डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : फोरपा / द कप (हिंदी- तिबेटन, भूतान) 

विहारातील फुटबॉलचा सर्वांत मोठा चाहता म्हणजे ऑर्जिन! तो फुटबॉलविषयीची मासिकं लपून वाचत असतो, त्याच्या खोलीभर दिग्गज फुटबॉलपटूंचे फोटो चिकटवलेले असतात. ब्राझीलचा रोनाल्डो हा त्याचा सर्वांत आवडता खेळाडू. नऊ नंबरची जर्सी घालून, कारकिर्दीत रोनाल्डोने जवळजवळ साडेचारशे गोल केले. त्यामुळे चाहते त्याला ठ9 असेही म्हणायचे. तशीच एक जर्सी ऑर्जिनही रोज घालतो, आणि त्यावरून विहाराचा गणवेश परिधान करतो. 

भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळ कुठला? तर सहज उत्तर मिळतं, क्रिकेट. आणि क्रिकेट सामन्यांची सर्वांत महत्त्वाची श्रृंखला कुठली? तर विश्वचषक स्पर्धा, नाही का? जगातील आणखी एक अतिलोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. तसं म्हणावं तर युरोप आणि दक्षिण अमेरिकेतच हा खेळ सर्वाधिक खेळला जातो. परंतु या खेळाचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. अशाच एका अति दुर्गम भागातील फुटबॉलप्रेमी मुलाची गोष्ट म्हणजेच ‘फोरपा’ हा चित्रपट. फोरपा म्हणजे चषक किंवा कप. हा तिबेटन भाषेतील चित्रपट आहे.

तिबेट हे हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील, समुद्रसपाटीपासून सुमारे 16,000 फूट उंच असलेले एक पठार आहे. त्यामुळेच त्याला ‘जगाचे छत’ असेही  संबोधले जाते. तिबेटची अर्थव्यवस्था कृषी आणि पर्यटन यांवर आधारित आहे. इथे बहुतांश लोक तिबेटी-बौद्ध संप्रदायाचे उपासक आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक ख्येन्तसे नोरबू (Khyentse Norbu) हे बौद्ध लामा आहेत. हिमाचल प्रदेशातील बिर गावातील एका बौद्ध विहारात त्यांनी ह्या चित्रपटाचं चित्रीकरण केलं आहे. हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला, आणि 1998 मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेभोवती त्यांनी त्याचं कथानक विणलं आहे.     

कथेची सुरुवात एका उंच टेकडीवर असलेल्या बौद्ध विहारात होते. विभिन्न वयांची मुले इथे बौद्ध धर्माचं शिक्षण घेण्यासाठी आलेली असतात. विहारातील वातावरण कडक शिस्तीचं असतं. परंतु खोडकरपणा हा मुलांचा स्वभावच आहे. तेच इथेही दिसतं. विहाराच्या भिंती कोळशाने रंगवणे, शिकवणी सुरू असताना चिठ्ठीवर काही गमतीदार किस्से लिहून एकमेकांकडे पाठवणे, असे आपल्याला परिचित असणारे सर्व प्रकार तिथेही सुरू असतात. एक विद्यार्थी तर चक्क झोपा काढत असतो. विद्यार्थ्यांचा अतिशय आवडता असा छंद म्हणजे फुटबॉल खेळणे. सकाळी अंघोळीसाठी जमलेले विद्यार्थी शीतपेयाच्या रिकाम्या कॅनने फुटबॉल खेळत असतात.

मुलांना समजून घेणारे, तरीही कडक शिस्त राखणारे गेको आपल्याला भेटतात. साधारण चाळिशीत असणारे गेको विहाराच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सांभाळत असतात. तेसुद्धा याच विहारात शिकले आणि आता अध्यापन करतात. विहारातील सर्वांत वरिष्ठ लामा एबॉट यांनी वयाची सत्तरी गाठलेली आहे. त्यांनी वर्षानुवर्षे बौद्ध धर्माची शिकवण दिलेली असते. कालांतराने बरंच काही बदलत असतं. तसंच आता शीतपेयाच्या कॅनने फुटबॉल खेळणाऱ्या, अर्थात जागतिकीकरणामुळे बाह्य जगतातील अनेक नव्या गोष्टीच्या संपर्कात आलेल्या या नव्या पिढीला बौद्ध धर्माची शिकवण देण्याची आणि त्यांच्यातून भविष्यातील लामा, धर्मप्रसारक निर्माण करण्याची जबाबदारी एबॉट ह्यांच्यावर असते. आज तिबेटमधून दोन नवीन विद्यार्थी शिक्षणासाठी येणार असतात. पण त्यांना येण्यासाठी होणारा उशीर आणि त्याबद्दलची कुठलीही बातमी न मिळाल्याने, काही विपरीत तर घडलं नसेल ना, अशा चिंतेत ते असतात.

आज ते एवढे चिंतातुर का असावेत? त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी, तिबेटचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू.

सॉन्गत्सेन गंपो ह्यांच्या राजवटीपासून संयुक्त तिबेट प्रांताचा इतिहास सुरू होतो. ह्यादरम्यानच बौद्ध धर्माला राजमान्यता मिळाली. तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वोच्च अध्यात्मिक गुरूंना ‘दलाई लामा’ असं संबोधलं जातं. हे पद तिबेटी एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं.

1950 मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळवला. तिथे आपली सत्ता चालवण्यासाठी सतरा कलमी करारही केला. पुढे मात्र ह्या कराराचा त्यांना साफ विसर पडला आणि जुलमी राजवटीची सुरुवात झाली. 1959 मध्ये तिबेटी जनतेने चिनी सरकारविरुद्ध बंड पुकारले. त्या लढ्याचे नेतृत्व करणारे चौदावे दलाई लामा, तेन्झिन ग्यात्सो यांना अखेर भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यांनी भारतातच तिबेटचं निर्वासित सरकार स्थापन करून आपला स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला आहे. आजही एक लाखांहून अधिक तिबेटमधील निर्वासित भारतात वास्तव्य करतात.

तर तिबेटमधील असुरक्षिततेचं वातावरण हेच चित्रपटातील एबॉट यांच्या काळजीचं खरं कारण असतं. वरकरणी कठोर वाटणाऱ्या एबॉट यांच्या हळव्या मनाचं दर्शन इथे घडतं. गेको यांना ते ताबडतोब एका अवलियाकडे जायला सांगतात. अचूक भविष्यवाणी सांगणारा, अशी त्याची ख्याती असते. अवलियाकडून तरी मनाची क्षणिक समजून घालणारा निरोप मिळेल, अशी आशा एबॉट यांना असते. अखेर विहाराकडे येणाऱ्या एका वाहनाचा आवाज येतो. जीव मुठीत घेऊन पाल्डेन (Palden) आणि न्यिमा (Nyima) हे दोघेही तिबेटच्या सीमेतून भारतात प्रवेश करण्यात यशस्वी होतात. त्यांना सुखरूप बघून एबॉट यांचाही जीव भांड्यात पडतो.

दुसऱ्या दिवशी त्या दोघांनाही वर्गात सामील करून घेतलं जात. प्रथेनुसार त्यांना बौद्ध्‌ नावं दिली जातात. न्यिमा अगदी नऊ-दहा वर्षांचा असतो. आईपासून दूर राहणं त्याला फार कठीण जातं. पाल्डेन हा त्याचा मामा, वय साधारण अठरा वर्षांचं असेल. न्यिमाची काळजी घेण्याची जबाबदारी पाल्डेनवर असते. विधी सुरू असताना वर्गातील काही विद्यार्थी खुशाल मस्ती करत असतात. विधी संपताच सर्वाधिक गोंधळ घालणाऱ्या दोन मुलांना गेको बोलावतात. त्यातील पहिला मुलगा तेरा-चौदा वर्षांचा ऑर्जिन. तोच खऱ्या अर्थाने ह्या चित्रपटाचा नायक आहे. दुसरा मुलगा, त्याचा साथीदार म्हणजे सतरा-अठरा वर्षांचा लोडो. खडसावून जाब विचारत गेको त्यांना शिक्षा देतात- ‘‘तुम्ही पाल्डेन आणि न्यिमाचे सर्व कपडे धुवायचे आणि त्यांचे केस कापून टक्कल करायचं.’’ इथेच चित्रपटातील या चारही प्रमुख पात्रांची गट्टी जमते.

विहारातील फुटबॉलचा सर्वांत मोठा चाहता म्हणजे ऑर्जिन! तो लपून फुटबॉलविषयीची मासिकं वाचत असतो, त्याच्या खोलीभर दिग्गज फुटबॉलपटूंचे फोटो चिकटवलेले असतात. ब्राझीलचा रोनाल्डो हा त्याचा सर्वांत आवडता खेळाडू. नऊ नंबरची जर्सी घालून, कारकिर्दीत रोनाल्डोने जवळजवळ साडेचारशे गोल केले. त्यामुळे चाहते त्याला ठ9 असेही म्हणायचे. तशीच एक जर्सी ऑर्जिनही रोज घालतो, आणि त्यावरून विहाराचा गणवेश परिधान करतो. आजूबाजूच्या सर्व परिस्थितीत त्याने हे फुटबॉलप्रेम अलगद जोपासलेलं असतं. सर्व जण झोपी गेल्यावर लोडोसह तो रोज चोरून फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने बघायला विहाराच्या जवळच्या गावात जातो, तिथे तिकीट लावून टीव्हीवर सामने दाखवले जातात.

न्यिमा अजूनही घरच्या ओढीने कासावीस झालेला असतो. आईने दिलेलं एक घड्याळ हृदयाशी धरून तो पाल्डेनजवळ बसलेला असतो. त्यांना थोडं खुलवावं म्हणून ऑर्जिन वर्ल्ड कपविषयी सांगू लागतो. ‘‘आज फ्रान्स आणि इटली या दोन दमदार संघांमध्ये सामना नक्की रंगणार आहे. पाल्डेन आणि न्यिमा, तुम्ही दोघंही आज याच सामना बघायला. कळेल तुम्हांला काय असतं फुटबॉलप्रेम ते! झिदानचा खेळ बघितला तर न्यिमाला घराचाही विसर पडेल.’’ अशा प्रकारे चौघांचाही सामना बघण्याचा बेत ठरतो. ऑर्जिन त्या दोघांनाही खेळाविषयी थोडी माहिती देत असतो.

ते चौघेही जातात, दरम्यान सामना सुरू होतो आणि काही मिनिटांतच रंगात येतो. ऑर्जिन आणि त्याच्या मित्रांचा हलकल्लोळ  सुरू असतो. त्यांना एकदोनदा शांततेने सामना बघण्याची ताकीदही अन्य प्रेक्षक देतात. दरम्यान गोल होतो आणि विहारातील शिस्तप्रिय मंडळींचं स्वत:वरील नियंत्रणच सुटतं. अखेर तेथील व्यवस्थापक त्यांना बाहेरची वाट दाखवतात. हिरमुसल्या चेहऱ्याने ते रात्री उशिरा विहारात पोहोचतात. तर तिथे चक्क गेको त्यांची वाट बघत असतात. अगदी चतुराईने चाललेला हा उपक्रम इथेच बंद पडतो. गेको त्यांना खूप रागावतात. दिलेल्या शिकवणीची आठवण करून देतात. अखेर शिक्षा म्हणून विहारातील सर्वांसाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतात. म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना!

मार्गात अडचणी आल्या, मदतीची दारं बंद होताना दिसली, की व्यक्तिमत्त्वाची खरी परीक्षा होते. कुणी प्रश्नांच्या जाळ्यात गुरफटून तिथेच अडकतो, तर कुणी आपली क्षमता आणि मर्यादा नीट ओळखून आगेकूच करण्यासाठी मार्ग शोधू लागतो. ऑर्जिनचं व्यक्तिमत्त्व दुसऱ्या प्रकारात मोडतं. त्यामुळे तिसऱ्या-चौथ्या दिवशी स्वयंपाक सुरू असताना तो मित्रांना म्हणतो, ‘‘विश्वचषक स्पर्धा चार वर्षांतून एकदाच होते. अगोदरच आपण दोन्ही उपान्त्य सामान्यांना मुकलो आहोत. उद्या ब्राझीलविरुद्ध फ्रान्स अंतिम सामना आहे. एकीकडे रोनाल्डो तर दुसरीकडे झिदान, हा सामना न बघणं म्हणजे अपराधच! त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, फ्रान्स हा एकमेव देश तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा देत आहे. त्यांच्या संघाला आपण प्रोत्साहन द्यायलाच हवं. सामन्यापूर्वी प्रत्येक संघाचं राष्ट्रगीत गायलं जातं. कधी तरी आपल्या तिबेटचंही राष्ट्रगीत गाता यायला हवं. त्यासाठी हा सामना बघावाच लागेल!’’ इथे ऑर्जिनचं ज्वलंत देशप्रेम दिसतं. सोबतच, तिबेटच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परीस्थितीचंही त्याला ज्ञान असतं.

‘‘बरं ठीक आहे, मुद्दा पटला. पण करायचं काय?’’ उर्वरित सर्वजण विचारतात.

उत्तर ऑर्जिनकडे असतं. ‘‘गेको यांनाच मदत मागू या. मला असं वाटतं की, त्यांनी आपल्याला जे रागावलं, ते फुटबॉलचा सामना बघितला म्हणून नाही, तर रात्री-अपरात्री न सांगता बाहेर पडणं सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नव्हतं म्हणून. आपल्या काळजीपोटीच त्यांनी आपल्याला ही शिक्षा दिली असावी. आणि असं असेल तर विहारातच सर्वांनी मिळून सामना बघण्याला हरकत का असावी?’’ परीस्थितीकडे निर्मळ मनाने, सकारात्मक दृष्टीने बघण्याचं हे किती सुंदर उदाहरण आहे, नाही का?

मग मित्रांना घेऊन अतिशय प्रांजळपणे ऑर्जिन हाच मुद्दा गेकोंना पटवून सांगतो. त्यांनाही कौतुक वाटतं. पण आपला राग अजून गेला नाही, असा ते आव आणतात.

‘‘एबॉट यांनी सहमती दर्शवली तरच पुढचं बोलता येईल. इथेच थांबा, मी चर्चा करून येतो.’’ असं म्हणत गेको एबॉट यांच्या ध्यानगृहाकडे चालू लागतात. मुलांची ही विनंती ते एबॉट यांना आदरयुक्त शब्दांमध्ये सांगतात.

‘‘दोन देश एका चेंडूसाठी झगडतात, म्हणजे हिंसा होतच असणार..?’’ एबॉट विचारतात.

‘‘तशी फार नाही होत. थोडी धक्काबुक्की चालायचीच, नाही का?’’ गेको उत्तर देतात.

‘‘मुलांवर वाईट संस्कार होतील, असं काही सामन्यात दाखवतात का?’’ एबॉट यांचा दुसरा प्रश्न.

‘‘नाही. मुळीच नाही. मी खात्री देतो.’’ लहान मुलाला शोभेल अशा उत्साहात गेको उत्तर देतात.

‘‘ठीक आहे, आता माझा शेवटचा प्रश्न. या फुटबॉल खेळाबद्दल तुम्हांला एवढी माहिती कशी काय?’’ एबॉट मिश्किलपणे हसतात. गेकोसुद्धा निरुत्तर झालेले असतात. विद्यार्थिदशेत गेको यांनीही फुटबॉलचे सामने नक्की बघितले असावेत, हे एबॉटना कळून चुकलेलं असतं. दोघेही दिलखुलास हसतात आणि सामना बघण्याची परवानगी मिळते.

इथून एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात होते. सामना बघण्याच्या उत्साहाचं एका सांघिक जबाबदारीत रूपांतर होतं. संघाला नेतृत्व तर हवंच असतं. इथे वयाने लहान असूनही ऑर्जिन पाऊल पुढे टाकतो. अनेकदा परिस्थितीच नेतृत्वाला जन्म देते. मग वय, लिंग, भाषा इत्यादींचा त्याला अडथळा येत नाही.

उत्तम नेतृत्वासाठी लागणाऱ्या इतरही गुणांचं दर्शन ऑर्जिनमध्ये घडतं. उदाहरणार्थ, गावातील व्हिडिओ सेंटरमधून टीव्ही भाड्याने आणायचा आणि त्यासाठी हव्या असलेल्या तीनशे रुपयांची जुळवाजुळव विहारातील सर्वांकडून वर्गणी गोळा करून करायची, असा सुस्पष्ट ॲक्शन प्लॅन त्याच्याकडे असतो. तसेच तो व्यक्ती-अनुरूप कामाची नीट विभागणीही करतो.

परंतु सर्व धावपळ करूनही अपेक्षेनुसार होतंच असं नाही. वर्गणीतून दोनशेच रुपये गोळा होतात, आता उरलेले शंभर रुपये देणार कोण? ऑर्जिनला त्या भविष्य सांगणाऱ्या अवलियाची आठवण येते. त्याला तो शंभर रुपयांची मदत मागतो. अवलियाने विनंती धुडकावून लावल्यानंतर तो अवलियाच्या खोलीला बाहेरून कुलूपच लावतो. ‘‘पैसे दिले, तरंच किल्ली मिळेल,’’ अशी धमकीच देतो. हळूहळू ऑर्जिनचं एक निराळं रूप समोर येऊ लागतं.

अखेर तीनशे रुपये घेऊन सर्व जण व्हिडिओ सेंटरला जातात. तिथे त्यांना कळतं, की अंतिम सामना असल्यामुळे टीव्हीचं भाडं आता साडेतीनशे रुपये करण्यात आलं आहे. एवढ्या कष्टांनंतर कसेबसे तीनशे रुपये जमा झालेले असतात. आता आणखी पन्नास रुपये आणायचे कुठून? सर्व जण हताश होतात. अंतिम सामना बघण्याचं स्वप्न अपुरंच राहणार, असं सर्वांना वाटत असतं.

तेवढ्यात ऑर्जिनला न्यिमाच्या घड्याळाची आठवण येते. हे घड्याळ गहाण ठेवलं, तर टीव्ही मिळेल आणि सामना बघता येईल, असा त्याचा बेत ठरतो. ‘फुटबॉलसाठी सगळं काही,’ असं करताना एका गोष्टीचा विसर त्याला पडतो. घड्याळ लहानग्या न्यिमाजवळ असलेली त्याच्या आईची एकमेव आठवण असते. ते हिरावून घेतलं तर त्याला किती दुःख होईल, हा विचारही ऑर्जिनच्या मनाला शिवत नाही. सामना बघता येईल, या विचारानेच तो पुरता हरखून गेलेला असतो.

अखेर टीव्ही मिळतो बरीच धावपळ करून तो विहारात आणला जातो. आणि रात्री सामना सुरू होतो. विहारातील सभागृह गजबजून गेलेलं असतं, एबॉट आणि गेकोसुद्धा सामना बघायला येतात. फ्रान्स आणि ब्राझील या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रोमांचक लढत सुरू असते. तेवढ्यात ऑर्जिनची नजर मान खाली घालून हुंदके देणारा न्यिमा आणि त्याला जवळ घेऊन त्याची समजूत घालणाऱ्या पाल्डेनकडे जाते. आपले घड्याळ परत मिळणार नाही कदाचित, अशी भीती त्याला वाटत असते. ऑर्जिनला त्याची चूक कळते. आपल्या क्षणिक मनोरंजनासाठी आपण त्याचं सुख हिरावून घेतलं, या विचाराने त्याचं मन पिळवटून निघतं. आता त्याला सामना बघण्यात यत्किंचितही रस उरलेला नसतो. ही चूक आपण ताबडतोब दुरुस्त करायला हवी. म्हणून तो थेट खोलीकडे धाव घेतो. हा प्रकार गेको यांच्या नजरेत येतो. तेही ऑर्जिनच्या पाठीमागे झपझप पावले टाकत निघून जातात.

खोलीत ऑर्जिन कपड्यांची पेटी हुडकत असतो. गेको यांना तो झाला प्रकार सांगतो. ‘‘माझ्याकडे ही कट्यार आहे. मोत्यांनी सजवलेल्या या कट्यारीची नक्कीच किंमत मिळेल. दिवस उजाडताच कट्यार देऊन मी न्यिमाचं घड्याळ परत मिळवीन. त्याच्या डोळ्यांतील अश्रू खरंच बघवत नाहीत!’’ ऑर्जिनला अधिक काही बोलवत नाही.

गेको यांना ऑर्जिनचं कौतुक वाटतं. खरा आनंद इतरांचं सुख जपण्यात आहे! हा धडा ऑर्जिन अनुभवातून शिकलेला असलो. पन्नास रुपयांसाठी महागडी कट्यार सहज द्यायला तयार झालेल्या ऑर्जिनला गेको म्हणतात, ‘‘तुझं व्यवहारज्ञान अगदी शून्य आहे. म्हणून मला खात्री आहे की तू उत्तम लामा बनशील. सर्वांशी तुझं मानवतेचं आणि प्रेमाचंच नातं असेल!’’

दुसरा दिवस उजाडतो. वर्ल्ड कप ऑर्जिनच्या आवडत्या फ्रान्स संघाने जिंकलेला असतो. त्याचा सर्वांत आवडता खेळाडू, रोनाल्डोला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळतो. पण ऑर्जिनला आज आनंद एकाच गोष्टीचा असतो. न्यिमाचं घड्याळ त्यानं परत मिळवून दिलेलं असतं.

दरम्यान एबॉट यांच्या शिकवणीची वेळ झालेली असते. आज ते विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारात, ‘‘पृथ्वीवर इतके दगड-धोंडे आहेत, काटे आहेत. त्यामुळे पायाला इजा होते. मग त्यावर उपाय म्हणून संपूर्ण पृथ्वीभोवती एक मऊ कापड गुंडाळता येईल का?’’

विद्यार्थी उत्तर देतात, ‘नाही.’

‘‘मग काय करता येईल?’’ एबॉट विचारतात.

‘‘आपणच पायांत चप्पल घालायला हवी,’’ एक विद्यार्थी उत्तर देतो.

‘‘अगदी बरोबर, पायांत चप्पल घालणे, विशाल पृथ्वीला मऊ कापड गुंडाळण्यासारखंच आहे. तसंच जगात असंख्य शत्रू आहेत. त्या सर्वांवर विजय मिळवणे शक्य नाही. परंतु आपण मनातील द्वेषावर नियंत्रण मिळवलं, तर तेसुद्धा सर्व शत्रूंवर विजय मिळवण्यासारखंच असेल.’’ हळूहळू एबॉट ह्यांचा आवाज पुसट होत जातो आणि चित्रपट संपतो.

एखाद्या खळखळणाऱ्या प्रवाहातून ओंजळभर पाणी घ्यावं, तसंच कुठल्याही गोष्टीचं असतं. मनाला शीतल तृप्तता देऊन ती कुठेतरी संपते. प्रवाह मात्र अखंडित सुरू असतो. चित्रपट संपताना त्याची कल्पना येते.

तिबेटला परत जाण्याचं एबॉट यांचं स्वप्न खऱ्या आयुष्यात पूर्ण झालेलं असतं.

ऑर्जिन तिबेटचा पहिला राष्ट्रीय फुटबॉल संघ बनवण्याचं स्वप्न रंगवत असतो.

....आणि विहारातील अनेक विद्यार्थी पुढच्या विश्वचषकाची आतुरतेने वाट बघत असतात!

----

साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'फोरपा / द कप' या हिंदी आणि तिबेटन भाषेतील तिबेटन चित्रपटावर निलेश मोडक यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.   

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मोडक
neeleshmodak@gmail.com

लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके