डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

बायडन यांच्याबद्दल लोकांना तिरस्कार नाही, तरीसुद्धा ते निवडून येतीलच असे नाही. ट्रम्प यांच्या टि्वट्‌सचा व वाचाळतेचा लोकांना कंटाळा येतो. पण बायडन काय बोलतात ते त्यांचे त्यांना तरी कळते की नाही, असा प्रश्न पडतो. विस्मृतीमुळे वा कधी सोईस्कर विस्मृतीमुळे ते असंबद्ध बोलतात. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील वगैरेची चिंता ट्रम्प करीत नाहीत. कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळावी, एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण ते कसे आहेत हे माहिती असूनही लोकांनी त्यांना निवडून दिले, ते भोंदू राजकारण्यांचा उबग आला म्हणून. नेहमीच्या राजकारण्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात. ट्रम्प मनात येते तसे उघड बोलतात.

ते कोणी जॉर्ज वॉशिंग्टन किंवा लिंकन आहेत, अशी कोणाचीही समजूत नाही. तरीसुद्धा या वर्षी ट्रम्प परत निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘‘विकसनशील देश म्हणून अनेक सवलती घेऊन चिनी स्वस्त मालाचा लोंढा 30 वर्षांपूर्वी सर्व देशांच्या बाजारपेठांत पाठवून अनेक देशांतील किरकोळ उद्योगधंदे चीनने 10 वर्षांत पार बसविले. त्या सर्व बाजारपेठा काबीज करून सर्वांना चीनवर अवलंबून राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण केली. बहुतेक विकसित देशांच्याही पुढे 15 वर्षांतच गेल्यावरही विकसनशील म्हणून सवलती घेण्याचे चीनने चालू ठेवणे ही फसवेगिरी झाली. अमेरिकेत दूरचा विचार करून धोरण आखण्याची वृत्ती नाही. याउलट चिनी लोक 50-100 वर्षांचा विचार करून धोरण आखतात. एक पट्टा, एक मार्ग (वन बेल्ट-वन रोड) ही युरोप, आफ्रिका व आशिया यांना दळणवळणाने जोडून वेढण्याची चीनची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी रस्ते, बंदरे वगैरेंसाठी पैसे देऊन चीन सर्वत्र आपले बस्तान बसवून पकड वाढवीत आहे. आर्थिक उर्जितावस्था आणणे एवढ्यावरच समाधान न मानता तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांत प्रगती करून अमेरिका व पाश्चात्त्य देशांच्या पुढे जाणे व एकमेव महासत्ता होणे, या दृष्टीने गेली काही वर्षे अमेरिकेत, युरोपात व इतर देशांत हजारो चिनी विद्यार्थ्यांचा लोंढा हार्वर्ड वगैरे विद्यापीठे, हॉस्पिटले, औषध व संशोधन संस्था, शेती, तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांत चीन सरकार विचारपूर्वक पाठवीत आहे. काही चिनी विद्यार्थी हेरगिरी करण्यासाठीच पाठविले जातात. शिक्षण पूर्ण करून, अमेरिकेत मोठी पदे मिळवून मग येथील संशोधन चीनसाठी चोरायचे- असा त्यामागे उद्देश असतो. ‘सहस्र कौशल्य’ (थाउजंड टॅलेंट्‌स) या योजनेखाली परदेशी तज्ज्ञ लोकांना चीनमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या जातात व संशोधनासाठी अनुदान दिले जाते. त्यांच्या मौलिक संशोधनाचा चीनला फायदा मिळतो. शिवाय जिथून हे तज्ज्ञ आले, त्या युरोप-अमेरिकेतील कंपन्या व विद्यापीठांतही चीनचे प्रस्थ आपोआप वाढते. फारशी टीका होत नाही, उलट चीनची बाजू घेतली जाते. चीनचे हे सहस्रमार्गे पाय पसरणे धोकादायक आहे’’, असे बाबांचे मत होते.

चीन सरकारशी घनिष्ठ संबंध असलेल्या मॅकिन्सी या जागतिक व्यवस्थापन व सल्लागार कंपनीचा अमेरिकेत चीनचे प्रस्थ वाढवण्यात व जगभर ‘एक पट्टा- एक मार्ग’ योजनेचा प्रसार करण्यात मोठा वाटा आहे. मॅकिन्सीचे वॉकर म्हणतात की- चीनचे कम्युनिस्ट पक्षाधिकारी जे काही करतात, ते लोकांच्या कल्याणासाठीच असतेे. किरकोळ माल चीनमध्ये बनवून घेण्याची कल्पना अनेक कंपन्यांच्या व राजकारण्यांच्या गळी उतरवण्याचे काम मॅकिन्सीने केले. तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रात चीनचे हातपाय पसरण्यामागेही तेच आहेत.  

दहशतवाद्यांनी 2001 मध्ये अमेरिकेवर हल्ले केल्यावर सर्व देश एक झाला; याउलट परिस्थिती आता आहे. ट्रम्प निवडून आल्यापासून देश दुभंगलेला होता, तो अजूनही तसाच आहे. त्यात ट्रम्प यांचा दोष आहेच, पण ते निवडून आल्यादिवसापासून, ‘‘आम्ही ‘प्रतिकारा’त (रेझिस्टन्स) सामील आहोत’’, असे म्हणणाऱ्या हिलरी, इतर पुढारी, पत्रपंडित, नट-नट्या वगैरेंचा दोष जास्त आहे. ट्रम्प यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना हॉटेलमध्ये खाऊन देऊ नका, त्यांच्या घरांवर मोर्चे न्या- असे हे लोक सांगतात. ही झुंडशाही झाली. प्रसारमाध्यमांनी याचे कौतुक करणे लांछनास्पद आहे. कायदेशीररीत्या निवडून आलेल्या अध्यक्षाला विरोध करतात, प्रतिकार नाही. नाझी जर्मनीने फ्रान्स, पोलंड वगैरे देश ताब्यात घेतले, तेव्हा लोकांनी नाझींचा प्रतिकार करण्यात प्राण गमावले. ट्रम्प यांना प्रतिकार करणाऱ्यांचे भाग्य उजळते. प्रतिकार करून फार मोठे शौर्य दाखवितो असे मानणाऱ्यांना नाझींच्या छळामुळे ज्यांचे प्राण गेले त्यांचा आपण अपमान करतो, याची जाणीव नाही. या वर्षीच्या फेब्रुवारीत ट्रम्प यांचे काँग्रेसपुढील भाषण संपल्याबरोबर त्यांच्याच उपस्थितीत सभापती पेलोसींनी त्या भाषणाची प्रत ‘जोन ऑफ आर्क’च्या थाटात हेतुपुरस्सर, सावकाश फाडून टाकली. ‘टेल ऑफ टू सिटीज’मध्ये विरोधकांचे गिलोटिन करणाऱ्या सत्तापिपासू, कजाग मादाम दफार्जचे पात्र डिकन्सने रंगवले आहे. पेलोसींच्या दफार्जसारख्या वागण्यातून त्यांना ट्रम्प यांच्याबद्दल किती दुस्वास आहे, हे परत सिद्ध झाले. अमेरिकन काँग्रेसच्या इतिहासात इतक्या खालच्या पातळीवर कोणी कधी गेले नसेल. त्याबद्दल पेलोसींना प्रश्न विचारण्याचे धाडस एकाच वार्ताहराने केले असता, पेलोसी त्याच्यावर डाफरल्या. त्यांना कधी कोणी उलट प्रश्न विचारीत नाही, ते ट्रम्प यांच्यासाठी खास राखून ठेवलेले असतात; कारण लगेच त्या वार्ताहराला खूप प्रसिद्धी मिळते.

बिल क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांच्यावर टीका केली जायची. पण ओबामा अध्यक्ष झाल्यावर काळ्या अध्यक्षावर आपण टीका करीत नाही, त्यांची फक्त स्तुतीच करायची- असा अलिखित नियम तयार झाला. ते मोठे तत्त्वज्ञानी विचारवंत आहेत, येशूसारखे तारणहार आहेत, वगैरे स्तुतिसुमनांचे हार घालण्यात जगभरच्या पत्रकारांची व भाष्यकारांची स्पर्धाच होती व आहे. आपण किती मोठ्या मनाचे आहोत, हे दाखविण्याचा तो प्रयत्न असतो. त्यांना व ओबामांना अजून असे वाटते की, तेच चिरकाल अध्यक्ष आहेत. त्यामुळे ओबामा पती-पत्नींनी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊससारखे ऑफिस ठेवले आहे. तिथे 20 अधिकारी व इतर कामाला आहेत. ट्रम्प यांनी टीका केल्यास ओबामांच्या कोणत्या मंत्र्याने कोणत्या विषयावर लेख लिहायचा, टीव्हीवर बोलायचे, हे सर्व ठरविले जाते. हिलरींनी व ओबामांनी अनेक खात्यांत व क्षेत्रांत निष्ठावंत पेरून ठेवले आहेत. वेगवेगळे कपोलकल्पित आरोप करून ते ट्रम्प सरकारपुढे अडचणी निर्माण करीत असतात. त्यात प्रसारमाध्यमे सामील असतात. हा बंडाचाच प्रकार आहे. पूर्वीच्या व नव्या अध्यक्षांनी एकमेकांवर टीका करायची नसते, असा संकेत आहे. पण ट्रम्प सरकारवर या सर्वांतर्फे व स्वत: ओबामा टीका करीत असतात, आणि ट्रम्पही ओबामांवर करतात. 

19 डिसेंबर 2016 च्या ‘साधना’तील ‘ट्रम्प यांच्या विजयावर शिक्कामोर्तब’ या लेखात बाबांनी लिहिले आहे की- ‘‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांच्या संमतीने स्वत: पुढ़ाकार घेऊन अमेरिकेच्या निवडणुकीच्या संगणक यंत्रणेत गुप्तहेर संघटनेतर्फे हस्तक्षेप करून ट्रम्प निवडून येतील असा डाव टाकला, म्हणून निवडणुकीचा फेरविचार होणे आवश्यक आहे, असा जोरदार प्रचार होऊ लागला. मायकेल मूर यांच्यासारखे डावे, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, तसेच सीएनएन, एमएसएनबीसीवरील तथाकथित पत्रपंडित, हॉलिवूडमधील तारे अशा सर्व महापंडितांच्या मताला झिडकारून मतदारांनी हिलरींऐवजी ट्रम्प यांना निवडून दिल्यामुळे आता ट्रम्प यांना अध्यक्षपदापासून कसे वंचित करायचे, याचे डाव टाकण्यास या सर्वांनी सुरुवात केली. सर्वसामान्य लोकांपासून ते किती दूर आहेत व स्वत:ला किती अवाजवी महत्त्व देतात, हे दिसून येते. त्या सर्वांना ट्रम्प काडीची किंमत देत नाहीत, हे त्यांचे खरे शल्य आहे. ट्रम्प यांना हिटलर, मुसोलिनी व लोकशाहीवर घाला घालणारे- असे म्हणणारे हे लोक स्वत: लोकशाहीची पर्वा करताना दिसत नाहीत. बंड घडवून आणून सत्ता ताब्यात घेण्याचा हा डाव घृणास्पद आहे. लोकांना बदल हवा होता. ट्रम्प हे निवडणूक जिंकले.’’

हिलरी व पेलोसी या दोघी स्वत:लाच राष्ट्राध्यक्ष समजतात. त्या व शिफ आदी डेमॉक्रॅट व गुप्तचर संस्था, वगैरेंनी सर्व नियम धाब्यावर बसवून ट्रम्पना उखडण्यासाठी त्यांच्यावर रशियाशी संगनमत (रशियागेट) केल्याचे खोटे आरोप करून म्युलर आयोगाचा पाश कसा घातला व प्रसारमाध्यमांनी कशी साथ दिली, हे बघितल्यावर बाबांनी चार वर्षांपूर्वीच केलेल्या विश्लेषणाचा प्रत्यय येतो. रशियागेट झाले नव्हते, हे म्युलर यांना पहिल्या दिवसापासून माहीत असणार, तरीही त्यांनी दोन वर्षे व चार कोटी डॉलर्स खर्च केले. स्वतंत्र आयुक्त नेमून चौकशी केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला अनिर्बंध अधिकार दिले जातात. त्याचा गैरफायदा घेतला जातो. स्टार यांनी बिल क्लिंटन यांच्याविरुद्ध व फिट्‌झेराल्ड यांनी लिबींच्या विरुद्ध असाच अधिकाराचा गैरवापर केला होता. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेचा ढिसाळपणा पाहिलेल्यांना ट्रम्प यांनी रशियाशी संगनमत केले नव्हते याची पूर्ण जाण होती. वॉल स्ट्रीट जर्नलच्या किम्बर्ली स्ट्ऱॉसल यांनी त्यावर उत्तम पुस्तक ल़िहिले आहे. स्टील माहितीपत्रातील (डॉसिए) माहिती खोटी होती, हे सर्वांना माहिती होते. रशियाशी संगनमत कोणी केलेच असेल तर ते हिलरींनी केले होते, हे हिलरी यांच्या निवडणूक मोहिमेचे वकील, स्टील आणि फ्युजन जी.पी. एस. यांच्यातील संबंधांवरून सिद्ध होते. मार्चमध्ये स्टील यांनी ब्रिटनमधील कोर्टात दिलेल्या साक्षीत ते कबूलही केले आहे. पण जगभरातील बहुतेक प्रसारमाध्यमांना व भाष्यकारांना ती बातमी समजलेली नाही.

रशियागेट संबंधात काँग्रेसपुढे ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेतील काही मुख्य व्यक्ती, गुप्तहेर संघटनांचे मुख्य, ओबामांच्या सरकारमधील उच्चपदस्थ अशा 57 जणांच्या साक्षी झाल्या. त्यातील 6000 पाने 7 मे रोजी  प्रसिद्ध झाली. त्यावरून सिद्ध होते की- रशियागेटच्या सूत्रधार हिलरी व त्यांचे निष्ठावंत यांनी गुप्तचर संस्था, डेमोक्रॅट व प्रसारमाध्यमे यांच्याबरोबर साखळीच करून खोट्या बातम्या व चौकश्यांची मोहीम अव्याहत चालू ठेवली. या हिलरीगेटवर ‘ऑल हिलरीज मेन’ असे पुस्तक लिहिता येईल. आपण हरलो हे हिलरी मान्यच करीत नाहीत. ट्रम्प यांचे अध्यक्षपद बेकायदा ठरवून त्यांना उखडण्याचा सत्तापिपासू हिलरींचा डाव लेडी मॅकबेथसारखा आहे. ट्रम्प हे पुतिन यांच्या हातांतील बाहुले, देशद्रोही (देशद्रोहाला देहदंडाची शिक्षा असते) व रशियाचे हेर असून त्यांनी रशियाबरोबर संगनमत केले असल्याचा भक्कम पुरावा आम्ही पाहिला आहे, असे सीआयए व एफबीआय या गुप्तचर संस्थांचे ब्रेनन, क्लॅपर, मॅकेब वगैरे गेली तीन वर्षे प्रसारमाध्यमांतून सतत छातीठोकपणे सांगत होते; पण त्याच वेळी त्यांनी काँग्रेसपुढील शपथेवर दिलेल्या साक्षीत मात्र असा काहीही पुरावा नाही, असे सांगितले होते. क्लॅपर यांनी कागदपत्रे बाहेर आल्यावर सीएनएनवरच कबुली दिली की, त्यांच्याकडे कसलाही पुरावा नव्हता. काँग्रेसपुढे शपथेवर दिलेल्या साक्षीत खोटे बोलल्यास तुरूंगात जायला लागते. पण ट्रम्प यांच्याविरुद्ध प्रसारमाध्यमांत जेवढे आवेशाने, उद्धटपणे, शिवराळ लिहू व बोलू तेवढी अधिक प्रसिद्धी व पैसा मिळतो. त्यामुळे तिथे बिनदिक्कत खोटा प्रचार करता येतो. रशियाला हिलरी अध्यक्ष व्हायला हव्या होत्या, ट्रम्प नाही- याचा पुरावा सीआयएचे प्रमुख ब्रेनन यांनी लपवून ठेवला, असे म्हणतात. कागदपत्रांवरून असेही दिसते की, एफबीआयचे प्रमुख कोमी यांना ओबामांनी सांगितले की, अध्यक्षपदावर निवडून आलेले ट्रम्प यांना रशियाबद्दल काही सांगण्याची गरज नाही.

‘विरोधी पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारावर व त्याच्या निवडणूक मोहिमेवर हेरगिरी करण्याचा आणि पुरावा नसताना त्या उमेदवाराने रशियाशी संगनमत केले असा आरोप करून आयोग नेमण्याचा प्रकार या देशात कधी झालेला नाही. ओबामा, बायडन यात सामील होते व प्रसारमाध्यमांना याबद्दल काहीच वाटत नाही याची खंत वाटते’, असे जोनाथन टर्ली या ‘जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी’च्या कायद्याच्या प्राध्यापकांनी कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यावर 14 मे रोजी लिहिले आहे.

‘‘अमेरिकेतील गुप्तचर संस्था फार प्रबळ आहेत. ते लोक चांगले कार्य करतात; पण काही जण अधिकाराचा दुरुपयोगही करतात, खोटे बोलतात. निवडणुकीच्या आधीच्या जाहीर सभांमध्ये ट्रम्प त्यांच्यावर टीका करीत, ते योग्य नाही. खासगीत सांगावे, नाही तर ते लोक अनेक अडचणी उभ्या करतील. ते देशासाठी चांगले नाही. पूर्वी हुवर यांनी केनेडी, जॉन्सन आदी अध्यक्षांना त्रास दिला होता.’’ असे बाबा रोज म्हणायचे. आता गुप्तचर संस्था व हिलरी आणि ओबामांच्या निष्ठावंतांनी ट्रम्प यांच्यावर खोटे आरोप करून सतत अडचणी आणलेल्या बघितल्यावर बाबांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो.

ट्रम्प यांनी रशियाशी संगनमत केल्याचा पुरावा आम्ही पाहिला आहे, असे रोज सांगणारे व लिहिणारे आता अंतर्धान पावले आहेत. शपथेवर दिलेल्या साक्षींची कागदपत्रे प्रसिद्ध झाल्याची त्या प्रसारमाध्यमांनी व डेमोक्रॅटनी दखलसुद्धा घेतलेली नाही. ‘रशियागेट व महाभियोग यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प हे साथीचा बागुलबुवा करत आहेत’, असे रोज म्हणणारे आता विचारतात की, ‘महासाथीमुळे एवढी जीवितहानी होत असताना रशियागेटवर कोणी बोलतातच कसे?’ रशियागेटबाबतच्या त्यांच्या खोटेपणाचे बिंग फुटल्यामुळे सध्या ही माध्यमे चीनची भलावण करून ट्रम्प यांना साथीबद्दल दोषी ठरविण्यात मग्न आहेत. येनकेन प्रकारे ट्रम्प यांना उखडणे हा एकमेव कार्यक्रम आहे. ट्रम्प व त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याच्या कल्पनेनेच त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. दुसरे बुश यांनी खोटे बोलून इराकविरुद्ध युद्ध सुरू केले तेव्हा आणि ओबामांनी इजिप्त, सीरिया व लिबियात अंधाधुंदी माजविली तेव्हा या बाणेदार माध्यमांनी स्तुतिसुमने उधळण्याऐवजी जाब विचारला असता, तर एवढी जीवितहानी व वित्तहानी झाली नसती आणि देशाला व जगाला फायदा झाला असता.

‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांना रशियागेटबद्दल पुलित्झर पारितोषिक मिळाले, हा एक मोठा विनोद आहे. सीएनएन व एमएसएनबीसी दिवसरात्र ‘बॉम्बशेल’ म्हणून रशियागेटच्या बातम्या देत. दुसऱ्या महायुद्धात लंडनवरसुद्धा एवढे बॉम्ब पडले नसतील. प्रसारमाध्यमांचे सगळे बॉम्बशेल फुसके बार निघाले. दुसऱ्या महायुद्धात यांना बॉम्ब करायला दिले असते, तर पहिल्याच दिवशी दोस्तराष्ट्रांची हार झाली असती आणि या बॉम्बवाल्यांना हिटलर व तोजो या खऱ्या क्रूरकर्म्यांपुढे मान तुकवावी लागली असती- जर मान शिल्लक राहिली असती तर! ट्रम्प यांना उखडण्यासाठी जे विविध प्रयत्न प्रसारमाध्यमांतर्फे केले जातात, त्यात ‘घटनेतील 25 वे कलम वापरावे’ असे अनेकदा सुचविले जाते. त्या कलमाप्रमाणे- मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेमुळे अध्यक्षीय जबाबदारी पार पाडण्यास अध्यक्ष असमर्थ असेल, तर त्याला काढून उपाध्यक्ष हा अध्यक्ष होतो. ट्रम्प यांच्या बाबतीत हे कलम लगेच वापरावे, अशी विधाने हे महापंडित सर्रास करीत आले आहेत. अध्यक्षाबद्दल तिरस्कार असल्याबद्दल 25 वे कलम वापरले जात नाही. येथे निवडणुकीने अध्यक्ष ठरविला जातो. ही अमेरिका आहे, रशिया किंवा चीन नव्हे.

वार्ताहरांनी मतप्रदर्शन न करता नि:पक्षपातीपणे बातम्या द्यायच्या असतात. संपादक व इतर भाष्यकारांनी सर्व बाजू समजावून घेऊन समदर्शी वृत्तीने मतप्रदर्शन करायचे असते. परंतु आता अमेरिकेतील व ब्रिटनमधील वृत्तपत्रांचा पूर्णत: कायापालट झाला आहे. स्वत:च बातमी होणे, एवढेच काहींचे ध्येय असते. टीव्हीवर व वृत्तपत्रांत बातमी विपर्यस्त करून सनसनाटी मथळा दिलेला असतो. शेरे-ताशेरे मारल्यावर सहा-सात परिच्छेदांनंतर एक-दोन ओळींत ट्रम्प नेमके काय बोलले हे कधी कधी लिहिलेले असते, त्या मजकुरापर्यंत बहुतेक जण वाचत नाहीत. सीएनएनचे मुख्य झुकर यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध लोकमत होईल, अशा रीतीने बातम्या द्यायच्या व भाष्य करायचे, असे धोरणच ठरवून दिलेले आहे. ट्रम्प व झुकर यांची मैत्री ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यावर संपली. आपणच खरे अध्यक्ष व्हायला पाहिजे होते, असे झुकर यांना वाटते. ट्रम्प यांच्यावर कोणीही सोम्यागोम्याने कुठलाही आरोप करून टीका केली की, लगेच त्या नव्या ताऱ्याची मुलाखत सीएनएनवर व एमएसएनबीसीवर घेतली जाते. त्या पंडितास निर्भीड भाष्यकार म्हणून नेमले जाते. त्याआधी यांचे नाव कोणीही ऐकलेले नसते. पैसे व प्रसिद्धी मिळवण्याचा हा सोपा घबाडयोग अनेकांना गवसला आहे. परदेशांतही ट्रम्प यांच्यावर टीका करून असा योग साधणारे आहेत. ‘थाट समरीचा दावी नट हा’, अशी ही स्थिती आहे. सिनेमात काम मिळण्यापूर्वी चाचणीत यशस्वी व्हायला लागते, तशीच टीव्हीवर हमखास काम मिळण्यासाठीची ही अनौपचारिक चाचणी ठरते. ट्रम्प यांनी त्यावर टीका केली, तर ते हुकूमशहा असून भाषणस्वातंत्र्यावर घाला घालत असताना आपण किती बाणेदार आहोत, याबद्दल प्रसारमाध्यमे स्वत:चीच पाठ थोपटतात.

व्हाइट हाऊसमध्ये उद्धटपणा केल्यावर तिथून बाहेर यायच्या आत एप्रिल रायन व ब्रायन करीम यांच्याशी सीएनएनचा करार झाला होता. याच करीम यांनी पहिले बुश यांना एकदा प्रश्न विचारला होता, तो बुश यांना आवडला नाही, त्याबरोबर दुसऱ्याच दिवशी करीम यांची नोकरी गेली. दहशतवादी हल्ला 2001 मध्ये झाल्यादिवशी तेव्हाचे अध्यक्ष दुसरे बुश व्हाइट हाऊसमध्ये 10 तास परतले नाहीत. ते 10 तास कोठे होते, असा प्रश्न पीटर जेनिंग्ज व बिल माहर यांनी विचारला. त्याच दिवशी माहर यांना राजीनामा द्यावा लागला. तो प्रश्न विचारायला अजूनही कोणी धजावलेले नाही. ट्रम्प हे पत्रकारांना ‘देशाचे शत्रू’, ‘लोकांचे शत्रू’, ‘फेक न्यूज’ वगैरे म्हणतात- हे अत्यंत चूक व घातक असले, तरी त्यांच्यामुळे कोणाही पत्रकाराची नोकरी गेलेली नाही. कोणाच्याही भाषण-स्वातंत्र्यावर गदा आलेली नाही. ट्रम्प यांच्या विरुद्ध माहर व अनेक जण रोज यथेच्छ गालीप्रदान करतात, त्यामुळे त्यांचे आणखीच कौतुक होते. रिपब्लिकन पक्षाच्या पाठीराख्यांना न्यूयॉर्क व वॉशिंग्टनच्या पत्रकारांचा राग आहे. ते पत्रकार स्वत:ला उच्च दर्जाचे समजतात व रिपब्लिकनांना गावंढळ समजतात, अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे पत्रकारांच्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्ती रिपब्लिकनांना फार आवडतात. अशा पाठीराख्यांना खुश करण्यासाठी ट्रम्प बोलत असतात. डेमोक्रॅट व प्रसारमाध्यमे ट्रम्प यांच्याविरुद्ध प्रचार करीत असतात. सर्वसामान्य लोक स्वत:च्या मतासारखी ठरावीक प्रसारमाध्यमे बघतात व वाचतात, त्यामुळे त्यांना दुसरी बाजू व वस्तुस्थिती माहिती नसते.

म्युलर अहवाल आला की, ट्रम्प यांना रशियागेटबद्दल देशद्रोही ठरवून देहदंड देता येईल, हे प्रसारमाध्यमांचे दिवास्वप्न ठरलेे. पण ट्रम्प यांनी विरोधकांना आयती संधी मिळवून दिली. अहवाल आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी युक्रेनचेे अध्यक्ष झेलिन्स्की यांच्याशी फोनवर अनेक विषयांवर बोलताना बायडन व त्यांचा मुलगा हंटर यांचा विषय काढला. ट्रम्प यांच्या स्वघोषित ‘अजोड शहाणपणाचा’ आणि ‘स्थिर व अलौकिक बुद्धिमत्तेचा’ पुन्हा एकदा प्रत्यय आला. प्रत्येक वेळी त्यांच्या बाजूने काही घडते, तेव्हा स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेण्यात ट्रम्प यांचा हातखंडा आहे. बायडन व हंटर यांचा विषय काढणे चूक होते, पण फार मोठा गुन्हा नव्हता. त्याबद्दल ट्रम्प यांना घटनेप्रमाणे ताकीद देणे काँग्रेसला शक्य होते, तेवढे करून काँग्रेसने थांबायचे होते. पण ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्याची तयारी ते निवडून येण्याआधीपासूनच डेमोक्रॅट पक्ष व प्रसारमाध्यमे करीत होते. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविला जाईल, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने 2016 मध्ये ट्रम्प निवडून येण्यापूर्वीच, तर ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली त्याच दिवशी लिहिले होते. युक्रेनबद्दल कोणाला फार प्रेम असल्यामुळे ट्रम्प यांच्यावर महाभियोग झाला असे नाही. अनेकांना युक्रेन कोठे आहे हे माहितीसुद्धा नाही आणि त्या देशाचे काय बरे-वाईट होते यात जरासुद्धा रस नाही. युक्रेनला देण्यासाठीचे पैसे जितके दिवस अडविण्याचा अधिकार होता, तितकेच दिवस ट्रम्प यांनी अडविले होते. तसे वागणे जर फार मोठा गुन्हा असेल, तर 2012 मध्ये निवडणुकीची मोहीम चालू असताना रशियाच्या मेदवेदेव यांना ओबामा म्हणाले होते की, ‘पुतिन यांना आता जरा सबुरीने घ्यायला सांगा, निवडणुकीनंतर मला अनेक गोष्टी करता येतील’ हा गुन्हा का नाही? पोलंडमध्ये अमेरिका संरक्षणासाठी क्षेपणास्त्र ठेवणार होती, ते निवडणुकीनंतर ओबामांनी रद्द केले. रशियाला तेच पाहिजे होते. ओबामांचे ते वागणे साटेलोटे (क्विड प्रो को) असे कोणाला वाटले नाही आणि कोणी त्यांच्यावर महाभियोग चालविला नाही, कारण अध्यक्षाला या बाबतीत बरेच अधिकार असतात ते सर्वांनी मान्य केले होते, ट्रम्प यांच्या बाबतीत मात्र साटे होते पण त्याबदल्यात लोटे नसताना त्यांच्यावर महाभियोग चालविला गेला; कारण त्यांना कुठलाच अधिकार वापरू द्यायचा नाही, असे डेमोक्रॅट व प्रसारमाध्यमे यांनी ठरवून ठेवले आहे.

अलीकडे वुहान विषाणूबद्दल रोज वार्ताहर परिषदेत दोन-दोन तास माहिती देऊन ट्रम्प प्रश्नोत्तरे करीत होते. बऱ्याच पत्रकारांना ट्रम्प यांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार आहे. ट्रम्पही अध्यक्षाला शोभेल अशा भाषेत बोलत नाहीत. त्यामुळे अर्ध्या तासानंतर परिषदेची पातळी खालावते. ‘‘मी व माझे सरकार मार्गदर्शनपर तत्त्वे सांगेल, पण काय करायचे हे प्रत्येक राज्यपाल वा महापौराने स्थानिक परिस्थिती अजमावून ठरवायचे आहे,’’ असे ट्रम्प रोज सांगत होते. तरी पत्रकार रोज त्यांना विचारीत होते की, ते सर्व देशासाठी टाळेबंदीचा आदेश का काढीत नाहीत? तसा काढावा, असा त्यांचा आग्रह होता. मग एक दिवस ट्रम्प म्हणाले की- ते तसे करू शकतील, त्यांना सर्वाधिकार आहेत. पण घटनेप्रमाणे त्यांना तसा अधिकार नाही. काही अधिकार अध्यक्षापेक्षा राज्यपालास व त्याहीपेक्षा गावच्या महापौराला असतात. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांच्या पक्षाच्या लोकांनीही त्यांची बाजू घेतली नाही. पत्रकारांनी ट्रम्प यांना उलटसुलट प्रश्न विचारले. ते योग्य होते. राज्यपाल कोमो म्हणाले, ‘‘ट्रम्प हे राजा नाहीत.’’ त्यामुळे कोमो यांचे कौतुक केले गेले. पण महापौर डिब्लाझिओ यांनी न्यूयॉर्क शहरात टाळेबंदी करून शाळा बंद करणार, असे जाहीर केले; तेव्हा कोमो म्हणाले की, डिब्लाझिओंना तो अधिकार नाही, मी राज्यपाल आहे आणि मी सर्व ठरविणार. घटनेप्रमाणे महापौरास सांगण्याचा अधिकार ट्रम्पना नाही, तसा कोमोंनाही नाही. गावाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार महापौरास आहे. ट्रम्प यांना ते राजा नाहीत म्हणून सांगितल्याबद्दल कोमो यांचे कौतुक करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना, कोमोंना ‘तुम्हीही राजा नाही’ असे सांगण्याचे धैर्य झाले नाही. ट्रम्प यांनी नंतर राज्यांना अधिकार आहे, असे कबूल केल्यावर मात्र घटनेची ग्वाही देणारे पत्रकार त्यांना परत पुन:पुन्हा विचारू लागले की, सर्व देशासाठी ते आदेश का देत नाहीत; कारण सध्याच्या परिस्थितीत देशासाठी आदेश काढणे योग्य होईल.

ट्रम्प निवडून आल्यावर अनेक अब्जाधीशांना वाटू लागले की- या माणसापेक्षा आपण खूप चांगले बोलू शकतो व आपल्याकडे पैसाही याच्यापेक्षा जास्त आहे, तेव्हा आपणच अध्यक्ष व्हायला पाहिजे. त्यामुळे अनेक धनदांडगे रिंगणात उतरण्यास उत्सुक झाले. ‘माझ्याकडे अमर्याद साधनसंपत्ती असून मी चांगला महापौर होतो, त्यामुळे मीच फक्त ट्रम्प यांना हरवू शकतो’, असा ब्लूमबर्ग यांचा दावा होता. त्यांची उमेदवारी 100 दिवसांत संपली. त्यांनी त्या काळात 100 कोटी डॉलर खर्च केले. अमेरिकन लोकांना स्वत:च्या पैशांचे प्रदर्शन करायला खूप आवडते. पण ब्लूमबर्ग यांनी अतिरेक केला. ते आपल्याला विकत घेऊ बघत आहेत, अशी मतदारांची समजूत झाली व मतदारांनी त्यांना नाकारले. लोकांना कोण पसंत पडेल याचे गणित नाही.

बायडन यांच्याबद्दल लोकांना तिरस्कार नाही, तरीसुद्धा ते निवडून येतीलच असे नाही. ट्रम्प यांच्या टि्वट्‌सचा व वाचाळतेचा लोकांना कंटाळा येतो. पण बायडन काय बोलतात ते त्यांचे त्यांना तरी कळते की नाही, असा प्रश्न पडतो. विस्मृतीमुळे वा कधी सोईस्कर विस्मृतीमुळे ते असंबद्ध बोलतात. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील वगैरेची चिंता ट्रम्प करीत नाहीत. कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळावी, एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण ते कसे आहेत हे माहिती असूनही लोकांनी त्यांना निवडून दिले, ते भोंदू राजकारण्यांचा उबग आला म्हणून. नेहमीच्या राजकारण्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात. ट्रम्प मनात येते तसे उघड बोलतात. ते कोणी जॉर्ज वॉशिंग्टन किंवा लिंकन आहेत, अशी कोणाचीही समजूत नाही. तरीसुद्धा या वर्षी ट्रम्प परत निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बायडन यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्साह नाही. गेल्या 40 वर्षांत बायडन यांचे परराष्ट्र धोरण प्रत्येक वेळी चुकीचे होते, असे पूर्वीचे संरक्षणमंत्री गेट्‌स यांनी लिहिले आहे. बायडन उपाध्यक्ष असताना चीनच्या एका कंपनीवर त्यांच्या मुलाला नेमले होते. हा गुन्हा नाही. त्यांचा भाऊ जेम्स व मुलगा हंटर या दोघांनी बायडन यांच्या नावाचा फायदा घेऊन कसा पैसा मिळविला, यावर एरवी डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने लिहिणाऱ्या ‘पोलिटिको’ने प्रकाश टाकला आहे. इथले लोकसेवक राजकारणी हे नातलगांतर्फे कंपन्यांची दलाली करून गबर होतात आणि पत्रपंडितांचेही त्यांच्याशी हितसंबंध असतात, याबद्दल 8 नोव्हेंबर 2016च्या ‘नवल वर्तले गे’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील लेखात बाबांनी लिहिले आहे.

चीनने बाजारपेठ थोडी खुली करायला सुरुवात केल्यावर जगाशी संबंध वाढेल व तेथील कम्युनिस्ट पद्धती नष्ट होईल, अशी बाबांना प्रथम आशा होती. तसे त्यांनी लिहिलेही होते. पण मग चीनचे उद्योग पाहिल्यावर त्यांचे मत बदलले. अमेरिकेतील सरकारी कागदपत्रांचा अभ्यास करताना बाबांच्या वाचनात आले की- चीनशी संबंध प्रस्थापित केल्यावर अमेरिका व पाश्चात्त्य संस्कृतीची देवाण-घेवाण होऊन चीनमधील कम्युनिस्ट राजवट कोसळून तिथे लोकशाही येईल, असे निक्सन यांना वाटले होते. पण दोन वर्षांतच त्यांचा भ्रमनिरास झाला व चीनच्या राज्यपद्धतीत बदल होण्याची आशा त्यांनी सोडली. किसिंजर मात्र चीनचे दलाल व प्रवक्तेच झाले. अनेक राजकीय नेते, प्राध्यापक, अर्थकारणी हे चिनी कंपन्यांवर असतात आणि दलाल वा प्रवक्ते म्हणून काम करतात, हे फार धोक्याचे आहे, असे बाबांचे मत होते. अनेक क्षेत्रांत चीनसाठी हेरगिरी करणारे लोक आहेत. दोन वर्षांपूर्वी सिनेटर डायान फाइनस्टीन यांच्या ड्रायव्हरला चीनचा हेर म्हणून अटक झाली. यावर ‘ड्रायव्हिंग मिस फाइनस्टीन’ किंवा ‘अवर मॅन इन सॅन फ्रान्सिस्को’ असा सिनेमा काढता येईल.

हॉलीवुड, खेळ, प्रसारमाध्यमे यांचेही आर्थिक हितसंबंध चीनमध्ये गुंतलेले आहेत. ट्रम्प यांच्यावर हुकूमशहा म्हणून टीका करून प्रतिकार मोहिमेत पुढाकार घेणारे हे लोक कम्युनिस्ट चीनच्या हुकूमशाहीची सर्व नियंत्रणे पाळून, चीनला पाहिजे तसे बदल करण्यात धन्यता मानतात. एनबीसी ही वृत्तवाहिनी कॉमकास्टच्या मालकीची आहे. कॉमकास्ट चीनमध्ये बस्तान बसवू पाहत आहे. त्यामुळे एनबीसी व एमएसएनबीसी या वाहिन्या चीनविरुद्ध सहसा भाष्य करीत नाहीत. एनबीसीने बीजिंगमध्ये झाओ लिजियांग या चीनच्या प्रवक्त्याची मुलाखत घेतली. झाओने सांगितले की, कोव्हिड विषाणू अमेरिकेच्या लष्कराने हुबेत सोडला. चिनी परराष्ट्र खात्याचे ली युचेंग यांनी एनबीसीला 28 एप्रिलला सांगितले की, ही साथ नैसर्गिक आपत्ती असून तिचे राजकारण करणे योग्य नाही, साथीला लवकर आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी काही केले नाही. एनबीसीने यावर काहीही आक्षेप घेतला नाही.

स्टारबक्सचे शूल्ट्‌स यांनीसुद्धा चीन फार चांगला असून रशिया वाईट असल्याची ग्वाही जाहीर सभेतून अनेक वेळा दिली होती. चीनमध्ये स्टारबक्सच्या शाखा खूप आहेत, रशियात विशेष नाहीत. यामुळे चीनचे प्रेम. चीन सरकारला दुखवल्यास चीनमधून गाशा गुंडाळावा लागेल व तेथील वायदेबाजाराची माहिती चीन देणार नाही, त्याचा परिणाम आपल्या जगभरच्या ‘ब्लूमबर्ग टर्मिनल्स’वर होईल, अशी भीती वाटल्यामुळे चीनविरुद्ध कोणतीही बातमी द्यायची नाही, असा ‘ब्लूमबर्ग वृत्तसंस्थे’च्या पत्रकारांना ब्लूमबर्ग यांचा कायमचा आदेश आहे. ब्लूमबर्ग यांच्यावरील पुस्तकात ही माहिती दिली आहे. देशातील परिस्थितीनुसार चीन सरकार आवश्यक ती उपाययोजना व कायदे करत असते, हे योग्यच आहे, असे चीनचे समर्थन ब्लूमबर्ग नेहमीच करतात. ट्रम्प काही नेतृत्व देऊ शकत नसल्यामुळे त्यांना बाजूला ठेवून चीनसह जी-20 मधील सर्व देशांनी सहकार्य करून विषाणू साथीला आळा घालण्यात पुढाकार घ्यावा, असा ब्लूमबर्ग यांचा लेख 2 मे रोजी प्रसिद्ध झाला. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्‌स यांच्या संस्थेतर्फे जागतिक आरोग्यसंस्थेेला देणगी दिली जाते. अलीकडे गेट्‌स पती-पत्नी ऊठसूट वृत्तपत्रांत व टीव्हीवर महासाथीचे तज्ज्ञ असल्यासारखे भाष्य करीत असतात. कोट्यवधी लोक या महासाथीत लवकरच दगावतील, असे त्यांनी मार्चमध्येच भाकीत वर्तविले होते. ते डॉक्टर कधी झाले? त्यांनी मुलाखतीत सांगितले की, चीनच्या सरकारला या विषाणूबद्दल दोष देणे चूक आहे, जागतिक आरोग्यसंस्था चांगले काम करीत आहे; अमेरिकेतील ट्रम्प यांच्या सरकारने मात्र या साथीचा प्रश्न योग्य रीतीने हाताळला नाही. चीनशी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे गेट्‌स बजावतात; पण चीनच्या असहकार्याबद्दल, साथीच्या प्रसाराच्या जबाबदारीबद्दल व चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर दडपण आणल्याविरुद्ध ब्रसुद्धा काढण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. त्यांच्या कंपनीचा धंदा चीनमध्ये चालू ठेवायचा तर चीनला दुखवून चालणार नाही, हे त्यांचे भावबंधन असावे. ‘अर्थस्य पुरुषो दास:’, हे व्यासांनी केव्हाच सांगितले आहे. शूल्ट्‌स, ब्लूमबर्ग, बिल गेट्‌ससारख्या लक्ष्मीधरांना चीनकडून पैसा मिळाला नाही तर त्यांचे नुकसान होणार नाही. नैतिक श्रेष्ठत्वाचा आव आणून उपदेश करणारे हे लोक स्वत:च्या फायद्यासाठी एकाधिकारशाही चीनची वकिली करीत आहेत.

वुहान विषाणूबद्दल सर्व दोष ट्रम्प यांना द्यायचा, चीनला नाही, हे डेमोक्रॅट पक्षाचे व प्रसारमाध्यमांचे धोरण चीनच्या पथ्यावरच आहे. या महासाथीसंबंधात चीनच्या खोट्या व विपर्यस्त प्रचारास दोष देणाऱ्या युरोपसंघाच्या अहवालाची मूळ प्रत व काही अंतर्गत ई-मेल ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ यांनी नुकतीच मिळवून बातमी दिली. मूळ अहवालात म्हटले होते की, ‘खोट्या व विपर्यस्त प्रचाराची जागतिक मोहीमच चीन चालवीत आहे. साथीस चीन जबाबदार नसून अमेरिकेने वेळच्या वेळी योग्य उपाययोजना केली नसल्यामुळे ही साथ जगभर पसरली असा प्रचार उघड तसेच गुप्तरीतीने चीन करीत आहे.’ ‘फ्रान्सने उपाययोजनेस उशीर केला व टेड्रोस यांच्यावर टीका करणे हे फ्रान्सच्या वंशवादाचे द्योतक आहे’, अशी टीका चीनने केली होती, याचाही उल्लेख मूळ अहवालात होता. परंतु चीनने दबाव आणून तो अहवाल बदलण्यास भाग पाडले. बदललेल्या अहवालात चीनला सरळ दोष न देता म्हटले आहे की, ‘काहींनी दुसऱ्यांवर दोष जाईल अशा प्रकारे खोटा प्रचार करण्याची मोहीम चालवली आहे, त्यात चीनमधील काही आहेत.’ फ्रान्सवरील चीनच्या टीकेचा व सर्बियातील चीनवादी बॉटच्या साखळीचा हे उल्लेखही गाळले आहेत. महासाथ होण्यापूर्व़ी युरोप व चीन या दोघांत सुमारे 160 कोटी डॉलरचा रोजचा व्यवहार चालत होता. जर्मनीतील मोटार कारखानदार, फ्रान्समधील शेतकरी व अनेक उद्योगधंदे हे निर्यातीसाठी चीनच्या मोठ्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. ती गमावून होणारे नुकसान त्यांना फार महाग पडेल. त्यामुळे टीकेची भाषा बदलून चीन दुखावणार नाही, अशी खबरदारी युरोपसंघाने घेतली.

चीनविषयक तज्ज्ञ गॉर्डन चँग यांनी चीनच्या साम्राज्यवादावर पुस्तके लिहिली आहेत. डेमोक्रॅट पक्ष अतिरेकी डावा होऊन कम्युनिस्ट धर्तीने वागत आहे. बायडन हे चाकोरीतल्या राजकारण्यांप्रमाणे बोलतात. त्यांचे चीनशी जवळचे संबंध अनेक वर्षे आहेत. चीन अमेरिकेशी स्पर्धा करूच शकत नाही, चीनकडून काहीच धोका नाही, असे त्यांनी गेल्याच वर्षी ठामपणे सांगितले होते. याउलट चीनचे वाढते वर्चस्व धोक्याचे आहे, असे ट्रम्प गेली अनेक वर्षे सांगत आहेत आणि अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी चीनला पायबंद घालण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांच्या बोलण्या-वागण्याला ताळतंत्र नाही, पण धोरण योग्य आहे, असे चँग नेहमी सांगतात.

‘किसिंजर यांच्या दृष्टीतून चीन’ या 18 जून 2011 च्या साधनातील लेखात बाबांनी लिहिले आहे की, ‘‘एकाच संघर्षामुळे आपला प्रश्न कायमचा सुटेल, असे चिनी नेते मानीत नाहीत. पाश्चात्त्य देशांचे नेते बुद्धिबळाच्या खेळातील अडवणुकीची खेळी करतात. त्या खेळात संपूर्ण हार वा जित होते. पण प्रत्यक्ष जीवनात असे होत नाही. चिनी खेळाचे नाव आहे  ‘वे ची’.  इंग्रजीत ‘पुढे चला’ अशा अर्थाने ‘गो’ या शब्दाने त्याचे भाषांतर केले जाते. खेळ सुरू करण्यापूर्वी पट मोकळा असतो. प्रत्येक खेळाडूला 180 खडे दिले जातात. मग खेळाडू त्याला वाटेल त्याप्रमाणे हे खडे पटावर ठेवतो. प्रतिपक्षाचा एकेक खडा हस्तगत करण्याच्या दृष्टीने हालचाली होतात. पटाच्या एका भागात नव्हे, तर निरनिराळ्या भागांत याप्रमाणे खेळ चालतो. यातून कोणी किती खडे वा सोंगट्या अडवून जिंकल्या याची मोजदाद होते. कोण जिंकला, हे स्पष्टपणे दिसणे सोपे नसते. थोडक्यात, हा वेढा घालण्याचा खेळ आहे. दुसऱ्या एका भाष्यकाराने एका ताज्या लेखात सांगितले आहे की, चीन दक्षिण चिनी समुद्राच्या भागात आजकाल या तंत्राचा (‘वे ची’) अवलंब करीत असून आफ्रिका खंडातही तो याच मार्गाने बस्तान बसवीत आहे. चीन हाच डाव भारतास वेढा घालण्यासाठी अवलंबीत असल्याचे या भाष्यकाराने व किसिंजर यांनी म्हटलेले नाही. पण तसा तो घातला जात आहे, असे माझे मत आहे.’’

‘सर्वंकष तत्त्वज्ञान हे सर्वंकष सत्तेलाच जन्म देते आणि मानवी समाजाची प्रगती सर्वंकष सत्तेला नियंत्रण घालण्यात वा घालून झालेली आहे, केंद्रीकरणाने नाही’, असे बाबांनी लाल गुलागमध्ये चीनवरील लेखात लिहिले आहे.

सर्व जग बेसावध असताना गुप्तपणे संहारक विषाणू पसरवून चीनने प्रथम आरोग्यावर आघात केला, व्यवहार बंद पाडले आणि त्यामुळे जगभर आर्थिक मंदी येऊन धनसंपदेच्या चाव्याही चीनच्याच हातात गेल्या. जगभर सर्वंकष सत्ता मिळवण्यासाठी चीनने शत्रुबुद्धीने हा डाव टाकला, पण ट्रम्प चीनवर नियंत्रण घालू बघत असताना ट्रम्पविरोधक चीनचीच बाजू घेत आहेत.

(समाप्त)

Tags: trump covid-19 corona china wuhan sushma talwalkar nirupama talwalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
stalwalkar@hotmail.com

लेखक, संपादक गोविंद तळवलकर यांच्या कन्या 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात