डिजिटल अर्काईव्ह

मी प्रत्यक्ष टिळकांनाच विचारीन!

सरलादेवी ही रवीन्द्रनाथ टागोरांची भाची. 'जीबोनेर झरा पाता (जीवनाची गळलेली पाने) नावाच्या त्यांच्या आत्मकथेत टिळकांच्या भेटीचा प्रसंग आला आहे. रबीन्द्रांची स्वर्णकुमारीदेवी नावाची त्यांच्या पेक्षा वयाने सहासात वर्षांनी मोठी असलेली बहीण होती. सरलादेवी ही तिची मुलगी. स्वतः स्वर्णकुमारी ह्या बंगाली भाषेत कादंबरी लिहिणाच्या पहिल्या लेखिका.

मी प्रत्यक्ष टिळकांच्या तोंडून जोपर्यंत ऐकलं नाही तोपर्यंत ह्या कशावर विश्वास ठेवणार नाही' हे उद्गार होते सरलादेवी चौधुराणी यांचे. 

सरलादेवी ही रवीन्द्रनाथ टागोरांची भाची. 'जीबोनेर झरा पाता (जीवनाची गळलेली पाने) नावाच्या त्यांच्या आत्मकथेत टिळकांच्या भेटीचा प्रसंग आला आहे. रबीन्द्रांची स्वर्णकुमारीदेवी नावाची त्यांच्या पेक्षा वयाने सहासात वर्षांनी मोठी असलेली बहीण होती. सरलादेवी ही तिची मुलगी. स्वतः स्वर्णकुमारी ह्या बंगाली भाषेत कादंबरी लिहिणाच्या पहिल्या लेखिका. 

टागोर कुटुंबातली साहित्य, संगीत, चित्रकला यांची उपासना आणि समाजसेवेची परंपरा स्वर्णदेवींप्रमाणे सरलादेवींनीही मोठ्या निर्धाराने चालवली होती.
सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी बंगाली भद्र समाजातल्या स्त्रिया कलकत्याला गंगास्नानाला जातानाही पालखीत पडदानशीन होऊन जात! श्रीमंत हिंदू कुटुंबातही बायका गोषात वावरत. व्यासपीठावर येऊन भाषणे करणे आणि लोकांपुढे उभे राहून गाणी म्हणणे हे तर भयंकर पाप होते.

अशा ह्या परिस्थितीत सरलादेवी स्त्री-शिक्षण, जाचक रूढी पासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून लेख लिहिणे, किंवा ब्रिटिश राजनीतीविरुद्ध जनतेच्या मनात प्रीती निर्माण करणे यासारखे बंडखोर कार्य चालवले होते. पण ह्या साऱ्यापेक्षा सरला देवींची सर्वात मोठी श्रद्धा जडली होती ती तरुणांच्या बलोपासनेवर.

सरलादेवींचे आणखी एक मामा सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आय. सी. एस्. मानले जातात. तत्कालीन मुंबई इलाख्यात ते कलेक्टर, डिस्ट्रिक्ट जज्ज अशा हुद्यांवर असत. सुटीच्या दिवसात सरलादेवी ह्या मामा-मामीकडे रहायला येत असे. गाण्याची तिला खूप आवड. मराठी लोकांचे अभिजात संगीतावरचे प्रेम पाहून तिला आश्चर्य आणि आनंद वाटत असे. मिळेल तिथून तो गाणी शिकायची, पण महाराष्ट्रातल्या सातारा, सोलापूर, पुणे अशांसारख्या गावात तिचा मुक्काम असताना तिच्यावर सर्वात मोठा परिणाम झाला तो महाराष्ट्रात चाललेल्या बलोपासनेचा! गावागावात आखाडे होते. तिथे मराठी तरुण दंड-बैठका काढताना दिसायचे. कुस्त्यांचे फड गाजत असत. दांडपट्टा, काठी-बोचाटा यांचे खेळ चालत. त्या गोटबाज शरीराच्या मर्दानी खेळांत रंगलेल्या मराठी तरुणांकडे पाहून सरलादेवीना ढिल्या शरीराच्या नाजूक बंगाली तरुणांची आठवण होऊन लाज वाटे. खेळाच्या मैदानावर गोऱ्या आणि निमगोऱ्या आडदांड तरुणांच्या हातचा भोप चुकवण्यासाठी हे बंगाली तरुण भ्याडपणाने सैरावैरा धावत असत.

महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांतून मर्दानी खेळांनी आणि साहसाच्या प्रयोगांनी साजरा होणारा नवरात्रोत्सव पाहिल्यावर शास्त्रोपासने ऐवजी सामान्य नाचगाण्यांनी साजरी होणारी बंगालातली दुर्गापूजा तरुण सरलादेवींना मिळमिळीत वाटायला लागली. बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम् या गीताचे तिने रवीमामांच्या सुरात सूर मिसळून शेकडो लोकांपूढे गायन केले होते. भारतमातेच्या 'मलयजशीतल' स्वरूपाइतकेच त्या गीतात तिच्या रौद्रस्वरूपाचे वर्णन आहे. सरलादेवींना त्या रूपाचेही तितकेच आकर्षण वाटू लागले होते. तिने बंगालच्या इतिहासातील वीरगाथा शोधून काढल्या. प्रतापादित्याचे चरित्र लिहून काढले. पूर्वदिव्यात रमायच्या तिच्या आवडी बद्दल खुद्द तिच्या रवीमामाने आपली ना पसंती व्यक्त केली होती. याकडे तिने दुर्लक्ष केले. राष्ट्रीय अहंकार जागवण्याच्या बाबतीत तिचा ओढा रवींद्रनाथांपेक्षा बंकिमचंद्राकडे अधिक होता.

वास्तविक रवींद्रनाथांचा शारीरिक बलोपासनेला आधीही विरोध नव्हता. एवढेच नव्हे तर आत्मरक्षणासाठी ज्यूडोसारख्या मल्लविदयेचे शिक्षण मुलांना आणि मुलींनाही शिकवायला शांतिनिकेतनात त्यांनी जपानी ज्यूडोतज्ञ नेमले होते. शांतिनिकेतनातल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातल्या भोजनकक्षातल्या भितीवर विद्यार्थिनींच्या कमरेला कृपाण लटकल्याचे चित्र अजूनही पहायला मिळते! पण केवळ शारीरिक बळाच्या आधारावर भारतीयांचे नव्या जगात मानाने जगण्याचे सामर्थ्य वाढेल याच्यावर रवींद्रांचा विश्वास नव्हता. राष्ट्रभक्तीच्या कैफात आपल्या देशात पूर्वापार जे चालत आले आहे तेच चांगले असे मानायची प्रवृत्ती वाढीला लागते. आधुनिक ज्ञान विज्ञान, विषेशतः तंत्र विज्ञान मिळवण्याच्या बाबतीत स्वदेशा विदेशाचा विचार न करता, मनाला संकुचित राष्ट्रीयत्वाच्या मोहात गुरफटू न देता, ज्ञान जिथून मिळेल तिथून घ्यावे आणि लोकांच्या कारणी लावावे ही रवींद्रनाथांची भूमिका होती.

तरुण सरलादेवींना हे अमान्य नव्हते, पण आपल्या तरुणांना चेतवण्यासाठी आपल्या परंपरांचा अभिमान जागृत करायला हवा, असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी बंगाली नवरात्रात 'वीराष्टमी' उत्सव सुरू करून 'खङगपूजा' करायची प्रथा चालू केली. त्या उपासनेचे संस्कृतात मंत्र रचले. त्या पूजेत 'पूर्वपूर्वगतान् वीरान् पुष्पांजलिम् ददाम्पहम्' म्हणत फुले वाहिली जाऊ लागली. 'छत्रपति महावीरम् महाराष्ट्र कुलनायकम् वीराष्ट म्याम् नमस्कुर्य पुष्पांजलिम् ददाम्यहम्' असा त्यात शिवाजी महाराजांविषयीचा मंत्र होता.

बालोपासनेविषयीचा उत्साह अशा त-हेने जागवला जात असताना त्या बळाचा उपयोग हिंसा, दरोडे अशा मार्गांनी इंग्रज राज्यकर्त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी केला तरच त्या बळाला अर्थ आहे. असा विचार करणारा दहशतवादी पंथही त्यावेळी अस्तित्वात आला होता. त्या काळी जहाल आणि मवाळ असे भारतीय राष्ट्रीय जीवनात दोन ठळक पंथ पडले होते. लोकमान्य टिळकांची जहालपंथीयांत गणना होत असल्यामुळे दहशतवादी आततायी कृत्यांना त्यांची सहानुभूती असल्याचाही हेतुपुरस्सर गवगवा झाला होता. त्यामुळे शारीरिक बलोपासना आणि राजकीय हिंसाचार यांची सांगड घालण्यात येत होती. बंगालात ठिकठिकाणी व्यायामशाळा उभ्या करून तरुणांच्यांत बलोपासनेचा उत्साह निर्माण करणाऱ्या तरुण सरलादेवींना मात्र याची नीटशी कल्पना नव्हती.

आणि एके दिवशी बडोद्याहून अरविंद घोषांची चिट्ठी घेऊन यतीन बांडुज्ये नावाचा तरुण सरलादेवींना भेटायला आला. 

हा यतीन युद्धविद्या शिकण्यासाठी बडोदे संस्थानातल्या सैन्यात सैनिक म्हणून भरती झाला होता. आता तो कलकत्यात राहून बंगाली तरुणांना बलोपासनेचे शिक्षण देऊ इच्छित होता. 

सरला देवींनी त्याला सर्व प्रकारची मदत करायला सुरवात केली.

त्या काळात कलकत्त्यातल्याच एका वस्तीत नंतरच्या काळात क्रांतिकारक म्हणून प्रसिद्धीला आलेल्या बारीन् घोष ह्यांच्या नेतृत्वाखाली 'भारत उद्धार दला'ची स्थापना झाली होती. यतीन बांडु्जये त्यातलाच एक निष्ठावंत कार्यकर्ता तिथेच राहायचा. तिथेच जेवायचा. आणि त्या दलात सामील झालेल्या तरुणांना व्यायाम, कवायत, अश्वारोहण वगैरे विद्या शिकवायचा. 

ह्या कार्यक्रमाला सरलादेवीची पूर्ण अनुमती होती, पण ह्या दलातर्फे राजकीय दरोडे घालायचा कार्यक्रम हाती घेतल्याचे कळल्यावर मात्र त्यांना धक्काच बसला. त्या प्रसंगाचे वर्णन आपल्या आत्मकथेत करताना त्या म्हणतात : ‘इरावती निवेदिताचं (स्वामी विवेकानंदाच्या शिष्या) ह्या तरुणांशी एकमत होतं. निवेदिता म्हणत होत्या खऱ्या की ब्रिटिशांची सत्ता आल्यापासून ह्या देशातल्या चोर-दरोडेखोरांचं भय नाहीस होऊन देशभर शांतता प्रस्थापित झाली, हेच हृया देशातल्या पुरुषांचं पौरूष्य नाहीसं होण्याचे कारण. कसली तरी अशांतता असल्याशिवाय पौरूष्य जागृत होत नाही. याकरता डाकू असण्याची आवश्यकता आहे. असल्या मतांची तिथं चर्चा होत असे. एके दिवशी यतीन म्हणाला, उद्या मध्यरात्री आम्हि एक तुकडी डायमंड हार्बरजवळ राहणाऱ्या एका म्हातारीच्या वाडीत घुसून, तिला ठार करून जमिनीत गाडलेले तिचं धन लुटून आणणार आहे. त्या म्हातारीचं कोणीही नाही आहे.

हे ऐकून मी म्हणाले, "चमत्कार आहे. एका असहाय म्हातारीला मारून तिचं धन पळवणार तुम्ही? वाहवा! केवढं पौरुष! आणि हे रक्तानं माखलेलं धन घेऊन काय करणार तुम्ही?"

"देश कार्य करणार."

"देशमाता काय तुमच्या गलिच्छ हातांनी झालेल्या कार्याचा स्वीकार करणार आहे? तिच्या एका असहाय निरपराध वृद्ध संतानाची हत्या तिला सहन होईल?"

"निश्चित! टिळक महाराजांचा हाच आदेश आहे !"

"मी ज्या क्षणापर्यंत असा आदेश त्यांच्या तोंडून ऐकला नाही तोपर्यंत काही झालं तरी विश्वास ठेवणार नाही. मी त्यांच्यापाशी जाईन. त्यांना विचारीन. मी परत येईपर्यंत ही हत्या थांबवुन ठेवा. आणि सर्व येऊन मला सांगा."

"ठीक आहे. तसं करू." यतीन म्हणाला.

आणि ही तरुण मुलगी कलकत्याहून पुण्याला आली. आपण पुण्याला टिळकांना भेटायला जातो आहोत याचा त्यांनी कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. टिळकांना भेटायला जाणे हे त्या काळी एक प्रकारचे धाडसच होते. टिळकांना भेटणाऱ्यांची नावे, पोलिसांच्या काळया यादीत जात. इंदिरा पुकारलेल्या आगीदाणीत जय प्रकाशांना भेटणाऱ्यांची नावे जशी पोलिसांच्या यादीत जात असत तशी.

ही बाई टिळकांना भेटायला चालली आहे. म्हटल्यावर कलकत्याहूनच तिच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला असता. हैदरी म्हणून एक डेप्युटी अकाउंटंट जनरल टागोर कुटुंबियांचे स्नेही मुंबईला जायला निघाले होते. त्यांच्या बरोबर मुंबईची सफर करायला म्हणून सरलादेवी निघाल्या.

आधी कल्याणमार्गे पुण्याला सत्येंद्रनाथ टागोरांचे बुद्ध स्नेही प्रोफेसर गोविदराव कडकडे यांना भेटायचे आणि मग मुंबईला जायचे असे त्यांनी ठरवले.

प्रोफेसर गोविंदराव कडकडे पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातून निवृत्त झाले होते. अतिशय हुशार पण स्वभावाने चक्रम! त्यांना भेटायला येत असल्याचे सरलादेवींनी तारेने कळवले. ते स्टेशनवर उतरून घ्यायला आले. त्यावेळी ते खडकी कॅन्टॉमेंटमध्ये राहायचे.

गोविंदराव कडकड्यांच्या घरी पोचल्यावर स्नान वगैरे आटोपल्यानंतर मी त्यांना म्हणाले, "मराठा पत्राचे संपादक एन्. सी. केळकर माझे स्नेही आहेत. त्यांना मला एकदा भेटायचं आहे."

दुपार उलटल्यानंतर फेटणीत बसून आम्ही केळकरांच्या घरी जाऊन पोचलो. 

त्यांना मी सांगितले, "मला टिळकांना भेटण अत्यंत आवश्यक आहे. त्याची व्यवस्था करा. मी त्याच्या वाड्यावर आणार नाही. तुमच्या घरी त्यांना आणि मला भोजनाचं आमंत्रण द्या." त्यांनी हे मान्य केले. त्या सुमाराला टिळकांच्यावर ताईमहाराज फौजदारी खटला चालू होता. त्यांच्या वाड्यात आजूबाजूला गुप्त पोलिसांचा बुजबुजाट होता. त्यामुळे तिथे त्यांच्याशी बोलणे धोक्याचे होते. टिळकांना भेटायला जे लोक जात त्यांच्यावर पोलिसांची वक्रदृष्टी पडायचीच. आणि मग अशा लोकांच्या हालचालींना अडथळे यायचे.

दुसऱ्या दिवशी केळकरांच्या घरी दुपारच्या जेवणाच्या वेळी टिळकमहाराजांची भेट झाली. त्या दिवसांत त्यांना क्षणाचीही फुरसत नव्हती. स्वतःचा 'डिफेन्स' ते स्वतः देत होते.

केळकरांच्या घरी येतानासुद्धा ते कायद्यांच्या ग्रंथांची रास आणि इतर कागदपत्र घेऊन आले होते. त्यापूर्वी मी त्यांना कधीही प्रत्यक्ष पाहिले नव्हते. हीच पहिली भेट.

टिळकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या बलशालीपणाची आणि अढळ दृढतेची छाप होती. गोखल्यांच्या चेहऱ्यावर जी कोमलता होती ती इथे नव्हती. कायद्यांचे ग्रंथ आणि कागदपत्रे ह्यांच्या वेढ्यात बसलेला जणू काय तो एक सजीव बलस्तंभ होता ! केळकरांच्याकडून माझे म्हणणे ऐकताक्षणी इतक्या कामात असूनही ते इथे आले होते. 

मी माझी समस्या त्यांच्यापुढे मांडली आणि प्रश्न केला, "आपण तरुणांना दरवडे घालायला पाठिंबा दिला आहे का?" 

खूप ठामपणाने टिळक म्हणाले, "मुळीच नाही. ह्या बाबतीत कुठल्याही धार्मिक दृष्टिकोणातून नीतिअमीतीच्या गोष्टी न करता शुद्ध राजकारणाच्याच दृष्टीनं मो बोलतो आहे. पुण्यातल्या तरुणांनी घातलेल्या दरवड्यांचीही मला माहिती आहे. त्या अनूषंगाने बोलतो आहे. असली चळवळ संपूर्णपणे निरर्थक, निष्फळ आहे. हे लोक पकडले जाणारच. देशातल्या लोकांचा खून करून पैसे जमवायला लागल्यावर त्यांच्याविरुद्ध देशातल्या लोकांना चीड आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लोकांची चीड ते ओढवून घेतील. माझा अशा गोष्टींना मुळीच पाठिंबा नाही. आपण तिथं जाऊन ह्या गोष्टीची जाहीर घोषणा करा. जे माझ नाव घेऊन ह्या आदेशाचा प्रचार करताहेत ते साफ खोट बोलताहेत."

सरलादेवी लिहितात: "त्यांचे हे मत ऐकल्यावर मला कल्पनातीत आनंद झाला. त्याक्षणी मला ते 'पूजनीय' झाले. हा खरा नेत्यासारखा नेता. मनावरचा सारा भार उरतला आणि केळकरांनी जमवून आणलेल्या भोजनाच्या बेतातल्या श्रीखंड-बासुंदीचा जरा अधिकच आस्वाद घ्यावासा वाटला."

जवळजवळ पाऊणशे वर्षांपूर्वीची ही हकीगत. टिळक ताईमहाराज खटल्याच्या कामात गढले होते असे सरलादेवींनी लिहिले आहे. म्हणजे 1904 अशा सुमाराची ही भेट असावी.

टिळकांच्या पाठीशी कसलीही राजकीय सत्ता नव्हती. त्यांच्या कृपाप्रसादाने कुठले 'पद' मिळण्याची शक्यता तर नव्हतीच. उलट तुरुंगात जाऊन बसायची धास्तीच अधिक होती. अशा काळात टिळकांचा शब्द हा ह्या देशात 'कौल' मानला जात होता. लोकांना पुढाऱ्यांकडून कुठलाही वैयक्तिक स्वार्थ साधला जाणार नाही याची खात्री असूनही त्यांचा शब्द शिरोधार्य मानावा असे ज्यावेळी वाटत असते त्याचवेळी 'नेता' ह्या शब्दाला आणि नेतृत्व ह्या कल्पनेचा अर्थ असतो.

'तख्त, तिजोरी आणि तलवार' यांचा मोह ज्यांना पडला नाही तेच खरे क्रांतिकारक ठरले. ह्या दादा धर्माधिकारीच्या वाक्यातली सत्यता अशा वेळी दिसते.

Tags: टिळकांचा शब्द जाचक रूढी स्त्री-शिक्षण टागोर कुटुंब 'जीबोनेर झरा पाता सरलादेवी चौधुराणी पु. ल. देशपांडे Tilak's words oppressive norms women's education Tagore family 'Jiboner Jhara Pata Sarladevi Chowdhurani P. L. Deshpande #Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे ( 15 लेख )

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी