डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी त्यांची सार्थ ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनोमन स्वीकारलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राममनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांच्या स्वप्नातला राजकीय पक्ष उभा करायचा, या नादापायी भाई वैद्य यांच्यासोबत वाघ सरांनी समाजवादी जनपरिषद हा पक्ष उभारायचा प्रयत्न करून पाहिला. पण आपला पिंड राजकीय नेत्याचा नाही, हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं असावं की काय कुणास ठाऊक? ते त्यात रमले नाहीत. का रमले नसावेत? दिवसही उलटे फिरत चाललेत, हे त्यांच्या लक्षात येत होतं.

प्रा. विलास वाघ दि.25 मार्चला पहाटे निधन पावले. ते 83 वर्षांचे होते. ‘वाघसर’ म्हणत सर्व जण त्यांना. ते गेल्यानंतर समाजमाध्यमात त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत होते. तेव्हा उमजत गेलं की, वाघ सर काय काय होते! सुगावा मासिकाचे संपादक, सुगावा प्रकाशनाचे प्रकाशक, देवदासींच्या मुला-मुलींसाठी पहिलं वसतिगृह सुरू करणारे द्रष्टे समाजसेवक, शिक्षणसंस्था उभारून शाळा-कॉलेजं काढणारे शिक्षणसंस्था चालक, जातिनिर्मूलनाचा ध्यास घेतलेले कार्यकर्ते-संघटक, सत्यशोधक, समाजवादी, आंबेडकरी चळवळीतले कृतिशील कार्यकर्ते-नेते, समाजवादी जनपरिषद या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष; तसेच पुणे विद्यापीठ, अशोक माध्यमिक विद्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थांत प्रभावी काम केलेले विद्यार्थिप्रिय शिक्षक, महाराष्ट्रभरातील सर्व परिवर्तनवादी चळवळींचे मित्र... अशी किती रूपं आहेत त्यांची!

दि.1 मार्च 1939 रोजी मोराणे (जि. धुळे) इथं वाघ सरांचा जन्म झाला. हे गाव स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव असलेलं. त्यामुळे इथल्या सर्व तरुणांवर स्वातंत्र्य चळवळीने पुढे आणलेल्या विचारांचे संस्कार होणं स्वाभाविक होतं. वाघ सरांवर ते संस्कार झाले नसते, तरच नवल. स्वातंत्र्य मिळालं. आता नवा देश घडवायचा, तो गांधी-आंबेडकरांच्या विचारांचा- असा ध्यास घेतलेल्या तरुणांपैकी एक होते वाघ सर. धुळे- जळगाव- खानदेश या परिसरातली फक्त जमीनच सुपीक नाही; तर इथला समाजही सुपीक, नवविचारांची मशागत झालेला. साने गुरुजींची कर्मभूमी- विचारभूमी असलेला.
अशा खानदेशातून नव्या जगण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आलेला विद्यार्थी म्हणजे विलास वाघ. पुण्यात एस. पी. कॉलेजमधून ते पदवीधर झाले. नंतर शिक्षक म्हणून नोकरीसाठी काही काळ कोकणात नरडवणे इथं काम केलं. त्यानंतर पुण्यातल्या अशोक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले.

कार्यकर्ता-शिक्षक अशी त्यांची अल्पावधीतच ओळख झाली. त्यांनी 1972 मध्ये ‘सुगावा’ मासिक सुरू केलं. त्यांनी 1983 मध्ये उषातार्इंशी आंतरजात-धर्मीय विवाह केला. वाघ स्वत: बौद्ध. उषाताई कुलकर्णी हिंदू कुटुंबातून आलेल्या. उषाताई गणिताच्या नावाजलेल्या प्राध्यापक होत्या. पुणे विद्यापीठात दोघांचे सूर जुळले. दोघांनी एकजीवानं पुढचा कार्याचा सारा डोंगर उभा केला. दोघांनी नोकऱ्या सोडल्या आणि सामाजिक काम सुरू केलं.

उषाताई गणिताच्या प्राध्यापक असल्यानं व्यवहार-कुशल. वाघ सर यांना व्यवहाराचा कंटाळा असावा, असं वाटे. वाघ सरांच्या पंच्याहत्तरीला ‘प्रबोधनपर्व’ हा विशेषांक काढण्यात आला होता. वाघ सर आणि उषाताई यांचं जीवनच एक प्रबोधनपर्व म्हणता येईल. ‘सुगावा’ मासिक आणि ‘सुगावा प्रकाशन’ चालवणं हे मोठं कठीण काम. दर महिन्याला अंक काढणं जिकीरीचं. लेख जमा करणं, त्याचे डीटीपी, प्रूफरीडिंग, छपाई बघणं, अंक घेऊन येणं, त्यांच्या घड्या घालणं, पोस्टाची तिकिटं लावणं, जिल्हावार गठ्ठे करणं, मग ते पोस्टात टाकणं- हे काम वाघ सर आणि उषाताई दर महिन्याला स्वत: करत. कधी माझ्यासारखा कुणी त्यांच्या मदतीला असे. प्रकाशनाचेही असेच. प्रूफरीडिंग करणं, पुस्तकाचं छपाई बघणं, मुखपृष्ठ करून घेणं- ते ती पुस्तकं विकणं- तीही सार्वजनिक कार्यक्रमात टेबल मांडून! असा व्याप दोघांनी सतत मांडला. निभावला.

मासिक आणि पुस्तक प्रकाशन करताना वाघ सरांची भूमिक स्पष्ट होती. ज्ञान-साहित्य-व्यवहाराचं लोकशाहीकरण करण्याची. जातव्यवस्थेचे चटके भोगल्यानं त्यांना मक्तेदारीचा जाम तिटकारा होता. मिरासदारीची चीड होती. साहित्यव्यवहारातल्या ब्राह्मणी प्रवृत्तीला ते कडवा विरोध उभा व्हावा म्हणून धडपडत. ‘सुगावा’त त्यांनी किती नवनवे लेखक उभे केले. कवींच्या कवितांना ‘सुगावा’मध्ये जागा दिली. दि.6 डिसेंबरला न चुकता निघणारा त्यांचा विशेषांक आगळावेगळा असे. आंबेडकरी विचारधारा समृद्ध करणारं साहित्य, लेख त्यात असत. एका विषयाला वाहिलेला असे. नवनवे लेखक त्या अंकात लिहीत. यातले नवखे कवी, लेखक पुढे-नावारूपाला आले. कुणीही फाटका कार्यकर्ता वाघ सरांकडे ‘सुगावा’च्या सदाशिव पेठेतल्या दुकानकम-ऑफिसात लेख, कविता आणून देई. नवा कार्यकर्ता, लेखक, कवी किंवा आम माणसांचं वाघ सरांना भारी कौतुक. तो काय वाचतो, लिहितो, काय काय करतो- हे वाघसरांना जाणून घेण्याची भारी हौस.

‘सुगावा’चा दर महिन्याचा अंक ते तेवढ्याच हौसेने आलेल्या प्रत्येकाला दाखवत. प्रत्येक पुस्तक त्यांना स्वत:चं मूल वाटे. वाघसर शिक्षण, प्रकाशन, संपादन, चळवळीत पन्नासेक वर्षे महत्त्वाचा रोल करत होते. सत्यशोधक, समाजवादी, आंबेडकरी चळवळीत त्यांच्या शब्दाला किंमत होती. या चळवळींचे ते भाष्यकार होते. पण ‘मी खूप मोठा आहे’, असा अहंकाराचा वारा त्यांच्या अंगी लागला नाही. त्यांनी कधी स्वत:चं मार्केटिंग केलं नाही. आजच्या भाषेत ते खुद्द एक ब्रँड होते, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. आपण न-नायक आहोत, हे जणू त्यांनी ठरवून टाकलेलं होतं की काय, कुणास ठाऊक! नायकत्वाची त्यांना शिसारी बसली असावी. दि.6 डिसेंबर (मुंबई) आणि धम्मचक्र परिवर्तनदिन (नागपूर) इथं ‘सुगावा’चा पुस्तक विक्रीचा स्टॉल हामखास असे. पुस्तक विकणं हा त्यांच्या हौसेचा विषय. महाराष्ट्रभरातील पुस्तक विक्रेत्याचे वाघ सरांकडे येणे-जाणे असे. त्यांचे बारीकसारीक प्रश्न-अडचणी, खोडी, स्वभाव वाघ सरांना माहीत असत. हे पुस्तके विक्रेते ‘सुगावा’ प्रकाशनाची पुस्तक विक्रीसाठी नेत. काही विक्रेते हिशेब नीट देत नसत. पैसे वेळेवर न देणं, कधी बुडवणं असं पुस्तक विक्रेत्यांकडून होत असे. अनेक जण वाघ सरांशी खोटे बोलत, तेव्हा उषातार्इंना राग येत असे. वाघ सर सांभाळून घेत. ‘सुगावा’ प्रकाशन ही वाघ सरांची जीवनशैली होती. व्यवसाय म्हणून त्यांनी त्याकडे कधी बघितलं नाही.

‘सुगावा’मार्फत त्यांनी कॉम्रेड शरद पाटील, डॉ.रावसाहेब कसबे अशा दिग्गजांची पुस्तकं प्रकाशित केली. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, कष्टकरी, अनाथ, देवदासी, दलित, ख्रिश्चन, मुस्लिम या समूहाच्या प्रश्नांवरची पुस्तकं त्यांनी अग्रक्रमाने प्रकाशित केली. त्यातून मराठी साहित्य, विचार यांच्या अभिजनकेंद्री स्वरूपाला त्यांनी सुरूंग लावला. सर्व जात-धर्मांचे लेखक उभे करून साहित्याचं लोकशाहीकरण केलं. हे त्यांचं मराठी साहित्याला खूप मोठं योगदान मानावं लागेल.

वाघ सरांची जीवनशैली सहज होती. मंचावर ज्या सहजपणे ते वावरत, त्याच सहजपणे ते लोकांचे प्रश्न सोडवत. परत त्याचा कुठे बोलबाला करण्यात त्यांना काडीचाही रस नसे. स्वत:च्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात त्यांना हिरीरी वाटत नसे. एखादा तपस्वी ज्या तन्मयतेने व्रत करत असेल, तसं त्यांचं सारं कार्य लयबद्धपणे सुरू असे.

त्यांचा गोतावळा खूप मोठा होता. राज्यभरातले नेते, कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्याशी त्यांचा सतत संवाद असे. ते त्यांच्या मतांवर ठाम असत. पण कुणाशी कटुता येऊ द्यायची नाही, हे त्यांचं ठरलेलं असे. ते निर्मळ हसत. त्यांच्याकडे पाहिलं की वाटे- इतकं निरंहकारी, निर्विष, निष्कपट जगता यायला हवं.

हेन्री डेव्हिड थोरो म्हणतो- हजारापैकी एक व्यक्ती सद्‌गुणी असते, उरलेले नऊशे नव्याण्णव सद्‌गुणांचे केवळ कोरडे समर्थक असतात. वाघ सर या हजारातले एक सद्‌गुणी व्यक्ती होते. वाघ सरांमध्ये खानदेशी माणसांतला मायाळूपणा शिगोशिग भरलेला होता. पुण्यात सिंहगड रोडला वडगाव बुद्रुक इथं देवदासी, अनाथ मुलांचं वसतिगृह ते चालवत. त्या मुला-मुलींना ते नियमित भेटत. पहिली ते चौथीची मुलं ती. वाघ सर आले की त्यांना अत्यानंद होई. आपलं कुणी आलंय, आता खाऊ मिळेल, आपल्याला कडेवर उचलून घेईल, आपलं कोडकौतुक होईल- असं प्रत्येक मुलाला वाटे. मुलं वाघ सरांना बिलगत. मग वाघ सर, उषाताई मुलांना खेळवत. त्यांच्याशी गप्पा, त्यांना खाऊ देत. मुलांच्या खोड्या, त्यांना समजावून सांगणं असं पाहण्यासारखं व अनुभवण्यासारखं ते दृश्य असे.

वाघ सरांबद्दल मुलांना किती विश्वास वाटे! आपल्या आजोबांना सांगावीत अशी गुपितं, अडचणी, कौतुक मुलं त्यांना सांगत. ते विश्वासाचं नातं केवळ पाहत राहावं असं वाटे.

वाघ सरांमध्ये एक लहान मूल सतत दडलेलं असावं. लहान मुलाच्या निरागसपणे ते जगण्याकडे बघत असावेत. कुणाचा राग नाही, कुणाशी छक्केपंजे नाहीत, कुणाशी स्पर्धा नाही. त्यांना महान व्हायचा सोस नव्हता. आमदार, खासदार, मंत्री होण्याची वाट त्यांची नव्हतीच. सत्ता महत्त्वाची असते, हे त्यांना कळलं होतं; पण सत्ताबाजीत त्यांना रस नव्हता. स्वत:च्या संस्थेतही ते संस्थाचालकासारखे वागत नसते. कुणाचे मालक बनण्याची त्यांना गोडी नव्हती. आपण समाजाचं काम करतोय, हा भाव सतत त्यांच्याजवळ असे.

राष्ट्रसेवा दलाचे त्यांच्यावर संस्कार होते. समाजवादी चळवळीत भाई वैद्य, बाबा आढाव यांच्यासोबत ते विविध चळवळींत लढले. समाजवाद्यांमधला आंबेडकरवादी आणि आंबेडकरवाद्यांमधला समाजवादी अशी त्यांची सार्थ ओळख होती. एका अर्थाने समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळींना जोडणारा पूल ते झाले होते. गांधी-आंबेडकर या दोन्ही विचारधारा एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत, हे त्यांनी मनोमन स्वीकारलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राममनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांच्या स्वप्नातला राजकीय पक्ष उभा करायचा, या नादापायी भाई वैद्य यांच्यासोबत वाघ सरांनी समाजवादी जनपरिषद हा पक्ष उभारायचा प्रयत्न करून पाहिला. पण आपला पिंड राजकीय नेत्याचा नाही, हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं असावं की काय कुणास ठाऊक? ते त्यात रमले नाहीत.

का रमले नसावेत? दिवसही उलटे फिरत चाललेत, हे त्यांच्या लक्षात येत होतं. फुले, शाहू, आंबेडकर ही सुधारणावादी विचारधारा पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी परिणामकारक राजकीय-सांस्कृतिक कार्यक्रम हवा, हे ते सतत मांडत. डावे, समाजवादी, आंबेडकरवादी यांची संस्थात्मक पातळीवर पडझड झालीय, याचा सुगावा त्यांना लागला होता. त्यामुळे आता राष्ट्रसेवा दलासारखी संघटना जीव ओतून पुन्हा बांधली पाहिजे, याची त्यांना तातडी वाटे. भाई वैद्य हे सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हा वाघ सर सेवादलात अधिक सक्रिय झाले होते.

सोई-सवलती, जात-समूह आधारित सत्तावाटप या पलीकडे राजकारण न्यायला हवं. तरुणांमध्ये प्रबोधन- प्रशिक्षणाचा प्रभावी कार्यक्रम सतत राबवावा, त्यातून पुरोगामी चळवळींना-विचारांना बळ मिळेल, अशी त्यांची मनोधारणा होती. कार्यकर्त्यांनी, लिहिणाऱ्यांनी खूप शिकावं अशी शिदोरी वाघसरांजवळ होती. ते कुणाही विषयी पाठीमागे वाईट बोलत नसत. जेवढं समोर बोलता येईल तेवढं आणि तेच समोर बोलायचं, अशी त्यांची धारणा असायची. चहाड्या, कुटाळक्या, गटबाजीत त्यांना रस नव्हता. जवळ येणाऱ्यांवर अपार माया करणं, त्याला गुण-दोषांसहित सांभाळून घेणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष होता. त्यांच्या वागण्या-बोलण्यात करुणा होती. कुठून आलं होतं हे? मी बौद्ध आहे, हे ते अभिमानानं सांगत. सर्वांनी बुद्ध अभ्यासावा, असा त्यांचा आग्रह होता.

सारनाथ (उत्तर प्रदेश) ला त्यांच्यासोबत होतो. तिथल्या बुद्धमूर्ती बघत होतो. ते किती तन्मयतेनं बुद्धमूर्ती बघत होते. गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माशी ते एकरूप झाले होते. ज्याच्याशी आपण एकरूप होतो, ती आपली जीवनशैली होते. वाघ सर बौद्धमय, बुद्धमय झाले होते. तीच त्यांची जीवनशैली झाली होती, जीवनमार्ग झाला होता. त्यानुसारच ते जगले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके