डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

युनिव्हर्सिटीच्या सांस्कृतिक संवादाच्या स्पिरिटविरुद्ध जाणारी प्रथा म्हणजे विविध देशांचे स्वातंत्र्यदिन किंवा सांस्कृतिक उत्सव राष्ट्रवादाच्या भावनेने आणि आक्रमक पद्धतीने साजरे करणे. लष्करी संचलने आणि राष्ट्रध्वज यांचे फोटो, देशभक्तीपर घोषणा यामुळे दक्षिण आशियाई मानसिकता तयार होण्यास अडथळेच येतात. म्हणजे, त्या-त्या देशांचे स्वातंत्र्यदिन साजरे करू नयेत, असे मला मुळीच म्हणायचे नाहीये; ते साजरे करण्याची पद्धत बदलायला हवी, इतकेच.  

सार्क युनिव्हर्सिटीतील माझ्या दिवसांविषयी लिहायचे म्हणजे मला माझे इथले ॲकॅडमिक क्षेत्रातले प्रयत्न, विविध संस्कृतींमधील संवाद आणि अस्मितेतील परिवर्तन यांवर लिहावे लागेल. माझा जन्म अफगाणिस्तानात एका मध्यमवर्गीय ताजिक कुटुंबात झाला. माझ्या वाढीच्या काळात सभोवती यादवी युद्धाचे आणि तालिबानविरोधी वातावरण होते. मी काबुल विद्यापीठातून ‘राज्यशास्त्र आणि कायदा’ या विषयात पदवी घेतली. सार्क युनिव्हर्सिटीत येण्यापूर्वी सुमारे सात महिने मी काबुल विद्यापीठाच्या ‘नॅशनल सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’मध्ये काम केले. ज्ञानसंपादन ही माझी केवळ साधी इच्छा नव्हती, तर ती माझी पॅशन बनली होती. पुढील अभ्यासासाठी युनिव्हर्सिटी निवडताना मी युनिव्हर्सिटीचे रँकिंग बघण्याव्यतिरिक्त, युनिव्हर्सिटीतील अभ्यासाची दिशा आणि सांस्कृतिक संवेदनशीलता याकडेही लक्ष देत होतो. स्कॉलरशिपसाठी शोध घेताना मला सार्क स्कॉलरशिपची माहिती मिळाली.

सार्क युनिव्हर्सिटी एक आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी आहे आणि अफगाणिस्तानचाही तिच्या स्थापनेत सहभाग आहे. म्हणून मला वाटले, सार्क युनिव्हर्सिटीपेक्षा चांगला पर्याय माझ्यासाठी असू शकत नाही. ह्या युनिव्हर्सिटीचा फोकस संकुचित राष्ट्रीयतेच्या पलीकडे जाणारा तर आहेच, पण ही युनिव्हर्सिटी येथील (दक्षिण आशियाई) स्थल-कालाशी संवेदनशील असेल असे वाटले. मला २०११ मध्ये एम.ए. IR साठी प्रवेश मिळाला. IR डिपार्टमेंटची आमची ती स्वत:च्या धारणांवर पहिलीच बॅच होती. २०१३ मध्ये एम.ए. पूर्ण होताच मी पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला.

‘प्रवासामुळे माणसे समृद्ध होतात’ अशा आशयाची एक पर्शियन म्हण आहे. माणसे वैविध्यपूर्ण वातावरणात राहून जास्त ‘सोशल’ बनतात. कुटुंबापासून दूर राहणे आणि ‘इतर’ समाजांतील व्यक्तींशी संपर्क यामुळे स्वतःविषयी, स्वतःचा समाज आणि संस्कृतीविषयी अधिक मोकळेपणे विचार करू लागतात. स्वत:च्या देशाच्या बाहेर राहावे लागल्याने इतरांच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहणे शक्य होते. सार्क युनिव्हर्सिटीत आल्यामुळे मी घरापासून पहिल्यांदाच दूर राहणार होतो. इथे अफगाण समाज आणि तिथले राजकारण याविषयी मित्रांशी चर्चा केल्यामुळे मला स्वतःच्या अफगाणिस्तानविषयक धारणांवर पुनर्विचार करता आला.

सार्क युनिव्हर्सिटीत आणि भारतात गेली साडेतीन वर्षे राहिल्याने मला दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक वैभवाची जवळून ओळख झाली. खरे तर, सार्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकणे म्हणजे आव्हाने, संधी आणि अनुभव यांचा संगम होय. दिल्लीत २०१० मध्ये स्थापन झालेली सार्क युनिव्हर्सिटी अगदी नवी युनिव्हर्सिटी आहे आणि तिचे स्वतःचे काही खास असे प्रश्न आहेत. मी ज्या दिवशी अफगाणिस्तानमधून भारतात आलो आणि सार्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला, त्या दिवशी मला कॉमन रूममध्ये एक बेड दिला गेला. ती रूम दहा जण शेअर करीत होते, हे पाहून मला धक्काच बसला. तेव्हा सार्क युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या जुन्या जागेत होती. काही दिवसांनी (आमचे होस्टेल म्हणून) आम्हाला विमानतळाजवळच्या ‘सेन्टॉर हॉटेल’मध्ये हलवण्यात आले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पूर्ण वर्षभर राहणे हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता.

सेंटॉरमध्ये एक पारंपरिक हिंदू मुलगा माझा रूममेट होता. तो रोज सकाळी नेमाने पूजा-अर्चा करीत असे. पण मी मुस्लिम असलो तरी त्यामुळे आमच्या संबंधांत कोणताही अडथळा आला नाही. आम्ही एकमेकांचा धर्म आणि संस्कृती समजावून घेत एकमेकांपासून शिकलो. खुशवंतसिंग आणि रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके मी पहिल्यांदा इथेच वाचली. तसेच ‘द लीजंड ऑफ भगतसिंग’ (हिंदी), रवींद्रनाथांच्या कादंबरीवर आधारित ‘घरे बाईरे’ (बंगाली), ‘काठमांडू’ (नेपाळी) आणि ‘खुदा के लिये’ (पाकिस्तानी) असे सिनेमे पण एन्जॉय केले. अफगाणिस्तानवर आधारित ‘द काईटरनर’सारख्या कादंबऱ्या वाचणे किंवा काबुली कीड, ओसामा यांसारखे सिनेमे पाहणे माझ्या इथल्या मित्रांना आवडते.

हैदराबाद, राजस्थान, जुनी दिल्ली आणि आग्रा यांसारख्या ठिकाणी गेल्यावर मला पर्शियन संस्कृतीच्या खाणाखुणा नजरेस पडल्या. तसेच इथल्या इस्लामिक वास्तूंमध्ये पर्शियन कविता कोरलेल्या सापडू शकतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जगभर एक प्रकारचे सपाटीकरण होत आहे, मॅकडोनाल्डसारख्या फास्ट फूडचे आक्रमण होत आहे. पण मी दिल्लीत मात्र दक्षिण आशियाई खाद्यसंस्कृतीचे वैविध्य अनुभवत होतो. मुघलाई जेवण हे दक्षिण आशियातील खाद्यसंस्कृतीच्या मिलाफाचे उत्तम उदाहरण होय. मुघल हे मध्य आशियातील ‘खोरासन’ प्रदेशातले. साम्राज्यभर पसरलेले मुघल जेवण हे मध्य आशियाई आणि उत्तर भारतीय जेवण यांच्या संयोगातून तयार झाले आहे. चिकन टिक्का आणि बिर्याणी यांसारखे मुघलाई पदार्थ, नेपाळी मोमो, पंजाबी छोले-भटुरे आणि काश्मिरी रोगन जोश हे माझे आवडते पदार्थ होते.

आता माझ्या भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन, बांगलादेशी, नेपाळी मित्रांना अफगाण जेवण आवडू लागले आहे. कबाब आणि काबुलीचे वेगवेगळे प्रकार; मंटू, अशक आणि बुलानी हे लोकप्रिय अफगाण पदार्थ, असे सर्व वैविध्यपूर्ण प्रकार आमच्या मेसमध्ये मिळावेत इतके आमचे भाग्य नव्हते. त्यामुळे एक अफगाण म्हणून मला युनिव्हर्सिटीच्या मेसमध्ये खाणे हे एक आव्हानच वाटत होते. तिखट भारतीय भाज्या आणि वरणाच्या (उत्तर भारतीय ‘दाल’) प्रकारांनी आमचा खाण्याचा उत्साहच कमी झाला. एका आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीमध्ये विविध प्रदेशांतील खाद्यपदार्थ मिळणे अपेक्षित असते. चवीबदल आणि अफगाण जेवणाची लज्जत यासाठी मी कधी कधी दक्षिण दिल्लीतील लाजपतनगर भागात जेवायला जात असे. (लाजपतनगरमध्ये १९८० च्या दशकापासून मोठ्या प्रमाणावर अफगाण निर्वासित वसलेले आहेत.) चांगल्या आठवणींचा विचार करायचा झाल्यास, सार्क युनिव्हर्सिटीमध्ये एकत्रितपणे साजरे होणारे सांस्कृतिक उत्सव नजरेसमोर येतात. अफगाण नवे वर्ष (नवरोज), मुस्लिमांचा ईद, हिंदूंची दिवाळी आणि मातृभाषादिन (२१ फेब्रुवारी) इ. साजरे करण्यासाठी सर्व विद्यार्थी सहभागी होत असत.

‘कल्चरल नाईट’मध्ये दक्षिण आशियाच्या पारंपरिक वेशभूषा, संस्कृती, नेपाळी लोकनृत्य, उर्दू आणि पर्शियन कविता, हिंदी आणि बंगाली गाणी, ‘कर्सक’ नावाचे अफगाण नृत्य वगैरेंचा समावेश असायचा. संगीताचा ठेका आणि वर्तुळाकार नृत्य यामुळे ‘कर्सक’ला युनिव्हर्सिटीमध्ये फारच लोकप्रियता लाभली. वर्गमित्रांचे आणि इतर जवळच्या मित्रांचे वाढदिवस साजरे करणे ही दुसरी एक प्रथा युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाली आहे.  युनिव्हर्सिटीच्या सांस्कृतिक संवादाच्या स्पिरिटविरुद्ध जाणारी प्रथा म्हणजे विविध देशांचे स्वातंत्र्यदिन किंवा सांस्कृतिक उत्सव राष्ट्रवादाच्या भावनेने आणि आक्रमक पद्धतीने साजरे करणे. लष्करी संचलने आणि राष्ट्रध्वज यांचे फोटो, देशभक्तीपर घोषणा यामुळे दक्षिण आशियाई मानसिकता तयार होण्यास अडथळेच येतात. म्हणजे, त्यात्या देशांचे स्वातंत्र्यदिन साजरे करू नयेत, असे मला मुळीच म्हणायचे नाहीये; ते साजरे करण्याची पद्धत बदलायला हवी, इतकेच.

सार्क युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय आणि अभ्यासपूर्ण वातावरणात असे दिवस वेगळ्या पद्धतीने साजरे व्हायला हवेत. वसाहतवादाचे आपल्या प्रदेशावर झालेले परिणाम किंवा स्वातंत्र्याचे महत्त्व यांसारख्या विषयांवर युनिव्हर्सिटीमध्ये या निमित्ताने चर्चा घडवून आणता येतील. सार्क युनिव्हर्सिटीत राहताना माझी आर्थिक बाजू कायम तणावाची राहिली आहे. शिक्षक आणि प्रशासनातल्या लोकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पगार मिळतात. परंतु मुलांचे राहणीमान आणि स्कॉलरशिपची वेळ येते; तेव्हा सार्क युनिव्हर्सिटी आंतरराष्ट्रीय तर राहूच देत, पण राष्ट्रीय निकषांवर पण उतरत नाही. दिल्लीत राहण्याचा खर्च लक्षात घेता पीएच.डी.च्या मुलांना साडेबारा हजार रुपये आणि एम.ए.च्या मुलांना सात हजार या रकमा जेवण-प्रवास- कपडे यांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यासही पुरेशा नाहीत. रिसर्चसाठीचा खर्च तर इथे गृहीत धरलेलाच नाही. माझी आता पीएच.डी. चालू आहे.

सार्क युनिव्हर्सिटीमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात आणि दृष्टिकोनात पडलेला फरक मला स्पष्टपणे जाणवतो. इथे मला केवळ चांगला अभ्यास नव्हे, तर एकूण जीवनपद्धती आणि संस्कृतीचा अनुभव मिळाला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत मी सार्क युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो, रडलो, प्रेम केले, ओरडलो आणि एका शांत-सहिष्णु दक्षिण आशियाचे स्वप्न पाहिले!

ओमरने International Relations मध्ये एम.ए. (२०११-१३) केले असून, तो सध्या सार्क युनिव्हर्सिटीत ‘अफगाणिस्तानातील बहुसांस्कृतिकता’ या विषयावर पीएच.डी. करीत आहे

Tags: सार्क विद्यापीठ ओमर सद्र culture afganistanatil bahusanskrutikta phd saarc university punarvichar karta ala afganistan omer sadr weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके