Diwali_4 प्रसार, गोंधळ आणि मदतीचे राजकारण
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

अमेरिकेतील (व अनेक देशांतील) तज्ज्ञांचे या बाबतीत अज्ञान, चुकीचे आडाखे, सार्वजनिक आरोग्यसंस्थांनी केलेला गोंधळ, विलंब, चुकीचे मार्गदर्शन- अशा अनेक गोष्टी साथ वाढण्यास कारणीभूत झाल्या. गुप्तचर संस्था व प्रसारमाध्यमे यांनाही काही माहिती नव्हती. साथीचे गांभीर्य  प्रथम कोणाच्या लक्षातच आले नाही. अमेरिकेतील अनेक मान्यवर संस्थांचे तसेच लंडनच्या इंपीरिअल कॉलेजचे आडाखे भरमसाट फुगलेले निघाले. त्यानुसार जगभर असंख्य लोकांना हा रोग होऊन कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडणार होते. अमेरिकेत सव्वा कोटी ते 2 कोटी जीवितहानी होईल, असा अंदाज होता. साथ पसरून अधिकाधिक माहिती मिळू लागली, तेव्हा रोज ही नवी माहिती लक्षात घेऊन त्या पायावर सुधारित आडाखे बांधले गेले. ‘जा.आ. संघटना, नियाड, डॉ.फाउची, सीडीसी, फिमा, गुप्तचर संस्था (सीआयए), प्रसारमाध्यमे काय करीत होती?’ असा प्रश्न 29 एप्रिलच्या वार्ताहर परिषदेत कोमो यांनी विचारला आणि स्वत:चा काही दोष नसून ही साथ पसरल्याबद्दल- या सर्वांना दोष दिला.

चीनच्या हुबे प्रांतातील वुहानमध्ये प्राणिबाजारातील जिवंत वटवाघळे खाल्ल्यामुळे प्रथम लागण होऊन कोव्हिड-19 विषाणूची साथ उद्‌भवून जगभर फैलावली, असे सांगितले जात होते. पण वुहानमधील प्रयोगशाळेतील निष्काळजीपणामुळे 2019 च्या नोव्हेंबरमध्ये (वा त्याआधी) या विषाणूंची लागण तेथील एकीस होऊन तिच्या संसर्गामुळे वुहानमध्ये या रोगाचा फैलाव झाला, अशी अमेरिकन सरकारची माहिती आहे. सध्या अमेरिकेसह अनेक देश वैयक्तिक संरक्षक साहित्य, औषधे तसेच औषधांत व तपासणीपरीक्षेसाठी लागणारे घटक यांसाठी चीनवरच अवलंबून असल्यामुळे चीनला याबद्दल जाब विचारणे व खोलात तपास करणे, हेही साथ आटोक्यात येईपर्यंत करता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेला आणि अमेरिका वा इतर कोणत्याही देशाच्या जीवशास्त्र संशोधकांना वुहानच्या प्रयोगशाळेस वा प्राणिबाजारास भेट देऊन तपासणी करण्यास चीनने बंदी केल्यामुळे तिथे खरी काय अवस्था आहे, हे समजू शकत नाही. तपासणी करण्याची मागणी 4 मे रोजी जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रेलिया व अमेरिका यांनी केल्यावर चिनी राजदूताने ऑस्ट्रेलियातून वाईन व अन्न आयातीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली.

आपली प्रयोगशाळा ही अमेरिकन प्रयोगशाळांच्या तोडीचीच नव्हे तर सरसच आहे, हे दाखवण्यासाठी गेली काही वर्षे चिनी शास्त्रज्ञ वुहानच्या प्रयोगशाळेत जंतूंवर प्रयोग करीत होते, जंतूंच्या विषाची तीव्रता वाढवण्याचेही प्रयोग चालू होते. या प्रयोगशाळेस उत्तेजनार्थ म्हणून अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया लाखो डॉलर देणगी अनेक वर्षे देत आले आहेत. तिथे जंतू बंदिस्त राहतील, त्यांचा कर्मचाऱ्यांना संसर्ग होणार नाही, ते निष्काळजीपणामुळे वा चुकीमुळे बाहेर फैलावणार नाहीत यासाठी आवश्यक त्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात बेपर्वाई दिसते- अशी सावधगिरीची सूचना 2017 मध्ये अमेरिकेने अहवालात नोंदली होती.

सर्वसामान्य चिनी जनतेत ॲक्युपंक्चर, पारंपरिक चिनी औषधे, वनस्पती वा प्राण्यांचा विविध प्रकारे औषध म्हणून वापर खूप असतो. खेेड्यापाड्यांत अनेकदा चुकीचे निदान करून चुकीची औषधेही दिली जातात. यामुळे हुबेमध्ये लाखो लोकांना या विषाणूची बाधा होऊन अनेक जण मृत्यू पावले असण्याची शक्यता आहे. चिनी सरकारी अधिकाऱ्यांनी या रोगाची बातमी लपवून ठेवून वेळीच उपाययोजना केली नाही. रोग्यांना समाजात मिसळून दिले. त्यामुळे वुहानमध्ये ही साथ सुरू झाली व फोफावली. ती इतकी संहारक व माणसांत संसर्गजन्य असल्याचे चिनी अधिकाऱ्यांना डिसेंबरमध्येच समजल्यावर ती चीनमध्ये इतरत्र फैलावू नये व हुबेमध्येही आटोक्यात राहावी, यासाठी त्यांनी विलगीकरणाचे व आणीबाणीचे कडक उपाय योजले. हुबेमधून चीनच्या इतर भागात जायला व इतर भागांतून हुबेमध्ये यायला बंदी केली. फेब्रुवारीपर्यंत वुहानमध्ये लोकांना घराबाहेर जाण्यासही बंदी होती.

जीवितहानीबरोबरच वुहानची आर्थिक व्यवस्थाही पार कोसळली. अनेकांचे धंदे बसले, रोजचे व्यवहार थांबले. ही भीषण अवस्था पाहून डिसेंबरमध्येच इतर देशांना या साथीची माहिती देऊन लगेच सावध करणे, वुहानमधून परदेशप्रवासास बंदी घातून ही साथ जगभर पसरणार नाही हे बघणे- हे चीनचे कर्तव्य होते. पण लोकांना परदेशात जाण्यास मुक्तद्वार ठेवले होते. या काळात वुहान व चीनच्या इतर भागांतून 4 लाख 30 हजार लोक  अमेरिकेत आले, 5 हजार इटलीत व काही युरोपात गेले. हे बेजबाबदार वर्तन होते, की पद्धतशीर योजना? दमडीही खर्च न करता, या विषाणूचा गुप्त अस्त्रासारखा उपयोग करून सर्व जगाची व विशेषकरून अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून पाडण्याची आयती संधी मिळत आहे, हे पाहून चीनने हे कपट कारस्थान फार खुबीने पार पाडले असण्याची शक्यता आहे. काही गरीब राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची या साथीमुळे फारच हलाखीची परिस्थिती होईल, तेव्हा चीनच त्यांना मदतीचा हात देऊन ते देश स्वत:च्या ताब्यात घेईल. आर्थिक मदत दिल्याच्या बदल्यात झांबियातील खाणी ताब्यात घेऊन तेथील खनिजसंपत्तीवर मालकी हक्क सांगण्यासाठी चीन दबाव आणत असल्याची बातमी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिली आहे.

‘डेली मेल’च्या सविस्तर वार्तापत्रांवरून दिसते की, नवा विषाणू उद्‌भवल्याचे 31 डिसेंबरला चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले पण तो प्राण्यांकडून माणसांत येत असला तरी माणसामाणसांत संसर्गजन्य नाही, अशीही ग्वाही दिली. चीनमधून याबद्दल बातमी देण्यास तेथील प्रसारमाध्यमांवर व डॉक्टरांवर बंदी आणली, काहींना छळ करून मारण्यात आले. रोग्यांची संख्या वाढत असून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे आम्हाला समजले असल्यामुळे जा.आ. संघटनेकडे ‘खरे काय घडत आहे ते सांगावे,’ अशी तैवानने विचारणा केल्यावर संस्थेने उत्तरच दिले नाही. हाँगकाँग व तैवानने डिसेंबरमध्येच आणि दक्षिण कोरियात फेब्रुवारीपासूनच जनतेची तपासणी काटेकोरपणे करून तेथील सरकारने ही साथ तिथे पसरणार नाही, याची खबरदारी घेतली.

दि. 26 मार्चच्या ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मधील बातमीप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारीत चीनने अनेक देशांतून अब्जावधी वैयक्तिक शारीरिक संरक्षक साहित्य, एन-95  मास्क वगैरेंची आयात करून आधीच साठेबाजी केली. मार्चपासून साथीचे प्रमाण जगभर  वाढून या साहित्याचा तुटवडा भासू लागल्यावर त्याचा पुरवठा करण्यासाठी अमेरिका, इटली व युरोप यांना चीनला विनंती करावी लागली आणि चीनने जगाच्या कल्याणासाठी ही मदत करीत असल्याचा आव आणला.

‘इटलीतील बंदराचे काम चीनला देणे धोक्याचे आहे, चीन त्यामार्गे युरोपात योजनाबद्ध रीतीने विस्तार करून व वाहतुकीवर ताबा मिळवून आपला प्रभाव वाढवेल, त्यामुळे चीनला अशा मोक्याच्या ठिकाणी शिरकाव करू देऊ नये’, अशी विनंती एक-दोन वर्षांपूर्वी ट्रम्प सरकारने केली होती. पण इटलीने चीनला बंदराचे व त्या भागाच्या विकासाचे काम दिले. इटलीच्या लोम्बार्डी प्रांतात 1 लाख चिनी आहेत. फ्लॉरेन्सच्या महापौराने आपण वंशवादी नसून फार पुरोगामी आहोत, याचे प्रदर्शन करण्यासाठी जानेवारीत ‘वुहानमधून परतलेल्या चिन्यांचे आलिंगन देऊन स्वागत करावे’ असे सांगितले. वुहानमध्ये ही साथ किती संहारक आहे हे माहिती असूनही इटलीच्या लोकांत ती पसरू नये, अशी काळजी घेण्याऐवजी नाकावर मास्क घातलेला एक चिनी गृहस्थ गावातील चौकात उभा राहून गाववाल्यांना आलिंगन देत असल्याचे दृश्य टीव्हीवर दिसले. विषाणुबाधित अनेक चिनी इटलीच्या समाजात मिसळल्यामुळे तिथे साथ फोफावून अनेक लोक दगावल्यावर महापौराने आणीबाणी जाहीर करून टाळेबंदी केली. साथीमुळे इटलीतले सर्व व्यवहारही बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बसले. त्याचा फायदा माफियाच्या गुंडांनी उठवला. गरिबांना आर्थिक मदत व औषधपाण्यास मदत करण्याच्या मिषाने त्यांना वर्चस्वाखाली आणले. इटलीतून हा विषाणू ब्रिटन, युरोप व अमेरिकेत पसरला.

टेड्रोस घेब्रेसस यांना जा.आ.संघटनेचे  अध्यक्षपद मिळवून देण्याची व्यवस्था चीननेच केली होती. वैद्यकीय डॉक्टर नसूनही संस्थेचे अध्यक्षपद मिळालेले हे पहिलेच होते. टेड्रोस यांनी 14 जानेवारीला चीनचीच री ओढून सांगितले की, हा विषाणू मानवजातीत संसर्गजन्य नाही. तशी वर्गवारी करणे हे त्या रोग्यांसाठी बदनामीकारक आहे, असे अजब विधानही केले. टेड्रोस हे आधी इथिओपियाचे आरोग्यमंत्री होते. आफ्रिकेतील अनेक देशांत चीनने गेली काही वर्षे रस्ते बांधणे, वाहतूक, बंदरे, इतर व्यवसाय यांस आर्थिक व तांत्रिक मदत देण्याच्या नावाखाली बस्तान बसवून ते देश चीनवर अवलंबून राहतील आणि  एक प्रकारे चीनच्या वसाहती होतील, असे बघितले आहे. इथिओपियाचे मंत्रिमंडळ, अधिकारी व व्यापारीवर्ग यांचे चीनशी हितसंबंध असून ते चीनच्या प्रभावाखाली आहेत. देशाच्या स्थूल उत्पादनाच्या प्रमाणात जा.आ.संघटनेला त्या देशातर्फे अनुदान दिले जाते. अमेरिका दर वर्षी 40 ते 50 कोटी डॉलर देते, पण चीन देतो फक्त 3 ते 4 कोटी. टेड्रोस यांसह आणखी काही चीनवादीही त्या संघटनेत आहेत. गेल्या वर्षी एड्‌स, कावीळ व इतर संसर्गजन्य रोगनिमूर्लनासाठी या संस्थेने जेवढा खर्च केला त्याच्या दुप्पट खर्च संघटनेच्या अधिकाऱ्यांचा प्रवास, उंची हॉटेलात राहणे, खाणेपिणे यांवर झाला. ट्रम्प सरकारने या संस्थेला जाब विचारून अमेरिकेचा हप्ता 3 महिने तात्पुरता थांबवला आहे.

जा.आ.संघटनेने हा रोग माणसांत संसर्गजन्य असल्याचे 23 जानेवारीला प्रथम मान्य केले. दि. 24 जानेवारीस अमेरिकेच्या नियाड (नॅशनल इन्स्टिट्यढूट  ऑफ ॲलर्जी अँड इनफेक्शन्स डिसीझेस) या संसर्गरोग संस्थेचे प्रमुख डॉ.फाउची यांनी ग्वाही दिली की, आपल्याकडे या रोगाच्या अटकावाची तयारी करण्यासाठी व तपासणीसाठी अनेक उपाय आहेत, त्यामुळे जनतेने चिंता करण्याचे वा घाबरून जाण्याचे कारण नाही. हा रोग अमेरिकेत अगदी अल्प हानिकारक असेल, पण तरीसुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र याबद्दल अतिशय जागरूक असायला हवे. दि. 30 जानेवारीला सीडीसी (सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल) या आरोग्यसंस्थेने हा रोग माणसांत संसर्गजन्य असल्याचे सांगितल्यावर अमेरिकेला प्रथमच समजले. चिनी नेत्यांनी या साथीसाठी उपाययोजना करून जगापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे, असे टेड्रोस यांनी टि्‌वट केले. त्यांनी प्रथम सांगितले होते की- ही साथ जगभर पसरण्याची काही शक्यता नाही, तिला आटोक्यात आणले गेले आहे, मास्कचा काही उपयोग नाही. पण 31 जानेवारीला त्यांनी सर्व जगाच्या आरोग्याला धोका असल्याची आणीबाणी जाहीर केली.

त्याच दिवशी ट्रम्प यांनीही साथीमुळे जनतेच्या आरोग्याला व जीविताला गंभीर धोका असल्याची आणीबाणी जाहीर केली. अमेरिकेचे चीनवंशीय नागरिक  व ज्यांचे कुटुंबीय अमेरिकेत आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त सर्व परदेशीयांना चीनमधून अमेरिकेत येण्यास 2 फेब्रुवारीपासून बंदी घातली. तेव्हा ते वंशवादी असल्याची टीका डेमॉक्रॅट पक्षनेते व बहुतेक प्रसारमाध्यमांनी केली; कारण युक्रेनसंबंधात ट्रम्प यांच्याविरुद्ध भक्कम पुरावा न देता महाभियोग चालविणेे व म्युलर पुराण परत उकरून खोटे आरोप करणे याशिवाय त्यांना दुसरा कार्यक्रम नव्हता. सर्व ठीक आहे, ही आणीबाणी खरी नसून आपल्याविरोधी महाभियोगाच्या प्रस्तावाकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ट्रम्प यांनी ती बनवलेली आहे, अशी टीका अमेरिकन कनिष्ठ सभेच्या (काँग्रेसच्या) सभापती पेलोसी व वरिष्ठ सभेचे (सिनेटचे) विरोधी पक्षनेते शूमर यांनी केली. डेमॉक्रॅट व अमेरिकेतील बहुतेक प्रसारमाध्यमांनी तीच री ओढली आणि  चीनवर टीका करणे चूक आहे, असे सांगितले. तेव्हा ‘ही साथ धोक्याची व खरी असून प्रसारमाध्यमेच खोटी आहेत’, असे ट्रम्प म्हणाले. पण याची बातमी देताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ब्रिटिश  प्रसारमाध्यमांनी सांगितले की, ‘या साथीत अर्थ नसून ती खोटी आहे, असे ट्रम्प म्हणतात!’ टीव्हीवर ट्रम्प यांचे ते भाषण ज्यांनी ऐकले, त्यांना ती बातमी विपर्यस्त करून दिली आहे, हे  समजले. पण जगातील बहुतेकांनी तपास न करता अशीच विपर्यस्त बातमी दिली व त्यावर भाष्य केले. ट्रम्पविरोधक अजूनही तोच खोटा प्रचार करतात.

जानेवारी व फेब्रुवारीत बरेच लोक युरोपातून-विशेषत: इटलीतून अमेरिकेत आले आणि काही चीनमधून युरोपात किंवा तैवानला जाऊन तिथून अमेरिकेत आले. त्यातील काहींची विमानतळावर तपासणी केली नव्हती, त्यांना 14 दिवस विलगही ठेवले नव्हते. त्यामुळे अमेरिकेत ही साथ फोफावली. युरोपातून येथे येणाऱ्या विमानांवर 16 मार्चला ट्रम्प यांनी बंदी घातली. तेव्हाही डेमॉक्रॅट व बहुतेक प्रसारमाध्यमांनी विरोध केला. युरोपमधील नेतेही रागावले. डेमॉक्रॅट प्रतिनिधी प्रेसली यांनी तर विमाने येण्यावर बंदी घालण्याचा ट्रम्प यांना अधिकारच नाही व तो काढून घेतला पाहिजे, असा प्रस्तावच काँग्रेसमध्ये मांडला.

ट्रम्प यांनी चीनहून विमाने अमेरिकेत येण्यास बंदी घातल्याचे पाहून लगेच फेब्रुवारीच्या मध्यास ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनीही परदेशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांत चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. सुट्टी संपून ही मुलेही तेव्हा चीनमधून ऑस्ट्रेलियात परत येणार होती, पण त्यांनाही येऊ दिले नाही. या बंदीमुळे ऑस्ट्रेलियात साथ पसरली नाही व फक्त 97 रुग्ण दगावले.

फेब्रुवारीत डेमॉक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीतील उमेदवारांच्या व ट्रम्प यांच्या प्रचार सभा चालूच होत्या. या रोगाकडे ट्रम्प यांच्याहीपेक्षा डेमॉक्रॅट  दुर्लक्ष करीत होते. सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच चालू ठेवावेत, चायना टाऊनमध्ये सर्वांनी यावे- असे सांगत होते. सीडीसीच्या अहवालानुसार 24 फेब्रुवारीला अमेरिकेत फक्त 17 जणांना या साथीची बाधा झाली होती. पण महिनाभरात ही संख्या हजारोंनी वाढली. काँग्रेसमधील चिनीवंशीय डेमॉक्रॅट जुडी चू यांनी बजावले की, चीनमधून हा विषाणू आल्याचा आरोप करणे चूक आहे.

ट्रम्प यांनी समाजात दूरता शिस्त पाळण्याचा आदेश 16 मार्चला व टाळेबंदीचा आदेश 31 मार्चला दिला. अमेरिकेत कोट्यवधी लोकांना या साथीची बाधा होऊन लाखो रुग्ण त्यात बळी पडतील, असा अंदाज 29 मार्चला डॉ.फाउची यांनी वर्तविला. दूरता पाळल्यास अंदाजे 1 ते अडीच लाख लोक दगावतील, मात्र अंतर न पाळता व्यवहार चालू ठेवले तर मृतांची संख्या 15 ते 25 लाखांवर जाईल, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

ट्रम्प व त्यांच्या सरकारने या महासाथीला पायबंद घालण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय योजणे परिणामकारक होतील, याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्गदर्शक पत्रिका प्रसिद्ध केली. परंतु अमेरिका हे संघराज्य असल्यामुळे प्रत्येक राज्याला, भागाला, गावाला स्थानिक परिस्थितीस योग्य अशी कोणती मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणायची व उपाययोजना करायची, हे ठरविण्याचे स्वतंत्र अधिकार घटनेने दिले आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने  दिलेल्या माहितीप्रमाणे 675 लोकांना या रोगाची बाधा झाल्याचे दिसल्याबरोबर कॅलिफोर्नियाचे राज्यपाल न्यूसम यांनी लगेच टाळेबंदी जाहीर करून दूरता पाळण्याचा आदेश दिल्यामुळे त्या राज्यात ही साथ जास्त वाढली नाही व कमी लोक दगावले. न्यूयॉर्कचे राज्यपाल कोमो यांनी मात्र 7000 लोकांना बाधा होईपर्यंत टाळेबंदी जाहीर न केल्यामुळे तेथील रुग्णसंख्या, हॉस्पिटलमध्ये व अतिदक्षता विभागात दाखल झालेल्यांची संख्या व मृतसंख्या अमेरिकेत सर्वाधिक आहेत. अर्थात जानेवारी-फेब्रुवारीत चीनमधून अमेरिकेत आलेल्या लोकांपैकी बरेच न्यूयॉर्क शहराच्या भागांत आले आणि तेथील दाट वस्ती, भुयारी रेल्वे, रेल्वे व बस यांमधील गर्दी यांमुळेही तिथे रुग्णसंख्या जास्त झाली.

हॉस्पिटले भरून जाऊन रोग्यांना दाखल करण्यास खाटा राहणार नाहीत, असा ओरडा खूप झाला. ट्रम्प यांनी नोकरशाहीच्या चाकोरीबाहेर जाऊन, आरमाराच्या सुसज्ज हॉस्पिटल असलेल्या दोन बोटींवर अनेक पटींनी अधिक रुग्ण दाखल करून घेता येतील, अशी व्यवस्था ताबडतोब करून घेतली आणि 2 हजार खाटांची ‘कम्फर्ट’ ही बोट न्यूयॉर्क शहराच्या बंदरात व ‘मर्सी’ ही बोट लॉस एन्जेलिसच्या बंदरात आणली. न्यूयॉर्क शहरातील जॅव्हिट्‌झ केन्द्रात हॉस्पिटल उभारण्याची व्यवस्थाही घाईघाईने  केली. प्रत्यक्षात न्यूयॉर्कमध्ये कोट्यवधी लोक आजारी पडले नाहीत. 2 लाखांवर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, पण खाटा कमी असल्यामुळे दाखल करता आले नाही असे कोठेही झाले नाही. दोन्ही बोटींचीही फारशी गरज पडली नाही.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सीडीसीने केलेल्या चुकांवर प्रकाश टाकला आहे. फेब्रुवारीत सीडीसीने सांगितले की, त्यांच्याकडे विषाणूसाठी रुग्णांची तपासणी करण्याच्या चाचणीच्या सामग्रीचा भरपूर साठा आहे, तो पुरेसा होईल. मार्चमध्ये सीडीसीने ही सामग्री सरकारी हॉस्पिटलांच्या प्रयोगशाळांना पाठवली, पण यात काही जिन्नसच घालायचे राहिले असल्यामुळे त्यांचा उपयोग झाला नाही. नंतर अन्न व औषधनियंत्रण संस्थेने (एफडीए) काही खासगी प्रयोगशाळांनाही या चाचण्या करण्याची परवानगी दिली. पण मागणी खूप असल्यामुळे त्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. निरुपयोगी सामग्री, सीडीसीच्या नियमांच्या जटिलतेमुळे लांबण व सरकारी प्रयोगशाळांपलीकडे क्षेत्र वाढवण्यास उशीर- असा सर्व गोंधळ सीडीसीने केला. त्यामुळे साथीस आळा घालणे आणखी कठीण झाले. चीनमधून परतल्यावर ज्यांना हा रोग झाल्याची लक्षणे आहेत, त्यांचीच फक्त चाचणी प्रथम करण्यात येत होती. नंतर चाचण्यांच्या सामग्रीचे उत्पादन वाढवून काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिक लोकांची चाचणी करण्यास सुरुवात झाली.

अँटिबॉडी कोणत्या व किती, हे बघण्यासाठी रक्ततपासणी करण्याची व्यवस्था आता खूप वाढवली आहे. यांतील कोणत्या प्रकारच्या अँटिबॉडी या रोगप्रतिकारक वा रोगप्रतिबंधक आहेत व त्यांची ही शक्ती किती काळ टिकते, याची माहिती हा रोग नवा असल्यामुळे अजून कोणालाच नाही. तपासण्या होऊन सर्व माहिती गोळा होईल, तेव्हा काही काळाने हे निष्कर्ष काढता येतील. अलीकडे कोमो यांनी सांगितले की, न्यूयॉर्क शहराच्या पाच भागांत काहींची रक्ततपासणी केल्यावर 25 टक्के लोकांत अँटिबॉडी असल्याचे आढळले आणि हे लोक लक्षणरहित होते. म्हणजे या विषाणूचा संसर्ग होऊन ते बरे झाले होते, पण संसर्गामुळे त्यांना काही त्रास झाला नाही व संसर्ग झाल्याचे समजलेसुद्धा नाही. याचा अर्थ- समाजात अनेकांना असा लक्षणरहित संसर्ग झाला असणार आणि हा विषाणू आतापर्यंत अंदाज केला होता त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असला, तरी अंदाजापेक्षा खूपच कमी घातक आहे. हे चांगले आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वा क्लोरोक्विन ही मलेरियासाठीची औषधे विषाणूग्रस्त रोग्यांना आवश्यक असतील तर डॉक्टरांनी देऊन त्यांचे प्राण वाचले तर चांगलेच, रोग्यांनी आपणहून मात्र ती घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तेव्हा ट्रम्प हे डॉक्टर नसताना ही दुष्परिणाम होणारी औषधे कशी घ्यायला सांगतात, असा ओरडा प्रसारमाध्यमांनी केला. त्याच वेळी कोमो व इतर काही राज्यपाल याच औषधांचा साठा करून ती त्यांच्या राज्यांतील रोग्यांना गरज भासेल तेव्हा उपलब्ध असतील हे बघत होते. पण त्यांना याबद्दल प्रसारमाध्यमांनी एकदाही प्रश्न विचारला नाही. अर्थात ट्रम्प यांनी कोणत्याही औषधाचा प्रचार करणे चूक आहे. ते डॉक्टर नाहीत. पण एवढे लोक मृत्युमुखी पडत आहेत, तेव्हा कोणताही उपाय करून त्यांना वाचविता आले तर बघावे, असा उद्देश त्यामागे होता. कोणती औषधे कोणत्या रोग्याला केव्हा द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार फक्त डॉक्टरांना आहे; पुढाऱ्यांना ते ठरवण्याचा अधिकार नाही, तेवढाच पत्रकारांना व इतरांनाही नाही. डॉक्टरांनी ती वापरून उपयोग झाला तर चांगले, असे केवळ ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे प्रसारमाध्यमांनी विरोधासाठी विरोध करणे व काहींनी भलावण करणे, हे दोन्ही चूक आहे. या औषधाच्या कंपनीत ट्रम्प यांचे आर्थिक संबंध गुंतले आहेत, असेही आरोप काहींनी केले. चौकशी केल्यावर ते आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले.

देशभरात 1 एप्रिलपर्यंत 1 लाख 30 हजार श्वसनयंत्रे लागतील, असा अंदाज फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंटने (फिमा) वर्तविला होता. केंद्र सरकारकडे व संरक्षण खात्यात 16 हजार श्वसनयंत्रे होती. कोमो यांसारखे काही राज्यपाल श्वसनयंत्रे खूप कमी पडणार म्हणून सतत ओरडा करत होते; पण राज्यात कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती श्वसनयंत्रे आहेत, त्यातील किती तेव्हा वापरली जात आहेत व नंतर वापरली जातील, याची काहीही माहिती करून घेण्याची तसदी त्यांनी व हॉस्पिटलच्या प्रशासकांनी घेतली नव्हती. काही कोटी लोक आजारी पडून अजून चार दिवसांनी 40 हजार श्वसनयंत्रे न्यूयॉर्कमध्ये लागतील, ती उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण निधन पावतील, असा भीतिदायक प्रचार त्यांनी चालविला होता. प्रसारमाध्यमांनीही काही चौकशी न करता लगेच त्याबद्दल ट्रम्प यांना दोषी ठरवून श्वसनयंत्रांच्या तुटवड्यामुळे रोगी दगावल्यास ट्रम्प यांनी काही न केल्यामुळे तसे झाले आणि त्या रुग्णांच्या रक्ताने ट्रम्प यांचे हात माखले आहेत, असा निर्णय दिला. ट्रम्प यांचे जावई ज़ॅरेड कुशनर व डॉ.बर्क्स यांनी मग तो सर्व तपास तातडीने व बारकाईने केला आणि सरकार व खासगी संस्था यांनी सहकार्य करण्याची व श्वसनयंत्रांचे उत्पादन शीघ्र गतीने होऊन जिथे गरज असेल तिथे फिमातर्फे आवश्यक तो पुरवठा करण्याची योग्य व्यवस्था केली.

अमेरिका हे संघराज्य असल्यामुळे केंद्र सरकार आणीबाणीसाठी औषधे, श्वसनयंत्रे व इतर साधनांचा साठा करून ठेवत असले, तरी मुळात सर्व राज्यांनी, जिल्ह्यांनी व गावांनीसुद्धा स्वतंत्रपणे अशा आणीबाणीसाठी या सर्वांचा साठा कायम सज्ज ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असते. पण ही साथ आल्यावर असे दिसले की, कोणाचीच अशी तयारी नव्हती. साठा कमी पडल्यास काय करायचे, एकमेकांत कसे सहकार्य करायचे, एका भागातून दुसरीकडे पुरवठा  नेण्याची काय व्यवस्था करायची याची काहीच योजना नव्हती. ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ व ‘ब्लूमबर्ग न्यूज’ने अशी माहिती दिली आहे की- दुसरे बुश अध्यक्ष असताना केंद्रीय साठ्यातील 10 टक्के एन-95 मास्क वापरण्यात आले होते, तेव्हा साठ्यातील ही तूट भरून काढण्यासाठी तेवढेच नवे आणून ठेवले गेले नाहीत. ओबामा अध्यक्ष असताना 2014 पर्यंत एन-95 मास्क, गाऊन वगैरेंचा 70 टक्के साठा संपला. साठ्यात 10 कोटी मास्क इत्यादींची भर घालण्याचा सल्ला तेव्हा देण्यात आला होता, पण तशी भर घालण्यात आली नाही. त्यामुळे आता श्वसनयंत्रांची व एन-95 मास्कची गरज लागल्यावर केवळ 20 टक्के साठा असल्याचे आढळले. त्यातील बहुतेक मास्क वाया  गेलेले होते. हे काम राष्ट्राध्यक्षाचे नसून त्या खात्याच्या मुख्याच आहे. ते गेल्या 20 वर्षांत कोणीच केले नाही. आता ट्रम्प यांनी श्वसनयंत्रे तातडीने उत्पादन करण्याचा आदेश देऊन ते काम करून घेतले आहे व 1 लाख अधिक श्वसनयंत्रांचा साठा करण्यात आला आहे. इतर देशांनाही यातून मदत दिली जाईल. अनेक खासगी संस्था आता कोट्यवधी एन-95 मास्क तयार करीत आहेत. ही साथ वा दुसरी काही आपत्ती येऊन गरज लागली तर त्यांचा उपयोग अमेरिकेतच होईल. पण श्वसनयंत्रे कमी पडल्यास ट्रम्प दोषी असतील, असा डंका कालपर्यंत पिटणारे वार्ताहर आता विचारतात की, एवढ्या श्वसनयंत्रांची गरज काय? ब्लूमबर्ग 10 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहराचे महापौर होते. तेव्हा श्वसनयंत्रे सुस्थितीत ठेवण्याचा खर्च फार येतो असे दिसल्यावर त्यांनी ती यंत्रे भंगारमध्ये विकून टाकली. त्यामुळे आता न्यूयॉर्कच्या साठ्यात श्वसनयंत्रे कमी होती आणि  जी होती ती किती आहेत याचा कोणाला पत्ता नव्हता.

साथीमुळे लोक मृत्युमुखी पडत असताना लोकमत विरुद्ध जाऊ नये व चांगली बातमी देऊन लोकांचे मनोधैर्य वाढवावे, म्हणून ब्रिटिश सरकारने 4 एप्रिलला गाजावाजा करून घाईघाईने बीजिंग इऑनमेड या चिनी कंपनीची शांग्रिला-510 ही श्वसनयंत्रे आयात केली. ती सदोष होती. हॉस्पिटलमध्ये वापरल्यावर रोग्यांना अपाय होऊन ते दगावले. इऑनमेडला याबद्दल विचारले असता, त्यांनी उत्तरच दिले नाही. आणखी दुसऱ्या देशांतही त्यांनी ही यंत्रे विकली काय, याचेही उत्तर दिले नाही.

इटली, स्पेन, ब्रिटन व अनेक देशांनी चीनकडून घाईघाईने आयात केलेली विषाणू तपासणीची कोट्यवधी डॉलरची वैद्यकीय सामग्रीही बरीचशी सदोष निघाली. नेदरलँड व फिनलँडने आयात केलेले मास्क निकामी निघाले. सदोष सामग्रीचे पैसे चीनने परत करावेत, अशी मागणी ब्रिटनने केली आहे. दि. 25 एप्रिलपर्यंत 78 देशांनी व 6 आंतरराष्ट्रीय संघटनांनी विविध वैद्यकीय सामग्री व उपकरणे आयात करण्यासाठी चीनला 150 कोटी डॉलरची 192 कंत्राटे दिली. ‘‘साथीच्या संकटकाळाचा फायदा घेऊन परोपकारी तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण करायची, ‘औदार्याचे राजकारण’ व वस्तुस्थितीचा विपर्यास करून स्वत:ला अनुकूल असा प्रचार करायचा आणि आपण विश्वासार्ह व जबाबदार सहकारी आहोत अशी जगाची समजूत करून देऊन आपली शक्ती वाढवायची मोहीम चीनने चालविली आहे’’, याबद्दल युरोपियन संघाच्या परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख बोरेल व जगातील काहींनी आवाज उठवला आहे. 

कोव्हिड 19 या नव्या रोगाची जगात कोणालाच माहिती नव्हती. अमेरिकेतील (व अनेक देशांतील) तज्ज्ञांचे या बाबतीत अज्ञान, चुकीचे आडाखे, सार्वजनिक आरोग्यसंस्थांनी केलेला गोंधळ, विलंब, चुकीचे मार्गदर्शन- अशा अनेक गोष्टी साथ वाढण्यास कारणीभूत झाल्या. गुप्तचर संस्था व प्रसारमाध्यमे यांनाही काही माहिती नव्हती. साथीचे गांभीर्य  प्रथम कोणाच्या लक्षातच आले नाही. अमेरिकेतील अनेक मान्यवर संस्थांचे तसेच लंडनच्या इंपीरिअल कॉलेजचे आडाखे भरमसाट फुगलेले निघाले. त्यानुसार जगभर असंख्य लोकांना हा रोग होऊन कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडणार होते. अमेरिकेत सव्वा कोटी ते 2 कोटी जीवितहानी होईल, असा अंदाज होता. साथ पसरून अधिकाधिक माहिती मिळू लागली, तेव्हा रोज ही नवी माहिती लक्षात घेऊन त्या पायावर सुधारित आडाखे बांधले गेले. ‘जा.आ. संघटना, नियाड, डॉ.फाउची, सीडीसी, फिमा, गुप्तचर संस्था (सीआयए), प्रसारमाध्यमे काय करीत होती?’ असा प्रश्न 29 एप्रिलच्या वार्ताहर परिषदेत कोमो यांनी विचारला आणि स्वत:चा काही दोष नसून ही साथ पसरल्याबद्दल या सर्वांना दोष दिला. प्रसार माध्यमांनी हे ऐकून घेतले, टीका केली नाही. पण त्याच वेळी हीच प्रसारमाध्यमे व डेमोक्रॅट हा सर्व दोष ट्रम्प यांच्या माथी मारत असतात. ट्रम्प यांनी सुरुवातीला हा फ्लूचा प्रकार असून लवकरच सर्व काही सुधारेल, अशी आशा प्रकट केली. पण चीनने खरी माहिती न दिल्यामुळे डॉ. फाउची वगैरे तज्ज्ञांचेही तेव्हा तसेच मत होते. कोणी आपल्या कार्यक्रमात बदल करण्याची गरज नाही, असे तेही सांगत होते. काही डॉक्टर जानेवारी व फेब्रुवारीत जमावाची खूप गर्दी होणारे कार्याम रद्द करा, असे सांगत होते. पण कोणी लक्ष दिले नाही.

चाचण्यांची सुरुवात करायला व युरोपातून येण्यास लोकांवर बंदी घालायला अमेरिकेने उशीर केला, यांमुळे फेब्रुवारीत साथ पसरली आणि जमावबंदी व दूरता शिस्तीचा आदेश मार्चच्या मध्यापर्यंत दिला नसल्याने ती आणखीच फोफावली, ही सीडीसीची चूक त्याच्या उपप्रमुख डॉ.शुचॅट यांनी 1 रोजी लेख लिहून कबुल केली. त्याच वेळी त्यांनी असेही सांगितले की- फेब्रुवारीतच आदेश दिला असता तरी लोकांनी पाळला असता असे नाही, कारण साथ पसरली नसल्याने तिचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात आले नव्हते. सीडीसी, नियाड वगैरेंच्या सल्ल्यानुसार ट्रम्प सरकार धोरण ठरविते.

फेब्रुवारीत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ व ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या चीनमधील वार्ताहरांना चीनने देशातून हाकलून दिले. साथ अमेरिकेत आल्यावर चीनमधील लोकांनी विजयानंद व्यक्त करून, अमेरिकेत ॲन्टिबायोटिक्स व औषधे निर्यात करू नयेत म्हणजे आणखी अमेरिकन दगावतील, असे चीनने त्यांच्या इंटरनेटवर टाकले होते. अमेरिकेत साथ असल्याबद्दल आनंद आणि  जपानकडे आता या विषाणूची सहल सुखाने व्हावी, म्हणून शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या पताका मार्चमध्ये चीनमधील काही हॉटेलांवर लावल्या होत्या, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वार्ताहराला आढळले. चीनमधील परदेशी लोकांना या काळात अतिशय वाईट वागणूक दिली जात असून एका व्यंग्यचित्रात सर्व परदेशी लोक कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दाखविले होते. आफ्रिकेतून आलेल्यांना जास्तच वाईट वागवले जात असल्याची तक्रार तेथील आफ्रिकी लोकांनी केली. अशा चीनची बाजू ट्रम्पद्वेषामुळे अमेरिकेतील प्रसारमाध्यमे व डेमॉक्रॅट घेतात.

हा विषाणू अमेरिकेने निर्माण केला व जगभर पसरविला, असे चीनच्या रेडिओवरून मध्य-पूर्वेतील देशांत गेले काही महिने रोज प्रक्षेपित केले जाते. पोलंड, सर्बिया वगैरे देशांत चीनचा रेडिओवरून खूप प्रचार चालतो, बॉट, ट्रोल, हेही वापरण्यात येतात. ‘अमेरिकेने मेरिलँडमधील लष्करी प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केला असून लसणीचे पाणी, व्हिटॅमिन सी व एक प्रकारच्या चांदीच्या पाण्याने त्याचा नाश करता येतो; आयबुप्रेफेन हे औषध वापरल्यास मात्र तो उफाळतो’ अशा अफवा अमेरिकेत चीन पसरवीत असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिली. चिनी सरकारचे पाठबळ असलेल्या अमेरिकेतील पाच प्रसारमाध्यम संस्थांची ‘परदेशी यंत्रणा’ अशी वर्गवारी करून फेब्रुवारीत त्यांना अधिक कडक नियम लागू केले गेले. काही दिवसांपूर्वी येथे अमेरिकेत अनेकांना फेसबुक, टि्वटर, व्हॉट्‌सॲप व मोबाईल फोनवरून संदेश आले की, ‘अमेरिकन सरकार या विषाणूचे निमित्त सांगून देशभरात नॅशनल गार्ड पाठवून आठवडाभर सर्व देशभर क्वारंटीन करणार आहेे.’ हे संदेश चीनच्या हस्तकांनी पाठविले होते, अशी बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे. वावे या चिनी कंपनीची भागीदारी मालकी असलेल्या व दलाली करणाऱ्या लास वेगासमधील ‘पीपल्स व्हॉइस ऑफ लास वेगास’ या रेडिओ स्टेशनचे काम वावेचा प्रचार करणे हे आहे. ‘फिनिक्स रेडिओ’ ही ॲरिझोनातील कंपनीही चीनच्या मालकीची आहे. चनी सरकारी वृत्तसंस्थेने 4 मार्चला भाष्य केले की, या साथीसाठी केलेला त्याग व कार्याबद्दल जगाने चीनचे आभार मानणे योग्य होईल. गेली अनेक वर्षे अमेरिकेत फेन्टानिल व कोकेन या अमली पदार्थांची काळ्या बाजारात गुप्तपणे प्रचंड आयात होते. या व्यसनामुळे दर वर्षी लाखो लोक मरतात, संसार बरबाद होतात, प्रचंड आर्थिक नुकसान होते. हे अमली पदार्थ चीनमधून पद्धतशीरपणे पाठविले जातात.

चीनचा धोका माहिती असूनही ड्रोन बनवणाऱ्या चिनी कंपनीस न्यू जर्सीत लोक दूरता पाळतात की नाही, यावर आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्यामुळे चीनला आयतीच हेरगिरीची संधी मिळाली आहे. टाळेबंदी शिथिल केल्यावर उद्योग कसे परत चालू करायचे याच्या सल्ल्यासाठी कोमो यांनी चीन सरकारशी घनिष्ठ संबंध असलेल्या व चीनची दलाली करणाऱ्या मॅकिन्सी कंपनीला कंत्राट दिले.

‘नावात काय आहे?’, असा प्रश्न शेक्सपिअरची जुलिएट विचारते. परंतु शास्त्रीय परिभाषेत मात्र राजकारण, देशकालपरिस्थिती, मतप्रवाह कोणत्या दिशेने वाहतो, वगैरे कशाचेही दडपण येऊ न देता, केवळ वैज्ञानिक नियमांनुसार सर्व जीवजंतूंचे प्रकार-उपप्रकार यांचे वर्गीकरण व नामकरण ठराविक नियम पाळूनच करायचे, असे जगमान्य तत्त्व आहे. ज्या भागात त्या जंतूंचा प्रथम प्रादुर्भाव झाला, त्या भागाचे नाव त्या जंतूंच्या प्रकारास वा उपप्रकारास देणे, असा एक नियम आहे. इबोला, झिका ही विषाणूंची नावे आफ्रिकेतील ज्या भागांत त्यांचा उद्‌भव झाला, त्यांवरून दिली गेली. ‘मारबर्ग विषाणू’चे नाव जर्मनीतील त्या गावावरून दिले आहे. अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील लाइम या गावावरून ‘लाइम रोग’ असे नाव दिले आहे. या नामकरणांस कोणी कधी आक्षेप घेतला नाही. कोरोना विषाणू-19 चा उद्‌भव वुहानमध्ये होऊन मग तो सर्वत्र पसरला. त्यामुळे ‘वुहान विषाणू’ हे त्याचे नाव शास्त्रोक्त आहे. पण चीनने त्याला जोरदार आक्षेप घेऊन दडपण आणले आहे. हे नाव वंशवादी असून आशियाई वंशाच्या लोकांच्या भावना दुखावतात व जगात त्यांना त्रास दिला जातो, असा आरोप करायलाही चीनने कमी केले नाही. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व जपान या जी-7 संघातील देशांनीही ‘वुहान विषाणू’ अशा नामकरणाच्या अमेरिकेच्या प्रस्तावास तो वंशवादी असल्याचा आक्षेप घेऊन विरोध केला. वंशवाद हे कारण सांगितले असले, तरी औषधे वगैरे अनेक बाबतींत हे देश (व अमेरिकाही) चीनवर अवलंबून असल्यामुळे त्यांचा पुरवठा ही साथ चालू असताना चीनने बंद करू नये, हे खरे कारण असावे. चीनकडून हा पुरवठा घेण्याच्या बदल्यात फ्रान्सने मोबाईल फोनच्या 5-जी साठी वावे कंपनीला काम द्यावे, अशी अट चीनने घातली. अमेरिकेतील चिनी लोक आता ही साथ आल्याबरोबर स्वत:ला चिनी न म्हणविता ‘आशियाचे’, असे म्हणायला लागले आणि आशियातून आलेल्या सर्वांनाच या वंशवादामुळे येथे त्रास होत असल्याचा डंका पिटू लागले. आशियातील देशांवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने चीनच्या योजना असतात. भारताभोवती जाळे पसरण्यासाठी चीनने पाकिस्तानात व श्रीलंकेतही पाय रोवले आहेत.

प्रसारमाध्यमे व डेमोक्रॅट या विषाणूस प्रथम  ‘चिनी वा वुहान विषाणू’ संबोधत होते. पण ट्रम्प यांनी असे म्हणताच ‘हा वंशवाद आहे’, असा आरोप करून, ‘ही साथ चीनमधून आली, असे तुम्ही म्हणताच कसे’, असा प्रश्न या सर्वांनी विचारला. यास ‘ट्रम्प विषाणू’ म्हणावे, असेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिले होते. कोठुनी हे आले येथे, हे माहीत असूनही आपण फार पुरोगामी आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास व ट्रम्पद्वेष यामुळे युरोप-अमेरिकेतील व जगभरातील अनेक डावे पुढारी, प्रसारमाध्यमे व भाष्यकार चीनच्या प्रचारमोहिमेत आपखुशीने सामील होऊन चीनला कुठल्याही प्रकारे दोष देणे हा गुन्हा आहे, तो ट्रम्प यांचा वंशवाद आहे, असे सांगत असतात. शास्त्रोक्त व सत्य काय यांची पर्वा करत नाहीत. चिनी कम्युनिस्ट प्रचारयंत्रणेचे हे यश आहे.

लाकडाच्या भल्या मोठ्या ट्रोजन वारूत ग्रीक सैनिक लपवून ओडिससने तो ट्रॉयमध्ये नेला आणि रात्री ट्रॉयचे लोक बेसावध असता हे सैनिक त्या घोड्याच्या पोटातून बाहेर आले, गावाबाहेर लपलेले ग्रीक सैन्यही आले आणि त्यांनी ट्रॉय काबीज केले- ही होमरने रंगवलेली कथा प्रसिद्ध आहे. वुहान विषाणू हा चीनने जग बेसावध असताना पाठवलेला ट्रोजन वारू आहे. 

Tags: चीन चायना सुषमा तळवलकर निरुपमा तळवलकर su[per power china sushma talwalkar nirupama talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
stalwalkar@hotmail.com

लेखक, संपादक गोविंद तळवलकर यांच्या कन्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात