डिजिटल अर्काईव्ह

महात्माजींनी येरवडा तुरुंगात असताना वल्लभभाईंना विचारले होते, 'स्वराज्य मिळाल्यावर तुम्ही कोणता हुद्दा स्वीकाराल?' क्षणाचाही विलंब न करता सरदारांनी उत्तर दिले होते, 'मी साधू होईन!’

वल्लभभाईंचे बालपण आणि विद्यार्थिजीवन कष्टात गेले. खाणारी तोंडे अधिक आणि कमावणारे हात कमी. सर्वांना सारखीच टंचाई. छोटा वल्लभ शेती करी व शिके. निसर्गाशी नाते लहानपणापासून जडले. आर्थिक ओढाताणीमुळे परिश्रम आणि स्वावलंबन अनिवार्यपणे अंगवळणी पडले. कोणावरही अवलंबून न राहाण्याची वृत्ती बालपणापासूनच अंगी बाणली. हाती घेतलेले काम पुरे करायचेच अशी सवय त्या वेळेपासूनच जडली. बाल्यावस्थेतच कठोर परिश्रम करायला शिकल्यामुळे त्यांनी निरर्थक गप्पागोष्टींमध्ये कधीच वेळेचा दुरुपयोग केला नाही. जमिनीशी नाते जोडणाऱ्यांना चकाट्या पिटण्याची चैन परवडत नाही. कामाचा बोजा इतका भारी की इतरांबरोबर शब्दांची जुगलबंदी करायला वेळच नव्हता. जेवायच्या वेळेला घरातील सर्व मंडळी एकत्र जमली तरी शिळोप्याच्या गप्पा निघत नसत. नेमके बोलण्याची सवय लहानपणापासूनच जडली होती. म्हणून आडवळणे घेत बोलण्याच्या ढोंगी वृत्तीपासून सरदार सदैव शंभर योजने दूर राहिले. घरी म्हणण्यासारखी सुबत्ता नव्हती. नोकरचाकर नव्हते आणि बऱ्यावाईट प्रसंगी खोटा डामडौल किंवा प्रदर्शन याचा संपूर्ण अभाव होता.

आईला घरच्या कामाच्या रामरगाड्यातून डोके वर करता येत नव्हते. आणि विरागी वडिलांपाशी कुटुंबासाठी द्यायला वेळ नव्हता. मातापितरांच्या धर्मपरायण जीवनातील साधुवृत्तीचा वारसा त्यांच्या मुलाने म्हणजे वल्लभने घेतला. वडिलांचे बोट धरून मंदिरात जाणाऱ्या वल्लभभाईंना मानवीजीवन आणि सृष्टी यांच्या पाठीमागे काही परमेश्वरी संकेत असल्याचे लहान वयातच जाणवले व ही जाणीव मोठेपणीही टिकली. प्रचलित अर्थाने ते मंदिरात जाणारे ईश्वरभक्त नव्हते आणि धार्मिकतेच्या टिळेमाळा आदी बाह्य लक्षणांवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही निराकार ईश्वरावरील त्यांची श्रद्धा अभंग राहिली. जो ईश्वराच्या अस्तित्वास मानतो, ज्याची कशावर तरी कोणावर तरी श्रद्धा आहे अशा माणसाला आयुष्य कोणत्याही क्षणी निरर्थक वाटत नाही. आणि जन्माचा हर्ष किंवा मृत्यूचे भय या दोहोंपासून तो मुक्त असतो. तशीच अवस्था वल्लभभाईंचीही होती. ते धार्मिक होते पण त्यांचा चमत्कारावर विश्वास नव्हता. तर्काने निराकाराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वितंडवादात ते पडत नसत. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, अशी त्यांची वृत्ती होती.

काही काही सवयी त्यांना वारशाने मिळाल्या होत्या. मातापित्यांचे संस्कार व धार्मिकता, तर्काच्या पलीकडील श्रद्धाजीवन, व्यवहारात मर्यादा पालन, वादविवादापासून दूर राहाणे, हाती घेतलेले काम श्रद्धापूर्वक करणे, मितभाषीपणा, देण्याघेण्यातही मितव्यय इत्यादी. मनात विचारचक्र चालू असताना वडील घरातल्या घरात येरझारा घालीत. वल्लभभाईंचीही तीच सवय. आईवडील दोघेही मितभाषी. सार्वजनिक जीवनात राहूनही वल्लभभाई जरूरीपुरतेच बोलत आणि त्यांच्या बोलण्यातून सच्चाईचे पडसाद उमटत. आई ईश्वरपरायण, वडील विरागी तर त्यांचे संतान वल्लभभाई हे ईश्वरभक्त कर्मयोगी. आईवडील कमालीचे स्वाभिमानी. वल्लभभाईंमध्ये हा गुण लहानपणीच बाणला होता. अन्याय सहन करायचा नाही आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी झुंजत राहायचे. वडिलांनी 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात गोऱ्या राजवटीला आव्हान दिले होते. ते मितभाषी असले तरी अत्यंत दृढनिश्चयी होते. न्याय-अन्यायांतला फरक त्यांच्या बरोबर लक्षात येई व ते न चुकता न्यायाचाच पक्ष घेत. संसारात राहूनही न त्यांनी संन्यस्त वृत्तीचे पालन केले. गोऱ्या राजवटीविरुद्ध शेतकरी व गरीबगुरिबांसाठी लढणाऱ्या वल्लभभाईंविषयी काय म्हणावे?

सर्वांची सेवाचाकरी करण्याचा व काळजी वाहाण्याचा आईचा गुण वल्लभभाईंच्यातही प्रकर्षाने उतरलेला होता. लहानातील लहान मुलापासून स्वतःच्या बरोबरीच्या साथीदारांची सेवाचाकरी करून सुखदुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहाणाऱ्या वल्लभभाईंच्या व्यक्तिमत्त्वातील या पैलूची ओळख कोणत्या शब्दांत द्यावी? लहानपणी नांगर चालवणारे वल्लभभाई मोठेपणी चरखा चालवू लागले. या एकाच गुणाच्या दोन अभिव्यक्ती म्हटल्या पाहिजेत. 

आईपासून जीवनात श्रद्धेची जोपासना करायला ते शिकले व वडिलांकडून त्यांनी स्वाभिमानाची दीक्षा घेतली. आईने कठोर परिश्रम, धार्मिक वृत्ती आणि संयम यांचे धडे दिले तर वडिलांनी त्यागाचे मर्म पटवून दिले. त्यांच्या मातोश्रींचे जीवन म्हणजे कष्ट सहन करण्याच्या अपार शक्तीची गाथा. वल्लभभाईंचे जीवनही त्यांच्यासारखेच. पित्याकडून त्यांनी निर्भयतेचा गुण उचलला. मातापित्यांच्या स्वभावात असलेली तितिक्षावृत्ती वल्लभभाईंच्या स्वभावाचा स्थायीभाव बनली.

वल्लभभाईंच्या स्वभावात अलिप्तपणा होता यात शंका नाही. चारचौघांत बसलेले असले तरी त्यांच्यातले न होता दूरत्व राखण्याची वृत्ती. जरूरीपुरतेच बोलायचे व तेही शक्य तितक्या कमी शब्दांत. लांबलचक स्पष्टीकरण नाही. निरर्थक शब्दांचा वापर नाही. व्यर्थ बडबड दूरच. भाषेचा विलास किंवा शब्दांचे अवडंबर नाही. खेड्यात जन्मलेले व त्याच वातावरणात वाढलेले वल्लभभाई इतर लोकांशी अत्यंत सभ्यतेने वागत आणि तरीही त्यांच्या वागण्यात शहरी कृत्रिमता आणि बोलण्यात शब्दच्छल यांचा मागमूस नसे. मनात असेल ते रोखठोक बोलायचे, मुत्सद्याची फसवाफसवी नाही. शब्दांत विशुद्ध निखालसपणा. आतले-बाहेरचे असे काही नाही. त्यांच्या गंभीर मुद्रेवर खुले हास्य क्वचितच पाहायला मिळे. बोलणे औपरोधिक. वेळ पडल्यास कटूही बोलत. जरुरीपेक्षा अधिक शब्दांची देवाणघेवाण करण्याची सवय नसल्याने त्यांच्या आजूबाजूला चाहत्यांचा गराडा पडलेला पाहायला मिळायचा नाही. वकिली भरभराटीत चालली होती. जीवन सुखात व्यतीत होत होते. पण हे सर्व वैभव एका क्षणात त्यांनी सोडून दिले. सबंध आयुष्यभर त्यांची सेवा करणाऱ्या त्यांच्या कन्या मणिबेन यांच्याशी सुद्धा त्यांचे संभाषण कामापुरतेच असावयाचे. जेवायच्या वेळेला 'जेवण तयार आहे' असे मणिबेननी क्वचितच कधी म्हटले असेल. वडिलांच्या खोलीच्या उंबऱ्याशी येऊन त्या उभ्या राहिल्या की त्या कशासाठी आल्या आहेत हे त्यांनी न सांगता वडिलांना कळत असे. जेवता जेवताही काही बोलणे व्हायचे नाही. तरीही वडिलांची खुशी नाखुशी, आवड नावड लेकीला आपसूक कळत असे. वडलांना खायला काय आवडते, काय नाही हे त्यांना न सांगताच कळत असे. वाढलेल्या ताटाबरोबर दह्याची वाटी न चुकता ठेवायच्या. वडिलांच्या बसायच्या खोलीत अडकित्ता सुपारी ठेवायला त्या कधी विसरायच्या नाहीत. लेकीने जन्मभर वडिलांची आईसारखी सेवा केली.

वयाच्या मानाने वल्लभभाई प्रौढ दिसायचे. खरखरीत खादीचा जाडजूड सदरा, जमिनीपासून वीतभर उंच नेसलेले जाड्याभरड्या खादीचेच धोतर आणि खांद्यावर तसल्याच खरखरीत खादीच्या उपरण्याची घडी हा त्यांचा नेहमीचा पोषाख. मुलाखतीसाठी आलेल्या लोकांशी संभाषण बहुधा एकतर्फी व्हायचे. मधून मधून आपण ऐकतो आहोत अशी आठवण देण्यापुरते 'हं हं' करीत राहायचे. पण बहंशी आपण स्वतः गप्प राहून इतरांचे बोलणे ऐकायचे. प्रश्न विचारायचे तेही मिताक्षरीच. समोरच्या व्यक्तीच्या नजरेस नजर भिडवून, स्थिर दृष्टीने पाहाण्याची त्यांची सवय. कित्येकदा तोंडाने प्रश्न न विचारता भेटायला आलेल्या माणसाकडे नुसते टक लावून बघत बसत. नजर वेधक व स्थिर. त्यामुळे त्यांच्यासमोर थापा मारलेल्या चालत नसत. जे काही असेल ते स्पष्ट सांगावेच लागे. कोर्टातही साक्षीदाराची उलट तपासणी करत असताना त्यांच्या अशा वर्तनाने साक्षीदाराची भंबेरी उडत असे. आपण बोलणे चालू ठेवलेले वल्लभभाईंना पसंत आहे की नाही याची कल्पना मुलाखतीला आलेल्या व्यक्तीला त्यांच्या अशा वागण्यावरून यायची. समोरच्या व्यक्तींचे मोजमाप करण्यात ते कुशल होते. त्यामुळे भेटीला आलेला माणूस जरूरीपेक्षा अधिक वेळ घ्यायला धजायचाच नाही. कामापुरतेच बोलून निघून जाणे त्याला भाग पडे.

वल्लभभाई बोलायचे कमी पण ऐकायचे सर्वांचे. मुलाखतीला आलेल्या व्यक्तीच्या बोलण्याची अथपासून इतिपर्यंत संपूर्ण नोंद ते मनातल्या मनात करीत; काहीही सुटावयाचे नाही. बोलणे ऐकता ऐकताच मिळालेल्या माहितीची छाननी व अनावश्यक बाबींची छाटणी मनात चालू असायची. निसटलेले दुवे जुळवले जायचे. एकटे असले की खोलीत फेऱ्या घालत. वडील झवेरभाई यांच्याकडून त्यांना एक टीपॉय वारशात मिळाले होते. त्या टीपॉयभोवती गोल फेऱ्या मारणे चालू असायचे. विशेषतः एखाद्या गंभीर बाबीचा विचार मनात घोळत असला की हे फेऱ्या मारणे जोरात चालू व्हायचे. त्यांच्या अशा फेऱ्या चालू असताना त्यांच्या खोलीत क्वचितच कोणी प्रवेश करायला धजे. खुद्द त्यांची कन्या मणिबेनसुद्धा अशा वेळी त्या खोलीत जायची नाही. वडिलांच्या स्वभावातील खाचाखोचांचे मणिबेनना पूर्ण ज्ञान होते. म्हणून त्या ‘बापूं'च्या (वडिलांना त्या 'बापू' म्हणत) कामात कधीही व्यत्यय आणीत नसत. विक्षेप पडणाऱ्याच्या डोळ्याला डोळा लावून वल्लभभाई पाहात. त्यांच्या नजरेची जरबच अशी होती की त्या नजरेचा एकदा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला पुन्हा कधी त्यांच्या कामात व्यत्यय आणण्याचे धारिष्ट्य होत नसे.

लहानपणापासूनच स्वावलंबनाचे व स्वतःचे निर्णय स्वतः करण्याचे धडे त्यांना मिळाले होते. मोठेपणीही हाच उपक्रम चालू राहिला. प्रश्न अहमदाबादच्या नगरपालिकेचा किंवा सत्याग्रहाचा असो की देशी राज्यांच्या विलीनीकरणाचा, हाती घेतलेले काम पुरे केल्याशिवाय सोडायचे नाही व हाती घेतलेले काम संपूर्ण निष्ठेने करायचे. काम करताना स्वतःच्या सोयीचा विचार करायचा नाही, स्वतःच्या कामाचा भार दुसऱ्यावर टाकायचा नाही, इतरांच्या सहकार्याने करायच्या कामाशी संबंधित सर्वांवर विश्वास टाकायचा, दुसऱ्याचे मत शांतपणे ऐकून घ्यायचे, काम तडीला जाईपर्यंत परिश्रम करीत राहायचे आणि काम पुरे झाल्यावर त्याचे श्रेय घ्यायचे नाही, इतरांच्या बरोबर केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना द्यायचे व अपयशाचे खापर स्वतःच्या माथी फोडून घ्यावयाचे, कामाच्या बाबतीत निर्णय घेताना त्या कामाच्या संदर्भातली आवश्यक माहिती मिळवून मगच, पण तरीही त्वरित निर्णय घ्यायचा, घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत चालढकल करायची नाही, असा वल्लभभाईंचा बाणा होता.

वकिली करत होते त्या काळात खूप धन कमावले. पण महात्मा गांधींच्या मार्गाकडे वळल्यावर भरभराटीत चाललेला आपला व्यवसायही वल्लभभाईंनी सोडला. सुटाबुटांचा त्याग केला. ऐश्वर्याला तिलांजली दिली व फकिरीबाणा पत्करला. बापूंचे (गांधीजींचे) अनुयायित्व पत्करल्यावर वल्लभभाईंच्या जीवनाचे ध्येय निश्चित बनले. जीवनात परिग्रहाला स्थान द्यायचे नाही. जरुरीपेक्षा अधिक वस्तू जवळ बाळगायच्या नाहीत. ज्या गोष्टीसाठी आपण परिश्रम घेतले नाहीत तिच्यावर हक्क सांगायचा नाही. जीवनात संयमाचे पालन करायचे व प्रामाणिकपणे वागायचे. शक्य तेवढे इतरांच्या उपयोगी पडायचे व केलेल्या मदतीचा डांगोरा पिटायचा नाही. आपत्कालात चित्ताचे स्थैर्य ढळू द्यायचे नाही. इतरांच्यावर आलेल्या संकटाचे वेळी स्वतःला मदत कार्यात झोकून द्यायचे; कोणत्याही भिडेला बळी पडायचे नाही, अन्याय कधीही सहन करायचा नाही, जरूर पडल्यास एकट्याने, कोणाच्याही मदतीशिवाय अन्यायाचा प्रतिकार करायचा. कुणाला बरं वाटावं म्हणून त्याची खुशामत करायची नाही व सत्य बेधडकपणे बोलायचे. वल्लभभाईंच्या ठिकाणी या सर्व गुणांचा समुच्चय झाला होता.

गुजरातच्या सार्वजनिक जीवनाच्या उभारणीत अहमदाबाद शहर नगरपालिकेचा महत्वाचा वाटा होता. नागरिकांना पदोपदी खुपणारी व पायदळी तुडवणारी सरकारी नियंत्रणे आणि नोकरशाही यांच्या विळख्यातून अहमदाबाद नगरपालिकेला सोडवून तिला राष्ट्रीय संग्राम व जनसेवा यांचे हत्यार बनवणारे वल्लभभाई आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कोणत्या शब्दांत करावे? सत्तेची किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न बाळगता स्वतःच्या व्यक्तिगत सुखसोयींचा त्याग करणाऱ्या वल्लभभाईंच्या व्यक्तित्वाचे वर्णन करणारे एखादे लेबल पाश्चात्य मानसशास्त्रात कोठे सापडेल काय?

वर्षातून एखाद्या वेळीच भरणाऱ्या गुजरात सभेचे जनसंघटनेत रूपांतर करणाऱ्या वल्लभभाईंच्या भूमिकेचे योग्य चित्रण अद्याप झालेले नाही. गुजरात सभेचे पहिले राजकीय अधिवेशन 1917 साली गोध्रा येथे महात्मा गांधींच्या उपस्थितीत भरले. 1921 साली पाचवे अधिवेशन भडोच येथे भरले. त्याच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते. 7 वे आणि अखेरचे अधिवेशन 1923 मध्ये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले. पहिल्या राजकीय परिषदेपासून 7 व्या अधिवेशनापर्यंतची सर्व अधिवेशने यशस्वी करण्यासाठी वल्लभभाईंनी केलेल्या कामगिरीची माहिती अद्याप पुरेशी उजेडात आलेली नाही. 1920 च्या नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात प्रांतिक समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला व 1923 नंतर गुजरात सभेचे स्थान गुजरात प्रांतिक काँग्रेसने घेतले.

वल्लभभाई क्रमाक्रमाने त्यांच्या वकिलीच्या मर्यादित कोशातून बाहेर पडत गेले व त्याच क्रमाने त्यांच्या कार्याचा विस्तार होत गेला. त्यांचे व्यक्तित्व जितके अंतर्मुख होते तितकेच त्यांचे कार्य जाहीर स्वरूपाचे होते. सार्वजनिक काम जसजसे वाढत गेले तसतसा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या वर्तुळाचा विस्तार पण वाढत गेला. आणि तरीही, समुदायात असतानाही अलिप्त राहाण्याचा त्यांच्या स्वभावातील पैलू त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिला. सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे, इतरांचे विचार जाणून घ्यावेत, हाती घेतलेल्या कामगिरीच्या संदर्भात विषयाचा सर्व तपशील जाणून घ्यावा, ती कामगिरी पार पाडण्यासाठी कशी व्यूहरचना करावी हे ठरवताना सर्व संबंधितांना त्या निर्णयाच्या प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे आणि तरीही कामगिरी पूर्ण झाल्यावर तिच्या यशाचे माप इतरांच्या पदरी घालून स्वतः बाजूस सरावे अशी त्यांची वृत्ती होती.

काही माणसे स्वभावतःच एकांतप्रिय असतात. एकट्याने राहाण्याच्या त्यांच्या सवयीचा अर्थ त्यांचा इतरांवर अविश्वास असतो असा करता येणार नाही. स्वतः होऊन दरबार भरवून न बसण्याचा अर्थ लोकाभिमुखता कमी असाही करता येणार नाही. सामान्य जनांपासून फटकून राहाण्याचा शिष्टपणा असाही त्याचा अर्थ नाही. भावनांचे प्रदर्शन ते करीत नसत पण त्यांचे मन मायाळू होते. अहमदाबाद नगरपालिकेच्या त्यांच्या कार्यामागे असणाऱ्या जनसामान्यांच्या विषयी त्यांना वाटणाऱ्या अनुकंपेचे मोजमाप आपण कसे करू शकणार? रोगांची साथ आली असताना आणि अतिवृष्टीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता दुःखितांचे अश्रू पुसायला जाणाऱ्या वल्लभभाईंना मानसशास्त्राच्या कोणत्या चौकटीत बसवावे? रेल्वे कामगार, अहमदाबाद शहरातील टपाल वाटप करणारे पोस्टमन, शेतकरी आणि 'बहारवाटिये' (दरवडेखोर) यांच्या हितासाठी ते लढले नसते तर नसते का चालले?

मजूर आणि अंत्यज, दुबळे आणि आदिवासी यांच्या साहाय्याला धावून जाणाऱ्या वल्लभभाईंच्या मानसिक जडणघडणीची चिकित्सा कशी करणार? बंद न्हाणीघराच्या अभावी खाटेच्या आडोशाला राहून स्नान करणाऱ्या गरीब भगिनींना लज्जारक्षणासाठी पक्की स्नानगृहे बांधून देणाऱ्या ते जागतिक युद्धामुळे झालेल्या भाववाढीविरुद्ध गरिबांना मदत करण्यासाठी स्वस्त धान्याची दुकाने काढणाऱ्या, डोक्यावर मैला वाहणाऱ्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या, म्युनिसिपालिटीच्या शाळांतील शिक्षकांच्या कल्याणाची व्यवस्था करणाऱ्या, कुंभार आणि रविवारच्या बाजारात बसून पोटापुरते कमावणाऱ्या गरीब 'व्यापाऱ्यां' वर कराचा बोजा लादणाऱ्या नगरपालिकेची भ्रष्ट बुद्धी ताळ्यावर आणणाऱ्या, स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात अनेक बिकट समस्यांचा सामना करण्यात गुंतलेले असतानाही निराश्रितांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायला जाणाऱ्या, छिन्न भिन्न होऊ घातलेल्या देशाला स्थिरतेच्या मार्गावर आणून सोडणाऱ्या, स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर असलेल्या देशाच्या वाट्याला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात नव्या भारतीय सरकारबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या, देश सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भत्ते व त्यांचे निवृत्तिवेतन यांची व्यवस्था करणाऱ्या, ज्यांची राज्ये काढून घेतली अशा संस्थानिकांच्या मनातही नवोदित भारताबद्दल अक्षय विश्वासाचे सिंचन सरदार वल्लभभाई पटेलांच्या व्य्क्तीमत्वाचे चित्रण कोणत्या शब्दांत करावे? 1946 ते 1950 या झंजावाती वर्षांच्या काळातील सरदारांची कामगिरी व त्या कामातील वज्रशक्ती आणि हृदयातील कणव यांचे मोजमाप करायला शब्द अपुरे पडतात.   

अंगीकारलेले ध्येय सिद्ध करण्याची तत्परता, ते ध्येय सिद्ध करीत असताना दाखवलेली निष्ठा व कर्तव्यपरायणता, बेतलेल्या असामान्य परिस्थितीतही चित्त स्थिर ठेवण्याची विवेकबुद्धी, कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हारणे, प्रलोभनांना बळी न पडणे, तत्त्वांच्या बाबतीत कोठेही तडजोड न करणे, स्वतःचे साथी व विरोध करणारे या सर्वांशीच सौजन्यपूर्ण व्यवहार ठेवणे, कोणत्याही परिस्थितीत त्वरित निर्णय घेणे आणि अनंत अडचणी आल्या तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, सतत प्रवृत्तिशील व जागरूक राहाणे, या पार्थिव व मायावी जगात अनासक्त राहाणे- सरदार पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अशा अनेक पैलूंची अनेक उदाहरणे देता येतील. त्यांनी देशासाठी खूप केले, आणि तरीही स्वतः एकाकी व अकिंचनच राहिले.

Tags: Gandhi Subhashchandra Bose Freedom Prince Bismark Vallabhbhai Patel Congress freedom मणिबेन वकिली अहमदाबाद गुजरात गांधी स्वातंत्र्य चळवळ काँग्रेस सरदार पटेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी