Diwali_4 कोणे एके काळी, एक देश/राष्ट्र...
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

कोणे एके काळी, एक देश/राष्ट्र...

येल विश्वविद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक जेसन स्टॅनली यांनी सध्या साऱ्या जगातच लोकशाहीची मोडतोड करणाऱ्या कडव्या विचारसरणींच्या उजव्यांकडेच लोकांचा कल कसा झुकला आहे, याचा अभ्यास केला आहे. त्यांना असे आढळले आहे की, याबाबत एक ठराविक रीत, फॉर्म्युला आहे; त्यायोगे लोकशाही मोडून टाकून तिच्या जागी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करण्यात येते. या वातावरणात पराकोटीचा द्वेष, हिंसाचार आणि गुन्हेगारी वर्तणूक मान्य करायला लोक तयार झालेले असतात. या हेतुपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या वातावरणात फॅसिझम अथवा त्या प्रकारची अन्य एखादी तत्त्वप्रणाली (कोणत्याही प्रकारचा विरोध न होता) लोकशाहीची जागा घेते. प्राध्यापक जेसन स्टॅन्ली यांना असे आढळले आहे की, जेथे जेथे लोकशाही ढासळली आहे, आणि मोडतोडीची प्रक्रिया सुरू आहे तेथे तेथे ही रीत दिसून येते.

अतिशय अटीतटीने लढवल्या गेलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, गदारोळाची धूळ आता खाली बसली आहे आणि हा लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे, असा गौरव होत आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या निकालाबाबत शांतपणे विचार करणे शक्य आहे. मात्र या निकालांमुळे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण मला हे केवळ अपेक्षित होते असे नाही तर, हेही उमगले होते की निवडणुकीचे निकाल अन्य कोणत्याच प्रकारे लागू शकत नाहीत. मला यासाठी साहित्याची मदत झाली आणि त्यामुळे त्याकडे एक अशी गोष्ट, जिचा अन्य कोणत्याही प्रकारे शेवट होऊ शकत नाही, या दृष्टीने पाहता येत होते.

गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ यांची मला आवडणारी एक कादंबरी आहे. तिचे नाव ‘द क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड’ (The Chronicle of a Death Foretold)- मरणाचे आधीच केलेले भाकीत. या कादंबरीच्या नावावरूनच कादंबरीचा शेवट काय होणार, हे वाचकांना अगोदरच ठाऊक झालेले असते. ही कादंबरी शेवटाकडून भूतकाळात जाते आणि मग ज्या मार्गाचा वापर करण्यात आला त्याबाबत आणि त्यामुळे हा शेवट अपरिहार्य कसा बनला हे सांगते.

2019 सालच्या निवडणुका अशाच प्रकारे चित्तवेधक आणि काळजीपूर्वक केलेल्या अभ्यासाचा भाग होत्या. त्यांची निष्पत्ती अन्य कोणत्याच प्रकारे होऊ शकली नसती, कारण हे साध्य करण्यासाठी जो मार्ग निश्चित करून पत्करण्यात आला होता, त्यामुळे अन्य काही होण्याची शक्यताच नव्हती. या निवडणुकांचा निकाल अगोदरच दिसण्यासाठी मला आणखी मदत झाली ती तत्त्वज्ञानाच्या एका प्राध्यापकाची.

येल विश्वविद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक जेसन स्टॅनली यांनी सध्या साऱ्या जगातच लोकशाहीची मोडतोड करणाऱ्या कडव्या विचारसरणींच्या उजव्यांकडेच लोकांचा कल कसा झुकला आहे, याचा अभ्यास केला आहे. त्यांना असे आढळले आहे की, याबाबत एक ठराविक रीत, फॉर्म्युला आहे; त्यायोगे लोकशाही मोडून टाकून तिच्या जागी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करण्यात येते. या वातावरणात पराकोटीचा द्वेष, हिंसाचार आणि गुन्हेगारी वर्तणूक मान्य करायला लोक तयार झालेले असतात. या हेतुपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या वातावरणात फॅसिझम अथवा त्या प्रकारची अन्य एखादी तत्त्वप्रणाली (कोणत्याही प्रकारचा विरोध न होता) लोकशाहीची जागा घेते. प्राध्यापक जेसन स्टॅन्ली यांना असे आढळले आहे की, जेथे जेथे लोकशाही ढासळली आहे, आणि मोडतोडीची प्रक्रिया सुरू आहे तेथे तेथे ही रीत दिसून येते. याबाबत त्यांनी हाऊ प्रॉपोगंडा वर्क्स आणि हाऊ फॅसिझम वर्क्स- (How Propaganda Works and How Fascism works) या दोन पुस्तकांमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे.

बहुसंख्याक लोकांपासूनच सुरुवात करू या. आधी सांगितलेल्या नव्या रीतीप्रमाणे, आपल्याला अल्पसंख्याकांचा धाक आहे आणि आपण अन्यायाचे बळी आहोत, अशी ठाम समजूत बहुसंख्यांक लोकांची करून देण्यात येते. एकदा का हे बी रुजले, की मग ज्यांनी हा अन्याय केला आहे, (अशी समजूत करून देण्यात आलेली असते) त्यांच्यावर सूड उगवण्याची भावना, एवढ्या तीव्रपणे पुढे येते की, ते एक प्रकारचे वेडच वाटावे. मग ‘ते’ म्हणजे बाहेरचे आणि ‘आम्ही’ म्हणजे बहुसंख्याकांचा धर्म आणि संस्कृती असे वर्गीकरण करण्यात येते. आणि तेच आपल्या, म्हणजेच बहुसंख्यांक प्रबळ समूहांचे हक्क आणि अधिकार यांच्यावर गदा आणत आहेत, अशी भावना निर्माण होते.

‘बाहेरचे’ या व्याख्येमध्ये समाजवादी, साम्यवादी व निरीश्वरवादी यांचा समावेश करण्यात आलेला असतो. त्या नागरिकांवर राष्ट्रविरोधी वा देशद्रोही असा शिक्का उमटवला जातो आणि ‘ते देशाचे शत्रू असल्यामुळे, त्यांच्यापासून सावध रहा,’ असा इशारा दिला जातो. वास्तव प्रतिपादनाला छेद देऊन लोकांच्या भावनांना आवाहन करून, त्या जाग्या करून भीतीचा प्रसार करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर पुढचे पाऊल टाकण्यात येते.

हे पुढचे पाऊल म्हणजे देशांतर्गत आणि देशाबाहेरील शत्रूपासून धोका निर्माण झाला आहे, देश धोक्यात आहे, असा सावधानतेचा इशारा बहुसंख्याकांना दिला जातो. या मुद्याची पुष्टी म्हणूनच कट-कारस्थानांच्या कहाण्या तयार केल्या जातात. ज्या नागरिकांवर राष्ट्रविरोधी असा शिक्का मारण्यात आलेला असतो, त्यांच्यावर ते राष्ट्रविरोधी कारस्थान करत असल्याचा आरोप केला जातो. (शत्रूपासून देशाचे संरक्षण केले जात आहे, यावरच सारा प्रकाशझोत ठेवलेला असतो.) ‘अशा वातावरणात आवश्यकता आहे, ती एका कणखर व आक्रमक नेत्याची आणि केवळ तोच देशाचे आणि जनतेचे रक्षण करू शकेल,’ असे सांगून त्या नेत्याचे दैवतीकरण केले जाते. लष्कराला मध्यवर्ती भूमिका मिळते आणि मग ते मानाने अशा नेत्याशेजारची जागा घेते आणि गौरवही करून घेते. वस्तुस्थितीचा लवलेशही नसलेल्या या ठिकाणी मग सत्य पूर्णपणे नाहीसे होते.

अस्तित्व टिकवण्यासाठी लोकशाही लढा देते आणि पराभूत होते. दीर्घकाळ जपलेली, मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य समता, बंधुभाव आणि मानवी हक्क ही मूल्ये निरुपयोगी- टाकाऊ म्हणून बाजूला फेकली जातात. त्यांची जागा अधिकार आणि श्रेणीबंधहाय रार्की- घेतात. हे श्रेणीबंध वांशिक, धार्मिक किंवा लिंगभेदावर आधारलेली असतात. विशिष्ट वंशीय गटाला आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांना श्रेष्ठ समजण्यात येऊन वरचे स्थान दिलेले असते. या सर्व प्रकारांमुळे व सत्य नाहीसे झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी मिथ्यकथांनी भरली जाते. वास्तवाची जागा परीकथा- कपोलकल्पित कथा घेतात.

स्टॅन्ली यांच्या शब्दांत सांगायचे तर, जे मिथक वास्तवाची जागा घेते, ते वैभवशाली गतकाळाचे असते. त्या काळात हा देश समजुतीप्रमाणे वांशिक अथवा धार्मिक दृष्टीने शुद्ध होता आणि त्यात ग्रामीण पितृसत्ताक मूल्येच राज्य करत होती. स्टॅन्ली यांनी केलेल्या या वर्णनामध्ये ‘आणि वांशिक दृष्ट्या शुद्ध’ अशी भर मी घालते. कारण ‘ही शुद्धता उजव्या अतिआक्रमक विचारसरणीत अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते आणि इतिहास असे दाखवतो की, या प्रकारचा प्रॉपोगंडा-प्रचार हा टोकाच्या हिंस्रपणाला परवानगी देतो,’ असा गोठवून टाकणारा, थरकाप उडवणारा निष्कर्ष स्टॅन्ली काढतात. ज्या सर्वसाधारण फॉम्युल्याचे-रीतीचे वर्णन त्यांनी केले आहे, तिचे भारत देश 2014 पासून ज्या मार्गाने जात आहे, आणि ज्यात टोकाच्या हिंस्रपणाचा समावेश आहे, त्याच्याशी आश्चर्यकारक साम्य आहे! 

लेखक, कलाकार, विद्यार्थी, शिक्षक आणि पत्रकार- यांना त्यांच्या स्वतंत्र वैयक्तिक मतांमुळे शिक्षा करण्यात आली आहे. चार ख्यातकीर्त लेखकांना ठार करण्यात आले आहे. गोरक्षकांनी आणि इतर दक्ष (जागरूक?) जमावाने केलेले खून, चालवलेला छळ आणि त्याप्रसंगी पोलीस व इतर लोक केवळ प्रेक्षकाची भूमिका करत असल्याचे दूरचित्रवाणीवर दिसले आहे. या गुन्ह्यांना ते देशभक्तांनी देशाच्या शत्रूंविरुद्ध केलेले कृत्य आहे असे सांगून, न्याय्य ठरविण्यात येऊन त्यांना बक्षिसे दिली गेली आहेत. अगदी अलीकडे तर अशा व्यक्तींना लोकसभेतही जागा देण्यात आली आहे. अशा प्रकारची वागणूक आणि छळ हा काही आपोआप घडलेला प्रकार नाही. तसे करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. ज्या प्रकारची विचारसरणी त्यांच्यात रुजवण्यात आली आहे, त्याचीच ही फळे आहेत. या रीतीचे- फॉर्म्युल्याचे इतर बाबींतही पालन करण्यात येत आहे.

लोकशाहीमध्ये लष्कर हे राजकारण आणि लोकांपासून दूर राहते. युद्धाचा उत्सव केला जात नाही. देशाच्या नेत्याकडे अचंबित होऊन, थक्क होऊन पाहिले जात नाही, त्याला जबाबदार (अकौंटेबल) ही धरण्यात येते. त्याने पत्रकार आणि अन्य माध्यमांना सामोरे जाऊन प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा असते. सर्वोच्च स्तरावरील नेता लोकशाहीतील प्रथांचे पालन करत नाही, त्यांचा आदर करत नाही, स्वतःला बाकी साऱ्यांहून मोठा समजतो, हे आपल्याकडे अगदी स्पष्टपणे दिसते आहे. आपण येथे जे काही पाहिले आहे, त्यावरून दिसते की, हा फॉर्म्युला राबवला जात आहे. आणि तोही अतिशय परिणामकारकपणे. म्हणजे कल्पित परीकथांना वास्तवापेक्षा प्राधान्य मिळत आहे. बेरोजगारी, ग्रामीण आणि शहरी हलाखी, यातना पीडा (डिस्ट्रेस), व्यवस्थित चाललेला भ्रष्टाचार आणि ज्याचा देशाला त्रास होत आहे, ते सारे पिछाडीवर जात आहे. या साऱ्या गोष्टी, परीकथा सांगणाऱ्याच्या, सतत काही तरी नवे शोधण्याच्या कलेला तोड नाही.

या कलेमुळे ही तोड नसलेली कथा वाचकांना/ऐकणाऱ्यांना भारून टाकते आणि या कोणे एके काळी... या वयातीत कथेलाही तोड नसते. जे कुणी अशी कथा कथन करण्याचे कौशल्य आत्मसात करतात, ते त्यांना हवा तो मूड तयार करू शकतात. संगीत आणि इतर सारे कलाप्रकार त्यांच्या त्यांच्या कलामाध्यमात निर्माण करतात त्याप्रमाणेच! सर्व कला आणि साहित्य यांना धोकादायक समजले जाण्याचे आणि त्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना हवा त्या प्रकारचाच मूड तयार करावा, (त्याखेरीज इतर नाही) म्हणून तर असे नियंत्रण ठेवले जात नसेल ना?

अनुवाद : आ. श्री. केतकर चेल. 9049742134
(इंडियन एक्स्प्रेसच्या सौजन्याने)               

Tags: gabrial garsia marquez jesan stanlaey yel university a.s. ketkar naynatara sehgal The Chronicle of a Death Foretold ‘द क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड’ गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ जेसन स्टॅनली येल विश्वविद्यापीठ आ. श्री. केतकर नयनतारा सहगल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नयनतारा सहगल

इंग्लिश लेखिका,  'रिच लाइक अस' या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात