11 जून हा पू. साने गुरुजींचा स्मृतिदिन, साने गुरुजींच्या निधनानंतर श्री. नानासाहेब गोरे यांनी लिहिलेला हा अविस्मरणीय लेख 'नारायणीय' या ग्रंथामध्ये प्रसिद्ध होत आहे. येथे तो उद्धृत करीत आहोत.
बिऱ्हाडाच्या दारात मी जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा तेव्हा माझे डोळे तुमच्या त्या तसबिरीवर क्षणमात्र तरी विसावतातच. खोली मध्ये दारासमोरच्या भिंतीवर तुमचे ते मध्यम आकाराचे छायाचित्र टांगलेले आहे. कोणत्या फोटोग्राफरने ते छाया चित्रण केलेले आहे, मला ठाऊक नाही. पण निःसंशय त्याने क्षण अगदी योग्य साधला आहे. ते तुमच्या पार्थिव देहाचे चित्रण आहे, असे वाटतच नाही. फोटोमध्ये तुमच्या अंगात सदरा आहे, डोक्यावर टोपी आहे. पण जगात वावरताना जिवाला देहाचा आश्रय करावा लागतो आणि देहाला वस्त्रप्रवरणांचा आश्रय करावा लागतो, म्हणूनच तो सदरा व ती टोपी छायाचित्रात दिसत आहेत. नाही तर ते छायाचित्र आहे तुमच्या मनाचे, नव्हे तुमच्या अंत: करणाचे. डोळे टिपता टिपता हसणाऱ्या आणि हसता हसता डोळे टिपणाऱ्या तुमच्या मनाचे. अर्ध्या फुललेल्या, अर्ध्या घामाळलेल्या तुमच्या अंतःकरणाचे.
कधी कधी बिऱ्हाडातले सगळे मित्र बाहेर गेले आणि बिऱ्हाडात मी एकटाच उरलो की मी तुमच्या त्या चित्राकडे पहात बसतो. मुंबईसारख्या उद्योगनगरीतली दुपारची शांतता ही एक मजेदार आणि सुखकारक गोष्ट आहे, नाही? रात्रीच्या शांततेहून ऐन दुपारची शांतता हा एक वेगळाच अनुभव आहे. त्या वेळी सगळे काही डोळयांना स्पष्ट दिसत असते. आणि तरीही ते कसे स्वप्नवत वाटत असते. दुधात साखर मिसळावी किंवा त्याहीपेक्षा अधिक समर्पक उपमा द्यावयाची तर नदीच्या निर्मळ प्रवाहात दुपारचे ऊन विरघळावे त्याप्रमाणे शहराचा प्रचंड कोलाहल अखंड वाहणाऱ्या काल- प्रवाहात बेमालूमपणे मिसळून ही शांतता निर्माण झालेली असते. त्यामुळेच की काय, तिला एक प्रकारची मुखरता प्राप्त होते.
ऐन दुपारच्या वेळी नदीच्या प्रवाहात बुडी मारली म्हणजे तळाशी बसलेल्या दगड-शिंपल आपल्या डोळ्यांना दिसतात; प्रवाहाचा मंद आणि सनातन षड्जध्वनी ऐकू येतो. आणि नागडया अंगाला सगळीकडून पाण्याचा थंड पण उबदार असा स्पर्शही जाणवत असतो. तसाच अनुभव मला दुपारच्या शांत वेळी येतो. म्हणून दुपारची ही उबदार प्रकाशमय आणि मुखर शांतता मला प्रिय वाटते. डोळ्यांवर पेंगेची फुलपाखरे अलगद उतरलेली असतात, आणि वास्तव जगाचे बंध जरा जरा मोकळे करून मन अंतराळात पोहु लागलेले असते. जाणीव आणि विस्मृती यांचे शुभ्र आणि श्यामल प्रवाह एकमेकाला खेटून वाहत असतात. त्यांचा एक मजेचा गोफ विणला जात असतो. इहलोकाच्या सीमा ओलांडून केव्हाच पलीकडे गेलेल्या सुहृदांना परत बोलावून त्यांच्याशी निभ्रांतपणे गप्पा माराव्याशा जर वाटत असतील तर सत्य आणि स्वप्न यांच्या सीमा रेषेवर मन रेंगाळत असतानाच्या या वेळेसारखी दुसरी वेळ मिळणार नाही. जाणिवेच्या जाहनवीचे आणि विस्मृतीच्या कालिन्दीचे मिसळत असलेले पण अद्यापि एकजीव न झालेले प्रवाह कौतुकाने पाहत असता या वाळवंटावरून मी कधी कधी तुम्हाला साद घालतो...
हीच वेळ तुमच्याशी बोलत बसण्याची. वर आकाशामध्ये तारे कुडकुडत असताना रात्रीच्या काळोखातून तुम्ही जर माझ्याजवळ आलात तर मी तुमच्याशी बोलण्याच्या मनःस्थितीत तरी राहीन की नाही कोण जाणे! माझ्या संवेदनशक्ती कदाचित तुमच्या दर्शनाने थिजून जातील. पण अशा दुपारच्या वेळी जर तुम्ही आलात तर माझे संज्ञाप्रवाह विजणार नाहीत. उलट झुळूझुळू वाहू लागतील. मनाशी मी म्हणेन की, वर्षाऋतूच्या आरंभी दूर देशी गेलेला हा सान पक्षी आज किती तरी दिवसांनी आपल्या कोटरात परत आला आहे! होय हे तुमचेच घरटे आहे. 'यत्र विश्व भवत्येकनीडम्' अशा वृत्तीने तुम्ही जगाकडे पाहिलेत, ते तरी या घरट्यात बसूनच ना? दिवस-मास या घरट्याची एक एक काडी जरी गळून पडत आहे तरी हे तुमचेच घरटे म्हणून जग त्याला आज ओळखते आहे आणि शेवटपर्यंत ओळखील, ती पाहा दाराजवळ उन्हाची तिरपी चौकट उमटलेली आहे- जिच्यापाशी बसून तुमचे अखंड लेखन चालू असे आणि उंबरठ्यापलीकडचा तो कट्टा येथून स्पष्ट दिसतो आहे. पाण्यावर बसून तुम्ही सायंकाळच्या छायांकडे तासन् तास पाहत राहत असा.
पहा, जमूना-जान्हवीचा भुरा प्रवाह आता चांगलाच श्यामल झाला असून त्याच्या उदरातून पूर्व घटनांचे कळे वर येऊ लागलेले आहेत. 1931 साली मी प्रथम तुम्हाला पनवेलीस पाहिले तेव्हा पासूनच्या गेल्या अठरा वर्षातल्या तुमच्या अनेक मूर्ती माझ्या डोळयांसमोर आकार घेत आहेत आणि विरून जात आहेत. तुमच्या बाह्य स्वरूपात या कालखंडामध्ये जरी फरक पडत गेला असला तरी तुमच्या मूळ प्रकृतीत फरक पडल्याचे मला कधी आढळले नाही. ते मौन, ते देह जाळीत राहिलेले दुखः, ती सदा व्यथित दृष्टी आणि नवीन पकडून आणलेला हरणाचा बछडा जरा कूठे खुट्ट झाले, जरा वारा निराळा आला तरी असा चमकतो, बावरून जातो, तसे तुमचे ते वागणे-कोणत्या हिरव्या रानात निश्चित मनाने चरत असताना तुम्हाला कोणी फासे टाकून पकडले आणि आमच्या या दुनियेत आणून सोडले! म्हणूनच का तुम्ही सदैव कोठला तरी कानोसा घेत असल्याप्रमाणे वागत असा?
पण तुमची ती वृत्ती पाहून मला तुमचा केव्हा केव्हा मनापासून राग येत असे. मी म्हणे. तुम्हाला किती सूक्ष्म, तरल आणि संवेदनक्षम मन प्राप्त झालेले आहे! सृष्टीमधल्या नानाविध वस्तू, नानाविध भावना, नानाविध संबंध निरीक्षण त्यांचे रसग्रहण करण्यासाठी बुद्धीची विशेष प्रकारची पात्रता ज्याप्रमाणे हवी असते, त्याचप्रमाणे त्या रसग्रहणाला शब्दाकार करण्यासाठी वाणीचीही विशेष प्रकारची पात्रता हवी असते. या दोन्ही पात्रता एकाच व्यक्तीच्या ठिकाणी क्वचित दिसून येतात पण त्या ज्या वेळी एकत्र असतात त्या वेळी महाकवीची सामग्री तयार झाली असे मानावयास हरकत नाही. अशी खरोखर दुर्मिळ, दस लाखांतून एखाद्याला मिळणारी सामग्री तुमच्या ठिकाणी जमून आलेली होती पण त्यातून महाकाव्य जम्मास येऊ शकले नाही, याचे कारण काय? तुमच्या मनाला ऐहिकापलीकडची लागलेली ओढ, हेच तर याचे कारण नसेल? हे ऐहिक आपले नव्हे. इतकेच केवळ तुम्हाला वाटत नव्हते. तर या ऐहिका मधल्या एकूण एक व्यापारांना दोषाचा मळ चिकटला आहे, असे वाटून तुमचे मन अगदी विटून, उबगून जाई शेवटी तर या उद्वीग्नतेचा कहरच झालेला आम्ही पाहिला.
मी असे विचारतो की, या जगतामध्ये असे काय आहे की, ज्यासाठी मनुष्याने सदैव खंतच करीत राहावे? या जगामध्ये प्रकाश आहे त्याचबरोबर अंधारही आहे. फुलांसमवेत काटे आहेत आणि सज्जनांप्रमाणे दुर्जनही आहेत ही गोष्ट खरी, पण म्हणून आपले सगळे जीवन संघर्षमय करून टाकण्याची काही आवश्यकता आहे काय? 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही तुकारामाची उक्ती मला रुचत नाही, पटत नाही. रात्रंदिवस युद्ध कोणाशी? कशा करिता? रात्रंदिवस यूद्ध ही कल्पनाच किती भयंकर नाही का? रात्रंदिवस युद्ध याचा अर्थ असा की, तेथे उसंत नाही. त्यात वगळावगळ नाही, त्यात क्षमा नाही. राजकारणामधला एकसत्तावादाचा पुरस्कर्ता ज्याप्रमाणे सारे व्यवहार, साऱ्या प्रवृत्ती, साऱ्या भावना, सारी साधने एका ध्येयाच्या सिद्धीसाठीच वापरतो त्याच जातीची ही तुम्हा ध्येयवाद्यांची आणि ब्रम्हवाद्यांचीही वृत्ती नव्हे काय? एक गोष्ट मी मान्य करतो ती ही की, ब्रम्ह्वाद्याची समरभुमी म्हणजे त्याचे स्वत:चे मनच असते. कदाचित तिची व्याप्ती त्याच्या आप्तेष्टांपर्यंत किंवा कुटुंबापर्यंत असेल; पण त्यापलीकडे तो कोणाशी सहसा झगडत नसल्या कारणाने राजकीय एकसत्तावाद्यांसारखा तो सर्व विरोधी भावनांचा व व्यक्तींचा काळ बनत नाही. पण तरीही त्याच्या संघर्षातील उग्रता कमी समजण्याचे कारण नाही.
या अखंड युद्धामध्ये इंद्रिये आणि आत्मा हे परस्परविरोधी पक्ष मानले गेल्या कारणाने इंद्रियजन्य अथवा इंद्रीवद्वारा प्राप्त होणाऱ्या सुखद अथवा दुःखद अनुभवांना तुमच्यासारख्यांच्या जीवनामध्ये योग्य स्थान तरी कोठून मिळणार? स्पर्श, रुची, गंध आदिकरून संवेदनामध्ये खरोखर किती प्रकार आहेत? वाईट आणि चांगले एवढे दोनच प्रकार यामध्ये असतात असे नव्हे, स्पर्श म्हटला की मऊ अथवा खरबरीत, थंड अथवा उष्ण इतकेच भेद त्यामध्ये नसतात. एका मऊपणात किती किती प्रकार आणि त्यात पुन्हा किती प्रती लावता येतील. फुलाच्या पाकळीचा मऊपणा निराळा, शहामृगाच्या पिसाचा मऊपणा निराळा, समुद्राच्या वाळूचा मऊपणा निराळा, बालकाच्या देहाचा मऊपणा निराळा आणि युवतीच्या अवयवांचा मऊपणा निराळा. जी गोष्ट स्पर्शसंवेदनाची तीच रुचीसंवेदनेची. कडू अथवा गोड एवढेच भेद रुचीमध्ये नाहीत. तिच्यात अनंत भेद आहेत. कटूतेत गोडी आणि गोडीत कटूता येथपर्यंत ते भेद पाडता येतात. ज्या विषयाची रुची चाखावयाची त्याच्या अंगच्या रुचीतील भेदामुळे प्रकार निर्माण होतील हे तर काहीच नव्हे. रुची घेणाऱ्यातील म्हणजे भोक्त्यांतील भेदानुसार रुचीमध्ये प्रकार मानावे लागतात. अपत्याचे चुंबन घेणारी आई आणि रमणीचे अधरपान करणारा प्रियकर यांच्या आस्वादाचा विषय जरी ओठ हाच असला आणि दोघांच्याही आस्वादाचे माध्यम जरी चुंबन हेच असले तरी ह्या दोन चुंबनाची रुची फार वेगळी आहे हे सांगण्याची गरज नाही. स्वर आणि शब्द यांच्या संवेदनाबद्दलही असेच म्हणता येईल आणि या संवेदनांचे जसजसे मिश्रण होत जाईल, तसतसे तर त्यांच्यामध्ये इतके स्वाद- वैचित्र्य निर्माण होत जाते की पुसता सोय नाही.
पण तुमच्यासारख्यांना मनाच्या या स्वाद क्षमतेची भीतीच वाटत असावी, त्यामुळे तुमची मने स्वादपराड्मुख बनत जातात. किंवा कोठल्यातरी एकाच स्वादाची भक्त बनतात. अस्तित्वाचे रसग्रहण करतानासुद्धा तुम्हाला त्यातले वैचित्र्य उपभोगता येत नाही. कारण तुम्हाला मानवामानवांमधला जण एकच भावबन्ध मान असतो, तो भावबन्ध म्हणजे प्रेमाचा; आणि प्रेमामधलीसुद्धा एकच छटा मान्य होते, तो म्हणजे वात्सल्याची. तुमच्या मनाच्या या एकारलेल्या घटनांमुळे असे झाले की, तुमच्या वाड्मयातील साऱ्या पात्रांवर व प्रसंगावर एकाच रंगाची डूब चढली, वाङ्मयाला महत्ता प्राप्त होण्यासाठी सृष्टीमधल्या अपार वैचित्र्याचे प्रतिबिंब जे त्यामध्ये उतरावयास हवे तेच नेमके उतरले नाही. लांबी, रुंदी व उंची या त्रिप्रमाणामुळे वस्तूला ज्याप्रमाणे सघनत्व प्राप्त होते, त्याप्रमाणे वास्तवता, वैविध्य व आशय या त्रिप्रमाणामुळे वाङ्मयाला घनत्व प्राप्त होते, पण तुमच्या सर्व कृतींना ही तिन्ही प्रमाणे प्राप्त होण्या- ऐवजी त्यांना तुमच्या मनातील आशयाचे एकमेव प्रमाण प्राप्त होत गेले आणि तुमच्या कृतींना प्रचाराचा म्हणजे सगळ्यांमध्ये एकच रस पाहण्याच्या व सगळयांना एकाच वृत्तीचे बनविण्याच्या प्रयत्नांचा वास लागून त्या कृतींत न्यून निर्माण झाले.
आपल्या ठिकाणचे मोठयातले मोठे असे जे लेखणीचे व वाणीचे सामर्थ्य ते निष्परिणामी ठरत आहे हे पाहून तुम्ही अधिकच कष्टी झालात काय? पण तुम्हाला जर मानवी जगाचा कंटाळा आलेला होता तर तुमच्या मनाला एवढी खंत का वाटावी? जे कटू आहे ते न का होईना मिष्ट? जे वक्र आहे ते न का होईना सरळ? जे दुष्ट आहे ते न का होईना सुष्ट? आपण आपल्याकडून प्रयत्न करावयाचा तो केलात ना? करीत होतात ना? मग ‘फले स्पृहा' कशा- करिता होती? आपल्या शक्तीतली एक एक समिधा जीवनयज्ञात तुम्ही टाकीत होता यात शंका नाही. पण तो समर्पण करीत असताना मनाला जी अविचल स्थिरता व निरामय आनंद प्राप्त व्हावयास हवा, तो का बरे तुम्हाला मिळाला नाही? इद्रियांच्या द्वारा ऐहिक जगाचा उपभोगही तुम्ही घेतला नाही आणि इंद्रियदमन करून ऐहिक जगाची सेवा करताना खऱ्या निवृत्ताला साजेशी ‘माफलेषु'ची भूमिकाही तुम्हांला साधली नाही. त्यामुळे तुमच्या मनाची तगमग होत राहिली, कर्तव्ययज्ञ चालू राहिला; पण अखेरपर्यंत प्रसन्नतेचे पायस तुम्हांला लाभलेले नाही.
साधकांच्या आयुष्यातील ट्रॅजेडी यातच आहे. तुमच्यासारखे जे साधक आहेत, त्यांना आमच्यासारख्या जडांचे समाधान तर मिळत नाहीच. कारण तुमच्या संवेदना अती सूक्ष्म, नाजूक आणि चोखंदळ असतात, पण त्या संवेदनांमुळे मनात उठणारे कल्लोळ प्रसन्न दृष्टीने पाहता यावे यासाठी जी बैठक साध्य करून घ्यावी लागते, तीही तुम्हाला प्राप्त झालेली नसते, रोकडचा व्यवहारवाद्यांसारखेही तुम्ही वागत नाही, स्थितप्रज्ञाप्रमाणे संपूर्णतया समर्पण बुद्धीनेही नाही. मार्गावरचे काटे दूर करता करता तुमचे हात रक्तबंबाळ झाले, पण काटे सरत ना आणि तुमच्याने थांबणे होई ना...
पण एवढी ही तळमळ तुमच्या देहपाताबरोबर शमली असेल असे कबूल करण्यास माझे मन तयार होत नाही. पणती फुटली दिवा विझला हा न्याय तुमच्यासारख्याच्या बाबतीत मान्य करणे मला जड वाटू लागले आहे. तेल संपले म्हणून विझतात ते दिवे निराळे आणि फुंकर मारून जे घालविण्यात येतात ते दिवे निराळे! अशा बळेच विझलेल्या शक्तींचे अवशेष कोठेतरी राहात असावेत... राहतील तर बरे असे मनाला वाटते. एवढी गोष्ट खरी. त्यामुळेच तुमचे ते छायाचित्र पाहिले आणि अशी निवांत वेळ मिळाली की तुम्हाला बोलावून घेण्याचा मोह मनाला पडतो. असे वाटते की, तुमच्या ओठावरचे ते रडवेले हसू जरा अधिक प्रकट व्हावे आणि आईच्या हातासारख्या तुमच्या त्या खरखरीत मऊ हातांनी माझा हात एक वेळ तरी पुन्हा दाबला जावा......
Tags: दुपार मुंबई छायाचित्र नारायणीय ना. ग. गोरे साने गुरुजी स्मृतिदिन बिऱ्हाड dupar mumbai chayachitra narayaniy nag a gore sane gurui smrutidin birhad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या