डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘ऋतुचक्र’ नव्याने लिहिण्याची आवश्यकता

आज कोणती तिथी आहे, हे हजारातल्या नऊशे नव्याण्णव लोकांना सांगता येणार नाही. इतकेच काय, सध्या कोणता भारतीय महिना चालू आहे, मार्गशीर्ष की पौष की माघ- हेही पुष्कळांना माहीत नसते. व्यवहारात आपण इंग्रजी महिने स्वीकारले आहेत ना? झालं तर मग! त्या-त्या (इंग्रजी) महिन्यात आपण घराबाहेर पडलो की, अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहायला मिळतात याकडे मला वाचकांचे लक्ष वेधायचे आहे, बस्स. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे माझे जास्त लक्ष आहे. दुर्गाबाई त्या-त्या महिन्यातील पक्ष्यांचे प्रणयाराधन आणि विणीचा वगैरे काळ टिपतात, हा माझा विषय नाही. जमिनीवर घडणारे ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे’ एवढेच मला अभिप्रेत आहे.

दुर्गा भागवत यांचे ‘ऋतुचक्र’ हे ललित लेखांचे पुस्तक 1956 मध्ये प्रसिद्ध झाले. वर्षातून नियमित अनुक्रमाने येणारे आणि वेगवेगळ्या परंतु ठरावीक जलवायुमानाचे कालावधी म्हणजे ऋतू. भारतीय महिन्यांप्रमाणे (चैत्र, वैशाख) बारा महिन्यांची छोटी-छोटी बारा प्रकरणे करून, त्यांना काव्यात्म शीर्षके देऊन, प्रत्येक महिन्यात निसर्गात कोणती मधुर परिवर्तने घडतात यांचे मनोज्ञ दर्शन आपल्या खास भावपूर्ण शैलीत दुर्गा भागवत ‘ऋतुचक्र’मध्ये घडवतात. या पुस्तकाद्वरा लघुनिबंध या गुळमुळीत आणि तंत्रबद्ध झालेल्या वाङ्‌मयप्रकाराचे, ललित-गद्य या चैतन्यमय वाङ्‌मय- प्रकारात होऊ पाहणारे परिवर्तन इतिहास घडवणारे ठरले. (दुर्गा भागवतांच्या बरोबरीने गो.वि. करंदीकर, इरावती कर्वे आदी नवलेखकांनी ही क्रांती पूर्णत्वाला नेली.) तेव्हापासून ‘ऋतुचक्र’ हे पुस्तक ‘साहित्याचे मापदंड’ ठरले. त्याच्याविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हिंमत आजपावेतो कोणी केली नाही.

तशी ती करण्याचा माझाही मुळीच इरादा नाही. पण जरा विचार करा- पासष्ट वर्षांपूर्वी, आजारी अवस्थेत तरीही झपाटल्यासारखे घडून गेलेले हे लेखन आहे. दुर्गाबाई शेवटी एक माणूसच आहेत ना? त्यांच्या निसर्गनिरीक्षणाला त्यांच्या म्हणून काही मर्यादा असू शकतात, हे तत्त्वत: मान्य करायला काय हरकत आहे? भारतीय महिन्यांनुसार ऋतू बदलत नाहीत, तर इंग्रजी (जानेवारी, फेब्रुवारी) महिन्यांनुसार बदलतात- ही मुख्य मर्यादा आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात उत्तर भारतातील ऋतूंचे आगमन दक्षिण भारतातील ऋतूंपेक्षा एक ते दीड महिना उशिरा होते, हे दुर्गाबार्इंच्या लेखनात येत नाही. प्राचीन संस्कृत साहित्य बहुतांशी उत्तर भारतात लिहिलं गेलं आहे. कालिदासाचं ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’ ही दोन काव्ये जरी विचारात घेतली, तरी त्यांत वर्णिलेली उत्तर भारतातील भौगोलिक परिस्थिती व तिकडचे हवामान दक्षिण भारतातील राज्यांपेक्षा खूपच भिन्न असल्याचे लक्षात येईल. जुन्या काळात नववधूला नेसवले जाणारे लाल रंगाचे वस्त्र हे पळसाच्या फुलांच्या रंगांमध्ये रंगवलेले असायचे. ज्या वेळी पळसाला फुले येतात तोच काळ तिकडे लग्नसराईचा असतो, म्हणजेच वसंत ऋतूचा असतो. तिकडे म्हणजे उत्तर भारतात वसंत ऋतू एप्रिलमध्ये येतो. तिकडचे आंबेदेखील आपल्यापेक्षा महिना-दोन महिने उशिरा बहरतात. त्यांना एप्रिलमध्ये मोहोर येतो.

खरे ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. ही वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. असे असताना दुर्गाबार्इंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले, हा मला पडलेला प्रश्न आहे. ऋतुचक्राचा चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी मेळ बसत नाही. सूर्यस्थितीवर ऋतू अवलंबून असल्याने ऋतूंचे प्रारंभ व भारतीय तिथी यांचाही संबंध नसतो. नक्षत्रविचार या शास्त्राची मला फार माहिती नाही, तरी तो सूर्यानुसार केला जातो म्हणून तो जास्त ‘शास्त्रीय’ असावा, असे वाटते. सूर्य ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो ते नक्षत्र मानतात. दर वर्षी 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून मृग नक्षत्र हे 7 जूनला लागते. होय ना? संक्रांत ही 14 जानेवारीलाच येते, याचेही भूगोलविज्ञान काहीसे असेच आहे. ‘नक्षत्रवृक्ष’ या विषयावरच्या सुंदर पुस्तकाचे लेखक सुभाष बडवे पुढील ऋतुचक्र मानतात: डिसेंबर व जानेवारी- शिशिर ऋतू, फेब्रुवारी व मार्च- वसंत ऋतू, एप्रिल व मे- ग्रीष्म ऋतू, जून व जुलै- वर्षा ऋतू, ऑगस्ट व सप्टेंबर- शरद ऋतू, ऑक्टोबर व नोव्हेंबर- हेमंत ऋतू. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री.द.महाजन यांत फक्त पंधरा दिवसांचा फरक करतात. म्हणजे त्यांच्या मते, वसंत ऋतू 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल असतो. ठीक आहे ना?

याविषयी फार चर्चा करण्यात रस नाही. आज कोणती तिथी आहे, हे हजारातल्या नऊशे नव्याण्णव लोकांना सांगता येणार नाही. इतकेच काय- सध्या कोणता भारतीय महिना चालू आहे, मार्गशीर्ष की पौष की माघ- हेही पुष्कळांना माहीत नसते. व्यवहारात आपण इंग्रजी महिने स्वीकारले आहेत ना? झालं तर मग! त्या-त्या (इंग्रजी) महिन्यात आपण घराबाहेर पडलो की, अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहायला मिळतात याकडे मला वाचकांचे लक्ष वेधायचे आहे- बस्स. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे माझे जास्त लक्ष आहे. दुर्गाबाई त्या-त्या महिन्यातील पक्ष्यांचे प्रणयाराधन आणि विणीचा वगैरे काळ टिपतात, हा माझा विषय नाही. जमिनीवर घडणारे ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे’ एवढेच मला अभिप्रेत आहे.

ऋतुचक्र हे माझे अत्यंत आवडते पुस्तक आहे. ते मी शंभर वेळा तरी वाचले असेल. अजूनही वाचतो. त्याचे खंडन करण्याचा उद्धटपणा माझ्यात नाही. दुर्गाबार्इंचा वारसा पुढे डॉ.शरदिनी डहाणूकर, मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आदी लेखकांनी समृद्धपणे आणि संपन्नतेने चालवला. मराठीतील सगळे निसर्गविषयक लेखन मी नुसते वाचलेच नाही, तर संग्रही ठेवले आहे. पण निसर्गनिरीक्षणात कळत-नकळत चूकही करायची आणि आपल्या पुस्तकात नोंदवूनही ठेवायची, हा प्रकार दुर्गाबार्इंसह अनेक लहानथोरांकडून होत आला आहे. महानांनी केलेल्या काही छोट्या-छोट्या चुका दुरुस्त करणे हे कामही मला नम्रपणे नव्या ‘ऋतुचक्रा’त करावयाचे आहे.

‘मधुमालती’ हे झाड ओळखण्यात अजूनही दुर्गाबार्इंसह सगळेच चूक करतात, डॉ.शरदिनी डहाणूकरांनी ती केली असल्याने ‘फुलवा’तला सगळा लेख रद्द ठरतो. जिला आपण सगळे मधुमालती म्हणतो, तिचं खरं नाव आहे बारमासी ऊर्फ रंगूनचा वेल. बारमासीच्या लांबट फुलांचे तुरे येतात आणि ते बहुधा उलटे लोंबतात. ही फुले सुरुवातीला पांढरी असतात, नंतर ती गुलाबी, भगव्या आणि शेवटी लालचुटुक रंगाची होतात. नावाचं सोडा- फुलं आणि हा वेल सुंदरच आहे, पण तो मधुमालती नाही. संस्कृत साहित्यात ज्याचं वर्णन आलंय, तो वेल खरा मधुमालतीचा असून त्याचे नाव माधवीलता असून कालिदासाने त्याला वसंतदूती म्हटलंय. त्याचे शास्त्रीय नाव Hiptage benghalensis (L) असे आहे. पुष्पा भारती यांच्या ‘पुष्पभारती’ नावाच्या सुंदर ग्रंथाचा मराठी अनुवाद झाला असून त्याला डॉ.जयवंतराव टिळक यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी पर्जन्य (रेन ट्री) यालाच शिरीष मानण्याची चूक केली आहे आणि धड माहिती नसणारे बहुतेक जण ही चूक करतात. शिरीष हे सुंदर, सुगंधी, कोमलतेची उपमा असणारे खास भारतीय झाड असून ‘पर्जन्य’ हा दीडशे वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतून इथे आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे नदीकाठी सगळी पर्जन्याचीच झाडे आहेत. पर्जन्याला सुगंध नसतो. ते एक घाणेरडे झाड कसे आहे, हे माझ्या ऋतुचक्रात येईलच. झाडाला ओळखण्यात, नावे देण्यात आपण अज्ञानातून अशा खूप चुका करतो. उदा. वॉटरलिलीच्या फुलाला कमळ समजून देवळाबाहेर ती विकायला ठेवलेली असतात. कमळाला खूप नावे आहेत, त्याचे तितकेच प्रकार आहेत;  पण वॉटरलिली काहीही झाले तरी ‘कमळ’ होऊ शकत नाही.

दसऱ्याला सोने म्हणून जी पानं विकतात, ती आपट्याची नाही ‘कांचन’ या वृक्षाची असतात. दसरा आला की, बिचाऱ्या कांचनाला अकाली घाम फुटतो; कारण त्याला ओरबाडायला आठही दिशांनी शहरी माणसे येतात. पुष्कळ मजेशीर गैरसमज आहेत. बदाम या नावाने ओळखले जाणारे झाड खोट्या बदामाचे आहे. आपण (खुराक म्हणून वगैरे) खातो ते बदाम आपल्या देशात पिकत नाहीत. खोट्या बदामाचे इंग्रजी नाव ‘ईस्ट इंडियन आल्मंड’ असे असून, त्याच्या फळांचा आकार बराचसा बदामासारखा असतो. तो मुळीच खाऊ नये! खरा बदाम इराण आणि उत्तर अमेरिकेतून आयात होतो. दुकानावर जाऊन त्याचे बी विकत घ्यावे आणि खावे. खोट्या बदामाला रस्त्यावरच पडू द्यावे (ही विनंती). दुर्गाबाई याच बदामाला खरा बदाम मानतात! आपण ज्याला अशोक म्हणतो आणि बागेत, कंपाउंड, वॉलजवळ लावतो ते उंच-सरळसोट वाढणारे अशोक हे खोटे अशोक आहेत. खऱ्या अशोकाला सीताअशोक म्हणतात. तो खास भारतीय वृक्ष असून, त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव सराका अशोका किंवा सराका इंडिका असे आहे. त्याउलट सर्वांना माहिती असणारा, मोठ्या प्रमाणात दिसणारा ‘आसुपालव’ हा खोटा अशोक किंवा मास्ट ट्री असून दुर्गा भागवत यांनी ऋतुचक्र पुस्तकात याही अशोकाचा असाच घोटाळा केला असल्याचे श्री.द.महाजनांनीदेखील मान्य केले आहे (विदेशी वृक्ष पृ.173). ‘कर्णिकार’ हे नक्की कोणते झाड यांचा मचळा (घोटाळा) मराठीतील प्रत्येक निसर्गलेखकाने केला आहे.

नव्या ऋतुचक्रात असे काही घोटाळे निस्तरायचे आहेत. देशी वृक्ष आणि विदेशी वृक्ष कोणते, हे केवळ नावावरून आपल्याला कळू शकत नाही. त्याने फार काही फरक पडत नाही म्हणा! पण सुंदर भारतीय नावे असणारे कैलासपती, बूच (आकाशमोगरा), गोरखचिंच, अनंत, गुलमोहोर, शंकासुर, हादगा, नीलमोहर, ऊर्वशी, भेंडीगुलाब, भद्राक्ष, गिरिपुष्प, कवठी चाफा, पांढरा चाफा, पर्जन्य, मोरपंखी ही भारतीय झाडे नसून त्यांचे मूळ विदेशी आहे, हे कळल्यावर आपल्याला धक्का बसतो. विदेशी झाडांचा विषय निघालाच आहे, तर नव्या ऋतुचक्रात आपल्याला त्यासंबंधी भूमिका घ्यावी लागणार आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ श्री.द.महाजन विदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लागवड करण्याच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते, परकीय वनस्पतींमुळे आपला पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो. आपली जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) कमी होऊ शकते. गाजर गवत, निलगिरी, कुबाभूळ किंवा वेडी बाभूळ या खरोखर उपद्रवी वनस्पती आहेत आणि त्यांची भरमसाट वाढ ही काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. परंतु सगळ्याच विदेशी झाडांना मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू शकत नाही. अनंत, चाफ्याचे सगळे प्रकार, गुलमोहोर, महोगनी, बूच, हादगा या विदेशी मित्रांवर माझे देशी बांधवांपेक्षा काकणभर अधिक प्रेम आहे. यात दोनशे- अडीचशे वर्षांपूर्वी आलेली काही झाडे आहेत. आपल्या मातीत ती वाढतातच ना? आपले कीटक आणि पक्षी त्यांचे परागसिंचन करून देतातच ना? त्यांच्या कित्येक पिढ्या इथे जन्मल्या, वाढल्या. त्यांना विदेशी तरी कोणत्या तोंडाने आणि का म्हणायचे? ‘नव्या ऋतुचक्रा’त त्यांचे स्वागत असेल.

मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर मी जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आठ वर्षांपूर्वी आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे, हे मला वाचून माहीत होते. इथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत. कदंब, अर्जुन, कांचन, चंदन, पांढरा शिरीष, सोनसावर ही मंडळी पुण्याची खासियत. जगभरातून आणलेली अनेक झाडे इथे लावली गेलीत. त्यात महोगनी, ऊर्वशी, सोनसावर यांसारखी माझी अत्यंत आवडती झाडं आहेत. पुण्यात श्री.द.महाजन आहेत. डॉ.वा.द.वर्तक, व्ही.जी.गोगटे इथे होऊन गेले. इथे एम्प्रेस गार्डन आहे, अनेक वनस्पतीउद्याने आहेत. ‘पुणे तिथे काय उणे’ हे वृक्षविविधतेच्या संदर्भात फारच लागू पडणारे आहे. या झाडांच्या संगतीने मी पुण्यात राहतो. पण माझे कोकणाचे आकर्षण काही कमी होत नाही. नागचाफा किंवा नागकेशर हे जगातलं सर्वांत सुंदर फूल कोकणातच असते ना! गोवा म्हणजे कोकणच? म्हणून पुष्पपरायण असणारा मी राहतो पुण्यात, पण माझा एक पाय असतो कोकणात. नव्या ‘ऋतुचक्रा’त मी तुम्हाला या सगळ्या झाडांना भेटवणार आहे. दुर्गा भागवतांचे ‘ऋतुचक्र’ साप्ताहिक साधनामधून क्रमश: प्रसिद्ध झाले होते ना, मीही तुम्हाला ‘साधना’तूनच भेटेन.

Tags: कोकण पुणे व्ही.जी.गोगटे डॉ.वा.द.वर्तक पुष्पा भारती व्यंकटेश माडगूळकर मारुती चित्तमपल्ली डॉ.शरदिनी डहाणूकर श्री.द.महाजन सुभाष बडवे नक्षत्रवृक्ष ऋतुसंहार मेघदूत कालिदास इरावती कर्वे गो.वि. करंदीकर ललित ऋतुचक्र दुर्गा भागवत विश्वास वसेकर 'ऋतुचक्र’ नव्याने लिहिण्याची आवश्यकता नवे ऋतुचक्र Hiptage benghalensis (L) V G Gogate Kokan V D Vartak Pune Pushpa Bharati Vyanktesh Madgulkar Maruti Chittampalli Shardini Dahanukar S D Mahajan Subhash Badave Nakshatravruksh Rutusanhar Meghdur Kalidas Iravati Karve G V Karndiakr Lalit Durga Bhagwar Vishwas Vasekar Nave Rutuchakra Rutuchakra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके