डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जेम्सनं हाती घेतलेला सर्वांत मोठा प्रकल्प म्हणजे Pax Britanica  हा तीन खंडांत लिहिलेला ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास होय. जेम्सच्या दृष्टीनं इतिहास म्हणजे एक प्रकारचं कथाकथन होय. महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव ते विन्स्टन चर्चिलच्या निधनापर्यंतच्या ब्रिटिश साम्राज्याच्या काळाचं त्यात वर्णन आहे. त्यात हीरकमहोत्सवाचा प्रारंभ, त्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये खास निर्माण केलेलं तार ऑफिस व ठरलेल्या वेळी बटण दाबून जगभर दिलेला महोत्सवाचा संदेश- या सगळ्याचं वर्णन आहे. पण त्याचबरोबर व्हिक्टोरिया राणीला हे साम्राज्य अभेद्य वाटत असलं आणि ते तिनं मिळवलं याचा तिला अभिमान वाटत असला, तरी काबीज केलेल्या सर्व देशांत दडपशाहीचा वापर करून, लष्करी बडगा दाखवून ते देश ताब्यात घेतले आहेत याचीही नोंद मॉरिसनं केली आहे. 

दि.2 ऑक्टो. 1926 रोजी इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये जन्मलेल्या जेम्स हंफ्रे मॉरिसचा मृत्यू जॅन मॉरिस या नावाने वयाच्या 95 व्या वर्षी वेल्समधील एका इस्पितळात झाला. अनेक वर्षांपूर्वी जॅन मॉरिस म्हणाली होती- माझ्या मृत्युलेखाचं शीर्षक असेल लिंगबदल करून घेतलेली लेखिका. वयाच्या 46 व्या वर्षापर्यंत ती पुरुष म्हणून जेम्स या नावाने वावरत होती. वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापासून आपल्यात काही तरी वेगळं आहे, असं वाटत असल्याचा उल्लेख Conundrum  आढळतो. लिंगबदलामुळे नव्हे, तर लेखनकर्तृत्वामुळे ती लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली.

जेम्सचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले. ऑक्सफर्ड ख्राईस्ट चर्चमध्ये तो choral scholar होता. कॉयरमध्ये गाणाऱ्या मुलांना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्याला मिळत होती. दुसऱ्या महायुद्धात क्वीन्स रॉयल लॅन्सरमध्ये त्यानं काम केलं. जेम्समधील स्त्रीत्वाच्या भावनेशी त्याची लष्कराबद्दलची ओढ कदाचित अनेकांना भुवया उंचावणारी वाटतही असेल. पण लष्करातील धाडस, निष्ठा, स्वयंशिस्त यासह सैनिकाचा रुबाबदारपणा जेम्सला आवडत असे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याची भेट एलिझाबेथ टकनीसशी झाली. ते दोघं 1949 मध्ये विवाहबद्ध झाले. ते वेल्समध्ये राहात असत. या जोडप्याला 5 मुलं झाली. एक लहानपणीच दगावलं. तीन मुलगे व एक मुलगी यांना त्या दोघांनी मोठं केलं.

जेम्सनं पत्रकार म्हणून लंडन टाइम्स, गार्डियन या वृत्तपत्रांत काम केलं. वृत्तपत्रात काम करता-करता जेम्सच्या लिखाणाला सुरुवात झाली. हे लिखाण विविध प्रकारचं होतं. लंडन टाइम्सनं त्याला गाझापट्टीत घडणाऱ्या घडामोडींचा अहवाल घेण्यासाठी 1946 मध्ये पाठवलं. पॅलेस्टाइनवर 1920 पासून ब्रिटिशांचा ताबा होता. तेथील गव्हर्नर लॉर्ड मॉयनीची (Moyne)  हत्या 1944 मध्ये झाली. तेथील किंग डेव्हिड हॉटेलवर 1946 मध्ये बाँबहल्ला झाला होता. ह्या घटनांचा व तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्याला पाठवलं होतं.

वयाच्या 26 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करणाऱ्या एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्जे यांच्या चमूत जेम्स सामील झाला. एव्हरेस्ट चढाईच्या वृत्तांकनाचे हक्क लंडन टाइम्सने मिळवले होते. त्या चमूत जेम्स एकटाच वार्ताहर होता आणि त्यानं 17900 फूट उंचीपर्यंत त्यांच्याबरोबर चढाई केली. हेतू हा की, शिखर सर केल्याची वार्ता प्रथम आपल्या वृत्तपत्रातून जाहीर करता यावी. त्या काळात आजच्याइतकी प्रगत संपर्क-संवादव्यवस्था नव्हती. एव्हरेस्ट सर केल्याचा सांकेतिक भाषेतील संदेश त्यानं नामचे बझार येथील रेडिओ स्टेशनवरून लंडनला पाठवला. ही वार्ता लंडनला राणी एलिझाबेथच्या (दुसरी) राज्यारोहण समारंभाच्या आदल्या दिवशी पोहोचली. ब्रिटनच्या साम्राज्यावरील सूर्य मावळू लागला होता. त्यामुळं ही वार्ता उत्साहवर्धक ठरली. या मोहिमेवर असतानाच जेम्सला त्याची पत्नी प्रसूत होऊन दुसरा मुलगा हेन्री झाल्याचा संदेशही मिळाला. अशा पथकाबरोबर जाण्यासाठी त्या पथकाशी खूप मनापासून जवळीक असावी लागते. ही जवळीक आयुष्यभर टिकून राहिली. एडमंड हिलरीचं न्यूझीलंडमध्ये 2008 मध्ये निधन झालं तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेसाठी न्यूझीलंड सरकारनं जॅन (जेम्स) व एलिझाबेथ यांची येण्या-जाण्याची व्यवस्था केली होती. चढाई करणाऱ्यांच्या मोहिमेतील ती एकटीच उरली होती. या मोहिमेवरील पुस्तक मात्र जेम्सनं तीन वर्षांनंतर लिहिलं. प्रत्यक्ष चढाई करणाऱ्यांची पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर स्वतःचं पुस्तक प्रसिद्ध करण्याचा संकेत जेम्सनं पाळला.

विद्यार्थिदशेत Travels in Arabia Deserts, Seven Pillars of Wisdom  यांसारख्या पुस्तकांनी जेम्सला खूप प्रभावित केलं होतं. त्यामुळंच Sultan in Oman  हे एकमेव प्रवासवर्णनात्मक पुस्तक जेम्सनं लिहिलं. शहरांवरील अन्य पुस्तकात त्या जागा व तेथील लोकांची वर्णनं आहेत. मॉरिसला स्वतःला प्रवासवर्णनलेखिका म्हणवून घेणं आवडत नसे. अरब जगतावरचं दुसरं पुस्तक Market of Seleukia  हे शीर्षक एका ग्रीक कवितेतून घेतलं आहे. या पुस्तकामध्ये एक देव बाजारात मौजमजा, फसवणूक करण्यासाठी येतो, अशी कल्पना आहे. वार्ताहर म्हणून असलेला अनुभव तसंच लष्कर व कैरोतील न्यूज एजन्सीचे अनुभव यातून त्याला ही कल्पना सुचली. इजिप्तच्या नासरभोवती अख्खं अरब जग फिरत असे. इतर अनेक देशांचे हितसंबंध त्यात गुंतलेले होते. आजच्या तेथील समस्यांचे मूळ या सर्वांत आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी जेम्सनं संपूर्ण मध्य-पूर्व हिंडून पालथी घातली होती. लेबनॉन हा सावकारांचा (मनी लेंडर्स) देश आहे, असं मॉरिस म्हणत असे. या सगळ्या वर्णनातून जेम्सला ज्यूंपेक्षा अरबांबद्दल अधिक सहानुभूती असल्याचं दिसून येतं.

मॉरिसची व्हेनिस, ट्रिस्टी (Trieste)  ही पुस्तकं गाजली. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ट्रिस्टी हे व्हेनिससारखं नेहमी ओठावर येणारं शहर नाही. पण 1914 मध्ये फ्रान्झ फर्डिनंड व त्याची पत्नी सोफी यांची हत्या झाल्याच्या  घटनेमुळं पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्यांची अंत्ययात्रा ट्रिस्टीमधून गेली होती. हे शहर कधी युरोपातील ह्या राज्याला, तर कधी त्या राज्याला जोडलं जाई. अखेरीस ते इटलीला जोडलं गेलं. त्या शहरात फिरताना हे शहर कोणत्या देशात आहे, हे इटलीतील 70 टक्के लोकांना माहीत नसल्याचं जेम्सला आढळलं. 1960 मध्ये प्रसिद्ध झालेलं ‘व्हेनिस’ अधिक लोकप्रिय असलं, तरी जेम्सला स्वतःला ‘ट्रिस्टी’ जास्त आवडत असे. व्हेनिस हे बोटींचं व होड्यांचं शहर आहे. व्हेनिस 15 शतकांपूर्वी समुद्रातून निर्माण झालं. व्हेनिस पाण्याखाली जाण्याची भीती 1966 मध्ये निर्माण झाली होती. पण पाण्याखाली प्रचंड मोठाले अटकाव निर्माण करून व्हेनिस बुडू दिलं नव्हतं. जॅननं 2015 मध्ये व्हेनिसला परत भेट दिली, तेव्हा तिला ते शहर आपलं वाटलं नाही.

मॉरिसनं जगातील जवळजवळ सर्व मोठ्या शहरांना भेटी देऊन तेथील लोकांचं व तेथील प्रमुख स्थळांचं वर्णन केलं आहे. त्याखेरीज जगभरात चाललेल्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांचं वार्तांकनही तिथं प्रत्यक्ष जाऊन केलं आहे. फ्रॅन्सिस गॅरी पॉवर्सचा खटला मॉस्कोत चालला होता. (तो अमेरिकेच्या हेरगिरी करणाऱ्या विमानाचा पायलट होता.) चे गेवारा या क्रांतिकारक नेत्याची मुलाखत मॉरिसनं क्युबामध्ये जाऊन घेतली. त्याचं वर्णन तिनं as sharp as cat  असं केलं आहे. मॉस्कोत मॉरिसनं गाय बर्जेस या ब्रिटिश हेरखात्यातील दोषी माणसाची भेट घेतली. इस्रायलमध्ये ॲडॉल्फ इचमन (Eichmann)  ह्या नाझी गुन्हेगाराच्या खटल्याचं वार्तांकन करताना मार्मिक विनोदाचा वापर केलेला दिसतो. लाखो ज्यूंना मारण्यात त्याचा हात असल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हिरोशिमालादेखील जेम्सनं भेट दिली होती.

जेम्सनं हाती घेतलेला सर्वांत मोठा प्रकल्प म्हणजे Pax Britanica  हा तीन खंडांत लिहिलेला ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास होय. जेम्सच्या दृष्टीनं इतिहास म्हणजे एक प्रकारचं कथाकथन होय. महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव ते विन्स्टन चर्चिलच्या निधनापर्यंतच्या ब्रिटिश साम्राज्याच्या काळाचं त्यात वर्णन आहे. त्यात हीरकमहोत्सवाचा प्रारंभ, त्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये खास निर्माण केलेलं तार ऑफिस व ठरलेल्या वेळी बटण दाबून जगभर दिलेला महोत्सवाचा संदेश- या सगळ्याचं वर्णन आहे. पण त्याचबरोबर व्हिक्टोरिया राणीला हे साम्राज्य अभेद्य वाटत असलं आणि ते तिनं मिळवलं याचा तिला अभिमान वाटत असला, तरी काबीज केलेल्या सर्व देशांत दडपशाहीचा वापर करून, लष्करी बडगा दाखवून ते देश ताब्यात घेतले आहेत याचीही नोंद मॉरिसनं केली आहे. तसेच सॅलिस्बरी, ऱ्होड्‌स, लॉर्ड किचनेर, जोसेफ चेंबरलेन यांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. ब्रिटिश साम्राज्यवाद एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरत चालला असल्याचं विधान ग्लॅडस्टोननं केलं होतं. ब्रिटिश साम्राज्यात भारत हा मोठा देश असल्यानं साहजिकच भारतानं त्यात बरीच जागा व्यापली आहे. प्रकल्पाला जेम्स या नावानं सुरुवात केली तरी प्रकल्पाच्या शेवटी तिनं जॅन हे नाव धारण केलं होतं.

जेम्सनं 1957 मध्ये South African Winter  या पुस्तकात त्रिभाजित आफ्रिकेचं आणि द्विधा मनःस्थितीतील जोहान्सबर्गचं वर्णन केलं आहे. आफ्रिकेतील या भटकंतीत जेम्सची गाठ एक मांत्रिकाशी पडली. तेव्हा त्यानं जेम्सला ‘तुझ्यात आमूलाग्र बदल घडून येईल आणि पूर्वीचं सगळं बदलून जाईल, सगळे त्रास (डोकं दुखणं वगैरे) नाहीसे होतील’ असं भविष्य वर्तवलं होतं. जगभर भविष्य वर्तवणारे लोक प्रश्नकर्त्यांना हवं तेच उत्तर देतात, असं मॉरिसनं नमूद केलं आहे. जेम्सच्या मनीची इच्छा दुभाष्यामार्फत मांत्रिकापर्यंत कशी पोहोचली असेल, असा वाचकाला प्रश्न पडतो.

मॉरिसनं वृत्तपत्रातील वार्ताहर म्हणून काम करणं 1960 च्या सुमारास सोडून दिलं. जगभर भटकंती करून विविध देश व शहरे पाहिली. थोडक्यात, फिरस्त्याचं जीवन स्वीकारलं. फिरणं, लेखन करणं, पुनश्च भटकंतीसाठी बाहेर पडणं- असा जीवनक्रम जेम्सनं स्वीकारला. अख्खा स्पेन 1963 मध्ये पिंजून काढला. संपूर्ण देशावर लिहिलेलं  The Presence of Spain  हे एकमेव पुस्तक. अपवाद- तिनं नंतर लिहिलेल्या वेल्सवरील पुस्तकांचा. स्पेनच्या बासिलिकातील ब्राँझचे चार घोडे जेम्सला फार आवडत. इतकंच नव्हे, तर उजवीकडून दुसऱ्या घोड्याचं खिंकाळणं ऐकू येणारा जेम्स हा एकमेव प्रवासी असावा. जेम्स अज्ञेयवादी असूनही त्याला चर्च पाहण्यात रस असे. स्पेनमधील टोलेडो येथील कॅथेड्रल म्हणजे ख्रिश्चन संस्कृतीचे यशोगीत आहे, असं जेम्सला वाटत असे. जॅननं 1983 मध्ये चीनला प्रथमच भेट दिली. बीजिंगच्या तिआनमेन चौकात उभं राहिल्यावर तेथील अत्याचार आठवून उबग आणणारी एक इच्छा सफल झाल्याचं समाधान मिळालं, असं तिनं म्हटलं आहे.

तिचं Last Letters from Hav  हे पुस्तक 1985 मध्ये प्रसिद्ध झालं. हाव हे संपूर्णपणे काल्पनिक शहर होतं. आपल्या पुस्तकात भूमध्य समुद्रापलीकडचं हे शहर असल्याचा उल्लेख तिनं केला आहे. त्या शहराला मार्को पोलो, इब्न बतुता, टी.ई.तॉरेन्स, ॲडाल्फ हिटलर यांनी भेटी दिल्याचा उल्लेख त्यात केला आहे. अल्बर्टो मॅन्युएल व जिआनिनी गुडालुपी यांच्या काल्पनिक स्थळांच्या कोशात त्याचा उल्लेख केलेला आहे. हे शहर नकाशात सापडत नसल्यामुळं अनेकांनी जॅनवर पत्रांचा मारा केला होता. इतिहास लेखन असो वा शहरांची वर्णने असोत, तिची लेखनपद्धती पारंपरिक नव्हती. त्यातच तिचं वेगळेपण होतं.

वयाच्या 46 व्या वर्षी (1972 मध्ये) मोरोक्कोतील कॅसाब्लँका शहरामधील डॉ. जॉर्जेस ब्यूरो (Burou)  यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया व त्याआधीची औषधोपचार योजना यशस्वीरीत्या पार पाडली आणि जेम्स मॉरिसची जॅन मॉरिस झाली. ह्या सगळ्याबद्दल तसंच त्याबाबतच्या लोकांच्या व कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांबद्दल जॅननं Conundrum  पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. ते एक प्रकारे तिचं आत्मचरित्रच आहे. काहींनी त्यावर टीका केली. मात्र एलिझाबेथ व मुलांनी तिला चांगला पाठिंबा दिला. ब्रिटिश कायद्यानुसार समलिंगी जोडप्यांना मान्यता नसल्यामुळं जेम्सला एलिझाबेथशी घटस्फोट घ्यावा लागला. जॅननं लिहिलं आहे, ‘हा अनुभव आश्चर्यकारक तर होताच’ पण मनाला शांतता देणाराही होता. नको असलेलं शारीरिक ओझं दूर करता आलं. औषधोपचारप्रक्रिया चालू असताना काही काळ ऑक्सफर्डमध्ये स्त्री म्हणून तर वेल्समध्ये चार मुलांचा बाप म्हणून पुरुषवेषात वावरावे लागत होते’, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर जॅन व एलिझाबेथ लीगल पार्टनर म्हणून शेवटपर्यंत एकत्र राहिले. एकत्र प्रवास केला.

नंतरच्या काळात मूळ इंग्रज असलेल्या जॅनला वेल्सबद्दल अधिक प्रेम व आपुलकी वाटू लागली. प्रिन्स ऑफ वेल्स या बिरुदाची निरर्थकता तिच्या लक्षात आली. वैयक्तिक रीत्या कोणत्याही इंग्लंडच्या राजपुत्राबद्दल तिला आकस नव्हता; पण इंग्रजी व वेल्स ह्या दोन्ही भाषा अगदी भिन्न आहेत. प्रिन्स ऑफ वेल्सला वेल्स भाषा येत नाही. त्याचं निवासस्थान वेल्समध्ये नाही. कधी तरी इंग्लंडचं जोखड फेकून वेल्स स्वतंत्र होईल, असा विश्वास तिनं आपल्या वेल्सवर लिहिलेल्या पुस्तकातून वेल्सचा इतिहास सांगताना व्यक्त केला आहे. इंग्लंड वा इंग्रजी भाषा तिला शत्रू वाटत नाही, पण ओढा मात्र वेल्सकडे आहे.

वयानुरूप जॅनलाही काठी घेऊन चालावं लागलं. भ्रमंती हळूहळू कमी झाली. एलिझाबेथला अल्झायमरनं ग्रासलं. मात्र जॅननं तिची साथ सोडली नाही. एकदा ब्रेकफास्टचा ट्रे जॅनच्या हातून पडला, त्यातील वस्तू सांडल्या-फुटल्या. एलिझाबेथ चटकन पुढे झाली अन्‌ तिनं सगळं स्वच्छ केलं. जॅननं एलिझाबेथला ‘तू चटकन किती छान सांभाळून घेतलंस’ असं म्हणेपर्यंत एलिझाबेथला आपण काय केलं ते लक्षातच राहिलं नव्हतं. जॅनला आत्मचरित्र लिहावंसं वाटत नव्हतं. मात्र तिचे प्रकाशनसंबंधी व्यवहार सांभाळणाऱ्या डेरेक जोन्सला (Derek Johns)  तिनं तिचं वाङ्‌मयीन चरित्र लिहिण्याची परवानगी दिली. त्याचं पुस्तक Ariel  शीर्षककानिशी प्रसिद्ध झालं आहे. तिला अनेक मानसन्मान व पारितोषिकेही मिळाली. तिची विविध प्रकारची सुमारे 50 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. विपुल लेखन करणारी ही लेखिका 20 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या लेखनाचा ठसा जनमानसावर उमटवून काळाच्या पडद्याआड गेली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके