डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भागलपूरचा आत्मा मुन्नासिंहच्या श्रद्धांजली निमित्ताने!

सर्वोच्च न्यायालयाने 1986 मध्ये शाहबानोच्या बाजूने दिलेल्या निकाल लोकसभेने पाशवी बहुमतामुळे (राजीव गांधी पंतप्रधान असलेल्या) घटना दुरुस्त करून फिरविला. या घटनेनंतर रथयात्रा व सोबत जागोजागी दंगलीनंतर भागलपूर व देशात दंगलीचे राजकारण पसरले. ते कमी पडले म्हणून आतंकवादी घटना व घटना घडल्यानंतर काही क्षणात मुस्लिम संघटनांची नावे उघड व अटकसत्र, यामध्ये बहुसंख्य मुस्लिम युवकांना पकडणे- असे पद्धतशीर ध्रुवीकरणाचे राजकारण करून समस्त सेक्युलर पाटर्या व स्वयंसेवी संघटनांना टीकेचे लक्ष्य करून त्यांची पत पद्धतशीरपणाने घालवण्याचे काम करण्यात आले. भागलपूर दंगलीनंतरच हा ट्रेंड योजनाबद्ध रीतीने वाढत आज दिल्ली व इतर राज्यांत क्लृप्त्या करून सत्ता हस्तगत करणे सुरू आहे. अशा तऱ्हेने ‘सवाल आस्था का है, कानून का नहीं है’, या  घोषणेभोवतीच पुढील राजकारण ‘मंदिर वही बनायेंगे’ चळवळीचे स्वरूप संघ परिवाराने वाढवत नेऊन पस्तीसपेक्षा जास्त वर्षांचा प्रश्न याच मुद्याभोवती फिरत ठेवला.

लालकृष्ण आडवाणी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ऑक्टोबर 1989 मध्ये देशभरातून विटा गोळा करण्याचा कार्यक्रम म्हणजे रामशिला पूजा या नावाने देशातील अनेक ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमात 24 ऑक्टोबर 1989 रोजी बिहारमधील भागलपूर येथील काजवली चक या ठिकाणी झालेल्या गडबडीतून संपूर्ण भागलपूर शहर व  जिल्हा, आजूबाजूचे गोड्डा, साहेबगंज, खगडिया, मुंगेर- म्हणजे संपूर्ण भागलपूरमध्ये दंगलीचा वणवा पसरल्यामुळे जवळपास तीनशे गावे युद्धसदृश परिस्थितीत उद्‌ध्वस्त केली गेली, 3000 पेक्षा जास्त माणसं मारली गेली!

या दंगलीच्या कव्हरेजसाठी दूरदर्शनमध्ये काम करत असलेल्या पत्रकार नलिनीसिंह भागलपूर दंगलीनंतर, ‘आँखो देखी’ नावाच्या कार्यक्रमात (तेव्हा फक्त एकच चॅनेल होते!) जेथे हजारोंच्या संख्येने हिंदू मॉब पारंपरिक हत्यारे घेऊन दंगलीमध्ये हिंसा करत असताना काही अपवाद म्हणून माणुसकी दाखवण्याची पण उदाहरणे- जिवावर उदार होऊन मुस्लिमांना वाचवायचा प्रयत्न करणारे- सर्वसामान्य माणसांमधील काही निवडक लोकांची प्रत्यक्ष मुलाखत घेत होत्या. त्यातील नया बाजार भागातील एका घरात 70 वयाच्या मुन्नासिंह नावाच्या एक सायकल दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या गृहस्थासोबत केलेली बातचित सगळ्यात लक्षवेधी व स्मरणात राहिली. दंगल झाल्यापासून बंगालमधील प्रसिद्ध लेखक किशोर घोष, शांतिनिकेतनमध्ये मराठी भाषा शिकवणारी माझी मैत्रीण वीणा आलासे या दोघांचा मला भागलपूरला चालण्याचा आग्रह होत होता. पण मी माझ्यावर माझ्या दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. शेवटी त्यांची उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे दंगलीनंतर सहा महिन्यांनी आम्ही सर्व जण 6 मे रोजी अप्पर इंडिया एक्स्प्रेसने सियालदाह स्टेशनवरून भागलपूरला निघालो.

सोबत कलकत्ता येथील सिनेमा दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या वहिनी वाणी सिन्हा, शांतिनिकेतन येथील चित्रकार सुधीर खस्तगीर यांच्या एकमेव कन्या श्यामली खस्तगीर आणि वीणा आलासे यांच्या दोन विद्यार्थिनी मनीषा बॅनर्जी, मंदिरा चटर्जी- असे सगळे भागलपूरला सकाळी सहा वाजता पोहोचलो.

मला नलिनीसिंहच्या आँखो देखी कार्यक्रमात ‘भागलपूर का सच’ ही डॉक्युमेंटरी गांधी पीस फाउंडेशनमध्ये पाहिलेली आठवलं. म्हणून मी म्हणालो की- बहुतेक तेथे मुक्कामाची सोय असावी. आपण आधी तेथे जाऊ व नसल्यास त्यांची मदत घेऊन इतरत्र थांबू आणि एक आठवड्याच्या कार्यक्रमात त्यांची मदत घेऊन इतरत्र फिरू. ती जागा स्टेशनहून एक किलोमीटरच्या आतच होती. माझ्या अंदाजाप्रमाणे तेथे मुक्कामाची पण सोय झाली. तेव्हा त्यांचे दंगलीनंतर रिलिफच्या कामासाठी एक शिबिर सुरू होते, ज्यात आम्ही सामील झालो. दुपारचं जेवण सुरू असताना शेजारच्या गृहस्थासोबत बोलता-बोलता मी मुन्नासिंहची चौकशी केली. शेजारचे गृहस्थ म्हणाले की- तो जो जेवण वाढत असलेला, पांढरा पायजमा व कुर्ता घातलेला माणूस आहे ना, तो मुन्नासिंह. या गृहस्थानेच मुन्नासिंहला हाक मारून बोलवले. मुन्नासिंह वरण-भाजी आम्हाला वाढायला लागला. मी म्हणालो, ‘‘हमारा खाना हो गया है, और आपने अगर नहीं खाया हो तो खाना खाने के बाद मुझे आपसे कुछ बात करनी है!’’ मुन्नासिंह म्हणाले, ‘‘माझं जेवण घरीच झालेलं असून माझं घर जवळच आहे. आपल्याला घरी आल्यामुळे समजायला बरेच सोपं जाईल.’’ लगेच हात धुऊन त्यांच्यासोबत गेलो.

नया बाजार येथील मोहल्ल्यात एक जुनी पडझड झालेली कोठी. लोखंडी गेट कसंबसं लोंबकळत होतं. मूळ जमीनदाराची आर्थिक स्थिती आता खंडहर होत चाललेल्या घरासारखी पाहून माझ्या मनात विचार आला की, जुन्या सामंतवादी व्यवस्था कोलमडत जात असलेल्या एका जमीनदाराची सध्या अवकळा आलेली ही कोठी.

घराच्या आवारात पाय टाकला आणि मला दंगलीचे अवशेष दिसायला लागले! अंगणात तुटलेल्या बांगड्यांचा खच, ओसरीची दारे-खिडक्या अर्धवट जळलेल्या व काचा तुटलेल्या अवस्थेत! सगळ्यात भीषण चित्र भिंतीवर दिसत होते- रक्ताच्या उडालेल्या चिळकांड्या. हे भेसूर चित्र पाहत असताना खालच्या बैठकीतील समस्त सोफ्यावर, तलवार, भाले वा तत्सम धारदार शस्त्रांनी वार केल्याने त्यांचे स्पंज व स्प्रिंग बाहेर डोकावत होत्या.

फार बोलक चित्र होतं. तरीही मुन्नासिंह आपल्याच तंद्रीत संपूर्ण घटनेची माहिती वर्णन करून सांगत होता. त्यामुळे मी अंतर्बाह्य हलून जात होतो. 1990 ते मार्च 2021... एकतीस वर्षे माझे एकमेव ध्येय कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराविरोधी काम करण्याची प्रेरणा द्यायला निमित्त झालं.

जवळपास दहा दिवसांनी भागलपूरहून कलकत्ता येथील घरी परत आल्यानंतर माझ्या बेचैन मन:स्थितीला इन्सोमिनीया झालेला पाहून मॅडम खैरनार म्हणाल्या, ‘‘आता आपली मुलं दहा वर्षे वयाच्या वरची असल्यामुळे बरंच काम सोपं झालेलं आहे. तुम्ही फार अस्वस्थ झालेलं पाहून मला वाटतं की, तुम्हाला जे काही करावंसं वाटतं ते करा; माझी काहीएक हरकत नाही.’’

त्या भेटीनंतर भागलपूरला दर महिन्याला एक फेरी सुरू केली. कलकत्ता-भागलपूर साडेचारशे किलोमीटर अंतर असून किमान आठवड्याच्या मुक्कामात दंगलीच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांचं दुःख ऐकणं सुरू केलं. बहुसंख्य ठिकाणी मुन्नासिंह सोबत असायचे. परतीच्या प्रवासात ते कलकत्ता येथील आमच्या घरी येऊन बरेच दिवस मुक्काम करायचे, कारण दंगलींनंतर सायकल दुरुस्तीचे दुकान चालवण्याची त्यांची इच्छा संपली होती. त्यांची मुलंही काही ना काही काम करायला लागली होती.

कलकत्ता येथील घराच्या अंगणात जुनं निंबाचं एक झाड होतं, ज्याची पाने मुन्नासिंह खात असे. निंबाच्या काड्यांनीच दात घासायचे. एके दिवशी मी त्यांचे तोंड उघडायला सांगितले तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूच्या जबड्याखाली एक लहान आकाराची सुपारी मावेल एवढ्या आकाराचे छिद्र पाहून मला संशय आला. माझ्या ओळखीच्या इंकॉलॉजिस्टकडे त्यांना तपासणीसाठी नेले,. तोंडाचा कॅन्सर आहे, असं निदान झाल्यावर मी कलकत्ता येथील ठाकूर पुकूर कॅन्सर हॉस्पिटलला क्रॉस चेकिंगसाठी नेले असताना त्यांचेही निदान कॅन्सर आहे असे पक्के झाल्यानंतर रीतसर ट्रीटमेंट सुरू केली. ऑपरेशन, किमोथेरपी वगैरे पार पडली. त्यातच मॅडम खैरनार यांच्या बदलीची ऑर्डर आल्यामुळे आम्ही कलकत्ता सोडून नागपूरला निघालो. आमचं सामान 1997 च्या जूनच्या शेवटी एका ट्रकने येणार होतं, तर मुन्नासिंह म्हणाले, ‘‘मी ट्रकमध्ये बसून येतो.’’ आम्ही समजून सांगितले तरीही त्यांचे एकच पालुपद- मी ट्रकमध्ये बसून येतो! अशा तऱ्हेने ते खरोखर ट्रकमध्ये बसून आले. जवळपास सहा महिन्यांनी परतले.

आमच्या घराचे बांधकाम करण्याची माहिती कळल्यावर मला सरळ म्हणाले, ‘‘आप देशभर घुमते रहते हो, आपसे घर बनाने का काम नहीं होगा।’’ म्हणून आमच्या घराच्या बांधकाम साईटवर तात्पुरती टिनची शेड केली होती त्यात ते राहायचे. घराच्या छताची स्लॅब झाल्यावरच भागलपूरला परत गेले. औषधोपचार केल्याने कॅन्सर आटोक्यात आला होता. त्यामुळे आम्ही निश्चिंत झाल्यामुळे त्यांचा  राहण्याचा हट्ट चालवून घेतला. मुन्नासिंह हे आमच्या कुटुंबाचाच भाग झाले होते.

मुन्नासिंहच्या शिक्षणाबद्दल आनंदी-आनंदच होता. रोजचं हिंदीमधील वर्तमानपत्र आवश्यक तेवढं वाचताना पाहिलं आहे, इतर कुठल्याही प्रकारची पुस्तके वाचताना पाहिले नव्हते. कमालीचे नास्तिक होते. कुठल्याही प्रकारची कर्मकांडे, पूजा-अर्चा करत नव्हते. ही नास्तिकता स्वतंत्रपणाने आलेली, याचे मला आश्चर्य वाटत होते.

कॅन्सरसारख्या आजारात असताना अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहत होतो, मुन्नासिंह कधीही घाबरलेला दिसला नाही. सामान्यतः माणसं मृत्यूला सामोरे जायला लागली म्हणजे देव-देवतांच्या नादी लागतात. मुन्नासिंह ठणठणीत बरे होऊन जवळपास पंचवीसेक वर्षे जगले. असा एथिस्ट मी जवळून फक्त मुन्नासिंहमध्येच पाहिला. आताची मृत्यूची बातमी- वयाच्या 85 वर्षांच्या वार्धक्यामुळे.

व्यक्तिगतरीत्या मी सांप्रदायिक विरोधी कामात किती यशस्वी झालो, ते खात्रीपूर्वक नाही सांगू शकत; पण माझ्या एकतीस वर्षांतील बहुसंख्य वेळ याच शक्तींविरोधी काम करण्यात गेला असून यात मुन्नासिंहसारख्या अत्यंत सामान्य माणसांमधील माणुसकीने मला जास्त ऊर्जा दिली आहे. भागलपूर दंगलीनंतर ‘भागलपूरची कहाणी- मुन्नासिंहची जुबानी’ कार्यक्रम 1992-93 मध्ये बंगाल आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील बहुसंख्य ठिकाणी- मुख्यतः  नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, जळगाव, धुळे, साक्री, मालेगाव, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आदी शहरांत केला. जे पाहिले, ते अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने मुन्नासिंह सांगत असायचा. पुण्यात स्नेहसदन येथील सभेतील एक वयस्कर श्रोता अक्षरशः गहिवरून हात जोडून म्हणाले, ‘‘नका हो बोलूऽ मला ऐकवत नाहीऽ!’’ त्या सभेचे अध्यक्ष नानासाहेब गोरे होते.

दि.24 ऑक्टोबर 1989 च्या दुपारची वेळ होती. मुन्नासिंह आपल्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करत असताना लोकांची धावपळ पाहून त्याला वाटलं की, कुछ तो गडबड होने की संभावना दिखती है. त्याचे दुकान जे चंपानगर भागलपूरला लागूनच 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेशीमचे यंत्रमाग असलेल्या भागात आहे, जो मुस्लिमबहुल आहे. मुन्नासिंह राहतात तो नया बाजार- ज्यात मुन्नासिंहच्या आजूबाजूला बरेच मुस्लिम परिवार राहतात, त्यांनी लगबगीने नया बाजारात मुस्लिम परिवारांच्या घरोघरी जाऊन अक्षरशः हाता-पाया पडून विणवण्या केल्या, ‘‘मुझे शहर की आबो-हवा ठीक नहीं लग रही है. आप लोग फिलहाल अंगके कपडों के साथ मेरे घर चलिए. कुछ भी सामान मत लो. जान है तो जहान है! जब स्थिति ठीक हो जाएगी तो वापस आ जाना, लेकिन अभी बगैर देर किए निकलो.’’

अशा तऱ्हेने 70 पेक्षा जास्त मुसलमान परिवार मुन्नासिंहने आपल्या घरात तीन दिवस ठेवले. घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या भाडेकरू व बिहार सरकारच्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सिन्हा, त्यांची विशीतील जेनी या मुलीने, प्रतिभा सिन्हाची वयस्कर सासू यांनी मनापासून साथ दिली. मुन्नासिंहची पत्नी व पंधरा-सोळा वर्षांची पिंकी ही मुलगी आणि तिच्यापेक्षा दोन लहान भावंडांनी मिळून सत्तर लोकांना तीन दिवस ठेवून घेऊन आपल्या घरातील दाणापाणी संपेपर्यंत त्यांची सेवा केली. मधल्या काळात कोतवाली पोलीस स्टेशन जे एक किलोमीटरच्या आत असून- तेथे मुन्नासिंह प्रत्यक्ष जाऊन विनंती करीत होते, पण पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी पण मुन्नासिंहने अन्न-पाणी देण्याची आमची स्थिती संपली असून, त्यांना सुरक्षित जागेत हलवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती केली. पोलिसांनी मुन्नासिंहला कैद करून ठेवून, पोलीस पाठवून घरातील सामानाची नासधूस केली. तेथील तथाकथित हिंदू लोकांना सांगितले की, यांनी घरात मुसलमान लोकांना ठेवले आहे, त्यांचे करायचे ते करा; अन्यथा लवकरच पॅरामिलिटरी येत आहे.

मुन्नासिंह व प्रतिभा सिन्हानी सत्तर लोकांना वाचवण्याची धडपड काही क्षणांत फोल ठरली. दंगलखोरांच्या हल्ल्यात नया बाजार येथील मुन्नासिंहच्या घरातच जागच्या 20 जण मारले गेले. इतर लोक मेले समजून जखमी अवस्थेत पडून असलेल्या दृश्याचे वर्णन मुन्नासिंहच्या तोंडून ऐकवत नव्हतं. उर्वरित शंभरच्या वर गावं, एक आठवडभर गांधी पीस फाउंडेशनच्या भागलपूर शाखेचे प्रमुख केदार चौरासिया, जयप्रकाश जय व रिलिफच्या कामासाठी आलेले लुथरन सर्व्हिसचे प्रसाद चाको यांच्या वाहनांमुळे आमच्या एका आठवड्याच्या मुक्कामात फिरू शकलो. दंगलीच्या तडाख्यात सापडलेल्या बहुसंख्य गावांमध्ये एकच कहाणी- हजारोंच्या संख्येंने हिंदू लोक कुऱ्हाड़ी, कुदळ, फावडी अशा अवजारांसहित मुस्लिम वस्त्यांवर युद्धासारखी चाल करीत. महिला, मुले, वयस्कर, मध्यम वयाच्या व तरुण- सगळ्यांची  सरसकट कत्तल करीत. काँक्रीटची घरे तोडून घरातील सामानाची चोरी हा कार्यक्रम तर सर्वच ठिकाणी दिसून आला. 300 वर गावं उद्‌ध्वस्त करण्यात आली होती. आम्ही शंभरेक गावे पाहिली, बाकीच्या गावांची परिस्थिती पाहण्याची आमच्यात हिंमत नव्हती, त्यामुळे परत फिरलो.

आम्ही पाहिलेल्या गावांमधील काही प्रमुख गावे- ज्यात चंदेरी येथील सबौर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मॉबला ‘काय करायचं ते करा; अन्यथा लवकरच पॅरामिलिटरी येत आहे, मग काही खरं नाही’ असं सांगितल्यावर 65 लोकं मारून तलावात टाकली. लोगाव येथे 115 लोकांना मारून शेतात पुरले. किमान तीन हजारांपेक्षा जास्त महिला, मुलांना या दंगलीत झालेल्या मृत्यूला सामोरे जावे लागले.

सध्या अयोध्या येथील बांधकाम होत असलेल्या मंदिरासाठी शिलापूजा मिरवणुकीतून झालेलं हे हत्याकांड त्यानंतर 13 वर्षांनी अयोध्या येथील कारसेवकांच्या परतीच्या प्रवासात गुजरात येथील गोधरा स्टेशनवरून जाणारी साबरमती एक्स्प्रेस या गाडीला 27 फेब्रुवारी 2002 रोजी लावलेली आग आणि त्यातील 59 जळलेल्या मृतदेहांची मिरवणूक काढून दोन हजारांपेक्षा जास्त माणसं मारली गेली, उद्‌ध्वस्त झाली- एकोणीस वर्षांपूर्वी गुजरात व भारतभर ‘मंदिर वही बनायेंगे’ या घोषणेला आणखी गती देत.

सर्वोच्च न्यायालयाने 1986 मध्ये शाहबानोच्या बाजूने दिलेल्या निकाल लोकसभेने पाशवी बहुमतामुळे (राजीव गांधी पंतप्रधान असलेल्या) घटना दुरुस्त करून फिरविला. या घटनेनंतर रथयात्रा व सोबत जागोजागी दंगलीनंतर भागलपूर व देशात दंगलीचे राजकारण पसरले. ते कमी पडले म्हणून आतंकवादी घटना व घटना घडल्यानंतर काही क्षणात मुस्लिम संघटनांची नावे उघड व अटकसत्र, यामध्ये बहुसंख्य मुस्लिम युवकांना पकडणे- असे पद्धतशीर ध्रुवीकरणाचे राजकारण करून समस्त सेक्युलर पाटर्या व स्वयंसेवी संघटनांना टीकेचे लक्ष्य करून त्यांची पत पद्धतशीरपणाने घालवण्याचे काम करण्यात आले. भागलपूर दंगलीनंतरच हा ट्रेंड योजनाबद्ध रीतीने वाढत आज दिल्ली व इतर राज्यांत क्लृप्त्या करून सत्ता हस्तगत करणे सुरू आहे.

अशा तऱ्हेने ‘सवाल आस्था का है, कानून का नहीं है’, या  घोषणेभोवतीच पुढील राजकारण ‘मंदिर वही बनायेंगे’  चळवळीचे स्वरूप संघ परिवाराने वाढवत नेऊन पस्तीसपेक्षा जास्त वर्षांचा प्रश्न याच मुद्याभोवती  फिरत ठेवला. राजकारण-समाजकारण, फक्त भावनिक मुद्दा घेऊन चाललेला कदाचित जगातील एकमेव देश असलेल्या भारतात समस्त उदारवादी, सेक्युलर, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकराइट, गांधीवादी आदींचे अस्तित्व असताना भाजपचा अश्वमेध कुणाकडूनच त्याचा लगाम धरण्याची गोष्ट तर सोडा, उलट बहुसंख्याक राजकारणी आम्हीही कसे हिंदू अहोत, हे दाखवण्याची चढाओढ करत असलेले पाहून मुन्नासिंह-प्रतिभा सिन्हा यांसारखी सज्जन शक्ती हीच भारतातील आशेची किरणे आहेत, अशा भावनेने धीर येतो. पण माणुसकीचे असे दूत एकेक करून जाताना पाहून खूप दु:ख होते. या भागलपूरच्या दोन्ही मित्रांशिवाय यापुढे जायला मन अत्यंत हळवं झालेलं असून, दोन्ही मित्रांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

Tags: श्रद्धांजली भागलपूर राजकारण स्मृतीलेख प्रतिभा सिन्हा मुन्नासिंह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश खैरनार,  नागपूर, महाराष्ट्र

 माजी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके