डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उस्मानाबाद जिल्हा साहित्य संमेलन : भारत सासणे यांचे अध्यक्षीय भाषण

मराठीमध्ये अलीकडल्या वीस-पंचवीस वर्षांच्या कालावधीत काही वाद खेळले गेले आहेत. शहरी आणि ग्रामीण साहित्याचा असा एक वाद आहे. काही एक अभिनिवेशाने हा वाद कुठेतरी निर्माण करण्यात आला आणि मराठवाड्याच्या भूप्रदेशातून खेळला गेला. मात्र या वादातून मराठी साहित्याला निश्चित अशी उंची मिळाली, असे मात्र म्हणता येत नाही. ज्याला नागर जीवनाचे आकलन होत जाते, त्याला ग्रामीण जीवनाचे आकलन होणे अशक्य नसते. फरक तपशिलाचा व त्याहीपेक्षा आंतरिक करुणेचा आहे.

उस्मानाबाद जिल्हा पातळीवरचे साहित्य संमेलन आज भरते आहे. या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून आपण मला निवडलेत याबद्दल मी आपला आभारी आहे. आजच्या दिवसात सात परिसंवाद होतील, विद्वान रसिकांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील, ही एक चांगली पर्वणी आहे.

जिल्हा पातळीवरच्या साहित्य संमेलनाची काय आवश्यकता आहे, असा एक प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो. या प्रश्नावर पूर्वी काही वेळा चर्चा झालेली आहे. उस्मानाबादसारख्या छोट्या-छोट्या ठिकाणी राहणाऱ्या रसिक नागरिकांना चांगल्या सांस्कृतिक वातावरणाची तहान असते. चांगले ऐकायला मिळावे, चांगले पाहायला, वाचायला मिळावे असे त्यांना वाटत असते. अशी संमेलने, चांगले सांस्कृतिक वातावरण निर्माण करू शकतात, त्या दृष्टीने अशा संमेलनांचे महत्त्व आहे.

संमेलनाध्यक्षाने अध्यक्षीय भाषणातून काही चिंता व्यक्त करावी, असा प्रघात आहे. ही चिंता प्रामुख्याने ‘भाषे’च्या अवहेलनेबाबत असते. असली व्यर्थ चिंता न बाळगता, काही एक ठोस अशा चिंतनावर भर देणे गरजेचे आहे.

मराठवाड्यातला उस्मानाबाद हा एक जिल्हा. औद्योगिक इत्यादी दृष्टीनेही हा जिल्हा प्रगत नाही, टंचाई आणि दुष्काळ या जिल्ह्याला नवा नाही, त्यातून भूकंपाचा तडाखा या जिल्ह्याला बसलेला. सांस्कृतिकदृष्ट्या हा जिल्हा तसा समृद्ध म्हणता येणार नाही. अर्थात दासबोधाची मूळ प्रत याच जिल्ह्यात दाखवितात आणि समर्थांचे हस्ताक्षरही याच जिल्ह्यात आहे, मात्र आजचे कितीतरी लेखक आणि साहित्यिक या भूप्रदेशातून बाहेर गेलेले आहेत. बाहेर गेल्यानंतर हे लेखक नावारूपाला आलेले दिसतात. या जिल्ह्यातून मात्र साहित्यनिर्मितीसाठी पोषक व अनुकूल असे वातावरण निर्माण होताना दिसत नाही. यामागचे कारण शोधले पाहिजे. एका बाजूने काहीएक लिहिणारी मंडळी अशा जिल्ह्यातून सतत अस्तित्वात असतात आणि दुसऱ्या बाजूने मात्र पोषक वातावरण नसते, असा अंतर्विरोध दिसून येतो. अशाच कुंठित रसिक कलावंतांच्या इच्छेतून असे छोटे छोटे उपक्रम होत असतात. मोठ्या शहरातून साहित्यनिर्मितीसाठी पोषक वातावरण असते; असा मात्र याचा अर्थ नाही. पोषक अनुकूल वातावरण असो किंवा नसो, एकूणच व्यापक शोध घेतला- तर सकस, जीवनवादी, सर्वव्यापी, साहित्य भोवताली निर्माण होताना दिसत नाही. ज्या भूप्रदेशात आपण राहतो आणि ज्या प्रदेशाची चिंता वाहतो त्या प्रदेशातून असे साहित्य का निर्माण होत नाही, याचा शोध आपण घेतला पाहिजे.

माझे असे निरीक्षण आहे की, गेल्या काही दशकांपासून प्रदेशवादांनी बराच अनर्थ घडविलेला आहे. प्रदेशवादी दृष्टिकोन नवोदित साहित्यिकाला व्यापक भूमिका घेऊ देत नाही. अनुभवाची आणि विचारसरणीचीसुद्धा व्याप्ती प्रदेशवादी वाढवू देत नाहीत. परिणामतः प्रदेशवादाच्या आणि प्रदेशवाद्यांच्या प्रभावाखाली आलेले साहित्य, संकुचित आणि खुरटे होताना दिसत आलेले आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो आणि जगतो, त्या प्रदेशाचे आकलन बाहेरच्या परिघात आणि एकूणच परिघाबाहेर गेल्याशिवाय होत नसते. दरम्यानच्या काळात प्रदेशवादी आपली विशिष्ट विचारसरणी निश्चित करून बसलेले असतात आणि त्यांनी निर्माण केलेले वाद, अनेक चांगल्या साहित्याच्या आणि स्वागतशील निर्मितीच्या शक्यता संपुष्टात आणत असतात. असल्या वादातून व्यापक, जीवनवादी आणि सर्वस्पर्शी साहित्य निर्माण होण्याची शक्यता नसते, असे उशिराने प्रदेशवाद्यांना जाणवू लागलेले असावे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अस्सल आणि जीवनवादी कादंबऱ्या, कथात्मक साहित्य आणि कविता अभावानेच या भूप्रदेशातून उगवून आलेल्या आहेत. अर्थात मक्तेदारी कोणत्याच भूप्रदेशाची नसते आणि कोणत्याही समूहाची नसते हे खरे असले तरी इथल्या वातावरणातून उत्तम साहित्य का निर्माण झाले नाही, याचा शोध कोणी घेतल्याचे मला ज्ञात नाही. हा चिंतनशील शोध घेतला पाहिजे.

इथल्या भूप्रदेशातून जे काही साहित्य निर्माण झाले, ते प्रामुख्याने प्रतिक्रियेतून निर्माण झालेले आहे. हा भूप्रदेश पुरेसा नागरी नव्हताच. त्यामुळे नागरी साहित्याच्या विरोधात ग्रामीण साहित्याला उभे करण्याचा चळवळीचा प्रयत्न झालेला दिसतो. चळवळीतून आणि तिरस्कारजन्य प्रतिक्रियेतून स्वतंत्र आणि जीवनवादी, तसेच उत्स्फूर्त साहित्य निर्माण होत नाही असा माझा विश्वास आणि अनुभवही आहे. ग्रामीण साहित्य खूप उंचीवर जाते तेव्हा ते ग्रामीण साहित्य राहत नाही, हे प्रदेशवाद्यांना लक्षात न आल्याने त्यांनी चिंतनशील आणि व्यापक साहित्यनिर्मितीच्या शक्यतांची उपासना करू दिलेली नाही असे दिसते. जी मोजपट्टी हातात घेतलेली आहे, त्या मोजपट्टीने विशाल आणि व्यापक जीवनाचे मोजमाप करता येत नाही, हे लक्षात न आल्यामुळे अनेक खुरट्या साहित्यनिर्मितीचे प्रयत्न गेल्या वीस-पंचवीस वर्षांत करण्यात आले आणि काळाच्या ओघात ते नष्टही झालेले आहेत. हे नुकसान कोणीतरी आता तरी नोंदवले पाहिजे.

अशा काही घटना या वीस-पंचवीस वर्षांत या भूप्रदेशात घडत होत्या याची जाणीव समीक्षकांना का झाली नाही, याचा शोधही घ्यावा लागेल. जे लिहिले जाते आहे ते अशक्त आणि खुरटे आहे, हे धारिष्ट्यपूर्वक सांगण्याची इथल्या समीक्षकांना कदाचित गरज वाटलेली नसावी. या भूप्रदेशातील साहित्यकारांची यादी काही वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून वाचायला मिळत असे. अपवाद वगळता बहुतेक नावे केवळ सौजन्यामुळे लिहिली गेलेली असावीत. याही काळात समीक्षकांना, धीटपणाने आणि प्रसंगी कटुता स्वीकारून ही साहित्यिकांची नावे नाहीत, असे सांगितलेले दिसत नाही. समीक्षेच्या क्षेत्रातील ही चलाखी प्रदेशवाद्यांच्या दहशतीमुळे निर्माण झालेली असू शकेल.

या भूप्रदेशाच्या बाहेर जे काही गंभीरपणे लिहिले जात होते, त्याची तरी दखल येथील समीक्षक सजगपणे घेत होते असेही नाही. प्रदेशवाद, आकलनाची आणि क्षमतेची उंची किती कमी करून टाकू शकतो, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.

आपण साहित्यनिर्मितीच्या पोषक वातावरणाच्या शक्यतांबाबत विचार करतो आहोत. आपण साहित्याशी संबंधित नियतकालिके निर्माण करू शकलेलो नाही आणि जी थोडी निर्माण केली ती टिकवू शकलेलो नाहीत. लेखकाला आपले लिखाण कोठेतरी प्रकाशित करावयाचे असते. हे लिखाण मराठी मुलखाच्या काना-कोपऱ्यांत वाचले जावे, असेही त्याला वाटते असते. चांगला वाचकवर्ग मिळविण्याचा लेखकांचा हक्कही असतो आणि इच्छाही! नियतकालिके निर्माण न होणे किंवा ती न चालणे, यांची कारणे प्रामुख्याने आर्थिक आणि व्यावहारिक आहेत. म्हणजेच चांगल्या अर्थकारणाशिवाय चांगले सांस्कृतिक आणि साहित्यिनिर्मितीसाठी उपकारक वातावरण निर्माणच करता येत नाही, असा अर्थ निघू लागला की आपल्याला भीती वाटू लागते. म्हणजेच साहित्यनिर्मितीची प्रक्रिया पुन्हा आपल्या इच्छेविरुद्ध अपरिहार्यपणे धनशक्तीशी जोडली जाऊ लागते. आपण हतबल दिसू लागतो. कथा, कविता आणि कदाचित कादंबऱ्याही छापणारी दर्जेदार नियतकालिके आसपास दिसत नसल्यामुळे नवोदित साहित्यकाराने आपला आविष्कार कोणत्या व्यासपीठावरून करावा, असा प्रश्न पडत राहतो. यावर काही उत्तर अथवा तोडगा अजूनतरी नजरेस पडलेला नाही. 

मराठीमध्ये अलीकडल्या वीस-पंचवीस वर्षांच्या कालावधीत काही वाद खेळले गेले आहेत. शहरी आणि ग्रामीण साहित्याचा असा एक वाद आहे. काहीएक अभिनिवेशाने हा वाद कुठेतरी निर्माण करण्यात आला आणि मराठवाड्याच्या भूप्रदेशातून खेळला गेला. मात्र या वादातून मराठी साहित्याला निश्चित अशी उंची मिळाली, असे मात्र म्हणता येत नाही. ज्याला नागर जीवनाचे आकलन होत जाते, त्याला ग्रामीण जीवनाचे आकलन होणे अशक्य नसते. फरक तपशिलाचा व त्याहीपेक्षा आंतरिक करुणेचा आहे. मनुष्य जीवनाबद्दल ज्याचे आकलन चांगले, त्या करुणावान व चिंतनशील लेखकाला नागरी व ग्रामीण असा फरक करण्यात स्वारस्य नसते. हे तांत्रिक आणि वरवरचे फरक म्हणजे सर्वस्व आहे, अशा आविर्भावात हे वाद खेळले गेले; पण त्यामुळे उत्तम ग्रामीण साहित्य निर्माण झाले असे दिसत नाही.

ज्यांनी उत्तम ग्रामीण साहित्य निर्माण केले आहे, त्यांच्यामध्ये स्वभावतः निर्मितिक्षमता व विलक्षण अशी ओरिजिनॅलिटी असणारच, कथित नागर साहित्य न लिहिण्यामागे त्यांचे केवळ निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे माझे निरीक्षण आहे. म्हणजेच ग्रामीण साहित्य मोठे की नागर साहित्य मोठे, असे व्यर्थ वाद मराठी साहित्याला काही देऊ शकलेले नाहीत हे आतातरी लक्षात घ्यावे.

खेडी वितळून नगरात आणि महानगरांत पसरू लागली आहेत असे म्हणतात. खेडी उद्ध्वस्त आणि नगरे बकाल झाली आहेत असेही म्हणतात. मात्र जीवन झपाट्याने बदलू लागलेले आहे, पण त्याचबरोबर नागरी जीवनदेखील. म्हणून बदलत्या मनुष्यजीवनाची दखल घेणारी उत्तम नागर कादंबरी मराठीत जशी शोधावी लागते आहे, तशीच उत्तम ग्रामीण कादंबरीसुद्धा शोधावी लागते आहे. लिखाण जेव्हा करुणावान होते आणि जगण्याचे आकलन गडद होते, तेव्हा ते लिखाण नागर राहत नाही व ग्रामीणदेखील राहत नाही. व्यर्थ वाद खेळणारांच्या हे लक्षात आले तर बरे होईल. 

ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी यांची पारितोषिके मराठीतील साहित्याला का मिळत नाहीत या बाबत चर्चा होते. या चर्चेतून साहित्यबाह्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अन्य भाषांमध्ये साहित्यकारांची लॉबी आहे, चांगल्या पद्धतीचे सादरीकरण केले जाते, शिफारशी केल्या जातात, मराठीप्रमाणे एकमेकांचे पाय ओढले जात नाहीत, इत्यादी स्वरूपाचे निष्कर्ष या चर्चेतून काढले जातात. मात्र अन्य भाषांमधून जशा कादंबऱ्या आणि कथात्मक साहित्य लिहिले जाते, तसे साहित्य मराठीमध्ये निर्माण होते आहे काय, याची तपासणी व सावध समीक्षा करताना कोणी दिसत नाही. मौलिक, जीवनवादी, विशाल जीवनपट नजरेसमोर ठेवणाऱ्या अनेक पिढ्यांची हकिकत एकाच ताकदीने मांडणाऱ्या विस्तृत कादंबऱ्या मराठीत शोधूनही सापडत नाहीत. कथांबाबतदेखील असेच म्हणता येते. नाटके तर जवळपास संपलेलीच आहेत, कवितेबाबत मात्र आशावादी राहता येणे शक्य आहे. इतका अस्वस्थतेचा, परिवर्तनाचा काळ असूनदेखील श्रेष्ठ आणि उंचीच्या कादंबऱ्या कथा, नाटके मराठीत का निर्माण होत नाहीत, याचा आपण शोध घेतला पाहिजे. 

मराठी साहित्याचा अनुवाद अन्य भाषांतून होताना दिसत नाही. तशी समृद्ध यंत्रणा आपल्याकडे फारशी उपलब्ध नाही. मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषांतून प्रकाशित झाले पाहिजे आणि मराठीने आपले विश्व अधिक व्यापक केले पाहिजे. पण हे कष्टाचे आणि निष्ठेचे काम कोण करणार, असा प्रश्न प्रत्येक वेळेला पडत राहतो. कवितांचा अनुवाद कोणी आणि कसा करावा, हा तर अवघड प्रश्न. कवी ग्रेस यांना अन्य भाषांतून कोण पोहोचते करणार? जी.एं.ना भारतातील अन्य भाषांत पोहोचविण्याचे काम कोण करणार? काही नाटकांचे अनुवाद होताना दिसतात, पण हे काम अपवादाचे म्हणावे लागेल. मराठीतील चांगले साहित्य अनुवादित करण्यासाठी संघटित अशी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.

लेखकाला तो आणि त्याचे लेखन या बाबत नेहमी विचारले जाते. मी का लिहितो, कसा लिहितो, माझ्या लेखनाच्या प्रेरणा काय आहेत, इत्यादी स्वरूपाची उत्तरे लेखकाला नेहमी द्यावी लागतात. मलादेखील अशा स्वरूपाची उत्तरे वेळोवेळी वेगवेगळ्या पीठांवरून आणि वेगवेगळ्या रसिक विद्वानांसमोर द्यावी लागलेली आहेत. या सगळ्यांचा येथे परामर्श घेण्याची आवश्यकता नाही, कारण अशी चर्चा तात्रिक व दार्शनिक होईल आणि हे येथे अपेक्षित नाही. मात्र येथे जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे समाधान केले पाहिजे. काही प्रातिनिधिक स्वरूपातील मुद्दे येथे नम्रपणे नमूद करीत आहे. 

लेखकाला स्वत:च्या व इतरांच्यादेखील छोट्या-मोठ्या लढाया नेहमी लढाव्या‌ लागतात. या लढाया आत्मिक अस्तित्वासाठी लढाव्या लागतात आणि सर्वसामान्य माणसाच्या गरिमेसाठी अस्मितेसाठीही या लढाया लढाव्या लागतात. म्हणून त्या अर्थाने लेखक हा लढवय्या असतो. लेखकाचे लिखाण करुणाजन्य व विवेकनिष्ठ आहे की नाही, यावर त्याच्या साहित्याची उंची अवलंबून असते. ही उंची एका अर्थाने पारमार्थिक लढाईतून साध्य केली जाते. लेखक हा असा पारमार्थिक लढवय्या आहे. 

मी स्वत: सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी मानत आलेलो आहे. त्यामुळे विविध स्तरांवरील मनुष्यजीवनाचे माझ्या लेखनाला आकर्षण आहे. सर्वसामान्य माणसाची कुंठा, त्याच्या वेदना, त्याने चालविलेली जगण्यातली छोटी-मोठी लढाई, त्याच्या भोवतालचे नातेसंबंधांचे जटिल असे जाळे, जीवनातील अतर्क्यता, माणसाचे बुद्धिजन्य दुःख, मनोजन्य दुःख आणि जगण्यातला निर्हेतुक पीडासंभव या सर्वांचा माझ्या लेखणीला विलक्षण असा सोस आहे. म्हणून मी जे लिहितो ते या संदर्भात, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याच्या संदर्भात, त्याच्या वेदनेच्या संदर्भात असते. लेखकाला लेखनामागची अपरिहार्यता अशी स्वीकारावी लागते. 

प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही वावरता तेव्हा तुम्हांला लेखक असण्याची अडचण जाणवते का, आणि लेखक म्हणून वावरताना प्रशासक असण्याची अडचण निर्माण होते का, असा एक नेहमीचा प्रश्न आहे. मराठी साहित्यविश्वातील प्रशासक असलेल्या लेखकांनी या संदर्भात काय उत्तर दिले आहे, हे जिज्ञासूंनी तपासून पाहावे. कदाचित सेतू माधवराव पगडी यांनी किंवा अन्य लेखकांनी या संदर्भात काही सांगितले असेल. माझ्यापुरते बोलावयाचे झाल्यास, मला या दोन्ही भूमिका सहज आणि परस्परपूरक वाटत आलेल्या आहेत. समाजजीवनात प्रशासक म्हणून वावरताना जे अनुभव येतात, ते अनुभव लेखनातील अनुभवाचे विश्व विस्तारित करीत असतात. लेखन करीत असताना, लेखनाचे आलेले अनुभव प्रशासकाला समृद्ध करीत असतात. भेटायला आलेला माणूस काही एक वेदनेचे पर्व घेऊन आलेला असतो. एखादा अर्ज कथा असते तर एखादी संचिका मनुष्यजीवनावर भाष्य करणारी जीवनवादी कादंबरी असू शकते. 'पारधी' या नावाने प्रकाशित झालेले एक निवेदन मी वाचत होतो. त्यामध्ये मी उस्मानाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी असताना, पारधी समाजाला केलेल्या प्रशासकीय मदतीचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. एक लेखक प्रशासनात असे काही रचनात्मक कार्य करू शकत असेल तर अनेक लेखक आपल्या संवेदनक्षम मनासह आणि विवेक करुणेसह, प्रशासनक्षेत्रात आले तर काय होईल, हे सांगण्याची गरज नाही. नेहमी विचारलेल्या प्रश्नांवर माझे असे चिंतन आहे.

ज्या अर्थी मी इतके लिहिले आहे, ज्या अर्थी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मला लाभले आहेत आणि ज्या अर्थी मराठी साहित्यविश्वात मी काही योगदान दिले आहे असा काहींचा समज आहे, त्या अर्थी नवोदित साहित्यिकांना मी काही सांगितले पाहिजे, असा या प्रसंगी आग्रह आहे. त्या अनुषंगाने काही मुद्दे मांडतो.

नवोदित साहित्यिकांनी कोणत्याही मार्गदर्शकाचे काहीही ऐकू नये, ही माझी पहिली सूचना आहे. आपल्या अंतरामध्ये जे काही होकायंत्र दडलेले आहे, त्या होकायंत्राची सुई थरथरून आलेल्या सूचनेला प्रमाण मानून लेखन केले पाहिजे. प्रदेशवाद, साहित्यांतर्गत कप्पे आणि टप्पे, वेगवेगळे इझम्स, वेगवेगळ्या अर्थचळवळी, या सर्वांमुळे चांगला लेखक घडतो असा माझा विश्वास नाही. अर्थातच, या सगळ्यांमुळे श्रेष्ठ अशी कलाकृती निर्माण होते असेही नाही. तुमचे आकलन जितके सखोल, व्यापक होईल, तितके तुमचे लेखन सकस व दर्जेदार होईल. त्यासाठी थांबायला शिकले पाहिजे. वाट पाहण्याची क्षमता स्वत:त निर्माण केली पाहिजे. गुणग्राहकता स्वीकारली पाहिजे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कथित समीक्षक आणि चळवळ चालविणारे कथित साहित्यिक यांच्यापासून नवोदितांनी सावध राहिले पाहिजे आणि स्वत:तली ओरिजिनॅलिटी जपली पाहिजे. लेखन हा व्यक्तिगत प्रवास आहे. हा सामूहिक आविष्कार नाही, कोणत्याही इझमच्या किंवा वादाच्या प्रभावाखाली साधक लेखकाचा आंतरिक प्रवास दूरवर पोहोचू शकत नाही. लेखकाने स्वत:च्या आंतरिक मौनाच्या प्रदेशात राहून उपासना करावयाची असते. तिरस्कारजन्य प्रतिक्रिया-वादातून कोणाच्या तरी विरोधात उभे राहता येते, मात्र स्वत:ची संगत स्वत:लाच सोडावी लागते. स्वपासूनची झालेली ताटातूट जीवनवादी आणि चिंतनशील साहित्यनिर्मितीसाठी कधीच पोषक ठरलेली नाही. काय लिहायचे हे न सांगितले तरी चालेल, पण काय लिहू नका हे मात्र कधीही सांगण्याचा प्रयत्न करू नये, हे प्रदेशवाद्यांना सांगण्यात यावे. या मुद्याच्या संदर्भात मला इतकेच सांगावयाचे आहे.

म्हणजे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबादसारख्या छोट्या छोट्या शहरांतून सांस्कृतिकदृष्ट्या पोषक असे वातावरण कसे निर्माण करता येईल, या संदर्भात चर्चा करता करता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. काही अपेक्षा त्या निमित्ताने व्यक्त केल्या पाहिजेत. विभाग पातळीवर तरी एखादे दर्जेदार नियतकालिक दीर्घ काळ चालवावे. उस्मानाबाद शहरामध्ये जसे साहित्य संमेलन होत आहे, तशी छोटीछोटी संमेलने ठिकठिकाणी भरवावीत. उत्तम साहित्याचा अनुवाद अन्य भाषांमधून प्रकाशित करण्याची यंत्रणा निर्माण करावी. त्याचबरोबर नव्या संवेदना जपणाऱ्या तरुण आणि बुद्धिमान समीक्षकांची फळी निर्माण व्हावी, अशा काही अपेक्षा आहेत. पण येथे या अपेक्षा संपत नाहीत. मी स्वत: चिंतनाअंती साहित्यांतर्गत जीवनवादाकडे पुन्हा पुन्हा येतो. छोटे-मोठे तांत्रिक भेद संपवून टाकणारी, मनुष्यजीवनाला जवळून पाहणारी करुणाजन्य व विवेकपूर्ण कादंबरी याच भूक्षेत्रातून, मराठवाड्यातून निर्माण झाली पाहिजे. कथा व अन्य साहित्यप्रकारदेखील निर्माण झाले पाहिजेत. येथे जमलेल्या आणि याच व्यासपीठावर विराजमान असलेल्या साहित्यिकांकडून मी या अपेक्षा व्यक्त करीत आहे. माननीय रा.रं. बोराडे यांच्याकडून एक महाकादंबरी मला हवी आहे. भास्कर चंदनशीव यांनी बदलत्या ग्रामीण संदर्भाचे विस्तृत लेखन कादंबरीस्वरूपात देण्याचे मान्य केले आहे. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या नव्या आणि सकस कादंबरीची मी वाट पाहतो आहे. वासुदेव मुलाटे यांच्या नव्या आणि पक्क कादंबरीची आवश्यकता आहे. अशाच अपेक्षा येथे जमलेल्या कवींकडूनसुद्धा आणि अन्य साहित्यिकांकडूनदेखील आहेत. येथून कोणी नाटककार पुढे येतो आहे का, याकडेसुद्धा लक्ष ठेवावे लागेल. अशा काही माफक आणि नम्र अपेक्षांसह, या अध्यक्षता भाषणाचा मी समारोप करतो आहे, परंतु जे सांगावयाचे आहे ते सांगून संपणारे नसल्यामुळे, 'सांगावयाचे संपले' असे जाहीर मात्र करता येणार नाही. उत्तम अशी जीवनवादी कादंबरी लवकरच मी लिहून आपल्यासमोर आणीन. कथात्म साहित्याचा परीघदेखील जास्त विस्तृत करीन. असे आत्मविश्वासाचे उद्गार आपल्या साक्षीने, थोड्या धारिष्ट्याने घोषित करावयाचे आहेत.

विभागीय साहित्य संमेलन या नगरीत भरो, अशाही अपेक्षा व्यक्त करतो. उस्मानाबाद जिल्हा साहित्य संमेलनासाठी मला अध्यक्ष या नात्याने आपण निवडले व त्या क्षमतेचा मी आहे असे आपल्याला वाटले, याबद्दल मी आपले व सर्व संबंधितांचे आभार मानतो. धन्यवाद!

Tags: नवोदित साहित्यिक साहित्य निर्मितीची अपेक्षा अविकसित भाग भारत सासणे अध्यक्षीय भाषण उस्मानाबाद साहित्य संमेलन थेट सभागृहातून Novice Literature Expectations of Literature Production Undeveloped Parts Bharat Sasane Presidential Speech Osmanabad Sahitya Sammelan Live from the auditorium weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके