डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘ती फुलराणी’ अभिजात भावनाट्याचा दर्जेदार प्रयोग

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ज्यांना अत्यंत आदराचे स्थान लाभलेले आहे, ज्यांनी किमान गेले अर्थ शतक मराठी रसिकांच्या मनावर आपली रूपांतरित आणि स्वतंत्र नाटके, प्रवासवर्णने, मध्यमवर्गीय जीवनामधील दर पिढीगणिक होत जाणारा बदल, आपला खट्याळ आणि विशुद्ध विनोद व अंतर्मुख करणारे कारुण्य यांसह टिपून केलेले विनोदी लेखन; व्यक्तिचित्रे, चिंतनपर लेख; यांच्याद्वारे अधिराज्य गाजविले आहे आणि आपल्या लेखनामधून जीवनाच्या विविधांगांचा वेध घेऊन अंतिमतः निखळ मानवतावादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केळा आहे अशा पु.ल. देशपांडे यांची ‘ती फुलराणी’ ही सुखात्मिका ही अशीच एक अभिजात नाट्यकृती आहे.

काही कलाकृतींना देशकाल परिस्थितीच्या सीमा नसतात. कोणत्याही काळात आणि कोणत्याही सांस्कृतिक सामाजिक पर्यावरणामध्ये त्या रसिकांच्या मनाला सारखेच आवाहन करीत असतात. त्या-त्या काळातील वाचक/प्रेक्षकांची अभिरुची समृद्ध करण्यात आणि त्यांना अर्थपूर्ण जीवनानुभवाचे दर्शन घडवून भारावून टाकण्यामध्ये अथवा क्वचित अंतर्मुख करण्यामध्येदेखील अशा कलाकृती मोलाची कामगिरी बजावीत असतात. स्वाभाविकपणे अशा कलाकृतींना समाजमनामध्ये एखाद्या दंतकथेचे, मिथ्यकथेचेही स्थान प्राप्त झालेले असते. या कलाकृतींना सामान्यपणे अभिजात कलाकृती म्हणून संबोधले जाते. दर पिढीगणिक त्यांचे नव्याने अवलोकन केले जाते. त्यांचा नव्याने अन्वय लावला जातो. त्यातही ती कलाकृती नाटकासारख्या प्रयोगधर्मी वाङ्मयप्रकारातील असेल तर तिचा प्रयोग करून बघण्यामध्ये नव्या पिढीच्या रंगकर्मींना एक प्रकारचे आव्हान वाटत असते. नव्या पिढीचे असे रंगकर्मी हे आव्हान स्वीकारायला नेहमीच उत्सुक असतात.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये ज्यांना अत्यंत आदराचे स्थान लाभलेले आहे, ज्यांनी किमान गेले अर्थ शतक मराठी रसिकांच्या मनावर आपली रूपांतरित आणि स्वतंत्र नाटके, प्रवासवर्णने, मध्यमवर्गीय जीवनामधील दर पिढीगणिक होत जाणारा बदल, आपला खट्याळ आणि विशुद्ध विनोद व अंतर्मुख करणारे कारुण्य यांसह टिपून केलेले विनोदी लेखन; व्यक्तिचित्रे, चिंतनपर लेख; यांच्याद्वारे अधिराज्य गाजविले आहे आणि आपल्या लेखनामधून जीवनाच्या विविधांगांचा वेध घेऊन अंतिमतः निखळ मानवतावादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केळा आहे अशा पु.ल. देशपांडे यांची ‘ती फुलराणी’ ही सुखात्मिका ही अशीच एक अभिजात नाट्यकृती आहे. या नाटकामधील ओघवते, खटकेबाज संवाद, एखाद्या भाषापंडितालाही लाजवील अशी पु.लं.ची भाषेविषयीची मार्मिक निरीक्षणे, दोन व्यक्तींमधील नात्याचा तरल, काव्यमय, परस्परांना समृद्ध करणारा पु.लं.नी नाट्यबद्ध केलेला प्रवास, या घटकांमुळे या सुखात्मिकेने गेल्या पाव शतकामध्ये अनेक अभिनेत्यांना, अभिनेत्रींना भुरळ घातलेली आहे. पंचवीस-सव्वीस वर्षांपूर्वी ‘ती फुलराणी’ या नाटकाचा स्वतः पु.लं.नी दिग्दर्शित केलेला प्रयोग रंगभूमीवर आला. त्यामध्ये सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक अशी दिग्गज नटमंडळी होती. त्या प्रयोगाने प्रेक्षकांना चिरस्मरणीय अनुभव दिला होता. त्यामुळे मराठी रसिकांच्या मनामध्ये एक प्रकारच्या मिथ्यकाचे स्थान लाभलेल्या या नाटकाचा प्रयोग करणे हे एक प्रकारचे आव्हान होते. मात्र ‘चंद्रलेखा’ या नाट्यसंस्थेसाठी दिग्दर्शक वामन केंद्रे या आजच्या आघाडीच्या दिग्दर्शकाने सादर केलेला ‘ती फुलराणी’ या नाटकाचा नवा प्रयोग हे आव्हान पेलण्यामध्ये यशस्वी झाला आहे. असे म्हणता येईल.

पु.लं.नी ‘ती फुलराणी’ हे नाटक बर्नॉर्ड शॉच्या ‘पिग्मॅलियन’वरून रूपांतरित केले आहे की, ते ‘माय फेअर लेडी’ या चित्रपटावरून घेतले आहे, या वादात न जाता निखळपणे या नाटकाच्या संहितेकडे पाहिले तर लक्षात येते ते असे की, ‘ती फुलराणी’ हे सामान्यपणे तीन स्तरांवर आकाराला येणारे भावनाट्य आहे. त्यामधील पहिला स्तर किंवा घटक आहे तो म्हणजे, हे नाटक भाषेविषयीच्या, उच्चारांविषयीच्या कुतूहलातून आणि भाषेची निर्मिती कशी झाली असेल या कुतूहलामधून निर्माण झालेले नाटक आहे. या नाटकाला लाभलेला दुसरा स्तर आहे तो, भाषेच्याद्वारे प्रकट होणारी आपल्या समाजातील सामाजिक सांस्कृतिक विषमता होय. तिसऱ्या स्तरावर मात्र ‘ती फुलराणी’ हे नाटक काव्यमय अशी तरल प्रेमकहाणी आहे. मुंबईच्या चिंचपोकळीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, शिळी फुल पाणी मारून नव्याने विकणाऱ्या कुण्या एका फुलवाल्या मंजुळा साळुंके नावाच्या अजागळ मुलीचा एका ‘फुलराणी’पर्यंत होणाऱ्या आणि केवळ स्वतःचे भाषावैभव, स्वतःची बुद्धिमत्ता, प्रकांडपांडित्य यातच मश्गुल राहून आत्मकेंद्री बनलेल्या प्रो. अशोक जहागिरदार या माणसाचे एका प्रेमिकामध्ये रूपांतर होण्याच्या प्रवासाचे हे एक भावनाट्य आहे. 

‘ती फुलराणी’ची संहिता वाचीत असताना या नाटकाचा आणखी एक पैलू लक्षात येतो. उच्चवर्गीयांच्या, उच्चवर्णीयांच्या बेगडी जगण्याचा, त्यांच्या तथाकथित सुसंस्कृतपणाचा, त्यांच्या भाषिक अहंकारांचा, त्यांच्या दांभिकतेचा पु.लं.नी या नाट्यानुभवाच्याद्वारे केलेला उपहास, दंभस्फोट हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या नाटकामधील या काही घटकांना समतोलाने आविष्कृत करून त्यातून एक समृद्ध आणि म्हणूनच अविस्मरणीय नाट्यानुभव साकार करणे ही या अभिजात नाट्यकृतीच्या प्रयोगाच्या यशस्वितेची एक कसोटी आहे.

वामन केंद्रे हे आजचे कल्पक आणि प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. व्यावसायिक रंगभूमीच्या मर्यादेत काही नवे प्रयोग करून पाहणे; नव्या दर्जेदार नाटकांना आणि अभिजात नाटयकृतींना स्वतःच्या संकल्पनांनुसार नव्याने सादर करून पाहणे, हे केंद्रे यांच्या दिग्दर्शकीय कामगिरीचे ठळक वैशिष्ट्य आहे. केंद्रे यांनी प्रस्तुत प्रयोगाच्या केलेल्या दिग्दर्शनामध्येदेखील त्यांच्या या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. हे नाटक भाषेसंबंधीच्या, उच्चारशास्त्रासंबंधीच्या आणि अंतिमतः अक्षरांच्या, शब्दांच्या भाषेच्या निर्मितीविषयीच्या कुतूहलातून निर्माण झाले आहे, याची जाणीव केंद्रे यांच्या प्रयोगात अगदी प्रारंभापासून म्हणजेच, "ही सारी शब्दांची किमया" ही प्रारंभीची नांदी कोरसला दर्शनी पडद्याच्या बाहेर आणून, प्रेक्षकांना विश्वासात घेऊन प्रभावीपणे गायला लावल्यापासूनच अधोरेखित झालेली आहे आणि दृश्यागणिक उत्तरोत्तर ती गडद झालेली आहे. तसेच सामाजिक विषमतेची जाणीवदेखील प्रारंभीच्या दृश्यांत विविध बोलींमध्ये बोलणारी पात्रे, मंजुळेची तथाकथित अशिष्ट भाषा, सुमा आणि सुभद्रा पटवर्धन यांची उच्चपणाचा दंभ असलेली आंग्लाळलेली मराठी; यांच्यामधून आणि डॉ. जोशी व अशोक जहागिरदार यांच्या नाटकभरच्या संवादामधून व्यक्त होणाऱ्या उच्चवर्गीयांच्या, उच्चवर्णीयांच्या जगण्यातील शुद्धाशुद्धतेविषयीच्या भाषिक अहंकारातूनही दिग्दर्शकाने सुस्पष्टपणे प्रकट केलेली आहे. परंतु या दोन्ही घटकांपेक्षा एक तरल प्रेमकहाणी, एक भावनाट्य म्हणून ‘ती फुलराणी’ साकार करण्यात दिग्दर्शक केंद्रे कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यासाठी संहितेत अदृश्य असलेल्या कोरसचा त्यांनी प्रयोगभर केलेला वापर, प्रो.अशोक जहागिरदार आणि मंजुळा यांच्यातील जवळकीचे, दुराव्याचे प्रसंग; त्यांच्यातील गुरु-शिष्या ते प्रियकर-प्रेयसी हे परिवर्तन दाखविणारे भावपूर्ण प्रसंग; बालकवींच्या कवितांचा केलेला अर्थपूर्ण वापर, प्रत्येक पात्राला स्वतःचे व्यक्तित्व प्राप्त करून देणारी अभिनयशैली आणि त्याद्वारे संपूर्ण रंगमंचाचा केलेला वापर, नजरबंदी करणारा अंकांचा शेवट; या घटकांच्याद्वारे वामन केंद्रे यांनी हे भावनाट्य कमालीच्या उत्कटतेने आणि काव्यमयतेने साकार केले आहे. मात्र त्यांनी संहितेमधील आईसाहेबांचे दृश्य वगळून पार्टीचा नव्याने सादर केलेला प्रसंग नाट्यानुभवाच्या तार्किक विकासाशी सुसंगत असला, तरीदेखील उच्चवर्गीयांच्या जगण्यामधील दांभिकपणाचा दृश्य स्वरूपात उपहास करण्याच्या पुलं.च्या हेतूला मात्र त्यामुळे बाधा पोहोचते. त्यामुळे या नाट्यानुभवातील वर्गविग्रहाची जाणीव काही प्रमाणात उणावते.

‘ती फुलराणी’ ही नायिकाप्रधान सुखात्मिका आहे. त्यातील मंजुळा साळुंकेची भूमिका भक्ती बर्वे-इनामदार या ख्यातकीर्त अभिनेत्रीने अजरामर करून ठेवलेली आहे. त्यामुळे ही भूमिका करणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र, अमृता सुभाष या नव्या पिढीतल्या अभिनेत्रीने हे आव्हान तर लीलया पेलले आहेच, परंतु या भूमिकेवर तिने निर्विवादपणे आपला हक्क सिद्ध केलेला आहे. मंजुळा म्हणून चपखलपणे शोभून दिसणाऱ्या अमृता सुभाष त्यांनी, घडविलेला भावाविष्कार, देहबोलीचा केलेला वापर, गायिलेली गाणी, म्हटलेले दीर्घ स्वगत, व्यक्त केलेली मंजुळेची हताशता, तिचा होणारा उद्रेक या आणि एक फुलवाली एक 'प्रणयचंचला' प्रेयसी ते एक आत्मभान आलेली स्त्री हे परिवर्तन दाखवणारा प्रवास; यांच्याद्वारे आपण एक समर्थ अभिनेत्री असल्याचा प्रत्यय आणून दिलेला आहे. अमृता सुभाषच्या रूपाने रंगभूमीला एक प्रगल्भ अभिनेत्री मिळालेली आहे. काहीसा हाच अनुभव दगडोबाच्या भूमिकेतील मिलिंद शिंदे या नव्या नटाने दिलेला आहे. केवळ दोनच दृश्यांमध्ये रंगमंचावर येणारा हा अभिनेता संपूर्ण प्रयोगात, आपली चपळ हालचाल, धूर्त, बेरकी नजर, गावरान भाषेला साजेसा काहीसा किनरा आवाज यांच्या साहाय्याने ठसा उमटवून जातो. अविनाश नारकर एक गुणी अभिनेता आहे. काहीसे पारंपरिक अभिनयशैलीचे अनुकरण करणारा हा तडफदार अभिनेता प्रो.अशोक जहागिरदारच्या भूमिकेची सगळी वैशिष्ट्ये अधोरेखित करतो. त्याने अखेरच्या स्वागतामधील उद्वेग, मंजुळेविषयी वाटणारी ओढ, उत्कटपणे, प्रभावीपणे साकार केलेली आहे. सुबोध प्रधान डॉ. विश्वनाथ जोशींच्या भूमिकेत नीट असले तरीदेखील क्वचित् एखाद्या प्रसंगी त्यांना कृत्रिम अभिनय करावा लागलेला आहे. अन्य कलावंतांनी आपली कामे चोखपणे केलेली आहेत.

आवर्जून उल्लेख करावयास हवा तो अनंत अमेंबल यांच्या पार्श्वसंगीताचा. संवादांना चाली लावून, त्या अभिनेत्री, अभिनेत्यांकडून गाऊन घेऊन, तसेच बालकवींच्या कवितांना अनोख्या आणि सुश्राव्य चाली लावून आणि दोन दृश्यांमधल्या काळोख्या जागा अर्थपूर्ण पार्श्वसंगीताने भरून काढून त्यांनी (आणि दिग्दर्शकानेदेखील) हे एक सांगितिक, काव्यमय भावनाट्य असल्याचा पुरेपूर प्रत्यय आणून दिलेला आहे. मोहन वाघांनी सुटसुटीत आणि पोषक नेपथ्य उभारून आणि प्रसंगानुरूप प्रकाशयोजनेतून हेच साध्य केलेले आहे. त्यांनी या नाटकाची देखणी निर्मिती केलेली आहे. पुलंच्या या अभिजात भावनाट्याचा आजच्या कल्पक आणि प्रयोगशील दिग्दर्शकाने आणि नव्या प्रतिभावंत अभिनेत्रीने, अभिनेत्याने साकार केलेला हा दर्जेदार प्रयोग रसिकांनी अनुभवावयास हवा.

Tags: पिगमेलियन बर्नाड शॉ वामन केंद्रे राजा नाईक अरविंद देशपांडे भक्ती बर्वे सतीश दुभाषी पु. ल. देशपांडे ती फुलराणी निळकंठ कदम ‘Pygmalion’ Barnard Show Vaman Kendre Raja Naik Arvind Deshpande Bhakti Barve Satish Dubhashi P.L. Deshpande ‘Tee Fulrani’ Nilkanth Kadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके