डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डॉक्युमेंटरीया सगळ्या अन्नचक्राचे अनेक घातक परिणाम झाले आहेत, हीच बाजू जास्त जाणवत राहते. त्यातला महत्त्वाचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणाचं प्रमाण जगभरात 1975 पासून तिप्पट झालं आहे. 2016 मध्ये 18 वर्षांवरच्या 190 कोटी माणसांचं वजन प्रमाणापेक्षा खूप जास्त होतं. 1 ते 5 या वयोगटातल्या 3.8 कोटी मुलांचं वजन 2019 मध्ये लठ्ठपणाकडे झुकणारं होतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणं, रक्तदाब वाढणं, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग, संधिवात, पचनसंस्थेचे विकार आणि झोपेचं चक्र बिघडणं असे आजार होण्याची दाट शक्यता असते. जास्त वजन असलेल्या मुलांना शाळेत चिडवलं जातं. त्यांना नैराश्य येऊ शकतं. तसंच वाढलेलं वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या उपाययोजनांमुळे मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डरचं प्रमाणही वाढत चाललं आहे. यामागचं महत्त्वाचं कारण आहे फास्ट फूड.

अमेरिकन टेलिव्हिजनवर 1996 मध्ये ओप्रा विनफ्री हिच्या एका टॉक शोचा विषय होता : धोकादायक खाद्य पदार्थ- डेंजरस फूड. ‘हँबर्गर या तिथल्या लोकप्रिय खाद्य पदार्थावर टीका करणं शक्य आहे का?’ अशी त्या कार्यक्रमात चर्चा झाली. आपल्याला आधी हा एखाद्या टीव्हीवरच्या कार्यक्रमाचा विषय कसा असू शकतो, हेच कळणं अवघड आहे. पुण्यापुरतं बोलायचं झालं तर ‘वैशाली हॉटेलमधल्या इडली-सांबारला पुणेकरांना नावं ठेवता येतील का?’ हा टेलिव्हिजन कार्यक्रमाचा विषय होऊच शकत नाही.

पण अमेरिकेत ‘फूड लिबेल लॉ’ असा एक प्रकार आहे. यात अलाबामा, ॲरिझोना, ओहिओ अशा 13 राज्यांमध्ये खाद्य पदार्थांवर टीका करायला कायद्यानं बंदी आहे.  एखाद्यानं खाद्य पदार्थांवर टीका केली, तर तो खाद्य पदार्थ तयार करणारा उत्पादक त्याच्यावर टीका करणाऱ्यावर या कायद्यानुसार  फिर्याद दाखल करू शकतो.

यामुळेच 1997 च्या डिसेंबरमध्ये ओप्रा आणि तिचा कार्यक्रम सादर करण्यात सहभागी असलेला होवार्ड लिमन याच्यावर 1 कोटी  डॉलर्सची केस झाली. लिमन हा तेव्हा ह्युमेन सोसायटीचा संचालक होता. या दोघांनी कार्यक्रमादरम्यान बीफ या मांसाच्या प्रकाराला नावं ठेवली, असा त्यांच्यावर आरोप होता. आता नावं ठेवली म्हणजे, या दोघांनी नक्की काय केलं होतं, ते पाहू.

ओप्राच्या कार्यक्रमाच्या आधीच्या महिन्यात ब्रिटनमध्ये जनावरांच्या मॅड काऊ या रोगामुळे माणसांना Creuzfeldt- Jakob disease (CJD) हा मेंदूविकार होऊ शकतो, असं तिथल्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. या वक्तव्याचा आधार घेऊन अमेरिकेतही गुरांना मॅड काऊ झाल्यानं (CJD)  हा मेंदूविकार माणसांमध्ये पसरू शकतो, असा दावा ओप्राच्या कार्यक्रमात लिमननं केला होता.

मुळात जनावरांना मॅड काऊ कसा होतो? तर- गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या या पशू-पक्ष्यांना फार्मवर खायला घालताना मेलेल्या जनावरांची हाडं किंवा प्राण्यांच्या शरीराचे इतर भाग स्वस्त प्रोटिनयुक्त अन्न म्हणून खायला  घातले जातात. त्यातून मॅड काऊ पसरू शकतो. खाद्य पदार्थांसाठी ज्यांची कत्तल केली जाते, त्या जनावरांना अशा प्रकारे खायला घालणं हे अमेरिकेतही सर्रास चालत होतं. लिमननं हे समजावून सांगितल्यावर ओप्रानं ‘मला हे ऐकून बर्गर खायचीच भीती वाटायला लागली; तुम्हालाही काळजी वाटायला लागली का?’ असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला होता. हा प्रश्न वादग्रस्त ठरला.

या कार्यक्रमानंतर अमेरिकेत मांसाचा खप कमी झाला. मॅड काऊ पसरेल या भीतीनं गुरांना जे अन्न दिलं जातं, त्यात मेलेल्या गाई-म्हशी आणि मेंढ्या यांच्या शरीराचे भाग वापरायला अमेरिकेतल्या कृषी खात्यानं बंदी केली. कॅटल फार्मवाल्यांची चांगलीच पंचाईत झाली.

अमेरिकेत टेक्सास राज्य हे कॅटल फार्म या उद्योगाचं केंद्र होतं. टेक्सास या राज्याचे कृषी विभागाचे संचालक असलेले रिक पेरी तेव्हा अमेरिकेत केंद्र सरकारात एनर्जी सेक्रेटरी होते. त्यांच्या मदतीनं कॅटल फार्म उद्योगाची चक्रं भराभर फिरली. टेक्सासमधल्या कॅक्टस फीडर्स इनकॉर्पोरेशनचा प्रतिनिधी पॉल एंग्लर यानं विनफ्री आणि लिमनवर केस ठोकली. याचा परिणाम म्हणून अमेरिकेत ‘फूड लिबेल लॉ’ हा प्रकार सुरू झाला.

फूड इनकॉर्पोरेशन या रॉबर्ट केन्नरनं दिग्दर्शित केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये हे सगळं पाहायला मिळतं. ‘फास्ट फूड नेशन’ या पुस्तकाचा लेखक एरिक श्लॉसर आणि ‘द ओम्निव्होर्स डायलेमा’ या पुस्तकाचा लेखक मायकेल पोलान या दोघांनी ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांसमोर उलगडत नेली आहे.

या डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीस लख्ख प्रकाशातल्या, नीटपणे मांडून ठेवलेल्या, भरगच्च खाद्य पदार्थांच्या स्टोअरमधून कॅमेरा हिंडतो. सुपर मार्केट्‌समध्ये ऋतू नसतात. तिथे 12 महिने हव्या त्या भाज्या, हवी ती फळे ताजी मिळू शकतात. ‘हे कसं?’ हा प्रश्न आपल्याला पडत नाही. अन्न पिकवणारी जमीन, शेतीचे बदलत गेलेले प्रकार, फास्ट फूड तयार करताना होणारी गुरांची कत्तल, याबाबत निरनिराळ्या देशांतल्या सरकारची कृषिविषयक धोरणं आणि खाद्य पदार्थांच्या रेडिमेड पाकिटांबाबतचे कायदे, एफडीएचं कामकाज, खाद्य पदार्थांच्या सुरक्षिततेसंबंधी नियम, फॅक्टरी फार्मिंग या सर्व गोष्टींबद्दल माहिती मिळवण्याचा आपण फारसा प्रयत्न करत नाही. बदलत गेलेल्या खाद्य संसस्कृतीमुळे अन्नाचं आौद्योगिकीकरण कसं झालं, आपलं अन्न जिथून येतं त्या शेतांवर, आपण ज्या सुपर मार्केटसमधून खरेदी करतो आणि रेस्टॉरंट्‌समध्ये खातो त्या सर्व ठिकाणी कॉर्पोरेट कंपन्यांनी कसा ताबा मिळवला आहे, याबाबत आपण संपूर्ण अनभिज्ञ असतो. जेनेटिकली मॉडिफाईड-जीएम या प्रकारातल्या पिकांवर काम करणाऱ्या मोन्साटोसारख्या कंपन्यांनी शेतीवर आणि अर्थचक्रावर किती भीषण परिणाम केले आहेत, हे आपल्यापर्यंत पोचूही शकत नाही.

या सर्व प्रश्नांचा मागोवा फूड इनकॉर्पोरेशन या डॉक्युमेंटरीमध्ये चार भागांत घेतला आहे. अमेरिकन लोक काय खातात याबद्दल मुलाखती, तज्ज्ञांचं त्यावरचं विश्लेषण, प्राण्यांच्या कत्तलखान्यातलं शूटिंग, कारखान्यातल्या कन्व्हेयर बेल्टमध्ये लावलेल्या कोंबड्या आणि त्यांची पिल्लं्‌... आजारी गाई, डुकरं, पहाटे अंधारात पकडलेल्या कोंबड्या, शेतकऱ्यांनी आणि कॅटल फार्मच्या मालकांनी मुलाखतीला दिलेले नकार- अशा अनेक गोष्टी या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्यासमोर वेगानं येत राहतात. मन सुन्न होऊन जातं. ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर लगेच काहीही खाणं शक्य होत नाही.

भारतापुरतं बोलायचं झालं तर, घरात तयार केलेला ताजा स्वयंपाक ही भारतीयांची आवड आहे. पण जागतिकीकरणानंतर जे घरी मिळत नाही, ते हॉटेलमध्ये जाऊन खाणं- ही परंपरा सुरू झाली. त्यातच अमेरिकाप्रेमाची लाट आल्यानंतर कॅनमधलं, फ्रोझन किंवा जंक फूड आणि त्यानं भरलेली सुपर मार्केट्‌स याचा भारतात अतिरेक झाला आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांबाबत आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत, हे लक्षात घेण्यासाठी आपण ही डॉक्युमेंटरी पाहायलाच हवी.

डॉक्युमेंटरीच्या पहिल्या भागात मका या धान्यानं जगात कसं प्रभुत्व मिळवलं आहे, ते दिसतं. खाद्य पदार्थांच्या पाकिटांवर दिसणाऱ्या कॉर्न फ्लोअर, कॉर्नमील, कॉर्न ग्लुटेन, कॉर्नफ्लेक्स, कॉर्नस्टार्च, स्टार्च, व्हेजिटेबल स्टार्च, कॉर्न ऑईल, कॉर्न सिरप, डेक्स्ट्रिन्स, डेक्स्ट्रोज, फ्रूक्टोज, हायड्रॉल, इथेनॉल, मेझ, सॉर्बिटॉल, सेल्युलोज, सॅकरिन, पॉलिडेक्स्टरोज या सर्व उत्पादनांमध्ये मका कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापरलेला असतो. सुपर मार्केटमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या पाकिटांपैकी 90 टक्के उत्पादनांमध्ये मका किंवा सोयाबीन हा एक घटक पदार्थ असतो. मका आता बॅटरी सेल्समध्येही वापरला जातो. मका स्वस्त असल्यानं तो कोंबड्यांना आणि गार्इंनाही खाऊ घालतात. त्यातून त्यांची वाढ भराभर होते. माशांनाही मका खायला शिकवलं जातं. मका खायला घालून वाढवलेल्या कोंबड्यांचं मांस किंवा बीफ हँबर्गरसारख्या फास्ट फूडमध्ये वापरलं जातं.

मक्याचं हे प्रस्थ इतकं कसं वाढलं? तर एक म्हणजे, ते स्वस्त आहे. दुसरं म्हणजे, ते धान्य साठवायला तुलनेनं सोपं आहे. त्याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम यामुळे दुर्लक्षिले गेले. अमेरिकेतली 30 टक्के जमीन मका या पिकासाठी पोषक आहे. शेतकऱ्यांना मका लावायला भरपूर अनुदान मिळतं. त्या योजनांचा लाभ घेऊन तिथे मका अतिरिक्त प्रमाणात लावला जातो. याचा परिणाम म्हणून, मक्याची अतिपैदास होत गेली. मग संशोधकांनी मक्याचा वापर करणारी नवनवीन उत्पादनं शोधली. तसंच सुपर मार्केटमध्ये पोचल्यावर ही उत्पादनं जास्त काळ टिकावीत यासाठीही अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेवर, अन्नावर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी नवनवीन प्रयोग केले.

डॉक्युमेंटरीतला दुसरा भाग हा गाय, म्हैस आणि त्यांचं मांस-बीफ यांवर आधारित आहे. या जनावरांच्या फार्मच्या आकाराची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशी दृश्यं डॉक्युमेंटरीत दिसतात. अशा फार्ममध्ये तासाला 400 गार्इंची कत्तल केली जाते.

बीफमुळे ज्या प्रकाराचा धोका वाढतो तो म्हणजे, इ कोली या प्रकारच्या जिवाणूंमुळे होणारं फूड पॉयझनिंग. इ कोली हा जिवाणू माणसाच्या आतड्यात असतो. तो काही प्राण्यांच्या आतड्यातही आढळतो. इ कोली प्रकारातले  सर्व जिवाणू घातक नसतात, उलट त्यातले काही पचनक्रियेत साह्य करतात. मात्र जर आपण दूषित अन्न खाल्लं किंवा दूषित पाणी प्यायलो, तर काही प्रकारांतल्या इ कोलीमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. काही वेळा न्यूमोनिया आणि मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. अशा संसर्गांमध्ये 75 टक्के ते 95 टक्के कारण इ कोली हा जिवाणू हे असतं. काही प्रकारचे इ कोली तर शिगा हे टॉक्सिन तयार करून तुम्हाला आजारी पाडतात. शिगामुळे आतड्याचा बाहेरचा थर खराब होऊ शकतो. यातलाच एक प्रकार पोटात मुरडा येणं, उलट्या, शौचातून रक्त पडणं इथपर्यंत पोचवू शकतो. मुलांमध्ये किडनी फेल होऊ शकते. ताप, रक्तस्राव, आकडी येणं असे जीवघेणे प्रकार इ कोलीमुळे होऊ शकतात.

इ कोलीचा संसर्ग कसा होतो? वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाच्या तुकड्यांचा एकत्रित भुगा करून ग्राऊंट मीट तयार होतं. ग्राऊंड मीट, अनपाश्चराईज्ड दूध, पाश्चराईज्ड न केलेले फळांचे ज्यूस या पदार्थांमधून इ कोलीचा संसर्ग होऊ शकतो. प्राण्यांची विष्ठा पाण्याच्या स्रोतात मिसळली जाऊन ते पाणी जर शेतीला वापरलं, तर तिथे उगवलेल्या भाज्या/फळं यांमधूनही इ कोली पसरू शकतो.

अमेरिकेत डोले स्पिनॅच या पालक वितरित करणाऱ्या कंपनीनं आपला पालक सगळ्या सुपर मार्केट्‌समधून 2006 मध्ये परत घेतला होता. याचं कारण शोधलं तर, पालकाची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्यानं आपली काही जमीन गुरांच्या फार्मला दिली होती. हा पालक खाल्लेल्या 31 जणांना किडनी फेल्युअरचा आणि 205 लोकांना अतिसाराचा त्रास झाला होता. अमेरिकेत इ कोलीच्या संसर्गाच्या अनेक केसेस झाल्या आहेत. उदाहरणार्थ- इ कोलीचा संसर्ग असलेलं मांस वापरलेला हँबर्गर खाऊन एका दोन वर्षांच्या निरोगी मुलाचा 12 दिवसांत मृत्यू झाला.

अन्नपदार्थ तयार होण्याच्या प्रक्रियेत भाज्या/फळं/मांस हाताळताना पुरेशी काळजी न घेणं, फार्म्सवरच्या चुकीच्या प्रॅक्टिसेस यातून किंवा खाद्य पदार्थांचं उत्पादन किंवा वितरण करताना इ कोलीचा संसर्ग होऊ शकतो. गार्इंना मका खायला दिला तर इ कोलीचं घातक प्रकाराचं म्युटेशन जलद होऊ शकतं. फॅक्टरी फार्ममध्ये हे प्राणी एकाच ठिकाणी दाटीवाटीनं दिवसभर उभे असतात. संसर्गाचा धोका त्यामुळे वाढतो. डॉक्युमेंटरीत ही गुरं कशा प्रकारे अंधारात दिवसभर उभी असतात, फक्त तोंड बाहेर येईल इतक्याच खिडकीतून ते कसं खातात- हे बघणं भयंकर आहे.

डॉक्युमेंटरीतला तिसरा भाग कोंबड्या-चिकन फार्मिंगवर आधारित आहे. 1950 मध्ये कोंबड्यांची तीन महिन्यांत पूर्ण वाढ होत असेल, तर आता फास्ट फूड़ चेन्सची गरज म्हणून त्या 49 दिवसांत मका खायला घालून वाढवल्या जातात. कोंबडीचं पिल्लू 7 आठवड्यांत 5.5 पौंड वजनाचं होतं. आपलं वजन पेलवत नसल्यानं ते चार पावलंही चालू शकत नाही, हे डॉक्युमेंटरीतलं दृश्य अंगावर काटा आणतं.

या कोंबड्या मका खाल्ल्यामुळे आधीच्या काळातल्या कोंबड्यांपेक्षा दुप्पट धष्टपुष्ट दिसतात. या कोंबड्यांना खिडकी नसलेल्या अंधाऱ्या जागेत ठेवलं जातं. चिकन फार्म चालवणाऱ्या एका महिलेनं कोंबड्यांना अंधाऱ्या जागेत ठेवायला नकार दिल्यामुळे तिच्याबरोबरचा करार एका मोठ्या कंपनीनं चक्क रद्द केला, हे या डॉक्युमेंटरीत दिसतं.

डॉक्यमेंटरीचा चौथा भाग डुकरांची पैदास यावर आधारित आहे. पिग फार्मवर दिवसाला 32000 म्हणजे तासाला 2000 डुकरांची कत्तल होते. सर्वच प्राण्यांच्या मांसाचं पॅकिंग करणं हे रोगांना आमंत्रण देणं असतं. ते जोखमीचं काम करत असताना कर्मचाऱ्यांना त्यातून इन्फेक्शन्स होतात. हे काम  करणारी मंडळी लॅटिन अमेरिकन देशांमधून येऊन बेकायदारीत्या अमेरिकेत राहत असतात. व्हिसा नसल्यामुळे त्यांना पडेल ते काम करावं लागतं. एका छुप्या कॅमेऱ्यामधून केलेलं हे चित्रण डॉक्युमेंटरीत दिसतं.

डॉक्युमेंटरीमध्ये शेवटी काही सकारात्मक गोष्टीदेखील दिसतात. उदा.- जोएल सालाटिन या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यानं ‘तुमच्या कंपनीवर मीच बहिष्कार टाकला आहे’ असं वॉल मार्टसारख्या कंपनीच्या प्रतिनिधीला सुनावणं!

पण या सगळ्या अन्नचक्राचे अनेक घातक परिणाम झाले आहेत, हीच बाजू जास्त जाणवत राहते. त्यातला महत्त्वाचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणाचं प्रमाण जगभरात 1975 पासून तिप्पट झालं आहे. 2016 मध्ये 18 वर्षांवरच्या 190 कोटी माणसांचं वजन प्रमाणापेक्षा खूप जास्त होतं. 1 ते 5 या वयोगटातल्या 3.8 कोटी मुलांचं वजन 2019 मध्ये लठ्ठपणाकडे झुकणारं होतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणं, रक्तदाब वाढणं, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग, संधिवात, पचनसंस्थेचे विकार आणि झोपेचं चक्र बिघडणं असे आजार होण्याची दाट शक्यता असते. जास्त वजन असलेल्या मुलांना शाळेत चिडवलं जातं. त्यांना नैराश्य येऊ शकतं. तसंच वाढलेलं वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या उपाययोजनांमुळे मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डरचं प्रमाणही वाढत चाललं आहे.

यामागचं महत्त्वाचं कारण आहे फास्ट फूड. फास्ट फूडचं जेवण हा कागदी बॅगेतून भेट मिळणारा हृदयविकार असतो. आज भाज्यांपेक्षा वेफर्सची पाकिटं स्वस्त दरात सगळीकडे उपलब्ध आहेत. त्यानं वाढणारा लठ्ठपणा आणि वैद्यकीय खर्च ही त्यातली हिडन कॉस्ट आपल्याला दिसत नाही.

माणसाच्या मूळ तीन गरजांपैकी अन्न ही एक गरज आहे. खाद्य पदार्थांच्या पाककृतींवर गुगलवर शोध घेतला तर 28,80,000 साईट्‌स दिसतात. ॲमेझॉनवर 80,000 इंग्रजी पुस्तकं या विषयांवर आहेत. मराठीतही पाककृतींच्या पुस्तकांचा खप सर्वाधिक असतो. पाककृतींचे टीव्ही कार्यक्रम, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरचे व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय असतात. पण पाककृतींबरोबर त्यातल्या घटक पदार्थांच्या स्रोतांची माहिती आपण कधी करून घेणार? नाही तर 1000 पौंड वजनाकडे पोचणारा प्रवास एका बर्गरनं सुरू होतो, हे वाक्य आपल्यासाठीही खरं ठरू शकतं.

डॉक्युमेंटरीची लिंक :  https://vimeo.com/31813990

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके