डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अंधाराची कूस, हुंदक्याने भरे... नीरोज गेस्ट्‌स डॉक्युमेंटरी

या डॉक्युमेंटरीमध्ये पी.साईनाथ यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन घेतलेल्या मुलाखती, त्यांच्या कुटुंबीयांना विचारलेले अचूक प्रश्न दिसतात. त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांच्या दृश्यांमधून त्यांचे विचार स्पष्ट होत जातात. अगदी घरातल्या छोट्याशा स्वयंपाकघरात, पुस्तकांच्या शेल्फसमोर मोकळ्या घरगुती वातावरणात आस्थेनं प्रत्येक मुद्यावर बोलणारे पी.साईनाथ आपल्याला दिसत राहतात. प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून अत्यंत ओघवत्या सौजन्यपूर्ण भाषेत, प्रसन्नपणे व ठामपणे पी.साईनाथ प्रश्न मांडत राहतात. भोवतालच्या लोकांशी आणि ते जिथे जातात तिथल्या लोकांशी त्यांचं वागणं पाहताना जिव्हाळा, आत्मीयता, सौजन्य, कळकळ सतत जाणवत राहते. विद्यार्थी किंवा समोरचा एकूण प्रेक्षकवर्ग यांच्यासाठी त्यांची भाषा व मुद्दे विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी आहेत.

 

तान्हं उपाशी लेकरू, भाकर मागते मायेले

आसू डोळ्यांत आणून, सूर्य दाखवी लेकराले

कवा देशील वं माये, भाकर आम्हाले खायले?

रातपासून नाही जेवलो, भूक लागली पोटाले

निवू दे ना वं जरा बापू, त्या गरम भाकरीले

चटका दुरून अंगाले लागतो, फोड येतील तोंडाले

आभाळीचा गरम सूर्य डोंगराआड गेला

वाट पाहून भाकरीची, तान्हा उपाशी झोपी गेला...

नीरोज गेस्ट्‌स या डॉक्युमेंटरीमध्ये एका दृश्यात विशीच्या आसपासची एक मुलगी श्रीकृष्ण कळंब यांची ही कविता वाचताना दिसते. या शेतकरी असलेल्या कवीनं आत्महत्या केली आहे आणि ही कविता वाचणारी त्यांचीच मुलगी आहे, असं पुढच्या दृश्यात कळतं. तेव्हा त्यापुढचं दृश्य लगेच पाहणं शक्य होत नाही, इतका सुन्नपणा येतो.

‘नीरोज गेस्ट्‌स हे नाव या डॉक्युमेंटरीला का दिलं आहे?’ असा प्रश्न आपल्या मनात ही डॉक्युमेंटरी पाहण्यापूर्वी येतोच, पण पहिल्याच दृश्यात त्यामागची कथा भारतीय पत्रकार पी.साईनाथ समोरच्या श्रोतृवर्गाला सांगताना दिसतात.

नीरो या रोमच्या राजाचा उल्लेख आपण सहसा रोम जळत होतं आणि नीरो हा राजा मात्र फिडल वाजवत बसला होता, इतकाच ऐकलेला असतो. याबद्दलचा इतिहास टॅसिटस या तत्कालीन इतिहासकारानं लिहून ठेवला आहे. इ.स. 54 ते 68 या काळात रोमन साम्राज्याचा अधिपती असलेल्या नीरोनंच ठरवून रोम जाळलं, असा त्याच्यावर काही जण आरोप करतात. आठ दिवस चालू असलेल्या त्या भीषण आगीत रोममधले तीन जिल्हे जळून खाक झाले. त्या आगीनंतर अर्थातच काही काळ तोच विषय रोममध्ये सारखा चर्चेत होता. ती चर्चा थांबवायची असेल, तर लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधणं हा एकमेव राजमान्य उपाय नीरोकडे उरला होता. त्यासाठी त्यानं रोमन साम्राज्याच्या इतिहासात अभूतपूर्व ठरेल अशी एक पार्टी द्यायची ठरवली. आपल्या अलिशान प्रासादाभोवतीच्या बगीच्यात नीरोनं ही पार्टी ठरवली.

एवढी कथा सांगितल्यानंतर ‘‘ती पार्टी बोलावणारा नीरो ही मला समस्या वाटत नाही, मला समस्या वाटते ती नीरोनं बोलावलेल्या पाहुण्यांची. कोण होते ते?’’ असं पी.साईनाथ समोरच्या प्रेक्षकांना विचारतात. पुढे ते म्हणतात, ‘‘पाच वर्षं शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नावर काम केल्यानंतर मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.’’ इथून पुढे नीरोज गेस्ट्‌स कोण? याचा वेध घेणारा या डॉक्युमेंटरीचा प्रवास सुरू होतो.

‘नीरोज गेस्ट्‌स- द एज आॉफ इनइक्वॅलिटी’ ही 56 मिनिटांची डॉक्युमेंटरी दीपा भाटिया यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘द हिंदू’ या प्रख्यात वृत्तपत्रातून पी.साईनाथ यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी वाताहत हा विषय 30 वर्ष सातत्यानं मांडला. भारतातल्या एकाही वर्तमानपत्राकडे निव्वळ ग्रामीण भागातल्या प्रश्नांचं वार्तांकन करणारा वार्ताहर नाही, हे लक्षात घेतलं तर पी.साईनाथ यांचं महत्त्व लक्षात येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम असलेले पी.साईनाथ हे ‘एव्हरीबडी लव्हज अ ड्रॉट’सारख्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांना पत्रकारितेतलं 2007 चं रॅमन मॅगेसेसे पारितोषिक मिळालेलं आहे. 

या डॉक्युमेंटरीमध्ये पी.साईनाथ यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन घेतलेल्या मुलाखती, त्यांच्या कुटुंबीयांना विचारलेले अचूक प्रश्न दिसतात. त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांच्या दृश्यांमधून त्यांचे विचार स्पष्ट होत जातात. अगदी घरातल्या छोट्याशा स्वयंपाकघरात, पुस्तकांच्या शेल्फसमोर मोकळ्या घरगुती वातावरणात आस्थेनं प्रत्येक मुद्यावर बोलणारे पी.साईनाथ आपल्याला दिसत राहतात. प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून अत्यंत ओघवत्या सौजन्यपूर्ण भाषेत, प्रसन्नपणे व ठामपणे पी.साईनाथ प्रश्न मांडत राहतात. भोवतालच्या लोकांशी आणि ते जिथे जातात तिथल्या लोकांशी त्यांचं वागणं पाहताना जिव्हाळा, आत्मीयता, सौजन्य, कळकळ सतत जाणवत राहते. विद्यार्थी किंवा समोरचा एकूण प्रेक्षकवर्ग यांच्यासाठी त्यांची भाषा व मुद्दे विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी आहेत.

डॉक्युमेंटरीत मधूनच डोळ्यांसमोर खट्‌कन येणारे आकडे, पीडित लोकांचे चेहरे, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचे हताश भाव, त्यांच्या डोळ्यांतली निराशा- हे मनाचा ताबा घेत राहतात. एका दृश्यात दोन माणसं हॉस्पिटलमध्ये तिसऱ्याला घेऊन येताना दिसतात. धूसर होत जाणाऱ्या हॉस्पिटलच्या इमारतीत ते दिसेनासे होतात तोपर्यंत त्या तिसऱ्या माणसानं कीटकनाशक प्यायलंय, असं  आपल्याला मागच्या कॉमेंट्रीतून ऐकू येतं. दुसऱ्या एका दृश्यात काही मजूर स्त्रिया एका ट्रेनमधून कामाला जात असताना पी.साईनाथ त्यांना प्रश्न विचारताना दिसतात. दिवसाला 20 तास काम करणाऱ्या या बायकांच्या मुलांना आपली आई ठाऊक नाही, हे त्या प्रश्नोत्तरांमधून लक्षात येतं आणि आपण निरुत्तर होत जातो.

भारतात- विशेषत: महाराष्ट्रात- शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, अनेक बाबतींतली विषमता आणि माध्यमांनी या बातम्यांकडे केलेलं संपूर्ण दुर्लक्ष या तीन मध्यवर्ती संकल्पना या डॉक्युमेंटरीमध्ये मांडलेल्या आहेत. पण त्या अनुषंगानं प्रत्येक दृश्यात मांडले गेलेले विषय हा एकेका लेखाचा विषय होऊ शकेल. सामाजिक न्याय-अन्याय, भेडसावणारी  विषमता,  नवउदारमतवादाचा दुटप्पीपणा, इकॉनॉमिक ग्रोथ रेट्‌स, जीडीपी यांचे दिपवून टाकणारे आकडे आणि शहरी चंगळवादी झगमगीत दुनियेमागची ग्रामीण भागातली दुनिया, बेरोजगारी, धान्याचा साठा करणारे व्यापारी, अन्नधान्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यातली धोरणं- असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत जातात.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. अजूनही 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतातल्या एकूण आत्महत्यांपैकी 11.2 टक्के आत्महत्या शेतकऱ्यांच्या आहेत. सन 1995 पासून 2014 पर्यंत भारतात 2,96,438 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असं नॅशनल क्राईम रेकॉडर्‌स ब्युरो ऑफ इंडियाचा अहवाल सांगतो. राज्यांपुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा आकडा सर्वांत जास्त आहे. ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांत महाराष्ट्राच्या खालोखाल शेतकरी आत्महत्या करतात. मात्र 2015 नंतर नॅशनल क्राईम रेकॉडर्‌स ब्युरो ऑफ इंडिया यांनी शेतकरी आत्महत्यांचा अहवाल दिलेला नाही.

त्यानंतरची आकडेवारी राज्याच्या महसूल विभागाकडून आलेली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांंच्या कुटुंबीयांना हा विभाग नुकसानभरपाई देतो. त्यांच्या अहवालानुसार 2016 मध्ये भारतात 11,379 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ महिन्याला 948 आणि दर दिवशी 31 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा होतो. सन 2018 मध्ये 10349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुईसाईड्‌स इन इंडियाचा अहवाल सांगतो. याचा अर्थ दिवसाला 28 शेतकरी आत्महत्या करत होते. भारतात 2011 पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये 11 टक्के वाढ झाली आहे. मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे विश्वासार्ह आकडे उपलब्ध नाहीत, हीदेखील एक गंभीर समस्या आहे.

सन 2018 या एकाच वर्षातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागची कारणं पाहायला गेलं तर- 39 टक्के शेतकऱ्यांनी कर्ज फेडता न आल्यानं, 19 टक्के शेतकऱ्यांनी नैसर्गिक कारणांमुळे पिकं अनियमित झाली या कारणानं, 12 टक्के शेतकऱ्यांनी कौटुंबिक समस्यांमुळे, 11 टक्के शेतकऱ्यांनी आजाराला कंटाळून, 4 टक्के शेतकऱ्यांनी दारू किंवा व्यसनाधीनता यामुळे आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 8 टक्के जणांनी खासगी स्वरूपातलं सावकाराकडून घेतलेलं कर्ज न फेडता आल्यानं आत्महत्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांना शेतीसाठी खतं, पाणी, वीज सगळं बाजारभावानं मिळतं, पण मालाला ठरावीक किंमत मिळेल याची खात्री नसतेच. अशा वेळी निरनिराळ्या कारणांसाठी सावकारांकडून कर्ज घेतलं जातं. तसंच आपल्या देशात ज्या गोष्टीसाठी कर्ज हवं असेल, त्यासाठी संपूर्ण रकमेचं कर्ज मिळत नाही. उरलेली रक्कम सावकाराकडून घेतली जाते. यातून कर्जाच्या विळख्यात सापडून शेतकरी आत्महत्या करतात. स्त्री शेतकरी असते, ही संकल्पनाच नसल्यामुळे अनेकदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बायकोला नुकसानभरपाई मिळत नाही. यावर ‘स्त्री ही आई, बहीण, मुलगी असू शकते पण शेतकरी नाही’ अशी मार्मिक टिप्पणी या डॉक्युमेंटरीत आहे.

कर्ज फेडता न येणं हे शेतकरी आत्महत्येमागचं सर्वांत मोठं कारण आहेच. पण कर्ज का फेडता आलं नाही त्यामागे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, उत्पादन खर्चाइतकंही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणं आणि व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक अशी अनेक कारणं असतात. सरकारच्या चुकीच्या योजना आणि धोरणं, सरकारी अनुदानांमधला भ्रष्टाचार अशीही अनेक कारणं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे आहेत.

यामागचा विरोधाभास मात्र थक्क करणारा आहे. आपल्या देशातल्या लोकांना पुरेल इतका अन्नाचा साठा झाल्यानंतर सहसा धान्याची निर्यात केली जाते, पण भारतातली परिस्थिती मात्र तशी नाही. भारतात गेल्या दोन दशकांत धान्याचं उत्पादन वाढतं आहे. पण दर माणशी धान्याची उपलब्धता मात्र 1960 पासून दर पाच वर्षांनी कमी होत चालली आहे.

एकीकडे पाहायला गेलं, तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत जगातला तांदळाचा मोठा निर्यातदार बनला आहे. भारत 2013 मध्ये जगातला सातव्या क्रमांकाचा धान्य निर्यातदार होता, तर गव्हाचा चौथ्या क्रमाकांवरचा आणि बीफचा पहिल्या क्रमांकावरचा निर्यातदार होता. भारतात 2012-13 मध्ये धान्यांची निर्यात 2.4 कोटी टन इतकी होती. त्यात तांदळाचा वाटा 1.3 कोटी टन इतका होता, तर गव्हाचा वाटा 65 लाख टन इतका होता. तांदळाची निर्यात 2012-13 मध्ये 2000 कोटी डॉलर्स इतकी, तर गव्हाची 1000 कोटी डॉलर्स इतकी होती.

हे झालं धान्याबाबत. दूध, चिकन आणि मासे यांच्या निर्यातीतही भारत अग्रेसर आहे. भारतानं 2015 मध्ये 3,50,000 कोटी रुपयांचं दूध, 90,000 कोटी रुपयांचे मासे आणि 45,000 कोटी रुपयांचं चिकन निर्यात केलं होतं. जगात भारताचं दुग्ध उत्पादन सर्वांत जास्त आहे. अमेरिका हा देश दुसऱ्या स्थानावर आहे.

धान्याचा आणि मांसाचा साठा करणारे ट्रेडर्स जागतिक बाजारपेठेत धान्य व बीफ विकून पैसा कमावतात, पण शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाइतकेही पैसे शेतीतून मिळत नाहीत. त्यांच्या पिकाला वाजवी भाव मिळत नाही.

गुरांच्या बाबतीतही परिस्थिती अशीच आहे. आपण गहू, तांदूळ, खाद्यतेल या प्रक्रियेत जनावरांना खाण्यायोग्य पेंड तयार करतो. साधारण दोन लाख टन राईस ब्रान आणि 8500 कोटी रुपयांचे ऑईल केक्स आपण गुरांना खायला घालण्यासाठी निर्यात करतो. भारतात मात्र जनावरांना कोरडा चारा 25 टक्के आणि ओला चारा 65 टक्के इतक्या प्रमाणात कमी पडतो. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, खायला अन्न नाही आणि आपल्या गुरांना खायला चारा नाही- अशी अवस्था आहे.

इतकं धान्य पिकवणारा भारत 117 कुपोषित देशांच्या यादीत 102 या स्थानावर आहे. तसंच अन्नधान्याच्या किमती भारतात सतत वाढत असतात. दारिद्य्ररेषेखालच्या लोकांना त्या परवडणं शक्यच होत नाही, पण त्याहून किंचित वरच्या आर्थिक स्तरातल्या लोकांनाही हे धान्य घ्यायला परवडत नाही. त्यामुळे दिवसाला ठरावीक कॅलरीजचा पुरवठा गरिबांना होत नाही. त्यातून कुपोषिततेचं प्रमाण वाढतं.

शेतकऱ्यांच्या हलाखीबाबत विरोधाभास दाखवणाऱ्या अशा अनेक गोष्टी या डॉक्युमेंटरीत जाणवत रहातात. एका प्रसंगात कापूस पिकवणारा एक शेतकरी चार लाखांचं कर्ज फेडू शकला नाही, म्हणून आत्महत्या करतो. त्या आत्महत्येबद्दल माध्यमांमध्ये काहीही येत नाही. शेतकऱ्यानं आत्महत्या केलेल्या गावापासून काही किलोमीटर्सवर इंडिया फॅशन वीकचं वार्तांकन  करायला 500 पत्रकार पोचतात. त्या शोमध्ये त्याच कापसापासून तयार झालेले कपडे घालून मॉडेल्स कॅटवॉक करत असतात.

दुसऱ्या एका प्रसंगात भारतात सेन्सेक्स जेव्हा खाली आला, तेव्हा अर्थमंत्री दोन तासांत दलाल स्ट्रीटवर पोचले. पण पंतप्रधानांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचायला 10 वर्षं लागतात, असंही एक उदाहरण पी.साईनाथ यांनी दिलंय. पुढे एका व्याख्यानात ते सांगतात, ‘‘शेतकऱ्यांना शेतीची अवजारं घ्यायला कर्ज हवं असेल तर बँक अनेक कागदपत्रं मागते, हमी मागते आणि मला मर्सिडीज बेंझ ही गाडी घ्यायला कर्ज देण्यासाठी बँका स्वत:हून फोन करतात.’’

आणखी एका प्रसंगात पी.साईनाथ स्वत: घरात कॉफी बनवत असताना ‘केरळमधल्या कॉफी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, पण कॉफीवर प्रक्रिया करणाऱ्या मधल्या उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना किती भरससाट नफा होतो,’ ते सांगतानाही दिसतात. मुळात दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याच काळात भारत सरकारनं उद्योजकांना/कॉर्पोरेट्‌सना दोन लाख कोटी इन्सेंटिव्ह दोन वर्षात दिला आहे, असं उदाहरणही या डॉक्युमेंटरीत दिसतं.

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न इतका भेडसावणारा असूनही माध्यमांमध्ये याची दखल घेतली जात नाही. लोकांना दारिद्य्राबद्दल वाचायला आवडणार नाही, असाही स्टँड माध्यमं छुप्या पद्धतीनं घेतात. शहरी किंवा ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गात शेतकऱ्यांचे खरे प्रश्न माहिती नसतात. महागाई, शहरातल्या ट्रॅफिकच्या समस्या, पावसात तुंबणारे रस्ते अशा अनेक विषयांवर सभा-समारंभात हिरीरीनं बोलणारे हे लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलताना दिसत नाहीत. अगदी कोरोना व्हायरसच्या काळातही आपल्याला वेळच्या वेळी, स्वस्त दरात ताजी भाजी मिळावी याचा अट्टहास धरणारे शहरी मध्यमवर्गीय लोक शेतकऱ्यांना कोरोनामुळे किती संकटांना तोंड द्यावं लागलं याचा विचारही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच या डॉक्युमेंटरीत एक जण ‘शेतकरी असणं हा गुन्हा आहे का?’ हा प्रश्न विचारतो.

भारतात शेतकऱ्यांच्या समस्यांवरच्या उपायांमध्ये स्वामिनाथन आयोग चर्चेत असतो. पण तो नुसताच चर्चेत असतो आणि सर्वांत कमी वाचला गेला आहे, असं पी.साईनाथ सांगतात. या आयोगानं 2004 ते 2006 च्या दरम्यान पाच अहवाल सादर केले होते. शेतीमालाला हमीभाव, सर्वांना अन्न उपलब्ध होणं, मजुरांना किमान वेतन, ग्रामीण भागातल्या कुटुंबांना विमा- अशा गोष्टी या अहवालात आहेत. त्यावर अर्थातच कृती झालेली दिसत नाही. यामुळेच 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये शेतकऱ्यांची संख्या 90 लाखांनी कमी झाल्याचं आकडेवारी सांगते. आता डॉक्युमेंटरीच्या शेवटाकडे आपण येतो आणि नीरोज गेस्ट्‌स कोण होते, याचं उत्तर मिळायला लागतं. पी.साईनाथ सांगतात...

नीरोनं पार्टी द्यायची ठरवली खरी, पण त्यात एक समस्या होती. अंतर्गोल भिंगाच्या आकाराच्या त्याच्या बागेत पाहुण्यांची बसण्याची काही ठिकाणं उंचीवर होती. संध्याकाळच्या वेळी पार्टी असल्यानं या सगळ्या उंच ठिकाणीही झगमगता प्रकाश पोचायला हवा होता. रोममधले प्रतिष्ठित, बुद्धिमान, वार्ताहर, उच्चपदस्थ राजकारणी असे सर्व लोक पार्टीत असणारच होते. बागेत काळोख असलेला नीरोला चालणार नव्हता. पण नीरो राजाच असल्यानं त्यानं ती समस्या सोडवली. कशी? तर, त्यानं तुरुंगातले कैदी आणि गुन्हेगार जमा केले. त्यांना एक-एक करून बागेतल्या शेकोटीत जाळायला सुरुवात केली. त्या आगीनं ती पार्टी प्रकाशमान झाली.

पुढे साईनाथ सांगतात- नीरो हा राजा वेडा होता, हे मान्यच आहे. पण कथा नीरोबद्दल नाहीये, ती नीरोच्या पाहुण्यांबद्दल आहे. त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यांची संवेदनशीलता कुठे गेली होती? आपण वाईन, फळं, मांस असं खात-पीत असताना भोवताली उजेड असावा म्हणून एक माणूस जळतोय- अशा परिस्थितीत तो घास त्यांच्या जिभेपर्यंत पोचलाच कसा?

‘आपल्याला मिळणारे घास ज्यांच्या श्रमानं आले, ते शेतकरी आत्महत्या करत असताना आपल्या जिभेपर्यंत ते घास पोचतात कसे? आपण सगळेच नीरोज गेस्ट्‌स आहोत का?’ हा प्रश्न पी.साईनाथ यांनी विचारलेला नाही. पण डॉक्युमेंटरीच्या शेवटी तो जळजळीत प्रश्न आपल्या मनावर आसूड ओढतोच.

डॉक्युमेंटरीची लिंक :  

https://www.youtube.com/watch?v=4q6m5NgrCJs

‘अंधाराची कूस, हुंदक्याने भरे...’ ही ओळ विंदा करंदीकर यांची आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात