डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला अरुण, कृतिका, अमा, सुरंगिका, मिजान, शुवो या माझ्या भारतीय- श्रीलंकन- बांगलादेशी मित्र-मैत्रिणींसमवेत हिमाचल प्रदेशात जाता आले, बर्फात खेळता आले. इतरही अनेक प्रकारचे अनुभव घेता आले. आम्ही दिल्लीत अनेक जागांना भेटी दिल्या, हॉटेलांत एकत्र जेवलो. मी कधीही समुद्र पाहिलेला नव्हता, या गोष्टीवरून माझे वर्गमित्र माझी खूप मजा घ्यायचे.

आम्ही मूळचे दक्षिण भूतानमधील आणि अल्पसंख्य नेपाळीभाषक समूहापैकी. त्यामुळेच मला नेपाळी भाषा चांगली बोलता येते. (त्याचा मला पुढे सार्क युनिव्हर्सिटीत आल्यावर फायदाही झाला. आमच्या देशात हिंदी सीरियल्स व चित्रपट फारच मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यामुळे मला हिंदी चांगली समजते, पण ती भाषा मला सफाईदारपणे बोलता येत नाही.) माझा जन्म भूतानमधला असला तरी माझे बरेचसे आयुष्य भारतातच गेले आहे. इयत्ता तिसरीपर्यंत भूतानमध्ये शिकून पुढच्या शिक्षणासाठी मी दार्जिलिंगला आले. बारावीपर्यंत तिथे होते आणि नंतर पदवीसाठी दिल्लीत आले. माझी पदवी इंग्रजी साहित्यातील असली तरी आम्हाला राज्यशास्त्र हा एक वैकल्पिक विषय होता. तो घेतल्यामुळे मला आंतरराष्ट्रीय राजकारणात रस उत्पन्न झाला. 

माझ्या आईच्या एका बेस्ट फ्रेंडच्या मैत्रिणीचे मिस्टर प्राध्यापक दिल बहादूर हे सार्क युनिव्हर्सिटीमधील इकॉनॉमिक्स विभागात शिकवत होते. (आता ते सार्क युनिव्हर्सिटीमध्ये नाहीत.) त्यांनी मला असा सल्ला दिला की, ‘मी सार्क युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करावेत. इथे वेगळी मुले आणि वेगळी आव्हाने माझ्यासमोर येतील.’ त्यांचे म्हणणे ऐकून मी प्रवेशपरीक्षा दिली आणि माझी निवड होताच ॲडमिशन घेतली. आधीची तीन वर्षे दिल्लीतच राहत असल्यामुळे, सार्क युनिव्हर्सिटीत आल्यावर दिल्ली शहराशी जुळवून घेण्यासाठी असा काही संघर्ष मला करावा लागला नाही (इतर बऱ्याच जणांना तो करावा लागतो). माझ्या दोन्ही रूममेट्‌स भारतीय होत्या. एक मुलगी बिहारची, तर दुसरी आसामची. 

मला इथे कुठली गोष्ट फार प्रकर्षाने सुरुवातीलाच जाणवली असेल तर ती ही की, इथला प्रत्येक जण आपल्या देशाविषयी फक्त चांगलंच बोलत होता. आपल्या देशात या  गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या बघायलाच हव्यात वगैरे. हे पाहून मला धक्काच बसला. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी वाईट आहेत, याविषयी कोणीही काहीच बोलत नव्हते. अर्थात, ही गोष्ट नंतर बदलत गेली. जसजसा काळ लोटत गेला, तसतसे लोक अधिक मोकळे आणि ‘सेल्फ क्रिटिकल’ होत गेले. दिल्ली युनिव्हर्सिटीतील माझ्या तीन वर्षांत खास म्हणावे असे काहीच शिकवले गेले नव्हते. राज्यशास्त्रातील बेसिक गोष्टी- ज्याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास होऊ शकत नाही ते पण मला येत नव्हते. 

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये आल्यावर मात्र अगदी अचानक नियमित रीडिंग्ज्‌, गृहपाठ आणि परीक्षा यामुळे आम्ही एका चक्रात बांधले गेलो होतो. त्यातून काही गोष्टी शिकता आल्या. पण इथे एक कन्फेशन दिले पाहिजे... मी लेक्चर्स अटेंड करून जे काही शिकले, त्यापेक्षा अधिक वर्गातील मुला- मुलींबरोबर झालेल्या चर्चांमधून शिकायला मिळाले. आमच्या वर्गात अनेक विषयांवर वाद-विवाद होत असत. तिथे माझ्या लक्षात येत असे की, एकूणातच लोकांना भूतानविषयी फारच कमी माहिती आहे. भूतान म्हटले की केवळ ‘Gross National Happiness Index (GNH)’चा उल्लेख होत असे. 

जी गोष्ट मुलांबाबत, तीच आमच्या शिक्षकांबाबत. आणि GNH नाव घेतले तरी लोक ‘ते फार इंटरेस्टिंग आहे’ यापलीकडे जात नसत. एका अर्थी त्यांना त्याविषयीही फार माहिती नसावी. खरे सांगायचे तर जगभरात जीडीपीची चर्चा होत असते, आणि भूतान जरी GNH विषयी बोलत असला तरी आम्हाला GNH चे प्रमाण वाढवण्यासाठी खूप काम करणे गरजेचे आहे. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये भूतानच्या मुलांची संख्या खूपच कमी आहे. (हे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे) सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये भूतानचा एक विद्यार्थी होता, त्याचे आडनाव ‘नेपाल’ असे होते. त्यावरून लोक त्याला अनेकदा नेपाळी समजायचे! तसाच प्रकार माझ्या आडनावाबाबतही. माझे ‘शर्मा’ हे आडनाव ऐकून लोक मला भारतीय समजायचे. 

मला मेस कमिटीत भूतानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तो अनुभव अविस्मरणीय होता. त्यानिमित्ताने मुलांच्या खाण्याविषयीच्या मागण्या ऐकून घेता आल्या आणि काही शिकायला मिळाले. कोणाला जेवणात फक्त चिकन हवे होते तर कोणाला फक्त शाकाहारी जेवण हवे होते, कोणाला उत्तर भारतीय जेवण नको होते तर कोणाला  तिखट जेवण नको होते. एक ना अनेक मागण्या. भारतीय मुलांमध्येही ‘बहुसंख्य उत्तर भारतीय’ आणि ‘अल्पसंख्य दक्षिण भारतीय’ (कदाचित दहापेक्षाही कमी) असे दोन गट दृष्टीस पडायचे. 

आम्ही मेसमध्ये दर महिन्यातून किमान एकदा, एका देशाचे जेवण मुलांना देता यावे यासाठी प्रयत्न केले होते, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. एकूण जेवणात उत्तर भारतीय पदार्थांचे प्रमाण कमी करून पोहे, इडली वगैरे पदार्थ आणण्याचा प्रयत्न केला होता. सार्क युनिव्हर्सिटीमध्ये आठ देशांचे विद्यार्थी असल्याने इथे जे जेवण मिळते त्याबाबत आठ देशांचे प्रतिनिधित्व होणे आवश्यक आहे. नेहमी केवळ उत्तर भारतीय, जेवण देऊन चालणार नाही. युनिव्हर्सिटीत असताना साजऱ्या केलेल्या सणसमारंभांची चांगली आठवण माझ्या मनात आहे. त्यातही विशेषतः दिवाळी, होळी आणि ईद. मी भारतात राहत असल्याने मला दिवाळी आणि होळीची सेलिब्रेशन्स बघायला मिळाली होती. पण सार्क युनिव्हर्सिटी याबाबतही आपले वेगळेपण सोडायला तयार नव्हती. 

दिवाळीत सर्व देशांचे विद्यार्थी एकत्र फटके उडवणे, चांगले कपडे घालून बाहेर फिरायला जाणे वगैरे गोष्टींत मनापासून रस घ्यायचे. अफगाण मुलांमुळे मला पहिल्यांदा अगदी मोठ्या प्रमाणावर ईद कशी साजरी केली जाते हे बघायला मिळाले. इथली होळी मात्र विशेष होती. होळी हा रंगांचा सण आहे असे मला माझे भारतीय मित्र सांगायचे; पण तो चिखलाचाही सण आहे, हे मला इथेच कळले! 

आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे २१ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा- दिनाशिवाय सार्क युनिव्हर्सिटीतील समारंभ पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये एक वेगळेच फिलिंग असायचे. सगळीकडे रंग, ध्वनी, दिवे, गंध यांची उधळण असायची. त्या दिवशी एकाच वेळी आपण राष्ट्रवादी असल्याची भावना आणि एका व्यापक दक्षिण आशियाई समूहाचे घटक असल्याची जाणीव व्हायची. त्या दिवशीच्या कार्यक्रमांत सर्व देशांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असायचा. एका वर्षीच्या कार्यक्रमात मी भाग घेतला होता. त्यानिमित्ताने मला आपापल्या देशाची भाषा आणि संस्कृती किती महत्त्वाची असते याचे भान आले. 

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असतानाच मला एका भारतीय विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थी परिषदेसाठी (मे-जून २०१३) जर्मनीला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यावर लक्षात  आले की, युरोपियन विद्यार्थ्यांना ‘सार्क’ ही फारच कमी महत्त्वाची संघटना वाटते. ‘युरोपियन युनियन’ने प्रादेशिक एकीकरणाबाबत इतकी मजल मारली आहे की, त्या मानाने सार्क फारच मागे पडलेले आहे. तिथे अनेकांना तर भूतान कुठे आहे हेसुद्धा माहीत नव्हते. मला त्यांना सांगावे लागायचे की, भूतान हा भारत आणि चीनच्यामधे असलेला नेपाळसारखाच आणखी एक देश आहे. कारण त्यांना काही ना का कारणाने नेपाळ माहीत असायचा. तशीच परिस्थिती सार्क युनिव्हर्सिटीमध्येही होती. 

आमच्या अनेक कोर्सेसमध्ये नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचे उल्लेख असायचे. भारत आणि पाकिस्तानचे अस्तित्व तर फारच जास्त प्रमाणात जाणवायचे. पण या सगळ्यांत भूतान आणि मालदीव कुठेही दिसायचे नाहीत. अगदी चौथ्या सेमिस्टरमध्ये सर्वांसाठी सक्तीच्या असलेल्या Introduction to south Asia या कोर्समध्येही असेच व्हायचे. हे चित्र बदलायला हवे. 

सार्क युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला अरुण, कृतिका, अमा, सुरंगिका, मिजान, शुवो या माझ्या भारतीय- श्रीलंकन- बांगलादेशी मित्र-मैत्रिणींसमवेत हिमाचल प्रदेशात जाता आले. बर्फात खेळता आले. इतरही अनेक प्रकारचे अनुभव घेता आले. आम्ही दिल्लीत अनेक जागांना भेटी दिल्या, हॉटेलांत एकत्र जेवलो. मी कधीही समुद्र पाहिलेला नव्हता, या गोष्टीवरून माझे वर्गमित्र माझी खूप मजा घ्यायचे. इथे मात्र हे नोंदवणे आवश्यक आहे की सार्क युनिव्हर्सिटीतील अनुभव म्हणजे काही फक्त चांगल्या अनुभवांचे संकलन नव्हे, काही कटु अनुभवसुद्धा आले. त्यातून स्वतःला सावरावे लागले, नव्याने उभे राहावे लागले. हा साराच प्रवास खूप काही शिकवून गेला. मला एक व्यक्ती म्हणून फार स्ट्राँग बनवून गेला. 

इतरांकडे लक्ष न देता आपण आपले काम करत राहावे, हा धडा मी या काळात शिकले. आता एकूण त्या खडतर दिवसांकडे मागे वळून पाहताना हसायला येते. त्यामुळे समारोप करताना जर काही सांगायचे असेल तर ते हे की, मी आता जी काही आहे- मला जे काही येते- ते केवळ सार्क युनिव्हर्सिटीमुळे.

पल्लवीने International Relations मधून एम.ए. (२०१२-१४) केले असून सध्या ती दिल्लीतील एका वेबमासिकात ‘ज्युनिअर एडिटर’ म्हणून काम करत आहे.

Tags: सार्क विद्यापीठ भूतान पल्लवी शर्मा bhutan pallavi sharma saarc university weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके