Diwali_4 ‘आयबीएन-लोकमत’पूर्वीचा निखिल
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘आयबीएन-लोकमत’पूर्वीचा निखिल

त्याचे टीव्हीवरचे कार्यक्रम ज्या सफाईने होतात त्यामागे ही मेहनत आहे, हा अभ्यास आहे आणि हा पाया आहे याची जाणीव बहुतांश लोकांना नसते. त्यांना वाटतं, टीव्हीवरून आक्रमकपणे प्रश्न विचारले की आपण चांगले अँकर झालो. पण निखिल आक्रमक असतो तेव्हा त्यामागे विचार असतो, राजकारणाची समज असते. ही समज वाचनातून, प्रत्यक्ष चळवळींमधल्या सहभागातून आलेली असते हे अनेकांना माहीत नाही. त्याचे कार्यक्रम सहज झाल्यासारखे वाटतात, कारण त्यातही कोणता मुद्दा आधी घ्यायचा, कोणत्या पाहुण्यापासून कोणाकडे जायचं याची गुंफण त्याच्या डोक्यात पक्की असते.

तीसहून जास्त वर्षं आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात असू; तर त्या व्यक्तीला आपण ओळखू लागलो आहोत, असं म्हणता येतं का? कितीही जवळची असली तरी दुसरी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे कधीच समजत नाही, असं म्हणतात. मधूनच कधी तरी आयुष्यात नवं काही घडतं आणि वाटतं- ‘अरेच्चा, याची ही बाजू आपल्याला ठाऊकच नव्हती.’ किंवा, एखादा प्रसंग घडतो आणि वाटतं- ‘अजून कळायचाय की हा माणूस आपल्याला!’

पण निखिलच्या बाबतीत हे खरं नाही. त्याला मी शंभर टक्के नाही, पण बऱ्यापैकी ओळखू लागलेय. त्याच्या मनात काय चाललंय हे समजू लागलेय, असं निश्चित म्हणता येईल. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याचा स्वभाव. आत एक आणि बाहेर एक असं त्याचं काही नसतं. घरात एक वेगळा निखिल आणि बाहेर कुणी दुसराच, असं त्याचं असत नाही. आपण जे बोलतो तसंच वागायचं असतं, आपण जी तत्त्वं सांगतो, ती खाजगी जीवनातही अमलात आणायची असतात; हे शंभर टक्के स्वीकारलेली माणसं फार कमी भेटतात. निखिल त्यांतला एक आहे. अगदी मी त्याला नवीन-नवीन ओळखायला लागले, तेव्हापासून त्याच्यातली ही क्वालिटी मला जाणवलेली आहे, भावलेली आहे.

‘साप्ताहिक दिनांक’, त्यानंतर ‘अक्षर’चा दिवाळी अंक, मग ‘षटकार’ व ‘चंदेरी’ ही पाक्षिकं आणि शेवटी ‘महानगर’ हे सायंदैनिक अशा तब्बल पाच नियतकालिकांसाठी निखिलबरोबर मी काम केलं. ‘दिनांक’ ही माझी पहिलीच नोकरी. खरं तर नोकरी म्हणणंही योग्य नाही. कारण हे साप्ताहिक काही मुख्य प्रवाहातल्या साप्ताहिकांसारखं नव्हतं. पर्यायी माध्यम, एका विचाराने चाललेलं साप्ताहिक होतं ते. त्यामुळे तिथलं वातावरणही ऐसपैस असे. संध्याकाळी नोकरी करून आपला वेळ देणारी मंडळी ऑफिसमध्ये येत. मग गप्पांचा अड्डाच जमायचा. विषय सगळे. पण मुख्यत: राजकीय.

‘दिनांक’ हे समाजवादी विचारांचं साप्ताहिक असलं तरी त्या विचारांचं मुखपत्र नव्हतं. नाटक, सिनेमा, ललित लेखन... कोणताही विषय इथे वर्ज्य नव्हता. मुळात एखादं परिपूर्ण साप्ताहिक काढायचं असेल, तर त्यासाठी कोणतं भान हवं याचा पहिला धडा मला इथे मिळाला. आपोआप. कोणीही जाणीवपूर्वक काही न शिकवता.

‘दिनांक’मधून बाहेर पडल्यानंतर निखिलने ‘अक्षर’ दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. हेमंत देसाई, केतन मसदेकर, जवाहर नागोरीसारखे मित्र बरोबर होते. साप्ताहिक आणि वार्षिक अशा दोन नियतकालिकांमधला फरक तेव्हा आम्हाला कळला. ‘अक्षर’मध्ये आम्ही खूप प्रयोग केले. (तसे ते ‘दिनांक’च्या संपादक मंडळानेही दिवाळी अंकात केले होते). त्याची सुरुवातच मुळी मुखपृष्ठापासून झाली होती. 1981 मधल्या ‘अक्षर’च्या त्या पहिल्या अंकावर संजय पवारचं चित्र होतं. बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांनी तेव्हा पत्रकारांची मुस्कटदाबी  करणारं बिहार प्रेस बिल आणलं होतं. त्याच्या विरोधात देशभरात पत्रकारांच्या संघटना मोर्चे काढत होत्या, निषेध व्यक्त करत होत्या. ‘अक्षर’चं कव्हर याच विषयाशी संबंधित असायला हवं, ही कल्पना निखिलची. संजयने त्यात (चार ओळींच्या) एका कवितेचीही भर घातली आणि त्यानंतर अंकातल्या महत्त्वाच्या विभागाशी किंवा मुख्य लेखाशी संबंधित चित्र आणि अशी कविता ही ‘अक्षर’ची खासियतच होऊन गेली. आज, एवढ्या वर्षांनंतरही आम्ही ती जपण्याचा प्रयत्न करत आहोत. मुळात पत्रकार असल्यामुळे असेल, निखिलचं दिवाळी अंकाचं संपादकीय प्लॅनिंग केवळ साहित्यिक अंगाने कधीच गेलं नाही. त्यात भर असायचा तो राज्यात, देशात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटनांचा. संदर्भ असायचा तो आजचा. त्याचबरोबर नाटक, सिनेमा, खेळ, चित्रकला, फोटोग्राफी यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रांचाही आवर्जून समावेश व्हायला हवा, याकडे त्याचा कटाक्ष असायचा.

सांगायचा मुद्दा हा की, माझ्या पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून माझ्यावर (आणि माझ्या लिखाणावरही) निखिलचे संपादकीय संस्कार झाले. आमचे स्वभाव अगदी वेगळे. म्हणूनच कदाचित आमचं बरं जमलं असावं. तो टोकाचा भडक. लोकांच्या मते उद्धटही. (‘अक्षर’च्या पहिल्याच अंकासाठी गोविंद तळवलकर यांच्याकडून त्याने लेख रिराईट करून घेतला होता. मात्र तळवलकरांचं मोठेपण हे की, त्यांनी तो दिलाही होता!)

‘अक्षर’चा पहिला अंक आम्ही 1981 मध्ये काढला. तेव्हापासूनच निखिलच्या मनात आपलं स्वत:चं वृत्तपत्र असायला हवं, याच्या योजना असाव्यात. पण एकदम वर्तमानपत्र काढण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक पाठबळ अर्थातच आमच्याकडे नव्हतं. बहुधा त्यामुळेच 1983 मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर देशातलं वातावरण क्रिकेटमय झालेलं असताना ‘आपण स्पोर्ट्स मॅगझिन काढू या’ हा विचार त्याने बोलून दाखवला. पाक्षिक काढणं हे रोजच्या दैनिकाइतकं मोठं पाऊल नव्हतं. पण प्रकाशनातला अनुभव म्हणून खूप महत्त्वाचं होतं. हे मला अर्थातच नंतर लक्षात आलं.

निखिलने एवढा सगळा विचार केला होता याची प्रत्यक्ष त्या वेळेला मला फार कल्पना नव्हती. किंबहुना, ‘षटकार’विषयी मला पहिल्यांदा कळलं, तेव्हा मी जोरात हसले होते. मी त्या वेळी ‘नवशक्ती’ दैनिकात नोकरी करत होते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही भेटायचो, तेव्हा निखिल दिवसभरात केलेल्या प्लॅनिंगविषयी सांगायचा. मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळ एक इराणी रेस्टॉरन्ट होतं. तिथे तो, पप्पू संझगिरी, उमेश आठलेकर आणि आमचे काही मित्र ‘षटकार’ची तयारी करत होते. संदीप पाटील संपादक असलेलं हे क्रीडाविषयक पाक्षिक सप्टेंबर 1983 मध्ये बाजारात आलं आणि पाहता-पाहता एक लाख प्रतींच्या खपाचा आकडा ‘षटकार’ने गाठला. कालांतराने मीपण नोकरी सोडून ‘षटकार’साठी पूर्णवेळ काम करू लागले. खुद्द क्रिकेटपटूंकडून आलेल्या इंग्लिश लेखांचं भाषांतर मी करायचे. काही वेळा ओरिजिनल लेखही लिहायचे.

‘षटकार’च्या वेळेस निखिलबरोबर मी पूर्णवेळ पत्रकारिता करायला सुरुवात केली. खरं तर क्रिकेट किंवा एकूणच खेळ हा काही निखिलचा विषय नव्हता. पण त्याला त्यात इंटरेस्ट नक्कीच होता. पत्रकार म्हणून होता. त्यामुळे विषय सुचवताना किंवा शीर्षकं देताना निखिलमधल्या संपादकाची झलक दिसायची. तीच गोष्ट ‘चंदेरी’बाबतही खरी म्हणायला हवी. सिनेमा, नाटक, टीव्ही हे निखिलचे विषय नसले; तरी त्यांत तो रमत असे. त्याने या विषयांवर ‘चंदेरी’मध्ये लेखही लिहिलेले आहेत. ‘चंदेरी’ आम्ही काढलं आणि मला जणू माझं फिल्ड मिळालं. आपल्याला सिनेमा या विषयात इतका रस आहे, हे मला स्वत:लाच त्या आधी माहीत नव्हतं. किंवा, कदाचित मी तितक्या गंभीरपणे ‘आपल्याला नेमकं काय करायचंय,’ असा विचारही केला नसावा.

पण मी खऱ्या अर्थाने लिखाण करायला लागले, तेव्हा निखिलच्या परफेक्शनिस्ट असण्याचा अधिकाधिक अनुभव यायला लागला. अनुवादाबद्दल त्याने मला कधी फार सुनावलं नाही, पण माझे ‘चंदेरी’मधले सुरुवातीच्या काळातले काही लेख त्याने मला तीन-तीन वेळा लिहायला लावलेले आहेत. लेख लिहिताना एका मुद्यामधून दुसरा मुद्दा यायला हवा; अचानक पॅरा सुरू होता कामा नये, ही निखिलची शिकवण. लेखाची सलगता महत्त्वाची असते आणि तेच लिहिणाऱ्याचं कसब असतं. नाही तर नुसती मिळालेली माहिती एका पाठोपाठ एक मांडणं म्हणजे काही लेख नव्हे, हे कळलं. सोप्या भाषेत लिही, हा सल्लाही निखिलचाच. मुलाखतीच्या बाबतीतही तेच. मुलाखत लिहिताना समोरच्या व्यक्तीच्या उत्तरामधून आपला पुढचा प्रश्न यायला हवा, म्हणजे मग ती मुलाखत वाचताना आपण दोन माणसांच्या गप्पा ऐकतोय असं वाटतं, हे त्याने मला सांगितलं. पुढे ‘महानगर’मध्ये मी ‘दिलखुलास’ हा मुलाखतींचा कॉलम लिहायला लागले आणि अनेकांनी मला ‘तुझ्या मुलाखती छान असतात; अगदी त्या माणसाशी चाललेल्या गप्पा आपण ऐकतोय असं वाटतं,’ अशी कॉम्प्लिमेंट दिलीय.

‘महानगर’ 1990 च्या 22 जानेवारीला सुरू झालं आणि निखिल खराखुरा संपादक झाला. दरम्यानच्या काळात आमचं लग्न होऊन सहा वर्षं लोटली होती. मात्र,
‘षटकार’ आणि ‘चंदेरी’ ही आम्हा सगळ्यांचीच मॅगझिन्स असल्यामुळे चोवीस तास आम्ही त्याच विश्वात असायचो. म्हणजे ऑफिसातले सहकारी हेच टवाळक्या करणारे मित्र होते. आम्हा कोणालाच त्या पलीकडे जग नव्हतं. स्टाफ कमी असल्यामुळे आमचं मिळून एक कुटुंब तयार झालं होतं. त्यात मारामाऱ्या होत्या, मस्ती होती, मजा होती. ‘महानगर’मुळे यात थोडा बदल झाला. कारण षटकार आणि चंदेरीमध्ये आम्ही सगळे समवयस्क होतो. एकमेकांना विरोध करताना, एकमेकांबरोबर असहमती दर्शवताना आम्ही कधीच प्रोटोकॉल पाळला नाही. पण ‘महानगर’मुळे स्टाफ वाढला. तरुण मुलं-मुली आल्या. त्यांच्यासमोर आम्ही सर आणि ताई होतो. या काळात निखिलही खूप बदलला. भडक तर होताच, पण आता अधिक कडक झाला. इथे शंभर टक्के त्याला जे हवं तसंच व्हायला हवं होतं. त्यासाठी हवे तेवढे परिश्रम आणि वाईटपणा घ्यायची त्याची तयारी होती.

‘महानगर’ने त्याला खूप नाव दिलं, प्रसिद्धी दिली. ज्या काळात मुंबईमध्ये शिवसेनेची दहशत होती, त्या काळात बाळ ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिण्याचं धाडस त्याने दाखवलं आणि सेनेने ‘महानगर’वर हल्ला केला. आमच्यावर बहिष्कार घालण्याचे आदेश दिले, शिवसेनेच्या मुखपत्रातून अत्यंत असभ्य भाषेत टीका केली आणि प्रसंगी खोटंही छापलं. (‘दोपहर का सामना’ या त्यांच्या हिंदी सायंदैनिकात ‘निखिल वागळे यांचं स्विस बँकेत खातं आहे’ अशी बातमी छापली होती. आम्ही अर्थातच ती वाचून खो-खो हसलो होतो. कारण रोजच्या व्यवहारात येणाऱ्या आर्थिक अडचणींना आम्ही कसे तोंड देत होतो, हे आमचं आम्हाला माहीत होतं.) या सेना प्रकरणामुळे ‘महानगर’ आणि निखिल वागळे ही नावं राष्ट्रीय स्तरावर पोचली. ‘इंडिया टुडे’पासून बहुतेक सर्व प्रमुख इंग्लिश नियतकालिकांनी आमची दखल घेतली. निखिलच्या मुलाखती छापल्या, त्याचं प्रोफाईल छापून आलं. काही आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सींनीही त्याची स्टोरी केली.

तसा अगदी कॉलेजपासून निखिल चळवळींमध्ये होता. कार्यकर्ता होता. युवा संघर्ष-वाहिनी, राष्ट्र सेवादल या संघटनांमध्ये काम केल्यामुळे आणि भरपूर वाचन असल्यामुळे त्याची राजकीय-सामाजिक जाण व वैचारिक पाया ‘दिनांक’च्या काळापासून पक्का होता. गांधी, आंबेडकर, लोहिया, मार्क्स तर त्याने वाचलेले आहेतच. मराठी साहित्याची त्याची जाण चांगली आहे. मात्र, कथा- कादंबऱ्यांपेक्षा राजकीय-सामाजिक लिखाण त्याला अधिक आवडतं. ओरहान पामुक वाचताना तो खूश असतो, पण पी.साईनाथच्या लेखनाविषयी जास्त आपुलकी बाळगतो. हुशार विद्यार्थी तर तो शाळेपासूनच आहे. त्यामुळे वाचलेलं सगळं त्याच्या मेंदूत पक्कं असतं.

त्याचे टीव्हीवरचे कार्यक्रम ज्या सफाईने होतात त्यामागे ही मेहनत आहे, हा अभ्यास आहे आणि हा पाया आहे याची जाणीव बहुतांश लोकांना नसते. त्यांना वाटतं, टीव्हीवरून आक्रमकपणे प्रश्न विचारले की आपण चांगले अँकर झालो. पण निखिल आक्रमक असतो तेव्हा त्यामागे विचार असतो, राजकारणाची समज असते. ही समज वाचनातून, प्रत्यक्ष चळवळींमधल्या सहभागातून आलेली असते हे अनेकांना माहीत नाही. त्याचे कार्यक्रम सहज झाल्यासारखे वाटतात, कारण त्यातही कोणता मुद्दा आधी घ्यायचा, कोणत्या पाहुण्यापासून कोणाकडे जायचं याची गुंफण त्याच्या डोक्यात पक्की असते. लेख लिहिताना त्याने आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच मला त्याच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमामधूनही जाणवतात. एवढा विचार आजचे तरुण पत्रकार करतात की नाही हे मला माहीत नाही, पण निखिल आजही त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचा अत्यंत गंभीरपणे विचार करत असतो याची मला कल्पना आहे. कारण मुळातच तो चोवीस तास पत्रकार आहे. बाकीची सगळी नाती, सगळ्या आवडी- निवडी, सगळं आयुष्य नंतर येतं.

‘दिनांक’च्या वेळेस काय किंवा ‘महानगर’च्या वेळेस काय, कधी-कधी मला वाटायचं, हा संपादक म्हणून नेमकं काय करतो? बातम्या तर सगळेच देतात, पण हळूहळू लक्षात यायला लागलं की निखिल त्या वर्तमानपत्राला एक दृष्टी देतो, परस्पेक्टिव्ह देतो. विचारांची बैठक पक्की असल्यामुळे ही दृष्टी येते. इतिहासाचं भान असलं तर हा परस्पेक्टिव्ह येतो. आणि वाचनाला प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करण्याच्या अनुभवाची जोड असली तर भूमिकेमध्ये ठामपणा येतो.

‘महानगर’चे जुने अंक आज काढून बघितले तरी आम्ही त्यात काय-काय नवे प्रयोग केले होते, त्याची झलक पाहायला मिळेल. एक परिपूर्ण वर्तमानपत्र काढायचा तो प्रयत्न होता. त्यात राजकीय-सामाजिक प्रश्नांना अर्थातच महत्त्व होतं; पण त्याचबरोबर ‘अक्षर’मध्ये ज्याप्रमाणे सगळी क्षेत्रं कव्हर करण्याचा कटाक्ष असे, तसंच  इथेही होतं. फक्त आता वर्षातून एकदा नव्हे, तर रोजच्या रोज ते भान बाळगायचं होतं. ‘अक्षर’मध्ये आतल्या पानांचा ले-आऊट चांगला होण्यावर निखिलचा नेहमी भर असे. मराठीत तेव्हा फक्त लिखित शब्दाला महत्त्व देण्याचा ट्रेंड होता. सरसकट नाही, पण सर्वसाधारणपणे. निखिलने तो लिखित शब्द तितक्याच नेटकेपणाने सजवला जावा, हे रुजवलं. ले-आऊट करताना फोटो मोठे असायला हवेत, ते डाव्या पानावर असावेत की उजव्या याचं भान ठेवणं, इंट्रो घेणं, कोट्‌स काढणं, कॅप्शन्समध्ये सर्जनशीलता आणणं; थोडक्यात व्हिज्युअली अंक चांगला होईल याकडेही लेखांच्या गुणवत्तेएवढंच लक्ष देणं, यावर त्याचा भर असायचा.

‘महानगर’चा ले-आऊटही फ्रेश वाटायचा. लक्षात घ्या, आज सगळी वर्तमानपत्रं रोज पुरवण्या काढतात. शनिवारी आणि रविवारी त्या मोठ्या असतात आणि आज वर्तमानपत्रं म्हणजे जणू बातम्या देणारं मॅगझिन झालंय. पण 1990 च्या सुरुवातीच्या काळात ही परिस्थिती नव्हती. मराठीत तर नव्हतीच नव्हती. त्यामुळे ‘महानगर’चं वेगळेपण अधोरेखित झालं. संध्याकाळचं वृत्तपत्र असूनही ‘महानगर’ची तुलना ‘सकाळ’च्या दैनिकांशी केली जायची. तिथे आठवड्यातून एकदा अशोक राणे जागतिक वा भारतीय सिनेमाविषयी लिहीत असे. पंधरा दिवसांतून एकदा सुनील गावसकरचं सदर असे. चित्रकलेवर कॉलम असायचा. शेवटच्या पानावर बिझिबीसारखा नर्मविनोदी कॉलम वेगवेगळे लेखक (राजदीप सरदेसाई, अनंत भावे, अवधूत परळकर, संजय पवार इ.) लिहीत. ‘महानगर’मध्येही नव्या लेखकांना नेहमीच महत्त्वाची जागा मिळत गेली. एडिट पेजवर येणाऱ्या कॉलम्समध्येही खूप वैविध्य असायचं. रत्नाकर मतकरी, भालचंद्र मुणगेकर, अरुण साधू, खुशवंतसिंग, सतीश तांबे, निळू दामले, अरुण शौरी अशा अनेकांचे कॉलम्स येत. शौरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात लिहिल्यानंतर दलित संघटनांनी ऑफिसवर मोर्चा आणला होता. तेव्हा निखिलने त्यांना ठामपणे सांगितलं होतं, ‘मी शौरींच्या विचारांशी सहमत नाही, पण त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या!’ असे वाद तर ‘महानगर’ने किती तरी पचवले.

पण हे झालं निव्वळ दैनिकाच्या निर्मितीविषयी. त्या पलीकडे समाजाशी असलेली आमची बांधिलकी ‘महानगर’च्या माध्यमातून व्यक्त होत असे. राजकारणाच्या होत असलेल्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात ‘महानगर’ने मोहीम उघडली होती. शरद पवारांचं हितेंद्र ठाकूर किंवा पप्पू कलानी यांच्याशी होणारं साटं- लोटं असेल किंवा हितेंद्र ठाकूरच्याच विरोधात वसई- विरारच्या नागरिकांनी केलेल्या लढ्याला दिलेली साथ असो. गो.रा. खैरनार यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याची अनधिकृत बांधकांमांविरोधी मोहीम असो किंवा ‘निर्भय बनो’सारखं आंदोलन असो. दत्ता इस्वलकरांच्या गिरणी कामगार संघर्ष समितीचा लढा असो किंवा मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन असो. ‘महानगर’ यात नेहमी आघाडीवर राहिलं.

पूर्वी निखिल नेहमी म्हणायचा, ‘‘आपण एक पर्यायी माध्यम म्हणून ‘महानगर’कडे बघायला हवं. प्रस्थापित वर्तमानपत्रांकडे आहे तेवढं आर्थिक बळ आपल्यापाशी नाही; पण आपण म्हणजे पत्रकारितेची शाळा आहोत. एक दिवस असा येईल, की इथे शिकून गेलेली मुलं महाराष्ट्रातल्या मुख्य प्रवाहातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये दिसतील.’’ आज त्याचं म्हणणं बऱ्याच अंशी खरं झालेलं दिसतं. युवराज मोहिते किंवा वैशाली रोडेसारखे पत्रकार आजही अभिमानाने ‘‘आम्ही ‘महानगर’चं प्रॉडक्ट आहोत,’’ असं सांगतात. काही वेळा एखाद्या कार्यक्रमात कुणी तरी मुलगी येते आणि ‘मॅडम, मी महानगरमध्ये दोन महिने काम केलंय’ असं सांगते तेव्हा मजा वाटते, बरं वाटतं आणि अभिमानही वाटतो.

याचा अर्थ ‘महानगर’चा प्रवास हा अगदी सहज-सोपा होता, असं अजिबातच नाही. किंबहुना, खाचखळगेच जास्त होते. पर्यायी माध्यम म्हणून आम्ही ते चालवत असलो, तरी मुख्य प्रवाहातल्या वर्तमानपत्रांना लागू होणारे बाजारातले नियम आम्हालाही लागू होत होते. कागदाचे दर, प्रिंटिंग प्रेसचे दर हे काही कुणी आमच्यासाठी कमी करत नव्हतं; तसं करावं अशी अपेक्षाही नव्हती. सांगायचंय एवढंच की, ही एक तारेवरची कसरत होती. जेवढा काळ जमली, तेवढा काळ आम्ही ती केली.

आज मागे वळून बघताना असंही वाटतं की, हळूहळू ‘महानगर’चं बहुमुखी असणं कदाचित कमी झालं असावं. आमचं वृत्तपत्र समाजाचे लढे लढताना एककल्ली झालं असावं. दुर्दैव म्हणजे, या समाजाला त्याच्याशी फार देणं- घेणं नव्हतं. पैशाची ओढाताण असली की, मनात  असलेल्या अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवता येत नाहीत. इच्छा असूनही बदल करण्यासाठी आवश्यक तेवढी मॅन पॉवर आणता येत नाही.

आम्ही दोघेही एकत्र काम करत असल्यामुळे व्यक्तिगत आयुष्यातही याचा परिणाम झाला का? अर्थातच झाला. काही वेळा निखिल खूप निराश व्हायचा. तेव्हा मी एकहाती गाडा रेटायचा प्रयत्न करायचे. आणि ‘आपलं कसं होणार’, या भीतीने मी कॉम्प्युटरवर रात्र-रात्र गेम्स खेळत बसायचे; तेव्हा ‘आपलं चांगलंच होणार’, अशी ग्वाही निखिल मला द्यायचा. या कशाचीही झळ आपल्या मुलाला लागणार नाही याची काळजी मात्र आम्ही दोघेही घेत होतो. साहजिकच थोड्या कळत्या वयात ‘आपल्या घरात आर्थिक तंगी आहे’ हे पार्थला जाणवत असणारच, पण त्याला इलाज नव्हता.

आम्हाला 1991 मध्ये मुलगा झाला आणि माझ्या मते निखिल आमूलाग्र बदलला. म्हणजे, पार्थने त्याला आपोआप बदलायला लावलं. पार्थ अगदी लहान असताना कुठे गेट टुगेदर असलं की, आम्ही दोघेच जायचो. निखिल नातेवाइकांमध्ये फारसा मिसळायचा नाही. पण कळू लागल्यावर पार्थ म्हणू लागला- ‘सगळ्यांचे आई-बाबा असतात, बाबाने पण आपल्याबरोबर यायला हवं.’ त्याच्यासाठी म्हणून निखिल आम्हा नातेवाइकांच्या घरी असलेल्या लहान मुलांच्या बर्थडे पाटर्यांमध्ये सहभागी होऊ लागला आणि त्याला ते आवडूही लागलं. पार्थसाठी निखिल छोट्या-छोट्या कविता करायचा आणि अनेकदा (वेडावाकडा) नाचही. माझ्या भाच्या तर म्हणायच्याही, ‘निखिलकाका, बाहेरच्या कुणी तुला असं बघितलं तर लोकांना तोच तू, हे खरं वाटणार नाही.’

पण तत्त्वांच्या बाबतीत घरात एक आणि बाहेर एक हे निखिलने कधीच मानलं नाही. पार्थला कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं, असा प्रश्न आला; तेव्हा माझं मत इंग्लिश असं होतं. पण मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावं, असं निखिलने त्या आधी अनेकदा जाहीरपणे म्हटलेलं आणि लिहिलेलं होतं. आणि त्याचा तसा आग्रहही होता. म्हणून मी माघार घेतली. आपण जे बोलतो ते खासगी आयुष्यात अमलात आणत नाही, असं होणं निखिलसाठी त्रासदायक असणार याची जाणीव मला होती. 2006 मध्ये निखिलचा टीव्हीवरचा प्रवास सुरू झाला. तो आयबीएन-लोकमतचा संपादक झाला. माध्यम नवीन होतं. पण निखिल तिथेही अगदी सहजी सेट्‌ल होऊ शकला. टीव्हीची लोकप्रियता काय असते याचा अनुभव यामुळे आला. आम्ही शिवाजी पार्कवर चालायला जातो तेव्हा अनेक तरुण मुलं-मुली निखिलबरोबर फोटो काढून घ्यायला येतात. या चॅनेलने निखिलला खूप जास्त लोकांपर्यंत पोचवलं यात शंकाच नाही.

पण त्याची पत्रकारिता वेगळी होती असं मला वाटत नाही. ‘महानगर’मध्ये त्याचा जो विचार होता तोच इथेही होता. उलट, इथे त्याला आर्थिक बोजा घ्यायचा नव्हता. मनातल्या कल्पना अधिक ताकदीने राबवता येत होत्या. पण मूळ पत्रकारिता तीच होती, त्यातली तत्त्व तीच होती. कॅनव्हास खूप मोठा होता इतकंच. यश मिळाल्यावर पाय हवेत जाण्याची खूपच शक्यता असते. त्यातून आयबीएनलोकम तसारखं खूप व्यापक माध्यम मिळाल्यानंतर तर अधिकच!

जमिनीवर राहण्यासाठी निखिलला पार्थचा आणि माझा खूप फायदा झाला, असं मुळी माझं म्हणणंच आहे. कारण आम्ही दोघे आणि घरातले आणखी दोन-चार जण सोडले तर निखिलला त्याची चूक स्पष्टपणे सांगणारी फार थोडी माणसं आहेत. मग ती वागण्यातली असेल किंवा निर्णयातली असेल... कामाच्या बाबतीतले त्याचे बहुतेक निर्णय मला मान्य असत. आमची कामाची पद्धत, वागायची पद्धत आणि स्वभाव भिन्न आहेत; पण मूलभूत गोष्टींबाबत आमचं कधीच दुमत झालेलं नाही. त्याच्यात अनेक दोष आहेत, माझ्यातही आहेत, आपल्या प्रत्येकात असतात. त्याच्या चुका होतात, माझ्याही होतात, आपल्या सगळ्यांच्या होतात. पण मुळात हे पॅकेज डील असतं ना? ‘एकमेकांबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचंय का’ या प्रश्नाचं उत्तर वेळोवेळी ‘होय’ असंच येत असेल, तर एकमेकांना गुण-दोषांसकट स्वीकारायचं- यात आपण काही फार मोठं करत नसतो ना?  

Tags: मीना कर्णिक निखील वागळे आयबीएन लोकमत अक्षर महानगर प्रेरणादायी युवा दिवाळी अंक meena karnik akshar mahanagar nikhil wagale inspirational yuwa diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात