डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डॉ. नवाल अल्‌ सदावी : मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या योद्ध्या

डॉ. नवाल अल्‌ सदावी वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन डॉक्टर झाल्या आणि इजिप्तच्या सरकारमध्ये आरोग्यखात्यात आरोग्य शिक्षणाच्या प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. या काळात त्यांना स्त्री-आरोग्याची दुर्दशा जवळून पाहता आली. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. देशातील स्त्रियांची केली जाणारी सुंता त्यांच्या काळजीचा विषय ठरला. या स्त्री-सुंता प्रथेचे स्त्रियांचं आरोग्य, लैंगिक संबंधामध्ये होणारा त्रास, प्रसवकाळातील वेदनांमध्ये होणारी वाढ असे अनेक दुष्परिणाम त्यांनी पाहिले. ज्याची चर्चा अगदी अलीकडे जगात होत आहे. डॉ.नवाल अल्‌ सदावींनी 1972 मध्ये या विषयावर पुस्तक लिहून त्याला वाचा फोडली. या विषयावर जाहीर भाषणं दिली. तेव्हा त्यांना तडकाफडकी पदावरून निलंबित केले. पुढे तर मूलतत्त्ववाद्यांच्याही नजरेत त्या आल्या. त्या करत असलेल्या लिखाणाची शिक्षा म्हणून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
 

दि. 21 मार्च 2021 रोजी, इजिप्तच्या नवाल अल्‌ सदावी यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांची छबी डोळ्यांसमोर तरळून गेली. जागतिक महिला चळवळीचं मोठंच नुकसान झाल्याची दु:खद जाणीव झाली.

मी त्यांना 1988 मध्ये भेटले होते. या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या मुस्लिम महिलांचं आंतरराष्ट्रीय संघटन बांधण्यासाठी ‘वुमेन लिव्हिंग अंडर मुस्लिम लॉज’ या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या परिषदेत डॉ.नवाल अल्‌ सदावी यांची भेट झाली होती. शुभ्र रुपेरी केस, ताठ शरीरयष्टी, चेहऱ्यावर असलेलं तेज, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या पवित्र्यात सदैव असलेल्या डॉ.नवाल अल्‌ सदावी. अगदी अलीकडील काळात बीबीसी या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत जेव्हा त्यांना ‘व्यवस्थेवर, अन्याय करणाऱ्यांवर त्या करत असलेली टीका सौम्य का नाही?’ असे विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘‘नाहीऽ मला हे स्पष्टपणे आणि आक्रमकपणे बोललंच पाहिजे, कारण आता जग जास्त अन्यायी आणि आक्रमक होत चाललं आहे. अन्यायाविरुद्ध आपल्याला मोठ्याने बोलावेच लागणार!’’ अशा डॉ.नवाल अल्‌ सदावी.

आम्ही ज्या आंतरराष्ट्रीय मुस्लिम महिला परिषदेत सहभागी झालो होतो, त्यात वयाने आम्हा सर्वांत ज्येष्ठ असलेल्या डॉ.नवाल अल्‌ सदावी. पण तरुण लोकांचंही तेवढ्याच उत्सुकतेने आणि गंभीरपणे त्या ऐकून घेत होत्या.  प्रसन्न आणि आनंदी होत्या. त्यांचं स्त्री असणं आणि त्यातही इजिप्शियन स्त्री असणं- अशा कुठल्याही चौकटीच्या त्या पलीकडे होत्या. त्यांचा स्वत:चा जो ठसा होता, तो अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या झुंजार लढवय्यीचा. इजिप्तमध्ये आम्हाला तीन महिने राहायचं होतं, ते तिथल्या महिलाविषयक कायद्यांच्या अभ्यासासाठी. तेव्हा डॉ.नवाल अल्‌ सदावी यांनी स्थापन केलेल्या ‘अरब वुमेन्स सॉलिडॅरिटी असोसिएशन’ या संघटनेने आमचे यजमानपद स्वीकारले होते. या संघटनेत स्त्रिया तर सदस्य होत्याच, पण तरुण मुले आणि मुलीही मोठ्या प्रमाणावर सहभागी होती.

डॉ.नवाल अल्‌ सदावी यांनी आपल्या देशातील हुकूमशाहीशी जी टक्कर दिली आहे, तिला तोड नाही. संपूर्ण मुस्लिम जगतात- विशेषत: हुकूमशाहीच्या विरोधात लढणाऱ्या मुस्लिम महिला संघटनांनाच केवळ नाही तर संपूर्ण जगभर त्यांच्याबद्दल आदर आहे. जगाचा निरोप 89 व्या वर्षी घेतलेल्या नवाल अल्‌ सदावी यांनी तरुणवर्गाला, येणाऱ्या पिढ्यांनाही प्रभावित करेल असं काम केलं आहे. त्यांची बंडखोरी, त्यांचा झुंजारपणा हा जागतिक पातळीवर महिला संघटनांचा आदर्श आहे.

लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना संताप यायचा. कुटुंबात भावाला जास्त अधिकार आणि मुलगी म्हणून आपल्यासोबत भेदभाव केला जातो, यावरून चिडलेल्या नवाल अल्‌ सदावींनी घरच्यांशी वाद घातला तेव्हा ‘देवानेच पुरुषांना जास्त अधिकार दिलेत’ असे उत्तर मिळाले, त्यावर लहानपणीच त्यांनी देवाला पत्र लिहिलं होतं की, ‘तू असा अन्याय कसा करू शकतोस? आणि असं असेल तर मी तुझी भक्ती तरी कशाला करू?’

पुढे कुटुंबात लढा देऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कारण वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचं लग्न लावून द्यावं, असं घरचे ठरवत होते. पुढे वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन त्या डॉक्टर झाल्या आणि इजिप्तच्या सरकारमध्ये आरोग्य खात्यात आरोग्य शिक्षणाच्या प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. या काळात त्यांना स्त्री-आरोग्याची दुर्दशा जवळून पाहता आली. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. सगळ्यात जास्त म्हणजे, स्त्रियांची केली जाणारी सुंता हा त्यांच्या काळजीचा विषय ठरला. या स्त्री-सुंता प्रथेचे स्त्रियांचं आरोग्य, लैंगिक संबंधामध्ये होणारा त्रास, प्रसवकाळातील वेदनांमध्ये होणारी वाढ असे अनेक दुष्पपरिणाम त्यांनी पाहिले- ज्याची चर्चा अगदी अलीकडे जगात होत आहे. डॉ.नवाल अल्‌ सदावींनी 1972 मध्ये पुस्तक लिहून या विषयाला त्याला वाचा फोडली. या विषयावर जाहीर भाषणं दिली. तेव्हा त्यांना पदावरून तडकाफडकी निलंबित केले गेले. पुढे तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. कारण सरकारची आरोग्यविषयक धोरणं, स्त्री-आरोग्याच्या प्रश्नांबाबत सरकारचा ढिसाळपणा याबद्दल त्या बोलत होत्या, हे तर  होतंच होतं; पण त्यांचं लेखन हे सरकारला भीती वाटण्याचं मोठं कारण होतं- त्या स्त्रियांचे दुय्यमत्व, समाज, वैद्यकशास्त्र आणि राजकारण याबद्दल लिहीत होत्या. स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्याशी शासनाचा व समाजव्यवस्थेचा संबंध, धर्माच्या नावाने स्त्रियांचे केले जाणारे शोषण यासंबंधी त्या परखडपणे लिहीत होत्या. त्यामुळे केवळ सरकारच नाही, तर मूलतत्त्ववाद्यांच्याही नजरेत त्या आल्या. त्या करत असलेल्या लिखाणाची शिक्षा म्हणून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. या काळात इजिप्तमध्ये अन्वर सादात यांची सत्ता होती.

डॉ.सदावी यांच्या लिखाणामुळे सरकार आणि मूलतत्त्ववादी दोघेही त्रस्त का झाले होते, ते त्यांच्या काही पुस्तकांची नावे जरी पाहिली तरी लक्षात येईल. ‘द हिडन फेस ऑफ इव्ह,’ ‘द फॉल ऑफ इमाम’, वुमन इज द ओरिजिन’ इत्यादी... स्त्रीमध्ये असलेल्या सुप्त शक्ती, स्त्रीचं स्वावलंबित्व आणि श्रेष्ठत्वाचा दडपण्यात आलेला इतिहास, सद्य:स्थितीत निर्माण केले गेलेले स्त्रियांचे प्रश्न, त्यामागे कारणीभूत असलेली धर्मसत्ता, राज्यसत्ता, वसाहतवाद हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय होते. त्यांच्या मतांची आणि भूमिकांची त्यांना किंमत चुकवावी लागली, पण त्या कधीच मागे हटल्या नाहीत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे अरब देशांबद्दल वा मुस्लिम देशांमधील महिलांच्या लढ्याबाबत बोलताना ‘बाप रे, बघा ते लोक कसे आणि बघा या त्यांच्या विरोधात लढणाऱ्या महिला किती शूर आहेत!’ असा सूर असतो. पण डॉ.नवाल अल्‌ सदावींनी सर्वच धर्मातील मूलतत्त्ववादी आणि हुकूमशाही प्रवृत्ती कसा एकसारखा विचार करतात, हे दाखवून दिले आहे. आपण आपल्या देशाकडे वळून पाहणेही पुरेसे ठरू शकेल.

डॉ.नवाल अल्‌ सदावी यांना सादात सरकारने तुरुंगात टाकले. भारतात आज आपल्या हक्कांसाठी वा न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या सकूरा झरगर, दिशा रवी आणि अशा अनेक महिलांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहेच. आपले तुरुंगातील अनुभव डॉ.नवाल अल्‌ सदावी यांनी लिहून ‘मेमरीज फ्रॉम वुमेन्स प्रिझन’ या नावाने प्रकाशित केले आहेत. त्याची अर्पणपत्रिका एक महत्त्वाचा संदेश देते. ती अर्पणपिंत्रका अशी आहे...

‘मरणाचीही पर्वा न करता

शोषणाचा तिरस्कार करणाऱ्या,

तुरुंगवासाची पर्वा न करता

स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या,

क्रांतीची पर्वा न करता

खोटेपणा, भोंदूपणा नाकारणाऱ्या

सर्व जगभरच्या स्त्री-पुरुषांना अर्पण.’

डॉ.नवाल अल्‌ सदावी या फक्त अरब हुकूमशाहीशी लढणाऱ्या योद्ध्या नसून, त्या संपूर्ण जगातील हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्यांचे प्रेरणास्थान आहेत, हे स्पष्ट आहे; पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यांना विनम्र अभिवादन!

(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.विलास वाघ यांचे 25 मार्च 2020 रोजी निधन झाले. त्यांना अभिवादन करणारे सुभाष वारे व राजा कांदळकर या दोघांचे लेख पुढील अंकात.)

Tags: स्त्रीवाद महिला चळवळ डॉ.नवाल अल्‌ सदावी सामाजिक कार्यकर्ता स्मृतीलेख weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके