डिजिटल अर्काईव्ह

असा एकदम विनयशील केव्हापासून झालास अंतू? सौंदर्य हा विषय तुला कळला नाही? मी तरी हे विनय म्हणून देखील मान्य करणार नाही. गुलाब मंत्रीचे ओठ ह्या विषयावर वेलणकराच्या हॉटेलात दोन तास तू मला काही काही सांगितलं होतंस ना? पावणे चार रुपये बिल होईपर्यंत आपण गुलाब मंत्रीच्या ओठांबद्दल बोलत होतो. सिल्लू काटपेटियाची मान किती नितळ आहे, ह्याबद्दल तूं संगमरवरापासून स्टेनलेस स्टीलपर्यंत सगळ्या जिनसा उपमेसाठी वापरल्या होत्यास अंतू अगदी तू आणि मी इथं आहोत, तेव्हा खरं बोलायला हरकत नाही. प्रमिला पेंडसेच्या लग्नाला आमंत्रणाशिवाय आपण गेलो आणि नारळ घेऊन बाहेर पडतांना प्रमिला पेंडसेचे हे शेवटच दर्शन म्हणून तो नारळ आपण आपल्या टेबलावर ठेवला होता. 

अंतू गणपुले इतका 'सौंदर्यवाचक' 'झाला असेल अशी मला कल्पनाही नव्हती. वास्तविक तो आणि मी शाळेपासूनचे सोबती. अंतूचे गणित चुकले तर माझा हिशेब चुकावा! अंतूने शिवाजीचा गुढघी रोग समर्थांच्या पाय लावावा तर मी शिवप्रभूंची वाघनखे शाहिस्तेखानाच्या पोटात खुपसावी त्याने रिओडीजानेरोचा स्पेनमध्ये थारेपालट केला तेव्हा मी डब्लिन जर्मनीत आणून वसवले. मास्तर बदलले, वर्ग बदलले; पण मी आणि अंतू फारसे बदललो नाही. 

'स्त्री' म्हणजे मधल्या सुट्टीत सागरगोटे खेळणारी आणि अधून मधून 'ए, माला दे ना चिंच म्हणून आमच्यासमोर तोंडे वेंगाडणारी वस्तू, येथपासून तो छबू लोखंडेला 'मिस् लोखंडे' म्हणण्यापर्यंतचा आमचा मानसिक विकास ही सोबती सोबतीनेंच झाला होता. तोच अंतू आठ दिवसांपूर्वी मला 'भिंत पिवळी आहे' हे सौंदर्यवाचक विधान आहे म्हणून सांगूं लागला आणि माझ्या तोंडून एकदम "ना न न ना ना अंतू आता पहिला उरला नाही." अशा करुणोदास ओळी बाहेर पडल्या. (हो! मी थोडासा त्यातला आहे.) 

"अंतू, भिंत पिवळी आहे, यांत सौंदर्य कसलं आलं? शेवंती पिवळी आहे म्हण!"
"तुला कसं कळलं?" अंतू दचकून म्हणाला.
म्हणजे शेवंती पिवळी आहे हे काय अॅटॉमिक सीक्रेट आहे? 
"ते जाऊ दे, भिंत पिवळी आहे."
"अंतू, भिंतीत काय सौंदर्य? तुला आठवतं? आपण फर्स्ट इयरला रिपीटर होतो तेव्हा विल्सनला आपल्या वर्गात प्रीता गायकवाड होती. नेहमी पिवळा मॅझोलिया वेणीत घालायची लेमन कलरची साडी नेसायची. पीतांबरी म्हणत होतो आपण तिला! काय सुंदर होती!" मी एक जमेल तितका दीर्घ निःश्वास टाकून म्हटले.
"सुंदर म्हणजे काय?" अंतूचा चेहरा रिटायर व्हायला आलेल्या हायकोर्ट जज्जा इतका गंभीर झाला होता.
अंतू, सुंदर म्हणजे काय हे मला तू विचारावंस? हे म्हणजे साक्षात गौतम बुद्धानं एखाद्या नवबुद्धाला सुत्तनिकाय किंवा तसल्याच कशाचा तरी अर्थ विचारण्यासारखं आहे. सुंदर म्हणजे काय ते समजून घेण्यात ना आपण बी. ए. व्हायला दुप्पट तिप्पट वेळ घेतला? नावच घेऊ का?"

अंतूच लक्ष नव्हते. कसल्यातरी गहन विचारात तो पार बुडाला होता. पूर्वी चंपा कार्लेकर चौपाटीवर दिसली नाही, अगर सिल्लू काटपेटिया फ्रेंचच्या तासाला आली नाही, किंवा उर्मिला कोडेकनाल बॅडमिंटन कोर्टावर दिसली नाही, किंवा जेठी अडवानीची कॅडिलॅक ठराविक वेळेला पोर्चमध्ये आली नाही, तर तो असाच गंभीर व्हायचा. चौपाटीवर जाण्यात हवा अगर भेळ यापैकी काहीही तो खात नसे. केवळ सहासात जणींच्या घोळक्यात 'चंपा कार्लेकर' सौंदर्यवाचक विधान. 

फ्रेंच ब्रिजखेरीज त्याचा इतर कुठल्याही फ्रेंच गोष्टीशी संबंध न येताही हा अर्धमागधीचा विद्यार्थी केवळ 'सिल्लू काटपेटिया' ह्या कारणास्तव तास तास फ्रेंच ऐकत असे. उर्मिला कोडेकनाल बॅडमिंटनच्या टूर्नामेंटसमध्ये जिंकली की हरली याचे अंतूला केव्हांही भान नव्हते, पण तिची एकही मॅच त्याने
सोडली नाही. जेठी अडवानीपेक्षा मी तिच्या कॅडिलॅकवर खूष होतो, त्यावेळी हाच अंतू 'तुला सौंदर्य म्हणजे काय ते कळत नाही' म्हणून माझ्यावर उखडला होता. तोच अंतू मला सांगत होता की, 'भिंत पिवळी आहे' हे सौंदर्यवाचक विधान आहे.

अंतू हे बघ, तू बनवाबनवी करू नकोस उगीच' भिंत पिवळी आहे' हे सौंदर्यवाचक विधान? उद्या 'मोरी तुंबली आहे' किंवा 'कठडा मोडला आहे' हे सौंदर्यवाचक विधान म्हणशील."
"मग तुझी सौंदर्यवाचक विधानाची कल्पना काय?" अंतूच्या गंभीरतेने निम्मी पाद्रीजात ओशाळली असती.
"कसलं सौंदर्यवाचक विधान घेऊन बसलास? सुंदरपैकी चहा घेणार का?"

"हे बघ!" उलट तपासणीत इष्ट उत्तराने वकिलाचा चेहरा फुलतो तसा अंतूचा चेहरा फुलला चहा सुंदर आहे असे तू म्हणालास.
"मी असे म्हणालो नाही." मी पिंजऱ्यातल्या अनुभवी साक्षीदाराच्या सावधतेने म्हटले" मी म्हटले होते की सुंदरपैकी चहा तू घेणार का?"
"चहा घेईन!" अंतून पराजित पुढाऱ्याने डिपॉझिट जप्त झाल्यावर विजयी उमेदवाराच्या अभिनंदनाचे भाषण सुरू करावे त्या थाटात उत्तर दिले. "पण सुंदरपैकी चहा घेणार का, यात 'चहा सुंदर आहे' हे एक सौंदर्यवाचक विधान दडलेले आहे."

"दडूं दे!" मी स्टोव्ह पेटवीत म्हटले. (हो! अजून स्टोव्ह मलाच पेटवावा लागतो आणि चहाही मलाच करावा लागतो. दुपारी ऑफिसात आणि रात्री घरी डबा येतो!) दडूं दे म्हणून भागणार नाही. सौंदर्य ही एक जटिल समस्या आहे.
"थांब! सुंठ घालून चहा करायचा असला तर आधी सुंठ टाकायची की साखर?"
"कसंही चालेल." माझ्या प्रश्नांत दडलेल्या टोमण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अंतू म्हणाला-उदाहरणादाखल हे पहा भिंत पिवळी आहे."
"अंतू, भिंत पिवळी आहे हे मला तू किती वेळा सांगणार?"
"सौंदर्यवाचक विधान म्हणजे काय हे तुझ्या ध्यानात येईपर्यंत."
"सौंदर्यवाचक विधान माझ्या ध्यानात आले नाही म्हणून सांगितलं कोणी तुला? हाय हाय! आहे ब्बुवा', 'या ss! 'तू छोकरी नाही सुंदरी', 'प्रेम कोणीही करेना SS', 'मस्त आहे हा', 'छे, डोळे म्हणजे छळ आहे', ' जातीच्या सुंदरांना-'ह्री सगळी सौंदर्यवाचक विधानं घोकता घोकता, अंत्या, ऑनर्स गेले नाहींत का आपले?" 

"अरे पण याला शास्त्रीय बैठक नाही. उदाहरणार्थ हे पहा, भिंत पिवळी आहे."
"अंतू, पुन्हा भिंत पिवळी आहे म्हणालास तर ह्या पांढऱ्या भिंतीवर डोकं आपटीन मी तुझं."
मला कींव येते तुझी! सुंदर म्हणजे काय सांग बघू.
सुंदर म्हणजे गुलाब मंत्री, सुंदर म्हणजे प्रमिला पेंडसे, सुंदर म्हणजे नैना होनावरकर, सुंदर म्हणजे दुर्गा तेलंग. एकेका " नावाला एक एक चमचा साखर पाण्यात घालत मी ओरडलो.
'चुक"
काय चूक? गुलाब मंत्री सुंदर नव्हती! तिच्यासाठी आपण लॉजिकऐवजी मॅथ्स घेऊन वर्ष बुडवलं नाही? प्रमिला पेंडसे सुंदर नव्हती? तिच्यासाठी आपण फावडी आणि घमेली घेऊन वसईला श्रमदान करायला गेलो नव्हतो‌? नैना होनावरकर सुंदर नव्हती. सांग ती सुंदर नसती तर गॅदरिंगच्या नाटकांत आपण दोन्ही विंगांत प्रॉमटर म्हणून राहिलो असतो. ती तालमीला येत नव्हती त्या दिवशी इतरांना काय प्रॉमटिंग लागत नव्हते.  पण आपण जात होतो‌मग तालमीला उगीच चूक म्हणण्यांत काय अर्थ आहे.

सौंदर्यासंबंधी हा आत्मनिष्ठ दृष्टिकोण झाला तुझा हे वस्तुनिष्ठ विधान नव्हे. पण भिंत पिवळी आहे हे विधान.
"अंतू, भिंत जर सुंदर असती तर तिच्यावर दुधाचा हिशेब लिहिला नसता आपण स्पष्टच बोलतो ह्या भिंतीवर तू कालच रात्री हा ढेकूण चिरडलास. समज, जेरुशा इझिकेलच्या मागल्या बांकावर वर्षभर बसत होतो‌आपण, तिच्या पाठीवर ढेकूण दिसला असता तर या सौंदर्यवाचक भिंतीवर तू ढेकूण चिरडलास तसा तू चिरडला असतास का? "नाउ टेल मी आता का गप्प?"

जेरुशा इझिकेलच्या आठवणीने अंतू अस्वस्थ झाला हे मला कळू शकत होते. 'जेरुशा हे सौंदर्याचे चालते बोलते प्रतीक आहे. असे त्यावेळी अंतूचे विधान होते. त्यावेळी पिवळ्या भिंतीवर त्यांचे मन जडले नव्हते. तिच्यामुळे आपल्या कॉलेजला (ते वर्ष आम्हीं झेविअर कॉलेजांत काढले.) लायब्ररी आहे हे अंतूला कळले होते. खंदकांत पडून शत्रूवर नजर ठेवावी तसा हाच हाच अंतू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, समग्र केळकर खंड वगैरे समोर मांडून, वाचनात गढलेल्या जेरुशाला उद्देशून सौंदर्यवाचक विधाने‌ करीत होता. त्यावेळी इंद्राच्या अप्सरांनी जेरुशाची वेणी घालावी आणि होलिवूडच्या तमाम नटींनी तिचे सॅण्डल्स साफ करावे, ही अंतूची सौंदर्यवाचक विधाने होती. 

आपले नावदेखील अनंत असण्यापेक्षा अॅण्टनी असते तर किती बरे झाले असते, अशासारखी असंख्य विधाने करणारा अंतू गणपुल्या 'भिंत पिवळी आहे' हे सौंदर्यवाचक विधान आहे, असे का सांगतो ह्याचा मला अंदाज येईना. जेरुशा इझिकेलच्या आठवणीने त्याला आलेल्या मुंग्या गेल्या असाव्या. कारण अंतू खिन्नपणाने हंसून माझ्यापाशी आला आणि म्हणाला,"तुला मी समजावून सांगूं का सौंदर्यवाचक विधानांचा विषय." अंतू, सांगणार असलास तर सांग बापडा पण हा विषय आता काही समजायचा राहिलाय का?"

"इतके दिवस मलाही तुझ्यासारखंच वाटत होतं. परंतु आपल्याला हा विषय नाही समजला. अंतू हे वाक्य उच्चारतांना मला थॉमस वूल्झेची आठवण झाली. मरतांना त्यानेही असेच काही उद्गार काढले होते म्हणतात.

असा एकदम विनयशील केव्हापासून झालास अंतू? सौंदर्य हा विषय तुला कळला नाही? मी तरी हे विनय म्हणून देखील मान्य करणार नाही. गुलाब मंत्रीचे ओठ ह्या विषयावर वेलणकराच्या हॉटेलात दोन तास तू मला काही काही सांगितलं होतंस ना? पावणे चार रुपये बिल होईपर्यंत आपण गुलाब मंत्रीच्या ओठांबद्दल बोलत होतो. सिल्लू काटपेटियाची मान किती नितळ आहे, ह्याबद्दल तूं संगमरवरापासून स्टेनलेस स्टीलपर्यंत सगळ्या जिनसा उपमेसाठी वापरल्या होत्यास अंतू अगदी तू आणि मी इथं आहोत, तेव्हा खरं बोलायला हरकत नाही. प्रमिला पेंडसेच्या लग्नाला आमंत्रणाशिवाय आपण गेलो आणि नारळ घेऊन बाहेर पडतांना प्रमिला पेंडसेचे हे शेवटच दर्शन म्हणून तो नारळ आपण आपल्या टेबलावर ठेवला होता. 

माझा नारळ आपण फोडून साखर घालून मारुतीच्या प्रसादासारखा खाल्ला आणि दुसऱ्या नारळात तू प्रमिलेची प्रतिमा पहात बसलास आणि ज्योती मेहता तिच्या बाकावर बसली तेव्हा जिथे फुले वेचली तिथे गोंवऱ्या का वेचायच्या, म्हणून तू बाष्प गद्गदित की काही तरी झाला होतास ना? इंटरची परीक्षा आठवते तुला? तुझ्या पुढल्या बाकावर शुभदा गडकरीचा नंबर होता. तिने सहज शेपटा उडवला तो तुझ्या पेपरवर पडला. त्याच्याकडे तीन तास पहात तू तो पेपर कोरा दिलास विसरलास का? 

"मानसिक क्रियांचा प्रांत सोडून तू शारीरिक क्रियांचा विचार करतो आहेस. तुझ्या बोलण्यात अंतर्गत विसंगती आहे. सौंदर्यांचा सांकेतिक किंवा अर्थरूपात्मक विचार कर. ऑस्बोर्न वाचला नाहीस तू."  चहा घे! " अंतूच्या ह्या बोलण्यावर ह्याहून मी अधिक काहीही बोलूं शकत नव्हतो. सौंदर्याची रवानगी इंद्रियातीत प्रांतांत करावी लागते. "अंतू कपातल्या चहाची रवानगी पोटात करीत म्हणाला,"हा विषय कठीण आहे. पण तो समजावून घेतला पाहिजे."
"चहा कसा झाला आहे?"
"सुंदर" अंतू म्हणाला.
"आता सुंदर हा शब्द कसा वापरलास?" मी त्याला पकडले.

"ऐक! सुंदर ही एकाच इंद्रियाशी निगडित असणारी संवेदना असेल तर श्रुती अगर दृक् यांपैकी.
"श्रुती अगर काय?"
"दृक्"
"दृक्?"

"दृक्" अंतू शेवटल्या अवस्थेतल्या रोग्यांकडे डॉक्टर पहातात तसा माझ्याकडे पहात म्हणाला.
"दृकू म्हणजे काय?"
"दृकू म्हणजे जे तूं पहातोस ते."
"म्हणजे तू हा चहा ... किंवा आपण गिरगावच्या नाक्यावर उभे राहून पहात होतो. ते? ते सगळे."
"दृक्! उदाहरणार्थ ही भिंत." अंतू पुन्हा भिंतीकडे वळला.
"अस्सं" मी रागाबरोबर चहा गिळला.

आता श्रुतिप्रत्यय आणि दृक्प्रत्यय यांच्याशी निगडित असलेली संवेदना यांपैकी कोणत्या तरी एका इंद्रियगटांतल्या कलाप्रकाराचा त्याग करणं आवश्यक आहे.
"काही कळलं नाह."
"तुला पहिल्यापासून समजावून सांगावं लागेल. आता हेच पहा. ही भिंत पिवळी आहे."
"अंतू, इफ यू डोंट माइंड, भिंत पिवळी आहे याखेरीज इतर काहीही पिवळं आहे म्हणून तू विषय समजावून सांग. श्रीखंड पिवळं आहे म्हण."
"नाही. तिथे श्रुति दृक् यांच्या जोडीला रसप्रत्यय येतो. शास्त्रीय चर्चेत शब्द फार काळजीपूर्वक वापरावे लागतात. नीट लक्ष दे भिंत पिवळी आहे."
"ठीक आहे."
"आता हे विधान ऐकल्यावर तुला काय वाटलं?"
"हे विधान तू करायला नको होतंस, असं वाटलं."
"ठीक आहे. तुला उदाहरण पटत नसलं तर दुसरं घेऊं. एक कागद घे." मग मी अंतूला कागद दिला. "पेन दे तुझं" मी पेन दिलं. आणि मग अंतूने कागदावर एक वाक्य लिहिलं. "राम काळा आहे."
"काय लिहिलं मी? रामा काळा आहे काय?"
"हो, पण रामा काळा आहे. यात सौंदर्यवाचक काय आहे अंतू? त्यापेक्षा सीता गोरी आहे, असं तरी लिही."
"तुझ्या लक्षात येणार नाही ते. जाऊं दे. 'क्ष' सुंदर आहे, चालेल?" 
"चालेल"
'आता 'क्ष' सुंदर आहे' या विधानाला आपण 'पे' असं म्हणू.
"का पण? 'क्ष' म्हणालास ना? आता हा 'पे' कुठला काढलास? आणि 'पे' वगैरे शब्द महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात नको लिहूंस."
"बरं, 'क्ष' सुंदर आहे' या विधानाला आपण 'ए' असं म्हणूं"
पण क्ष  म्हणतोय् ना आपण? पुन्हा 'क्ष' पुढे 'ए' कशाला?
"अरे 'क्ष' सुंदर आहे' हे विधान झालं. या विधानाचं नाव 'ए'.
"चालू दे."
"आता ह्या 'ए' ची आपण नीट तपासणी करूं."
" 'ए' ची तपासणी करायला 'ए' काय शाळा आहे की गटार आहे."

"हे बघ, विषय सोपा करण्याच्या दृष्टीने मी सांगतोय तुला! अगदी साध्या शब्दांत सांगतो. तू‌ऑस्बोर्न वाचला नाहीस. ह्यूम तरी."
"मला फक्त ह्यूम पाइप ठाऊक आहे."
"बरं काट"
"कोण"
"काट? निदान ॲरिस्टॉटल? प्लेटो? हेगेल? रिचर्ड्स्?."

"अंतू, तुला ठाऊक आहे की, रहस्यकथेशिवाय आणि गली अडीच वर्षे शनि माहात्म्या शिवाय मी काही वाचीत नाही. पुढल्या महिन्यात माझा शनि मार्गी होतोय. गुरु उच्चीचा येतोय्, त्यावेळी हे सगळे आणून टाक माझ्यापुढे. चिवड्यासारखा फडशा पाडीन या चोरांचा हा."
"निदान ऑस्बोर्न तरी वाचायला हवा होतास तू. हरकत नाही. पण हे नीट पहा. 'क्ष सुंदर आहे' ह्या विधानाला आपण 'ए' म्हटले. आता समज, 'क' ने हे विधान केलं. म्हणजे काय झालं?"
"काय व्हायचं आहे?"
"म्हणजे 'क' चा 'ए' हा वस्तुनिष्ठात्मक आत्माविष्कार झाला."
"बापरे! इतकी भानगड होते का 'क्ष सुंदर आहे हे 'ए' विधान 'क' ने केलं तर?"
यस्, माय डियर फ्रेण्ड तुझ्या बरंच ध्यानात आलं. लिहून घेऊं या. 'ए' नंतर 'क' आता बघ, हे विधान त्यानं का केलं? 
मला काय ठाऊक?

"सौंदर्यविषयक अनुभूतीचा संवेदनाशीलतेच्या पोटी‌आलेला प्रत्ययात्मक साक्षात्कार ह्या साक्षात्काराला आपण काय म्हणू या! अंतूने मला विचारले आणि मी जांभई दिली, पण अंतू नामोहरम झाला नाही. त्याने उत्साहाने त्याला 'अ' असे‌ नाव दिले. "ह्या अनुभूतीला आपण 'अ' म्हणूं."
"म्हण"
"म्हणजे 'क' ला 'ए' मधून 'अ' चा आत्मसाक्षात्कारी प्रत्यय आला."
"अस्सं! गंमत आहे" हॅटमधून ससा निघाल्यावर वाटते तसे मला वाटल्यामुळे मी उद्गारलो.
"आता सुंदर काय आहे सांग?"
किशोरी गव्हाणकर मी अभावितपणे बोलून गेलो. किशोरी आमच्या ऑफिसात 'इन्वर्ड आउटवर्ड' करते. दांतांच्या सौंदर्यस्पर्धेत कुठल्याशा टुथ पावडर कंपनीने तिला चांदीचे माकड आणि सहा बाटल्या बक्षीस दिल्या. त्यातली एक तिने हेडक्लार्कला दिली; पण कवळ्या ट्रुथ पावडरने धुता येत नसल्यामुळे हेडक्लार्कने ती मला दिली आणि मी किशोरीला थँक्स दिले. आणि किशोरी सगळे सुंदर दात दाखवीत कालच संध्याकाळी माझ्याकडे पाहून हसली. एवढ्या आंतरिक इंद्रियनिष्ठ संवेदनांच्या पार्श्वभूमींतून ते नाव माझ्या तोंडून घरंगळले.

"किशोरी गव्हाणकर कोण? जाऊ दे, ते मग पाहू. सुंदर काय आहे? क्ष! क्ष सुंदर आहे, हे मूळ विधान. आता 'ए' ह्या विधानाचा कर्ता 'क' आणि 'अ' हा प्रत्यय आणि 'क्ष' हे कर्म समजलं? कागदावर क्ष हे अक्षर लिहीत अंतू म्हणाला. आता नीट लक्ष दे. संवेदनावर्गीय उदाहरणे आणि अर्थाधिष्ठित उदाहरणे यांत एक फरक असूं शकेल. म्हणजे 'क' हा 'क्ष' सुंदर आहे या विधानाचा कर्ता 'क्ष' ला ज्यावेळी सुंदर दिसतोस म्हणाला"

"सुंदर दिसतेस म्हणाला असं म्हणालास तर शास्त्रीय चर्चेत चूक नाही ना होणार." 

"नाही, दिसतेस म्हण. हा, तेव्हा क जेव्हा तिला तसं म्हणाला तेव्हा कच्या आंतरिक अवस्थेची पातळी एका विशिष्ट थराची असेल. तो थर बदलूं हि शकेल. त्याला आपण 'ढ' म्हणू."
नाही. तोच 'क' पण पातळी वेगळी. त्याला 'र' म्हणू.
"म्हणजे आता हे बघ" कागदावरील अक्षरांवर बोट ठेवीत अंतू म्हणाला
हे त्या विधानाचे समीकरण तयार व्हायला लागले. आता दुसरा भाग विधान करणारा कोण?"
"तू"
"मी कसा? 'क' नाही का हे म्हणाला? म्हणजे पुन्हा 'क' मांडूं आता 'क्ष' सुंदर आहे या विधानांत 'क्ष' आहे' हे एक विधान आहे."
'अर्थात. 'क्ष' असल्याशिवाय सुंदर किंवा कुरूप कशी असेल? क्ष आहेच."
करेक्ट! मग 'क्ष' आहे आणि 'क्ष' सुंदर आहे, या विधानात 'क' ला ती सुंदर वाटली हे अहंकेंद्रीय विधान आहे. त्याला ती एकदम . सुंदर वाटली. तिला पाहिल्याबरोबर 'क' ला एकदम कळ आली" मी माझ्या विनोदाला एकटाच हंसलो. अंतू हंसला नाही.

त्याला एक रसेलच्या म्हणण्याप्रमाणे स्थलकालनिरपेक्ष वस्तुवाचीय दृक्भ्रम झाला, अगर काटच्या म्हणण्याप्रमाणे हेतु निरपेक्ष हेतु किंवा सौंदर्यनिरपेक्ष सौदर्यांचा, अथवा प्रो. सुरवात म्हणतात त्याप्रमाणे निरपेक्ष निरपेक्ष कौरुप्यहीनतेचा प्रत्ययाकारी प्रत्ययशून्याभास झाला. ह्याला आपण गाढवपणा म्हणूं या! आता माझा तोल सुटला. माझा चहा पिऊन अंतू वर माझाच अंत पहात होता. 

रागावू नकोस. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. ह्या अनुभूतीला आपण 'ळ' म्हणूं. म्हणजे पहा कागदावर पुढे 'ळ' हे‌ अक्षर लिहीत अंतू म्हणाला. 'क्ष' सुंदर आहे हे सौंदर्यवाचक विधान, व्याला आता 'ए' पासून 'ळ' पर्यंत या अशा पायऱ्या आल्या. त्याला आपण हॉरिझॉटल प्रोग्रेशन म्हणू हेगेलसारखं आता मला सांग, हे त्या क ला का वाटल.
"'काय"
'क्ष' सुंदर आहे म्हणून
का म्हणजे? 'क्ष'चे डोळे बदामी असतील, ओठ गुलाब मंत्रीसारखे असतील, केस शुभदा गड़करीसारखे असतील, मान सिल्लू काटपेटियासारखी असेल आणि जेठी अडवानीसारखी ती 'क्ष' आपल्या कॅडिलॅक् मधून शटलकॉ सारखी सपकन् उतरली असेल.
फाइन्! म्हणजे अनेकविध अनुभूतींचा एक कॉस्मिक आविष्कार असेल" 
"कॉस्मेटिक आविष्कार म्हणजे?"
"कॉस्मिक" अंतू ओरडला.
"अस्सं!" जाऊं द्या.
"ह्या कॉस्मिक आविष्काराला आपण 'ल' म्हणू."
"झालं?" मी हताशपणे  विचारले.

नाही. आता हा जो कॉस्मिक 'ल' हा आविष्कार आहे, त्याचं कारण काय?
ह्या सगळ्या पोरींनी आपल्या आयुष्याची आठ वर्षे खड्डयांत टाकली हे एकच.

जरा क्रूड शब्दांत सांगितलंस, परंतु भावार्थ बरोबर. म्हणजे जशी वस्तु तशी स्टिम्युलेशन्, जशी स्टिम्युलेशन् तशी संवेदना, जशी संवेदना तशी अटेन्शन
"अटेन्शन् म्हणजे उर्मिला कोडेकनाल बॅडमिंटन कोर्टात आली कीं आपण ओरडत होतो ते?"
जवळ जवळ तेच. आणि अटेन्शन, नंतर अॅटिट्यूड! आता वस्तूला आपण 'त' म्हणू, स्टिम्युलेशनला 'र' म्हणू, संवेदनेला काय म्हणशील?
"ग्रहण काय वाटेल ते"
"'श' म्हणू"
"ठीक आहे."
"स्टिम्युलेशन नंतर अटेन्शन! अटेन्शनला 'प' म्हणूं, या सगळ्या पायऱ्या लक्षात ठेव हा, त्याशिवाय सौंदर्यवाचक
विधानांची उपपत्ती लक्षात येणार नाही तुझ्या. काय समजलास?"
"पुढे बोल."
"आता अटेन्शन नंतर अॅटिट्यूड हे अॅटिट्यूड"

समोरच्या कागदावर काही कारण नसतांना एक पंचकोन काढीत अंतू म्हणाला,'हे अॅटिट्यूड समाजाच्या प्रत्येक थरांत निराळे असू शकेल. व्यक्तिगत आत्मप्रत्ययाची विभिन्नता ही सौंदर्य समीक्षेतली महान् समस्या आहे. त्याला आपण थरवाचक 'थ' म्हणूं. थर लक्षात आले का तुझ्या?"
थर आणि पारकर नावाचे कोणीतरी शाळेतल्या भूगोलांत होते.
"अरे ती वाळवंटं"
"मघांपासून वाळवंटांत हिंडल्यासारखंच वाटतंय मला. सौंदर्यात्मक वाळवंट म्हण. अ-क्ष-क वगैरे उंट त्यांतून फिरताहेत."

ह्या चित्राकृती झाल्या. तो विषय निराळा आहे. कलावंतांची इंद्रियानुभव ग्रहण क्षमता कशी असते किंवा सायनेस्थिशियाचा व्यापार किती पातळ्यांवरून होतो, हे प्रश्न अगदी वेगळे आहेत. तुला इंटरेस्ट असलं तर संध्याकाळी व्याख्यानाला ये माझ्याबरोबर.
"कुणाच्या?"
"प्रोफेसर सुरवाते" हे म्हणतांना अंतूच्या चेहऱ्यावर 'बुद्धं सरणं गच्छामि' ढंगाची गंभीरता होती. इतका विद्वान् आपल्याच काय पण परदेशांतही जन्माला यायचा आहे.
"कशावरून?"
"त्यांनी स्वतःच सांगितले. प्रत्येक विद्वान् गाढव कसा आहे, हे त्यांनीं कमालीच्या आत्मीयतेनं सिद्ध केलं आहे, कांट, हेगेल, ऑस्बोर्न, प्रोफेसर बूटलेगर, शांपेन द कॅम्पेन् सगळ्यांना नुसतं आडवं लोळवलं त्यांनी आणि मीदेखील हा कोण संपत्ती नवा पुरुषावतार आहे तो एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून व्याख्यानाला गेलो. दिवाणखाना तुडुंब भरला होता. काटू, हेगेल, अॅरिस्टॉटल वगैरे मंडळींचा खात्मा केल्यामुळे की काय कोण जाणे, प्रोफेसर सुरवात्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण धुंदी, खून चढतो तशी चढली होती. मला मात्र व्याख्यानांतला एक शब्द कळत नव्हता. मी 'कोण तुजविण सांग मला गुरुराया'चा भाव चेहऱ्यावर आणून अंतूकडे पाहू लागलो. अंतूचे लक्ष प्रोफेसर सुरवात्यांकडे नव्हते, दूरच्या एका कोपऱ्याच्या बाजूला एकाग्र चित्ताने त्याची सौंदर्यसमीक्षा चालली होती.

आता मला भिंत पिवळी का आहे, हे चटकन् उमगले. पिवळ्या भिंतीला टेकून आमची एके काळची पीतज्योती प्रीता गायकवाड बसली होती. तीच लेमनकलरची वेशभूषा आणि शेवंतीची पिवळी वेणी.
"अंतू प्रीता गायकवाड?" मी. शू : हळू" अंतू.

सौंदर्यशास्त्र कशाशी खातात हे आपल्या देशातल्या एकाही स्वतःला विद्वान् म्हणवणाऱ्याला कळलं असेल तर शपथ... प्रो. सुरवाते."
'अजून लग्न झालं नाही‌वाटतं तिचं?" मी."नाही. व्याख्यान ऐक" अंतू.
शेवंतीची वेणी ती रोज घालते मी.

अमूक एक पिवळं आहे म्हणून काय सौंदर्यवाचक प्रतिक्रिया आपल्या मनात थोडीच होणार आहे? पिवळं म्हणजे काय ते ठरवावं लागेल प्रो. सुरवाते.
प्रीता गायकवाड मी कुजबुजलो. मागून दोघांनी मला ' शू: शू'  केले.
"पिवळेपणा कशाने सिद्ध झाला, हे ठरवा. पण आपल्या देशातले विद्वान् महामूर्ख आहेत. ॲरिस्टॉट्लने एक गाढवपणा केला प्लेटोला तो सुधारण्याचा प्रयत्न करून सुधारता आला नाही. कसा ते सांगण्याचे हे स्थळ नव्हे." प्रोफेसर सुरवाते.
"प्रीता बोलली का तुझ्याशी?" मी "हो. व्याख्यान संपल्यावर भेटणार आहे. व्याख्यानाकडे लक्ष दे" अंतू अनिमिषं नजरेने भिंतीकडे पहात बोलला.

"तात्पर्य, बंधु आणि भगिनींनो, ह्या विषयाच्या वाटेला जाऊ नका. मला हा विषय कळला म्हणून तुम्हाला कळेलच असं नाही."

मला सुरवाते प्रोफेसरांच्या व्याख्यानांतले एवढेच काय ते कळले आणि सकाळची चर्चा फाडून टाकावी म्हणून मी खिशांतून कागद काढून पाहू लागलो. त्यांतल्या अ...क... क्ष वगैरे संज्ञांवरून डोळे फिरवता फिरवता एक निराळेच सौंदर्यवाचक विधान तयार झाले होते. ए... क. अ ... ...क्ष... र... क... ळ ल...त…..र...श…..प... थ -मी 'युरेका ' म्हणून अंतूकडे पाहिले.‌ अंतू पिवळ्या भिंतीच्या दिशेने पाहून हंसण्याचा प्रयत्न करीत होता आणि भिंतीच्या दिशेनें पीतांबरी शेवंती फुलून अधिक पिवळी होत होती आणि सुरवाते प्रोफेसर कंठकौशल्याची पराकाष्ठा करीत म्हणत होते. भिंत पिवळी आहे, ह्या एका साध्या सौदर्यवाचक विधानापासून सुरवात करून आपण सौंदर्याच्या आस्वादाच्या कक्षा काय? मर्यादा काय? पातळ्या कोणत्या? आगळी प्रचीती कोणती?

"प्रीता गायकवाड अजून तश्शी दिसते" मी गंभीरपणे त्या चिटोऱ्यावर आणखी एक सौंदर्यवाचक विधान लिहिले. आजूबाजूचे होनहार विद्वान् त्यांच्या कळपातल्या ह्या नव्या रंगरुटाकडे आदराने पहात होते...मी अंतूंकडे पहात होतो. अंतू प्रीताकडे पहात होता आणि प्रीता आपल्या मनगटावरल्या पिवळ्या जर्द सोनेरी घड्याळाकडे पहात होती.

Tags: दुर्गा तेलंग नयना होनावरकर खेळ प्रमिला पेंडसे बॅडमिंटन फ्रेंच शाहिस्तेखान जर्मनी स्पेन पु. ल. देशपांडे Durga Telang Nayana Honavarkar Sports Pramila Pendse Badminton French Shahistekhan Germany Spain P. L. Deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे ( 15 लेख )

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी