डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

रवींद्रनाथ टागोर डॉक्युमेंटरी - सत्यजित रे

या डॉक्युमेंटरीला भारतात राष्ट्रपती सुवर्णकमळ, लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं गोल्डन सील आणि उरुग्वेमधलं मानाचं माँटव्हिडिओ फिल्म फेस्टिव्हलमधलं पारितोषिक मिळालं होतं.

एखादं चांगलं पुस्तक किंवा लेख आपल्याला अनेकानेक लेख, पुस्तकं वाचायला किंवा काही चित्रपट पाहायला उद्युक्त करतो, तसं ही डॉक्युमेंटरी रवींद्रनाथ यांच्याबद्दल पुढच्या अभ्यासाला चालना देते. कोणत्याही उत्तम कलाकृतीचं काम आपल्याला जास्त विचारप्रवृत्त करणं हे असतं. या अर्थानं ही डॉक्युमेंटरी आपल्या देशातल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल विविधांगी विचार करायला भाग पाडते. शेवटी बा.भ. बोरकर यांची ही कविता आठवल्यावाचून राहत नाही...!

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा,

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा...

त्या दोघांनीही भारताचे नाव जागतिक पातळीवर पोचवले. दोघेही आंतरराष्ट्रीय मानसन्मानाचे धनी. एकाला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं, तर दुसऱ्याला चित्रपटांच्या दुनियेतले प्रतिष्ठेचे ऑस्कर पारितोषिक. दोघेही ब्राह्मो समाज या हिंदू धर्मातल्या पंथानुसार मार्गक्रमण करणारे. दोघांचंही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. एक महान साहित्यिक, कवी, गीतकार, नाटककार, संगीतकार, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, क्रांतिकारी आणि चित्रकार. दुसरा महान दिग्दर्शक, पटकथालेखक, लेखक, कवी, कॅलिग्राफर आणि संगीतकार. दोघंही बंगाली बाबू..! हे दोघं म्हणजे अर्थातच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे.

बहुविध क्षेत्रांत जो तज्ज्ञ असतो, त्याला रेनासान्स मॅन म्हटलं जातं. मेटॅफिजिक्स, कविता, भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र, संगीत, नाट्य, प्रशासन, राजकारण, जीवशास्त्र, एथिक्स आणि प्राणिशास्त्र अशा अनेक विषयांवर अभ्यास व लिखाण करणारा ॲरिस्टॉटल; मोनालिसा किंवा द लास्ट सपर या चित्रांमुळे जगद्‌विख्यात असलेला आणि हेलिकॉप्टर, सौरऊर्जा, कॅल्क्युलेटर, भूगर्भशास्त्रातली टेक्टॉनिक्स अशा निरनिराळ्या कल्पना सोळाव्या शतकात मांडणारा लिओनार्दो दा विंची हा फ्लोरेन्समधला चित्रकार- अशी रेनासान्स मॅनची अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात.

भारतातला रेनासान्स मॅन म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, लघुकथा, निबंध, प्रवासवर्णनं, नाटकं, कविता, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी यातून भारतातले साहित्य, संगीत आणि समग्र कलाविश्वाचा चेहरामोहराच बदलून गेला. त्यांची 200 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले ते खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूला जवळपास 60 वर्षे उलटून गेल्यानंतरही कलकत्त्यामध्ये टागोरांच्या प्रतिमा सर्वत्र दिसतात. त्यांची गाणी प्रत्येक चौकात ऐकू येतात. पुस्तकांच्या दुकानात त्यांच्या पुस्तकांचा स्वतंत्र विभाग असतो. आजही जगातला कोणताही बंगाली माणूस त्यांचे ऐकून वा उच्चारून भावुक होतो. टागोरांच्या शांतिनिकेतनमध्येच सत्यजित रे हे चित्रकला शिकले.  नंतरच्या काळात त्यांची चित्रं-रेखाचित्रं हजारो कलाकारांना प्रेरित करून गेली. सत्यजित रे यांच्या विचारांवर टागोरांच्या विचारांचा विलक्षण पगडा होता. आपल्या आयुष्यात 36 चित्रपट काढणारे सत्यजित रे यांनी टागोरांच्या साहित्यावर एकूण पाच चित्रपट काढले.

आपल्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीची जगाला ओळख करून देणारे रे यांनी आपल्या एका डॉक्युमेंटरीमधल्या सुरुवातीच्या 10 ते 12 मिनिटांबद्दल ‘मोस्ट मूव्हिंग अँड पॉवरफुल थिंग्ज दॅट आय हॅव प्रोड्युस्ड’ असे उद्‌गार काढले होते. ती डॉक्युमेंटरी म्हणजे रवींद्रनाथ टागोर...! रवींद्रनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1961 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहावरून सत्यजित रे यांनी ही डॉक्युमेंटरी काढली होती. रवींद्रनाथ टागोर यांची जडण-घडण, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पडलेल्या गोष्टी, माणसं- असं सगळं आपल्यासमोर या डॉक्युमेंटरीतून एखाद्या नादमधुर कवितेसारखंच उलगडत जातं.

या 54 मिनिटांच्या कृष्ण-धवल डॉक्युमेंटरीच्या पहिल्या दृश्यात रवींद्रनाथांच्या शवयात्रेला  लोटलेला जनसमुदाय दिसतो. हा माणूस शब्द, संगीत व कविता, कल्पना आणि आदर्श यांचा वारसा मागे सोडून गेला आहे. आत्ताच्या आणि भावी पिढ्यांसाठी तो आपल्याला प्रेरणादायी आहे, अशा अर्थाची वाक्यं पार्श्वभूमीवर ऐकू येतात. तो आवाज प्रत्यक्ष सत्यजित रे यांचाच आहे.

डॉक्युमेंटरीत यानंतरच्या दृश्यांमध्ये टागोर कुटुंबाची कुटुंबरेषा दिसते. आठव्या शतकापासून बंगालमध्ये स्थायिक झालेलं टागोर कुटुंब मूळचं कनौजचं होतं. द्वारकानाथ टागोर हे रवींद्रनाथांचे आजोबा. त्यांचा मोठा मुलगा देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे वडील. देवेंद्रनाथांच्या चौदा मुलांमधला रवींद्रनाथ म्हणजे रवी हा सर्वांत धाकटा मुलगा. टागोरांचं कुटुंब प्रतिष्ठित आणि समाजात अनेक कारणांनी मान्यता पावलेलं होतं. देवेंद्रनाथ स्वत: लंडनमध्ये जात-येत असत. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते.

देवेंद्रनाथांच्या 14 मुलांमधले अनेक जण लेखक, चित्रकार आणि संगीतकार होते. द्विजेंद्रनाथ हा रवींद्रनाथांचा सर्वांत मोठा भाऊ कवी होता. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार होते. स्वर्णकुमारी देवी ही रवींद्रनाथांची  बहीण. ती भारतातली पहिली स्त्री-कादंबरीकार होती. एकूण, टागोरांचं घर हे अनेक कलांचं दालन होतं. नाटकं, संगीताचे जलसे घरात चालत. आम्ही सगळेच लिहीत, गात, वाचत, अभिनय करत. स्वत:मधलं सगळं सर्वांगानं व्यक्त होत असायचं, असं प्रत्यक्ष रवींद्रनाथांनीच बालपणाबद्दल लिहून ठेवलं आहे.

सत्यजित रे यांनी या डॉक्युमेंटरीत काही प्रसंग नाट्यमयरीत्या वापरले आहेत. त्यापैकी एका प्रसंगात शाळेत अत्यंत भकास, एकाकी बसलेला लहानगा रवी दिसतो. त्याला समोर मास्तर जे  शिकवत असतात, त्यात काडीचा रस नसतो. वर्गाच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याला खुणावत असतो. त्यामुळे अनेक शाळा बदलूनही रवींद्रनाथांची कोणत्याच शाळेशी नाळ जुळली नाही.

अखेरीस ते घरीच शिकले.  हेमेंद्रनाथ या त्यांच्या भावानं त्यांना इतर विषयांबरोबर कुस्ती, पोहणं अशा गोष्टीही आवर्जून शिकवल्या. त्या शिकण्यातून व बुद्धिमान भावंडांच्या सहवासामुळे लहानपणापासूनच बुद्धिझम, संस्कृत काव्य, इंग्रजी साहित्य, सूफी आणि बंगाली बाऊल परंपरा या सगळ्यातून रवींद्रनाथांनी प्रेरणा घेतली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून किशोरवयातच ते कविता आणि नाटकं लिहीत होते. तेराव्या वर्षी त्यांनी लिहिलेली कविता एका मासिकात छापूनही आली होती.

यादरम्यान वडिलांबरोबर डलहौसी आणि नंतर अमृतसर या दोन्ही ठिकाणी फिरत असताना कालिदासाच्या नाटकांपासून इतिहासापर्यंत अनेक गोष्टींचा  रवींद्रनाथांनी अभ्यास केला. ते या डॉक्युमेंटरीत उत्तमरीत्या पाहायला मिळतं.

वयाच्या सतराव्या वर्षी रवींद्रनाथ लंडनला गेले. त्यांनी बॅरिस्टर व्हावं, अशी देवेंद्रनाथ यांची इच्छा होती. पण त्या शिक्षणातही रवींद्रनाथ रमले नाहीत. शेक्सपिअरची नाटकं आणि पाश्चात्त्य संगीत यांचा अभ्यास करून वकिलीचं शिक्षण पुरं न करताच ते कलकत्त्याला परतले. त्या सुमारास त्यांनी ‘वाल्मीकी प्रतिभा’ हे नाटक लिहिलं. या नाटकाला त्यांनी दिलेलं संगीत हे पाश्वात्त्य आणि भारतीय रागसंगीतावर आधारित होतं. यातली वाल्मीकीची भूमिकाही त्यांनी स्वत: केली होती.

वयाच्या 22 व्या वर्षी 1883 मध्ये रवींद्रनाथांचं मृणालिनीदेवी यांच्याशी लग्न झालं. ते 1901 मध्ये आपली दोन मुलं आणि पत्नी यांच्याबरोबर शांतिनिकेतन या ठिकाणी राहायला गेले.

पारंपरिक शिक्षणपद्धतीचा त्यांनी घेतलेला धसका, आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळावं ही इच्छा आणि उपनिषदांवरून प्रेरणा घेऊन त्यांनी शांतिनिकेतन या ठिकाणी शाळा सुरू करायचं ठरवलं. या शाळेसाठी पैसे जमवताना त्यांनी काही पुस्तकांचे हक्क आणि बायकोचे दागिने विकले होते. शिक्षणाच्या बाबतीत आपण जे सहन केलं ते पुढच्या पिढ्यांना सहन करायला लागू नये असं वाटून, त्याबद्दल कळवळीनं विचार करून, त्यावर कृती करून आपल्याच आयुष्यात ही भव्य-दिव्य स्वप्नवत्‌ शाळा रवींद्रनाथांनी उभी केली. शांतिनिकेतनमध्ये शाळा सुरू करताना ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, हा त्यांचा प्रमुख हेतू होता. पुढची 30 वर्षं त्यांनी ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी अपार कष्ट घेतले. सत्यजित रे, अमर्त्य सेन आणि इंदिरा गांधी हे शांतिनिकेतनमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी आहेत.

मात्र याच काळात रवींद्रनाथांची बायको, दोन मुलं आणि कादंबरीदेवी ही त्यांच्या भावाची बायको असे सर्व जण मरण पावले. रवींद्रनाथांनी तेव्हा आपल्या सगळ्या भावना कवितांमधून व्यक्त केल्या.

रवींद्रनाथांच्या या कवितांचा इंग्रजी अनुवाद 1912 मध्ये विल्यम रॉथेनस्टाईनच्या हातात पडला. रॉथेनस्टाईन हा चित्रकार आणि कलाविषयक लिखाण करणारा इंग्लंडमधला समीक्षक होता. टागोरांच्या कवितांनी तो कमालीचा प्रभावित झाला. त्यानं त्या कविता डब्ल्यू.बी. यीट्‌स या महान कवीला पाठवल्या. यीट्‌स त्या कवितांमध्ये कित्येक दिवस बुडून गेला होता. आपल्या कवितांसाठी टागोरांकडून प्रेरणा घेतल्याचं पत्रही यीट्‌सनं रॉथेनस्टाईनला पाठवलं होतं. तोपर्यंत टागोर भारतात प्रसिद्ध असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते कोणाला फारसे ठाऊक नव्हते. मात्र 1913 मध्ये ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यांचं नाव जगभर पोचलं. त्यांना 1915 मध्ये लंडनमधला मानाचा सर हा किताबही मिळाला.

रवींद्रनाथांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना 1918 मध्ये केली. आपली नोबेल पारितोषिकाची सर्व रक्कम त्यांनी विश्वनिकेतनच्या उभारणीसाठी दिली. यावर पु.ल. देशपांडे यांनी ‘वंगचित्रे’ या पुस्तकात अप्रतिम लिहिलं आहे. ते म्हणतात : कसली धुंदी घेऊन जगली ही माणसे? त्या त्यागाचीच धुंदी. नव्या निर्मितीची, नव्या प्रयोगांची. स्वत: गुरुदेवांनी नोबेल प्राईझची लक्षावधी रुपयांची रक्कम ‘इदम न मम’ या भावनेने आश्रमार्पणामस्तु केली. सहकाऱ्यांनी आपापल्या जीवनाच्या आहुती टाकल्या. या साऱ्यांनी डोळ्यांपुढे उभी केलेली स्वप्नेच एवढी मोठी होती की, ती प्रत्यक्षात आणायला कुबेराचे भांडार अपुरे पडले असते. आकाशातल्या नक्षत्रांपासून ते नूपुरांच्या झणत्कारापर्यंत विपुल समग्रतेचा साक्षात्कार घडवून घेऊन इथला प्रत्येक छात्र आणि छात्री जीवनात आपली आयुष्यनौका लोटायला समर्थ करून पाठवू, असा संकल्प सोडून हे सारे ऋषी त्या तपोवनात सज्ज झाले होते. ऋषी नित्यनूतन प्रयोगात दंग असतात. वृद्ध विचारांना ते आलिंगन देऊन बसत नाहीत आणि नव्या विचारांच्या पदाघातांना भीत नाहीत. यौवनाची आव्हाने स्वीकारीत असतात. काल त्यांना जखडून ठेवत नाही, उद्या भेडसावीत नाही आणि आजकडे ते निर्भय डोळ्यांनी पाहतात.

शांतिनिकेतन व विश्वभारती या दोन शिक्षणसंस्थांसाठी देणग्या गोळा करताना रवींद्रनाथांनी जगप्रवास केला होता. आपल्या अखंड भ्रमंतीत टागोर तेव्हा रोमाँ रोलाँ या विचारवंताला, चार्ली चॅप्लिन या कलावंताला आणि अल्बर्ट आइन्स्टाईन या बुद्धिवंताला भेटले होते. टागोर हे विचारवंत कवी होते, आइन्स्टाईन कविवृत्तीचा विचारवंत होता. दिमित्री मेरिआनऑफ यानं आइन्स्टाईन आणि रवींद्रनाथ ही दोन ग्रहांची भेट असल्याचं म्हटलं होतं.

कलकत्त्यात संशोधनात गढून गेलेले जगदीशचंद्र बोस यांच्याशीही तेव्हा रवींद्रनाथांचा स्नेह होता. भारतात तेव्हा चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीतही रवींद्रनाथ सक्रिय होते. लॉर्ड कर्झनच्या बंगालच्या फाळणीच्या तत्त्वांना त्यांचा सक्त विरोध होता. इतकंच नव्हे तर, 1919 च्या जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर त्यांनी सर हा किताब परत करून टाकला होता. डॉक्युमेंटरीत हा भाग चित्रं, वृत्तांकनं आणि रेखाटनं यांच्या साह्यानं दाखवला आहे.

यानंतरच्या काळात व्हिक्टोरिया कांपो या मैत्रिणीला त्यांनी आपली काही रेखाटनं दाखवल्यावर तिनं विचारलं, ‘तू चित्रं का काढत नाहीस?’ तेव्हा चित्रकलेचं शिक्षण अजिबात घेतलेलं नसताना वयाच्या 67 व्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रं काढायला सुरुवात केली. पुढच्या 13 वर्षांत त्यांनी 3000 पेक्षा जास्त चित्रं काढली.

रवींद्रनाथ शेवटच्या काही वर्षांमध्ये शांतिनिकेतन सोडून लहानपणी राहिले होते त्या जोरासांकोमधल्या घरात येऊन राहिले होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी युरोपमधला वाढता हिंसाचार पाहिला. वयाच्या 80 व्या वर्षीदेखील त्यांनी फॅसिझमविरोधात आवाज उठवला. आत्मकेंद्री राजकारण आणि राष्ट्रवाद कोणत्याही संस्कृतीला घातक ठरू शकतो, असं त्यांचं मत होतं.

त्यांनी 1941 मध्ये ‘क्रायसिस इन सिव्हिलायझेशन’ हा निबंध लिहिला होता. त्यातल्याच एका भागातल्या ओळींनी या डॉक्युमेंटरीचा शेवट होतो. रवींद्रनाथ लिहितात- ‘भोवती मला संस्कृतीची लक्तरं दिसतात. सगळं भकास झालेलं दिसतं. पण माणसाच्या माणूसपणावरचा माझा विश्वास संपवण्याचं पाप मी करणार नाही. हे भयचक्र संपेल, वातावरण परत एकदा त्यागासारख्या उदात्त भावनांनी भरून जाईल आणि इतिहासात एक नवं प्रकरण सुरू होईल याची मला खात्री आहे. कदाचित ज्या दिशेला सूर्य उगवतो, त्या पूर्वेकडच्या देशांमधूनच नवी पहाट जन्मेल. आपला मानवतावादाचा वारसा सर्व अडथळे ओलांडून परत एकदा मानवजात चोखाळेल. तो दिवस लवकरच उगवेल...!’

‘पथेर पांचाली’ हा सत्यजित रे यांचा चित्रपट पाहिल्यानंतर अकिरा कुरोसावा या महान दिग्दर्शकानं ‘माझ्या मनातली खळबळ मी कधीच विसरणार नाही’ असे उद्‌गार काढले होते. सत्यजित रे यांची रवींद्रनाथांवरची डॉक्युमेंटरीदेखील प्रेक्षकांच्या मनावर तितकाच उत्कट परिणाम घडवून आणते. टागोरांचा जीवनपट एका तासाच्या डॉक्युमेंटरीत इतक्या समर्थपणे फक्त सत्यजित रेच उलगडून दाखवू शकतात. डॉक्युमेंटरी कशी असावी, कॅमेरा कसा वापरावा, डॉक्युमेंटरीचा वेग कसा राखावा, आवाजाचा वापर, त्यातला भारदस्तपणा, प्रत्येक दृश्यासाठी चपखल बसणारं शब्दवर्णन, पार्श्वसंगीत... या डॉक्युमेंटरीतील सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटरीत अभ्यासण्याजोग्या आहेतच. महत्त्वाचं म्हणजे ही रवींद्रनाथांचा प्रचार करत नाही.

या डॉक्युमेंटरीला भारतात राष्ट्रपती सुवर्णकमळ, लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं गोल्डन सील आणि उरुग्वेमधलं मानाचं माँटव्हिडिओ फिल्म फेस्टिव्हलमधलं पारितोषिक मिळालं होतं.

एखादं चांगलं पुस्तक किंवा लेख आपल्याला अनेकानेक लेख, पुस्तकं वाचायला किंवा काही चित्रपट पाहायला उद्युक्त करतो, तसं ही डॉक्युमेंटरी रवींद्रनाथ यांच्याबद्दल पुढच्या अभ्यासाला चालना देते. कोणत्याही उत्तम कलाकृतीचं काम आपल्याला जास्त विचारप्रवृत्त करणं हे असतं. या अर्थानं ही डॉक्युमेंटरी आपल्या देशातल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल विविधांगी विचार करायला भाग पाडते. शेवटी बा.भ. बोरकर यांची ही कविता आठवल्यावाचून राहत नाही...!

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा,

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा...

डॉक्युमेंटरीची युट्यूब लिंक

Tags: साधना सिनेमा सदर सत्यजित रे रवींद्रनाथ टागोर डॉक्युमेंटरी sadhana cinema sadhana sadar sadar satyajit rey ravindranath tagore documentaries weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके