डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पुष्पाबाई : अस्वस्थ काळातील दीपस्तंभ

बाबासाहेबांच्या सभांत किंवा गांधींच्या सत्याग्रहात, विविध आंदोलनांत ज्याप्रमाणे स्त्रिया सहभागी होत होत्या, त्याचं प्रमाणही पुढील काळात कमी होत गेलं. स्त्रियांचे प्रश्न पुढे आणतानाच स्त्रीवादी भूमिका घेणं ही परंपरा आंबेडकरी चळवळीतही राहिली नाही, असं बाईंचं स्पष्ट मत होतं. अनेकदा स्त्रीप्रश्नांची चर्चा ही भावनिक पातळीवर जास्त झाली. स्त्रियांचे प्रश्न हे जात आणि वर्गलढ्यातही गुंतलेले होते. खरं तर हे सारेच प्रश्न एकमेकांशी संलग्न होते; पण आपण त्यांच्याकडे वेगवेगळे प्रश्न म्हणून पाहत राहिल्यानं आणि स्त्री-अभ्यास हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच साहित्यिक अभ्यासाचा भाग आहे हे लक्षात न घेता हे प्रश्न मांडले गेल्यानं स्त्री-अभ्यासाची मांडणी म्हणावी तशी पद्धतशीर पद्धतीनं झाली नाही- हा बाईंनी मांडलेला मुद्दा आजच्या काळातील साऱ्या चळवळी पाहिल्या तर किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं. 

दोन ऑक्टोबरला संध्याकाळी साधारण साडेचार वाजता भावेसरांचा फोन आला, ‘‘नीरजा, बाई नाहीत गं बऱ्या. ओळखही हरवली आहे नजरेतून.’’ त्या क्षणाला मनातून हादरले. बाईंना पाहावंसं वाटत होतं. धावत जावंसं वाटत होतं. पण कोरोनाकाळ आणि सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या लोकल्स यामुळे मुंबईच्या एका टोकाहून दादरला पोचणं तसं शक्य नव्हतं. मग सुधीर देसाई, युवराज मोहिते यांच्याशी बोलण्यात संध्याकाळ गेली. रात्री जवळजवळ दोनपर्यंत बाईंचाच विचार होता डोक्यात. कधी तरी लागलेली झोप पहाटे युवराजच्या फोननं उडाली. बाई गेल्याचा निरोप होता. मग मात्र निघाले त्यांच्याबरोबर. आदल्या दिवशी पाहायला गेले असते, तर डोळ्यांतील ओळख हरवलेल्या बाई कशा दिसल्या असत्या, याची कल्पना नाही करू शकत. पण गेली दीड-पावणेदोन वर्षं भावे कुटुंबाचं घरचं झालेल्या कॉलनी नर्सिंग होमच्या त्या कॉटवर डोळे मिटून शांत पहुडलेल्या बाई तीन ऑक्टोबरला सकाळीपाहिल्या आणि वाटलं झोपल्या तर आहेत त्या शांत! आणि केवळ आपल्याच नाही, तर आज ज्यांना-ज्यांना त्यांची गरज आहे त्या-त्या माणसांच्या आणि विशेषतः या अंगावर येणाऱ्या, भयभीत करणाऱ्या हिंसक काळात सत्यासाठी-न्यायासाठी लढू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आहेत त्या. 

जर समृद्धी म्हणजे- जीवापाड प्रेम करणारे खूप सारे मित्र- एका हाकेसरशी धावून येणारे, आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकाच्या आठवणी जपणारे विद्यार्थी... स्वातंत्र्य, समता, स्त्रीमुक्ती, वर्गलढा, जाती-अंताची चळवळ, अभिव्यक्ति-स्वातंत्र्य अशा अनेक शब्दांचे अर्थ जाणून त्यासाठी लढणारे आणि ह्या साऱ्या चळवळी स्वतःच्या जगण्याचा भाग करून घेताना बाईंकडे आधार व आदर्श म्हणून पाहणारे विवेकी लोक आपल्या जगण्याचा भाग होणं- असं असेल तर बाईंचं एक्याऐंशी वर्षांचं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध होतं, असं म्हणायला हरकत नाही.

काही माणसं आपल्या आयुष्याचा कायमचा भाग झालेली असतात. ती आपल्या आयुष्यातून कधी निघून जाऊ शकतील, असं वाटतच नाही. त्यांच्याशिवाय आपणच नाही तर हे जगही चालू शकेल की नाही, असं वाटतं असतं. बाई अशा माणसांतल्या एक होत्या. त्यांचा सारा झंझावात पाहिलेल्या आमच्या पिढीला हे वादळ कधी शांत होईल, असं वाटलंच नव्हतं. कोणत्याही काळात त्या आपल्या सोबत असतील आणि आपल्याला धीर देतील, लढे उभारायचं बळ देतील- असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं. म्हणूनच नयनतारा सहगल यांच्यासाठी व्हीलचेअरवरून बाई सभागृहात आल्या आणि अगदी संयत पण ठाम शब्दांत त्यांनी आपला निषेध नोंदवला, तेव्हा बाईंना त्या अवस्थेत पाहणं जड गेलं असलं तरी, हा आवाज आपल्या सोबत राहणार आहे आणि जगण्याला  उभारी  देत राहणार आहे, याचा विश्वास लोकांच्या डोळ्यांत दिसत राहिला.

मधुमेहामुळं एका पायाची बोटं गेली तेव्हा सारा भारत फिरणाऱ्या बाईंच्या पायाची भिंगरी थांबली होती. पण जखम सुकल्यावर पायासाठी बनवलेल्या नव्या बुटांचंही कौतुक करणाऱ्या बाई पुन्हा धडाडीनं उभ्या राहिल्या. कार्यक्रमांना हजेरी लावायला लागल्या, शब्दांची तोफ चालवायला लागल्या; तेव्हा सर्वांनाच पुन्हा धीर आला होता. पण 2019 च्या जानेवारीत तब्येत पुन्हा बिघडली. दुसऱ्या पायाची बोटंही गेली. त्यानंतर मात्र बाई कॉलनी मुक्कामीच राहिल्या आणि शेवटी तिथूनच त्यांनी शेवटचा निरोप घेतला.

बाईंच्या आयुष्याचा पट जर पाहिला तर- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा प्रवास किती दीर्घ होता, ते लक्षात येतं. जिथं चळवळ किंवा आंदोलनं होती तिथं तिथं बाई होत्या; मग तो आणीबाणीचा काळ असेल की शीला किणीचं प्रकरण असेल, मृणालताई गोरे, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव अशा विविध चळवळींतील लोकांबरोबरचं काम करणं असेल की नरेंद्र दाभोलकर, विद्या बाळ, मेधा पाटकर यांच्यासोबत उभं राहाणं असेल. पाकिस्तान-भारत मैत्री  फोरम असेल, साने गुरुजी स्मारकाचं आंतरभारती केंद्र असेल की केशवराव गोरे ट्रस्टनं सुरू केलेलं मृणाल गोरे दक्षिण आशियाई केंद्राचं काम असेल, पर्यावरण वाचवण्यासाठीची आंदोलनं असतील किंवा नंदू माधव यांनी साऱ्या सामाजिक संस्थांची घातलेली ‘सांगड’ असेल... बाई या सगळ्यांच्या सोबत कायम राहिल्या. अगदी छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणारे कार्यकर्ते असोत की आपापल्या कुवतीनुसार लेखन करणारे साहित्यिक असोत, बाईंचा सल्ला हा त्यांच्यासाठी कायम महत्त्वाचा राहिला आहे.

मी बाईंना सुरुवातीला ओळखत होते ती एक विद्यार्थी घडवणारी शिक्षिका आणि नाट्यसमीक्षिका म्हणून. बाबांनी मनमाडला अनेक चर्चासत्रे आयोजित केली होती. त्यातील काही चर्चासत्रांत व पुढे बाबा ज्या चर्चासत्रात सहभागी होत तिथे पुष्पाबाईंची उपस्थिती असल्याने बाबांच्या तोंडून त्यांचे नाव अनेकदा ऐकले होते. पुढे भेटीही झाल्या. माझ्या लग्नप्रसंगी बाई व भावेसर दोघेही आवर्जून आले होते. त्या काळात म्हणजे 1983 च्या अनुष्टुभच्या दिवाळी अंकात विलास सारंग यांची जी ‘गर्भवती’ नावाची कथा छापून आली होती, त्या कथेवर अश्लीलतेचा आरोप करून खटला भरण्याचे घाटत होते. तेव्हा अनुष्टुभचे त्या काळचे संपादक डॉ.रमेश वरखेडे यांनी गर्भवतीमधील श्लीलाश्लीलाची चर्चा घडवून आणली होती. त्या चर्चेत डॉ. रा.भा. पाटणाकर, प्रा. मे.पु. रेगे, ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर आणि डॉ.वसंत पाटणकर यांच्यासोबत पुष्पाबाईही होत्या. बाईंच्या साहित्यक्षेत्रातील कामामुळे- विशेषतः नाट्य व साहित्याच्या अभ्यासक म्हणून- मी त्यांना ओळखत होतेच, पण अशा प्रश्नांमागे आणि लोकांबरोबर केव्हाही उभी राहाणारी व ठाम भूमिका घेणारी साहित्यिका म्हणूनही त्यांची ओळख होत गेली. पुढील तीस-पस्तीस वर्षांच्या काळात तर साहित्य-विश्वापलीकडल्या बाईदेखील हळूहळू उलगडू लागल्या. एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणाऱ्या जादूगारासारखं बाईंचं अस्तित्व समाजातील सर्वच स्तरांवर जाणवायला लागलं.  

बाई एक विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या, असं सारेच म्हणतात, आणि ते शंभर टक्के खरं आहे. पण बाईंचे हे विद्यार्थी केवळ त्यांच्या वर्गातले नव्हते; तर प्रत्येक परिसंवादात, प्रत्येक चर्चासत्रात त्यांना ऐकणारे श्रोतेच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अनेक कार्यकर्ते अप्रत्यक्षपणे त्यांचे विद्यार्थी झालेले मी पाहिलेत. बाईंना ऐकणं ही पर्वणीच असायची. मी बाईंची अनेक भाषणं आणि व्याख्यानं ऐकली आहेत. कधीही लांबण लावली नाही त्यांनी. मोजकं पण नेमकं बोलणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण व नेमकी मांडणी असायची प्रत्येक विषयाची. बाईंचं सामाजिक, साहित्यिक, राजकीय आणि सांस्कृतिक जगातील काम हे व्यापक पातळीवरचं होतं. मुख्य म्हणजे, या सगळ्या विषयांवरील त्यांच्या मांडणीला वैश्विक संदर्भही होते. 

वलयांकित राजकीय नेत्यांचं थेट वस्त्रहरण बाईंनीच करावं आणि तेही कसलीही पर्वा न करता. जे-जे दिसत होतं, जाणवत होतं ते-ते सडेतोडपणे मांडणं, बोलणं आणि तेही संयत पण धारदार शब्दांत- हे बाईंचं वैशिष्ट्य होतं. मग शिवसेनेनं मराठी माणसाच्या अपेक्षांवर कसं पाणी फिरवलं, हे सांगतानाच प्रबोधनकार ठाकरेंचा भक्कम वारसा असताना त्यांना तो सोईचा नसल्यामुळे कसा वापरता आला नाही, याच्यावर रोकठोक भाष्य बाईंनी सहज केलं आहे. वेगवेगळ्या पक्षांतील  नेत्यांच्या  विचारधारा आणि आचरण यातील फरकावर नेमकं बोट ठेवून त्यांच्या एकूण कारकिर्दीतील कमकुवत कोपरे बाईंनी वेळोवेळी दाखवून दिले आहेत. जनतेसमोर एक आणि प्रत्यक्षात एक भूमिका असणाऱ्या दांभिक नेत्यांना झोडण्याची ताकद जशी त्यांच्याकडे होती, तसंच बऱ्या कामाला पावती देण्याचं औदार्यदेखील त्यांच्याकडे होतं. त्याचं कारण बाईंना माणसं वाचता येत होती, त्यांच्या बऱ्या-वाईट गुण-दोषांसकट जाणता येत होती. बाई कायम समाजाभिमुख जगत आल्यानं समाजाचीही मानसिकता त्या जाणत होत्या. त्यामुळेच जात आणि धर्म यांच्या नावावर जनतेला वापरणाऱ्या  राजकीय नेत्यांची चिरफाड करतानाच या समाजातील लोकांची अगतिकताही त्या जाणून घेत होत्या.   

बाईंची सारी मांडणी पारदर्शक असायची. धर्मचिकित्सेबद्दल आणि स्त्रीवादाबद्दलची मांडणीही अशीच आहे. कोणत्याही गोष्टींवर भाष्य करताना सगळ्या बाजू तपासून पाहण्याची त्यांची वृत्ती ही आजच्या काळात मला फार महत्त्वाची वाटते. त्यामुळेच डॉ.श्रीराम लागू या अत्यंत जवळच्या मित्रानं  ‘परमेश्वराला रिटायर करा’ ‘असं म्हटलं असलं तरी ‘देव आम्हाला लागत नाही, पण कुणाला लागत असेल तर असू देत. फक्त देवाच्या भक्तीत, धर्मात कुणाचं शोषण व्हायला नको’ या दाभोलकरांच्या मताला त्या सहज स्वीकारत होत्या. समाजातील अनेक मान्यवरांच्या- विशेषतः महात्मा गांधींच्या- धार्मिक असण्याबद्दल मत विचारल्यावर  त्या म्हणतात, ‘मी जरी कोणती धर्मश्रद्धा मानत नाही, तरी माणसाला एखाद्या धर्मश्रद्धेची गरज लागू शकते हे मी मानते, समजून घेते.’(लढे आणि तिढे) 

बाईंचा विरोध श्रद्धेला नव्हता, तर कर्मकांडांना होता. धर्माच्या बाजारीकरणाला, धर्माच्या नावावर राजकारण करून धर्माचा वापर सत्तेसाठी करणाऱ्या राजकारण्यांना आणि धर्माच्या नशेत लोकांना गुंतवून त्याचा व्यापार मांडणाऱ्या तथाकथित धर्ममार्तंडांना होता. धर्माच्या नावानं हिंसा करणाऱ्या लोकांना त्या खडे बोल सुनवीतच, पण कोणत्याही प्रकारचं वाचन न करता शब्दांना एका विशिष्ट अर्थात बंदिस्त करणाऱ्या लोकांना त्यांचे अर्थ समजावून सांगत. ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ सांगताना त्या म्हणतात, ‘‘आपण ‘सनातन’ हा शब्द जुनाट या अर्थाने वापरत असलो तरी मुळात सनातन धर्म म्हणजे धर्माचं विशुद्ध रूपातलं तत्त्वज्ञान. एक शाश्वत असतं आणि एक परिवर्तनशील असतं. सनातन हे शाश्वत, विशुद्ध रूप.’ (लढे आणि तिढे). अर्थात बाईंचा विश्वास परिवर्तनशील तत्त्वज्ञानावर होता आणि धर्मचिकित्सा केली तर परिवर्तनाचा मार्ग मोकळा होतो, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. 

कोणी घरी देवपूजा करतं तेव्हा तो वादाचा विषय होत नाही तर तोच देव रस्त्यावर आणला, त्याचं राजकारण केलं, त्यातून हिंसा आणि आक्रमकतेला खतपाणी मिळालं की धर्म हा वादाचा विषय बनतो, असंही त्या म्हणायच्या. हिंदू धर्म खरं तर अतिशय लवचिक आहे. त्यात इतर धर्मांसारखा  एक देव किंवा एक धर्मग्रंथ नाही, ही महत्त्वाची उपलब्धी आहे, असं त्यांना वाटायचं. त्याविषयी बाई म्हणतात, ‘‘एक देव, एक धर्मग्रंथ नसल्याने हिंदू धर्मात अंगभूत लवचिकपणा आहे, ‘भगवद्‌गीता’ हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे, असं कोणी म्हटलेलं नाही; पण जरी तसं मानलं तरी खुद्द भगवद्‌गीतेत अनेक तत्त्वज्ञानं आहेत, हेही आपल्याला लाभलेलं मोठं देणं नाही का? लवचिकपणा इतका की, हिंदू माणूस धर्मातील कुठल्याच कर्मकांडाशी जखडला गेलेला नसतो. ख्रिश्चन व्यक्ती जन्मापासून मरेपर्यंत चर्चशी बांधली गेलेली असते. तसं हिंदूंचं नाहीच. आपण देवळाशी बांधले गेलेलो तर नाहीच, पण त्याही पलीकडे आयुष्यभर देवळात पाऊलही न टाकता हिंदू माणसं हिंदू राहू शकतात- इतकी मोठी लवचिकता आहे.’ (लढे आणि तिढे)

बाईंच्या मते, धर्मामुळे जशा हिंसा झाल्या तशीच अनेक करुणेची कामं उभी राहिली. त्यामुळे बाईंना धर्माची सर्जनात्मक शक्तीही तितकीच महत्त्वाची वाटायची.

प्रत्येक गोष्टीकडे विवेकीपणे पाहण्याच्या बाईंच्या स्वभावामुळेच बाई समग्रतेनं विचार करत होत्या. एकांगीपणे त्यांनी ना राजकारणाचा विचार केला, ना समाजाच्या मानसिकतेचा, की धर्माचा किंवा देवाचा. त्यामुळे ज्या वेळी स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाचा विषय आला, तेव्हा बाईंनी असं म्हटलं नाही की- जो देव तुम्हाला गाभाऱ्यात घेत नाही तिथं जायचं कशाला? उलट त्या  म्हणत राहिल्या की- जर एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीला- मग ती स्त्री असो- की पुरुष असो तिथं जाण्याचा अधिकार आपल्याला घटनेनं दिला आहे आणि प्रत्येक स्त्रीला जर तिची इच्छा असेल तर हाजी आली दर्गा असो, शनिशिंगणापूरचं मंदिर असो की शबरीमलाय देवालय असो- तिथं जाण्याचा अधिकार मिळायलाच हवा. त्यांच्या दृष्टीनं हा स्त्रीच्या सन्मानाचा प्रश्न होता. मासिक पाळी येते म्हणून स्त्रीला मंदिरात प्रवेश नाकारणं किंवा त्यापासून तिला दूर ठेवणं म्हणजे स्त्रीच्या दुय्यमत्वाला ठळक करणं होतं. आपापल्या श्रद्धा जपण्याचा प्रत्येकाला अधिकार असला, तरी या अंधश्रद्धांच्या नावावर स्त्रीला दुय्यम म्हणून अधोरेखित करणं त्यांना मान्य नव्हतं.  

अर्थात समाजातील विविध विचारधारा आणि समाजमन जाणून घेऊन त्याचं विश्लेषण बाई करत असल्या, तरी ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आहेतच, हे त्या ठामपणे सांगत. आपल्याकडे अगदी खासगी आयुष्यातही  धर्मचिकित्सा न करता आंधळेपणानं कोणताही प्रश्न न विचारता वाडवडिलांनी सांगितली म्हणून  कर्मकांडं करत राहाणारे अनेक लोक आहेत. या साऱ्या कर्मकांडाला परंपरांचं आणि संस्कृतीचं भरजरी आवरण देऊन त्यात लोकांना बंदिस्त करून ठेवणारे तथाकथित संस्कृतिरक्षक पाहिले की, त्या अस्वस्थ होत. अशा संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली स्त्रीला जोखडात बंदिस्त करणाऱ्या समाजावर व त्यांच्या मानसिकतेवर परखड टीका बाई अनेक मंचांवरून करत राहिल्या.

बाई ज्या वेळी मंचावरून स्त्रीप्रश्नांविषयी बोलत, स्त्रीवादाची मांडणी करत, त्या वेळी अनेक गोष्टी स्पष्ट होत जात. ‘मिळून साऱ्याजणी’नं पुण्याला ‘यशदा’मध्ये घेतलेल्या एका चर्चासत्रात बाईंनी जेव्हा स्त्रीवादाची भारतीय परिप्रेक्ष्यात मांडणी केली होती, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं. ‘‘तुम्हाला ऐकणं ही पर्वणी असते आमच्यासाठी. पण ही अशी मांडणी लिखित स्वरूपात यायला हवी. तुम्ही लिहा.’’ तेव्हा बाई हसल्या फक्त. लिहिण्याचा कंटाळा होता का बाईंना, माहीत नाही. कदाचित त्यांच्या मनाच्या पाटीवर त्यांनी एवढं लिहून ठेवलं होतं की, ते पुन्हा कुठल्या तरी वहीत उतरवून काढायला त्यांना वेळ नसावा. अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा उत्साह असल्यानं आणि जवळजवळ सगळ्याच चळवळी आणि त्यांचे मंच त्यांना खुणावत असल्यानं त्यांच्या मांडणीचे निबंध त्यांच्या मनातच तयार होत असावेत. हातात नोट्‌स घेऊन बाई बोलायला उभ्या राहिल्यात, असं चित्र कधी दिसलं नाही. त्यामुळे बाईंची सविस्तर मांडणी पुस्तकरूपात आपल्यासमोर येऊ शकली नाही. तरीही मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नानं ‘लढे आणि तिढे’ या अलीकडेच आलेल्या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील समाजिक आणि राजकीय दस्तावेजाचा छोटासा तुकडा त्या आपल्यासाठी ठेवून गेल्या. या पुस्तकात त्यांनी स्त्रीप्रश्नावर केलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात फुले, आगरकर, आंबेडकरांपासून ते गांधी, विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापर्यंत सगळ्यांनी स्त्रियांचे प्रश्न ज्याप्रमाणे विविध अंगानं पुढे आणले त्याप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात ते झाले नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. बाबासाहेबांच्या सभांत किंवा गांधींच्या सत्याग्रहात, विविध आंदोलनांत ज्याप्रमाणे स्त्रिया सहभागी होत होत्या, त्याचं प्रमाणही पुढील काळात कमी होत गेलं. स्त्रियांचे प्रश्न पुढे आणतानाच स्त्रीवादी भूमिका घेणं ही परंपरा आंबेडकरी चळवळीतही राहिली नाही, असं बाईंचं स्पष्ट मत होतं. अनेकदा स्त्रीप्रश्नांची चर्चा ही भावनिक पातळीवर जास्त झाली. स्त्रियांचे प्रश्न हे जात आणि वर्गलढ्यातही गुंतलेले होते. खरं तर हे सारेच प्रश्न एकमेकांशी संलग्न होते, पण आपण त्यांच्याकडे वेगवेगळे प्रश्न म्हणून पहात राहिल्यानं आणि स्त्री-अभ्यास हा सांमाजिक, सांस्कृतिक तसेच साहित्यिक अभ्यासाचा भाग आहे हे लक्षात न घेता हे प्रश्न मांडले गेल्यानं स्त्री-अभ्यासाची मांडणी म्हणावी तशी पद्धतशीर पद्धतीनं झाली नाही, हा बाईंनी मांडलेला मुद्दा आजच्या काळातील साऱ्या चळवळी पाहिल्या तर किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं. बाई म्हणायच्या तसं दलित मुक्तीचा आणि स्त्रीमुक्तीचा विचार बरोबरीनं गेला असता, तर कदाचित या सगळ्याच प्रश्नांकडे एकत्रितपणे पाहिलं गेलं असतं, स्त्रीवाद हेच मोठं राजकारण आहे हे लक्षात घेतलं असतं तर स्त्रियांच्या राखीव जागा वगैरेवर घेतलेल्या भूमिका घेताना विचार झाला असता. 

स्त्रीचे सगळे प्रश्न हे तिला दिलेल्या आरक्षणाने सुटणार नाहीत, ही बाईंची भूमिका आजही स्त्रीचं शारीर आणि मानसिक पातळीवर होणारं शोषणं पाहिलं तर  किती योग्य होती, हे लक्षात येतं. जिथं जिथं स्त्रियांना संधी मिळाली, जिथं जिथं स्त्रिया चळवळी करत होत्या; तिथं तिथं म्हणजे त्या-त्या देशात स्त्रियांनी युद्ध, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप केला. कायम युद्धविरोधी आणि शांततावादी भूमिका घेतली, हे त्या आवर्जून सांगत होत्या. स्त्रीप्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी त्यांना प्रेम होतं. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील विविध चळवळींनी स्त्रीला दिलेल्या बळामुळे आज  स्वातंत्र्य आणि बऱ्यापैकी सत्ता उपभोगणाऱ्या नव्या पिढीतील काही स्त्रिया भांडवलशाहीचा व उजवा विचार मानायला लागल्या आणि ‘स्त्रीमुक्तीची गरज काय?’ असं म्हणू लागल्या, तेव्हा बाई अस्वस्थ झाल्या. 

एकूणच स्त्रीवादी साहित्य, स्त्रीवादी समीक्षा याचा गंभीरपणे विचार करणाऱ्या बाई स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाविषयी, त्यातल्या पुरुषव्यवस्थेच्या हस्तक्षेपाविषयी अत्यंत तळमळीनं व परखडपणे बोलत राहिल्या. मराठीमध्ये अजूनही हवी तशी स्त्रीवादी मांडणी झाली नाही, याची खंत त्या व्यक्त करत होत्या. ती त्यांनीच केली असती, तर मराठी साहित्य आणि समीक्षेला एक झळाळी प्राप्त झाली असती, असं आता वाटतं. 

जसजसा त्यांचा जास्तीत जास्त सहवास मिळत गेला तसतशी बाईंच्या तोंडून वेगवेगळ्या विषयांवरील मतं ऐकायला मिळायला लागली. साने गुरुजी स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे पहिले अध्यक्ष रामदास भटकळ यांच्याकडून 2010 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे घेताना ‘नीरजावरच्या कामाचा भार थोडा हलका व्हावा आणि तिला सर्जनशील लेखनाला वेळ मिळावा, म्हणून हे अध्यक्षपद मी स्वीकारते आहे’ असं बाई म्हणाल्या होत्या आणि म्हटल्याप्रमाणं खरंच त्या वागल्या. बाई अध्यक्ष असतानाच्या या साऱ्या काळात चार साहित्यसंवाद आम्ही घेतले. त्यात ‘विद्रोही साहित्य आणि परंपरा’, ‘राजकारण आणि साहित्य’, ‘अस्वस्थ जगत’, ‘स्त्रीवाद, सिद्धांत, चळवळी आणि संस्कृती’  अशा विविध विषयांवर मांडण्या झाल्या. या साऱ्या काळात मुंबईबाहेर गेल्यावर अनेक ठिकाणी बाईंबरोबर एकाच खोलीत राहण्याचे प्रसंग आले. त्या काळात आमचं नातं खासगी पातळीवरही समृद्ध होत गेलं. बाईंचं मायेनं जेवू-खाऊ घालणं असो, की माझ्या कुटुंबांतील प्रत्येकाची विचारपूस असो- या सगळ्यामुळे एक वेगळाच बंध निर्माण झाला. 

मी 2012 पासून माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयात अध्यापन करत होते. त्या काळात तर अनेकदा लेक्चर्स संपल्यावर, तर कधी जोडून दोन पिरियड ऑफ मिळाले तर मागच्या दारीच असलेल्या बाईंच्या घरी सहज जाऊन येत होते. त्यांच्या पुस्तकांच्या घरात बसायला जागा शोधत-शोधत त्यांचा पाहुणचार घेत होते, तर कधी तरी क्वचित मीही काही तरी करून नेत होते.  कधी त्यांच्याकडून वाचण्यासाठी म्हणून पुस्तकं आणत होते, तर कधी माझ्याकडची त्यांनी न वाचलेली पुस्तकं देत होते. त्यावर चर्चा करत होते. पण कोरोनाकाळ सुरू झाला आणि बाईंकडे जाणं थांबलं. त्या काळात माणसांच्या भुकेल्या असलेल्या बाईंशी फोनवरून संपर्क करत राहणे, हाच पर्याय उरला होता. पण फोनवर त्या प्रसन्नपणे बोलायच्या. एका पुस्तकाच्या अनुवादाचं काम सुरू आहे, असं सांगत होत्या. नवे आलेले बूट घालून खोलीतच फिरायला लागलेय, म्हणून या ऑगस्टमध्येच त्या म्हणाल्या होत्या. गेल्या सात वर्षांतील आजारपणात धरून ठेवलेली उमेद आणि आजच्या अस्वस्थ काळाला जोडून घेत त्यावर व्यक्त होत राहण्याची आस अजिबात कमी झाली नव्हती. पण शेवटच्या पंधरा दिवसांत ती कमी होत गेली. ताप आला, तब्येत खालावत गेली आणि या अस्वस्थ काळात अशांत झालेल्या मनांना मार्ग दाखविणारा दिवा काळाच्या पडद्याआड गेला. अर्थात, प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांच्या विचारांतून बाई आपल्या सगळ्यांशी जोडून राहणार आहेत आणि रहातीलच, याची खात्री आहे.

Tags: स्त्रीवादी समीक्षा स्त्रीवादी साहित्य स्मृतीलेख पुष्पा भावे नीरजा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात