डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

त्या छळाबद्दल निवेदन करणं आवश्यक वाटलं...

रा. शं. दातार नाट्य पुरस्कार :  समाजस्वास्थ्य

त्या वेळी आजूबाजूची जी परिस्थिती होती, दाभोलकरांच्या खुनानंतर वातावरण महाराष्ट्रात झालं होतं, ज्या गोष्टी घडत होत्या; त्यांचाही प्रभाव त्या वेळी आमच्या मनांवर होता. म्हणून वाटलं की, र.धों.कर्व्यांवरच्या कोर्ट-केसेसभोवतीच नाटक का उभं करू नये? एका बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला या समाजामध्ये ज्या प्रकारच्या छळाला बळी पडावं लागतं, त्या छळाबद्दल आपण आपलं निवेदन मांडणं आज आवश्यक आहे, असं वाटलं. त्या वेळी आजूबाजूची परिस्थितीही अशी काही होती की, माझं हे वाटणं वरचेवर जास्त तीव्र होत गेलं. आणि मग मी लिहिलं. माझ्या लिखाणाचा सगळा फोकस त्या कोर्ट-केसेसवर राहिला. एका माणसाविरुद्ध तीन-तीन केसेस लादल्या जातात आणि माणूस मेल्यानंतरही चौथी केस लादण्याची लोकांची तयारी असते, हे फार भयानक होतं!

सुमारे ९६ वर्षांपूर्वी, जेव्हा स्त्री-पुरुष संबंध आणि संततिनियमन या गोष्टींचा साधा उच्चारही समाजात निषिद्ध मानला जात असे, त्या काळात रघुनाथ धोंडो कर्वे या मराठी समाजसुधारकानं लैंगिक शिक्षणाचा पुरस्कार करून समाजात संततिनियमनाचा प्रचार-प्रसार करण्याचं ध्येय अंगीकारलेलं होतं. स्वत:च्या पत्नी मालतीबाई यांना सोबत घेऊन त्यांनी १९२१ मध्ये पुण्यात एक संततिनियमन केंद्र सुरू केलं. ब्रह्मचर्य, लैंगिकता, विवाहित स्त्रीपुरुषांची मानसिकता लैंगिक संबंधांविषयीचं अज्ञान, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि नैतिकता या साऱ्या गोष्टींबद्दल अत्यंत स्पष्ट व बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेऊन त्यांनी या साऱ्या विषयांबद्दल जनजागृतीचं मोठं काम सुरू केलं. त्यांवर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, भरपूर लेखनही केलं. आणि संततिनियमनाची साधनंही विक्रीला ठेवली.  नंतर १९२७ मध्ये त्यांनी समाजस्वास्थ्य नावाचं एक मासिक सुरू केलं आणि त्या काळातल्या कर्मठ, धर्मवादी लोकांचा कडवा विरोध पत्करून ते निष्ठेनं चालवलं. त्या काळात वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टरही वृत्तीनं परंपरावादी आणि सनातनी होते. त्यांचाही कर्व्यांना विरोध होता. अशी एकूणच, र.धों.कर्व्यांना त्या काळच्या समाजाकडून पराकोटीची अवहेलना सहन करावी लागली, घोर आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं आणि पुढे चालून आपली नोकरीही गमवावी लागली. ते ज्या-ज्या गोष्टींचा प्रचार करीत, त्या गोष्टींना अश्लील आणि समाजविरोधी मानून त्यांच्याविरुद्ध कोर्टांत खटले भरले गेले. पण तरीही त्यांनी स्वत:चं काम निष्ठापूर्वक सुरूच ठेवलं. त्या कामाचाच एक भाग म्हणून त्यांनी लोकशिक्षणासाठी आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, वेश्याव्यवसाय, गुप्तरोगांपासून बचाव, संततिनियमन अशा विषयांवर पुस्तकं लिहिली. तत्कालीन सनातनी वृत्तीच्या लोकांमध्ये त्यामुळे खळबळ माजली. त्या लोकांच्या दबावामुळे अश्लीलतेच्या आरोपाखाली र.धों.कर्व्यांवर तीन कोर्ट- खटले भरले गेले. समाजसुधारणेसाठी निष्ठेनं काम करीत, येणाऱ्या आपत्तींशी एकाकीपणे झुंजणाऱ्या र.धों. कर्व्यांना ज्या कायदेशीर लढ्यांना सामोरं जावं लागलं होतं, त्यांतील दोन खटल्यांच्या आधारे नाटककार प्रा.अजित दळवी यांनी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचं एक प्रत्ययकारी नाटक लिहिलं आहे. सर्जनशील दिग्दर्शक अतुल पेठे यांनी ते नाटक रंगमंचावर सादर केलेलं आहे.

प्रश्न - र.धों.कर्व्यांवर लादलेल्या कायदेशीर खटल्यांच्या अनुषंगाने तुम्ही ‘समाजस्वास्थ्य’ हे नवं नाटक लिहिलेलं आहे. आजच्या काळात त्यांच्याबद्दलचं हे नाटक लिहिण्यामागे तुमची भूमिका काय होती?

- रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याबद्दल मी आधी वाचलेलं होतंच. पण अमोल पालेकरांनी जेव्हा ‘ध्यासपर्व’ हा चित्रपट करायला घेतला, तेव्हा कर्वे मला जास्त चांगले कळाले. तेव्हा र.धों.कर्व्यांविषयीची माहिती तर बऱ्यापैकी मिळाली होतीच, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मोठं आकर्षणही वाटलं होतं. एक बुद्धिप्रामाण्यवादी माणूस स्वत:च्या तत्त्वांसाठी इतका टोकाला जाऊ शकतो याचं आश्चर्य मला वाटलं होतं. ध्यासपर्व या चित्रपटाचा मुख्य भर र.धों.कर्व्यांच्या संततिनियमनाच्या कामावर होता त्यांच्या विवेकवादावर फारसा नव्हता. पण कर्व्यांचा विवेकवादही लोकांसमोर केव्हा तरी मांडला गेला पाहिजे, ही गोष्ट माझ्या मनात रुजून राहिलेली होती. त्या काळात डॉ.श्रीराम लागूंनीही मला विचारलं होतं की, ‘तुम्ही र.धों.कर्व्यांवर नाटक लिहून द्याल का?’ म्हणून. जयंत पवारही मला एकदा म्हणाले होते की, कर्व्यांवर नीट लिहिलं गेलं पाहिजे. त्यामुळे तो विचार मनात पुन:पुन्हा येत राहिला. त्याकाळी य.दि.फडक्यांनी त्यांच्यावर लिहिलेलं एक अतिशय वस्तुनिष्ठ असं पुस्तक होतं. नंतर अनंत देशमुखांनी र.धों.कर्व्यांचे सगळेच खंड पुन्हा प्रकाशित केले. ती एक बहुमोल खाणच जणू माझ्या हाती लागली. ते खंड वाचनात आले आणि त्यांतून असं लक्षात आलं की, र.धों.कर्व्यांच्या अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपण लिहायला पाहिजे. आणि तेव्हा मी लिहायला सुरुवात केली. पुण्याला ‘सुदर्शन’ नावाचा जो नाटकाचा मंच आहे, त्यातल्या आमच्या काही रंगकर्मी मित्रांनी त्याच सुमारास र.धों. कर्व्यांच्या लिखाणातले निवडक वेचे लोकांना नुसते वाचून दाखवायला सुरुवात केली होती आणि ते लोकांना आवडत होतं- नवं काहीतरी ऐकल्याचं समाधान त्यांना मिळत होतं. त्याच काळात इकडे मी र.धों. कर्व्यांवरच एक नाटक लिहीत होतो. त्या नाटकात सगळा भर त्यांच्या विवेकवादावर होता. त्या नाटकात एक कोर्ट-सीन होता, पण ते नाटक त्या कोर्ट-सीनभोवती नव्हतं. ते नाटक मी अतुल पेठेला वाचायला दिलं, त्याला ते नाटक आवडलं आणि त्यानं ते बसवायचं ठरवलं. पण पुण्यात आणि इतरत्र आम्ही त्या नाटकाचं पुन:पुन्हा वाचन केलं, तेव्हा असं वाटायला लागलं की, त्यात आणखी काही गोष्टी यायला हव्यात. त्या वेळी आजूबाजूची जी परिस्थिती होती, दाभोलकरांच्या खुनानंतर जे वातावरण महाराष्ट्रात झालं होतं, ज्या गोष्टी घडत होत्या; त्यांचाही प्रभाव त्या वेळी आमच्या मनांवर होता. म्हणून वाटलं की, र.धों.कर्व्यांवरच्या कोर्ट-केसेसभोवतीच नाटक का उभं करू नये? एका बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला या समाजामध्ये ज्या प्रकारच्या छळाला बळी पडावं लागतं, त्या छळाबद्दल आपण आपलं निवेदन मांडणं आज आवश्यक आहे, असं वाटलं. त्या वेळी आजूबाजूची परिस्थितीही अशी काही होती की, माझं हे वाटणं वरचेवर जास्त तीव्र होत गेलं. आणि मग मी लिहिलं. माझ्या लिखाणाचा सगळा फोकस त्या कोर्ट-केसेसवर राहिला. एका माणसाविरुद्ध तीन-तीन केसेस लादल्या जातात आणि तो माणूस मेल्यानंतरही चौथी केस लादण्याची लोकांची तयारी असते, हे फार भयानक होतं! कर्व्यांवरची पहिली केस निदान समाजस्वास्थ्यमधल्या व्यभिचाराचा प्रश्न या लेखावर होती. पण दुसरी केस मासिकातल्या सेक्सविषयक प्रश्नोत्तरांवर केली गेली. आणि तिसरी केस तर मासिकात आलेल्या जाहिरातीतल्या एका शब्दावर केलेली होती. त्यांतल्या एका केसमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी र.धों.कर्व्यांचं वकीलपत्र घेतलं होतं. र.धों.कर्व्यांचे वकील म्हणून बाबासाहेब त्यांच्या बाजूनं कोर्टात तर उभे राहिलेच, पण पुढे चालून त्यांनी मुंबईच्या विधी मंडळात संततिनियमनाचं बिनसरकारी विधेयकही मांडायला लावलं होतं. त्या केसच्या आधी र.धों.कर्व्यांची बाबासाहेबांबरोबर झालेली चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. ती या नाटकात मी समाविष्ट करू शकलो याचं मला समाधान आहे. कर्व्यांवरच्या सगळ्या केसेस समाजातील सनातनी मंडळींच्या सांगण्यावरून तत्कालीन सरकारनं, म्हणजे राज्यसंस्थेनं दाखल केलेल्या होत्या. त्या काळी समाजात सनातनी लोकांचं प्राबल्य होतं. सनातन्यांना विरोध केल्यानं समाजात अशांतता माजून कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून राज्यसंस्था नेहमी सनातन्यांच्या दबावाखाली असे. कर्व्यांविरुद्धच्या केसेस कुणा व्यक्तीनं नव्हे, तर सरकारनंच भरलेल्या होत्या, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडे किती किरकोळ कारणांसाठी एका विवेकवादी माणसाला मोठा छळ सहन करावा लागतो, याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणूनच हे नाटक या छळाबद्दलचं असावं, असं आम्हाला वाटलं.

प्रश्न - या नाटकात इतर कोर्टरूम-नाट्यांप्रमाणे खटकेबाज संवाद, नाट्यमय दृश्यं किंवा एकदम कलाटणी घेणारे प्रसंग नाहीत आणि तरीही नाटकाचा प्रयोग परिणामकारक होतो. हे कसं काय साधता आलं?

- कसं आहे... हे एक चरित्रनाट्य आहे. त्यामुळे कथानायकाच्या आयुष्यात जे काही जसं काही घडलं, तसंच लिहावं लागतं. ही चरित्रनाट्याची मर्यादाही आहे. आणि त्याची शक्तीही आहे. कथानायक गांधी असोत वा कर्वे असोत- तुम्ही त्यांच्या जीवनाबद्दल वाचायला लागता, तेव्हा तुम्हाला जे काही सुचत जाईल ते महत्त्वाचं असतं. त्याला धरून लिखाण जेवढं परिणामकारक करता येईल तेवढं आंपण करीतच असतो. पण ते बाजूला ठेवून नाट्यपूर्ण असं काही तरी लिहिणं योग्य नव्हे, असं मला आता वाटतं. समाजस्वास्थ्यबद्दल असं म्हणता येईल की र. धों.कर्व्यांची जी अनेक विधानं आहेत, तीही प्रेक्षकांना धरून ठेवणारी आहेत. त्यांच्या काही विधानांचा मी आधार घेतलेला आहे, तर काही विधानं जशीच्या तशी मांडली आहेत. उदाहरणार्थ- न्यायाधीशांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कर्वे म्हणतात की, ‘काम हा धर्माचा एक प्रतिस्पर्धी आहे. एरवी धर्माचा तुमच्यावर खूप पगडा असतो. पण कामप्रेरणा इतकी प्रबळ असते की, ती धर्माज्ञा उल्लंघण्याचं बळ माणसाला देते.’ आज असं विधान तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. तेव्हा नाटकात फार नाट्यपूर्ण असे प्रसंग जरी नसले, तरी अशी विधानं आणि ही सारी चर्चाच मुळात प्रेक्षकांना धरून ठेवणारी आहे, असं मला वाटतं.

प्रश्न - अतुल पेठे हे अलीकडच्या काळातल्या मोजक्या प्रयोगशील दिग्दर्शकांपैकी एक आहेत. समाजस्वास्थ्यच्या त्यांच्या या सादरीकरणात नाटकाची दृश्यमानता आणि आशय या गोष्टी परिणामकारक करणारी कोणती वैशिष्ट्यं तुम्हाला जाणवली?

- त्यांच्या सादरीकरणाची बरीच वैशिष्ट्यं सांगता येतील. त्यांतलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, रंगमंचावरच्या जागांचा सूचक वापर. उदाहरणार्थ- या नाटकात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असणाऱ्या र.धों.कर्व्यांना न्यायाधीश प्रश्न विचारत असतात, तेव्हा विल्सन कॉलेजमधील प्रसंग सांगितला जातो. कॉलेजचे प्राचार्य कर्व्यांना बोलावून राजीनामा द्यायला सांगतात, असा तो प्रसंग स्टेजवर प्रत्यक्ष दाखवलेला आहे. आणि त्याही वेळेला अतुल पेठेंनी कर्व्यांना त्या पिंजऱ्यातच उभं केलेलं आहे. प्राचार्य बाहेरून येतात, त्यांच्याशी बोलतात आणि निघून जातात. हा सारा वेळ कर्वे पिंजऱ्यातच उभे दाखवलेले आहेत. म्हणजे कर्व्यांचं सगळं आयुष्यच कसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं असल्यासारखं गेलं, हे त्यातून सूचित झालेलं आहे. नंतर अतुल पेठेंनी नाटकाचा काही भाग एडिट करून र.धों.कर्व्यांपासून सुरू होणारं हे नाटक वैश्विक स्तरापर्यंत नेण्याचा चांगला प्रयत्न केलाय. पहिल्या केसपासून दुसऱ्या केसमध्ये जाईपर्यंत त्या खटल्याच्या सीनमधून एकेक गोष्ट वजा होत गेलेली दाखवली आहे. म्हणजे हळूहळू त्यातून न्यायाधीश, वकील, उलटतपासणी या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. मग तिसऱ्या केसमध्ये तर अवघ्या स्टेजवर अगदी समोर आणून ठेवलेला फक्त पिंजरा आहे आणि पिंजऱ्यात आरोपी म्हणून उभे असणारे र.धों.कर्वे एकटेच. त्यांचं जे काही म्हणणं आहे, ते लोकांसमोर ठेवतायत, असं दृश्य पेठेंनी उभं केलेलं आहे. त्यामुळे हे नाटक र.धों.कर्व्यांपर्यंत मर्यादित राहत नाही. समाजाकडून आरोपीच्या पिंजऱ्यात डांबल्या गेलेल्या अशा किती तरी लोकांपर्यंत हे नाटक जातं.

प्रश्न - गेल्या पिढीतले परिवर्तनवादी विचारांचे पत्रकार म.य.ऊर्फ बाबा दळवी हे तुमचे वडील होते. त्यांच्याशी तुमचा संवाद नेहमीच होत असे. १९७० च्या सुमारास कुमार सप्तर्षींच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या युवक क्रांतिदलाशी तुम्ही संबंधित होता. त्यानंतरच्या काळात मराठवाड्यात झालेलं दलित शिष्यवृत्ती वाढीचं आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतराची चळवळ, मराठवाडा विकास आंदोलन या चळवळींशीही तुम्ही जोडलेले होतात. या साऱ्या संघटनांच्या विचारांचा आणि चळवळींच्या मूल्यांचा कितपत प्रभाव तुमच्या लिखाणावर आहे?

- खूप मोठा प्रभाव आहे. तो एक प्रकारे लिखाणाचा पाया आहे, असं म्हणता येईल. आमचे बाबा हे मोठे पत्रकार होते, हे खरंच आहे. पण आम्हाला ते एखाद्या मित्रासारखे होते. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट असे माझे सगळे मित्र हे त्यांचेही मित्र होत असत. माझे औरंगाबादचे मित्र घरी आले की, बाबा त्यांच्या खांद्यावर हात टाकून फिरायला निघायचे. आमच्यामध्ये खूप छान असं मोकळेपण होतं. आम्हाला कधी त्यांची धास्ती वाटत नसे. नंतर जेव्हा पत्रकारिता सोडून ते पूर्णपणे सामाजिक चळवळींकडे वळले, तेव्हाही आम्हा मुलांच्या नाट्यलेखनात आणि सुनांच्या अभिनयकौशल्यात त्यांना रस असे, त्याचा आनंद ते घेत असत. बाकी, तो सारा काळ एक प्रकारे भारलेला असा होता. १९६७ मध्ये फ्रान्समध्ये झालेली लोकआंदोलनं, त्यानंतर बिहारमध्ये झालेलं संपूर्ण क्रांती आंदोलन, तत्कालीन गुजरातमध्ये झालेलं जनआंदोलन यांचा प्रभाव आमच्यावर होता. तुम्ही उल्लेखलेल्या मराठवाड्यातल्या सगळ्या आंदोलनांत तर आपण सारेच तरुण सहभागी  होतो. त्या काळी मी आणि डॉक्टर भालचंद्र कांगो असे दोघे जण औरंगाबादेत कुठेही गेलो की भोवती गर्दी जमत असे. त्या काळी कुमार सप्तर्षींनी इथे महिनाभर एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्यांवर वर्ग चालवले होते. गुलमंडीच्या रस्त्यावर उभे राहून ते बोलत आणि भोवती तुफान गर्दी जमलेली असे. त्या काळी ते पाहायला विजय तेंडुलकर स्वत: औरंगाबादेस आले होते. तेंडुलकरांचा व्यक्ती म्हणून माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्या वेळी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या घराघरांतून तेंडुलकरांना मी घेऊन गेलो होतो. व्यक्तिप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, किंवा धर्मप्रामाण्य न मानता स्वत:च्या बुद्धीला प्रमाण मानून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याची एक पद्धत युक्रांदनं आम्हाला दिली. त्यामुळे समाजातल्या कोणत्याही मोठ्या माणसाची किंवा समाजवादी अगर काँग्रेसच्या नेत्याची व्यक्तिपूजा आम्ही कधीच केली नाही. आणि याचा पुरेपूर फायदा माझ्यातल्या लेखकाला झाला. त्यामुळे लेखक म्हणून असणाऱ्या माझ्या अवकाशाला मर्यादा पडल्या नाहीत. मी अमुक विषयावर बोलणार नाही, तमुक विषयावर लिहिणार नाही, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली नाही. सर्व विषय माझ्यासाठी खुले होते.

प्रश्न - सत्तरच्या दशकापासून तुम्ही औरंगाबादेतील हौशी रंगभूमीशी जोडले गेला होतात. सुरुवातीला दिशांतर आणि नाट्यरंग या हौशी संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेऊन छोट्या-मोठ्या भूमिका करीत होता. पुढे तुम्ही स्वत:च परिवर्तन नावाची एक संस्था काढलीत आणि वेगळ्या धाटणीची नाटकं लिहून हौशी रंगभूमीवर सादर केलीत. त्या काळच्या हौशी रंगभूमीमध्ये आणि आजच्या हौशी मराठी रंगभूमीविषयी थोडे सांगता?

- माझ्या वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत- म्हणजे सुरुवातीचा माझा युक्रांदचा काळ असो किंवा प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो तो काळ, किंवा नंतरचा आणीबाणीचा काळ असो; तेव्हा मी काही स्वत:ला लेखक म्हणून गांभीर्यानं घेतलंच नव्हतं. लहानपणापासून बालरंगभूमी वगैरेंशी संबंध आल्यामुळे नाटकाची आवड होती. गार्बोसारखं नाटक पाहायला मुंबईला जाणं किंवा घाशीराम कोतवाल पाहायला मुद्दाम पुण्याला जाणं, हे मी करत होतो. त्यामुळे तेव्हा युक्रांदचं काम करायचं, नोकरी करायची आणि मग वर्षातून एखाद्या नाटकात काम करायचं, असा काहीसा क्रम असे. त्या काळी आपण सगळेच समांतर मानले गेलेले चित्रपट पाहायचो, मग त्यांवर बोलायचो, बसस्टँडसमोरच्या मॉडर्न हॉटेलात बसून चर्चा करायचो. त्याच वेळी काही जण आपापली आत्मचरित्रंही लिहीत होते. अशा सर्जनाच्या लाटा सभोवताली असायच्या. त्यांत नाटकही असायचं. पण नाटक हे पुढे चालून माझं संपूर्ण जीवन व्यापून टाकेल, असं काही मला वाटलं नव्हतं. पण पुढे जेव्हा आणीबाणी जाहीर झाली, माझे बरेचसे मित्र तुरुंगात गेले आणि आपणा सर्वांनाच एका मोठ्या कोंडीला सामोरं जावं लागलं; तेव्हा मी माझं ‘मुक्तिधाम’ हे पहिलं नाटक लिहिलं. मुळात ती मी लिहिलेली एक कविता होती. तेव्हाच्या मराठवाडा दैनिकात ती प्रसिद्ध झाली होती. कालचा जो तुरुंग, त्यास आता मुक्तिधाम म्हणायचं- म्हणजे नुसतं लेबल बदलायचं, असा तिचा सारांश होता. अर्थात मी काही कवी नव्हतो. आणि कथा किंवा कादंबरी या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक मला जवळचं वाटत असे. म्हणून मग त्या कवितेचं मी नाटकात रूपांतर केलं. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणारं नाटक म्हणून ते गाजलं. आणि त्यानंतर मी नाट्यलेखनाकडे वळलो. एक तर सामूहिक कलेकडे माझा ओढा जास्त होता. एकट्यानं विचार करून काही करण्याऐवजी सगळे एकत्र येऊन काही तरी निर्माण करण्याची उर्मी माझ्या अंगी होती. कदाचित हा चळवळींचाही परिणाम असेल. आणि पुढे आणीबाणीनंतर जेव्हा चळवळी थंड झाल्या आणि केंद्रात जनता सरकार आलं. त्यानंतर परिवर्तन ही संस्था आम्ही काढली, तेव्हा संस्थेकडे लेखक-दिग्दर्शक दोन्हीही नव्हते. त्यामुळे लिहिण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. त्यानंतर मी ‘आपल्या बापाचं काय जातं?’ हे नाटक लिहिलं. त्यात संगीत नाटकापासून घाशीरामपर्यंतचे सगळे फॉर्म्स वापरून आजच्या स्थितीवर भाष्य केलेलं होतं. या नाटकानं तर तेव्हा मोठी धमाल उडवली होती. हे नाटक वाचून सतीश आळेकरांनी आणि तेंडुलकरांनी नाटककार कार्यशाळेसाठी ते निवडलं. त्यानंतर मग शतखंड हे नाटक मी लिहिलं. शतखंडच्या नाट्यवाचनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार, श्रीराम लागू यांसारखे मातब्बर लोक त्या वेळी हजर होते. वाचन संपल्या-संपल्या लागूंनी जाहीर केलं की, हे नाटक ते स्वत: सादर करणार आहेत. त्यानंतर मी नाट्यलेखन गांभीर्यानं घेण्यास सुरुवात केली. मग तेच माझ्या आयुष्याचा मुख्य भाग बनलं. त्यानंतर मग संघर्ष, देहधून, बलरामाचं गाणं ही नाटकं लिहिली गेली. डॉ.लागू असं म्हणत की, नाटक हे काही फक्त मनोरंजनाचं किंवा समाजप्रबोधनाचं साधन नाही, ते नाट्यमय अनुभव इतरांशी शेअर करण्याचं माध्यम आहे. मलाही असं वाटतं. आणि एका चर्चेत मी तसं बोललोही आहे की, संगीत हे माणसाला शांत करतं, तर नाटक हे त्याला अस्वस्थ करत असतं. आणि म्हणून, माझ्या अस्वस्थतेत इतरांना सामील करून घेण्यासाठी मी नाटक लिहितो. माझा लिहिण्याचा उद्देशच तो असतो.

प्रश्न - मराठी व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा निखळ मनोरंजनप्रधान नाटकं होत असत, त्याच काळात शतखंड, डॉक्टर तुम्हीसुद्धा, गांधी विरुद्ध गांधी ही तुमची विचारप्रधान नाटकं आली. ‘समाजस्वास्थ्या ’प्रमाणेच त्या सर्व नाटकांतून कथानकांच्या अंगाने जाणारी एक तर्कशुद्ध विवेकवादी भूमिका मांडलेली दिसते. आज वाढता भौतिक विकास, माहिती-तंत्रज्ञानातील वाढ आणि चंगळवादी जीवनशैलीचा हव्यास यांमुळे विवेकवादाची पीछेहाट होते आहे, असे तुम्हाला वाटते का?

- साधारणत: १९९० चा तो काळ असेल. त्या वेळी फक्त माझीच नव्हे, तर अनेक लोकांची विचारप्रधान नाटकं रंगभूमीवर आली होती. त्यात त्या नवनाटककार कार्यशाळेतलेही लेखक होते. उदाहरणार्थ- प्रेमानंद गज्वींचं ‘घोटभर पाणी’ हे नाटक होतं, शफाअत खानचं ‘शोभायात्रा’ हे नाटक होतं, जयंत पवारचं ‘अधांतर’ होतं, संजय पवारचं ‘कोण म्हणतंय टक्का दिला’ होतं आणि प्रशांत दळवीचं ‘चारचौघी’, आणि माझं ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ ही नाटकं त्यात होती. तेव्हा अनेक लोक नव्या प्रकारचं नाटक लिहीत होते आणि प्रथमच असं दिसलं की, मराठी प्रेक्षकही ते बघत होता. माझं ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ हे चंद्रकांत कुलकर्णीदिग्दर्शित नाटक महेश मांजरेकरांनी रंगभूमीवर आणलं; तेव्हा आधी वाटलं होतं की, थोडे प्रयोग करून बघू. कारण प्रेक्षक असं नाटक स्वीकारतील का, हे माहीत नव्हतं. पण मला वाटत होतं की, ते खूप लोकांपर्यंत जाईल. आणि नंतर खरोखरच असं दिसलं की, प्रेक्षक ते नाटक बघायला उत्सुक असत. ते महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे प्रेक्षक उत्सुक नसते, तर ‘गांधी विरुद्ध गांधी’ या गंभीर नाटकाचेही इतके प्रयोग होऊच शकले नसते. त्या नाटकात अनेक छोटे-छोटे प्रवेश होते. आणि प्रत्येक प्रवेशानंतर अंधार होत असे. तेव्हा नाटक पाहिल्यानंतर महेश एलकुंचवार मला म्हणाले की, प्रवेशांमधल्या अंधारांमुळे मला सावरायला वेळ मिळत होता. नाही तर मला त्रास झाला असता ते नाटक बघून. म्हणजे त्या काळात अशी वैचारिक नाटकंसुद्धा प्रेक्षकांनी स्वीकारली होती, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कलाकारांनीसुद्धा ती नाटकं आवर्जून केली. शफाअत खानचं ‘शोभायात्रा’ हे नाटक कलाकारांनी एक पैसाही न घेता केलं. सयाजी शिंदे, किशोर कदम, नंदू माधव हे आज रंगभूमीवर मोठे असणारे सगळे नट त्यात होते. हे नाटक व्हायला पाहिजे, या जिद्दीनं त्यांनी कामं केलेली होती. म्हणजे त्या काळी  प्रेक्षक तर अशी नाटकं बघायला आलेच, पण कलाकारही अशी नाटकं करायला पुढे आले, हा नवा विचार समजून घेणारे दिग्दर्शकही या नाटकांना मिळाले आणि अशी नाटकं लिहिण्याची ऊर्मी बाळगणारे लेखकही तयार झाले. असा तो काळ होता. तो काळ आता पुन्हा निर्माण करणं हे आपल्या हातात नसतं. आजच्या काळात थोडं मिश्र स्वरूपाचं चित्र दिसतंय, असं मला वाटतं. आता विवेकवादाला धोका कशाचा आहे? तर, आज आधुनिक तंत्रज्ञान किंवा भौतिकता यांचा नव्हे, तर चंगळवादाचा मात्र फार मोठा धोका विवेकवादाला आहे असं मला वाटतं.

प्रश्न - आता नवं एखादं नाटक लिहिताय का? किंवा ज्याच्यावर लिहावं, असा एखादा विषय डोक्यात आहे का?

- असे विषय नेहमीच असतात आणि अनेक बीजं असतात. पण म्हणून लिहिलं जातंच असं नाही. मी नेहमी माझी पत्नी अनुया, भाऊ प्रशांत, चंदू (चंद्रकांत कुलकर्णी), माझी मुलं यांच्याशी बोलतो. काय महत्त्वाचं आहे, काय नाही, कशावर लिहावं- हे चर्चेतून ठरवतो. आणि मग लिहिण्यासाठी कोणता विषय निवडायचा, हे नक्की करतो. त्यामुळे माझ्या नाट्यलेखनात खूप दिवसांचं अंतर पडलेलं असतं. अलीकडे मला आपण पोस्ट-ट्रुथ संकल्पनेविषयी लिहावं, असं वाटतंय. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि निरनिराळी संवाद-माध्यमं (सोशल मीडिया) यांत सत्याचा अपलाप करून किंवा वस्तुनिष्ठता बाजूला सारून काल्पनिक गोष्टींवर आधारित सिद्धांत पुढे रेटण्याची जी धडपड सुरू असलेली दिसते,त्याबद्दल काही लिहावं असं मला वाटतंय. पण केव्हा लिहीन, हे आज सांगता येत नाही.

संवादक : विजय दिवाण

Tags: अतुल पेठे र. धों. कर्वे नाटक समाजस्वास्थ्य मुलाखत विजय दिवाण अजित दळवी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१७ atul pethe. r. dhon. karve r. d. karve theater natak samajswasthya interview mulakhat vijay diwan ajit dalavi ra shan datar natya puraskar Maharashtra foundation awards 2017 Maharashtra foundation purskar 2017 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अजित दळवी,  औरंगाबाद

राज्यशास्त्राचे प्राध्यापक, नाटककार व पटकथालेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात