Diwali_4 पेप्सी व्हर्सेस कोक इन द आईस कोल्ड वॉर
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘पेप्सी व्हर्सेस कोक इन द आईस कोल्ड वॉर’ या फिल्मची युट्यूब लिंक ही https://www.youtube.com/watch?v=2L0poc-om6c

जॉन स्मिथ पेंबरटन. अमेरिकेत गुलामगिरीच्या विरोधात 1860 पासून पाच वर्षे चाललेल्या यादवी युद्धातला लेफ्टनंट कर्नल. 1865 च्या एप्रिलमध्ये त्याच्या छातीवर एक घाव बसला. जखम झाली. ती जखम नंतर भरून निघाली, पण पेंबरटनला यादरम्यान मॉर्फिन या वेदनाशामकाचं व्यसन लागलं. त्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी 1866 मध्ये पेंबरटननं अफू नसलेली वेदनाशामकं बनवण्याचे प्रयोग सुरू केले. त्यानं कोका या झुडपाची पानं, कार्बोनेटेड पाणी आणि इतर घटक वापरून एक पेय 1886 मध्ये तयार केलं. यादवी युद्धात जखमी झालेल्या असंख्य सैनिकांना तेव्हा ड्रग्जचं किंवा दारूचं व्यसन लागलं होतं. त्यांना नैराश्य, अस्वस्थता, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास होते. त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या बायकांनाही नैराश्य आलं होतं. पेंबरटननं तयार केलेलं पेय या जोडप्यांसाठी वरदान ठरलं. फ्रँक रॉबिन्सन हा पेंबरटनचा अकाउंटंट होता. त्यानं या पेयाला नाव दिलं- ‘कोका-कोला!’

‘बर्प : पेप्सी व्हर्सेस कोक इन द आईस कोल्ड वॉर’ या जॉन पिल्जरच्या डॉक्युमेंटरीत सुरुवातीच्या काही प्रसंगांमध्ये अमेरिकन यादवी युध्दानं कोका-कोला या पेयाला कसा जन्म दिला, ते काही क्षणांपुरतं दिसतं! कोका-कोला आज जगभरातल्या दोनशे देशांमध्ये विकला जातो. 62600 कर्मचारी असलेल्या कोका-कोलाची 2018 ची उलाढाल 3180 कोटी अमेरिकन डॉलर्स होती. आज कोका-कोलाच्या दिवसाला 190 कोटी बाटल्या जगभरात प्यायल्या जातात. 1898 साली सुरू झालेली पेप्सीदेखील दोनशे देशांमध्ये विकली जाते. 2,63,000 कर्मचारी असलेल्या पेप्सिको कंपनीची 2018 ची उलाढाल 6466.1 कोटी अमेरिकन डॉलर्स होती. पेप्सी आणि कोला या दोन ब्रँड्‌समध्ये सतत स्पर्धा सुरू असते.

या दोन कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या या युद्धसदृश स्पर्धेला शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. त्या स्पर्धेनं जगातले कोणकोणते बदल पाहिले आणि घडवले आहेत, त्यावर ‘पेप्सी व्हर्सेस कोक : इन द आईस कोल्ड वॉर’ ही डॉक्युमेंटरी आधारित आहे. डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीला तिचं सार कमीत कमी वाक्यांमध्ये पिल्जरनं दर्शकांसमोर आणलं आहे. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन शहरामधलं एक युद्धस्मारक मागे दिसत असताना पिल्जर आपल्याला उपरोधिक स्वरात सांगायला लागतो... ही फिल्म जागतिक युद्धावर आधारित आहे. वार्ताहर म्हणून अनेक वर्षं काम करत असताना हे युद्ध माझ्या नजरेतून निसटूनच गेलं होतं. हे युद्ध जगातल्या शंभर देशांमध्ये लढलं जात होतं. आदर्शवाद झुगारून साम्यवादी आणि भांडवलशाहीवादी देशांमध्ये,  तसंच इस्लामिक, बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन देशांमध्ये ते युद्ध लढलं गेलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर, जॉन्सन, निक्सन, कार्टर, चीनचे नेते चँग कै शेक, माओ झेडाँग, बुद्धिस्ट नेते दलाई लामा, रशियाचे नेते क्रुश्चेव्ह आणि फादर ख्रिसमस (सांताक्लॉज) या सगळ्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले होते.

या डॉक्युमेंटरीचा जनक असलेला जॉन पिल्जर हे शोध पत्रकारितेतलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशांच्या परराष्ट्रीय धोरणांवर तो सातत्यानं टीका करत असतो. साम्राज्यवाद, युद्धखोरी, वर्णभेद, वंशभेद, नवउदारमतवाद, अनेक देशांमध्ये मूळ रहिवाशांवर होणारे अन्याय, माध्यमांचं व्यापारीकरण- अशा कित्येक विषयांवर पिल्जर गेली सहा दशकं लिहितो आहे. गेल्या शंभर वर्षांत सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या राष्ट्रांनी जगाला आपल्या धोरणांनुसार कसा आकार दिला, ते तो अचूकपणे मांडतो. फ्रीडम नेक्स्ट टाइम, टेल मी नो लाईज, द न्यू रूलर्स ऑफ द वर्ल्ड, हीरोज, हिडन अजेंडाज्‌ अशी पुस्तकं लिहिणाऱ्या पिल्जरनं पत्रकारितेतले मानाचे जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. पिल्जरचे लेख, फिल्म्स आणि रेडिओवरची भाषणं ब्रिटिश लायब्ररीनं 2017 मध्ये संग्रहित केली आहेत.

सन 1962 पासून त्यानं 61 डॉक्युमेंटरीज केल्या आहेत. व्हिएतनाममधील युद्ध, कंबोडियामधला नरसंहार, इंडोनेशियानं ईस्ट टिमोरमध्ये केलेला रक्तपात, अमेरिकेची लॅटिन-अमेरिकन देशांमधली सततची लुडबुड, अमेरिकेनं अफगाणिस्तान आणि इराक या देशांवर लादलेलं युद्ध, इस्रायलनं पॅलेस्टाईनवर केलेला कब्जा, वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या धोरणांचा विकसनशील देशांवर होणारा परिणाम... अशा अनेक गोष्टींवर त्यानं केलेल्या डॉक्युमेंटरीज विसाव्या शतकातलं दुर्लक्षित आणि उपेक्षित जग आपल्यासमोर मांडतात.

‘पेप्सी व्हर्सेस कोक : इन द आईस कोल्ड वॉर’ ही 1984 ची पिल्जरची डॉक्युमेंटरी जिन चेन लुईस याच्या ‘द कोला वॉर्स’ या पुस्तकावर आधारित आहे. गेल्या शंभर वर्षांतलं अमेरिकेचं राजकारण आणि सत्ताकारण, जगावर सत्ता गाजवण्याचे प्रयत्न, अनेक युद्धं, दुसरं महायुद्ध, प्रचारतंत्र, जाहिरातींचं तंत्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेली कोका-कोला आणि पेप्सी-कोला या दोन बलाढ्य कंपन्यांची सुंदोपसुंदी, त्यामागचं अर्थकारण, समाजकारण, बदलत गेलेली माध्यमं अशा अनेक मुद्यांना ही डॉक्युमेंटरी स्पर्श करत जाते. जॉन पेंबरटन यानं 1886 मध्ये अटलांटामध्ये कोका-कोला बनवणं सुरू केलं. त्यानंतर असा कँडलर यानं कोका-कोला बनवण्याची कृती आणि ब्रँड 1889 मध्ये अवघ्या 2300 अमेरिकन डॉलर्सला विकत घेतल्या. आज दोनशे देशांमध्ये कोका-कोलाची 500 प्रकारची करोडो पेयं एका दिवसात प्यायली जातात.

कोका-कोलाबद्दलची काहीशी रंजक माहिती या डॉक्युमेंटरीत सुरुवातीला कळते. उदाहरणार्थ- कोकेन हा नशीला ड्रग त्यात वापरला आहे, अशा अफवा या पेयाभोवतालचं गूढ वाढवणाऱ्या ठरल्या. कोका-कोलानं सांताक्लॉज आपलं पेय पितो आहे, अशी जाहिरात करून लोकप्रियता मिळवली. सांताक्लॉज जसा जरासा स्थूल, आनंदी, दिलखुलास वाटतो; तशी प्रतिमा या जाहिरातीतून कोकनं निर्माण केली. कोका-कोलाच्या बाटलीचा आकार एखाद्या कमनीय स्त्रीच्या बांध्याप्रमाणे होता.

कोका-कोलानं निरनिराळ्या देशांमध्ये कसा जम बसवला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्याला कसा हातभार लावला, ते डॉक्युमेंटरीत नंतरच्या दृश्यांमध्ये उलगडत जातं. दुसऱ्या महायुद्धात कोका-कोला चक्क युद्धसामग्रीबरोबर इतर देशांमध्ये पोचला. तेव्हा अमेरिकेचे रणगाडे, पाणबुड्या आणि लढाऊ विमानांमध्ये कोकचे डिस्पेन्सर्स लावलेले होते. दोस्त राष्ट्रांबरोबर अमेरिका नाझी जर्मनीविरोधात असताना कोका-कोला बनवणारं सिरप जर्मनीत पोचू शकत नव्हतं. तेव्हा कोका-कोलानं तिथे फँटा हे आपलं नवं पेय सुरू केलं होतं. ते जर्मनीतल्या नाझी लोकांचं लाडकं पेय होतं. मजा म्हणजे, नंतर पोलंडच्या साम्यवादी राजवटीतही कोका-कोला लोकांना आवडला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनबरोबर अमेरिकेचं शीत युद्ध सुरू झालं, पण आयसेन हॉवर या तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी झुकोव्ह या सोव्हिएतच्या जनरलला कोका-कोला भेट दिल्यानंतर तो कोका-कोलाचा चाहता बनला होता. त्याच्यासाठी चक्क विशिष्ट व्हाईट कोक सोव्हिएत युनियनमध्ये पोचत होता.

तोपर्यंत कोका-कोलाच्या स्पर्धेत पेप्सी-कोला उतरला होता. पेप्सी या पेयाची सुरुवात 1893 मध्ये कॅलेब ब्रॅडहॅम यानं केली. तेव्हा ब्रँड्‌स ड्रिंक या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या पेयाला 1898 मध्ये पेप्सी-कोला हे नाव मिळालं. पेप्सी-कोला हे नाव पचनक्रिया या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आलं आहे. खरं तर 1903 मध्ये ब्रॅडहॅमनं 19848 गॅलन्स पेय विकलं होतं. पण पहिल्या महायुद्धामुळे साखरेच्या किमतीत चढ-उतार होत होते. तेव्हा पेप्सीला चक्क दिवाळखोरीचा सामना करावा लागला. तेव्हा रॉय मेगार्गेल यानं पेप्सी हा ट्रेडमार्क विकत घेतला. तसंच लॉफ्ट या कँडी विकणाऱ्या व्यवसायाला कोका-कोलानं किमतीत सवलत द्यायला नकार दिला. तेव्हा लॉफ्ट इनकॉर्पोरेशननं चक्क पेप्सी कंपनी चालवायला घेतली. पेप्सीची सुरुवातच अशी कोका-कोलाच्या स्पर्धेतून झाली. 1922 आणि 1933 च्या दरम्यान कोका-कोला कंपनीनं पेप्सी-कोला विकत घ्यायचा प्रस्ताव तीन वेळा मांडला. तीनही वेळा त्यांना नकाराला सामोरं जावं लागलं.

अमेरिकेत तोपर्यंत कोका-कोलानं चांगलाच जम बसवला होता. पण पेप्सीनं अमेरिकेत 1950 च्या दशकात जॉन मॅकार्थींशी संधान साधलं. साम्यवादी लोकांविरुद्ध त्यानं उघडलेल्या मोहिमेमुळे सिनेटर मॅकार्थी तेव्हा (कु)प्रसिद्ध झाला होता. त्याच्या काळात अमेरिकेत साखरेच्या वापरावर बंधनं आली होती. मात्र तसं बंधन घालणं अँटिअमेरिकन आहे, असं विधान मॅकार्थीनं केलं. पेप्सी-कोलानं त्यासाठी मॅकार्थीकडे 20,000 डॉलर्सचा चेक पोचवला होता. ‘पेप्सी-कोला किड’ या नावानं मॅकार्थीला त्याबद्दल दूषणंही दिली जातात.

जोआन क्रॉफर्ड ही अमेरिकन अभिनेत्री पेप्सीचा चेअरमन आल्फ्रेड स्टील याची बायको होती. तिनं या काळात पेप्सीचा भरपूर प्रचार केला. ती पेप्सीची अँबॅसिडरच बनली होती. जाहिरातींमध्ये दोन्ही कंपन्या आज खेळाडू, चित्रपटसृष्टीतले कलाकार अशा सेलिब्रिटीजचा चिक्कार वापर करतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर कोक सोव्हिएत युनियनमध्ये लोकप्रिय होत असतानाच रिचर्ड निक्सन या राष्ट्राध्यक्षांनी रशियन नेते क्रुश्चेव्ह यांना एकदा पेप्सीच्या स्टॉलकडे नेलं. डॉन केंडॉल हा निक्सन यांचा मित्र तेव्हा पेप्सी कंपनीचा सीईओ होता. क्रुश्चेव्ह यांना ते पेय खूपच आवडल्यानं त्यांनी त्याचे अर्धा डझन ग्लासेस लगोलग संपवले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. 1972 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पेप्सीचा कारखाना सुरू झाला. अर्थात, कोका-कोलाचा जळफळाट झाला.

त्यानंतर कोका-कोलाचा सीईओ पॉल ऑस्टिन यानं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्याद्वारे सोव्हिएत युनियनमध्ये संधान साधलं. 1979 मध्ये फँटा हा कोका-कोलाचा भाऊ सोव्हिएत युनियनमध्ये दाखल झाला. अर्थात कोका-कोलाचा कारखाना तिथे सुरू व्हायला मात्र वर्षं 1986 उजाडावं लागलं. सोव्हिएत युनियनचे तुकडे झाल्यानंतर पेप्सी आणि कोका-कोला यांची विखुरलेल्या देशांमध्ये पोचण्यासाठी नव्यानं स्पर्धा सुरू झाली. चीनमधून 1949 मध्ये माओनं कोका-कोलाला हाकललं होतं. पण 1978 मध्ये जिमी कार्टर यांनी कोका-कोला चीनमध्ये यशस्वी होईल, याची पायाभरणी केली होती.

जगातल्या बलाढ्य देशांमध्ये आपली उत्पादनं विकत असताना कोका-कोलानं विकसनशील देशांवर कसे अन्याय केले, ते या डॉक्युमेंटरीत अनेक वेळा दिसतं. उदाहरणार्थ, कोका-कोलानं 1938 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आपली उत्पादनं विकायला सुरुवात केली. 1980 मध्ये आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर अन्यायाची परिसीमा होत असताना कोका-कोलानं तिथली शीत-पेयांची 90 टक्के बाजारपेठ काबीज केली होती. कोका-कोलाच्या जगभरातल्या खपात 5 टक्के वाटा दक्षिण आफ्रिकेचा होता. तिथे कोका-कोलाच्या कारखान्यात 4500 कामगार काम करत होते. त्यांना वर्णामुळे वेगळी वस्ती, वेगळी कामं आणि वेगळा पगार दिला जात होता. कृष्णवर्णीय कामगारांनी कोकवर 1982 मध्ये बहिष्कार टाकण्याची मागणी केली. दोन ठिकाणी काम करणं बंद केलं. तेव्हा कंपनीनं कामगार संघटनेबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. त्यानंतर कामगारांचं वेतन बऱ्यापैकी सुधारलं. त्यांना निवृत्तिवेतन मिळेल याची सोय केली. नेल्सन मंडेला निवडून आल्यानंतर पेप्सीनं दक्षिण आफ्रिकेतल्या बाजारपेठेत प्रवेश केला.

पिल्जरनं या डॉक्युमेंटरीत कोका-कोला आणि पेप्सी या दोन्ही कंपन्यांच्या सीईओेंना मुलाखतीसाठी राजी केलेलं दिसून येतं. कोलंबियातल्या एका सर्वसामान्य घरातली स्त्री जे पेय पिते, तेच पेय राष्ट्राध्यक्ष पितात किंवा प्रत्येक माणसाला ते उपलब्ध आहे, याचा मला आनंद होतो- असं डोनाल्ड केऑफ हे कोका-कोला कंपनीचे सीईओ म्हणताना दिसतात. तसंच न्यूयॉर्कमधल्या पेप्सी-कोलाच्या मुख्यालयात जाऊन पिल्जरनं डोनाल्ड केंडॉल या सीईओसमोर एक महत्त्वाचं विधान केलं आहे. तो म्हणतो, पेप्सीचं साम्राज्य केवळ एका मधुर चिकटसर पाण्याच्या जिवावर उभं आहे. त्यावर केंडॉल स्मितहास्य करून म्हणतात, म्हणजे त्यात काही तरी खास आहे ना?

हे काही तरी खास किती भीषण आहे, याची कल्पना सर्वसामान्य माणसांना येत नाही. कोका-कोलाची उत्पादनं, ती विकण्यासाठी कंपनी अवलंबत असलेले मार्ग, उत्पादनामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, प्राण्यांवर घेतल्या जात असलेल्या चाचण्या, कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय, आर्थिक धोरणं यामुळे कंपनीवर 1886 पासून सतत खटले चालू आहेत. पेप्सीच्या पेयांमध्ये भारतात सापडलेली कीटकनाशकं, भारत व ब्रिटनमध्ये पेप्सिकोच्या कारखान्यांनी केलेला पाण्याचा अतिरिक्त वापर आणि त्यावर झालेले वाद ही प्रकरणं चालू असतातच.

कोका-कोला आणि पेप्सी या दोन कंपन्या पर्यावरण, लोकांचं आरोग्य अशा अनेक गोष्टींवर घातक परिणाम करत सुटल्याच आहेत. उदा.- 1980 च्या दशकातल्या एका सर्वेक्षणात जगभर लठ्ठपणा वाढण्याचं महत्त्वाचं कारण शीत-पेयं असल्याचं निदर्शनास आलं होतं. पर्यावरणाची नासाडी करणाऱ्या या कंपन्यांमुळे जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना प्यायला पाणी नाही आणि धनिकांची तहान भागवायला महागडे शीत-पेयांचे कॅन उपलब्ध होतात, अशा भयंकर विषमतेपर्यंत आपण पोचलो आहोत.

‘सेन्सॉरशिपमुळे टेलिव्हिजनवर माझ्या फिल्म्स दिसण्याची सुतराम शक्यता नाही’, असं खुद्द पिल्जरच म्हणतो. युट्यूबवर त्याच्या काही फिल्म्स उपलब्ध आहेत, त्या पाहायलाच हव्यात.

 

Tags: अमेरिका ब्रँड्‌स ड्रिंक कॅलेब ब्रॅडहॅम पेप्सी-कोला कोका-कोला जॉन आईस कोल्ड वॉर कोक पेप्सी बर्प amerika drink brands caleb brandham pepsikola kokakola john ais coled woar kek pepsi barf weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात