मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात वेगळी मुहूर्तमेढ रोवणाऱ्या हमीद दलवाई यांचा 37 वा स्मृतिदिन येत्या 3 मे रोजी येत आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दरवर्षी एका कार्यकर्त्यास हमीद दलवाई यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार गौसिया सुलताना डिस्कॉटा या गोव्यातील कार्यकर्तीला 3 मे रोजी अहमदनगर येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकात होणाऱ्या कार्यक्रमात, रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते व भाई वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणार आहे. त्या निमित्ताने, हमीद दलवाईंचे व्यक्तिचित्र रेखाटणारा पु.ल.देशपांडे यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत. काळ जसजसा उलटत जाईल तसतसे हमीद दलवाईंच्या कार्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होत जाईल. दोन वर्षांपूर्वी इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या Makers of Modern India या पुस्तकात आधुनिक भारताच्या 23 मानकऱ्यांमध्ये हमीद दलवाई यांना स्थान दिले आहे. -संपादक
आगरकरांना ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हटले जाते. हमीद दलवाई हा ह्या महाराष्ट्रातला असाच देव न मानणारा देवमाणूस. पण ‘देव न मानणे’ हे हमीदला मात्र आगरकरांहून अधिक धोक्याचे होते. तो ज्या मुसलमान धर्मात जन्माला आला होता, त्यात हिंदूंसारखी उदारमतवादी परंपरा नाही. आगरकरांना सनातन्यांचा विरोध झाला, तरी त्यांच्या मताला पाठिंबा देणारेही हिंदू होते. हमीदचा लढा हा मुसलमानी समाजात अभूतपूर्व होता. आजदेखील बॅरिस्टर छगलांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सर्वार्थाने इहवादी आणि उदारमतवादी माणसे वगळली, तर हमीदच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे- तो बहुसंख्य मुसलमानांच्या हिशेबी ‘काफिर’ होता. त्याला काफिर मानत नव्हत्या फक्त धार्मिक रूढींच्या जाचाखाली रगडल्या जाणाऱ्या त्या दुर्दैवी मुसलमान भगिनी. ‘तलाक’पद्धतीमुळे ज्यांच्या आयुष्याचा पालापाचोळा होत होता, अशा भगिनींना त्यांची दु:खे जाणणारा एक भाऊ लाभला होता. त्या जाचातून मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणारा भ्राता उभा राहिला होता. माणुसकीचे प्राथमिक अधिकार ज्यांना घरातही नाहीत आणि घराबाहेरही नाहीत, अशा अवस्थेत जगण्याचे भोग ह्या देशातल्या मुसलमानच नव्हे; तर असंख्य स्त्रियांच्या नशिबाला लागलेले आहेत.
खुद्द दलित समाजातील पुरुषदेखील त्यांच्या स्त्रियांना प्रतिष्ठेने वागवत असतात, असे नाही. ह्या देशातल्या बहुतांश स्त्रियांचे जगणे म्हणजे नाना प्रकारच्या खस्ता काढीत पिचत-पिचत एके दिवशी मरून जाणे, एवढेच आहे. ते मरण जिला लवकर येईल, ती स्त्री भाग्यवान. मृत्यूनेही उशीर लावला, तर त्या दुर्भाग्याला सीमा नाही. ‘धर्म’, ‘मजहब’ या नावाखाली अनेक अदृश्य लटकत्या तलवारी असंख्य अभागी जिवांच्या मस्तकांवर ते जीव केवळ स्त्रीदेहाने ह्या जगात आले म्हणून शतकानुशतके टांगलेल्या आहेत. दुर्भाग्याची प्रत निराळी, पण त्यातून कुठल्याही धर्मातली स्त्री सुटलेली नाही. हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दु:ख जाणवले होते, असे नाही; फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दु:खांना कुठे वाचाच फुटत नाही; ती फोडायला कुणी धजावत नाही ह्याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाच्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती. हिंदू स्त्रीला निदान निसर्गाने बहाल केलेली मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश तरी नाकारला जात नव्हता; मुसलमान स्त्रीला तोही नाकारलेला. अपवाद फक्त नियम सिद्ध करण्यापुरते आणि ह्या साऱ्या रूढी पुरुषांची सोय व्हावी, म्हणून.
हिंदू समाजातही अनेक अनिष्ठ रूढी आहेत; परंतु त्या रूढी नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य देणारे समाजसुधारक हिंदू समाजात वेळोवेळी निघाले. धर्मांधांची दहशत नव्हती, असे नाही. आजही ‘एक गाव : एक पाणवठा’ चळवळीत काम करणाऱ्यांना त्या दहशतीचा अनुभव येतो. परंतु अनिष्ठ रूढी नाहीशा करू पाहणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याची हिंमत आता तथाकथित हिंदू धर्मगुरूंच्यातही राहिलेली नाही; पण मुसलमान समाजातील धर्मसत्तेचे बळ अजूनही टिकून आहे. धर्मसुधारणेचा प्रत्येक प्रयत्न सर्व प्रकारच्या शक्ती पणाला लावून हाणून पाडला जातो, अशी आजही तिथे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच राजा राममोहन रॉय यांच्यापासून ते फुले-आगरकरांपर्यंत समाजसुधारकांची आणि त्या सुधारणांचा कालांतराने का होईना, परंतु स्वीकार करणाऱ्यांची हिंदूंच्यात जशी परंपरा निर्माण झाली; तशी भारतीय मुसलमानांच्यात होऊ शकली नाही. भारतीय मुसलमान कम्युनिस्टांनादेखील मुसलमानांतील धार्मिक अनिष्ट रूढींविरुद्ध बंड पुकारता आले नाही. ब्रिटिशांनी उघडलेल्या शाळा-कॉलेजांत मुसलमान मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न करणारे सर सय्यद अहमदखान यांच्यासारखे सुधारक झाले; परंतु त्यांनाही स्त्रीशिक्षण, बुरखापद्धती, तलाक या बाबतीत सुधारणा करण्याची हिंमत दाखवणे अवघड होते.
इतकेच नव्हे, तर आपले धार्मिक निराळेपण टिकवून ठेवण्याच्या अट्टहासात आपल्याच धर्मातल्या स्त्रियांवर होणारे अन्यायदेखील अजूनही बुद्धिपुरस्सर जोपासले जात आहेत. त्यांविरुद्ध कोणी ‘ब्र’ काढला, तर त्याला वैचारिक व्यासपीठावरून उत्तर देण्याऐवजी त्याचे जीवितच धोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आले आहेत; आजही होत आहेत. अशा ह्या समाजात सर्वस्वसमर्पणाच्या तयारीने हमीद उभा राहिला होता. हमीदशी माझा स्नेह होता, हे म्हणतानादेखील त्या म्हणण्यातून आत्मप्रौढीचा ध्वनी उमटेल की नाही अशी मनाला शंका यावी इतका तो मोठा होत गेलेला होता. ज्या जिद्दीने तो ह्या साऱ्या अन्यायांविरुद्ध लढत होता, ते पाहिल्यावर त्याची भेट ही एखाद्या वीरपुरुषाच्या दर्शनासारखी वाटत होती, असे म्हणण्यात मला यत्किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही. हमीदचा आणि माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासूनचा परिचय. ‘कफनचोर’सारखी विलक्षण परिणामकारक कथा लिहिणारा हमीद, ‘इंधन’सारखी सरळसूत शैलीतली पण प्रभावी कादंबरी लिहिणारा हमीद. मी रेडिओत नोकरी करीत होतो, त्या वेळी कोकणातल्या मुसलमान कुटुंबाच्या जीवनावर श्रुतिकांची एक मालिका मी त्याच्याकडून लिहून घेतली होती. सदैव हसतमुख, बोलताना गमतीने आपले ते घाऱ्या रंगाचे डोळे मिचकावण्याची सवय असलेला हमीद, हसताना लालबुंद होणारा, खट्याळ पोरासारखी जीभ काढणारा, बोलताना बऱ्याच कोकणी माणसांना सवय असते तशी, ‘‘आयकलं का?’’ म्हणून वाक्याची सुरुवात करणारा- मराठी साहित्याच्या क्षेत्रात सरसर वर चाललेला हमीद.
अशा ह्या उमद्या, खेळाडू आणि मैफलीत हव्याहव्याशा वाटणाऱ्या तरुणाच्या अंत:करणात एक ज्वाला पेटते आहे आणि पाहता-पाहता ती एका बंडाची मशाल होणार आहे, याची त्या काळात फार थोड्या लोकांना कल्पना असेल. पण एक दिव्य क्षण त्याच्या जीवनात आला आणि ललित साहित्य, त्याचा आवडता समाजवादी पक्ष या सर्वांशी असलेले संबंध बाजूला करून त्याने एका भयंकर बिकट वाटेचा प्रवास सुरू केला. पाहता-पाहता एका अपूर्व अशा नव्या प्रबोधनाचा उद्गाता होऊन तो निराळ्याच तेजाने तळपायला लागला. जीवनात त्याला एक उदात्त, परंतु प्रसंगी प्राणाचे मोल मागणारे प्रयोजन सापडले. इहलोकातच स्वार्थापोटी सत्यधर्म दडपला जातो आणि अन्याय चालू ठेवले जातात, हे सत्य सांगण्यासाठी म.जोतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जोतिबांच्या वाट्याला विद्वान(?) समाजाची उपेक्षा आणि उपहास आले. हमीदची वाट आणखीनच भयंकर संकटे आणणारी. मुसलमान समाजाला धर्मनिरपेक्ष अशी सुधारणाच मंजूर नव्हती. जे काही सांगायचे, ते प्रेषिताच्या मुखातून एकदा बाहेर पडलेले आहे; त्यात बदल करू पाहणारा हा नष्ट करण्याच्याच लायकीचा- हीच त्या समाजातल्या बहुसंख्यांची धारणा. असल्या ह्या भयंकर वाटेवरची हमीदची चाल मात्र एखाद्या खेळाडूने मैदानात प्रवेश करावा तशी होती. त्याच्या चर्चासत्रात लोक त्याला नाना प्रकारचे प्रश्न विचारीत. त्यांची उत्तरे देताना जणू काही एखाद्या गमतीदार घटनेचा आपण उलगडा करीत आहोत, अशी त्याची मुद्रा असे. चेहऱ्यावरचे हसू मावळू न देता प्रश्न ऐकायचा. त्या वृत्तीनेच उत्तर सुरू व्हायचे. मधूनच डोकावणारी त्याची ती ‘आयकलं का’ म्हणण्याची लकब ऐकणाऱ्याशी नकळत सख्य साधून जायची. बोलता-बोलता गंभीर मुद्दा आला तरी त्याच्या चेहऱ्यावरचा सौम्य भाव ढळत नसे. एखाद्या कलावंताला निर्मितीत रंगलेले पाहावे तसे त्याच्याकडे पाहत राहावेसे वाटे. त्याच्या बोलण्यात कुठे कटुता, खोटा आवेश, वैताग असल्या गोष्टींचा स्पर्श नसे.
यशापयशाची चिंता न करता आपल्या कार्यात रमून गेल्यासारखी त्याची वागण्याची वृत्ती पाहिल्यावर डोळ्यांपुढे दिसणारा हमीद कलावंतांच्या हातातल्या वाद्यासारखा वाटायचा. सतारीतून करुण स्वर निघावेत आणि त्या कारुण्याच्या सतारीवर परिणाम न दिसता ती आपल्या घडणीतल्या त्या पितळी ब्रिजेस, हस्तिदंती कलाकुसर, चमकदार भोपळे यांच्यामुळे ते देखणेपण जसेच्या तसे ठेवून असावी; तसे काहीसे त्याचे ते आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि बोलण्यातून जाणवणारी रूढिग्रस्तांची करुण कहाणी ह्यांच्यातल्या पृथकपणाने प्रत्ययाला यायचे. एखाद्या कार्याशी संपूर्णपणाने लिप्त असूनही त्या लिप्ततेचे प्रदर्शन न करणारी अलिप्तता सत्यशोधक हमीदला त्याच्यातल्या कलावंत हमीदने दिली असावी. मनाला हादरून टाकणाऱ्या त्याच्या ‘इंधन’ ह्या कादंबरीचे निवेदनदेखील असल्या कलापूर्ण अलिप्ततेचाच प्रत्यय घडवते. इतके करुण प्रसंग आहेत, पण कुठे भळभळ नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी झगडू पाहणाऱ्या मुसलमान स्त्रियांचा मोर्चा ही एक अभूतपूर्व घटना होती. त्याची कथाही त्याने जणू त्यात आपण कोणीच नव्हतो अशा विलक्षण संयमी अलिप्ततेने सांगितली होती. त्या मोर्चातील महिला पुढे दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेली. तिला भेट नाकारण्यात आली. हे सर्व सांगून त्याबद्दलची चीड व्यक्त न करता हमीद आपले डोळे मिचकावीत म्हणाला, ‘‘आणि आयकलं का, ही भेट नाकारताना पंतप्रधान इंदिरा गांधी आपणही बाई आहोत, हे विसरल्या.’’
कुठल्याही मोर्चाचे किंवा परिषदेचे श्रेय त्याने चुकूनही स्वत:कडे घेतले नाही. श्रेयाविषयीची असली उदासीनता दुर्लभ आहे. सत्यशोधाचे कार्य आणि तो ह्यांच्यात मुळी एक अद्वैतच निर्माण झाले होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ह्या एकरूपतेमुळेच झळाळी आली होती. ह्या कार्याविषयी तो तासन्तास न थकता बोलायचा. त्या बोलण्यात उत्तम तर्कसंगती असूनही रुक्षतेचा स्पर्श नसे. उलट, त्याचे बोलणे ऐकताना त्या माणसाशी आपण स्नेह जोडीत चालल्याचा निर्मळ आनंदच असायचा. ह्या स्नेहभावामुळेच की काय कोण जाणे, नवपरिचितदेखील त्याचा उल्लेख आपल्या शाळासोबत्यासारखा एकेरीत करायचे, ‘‘आपला हमीद आलाय,’’ हा आपुलकीचा उल्लेख नाथ पैंचा अपवाद सोडला तर मी इतर सार्वजनिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत क्वचितच ऐकला आहे. नाही तर माणसाचा एकदा नेता झाला की, तो नकळत एका अदृश्य उच्चासनावरच बसून बौद्धिक घेत असतो. बरे, हा स्नेह जमवण्याचा धूर्त पुढारीछाप थाट नव्हता. हमीदने कसलाच थाट जमवला नाही. लढा भीषण असूनही त्याच्या नेतृत्वाचे कंकण हाती मिरवले नाही, की आज्ञार्थी हुकूम सोडले नाहीत. अजूनही ‘दार उल इस्लाम’चे म्हणजे सारे जग इस्लामी करण्याचे स्वप्न पाहणारे लोक आहेत. अशा लोकांतही तो ‘शांतपणाने विचार करा. आधुनिक लोकशाही राष्ट्रात असल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून वागून चालणार नाहीत,’ हे निर्भयपणाने जाऊन सांगत होता.
एखाद्या धर्ममार्तंडाच्या सभेत त्याच्यावर आघात तर होणार नाही ना, अशी त्याच्या मित्रांना भीती वाटायची. हमीदला ती फिकीर नसे. धर्मवेड्या वर्तमानपत्रांतून त्याच्यावर वाटेल ते आरोप होत. धर्मवेड्यांचा विरोध, तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांचाही विरोध, मुसलमानांचे दोष दाखवल्यामुळे खूष होणारे हिंदू त्यांचे दोष दाखवले की नाराज! हे सारे सहन करताना त्याने मूळ इहवादी भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. त्याबरोबरच वैचारिक आणि राजकीय मतभेदांना स्नेहभावनेच्या आडही येऊ दिले नाही. ह्या मार्गाने निघाला त्या वेळी चार इनेगिने सोबती सोडले, तर ‘एकला चालो रे’ म्हणतच निघाला होता. साथ होती ती त्याच्या जीवनध्येयाशी एकरूप झालेल्या त्याच्या पत्नीची. तिला मात्र संसारी असूनही एक प्रकारची अभूतपूर्व फकिरी पत्करलेल्या ह्या माणसाच्या घरातली चूल पेटती ठेवायला लागत होती. आणि त्याबरोबर असल्या काफिराबरोबर घरसंसार करण्याबद्दल नाना प्रकारचे हाल सहन करावे लागत होते. अल्लाची महती गात हिंडणारे फकीर इस्लामला ठाऊक होते; पण माणसांच्या दुनियेत माणसांनीच न्यायाचे राज्य आणले पाहिजे, हे सांगत हिंडणारा फकीर धर्मवेड्या इस्लामी लोकांना मात्र नुसताच नवा नव्हता, तर नामंजूर होता.
महाराच्या स्पर्शाने ‘अब्रह्मण्यम्’ म्हणणाऱ्यासारखे हमीदचा नामोच्चार कानी पडल्यावर तोबा- तोबा करणारे मुसलमानच अधिक होते. हाती ज्ञानदीप घेऊन धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायांवर प्रकाश टाकणारा हमीद त्यांच्या दृष्टीने सैतान होता. पण असल्या धर्मसत्तेपुढे निमूटपणे मान तुकवीत वागणाऱ्या समाजातही त्याचे प्रकाशकिरण पोहोचले. एक-एक करीत काही तरुण त्याच्या जोडीने चालू लागले. ‘मुस्लिम सत्यशोधक समाजा’ची स्थापना झाली. त्या समविचारी मित्रांपैकी कुणालाही हमीदने आपण नेता आणि ते अनुयायी अशी भावना येऊ दिली नाही. हमीदला नवा प्रेषित होऊन नवा पंथ स्थापन करायचा नव्हता. ह्या चळवळीचा रोख केवळ मुसलमान स्त्रियांवरचा अन्याय दूर व्हावा, एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. धर्माच्या नावाखाली सोसावे लागणारे अन्याय दूर व्हावेत, म्हणून चाललेल्या समाजप्रबोधनाच्या चळवळीचाच तो एक भाग होता. ज्या समाजात तो लहानाचा मोठा झाला, त्या समाजातल्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाशी तो अधिक परिचित होता. डॉ.बाबा आढावांनी ‘एक गाव : एक पाणवठा’ ही चळवळ हाती घेतली; याचा अर्थ त्यांना ग्रामीण जीवनात बाकी सर्व काही उत्तम चालले आहे असे वाटते, असा घ्यायचा नसतो. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्याला पन्नास ठिकाणी आगी लागलेल्या दिसतात; त्यांतली जी विझवता येईल, ती विझवावी. मुसलमान लोक आजही मध्ययुगीन अंधश्रद्धांना कवटाळून बसल्यामुळे आधुनिक जगात मागे पडत चालले आहेत, हे हमीदला दिसत होते. त्या समाजाची बौद्धिक आणि आर्थिक हलाखी दिसत होती. इज्जत, खानदान, मजहब, मुल्ला- मौलवींचे फतवे, जहन्नमी दहशत- अशा नाना तऱ्हेच्या भिंती उभ्या करून कोंडवाड्यात जगायला लावलेल्या स्त्रियांची असहायता त्याला अस्वस्थ करीत होती.
‘‘जर इहवादी लोकशाही ध्येये प्रत्यक्षात आणायला हवी असतील, तर भारतातल्या सर्व उदारमतवादी शक्ती एकत्र यायला पाहिजेत; त्यांनी अपक्ष भूमिकेवरून आणि कुठल्याही राजकीय सत्तासंपादनाचा हेतू मनात न ठेवता कार्य करायला हवे. हताश होऊन ‘जे-जे होईल ते-ते पाहावे’ अशा भूमिका घेऊन चालणार नाही. माणसांना पशूचे जीवन जगायला लावणारे नियम कुणीही केलेले असले, तरी ते बदलले पाहिजेत.’’ असा त्याचा ठाम निर्धार होता. वास्तविक, उगीचच कोणी कोणाच्या धर्मात ढवळाढवळ करू नये, असली सोईस्कर भूमिका घेऊन धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायांकडे काणाडोळा करून काँग्रेस पक्षाने आजवर चावलेल्या मतपेटीच्या प्रणयाराधनाच्या तत्त्वशून्य राजकारणात शिरून, सत्तेचे स्थान स्वीकारून, लौकिक मानमरातब मिळवण्याची वाट हमीदला मोकळी होती. हमीदने ती नाकारली. विरोधकांचा राग ओढवून घेतला. त्याच्या जीवनातला प्रत्येक दिवस नवी आव्हाने स्वीकारण्याचा दिवस होता. अशी आव्हाने स्वीकारीत चाललेला हमीद भेटला आणि बोलायला लागला की वाटे, याचे हे बोलणे इतर कशासाठी असले-नसले तरी स्वत:च्या मनाच्या उन्नयनासाठी ऐकत राहावे. सार्वजनिक हिताच्या कार्यात धडपडणारी माणसे भेटतात. त्यांचा त्याग मोठा असतो. पण त्यांच्यापैकी अण्णासाहेब सहस्रबुद्धे किंवा एस.एम.जोशी यांच्यासारखी पाच-दहा माणसे वगळली, तर अशा मंडळींच्या बोलण्यात निष्क्रिय समाजाविषयी एक प्रकारचा किरकिरीचा किंवा तक्रारीचा सूर असतो.
हमीदच्या बोलण्यातून हा सूर उमटलेला मला आढळला नाही. निराशेचे असंख्य क्षण त्याच्या ह्या तळमळीच्या जीवनात आले असतील. त्यानेच एक आठवण सांगितली होती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वीच्या निवडणुकीच्या काळात त्याला एक मुसलमान गृहस्थ भेटले. ते म्हणाले, ‘‘अहो, कशासाठी चालल्या आहेत या निवडणुका? कशाला हा सगळा प्रचार? लवकरच इथे आयुब खान येऊन हे सगळं मिटवून टाकणार आहेत.’’ हमीद म्हणाला, हे ऐकल्यानंतर मी माझ्या मनाचा तोल जाऊ दिला नाही. तो गृहस्थ अशिक्षित होता. मला दु:ख झाले ते ह्या काळातही मुसलमानांची मने त्या कालबाह्य आणि मध्ययुगीन कल्पनांच्या जाळ्यातच कशी अडकवून ठेवली आहेत, या गोष्टीचे. हमीदच्या लिखाणात किंवा भाषणात चुकूनही कधी सभ्यतेची मर्यादा सुटली नाही. वास्तविक, कसली भयंकर झुंज तो घेत होता; पण त्याची भाषणे ऐकताना एक कमालीचे आकर्षक उमदेपण त्याच्या रूपाने वावरत आहे, असे वाटायचे. हळूहळू त्याच्याभोवती मुसलमान समाजातले सुधारणावादी तरुण जमायला लागले होते. ‘माणसाचं भलं माणसानंच करायचं असतं’, ह्या तत्त्वावर विश्वास असलेल्यांचा परिवार जमू लागला होता. चळवळीला गती येण्याची चिन्हे दिसत होती. अशा वेळी त्याला तो किडनीचा दुर्धर रोग जडावा! तरीही त्याची हिंमत खचली नव्हती. देहाच्या कमकुवत अवस्थेत मनही कमकुवत होते. पण त्या आजारातही विज्ञानावर त्याचा भरवसा होता. त्याने चुकूनसुद्धा कुठल्याही देवाची करुणा भाकली नाही. जरा बरे वाटले की, सहकाऱ्यांशी पुढल्या योजनांची चर्चा सुरू.
डायलिसिसचे उपचार चालू होते, पण एक परावलंबी रुग्ण म्हणून जगत राहण्याची त्याला इच्छा नव्हती. अशा वेळी खराब झालेली किडनी काढून त्या ठिकाणी दुसरी किडनी बसवण्यासाठी शल्यक्रिया केली गेली. आता आणखी चार-पाच वर्षे तरी ह्याच उत्साहाने त्याला आपले कार्य करता येईल, अशी सर्वांना उमेद वाटत होती आणि एकाएकी प्रकृती पुन्हा ढासळली. बसवलेली किडनी काढून टाकावी लागली. पुन्हा डायलिसिस. यापुढे तो जगता तरी एक शय्याग्रस्त रुग्ण म्हणूनच त्याला पडून राहावे लागणार होते. असल्या जगण्याला तो जगणे मानायलाच तयार नव्हता. स्वत:च्या देहाकडे एका महान कार्यासाठी वापरण्याचे साधन म्हणूनच तो पाहत होता. ते कार्य घडत नसेल. तर हे निरुपयोगी साधन कशासाठी सांभाळीत राहायचे? श्री.शरद पवार, प्रा.अ.भि.शहा आणि श्री.गोविंद तळवलकर ह्या आपल्या निकटच्या मित्रांना लिहिलेले त्याचे शेवटचे पत्र हे एक केवळ निरवानिरवीचे पत्र नाही. आपल्या देहाकडे ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असणारे फक्त एक साधन असे मानणाऱ्या हमीदचा धर्मनिरपेक्ष मानवतावादच ह्या जगाला तारू शकेल असे सांगणारा तो एक संदेश आहे. ह्या जगात जगताना त्याने स्वत:ला काळाला उचित असणारे परिवर्तन नाकारणाऱ्या कुठल्याही धर्माचे लेबल लावू दिले नाही. मानवी समाजात समता आणणे, हेच सर्वोच्च ध्येय मानून जगणारे चैतन्य त्या देहाच्या वाहनातून मानवी जीवनातले अन्याय आणि विषमता नष्ट करण्याच्या संगरात उतरले होते. त्यातले चैतन्य निघून गेल्यावर त्या गतिशून्य वाहनाला कशाला हवेत धार्मिक अंत्यसंस्कार आणि इतर सोपस्कार?
आजवर ते चैतन्य हमीदच्या रूपाने डोळ्यांपुढे वावरत होते. आपल्या मित्रांपैकी एक अशा सहजभावनेने हमीद भेटत होता. बोलत होता. थट्टामस्करी करीत होता. त्यामुळे एका व्यापक प्रबोधनाचा उद्गाता ह्या दृष्टीने त्याची असामान्य उंची जाणवत नव्हती. ती तो जाणवूही देत नव्हता. आता तो चर्मचक्षूंच्या आड कायमचा गेला. खूप दूर गेला आणि दूर गेलेल्या पर्वतासारखी त्याची ती उंची आता जाणवायला लागली. त्याच्या त्या समर्पित जीवनाकडे पाहिल्यावर आता मात्र जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दीन-दलित समाजात नवे चैतन्य निर्माण करणाऱ्या परंपरेत मुसलमान समाजातल्या उपेक्षित राहिलेल्या दीन-दलित स्त्रीपुरुषांच्या उद्धाराच्या चळवळीचा प्रवाह आणून जोडणारा त्या मालिकेतला एक श्रेष्ठ प्रबोधनकार ह्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे, हे समजले. महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधनाच्या इतिहासकाराला म.फुले, डॉ.आंबेडकर आणि हमीद दलवाई ही नावे अत्यंत आदराने उच्चारूनच ह्या प्रबोधनाचा विचार करावा लागेल. किंबहुना, म.फुल्यांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाच्या संपूर्ण इहवादी आणि ‘माणुसकी हाच धर्म मानायला हवा’ ह्या विचारवृक्षाला आलेले ‘हमीद दलवाई’ हे खरे रसरशीत फळ होते.
धर्म, रूढी, वंशवर्चस्व, राजकीय आणि आर्थिक सत्तालोभ यांची असहायांच्या शोषणासाठी राक्षसी चढाओढ चालत असलेल्या ह्या जगात शोषितांच्या अश्रुधारांना खंड नसतो; उणीव असते ती असले असहाय अश्रू पुसून तिथे हास्य फुलवायला निघालेल्या निर्भय आणि नि:स्वार्थी हातांची. हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मिळ हात गेले. हमीद अनेक दृष्टींनी अकाली गेला. विरोधकांना त्याला हरवता आले नसते. एका दुर्धर रोगाने ऐन बहरात त्याचे जीवनपुष्प कुस्करून टाकले. ह्या दु:खाबरोबरच, भारताच्या जीवनात एक नवे क्रांतिपर्व सुरू होते आहे अशा काळातले हमीदच्या निधनाचे दु:ख मनाला अधिक यातना देणारे आहे. केवळ मुसलमान समाजाचेच नव्हे, तर साऱ्या भारतीयांचे हे दु:ख आहे. आजवर या ना त्या पूर्वग्रहामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा एक ऐतिहासिक क्षण आला आहे. अशा क्षणांना पकडून त्यांचे युग करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हमीदच्या हातांसारख्या हातांची कधी नव्हती इतकी आज गरज आहे. ते सामर्थ्य आता हमीदच्या विचारांतून मिळवावे लागणार आहे. ह्या जगात देव दीनांचा वाली नसतो- दीनांचा वाली माणूसच, ह्या भावनेने माणसांनी वागायला हवे. दीन जनांविषयीचा कळवळा आणि त्यांचे भले झालेच पाहिजे हा आत्मविश्वास यांतून माणसाची मने जोडणारे त्याचे ते ‘‘आयकलं का?’’ हे शब्द उमटायचे. हमीदचे ते अंत:करण, ती निर्भयता आणि तो आत्मविश्वास घेऊन धर्म-पंथ-जात-पात यांचा विचार न करता जगणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींनाच हमीदला मरणानंतरही लाभलेल्या अमरत्वाचा खरा अर्थ उमगेल. कारण स्वत:च्या दहनभूमीवर चिरा आणि पणती लावून ते तसले अमरत्व मला देऊ नका, हे स्वत: हमीदनेच सांगितलेले आहे. नमस्कारासाठी जुळलेल्या करांपेक्षा समाजहिताच्या कार्यासाठी एकमेकांच्या करांत जुळलेले करच माणसांना अधिक समर्थ जीवनाकडे नेत असतात.
(‘मैत्र’- मौज प्रकाशन गृह, मुंबई)
Tags: कॉंग्रेस गोविंद तळवलकर अ.भा शहा शरद पवार हिंदू मुस्लीम एक गाव एक पाणवठा बाबा आढाव तिहेरी तलाक इंधन कफनचोर गोपाल गणेश आगरकर महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुस्लीम सत्यशोधक मंडळ अभिवादन एक श्रेष्ठ प्रबोधनकार हमीद दलवाई पु.ल.देशपांडे Congress Govind Talwalkar A.B Shaha Sharad Pawar Hindu Muslim Ek Gaon Ek Paanvatha Baba Adhav Tiheri Talak Indhan Kafanchor Gopal Ganesh Agarkar Mahatma Phule Dr.Babasahebe Ambedkar Muslim Satyshodhak Mandal Abhivadan Hamid Ek Shresht ProbdhanKar Hamid Dalwai P.L Deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या