक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की त्यांचा सगळा कल्पनाविलास, जो खरोखरी त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे, तो उचंबळून येतो. याचं फार सुंदर चित्र ‘सुंदर पत्रा’मध्ये आहे. कथानकाचे बंधन नाही, प्रसंगाचे बंधन नाही, विचार कोणता- कुठे मांडायचा याचेही बंधन नाही- जसा विचार येईल तसा, जिथवर जाईल तिथवर- इथेच गुरुजींचा सगळा कल्पनाविलास आणि मनाचा मोकळेपणा अगदी प्रकर्षाला जाऊन पोचलेला आहे ! म्हणून सबंध सुंदर पत्रे ही विविध प्रकारच्या कल्पनांनी भरलेली आहेत. आणि कोणत्याही ठिकाणी शारीरिक अगर मानसिक विकृतीचा जराही आढळ होत नाही.
साने गुरुजींचे वाङ्मय रडके आहे असा एक आक्षेप घेतला जातो. त्यांचे वाङ्मय रडके आहे, या आक्षेपाला एका मर्यादेमध्ये तथ्य आहे, दुसऱ्या मर्याददेमध्ये तथ्य नाही. साने गुरुजींच्या डोळ्यांसमोर असणारा वाचकवर्ग हा सदैव 14 ते 18 वर्षे वयाचा आहे. हा जो 14 ते 18 च्या वयाचा वाचकवर्ग आहे. हा विद्यार्थी आहे; ह्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त सुलभ सोपी करून सांगणं आणि प्रामुख्याने ध्येयवादाचा नि भावनांचा अधिकाधिक भर तिथं देणं या गोष्टी आवश्यक आहेत. या विद्यार्थ्यांशी बोलताना गुरुजींचा पिंड बनलेला आहे. ते मनानेच तिथे समरस झाले आहेत.
एखाद्या वेळी ते काय करतात की, चौदाच्या खालच्या मुलांसाठी लिहायला लागतात. जिथे चौदाच्या खालच्या मुलांसाठी गुरुजींनी जे वाङ्मय लिहिले आहे ते वाचताना हे लक्षात येते की, सामान्यतः पाच ते नऊ हा जो वयोगट आहे, त्याच्यासाठी गुरुजींना लिहिता येत नाही. कारण त्या विश्वाशी ते समरस होऊ शकत नाहीत. म्हणून गुरुजींची बालगीते, त्यांच्या बालकथा ह्या नऊ-दहा वर्षांखालच्या मुलांना वाचताच येत नाहीत. तिथं तो मुलगा समरसच होऊ शकत नाही. कारण 5 ते 9 या वयोगटातला जो मुलगा आहे त्याच्या इंद्रियांची संवेदनशीलता अतिशय तीव्र असते आणि मन पुष्कळसं कोरं असतं. परिणाम याचा काय होतो की, नेहमी तुम्हांला इंद्रिय-संवेदना, स्पर्श संवेदना, त्या वयातील त्याच्या आवडीनिवडी यांच्याशी सांधा जोडून काय सांगायचे ते सांगावे लागते. याचा सांधा तोडून काही सांगता येत नाही. या लहान मुलांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांच्याशी गुरुजींचा सांधा कधीच जुळत नाही.
दहाव्या वर्षाच्या पुढे मुलगा गेला की त्याचे ‘कंडिशनिंग’ व्हायला सुरुवात होते. शाळेतून, आईच्या, मित्रांच्या, मास्तरांच्या बोलण्यातून असे कंडिशनिंग होत असते. स्त्री म्हणजे अशी, पुरुष म्हणजे असा, बाई म्हणजे अशी, बाप म्हणजे असा असे ‘टाइप’ तो गृहीत धरायला लागतो. त्याला इंडिव्हिज्युअलिटीची अजून जाणीव होत नाही, या टाइपमध्ये त्याच्यासमोर दोनच बाजू असतात एक म्हणजे भावनेच्या बाबतीत ओव्हर पोझ, आणि दुसरी म्हणजे ध्येयवादाच्या बाबतीत ओव्हर पोझ. अठराव्या वयानंतर तो मुलगा क्रमाने वास्तवतेकडे सरकायला लागतो आणि गुंतागुंतही त्याच्या लक्षात यायला लागते. साने गुरुजी ज्या वेळी प्रौढांसाठी वाङ्मय लिहितात ते वाचताना आपल्या लक्षात येते की त्यांनी लिहिले प्रौढांसाठी, पण त्यातले काही प्रौढांसाठी लिहिले मधला जो सगळा आशय आहे तो या 14 ते 18 वयाच्या मुलांसाठी आहे.
जगातल्या सर्वश्रेष्ठ अशा कलाकृती साने गुरुजींनी अनुवादित केलेल्या आहेत; पण त्या इतक्या सोप्या अनुवादित केल्या आहेत की त्या 14 ते 18 वयाच्यासाठी असतील. यावरून एवढेच सांगता येईल की, साने गुरुजी ज्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कार्यकर्ते म्हणून कार्य करीत होते, त्या वेळी त्यांना बाहेरच्या समाजाला जो सुप्त माणूस आहे तो आपला नवा कार्यकर्ता आहे असे आरंभीच्या काळात वाटले नव्हते. आरंभीच्या काळी त्यांच्या असे लक्षात आले की, जो जो कोणी तिशी ओलांडून पलीकडे गेलेला होता तो माणूस आपले ऐकून घेणार नाही; कारण आपण पाहात आहोत- जो माणूस वीस ते तीसच्या दरम्यान आहे तो कुठे तरी संसाराला लागलेला आहे संसारात गुंतलेला आहे. तेव्हा आपलं आशास्थान आहे फक्त मुलं; -आणि ही मुलं कोणती ? तर माझ्या हाताखाली जी शिकताहेत ती. पुढे साने गुरुजी नेते म्हणून वाढले, वयाने वाढले. त्यांच्याभोवती अनुयायांचा गट जमला, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात गुरुजींचे लक्ष राहिले सेवा दलाकडे. याचे खरे कारण हे आहे की, ते मनाने आणि प्रकृतिधर्माने 14 ते 18 या गटाशी निगडित झालेले होते.
साने गुरुजींची जी भावनात्मकता आहे तिचे सुद्धा खास वैशिष्ट्य आहे. साने गुरुजी रडके आहेत असे काही जण म्हणतात. गुरुजींच्या रडण्यामध्येसुद्धा खास वैशिष्ट्य आहे. गुरुजीचं रडणं हे कधीही कर्तव्याच्या आड येत नाही. त्यागाच्या आड येत नाही. आपलं कर्तव्य करत असताना ज्या यातना सहन कराव्या लागतात त्यांच्या आड येत नाही. गुरुजींचं जे रडणं आहे ते एखादा कठोर निश्चयी पुरुष जसा निश्वयाने पुढे जात असतो,- त्याचं रडणं आहे. ज्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटते, प्रत्येक त्यागाची, संकटाची भीती वाटते, जे भांडण टाळतात, तडजोडी करतात, लाचार होतात, दीन होतात आणि आक्रमण झालं तर रडतात- या रडण्यापेक्षा साने गुरुजीचं रडणं फार निराळं आहे.
या संदर्भातलं अलीकडच्या काळातलं अतिशय सुंदर उदाहरण आहे शेख मुजीबचं. शेख मुजीब यांनी पहिल्यांदा असा निर्णय घेतला की स्वातंत्र्य घ्यायचं. बंगालमध्ये त्यांनी स्वातंत्र्य जाहीर केलं. त्यानंतर असा निर्णय घेतला की बाहेर हिंडायचं नाही. कारण गर्दीत मारला गेला असे म्हणण्याची संधी पाकिस्तान्यांना द्यायची नाही. ते आपल्या घरी बसून राहिले. म्हणजे गोळी घालायची असेल तर घर घेरून मारलं पाहिजे. म्हणजे ‘पर्पजफुल मर्डर’चा चार्ज पुढल्या पिढ्यांना ठेवता आला पाहिजे. मुजीबनी पळून जायचे नाकारले, भूमिगत व्हायचे नाकारले. कारण त्यांचे म्हणणे असे की, मी जर पळून गेलो, अगर भूमिगत झालो, तर मागून लोक असं म्हणतील की, हा सुरक्षित राहिला आणि आम्ही मात्र अडचणीत सापडलो. त्यामुळे त्यांनी कैदेत पडणे इष्ट मानले. फासावर जाणे त्यापेक्षा जास्त चांगले मानले.
नंतर ते दीर्घकाळ अटकेत राहिले. त्यांना माहीत होतं की इथून आपण जिवंत बाहेर सुटू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांना कळलं की बंगाल स्वतंत्र झाला. आता मरायला हरकत नाही. त्यानंतर त्यांना विमानात बसवून लंडनमध्ये आणून सोडलं. तिथे त्यांनी विचारलं, ‘’ॲम आय फ्री ?’’ उत्तर मिळालं, ‘’यू आर फ्री.’’ मुजीब यांच्या चेहेऱ्यावरची एकही रेषा तोपर्यंत हालली नव्हती. नंतर त्यांची एका हॉटेलात सोय करण्यात आली. तीन तास त्यांचा तिथं मुक्काम होता. लंडनच्या पंतप्रधानांनी त्यांचं औपचारिकरीत्या स्वागत केलं... इत्यादी. नंतर केबलनं इंदिरा गांधींशी कॉन्टॅक्ट जोडण्यात आला. आणि इंदिरा गांधींचे आभार मानताना त्यांनी रडायला सुरुवात केली. त्यांना रडे आवरेचना. नंतर त्यांनी भारत सरकारला आपल्या पत्नीशी फोन जोडून देण्याची विनंती केली. पत्नीशी फोन जोडून देण्यात आला. मग बायकोला तिची प्रकृती बरी आहे का, म्हणून विचारलं.
नंतर ते विमानातून हिंदुस्थानात आले. हिंदुस्थानात आल्यानंतर जाहीर सभेतील व्याख्यान, सत्कार वगैरे झाले. तिथं रडलेबिडले काही नाही. तिथुन ढाक्याला गेले, आणि ढाक्याच्या पहिल्याच व्याख्यानात ‘माझे लाख लोक मेले-‘ हे सांगताना प्रचंड भरसभेत ते हमसाहमशी रडले ! त्यांना पुढचे बोलणेच सुधरेनासे झाले... प्रश्न असा निर्माण होतो की, खरोखरच माणसाचं आपल्या सहकाऱ्यांवर असणारं प्रेम, आपल्या बायका-मुलांवर असणारं प्रेम, त्यांच्या यातना पाहिल्यावर येणारं रडू- या गोष्टी इतक्या वाईट असतात का,- की ज्या गोष्टी आपण वर्ज्यच मानल्या पाहिजेत ? असे मानण्याचे काही कारण नाही.
म्हणून हे जे दोन प्रकारचे रडणे आहे- की जे रडणे भीतीतून निर्माण होते आणि सुरक्षिततेच्या दिशेने जायला लागते, म्हणून ते आक्रमण सहन करायला लागते, मग थोडेसे दीनलाचार व्हायला लागते, करुणा भाकायला लागते;- यातले रडणे हा एक भाग आहे. आणि ज्या ठिकाणी प्रत्येक ध्येयवाद, त्याग, निष्ठा- एका निश्चित दिशेने पुढे जाणे- हे सगळे चालू आहे. यात चिडून उठलेल्यांच्या यातनांविषयीची करुणा आहे म्हणून सारखे रडू येते- गुरुजींच्या वाङ्मयातील जो रडकेपणा आहे तो कर्तव्यनिष्ठांचा रडकेपणा आहे. या रडकेपणाला सामान्य जीवनातल्या रडकेरपणापेक्षा काही वेगळे स्थान आहे, हे आमच्या टीकाकारांना नक्की वाचता आलं नाही. कारण त्यांना एकच रडणे माहीत आहे; सगळे रडणे माहीत नाही.
तरीसुद्धा मी हे मान्य करायला तयार आहे की साने गुरुजींचे जे वाङ्मय- या वाङ्मयाचे वाङ्मयीन मूल्य आपण वाङ्मयीन कसोट्यांनी करत असताना तुम्ही वे वाङ्मय वाईट आहे असे म्हणणार काय ? -मध्यम प्रकारचे आहे, असे म्हणणार आहात काय ? हा वाङ्मयीन निर्णय मी मान्य करायला तयार आहे; पण हे वाङ्मय माणसाला दुबळं बनवतं हा जो विचार आहे, हा मी कबूल करायला तयार नाही. कारण हे वाचून एक पिढी त्याग करायला सिद्ध झाली; ही तर गोष्ट अनुमानाने सांगण्याची गरज नाही,- तर पुराव्याने सिद्ध होण्याजोगी आहे. ती एक पिढी हे वाङ्मय वाचताना रडली; आणि रडता रडता जेलमध्ये जायला तयार झाली. एक पिढी हे वाङ्मय वाचून कष्ट भोगायला तयार झाली. दारिद्र्यात राहायला तयार झाली. मार खायला तयार झाली. तेव्हा या वाङ्मयाने माणसाला दुबळे बनवले, हा चार्ज आम्ही मान्य करणार नाही. कलात्मक न्यायाने म्हणायचे तर त्याच्यावर वेगळी चर्चा करू.
या मुद्द्यावरही मतभेद असू शकतात. काहींना ते कलात्मक वाटेल, काहींना ते कलात्मक वाटणार नाही. मलासुद्धा ते कलात्मक वाटत नाही. कारण 14 ते 18 हा एकच वयोगट ज्या माणसाच्या डोळ्यांसमोर आहे त्या माणसाने जीवनातल्या सगळया गुंतागुंतीच्या जाणीवा या हरवून टाकलेल्या आहेत; जीवनाची टोटल कॉप्लेक्सिटी जिथे व्यक्त होत नाही, या वाङ्मयाचे इतर मूल्य कोणतेही असले तरी कलात्मक मूल्य बेताचे आहे, असे मला वाटते.
इथे कलात्मक मूल्य विवाद्य आहे. तरीही या वाङ्मयाने माणसाला त्यागाच्या प्रेरणा दिल्या आहेत, आत्महत्येच्या दिलेल्या नाहीत. रोमँटिक वाङ्मयामध्ये भावनाशीलता आहे. अतिरिक्त भावनाशीलता हे सर्व रोमँटिक मंडळींचे वैशिष्ट्यआहे, पण अतिरिक्त भावनाशीलता हे जे रोमँटिक मंडळींचे वैशिष्ट्य आहे, शेली, कीटस्, बायरन- या सर्व रोमँटिक मंडळींचे एक दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे की, यांनी या जगातला अन्याय अटळ आहे असे समजून तो सहन करण्याचे आणि तो भोगून कुंथत बसण्याचे शिक्षण दिले.
कुढेपणा हे माणसाचे मोठेपण आहे असे शिकवले. सगळ्या जीवनाच्या कर्तव्यातून निवृत्त व्हायला शिकवले, या जगामध्ये सज्जनांचा टिकाव लागणे शक्यच नाही,- म्हणून आयव्हरी टॉवरमध्ये राहायला शिकवले. जग पुरेसे सुंदर नाही म्हणून जगाचा त्याग करून निसर्गाकडे जायला शिकवले. म्हणजे शास्त्रापासून दूर, समाजापासून दूर, दारिद्रयापासून दूर, दु:खापासून दूर, अन्यायाच्या प्रतिकारापासून दूर, त्यागापासून दूर;- असे एक स्वतःचे वैयक्तिक जीवन- जे सगळी आक्रमणे दीनपणे सहन करते- असेच निर्माण व्हायला प्रवृत्त करते. या रोमँटिक वाङ्मयाचा दुसरा परिणाम निघाला तो हा की, दुःख जीवनात निर्माण होणं हे माणसं आपला मोठेपणा समजायला लागली. मृत्यूची आसक्ती निर्माण होणं हा मोठेपणा समजायला लागली. त्यामुळे आत्महत्या हे पुण्यकृत्य वाटायला लागले.
गुरुजींच्या वाङ्मयाचा परिणाम जीवनविन्मुख होणे नाही. त्यांच्या वाङ्मयाचा परिणाम मृत्यूची आसक्ती नाही. गुरुजींच्या वाङ्मयाचा परिणाम आहे- जीवनाची आसक्ती; त्या जीवनाच्या आसक्तीमध्ये विशिष्ट प्रकारचे परिवर्तन घडवून आणण्याची आसक्ती; आणि ते परिवर्तन घडविण्याच्या प्रयत्नात मरण आले तर ते स्वीकारण्याची तयारी. हा जर गुरुजींच्या सगळ्या भाबडेपणाचा परिणाम होत असेल तर ते वाङ्मय माणसाला सामर्थ्य शिकवणारे आहे. सामर्थ्य देणारे आहे. सामर्थ्य देणं आणि शिकवणं ही गोष्ट तितक्याच समर्थ मनाच्याशिवाय येत नाही. तर गुरुजींचे रडणे हे समर्थाचे रडणे आहे: त्याची वाङ्मयीन चिकित्सा करण्यात अर्थ नाही.
Tags: Literature review साहित्य-समीक्षा Literature साहित्य Sane Guruji साने गुरुजी Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या