एका उदात्त ध्येयासाठी आपण दोघे आयुष्यभर एकमेकांचे साथी म्हणून जगलो. आपल्या देशाचे अंतिम हित आणि तुम्हांला व मला एकमेकांबद्दल वाटत असलेले प्रेम व आदर यांमुळेच आपण सतत एकत्र राहिलो. आपल्या दृष्टिकोनात जे फरक आहेत आणि आपल्यात जे स्वभावभेद आहेत, त्यांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सतत एकमेकांचे सहकारी राहिलो.
3-2-1948
बापूजींच्या मृत्यूनंतर सर्व काही बदलून गेले आहे आणि आपल्याला एका वेगळ्या आणि अधिक कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे...
काही विघ्नसंतोषी माणसे सतत अफवा पसरवून, आपल्या दोघांमधील जे किरकोळ मतभेद असतील ते फार मोठे आहेत, असा दुष्ट प्रचार करीत असतात. यामुळे मला अतिशय दुःख होते. आपण असा खोडसाळपणा कठोरपणे थांबविला पाहिजे.
पाव शतकाहून अधिक काळ आपण दोघे एकमेकांचे निकटचे सहकारी आहोत. अनेक वादळांना आणि संकटांना आपण एकत्र तोंड दिले आहे. या कालखंडात माझे आपणाबद्दलचे प्रेम आणि आदर सतत वाढत गेला आहे, असे मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणू शकतो आणि काहीही घडले तरी हे प्रेम व हा आदर कधी कमी होणार नाही.
बापूजींच्या निधनानंतर ज्या आणीबाणीच्या आणि कसोटीच्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी आपण दोघांनी मित्र आणि सहकारी म्हणून एकत्र काम करणे हे मी माझे कर्तव्य मानतो आणि मला असे वाटते की आपणही तसेच मानीत असणार. केवळ वरकरणी नव्हे तर एकमेकांवर नितांत विश्वास आणि एकमेकांशी संपूर्ण निष्ठा ठेवूनच आपल्याला काम करावे लागेल. मी आपणास असे अभिवचन देतो की माझ्याकडून आपणास ही निष्ठा व हा विश्वास मिळेल.
आपणा दोघांना मनमोकळेपणाने बराच वेळ बोलता येईल असे मला वाटत होते. परंतु कामे इतकी प्रचंड आहेत की आपल्याला उसंतच मिळत नाही. म्हणून अशा मनमोकळ्या बोलण्यासाठी थांबावे असे मला वाटत नाही. त्यामुळेच मी आपणास हे पत्र लिहीत आहे. आपणाबद्दलचे प्रेम आणि स्नेह हे मी या पत्राद्वारा व्यक्त करू इच्छितो.
- जवाहरलाल नेहरू
5-2-1948
आपल्या पत्रातील उत्कट स्नेह आणि भावनेचा ओलावा यांमुळे माझे अंतःकरण हेलावून गेले. आपण आपल्या पत्रात उत्कटतेने आणि मनापासून ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तशाच भावना आपणासंबंधी माझ्याही आहेत.
एका उदात्त ध्येयासाठी आपण दोघे आयुष्यभर एकमेकांचे साथी म्हणून जगलो. आपल्या देशाचे अंतिम हित आणि तुम्हांला व मला एकमेकांबद्दल वाटत असलेले प्रेम व आदर यांमुळेच आपण सतत एकत्र राहिलो. आपल्या दृष्टिकोनात जे फरक आहेत आणि आपल्यात जे स्वभावभेद आहेत, त्यांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सतत एकमेकांचे सहकारी राहिलो.
बापूजींच्या निधनापूर्वी थोडा वेळच मी व बापूजी, तासाहूनही अधिक काळ एकमेकांशी बोलत बसलो होतो. माझे भाग्य म्हणूनच मला ही संधी मिळाली. आपल्या देशाच्या भवितव्यासंबंधी ते जो विचार करीत होते तोही आपल्या दोघांना एकत्र ठेवणारा बळकट धागा आहे. मी आपणास अशी ग्वाही देऊ इच्छितो की, माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतील आणि जी कर्तव्ये मला करावी लागतील, ती पार पाडताना बापूंच्या या विचाराच्या आधारेच सतत वागण्याचा मी निर्धार केला आहे.
- वल्लभभाई पटेल
Tags: Gandhi Respect Trust Bapu Congress Sardar Patel Friendship स्नेह प्रेम विश्वास मित्र सहकारी मतभेद बापू सरदार पटेल पंडित नेहरू काँग्रेस सरदार पटेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या