डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मिणमिणत्या मंद प्रकाशात बुद्धाचा पुतळा खूपच लांबलचक वाटत होता. शांतपणे पहुडलेला तो सुंदर बुद्ध! माझ्या हाताला झालेला मृत्यूचा थंड स्पर्श माझ्या मनात अजून ताजा होता. परंतु त्या बुद्धाच्या सुंदर, रंगीत शिल्पाने मनात आनंदी चेतना दिली होती.

कोटाभारू, काला तेरेंगानु, तानजोंग नारा हे सर्व भाग पाहिल्यावर पश्चिम मलेशियाचा पूर्व किनारा जवळजवळ सर्व पालथा घातला होता. आता कान्टान शहरातून बोट घेऊन पूर्व मलेशिया ह्या बोर्नेओ देशाजवळील भागात जायचा विचार फारच छान वाटला. कान्टान शहराबाहेरील थोडंसं रानात, डोंगरातील गुहेतला, एका कुशीवर पहुडलेला, बुद्धाचा लांबलचक पुतळा प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याची माहिती काढल्यावर मला समजलं की बसस्टँडवरून दर अर्ध्या तासाने एक बस सुटते नि त्या गुहेपासून दोन किलोमीटर्स दूर, शेवटच्या बसस्टॉपवर थांबते. चार किलोमीटर्स चालणं म्हणजे हातचा मळ.

बसस्टँड शोधून काढून मी तेथे बरोबर साडेनऊला पोहोचले. दोन मिनिटांत एक ऑस्ट्रेलियन तरुण जोडपं त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीला घेऊन माझ्या शेजारी येऊन बसलं. कोणतीही बस आली की आम्ही सर्व धावपळ करून, खात्री करून घ्यायचो की ती आमची बस नव्हती. इंग्लिश तर कोणालाच येत नव्हतं आणि माझं मलय भाषेचं ज्ञान हे थोड्या वाक्यांपुरतं. फक्त एक टॅक्सीवाला, त्याचं नाव महंमद, केव्हापासून आमच्यामागे लागला होता. त्याला बरंच इंग्लिश येत होतं. ऑस्ट्रेलियन जोडपं पक्कं ट्रॅकिंग करणारं, त्यामुळे टॅक्सी घ्यायच्या भानगडीत पडायला ते कबूल नव्हतं. एकटीनं त्या रानात, टॅक्सीतून जाणं मला मुळीच उचित वाटत नव्हतं. त्यामुळे महंमदकडे दुर्लक्ष करून आम्ही बसची वाट पाहत बसलो. बघताबघता अडीच तास होऊन गेले. आमच्या लक्षात आलं की बस कधी येणार आणि कोणत्या मार्गानं जाणार ह्या वेळापत्रकाला काहीच अर्थ नाही. वाटेल त्या वेळी वाटेल ती बस असा सावळा गोंधळ असतो.

आत्तापर्यंतचा माझा बसप्रवास व्यवस्थित झाला होता. त्यामुळे हा बेशिस्तपणा कान्टान ह्या शहराचं खास वैशिष्ट्यही असेल. ऊन खूपच तळपत होतं व जळते चटके देत होतं. आम्ही बसची वाट बघून बघून खरं म्हणजे वैतागलोच होतो. बारा वाजून गेले होते. महंमद टॅक्सीवाला, अधूनमधून आमच्याकडे दात विचकून जात होता. आठ वर्षांच्या लहान मुलीला, दुपारच्या कडक उन्हात चार किलोमीटर्स चालायला खूपच त्रास होणार हा माझा विचार त्या ऑस्ट्रेलियन आईला एकदाचा पटला. आम्ही सर्वांनी मिळून महंमदची टॅक्सी घ्यायची ठरवली. महंमद गेले तीन तास आमची वाट बघत बसलाच होता. कारण आमची बस येणार नाही, हे त्याला पक्कं माहीत होतं व परदेशी लोकांकडून भरपूर कमाई मिळणार हा त्याचा पूर्वानुभव. मी महंमदबरोबर पुढच्या सीटवर बसले. ऑस्ट्रेलियन कुटुंब पाठीमागे. गरम गरम उन्हाच्या झळा घोंघावून जात होत्या.

मी माझा हात टॅक्सीच्या दारावर विसावल्यामुळे, माझ्या हाताचं कोपर टॅक्सीबाहेरच झुकलं होतं. इतक्यात काहीतरी, चॉकलेटी तपकिरी रंगाची गोष्ट माझ्या हाताच्या कोपराला ओझरता थंड स्पर्श करून गेली. मी महंमदला ओरडून ताबडतोब टॅक्सी यांबवायला सांगितलं. आम्ही सर्वांनी मान वळवून पाहिलं. त्या काळ्या चमकणाऱ्या डांबरी रस्त्यावर एक सहा फूट लांबीचा, तुकतुकीत तपकिरी रंगाचा नाग वळवळत रानाच्या दिशेने जात होता. महंमद म्हणाला की आमच्या टॅक्सीच्या फिरत्या चाकाचा ओझरता स्पर्श झाल्यामुळे तो नाग एकदम त्याच्या शेपटीवर फुत्कारून उभा राहिला असल्यामुळे तो माझ्या हाताच्या कोपराला निसटता लागून गेला असणार.

ऑस्ट्रेलियन बाईचा आधीच पांढरा असलेला चेहरा आणखीन फटफटीत झाला. तिच्या नवऱ्याचा आवाज भीतीने चिरकला आणि त्याने महंमदला विचारलं की, ह्या भागात नाग भरपूर प्रमाणात आहेत का? तसे महमद म्हणाला, "हे सर्व रान नागांनी खच्चून भरलं आहे. त्यामुळे या गुहेतील परिसरात फार जपून चालावं लागतं. म्हणून मला इतके तास कळत नव्हतं की ही परदेशी माणसं इथं चार किलोमीटर्स चालण्याचा एवढा वेडा अट्टाहास का करत आहेत?" मी व ऑस्ट्रेलियन जोडप्याने सुटकेचा निःश्वास टाकला. त्या आठ वर्षांच्या मुलीला काय गंभीर गोष्ट झाली ते कळलंच नव्हतं. त्यामुळे गुहेत प्रवेश करण्यासाठी खूप खूप पायऱ्या वर चढून गेल्यानंतर परत आत उतरताना आम्ही सगळ्यांनी सतत एकत्र राहायचं ठरवलं.

आत एखादा मोठा हॉल असावा अशी ती गुहा खूप मोठी होती. मिणमिणत्या मंद प्रकाशात बुद्धाचा पुतळा खूपच लांबलचक बाटत होता. शांतपणे पहुडलेला तो सुंदर बुद्ध! त्याच्याभोवती जणू एक जादूचं वलयच. सबंध गुहेत आमच्याशिवाय आणखीन कोणीच नव्हतं. अंधारातून कधीकधी वटवाघळं पंख फडफडत घिरट्या मारीत होती. अंधारात आणखीन डोकावून बघण्याची आमची उत्सुकता केव्हाच विरघळून गेली होती. माझ्या हाताच्या कोपऱ्याला झालेला मृत्यूचा थंड स्पर्श माझ्या मनात अजून ताजा होता. परंतु त्या बुद्धाच्या सुंदर, रंगीत शिल्पानं मनात आनंदी चेतना दिली होती. सकाळपासून बसची वाट पाहण्यात गुंतल्यामुळे मी काहीच खाल्लं वगैरे नव्हतं. परत ती गुहा आतून चढून डोंगरावरील सर्व पायऱ्या उतरेपर्यंत पायांत अक्षरशः गोळे येऊन ते आखडून गेले. डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या बोटांच्या नखापर्यंत अंघोळ केल्याइतकी घामाने भिजले होते. हायकिंग बुटांच्या आत तर घामाचं जणू डबकंच झालं होतं व त्यातून सुळसुळ आवाज येत होता. पायऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या खोकड्या दुकानात कधी पोचू असं झालं होतं. एका क्षणात, कोका कोलाच्या दोन बाटल्या मी माझ्या घशात ओतल्या, तसा जीवात जीव आला. कोका कोला हा इतका चविष्ट व सुमधुर लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी, बंदरावर जाऊन, पश्चिमेकडून पूर्व मलेशियाला जाणारी प्रचंड बोट पकडली. ऑफ सीझन असल्यामुळे बोटीवर प्रवासी लोक नव्हते. परंतु मलेशियाचे पाचशे सैनिक, त्यांचे अधिकारी, काही अधिकाऱ्यांच्या बायका असे लोक त्या बोटीत होते. सबंध बोटीत एकूण बायका होत्या पंधरा, त्यांतील मी एकटी परदेशी. बोटीवर काम करणान्या दोघीतिघी मुलींना व मुख्य स्वयंपाक्याला अमेरिकेचे भयंकर आकर्षण. ते आकर्षण इतकं की एखाद्या महाराणीची काळजी घ्यावी तशी त्यांनी माझी काळजी घेतली. किती प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ घातले! सैन्यातील लोकांनाही मी नॉव्हेल्टी झाल्यामुळे, त्यांच्या मुख्य कर्नलने मला फारच मानानं वागविलं. खूपच गप्पाटप्पा झाल्या. पहिल्या व तिसऱ्या पंतप्रधानांच्या खासगी फंक्शनला मी हजर होते, हे कळल्यावर तर काय फारच कौतुक झालं.

मी बोटीत चकरा मारत असताना, अगदी खालच्या मजल्यावर शिडीच्या मागे एक उंचापुरा सरदारजी दिसला. त्याचं वय असेल तिशीच्या आसपास. ह्या माणसाबरोबर बोलावं की नाही असा विचार माझ्या मनात चमकून गेला. शेवटी न राहवून मी बोलले, ‘नमस्ते सरदारजी’ ते शब्द ऐकल्यावर तर तो एकदम जवळजवळ रडायलाच लागला. मग मला त्यानं त्याची गोष्ट सांगितली. तो भारत सोडून कसाबसा सिंगापूरपर्यंत पोहोचला होता. त्याच्यानंतर त्याच्याकडे व्हिसा वगैरे काहीच नसताना, नोकरीच्या शोधात तो मलेशियात भटकत होता. शेतावर काम करणारा तो जाट, पंजाबी भाषा बोलणारा माणूस! एक अक्षर इंग्लिश येत नव्हतं. हिंदीचाही जास्त गंध नाही. परंतु मला पंजाबी भाषा बरीच येत असल्यामुळे त्याची रांगडी जट्ट पंजाबी भाषा कळत होती. त्या माणसाची हिंमत बघून मी चाटच पडले. मी त्याला विचारले की परवानगीशिवाय तो मलेशियात कसा राहू शकला. तेव्हा तो म्हणाला, “बाईजी, आपलं गुरुद्वारा आहे ना! वाहेगुरू मला प्रेमानं भरवितो. भारतात राहून त्या शेतीवाडीत मी कुजतच पडलो होतो ना! आता आपली बोट कुचिंगमध्ये पोचेल. तेथे काही सरदार लोक आहेतच.

खूप खूप काम करेन. जे पडेल ते. थोडाबहुत पैसा मिळवीन आणि दीड वर्षात अमेरिकेला नक्कीच पोचेन. आता भारतात परत फिरणार नाही." हे धाडस होतं का मूर्खपणा? एक मात्र खरं, सरदार लोकांची धडपड व चिकाटी फारच. कोणतंही काम करायला त्यांची सदैव तयारी, असा माझा इतक्या वर्षांचा अनुभव. कोणालाही फुकट जेऊ-खाऊ घालायची त्यांची उदारताही कमालीची. बोटीवरील सर्व सैनिकांना पाहून तो इतका टरकला होता, की तो कोठेतरी दडून बसला. मला तो बोटीवर परत दिसला नाही. कुचिंग शहरातील बंदरावर माझा पासपोर्ट वगैरे तपासला गेला. त्या सगळ्यांतून तो सरदारजी कसा निसटला असेल कोणास ठाऊक? परंतु मला खात्री आहे की त्याने अमेरिकेपर्यंत घोडदौड नक्कीच केली असणार.

इतकंच नव्हे तर स्वकष्टाने, एखाद्या लहान बिझनेसचा मालकही झाला असेल. जगाच्या कोपऱ्यात कोठेही जा, एकतरी सरदार दिसतोच. बोट बंदराला लागेपर्यंत रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते. एका अधिकाऱ्याने मला टॅक्सी मिळवून दिली व एका उत्तम हॉटेलचा पत्ता दिला. हॉटेल शहरातील खूपच चांगल्या ठिकाणी व सुंदर होतं. मी हॉटेलमध्ये पोहोचते न पोहोचते, तेवढ्यात त्या अधिकाऱ्याचा तेथे फोन आला. त्याने मॅनेजरला सांगितले की ही मुलगी एकटी प्रवास करते आहे, तर तिची काळजी जातीने घ्या. झालं! मग तर काय हॉटेलमध्येही माझी सरबराई खूपच झाली. त्यामुळे शहरात एवढ्या रात्री पोचून पंचाईत काहीच झाली नाही. खरंच प्रत्येक माणसात चांगुलपणा खूप असतो, तो माझ्या वाट्‌याला खूप वेळा भरभरून येतो. याहून आणखीन काय पाहिजे?

(क्रमशः)

Tags: शांत बुद्ध मलेशिया प्रवासवर्णन आठवणी the silent buddha malessia tour diary memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके