Diwali_4 सुननेकी मोहलत मिले तो आवाज है पत्थरोंमे! ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट, नोम चॉम्सकी अँड द मीडिया’
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

सुननेकी मोहलत मिले तो आवाज है पत्थरोंमे! ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट, नोम चॉम्सकी अँड द मीडिया’

या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग ‘थॉट कंट्रोल इन अ डेमोक्रॅटिक सोसायटी’ हा 95 मिनिटांचा आहे. अमेरिका लोकशाहीच्या बाजूनं आणि दहशतवादाच्या विरोधात काम करते- ही तिनं स्वत:ची उभी केलेली प्रतिमा कशी फसवी आहे; त्याउलट अनेक देशांमधली लोकशाही उलथून लावण्यासाठी अमेरिकेनं केलेले प्रयत्न, दडपशाहीला दिलेलं उत्तेजन आणि थेट किंवा गुप्तपणे दहशतवादाला दिलेलं प्रोत्साहन याबद्दल चॉम्स्कीच्या लिखाणातले अनेक संदर्भ या भागात येतात. त्यापैकी डॉक्युमेंटरीच्या या भागात कंबोडिया या देशात पोल पॉट या क्रूरकर्म्यानं केलेला नरसंहार सविस्तरपणे येतो. कंबोडियामध्ये ‘ख्मेर रूज’ या कम्युनिस्ट विचारसरणीच्या पार्टीचा नेता पॉल पॉट यानं देशाचा तत्कालीन नेता नोरोडोम सिहनॉक याची सत्ता 1975 मध्ये उलथवून टाकली. कंबोडियाचा नेता झाल्यावर त्यानं देशातल्या नागरिकांचं तीन भागांत वर्गीकरण केलंय.

‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’ हा चित्रपट एन्निओ मॉरिकॉनची तुफान गाजलेली ट्यून आणि क्लिंट ईस्टवूड या अभिनेत्यानं साकारलेला बेदरकार नायक अशा गोष्टींमुळे आजही पाहिला जातो. इतकंच नव्हे तर, हॉलीवुडपटांमध्ये जॉन वेनच्या ‘द क्वाएट मॅन’ किंवा ‘द लाँगेस्ट डे’ अशा चित्रपटांबद्दल अनेकांना आजही आकर्षण वाटतं. हे काऊबॉय धर्तीचे धाडसी नायक, त्यांचे ठरावीक पोशाख, समोरच्या माणसाला क्षणाचाही अवधी न देता त्यांचं पिस्तूल चालवणं- या प्रकारांची मोहिनी आजही जगभरातल्या चित्रपटांवर (आपल्याकडचा अर्थातच शोले) दिसते. या वेस्टर्न प्रकारच्या चित्रपटांमधल्या गावांचे ठरावीक सेट्‌स; डाकू, जुगारी, शेतकरी, सामान्य नागरिक अशी माणसं- हे बघणं कित्येकांना नॉस्टॅल्जिक करतं.

पण हे काऊबॉय प्रत्यक्षात असे होते का? जरा तपशिलात गेलं तर मेक्सिकोसारख्या ठिकाणी इतरत्र कोणतीच नोकरी न मिळाल्यानं घोड्यावरून गुरांचे कळप राखणाऱ्या माणसाचं- म्हणजे गुराख्याचं काम काऊबॉय करायचा, हे लक्षात येतं. पण अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या वेस्टर्न चित्रपटांद्वारे काऊबॉयची बेदरकार, धाडसी, साहसी अशी प्रतिमा माध्यमांनी तयार केली.

याचं कारण काय असावं? कारण तेव्हाच्या यादवी युद्धानंतर मागणी खालावल्यामुळे अमेरिकेतल्या बंदूक उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा चालत नव्हता. बाहेरच्या देशांमधली बंदुकांची बाजारपेठही एकदम खालावली होती. शेतीप्रधान संस्कृती असलेल्या अमेरिकेत 19 व्या शतकाच्या अखेरीस फक्त शेतकऱ्यांकडेच कोल्ह्यांना पळवून लावायला साध्यासुध्या बंदुका असायच्या. यावर उपाय म्हणून सर्वसामान्य नागरिकांनीदेखील फॅशनेबल बंदुका बाळगण्याची संस्कृती निर्माण करणं आवश्यक होतं. यासाठी वेस्टर्न चित्रपटातल्या वाइल्ड वेस्ट या संकल्पनेचा उदय झाला. इतरांनी खिशातून पिस्तूल काढायच्या आत चपळाईनं पिस्तुल काढणाऱ्या काऊबॉय प्रतिमेवर आधारित चित्रपट तयार व्हायला लागले. मग तुमच्या मुलाकडे जर विंचेस्टर रायफल नसेल तर तो कसला मर्द पुरुष? किंवा तुमच्या मुलीकडे ते गुलाबी रंगाचं छोटंसं पिस्तूल नसेल, तर ती कशी आनंदात राहणार? वगैरे जाहिरातींचा भडिमार आणि प्रसार सुरू झाला. याचा परिणाम म्हणजे, आज अमेरिकेची लोकसंख्या एकूण जगाच्या 4 टक्के आहे आणि जगातल्या एकूण बंदुकांपैकी 40 टक्के बंदुका अमेरिकेतल्या लोकांकडे आहेत!!

नोम चॉम्सकी या विचारवंताच्या एका मुलाखतीत हे वाचायला मिळतं. आपली उत्पादनं खपवण्यासाठी, एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा परंपरा लोकांमध्ये रुजवण्यासाठी, एखाद्या नेत्याची प्रतिमा जनमानसात आपल्याला हवी तशी तयार करण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक, गुंतवणूकदार व माध्यमांचे मालक माध्यमांचा वापर कसा चतुराईनं करतात, यावर चॉम्सकी गेली 75 वर्षे सातत्यानं आवाज उठवतो आहे.

अमेरिकेतल्या एमआयटी विद्यापीठात भाषाशास्त्र या विषयाचा प्राध्यापक असलेला 91 वर्षांचा चॉम्सकी आपलं लिखाण, प्रेझेंटेशन्स, मुलाखती या सर्व गोष्टींमधून निरनिराळी माध्यमं करत असलेलं नागरिकांचं मॅनिप्युलेशन यावर टीकेची झोड सतत उठवत असतो. आजपर्यंत जगात होऊन गेलेल्या 8 विचारवंतांच्या यादीत चॉम्सकीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातले विचारवंत त्याचं नाव अत्यंत आदरानं घेतात.

भाषाशास्त्र या विषयात चॉम्सकीनं 1955 मध्ये डॉक्टरेट मिळवली. लहान मुलं भाषा पटापट शिकतात. त्यासाठी मानवी मेंदूत लँग्वेज ॲक्विझिशन डिव्हाईस (एल.ए.डी.) असतात, हा शोध लावणाऱ्या चॉम्सकीचं भाषाशास्त्रातलं काम इतिहासात अजरामर आहे. या विषयाच्या अनुषंगानं उत्क्रांतिवाद, मानसशास्त्र, मुलांची वाढ, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर सायन्स, इम्युनॉलॉजिकल बायोकेमिस्ट्री, बिहेविअरिझम या सर्व क्षेत्रांवर चॉम्सकीच्या संशोधनाचा प्रभाव आहे.

भाषाशास्त्र, प्रसारमाध्यमं, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, युद्धखोरी, दहशतवाद, वर्गव्यवस्था अशा अनेक विषयांवर त्यानं  लिहिलेल्या लेखांची संख्या हजारोंच्या घरात जाईल. त्याची भाषणं, त्यातली अवतरणं सर्वाधिक वेळा संदर्भ म्हणून वापरली गेली आहेत. चॉम्सकीवर सुमारे 20-25 डॉक्युमेंटरीज निघालेल्या आहेत.

अमेरिकेतला मास मीडिया म्हणजे वृत्तपत्रं, रेडिओ, टीव्ही आणि आता सोशल मीडिया- या सर्व माध्यमांचा प्रचारतंत्रासाठी सरकार कसा वापर करतं, हे त्यानं ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट : द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया’ या एडवर्ड हर्मानबरोबर 1988 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात अचूकपणे मांडलं होतं. ‘लोकांना  नरकात जायला सांगताना विशिष्ट प्रकारे सांगितलं, तर ते तिथे कसं जायचं याचा रस्ता विचारायला लागतील- हे पाहणं म्हणजे डिप्लोमसी’ असं विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे. अशा प्रकारे लोकांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टीचा कन्सेंट- होकार उत्पादनासारखा तयार करणं, हे काम मीडिया करतो म्हणून या पुस्तकाला ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट’ हे नाव दिलं आहे.

या पुस्तकात तीन महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या आहेत. ‘देअर इज ऑलवेज अ बिगर फिश’ असा ‘स्टार वॉर्स’ चित्रपटात एक संवाद आहे. तसंच आपण कोणतीही बातमी वाचली, ऐकली किंवा पाहिली तरी त्यामागे एक वेगळा धनाढ्य वर्ग उभा असतोच.

या अनुषंगानं चॉम्सकीनं पुस्तकात मांडलेली पहिली संकल्पना म्हणजे- सर्व प्रकारची माध्यमं केवळ सत्ताधारी आणि उच्च वर्गातल्या लोकांचं भलं व्हावं, या उद्देशानं बातम्या छापतात किंवा घटना दाखवतात. दुसरी संकल्पना म्हणजे- लोकांपर्यंत खरी माहिती पोचवणं हा हेतू न बाळगता, जाहिरातींमधून मिळणारा पैसा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जाहिरातदारांना फायदा होईल, अशाच बातम्या जास्त प्रमाणात दाखवल्या जातात. जाहिरातदार हे श्रीमंत असल्यामुळे ते बातम्यांवर अर्थातच नियंत्रण ठेवतात.

पुस्तकातली तिसरी संकल्पना म्हणजे- टीव्ही चॅनेल्सवर जे तज्ज्ञ लोक येऊन आपलं मत मांडतात किंवा घडलेल्या घटनेबद्दल माहिती सांगतात त्यामागेही गुंतवणूकदार, जाहिरातदार, सत्ताधारी या वर्गाचं नियंत्रण असतं. हे सर्व जण सर्वसामान्यांनी टीव्हीवर/सोशल मीडियावर काय पाहायला हवं, याबाबत कमालीचे जागरूक असतात.

उदा. 2013 पासून जेफ बेझॉस हा ॲमेझॉन कंपनीचा मालक ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतल्या वृत्तपत्रसमूहाचा मालक आहे. जेफ बेझॉसला 2014 मध्ये अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी- सीआयएकडून 60 कोटी डॉलर्सचं काँट्रॅक्ट मिळालं आहे. युजर्सबद्दल जी माहिती ॲमेझॉन गोळा करते, ती सगळी माहिती सीआयएकडे जमा होऊ शकते. तसंच एरिक श्मिड्‌ट हा 2011 ते 2015 या काळात गुगल कंपनीचा सीईओ होता. त्यानं लिहिलेलं Technological Imperialism हे पुस्तक बिल क्लिंटन, हेन्री किसिंजर, मॅडेलिन ऑलब्राईट आणि टोनी ब्लेअर या नेत्यांनी नावाजलं होतं. युजर्सचा आपण गोळा करत असलेला डेटा गुगलनंही अमेरिकन सरकारला पुरवला होता. या डेटाचा उपयोग करून सरकार सर्वसामान्यांवर नियंत्रण ठेवतं. शोधायला गेलं तर कॉर्पोरेट, सरकारं, माध्यमं यांच्यातली अशी संधानं अगणित सापडतात.

चॉम्सकीचं हे पुस्तक जगभर गाजल्यानंतर त्यावर आधारित ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट, नोम चॉम्सकी अँड द मीडिया’ ही डॉक्युमेंटरी मार्क ॲकबार आणि पीटर विनटोनिक या दोघांनी 1992 मध्ये तयार केली.

ही 167 मिनिटांची डॉक्युमेंटरी या जोडगोळीनं जगभरात 300 शहरांमध्ये फिरून तयार केली आहे. 50 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तिनं 22 पारितोषिकं पटकावली आहेत. गुंतागुंतीच्या अनेक कल्पना शक्य तितक्या सोप्या करून सांगणारी ही डॉक्युमेंटरी दृश्य माध्यम कसं वापरावं याचा वस्तुपाठ आहे. चॉम्सकीचे गेल्या 25 वर्षांतले लेख, त्याच्या भाषणांचं मूळ फूटेज, रेडिओ व टेलिव्हिजनवरची त्याची रेकॉर्डिंग्ज, रेखाचित्रं आणि ग्राफिक्स यांच्या साह्यानं त्याच्या जीवनचरित्रातल्या घटना- असं 185 अर्कायव्हलमधलं मटेरिअल यात वापरलं आहे. यामुळे क्लिष्ट भासणारा विषय असूनही डॉक्युमेंटरी प्रेक्षणीय झाली आहे. उदाहरणार्थ- एका दृश्यात लोक कसे मूलगामी विचारसरणीचे असतात आणि वेगवेगळ्या देशांतलं सरकार आपापल्या नागरिकांच्या विचारशक्तीवर नियंत्रण कसं ठेवतं, हे चॉम्सकी सांगत असताना  त्याच्यावरून कॅमेरा एकदम हिटलरच्या एका जुन्या रॅलीकडे जातो. पुढच्या दृश्यात अमेरिकन पोलीस शांततेनं निदर्शने करणाऱ्यांना अटक करताना दिसतात, त्यानंतर लगेच एका चर्चचं शिखर आणि मशिदीचा सज्जा दिसतो. सत्ता आणि माध्यमं यांच्यातलं नातं डॉक्युमेंटरीत प्रवाहीपणे उलगडत जातं. अनेक वेळा  हास्यविनोदाची पखरणही मस्त वाटते. डॉक्युमेंटरी आत्मविश्वासानं बनवलेली आणि कारणमीमांसेनं परिपूर्ण झालेली आहे.

बिल मॉयर्स हा लेख, विल्यम बकली हा विचारवंत व लेखक, टॉम वूल्फ हा लेखक-पत्रकार, पीटर जेनिंग्ज हा एबीसी वर्ल्ड न्यूजचा पत्रकार, मायकेल फुको हा तत्त्वज्ञ, सारा मॅकक्लेंडॉन ही व्हाईट हाऊसचं रिपोर्टिंग करणारी पत्रकार, दुसऱ्या महायुद्धात छळछावण्या होत्या हे प्रकरणच नाकारणारा(!) रॉबर्ट फॉरिसन यांच्यासारखे निरनिराळे विचारवंत या डॉक्युमेंटरीत मतं मांडताना दिसतात.  पियॉजे हा बिहेविअरिझमचा पुरस्कर्ता असलेला मानसशास्त्रज्ञ आणि चॉम्सकी यांच्यातले वादही इथे लक्षात येतात.

डॉक्युमेंटरीचा पहिला भाग ‘थॉट कंट्रोल इन अ डेमोक्रॅटिक सोसायटी’ हा 95 मिनिटांचा आहे. अमेरिका लोकशाहीच्या बाजूनं आणि दहशतवादाच्या विरोधात काम करते- ही तिनं स्वत:ची उभी केलेली प्रतिमा कशी फसवी आहे; त्याउलट अनेक देशांमधली लोकशाही उलथून लावण्यासाठी अमेरिकेनं केलेले प्रयत्न, दडपशाहीला दिलेलं उत्तेजन आणि थेट किंवा गुप्तपणे दहशतवादाला दिलेलं प्रोत्साहन याबद्दल चॉम्स्कीच्या लिखाणातले अनेक संदर्भ या भागात येतात.

त्यापैकी डॉक्युमेंटरीच्या या भागात कंबोडिया या देशात पोल पॉट या क्रूरकर्म्यानं केलेला नरसंहार सविस्तरपणे येतो. कंबोडियामध्ये ‘ख्मेर रूज’ या कम्युनिस्ट विचारसरणीच्या पार्टीचा नेता पॉल पॉट यानं देशाचा तत्कालीन नेता नोरोडोम सिहनॉक याची सत्ता 1975 मध्ये उलथवून टाकली. कंबोडियाचा नेता झाल्यावर त्यानं देशातल्या नागरिकांचं तीन भागांत वर्गीकरण केलं. त्यात कोणतेही अधिकार नसलेले अशा भागातल्या लोकांचे अनन्वित हाल केले. उपासमार, स्वत:साठी खड्डे करायला लावून त्याच खड्‌ड्यात जिवंत पुरणं, सर्व शिक्षित लोकांना ठार मारणं, चष्मा असलेल्या लोकांना वाचता येत असेल या कारणानं त्यांना ठार मारणं, लहान मुलांना मारताना लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोचू नये यासाठी स्पीकर्सवर गाणी लावणं- असे क्रूर प्रकार करून त्यानं 300 किलिंग फील्डसमध्ये 25 लाख लोकांना मारलं. यातून वाचलेल्या लाँग नावाच्या मुलीनं लिहिलेलं ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ हे पुस्तक अंगावर काटा आणतं. यादरम्यान पॉल पॉटनं  व्हिएतनामचं एक बेट ताब्यात घेतलं. या युद्धात चीनच्या मदतीनं व्हिएतनामशी पॉल पॉट लढला, पण त्याचा पराभव झाला.

कंबोडियातल्या या घटनांवर अमेरिकेतल्या जॉन बॅरॉन आणि अँथनी पॉल या दोघांनी ‘मर्डर ऑफ अ जेंटल लँड’ हे पुस्तक लिहिलं होतं. पण अमेरिकेनं स्वत: कंबोडियात किती हत्या घडवून आणल्या, त्याबद्दल अर्थातच हे पुस्तक भाष्य करत नाही. यावरूनच चॉम्सकीनं या पुस्तकाच्या विरोधात मतं मांडली होती. अमेरिकेनं बोइंग-52 (बी-52) या 32000 किलो शस्त्रास्त्रं घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या विमानानं कंबोडियात केलेल्या हल्ल्यांविरोधात आणि कंबोडियन नागरिकांना मारण्याबद्दल पुस्तकात अवाक्षरही नसल्याबद्दल चॉम्सकीनं टीका केली होती. याउलट, पॉनचॉड या लेखकानं याच विषयावर लिहिलेलं ‘इयर झीरो’ हे पुस्तक वास्तवातल्या घटनांशी जास्त नातं सांगतं, असंही चॉम्सकीचं मत होतं. याच पुस्तकावर याच नावाची डॉक्युमेंटरी जॉन पिल्जरनं काढलेली आहे.

ईस्ट टिमोर हे बेट अमेरिकेच्या मदतीनं इंडोनेशियानं 1981 मध्ये ताब्यात घेतलं. तेव्हा तिथे लाखो लोकांना अशाच प्रकारे ठार मारलं. महिलांवर अत्याचार केले. पण इंडोनेशियातल्या नरसंहाराबाबतच्या बऱ्याच बातम्या न्यूयॉर्क टाइम्सनं केवळ लंडन टाईम्सच्या तोकड्या रिपोर्टवरून छापल्या, असा आरोप चॉम्सकीनं केला आहे. ईस्ट टिमोरबद्दल अमेरिकन मीडियानं ज्या प्रकारे वार्तांकन केलं, ते डॉक्युमेंटरीत दाखवताना एका वर्तमानपत्रातला मानवी हक्कांची पायमल्ली होतानाचा लेख दिसतो. तेव्हाच शस्त्रक्रियेची सुरी दिसते आणि टाके घालून बातमी कशी बदलली जाते, ते दिसतं.

डॉक्युमेंटरीचा दुसरा ‘ॲक्टिव्हेटिंग डिसेंट’ हा भाग 72 मिनिटांचा आहे. माध्यमांच्या या मॅनिप्युलेशनमधून बाहेर कसं पडावं, संतुलित मनोवृत्ती कशी राखावी आणि आपण खरी माहिती कशा प्रकारे मिळवावी, हे या भागात तपशीलवार मांडलं आहे. माहिती मिळवताना ठरावीक स्रोतांवर अवलंबून न राहता  जितक्या स्रोतांमधून माहिती मिळेल तितक्या स्रोतांमधून ती मिळवत राहावी, असं चॉम्सकी सांगतो. सर्व देशांमधली छोटी-मोठी वर्तमानपत्रं, मासिकं, प्रकाशनसंस्था, रेडिओ या माध्यमांमधून जगभरातल्या बातम्या आपण कायम वाचायला/ऐकायला/पाहायला हव्यात. त्यांचं विश्लेषण करताना सर्व प्रकारच्या अधिकारशाहीवर प्रश्न विचारायला हवेत, असं तो आवर्जून सांगतो. विशेष म्हणजे ‘मतं तपासून पाहा’ असं सांगताना तो स्वत:लाही त्यातून वगळत नाही. त्यानं मांडलेल्या कल्पना, संकल्पना यात किती तथ्य आहे ते वाचकांनी/प्रेक्षकांनी तपासून पाहावं, असं आवाहन तो स्वत:च करतो. चॉम्सकीच्या कल्पनांना कन्सेंट देणंही मॅन्युफॅक्चर केलेलं नसावं, असं तो आग्रहानं सांगतो. मुक्त विचारसरणीच्या आणि माहितीचा सतत शोध घेणाऱ्या व्यक्तीला खऱ्या गोष्टी कळायलाच हव्यात, या हव्यासात चॉम्सकीनं आयुष्य वेचलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरची भाषणं ऐकताना आपण लहान होतो, पण त्या आवाजातला उद्दामपणा मला जाणवायचा- असं चॉम्सकीनं एका लेखात लिहिलं आहे. आता 60 वर्षांनंतर कोरोनाव्हायरस या जवळपास तिसऱ्या महायुद्धाची स्थिती असलेल्या काळातही ट्रंपनं आरोग्यकारी सेवांचे फंड कमी करून लष्कराचे फंड कसे वाढवले आणि ड्रग्ज बनवणाऱ्या कंपन्यांनी सार्स विषाणूनंतरच्या मधल्या काळात विषाणूंवरच्या औषधांवर संशोधन कसं थांबवलं, ते हा जगातला सर्वांत विद्वान म्हातारा सांगतोच आहे. आपण ते कधी ऐकणार?

डॉक्युमेंटरीची लिंक https://www.youtube.com/watch?v=EuwmWnphqII

Tags: निलांबरी जोशी डॉक्युमेंटरी नोम चॉम्सकी नोम चॉम्सकी अँड द मीडिया मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट documentary manufacturing consent noam chomsky and the media noam chomsky nilambari joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात