डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढीचे प्रतिनिधी असलेले पन्नालाल भाऊ यांनी 9 जुलै रोजी, 88 व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यलढ्यातून आकाराला आलेल्या मूल्यांच्या आधारावर नवा भारत घडवावा, असे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. त्या ध्येयपूर्तीचा आशय समाजवादी विचार, समाजवादी राज्यव्यवस्था व समाजवादी समाज रचना यात आहे, अशी त्यांची पक्की धारणा बनली. त्यासाठी प्रबोधन, रचना, संघर्ष या तिन्ही आघाड्यांवर गेली सात दशके ते कार्यरत राहिले. ‘पायपीट समजवादासाठी’  हे त्यांचे आत्मकथन, मनोविकास प्रकाशनाकडून ऑगस्ट महिन्यात येत आहे. त्यातील एक प्रकरण इथे प्रसिद्ध करीत आहोत. या प्रकरणातून भाऊंच्या सुरुवातीच्या काळातील जडणघडण कशी झाली असावी, हे काही प्रमाणात तरी कळते. 

- संपादक

दादीजी म्हणजे वडिलांची आई आणि नानीजी म्हणजे आईची आई. सन 1934 मधील गोष्ट. आम्ही त्या वेळी दाणे गल्लीत सुलाखेंच्या वाड्यात राहत होतो. काकाजींनी नुकतेच किराणा दुकान सुरू केले होते. ‘प्रेमराज पन्नालाल सुराणा’ असे दुकानाचे नाव ठेवले होते. मारवाड्यांत त्या वेळी अशी प्रथा होती की, आधी बापाचे नाव लिहायचे, मग मुलाचे. दोन बहिणींच्या पाठीवर मी जन्मलो होतो. चौकात मोक्याच्या ठिकाणी दुकानाला जागा भाड्याने मिळाली होती.

चार-पाच वर्षांनंतर गवळे गल्लीत सुलाखेंच्याच तबेल्यात राहायला गेलो. थोरले काका-भायजी यांचे घर त्याच गल्लीत शाळा नं.2 ला लागून होते. दुपारी मधल्या सुटीत शाळेच्या बाहेर आल्यावर दादीजी दिसायच्या. भायजींच्या घरासमोर अंथरलेल्या तळवटावर गोल साडी नेसलेल्या व डोक्यावर पदर घेतलेल्या एक-दोन शेजारणींसोबत बसायच्या. ओळखीचे जाणारे-येणारे त्यांच्यासमोर जाऊन वाकून पाया पडायचे. डबलकाष्टी धोतर नेसलेले, अंगात कॉलरचा शर्ट, डोक्यावर काळी टोपी अशा पोशाखातले जोशी समोरून चालले की, दादीजी बसल्या जागेवरूनच म्हणायच्या-‘पगे लागू महाराज!’ कारण ते ब्राह्मण होते. मारवाड्यांच्या लग्नकार्यात पौरोहित्य करायचे. आम्ही ओसवाल. म्हणजे जातीच्या उतरंडीत त्यांच्या खालच्या पायरीवरले. त्यामुळे जोशी तिशीच्या आत-बाहेर असले तरी पंचावन्न वर्षांच्या दादीजी त्यांचा मान राखायच्या. शरीर स्थूल झाले असल्याने त्यांना चटकन उठून उभे राहता येत नसे. छोटा काकाजी तिथून चौक ओलांडून उजवीकडे वळले की, तिसरे घर असलेल्या गंगावणेच्या वाड्यातल्या माडीवर राहायचे. चांदमल त्यांचे नाव. तेही काकाजींच्या किराणा दुकानातच काम करायचे. दादीजी त्यांच्याकडे राहायच्या. सगळ्यात धाकटा म्हणून. एका निपुत्रिक दिराला चांदमल हे दत्तक दिले होते. दादीजी सकाळचे जेवण उरकून गवळे गल्लीत भायजींच्या घरासमोर येऊन बसायच्या, त्या संध्याकाळपर्यंत. त्या वेळी तो रस्ता फारसा रहदारीचा नव्हता. दिवसभरात चुकून एखादी सायकल जायची-यायची. ‘मा’ म्हणजे थोरली चुलती त्यांना एक-दोनदा पाणी आणून द्यायच्या. दिवस मावळायच्या आत जेवायचे असायचे. म्हणून पाच-सहा वाजता दादीजींना विचारायच्या- ‘‘ब्याळू करो कै?’’... ‘‘कई कर्यो हे?’’ त्या विचारायच्या. ‘‘घोटेडी खिचडी करी हे. पापड शेकर चुरी कर लावू ना?’’ मा विचारायची. लहर लागली तर दादीजी ‘हो’ म्हणायच्या. तिथेच बसून जेवण करायच्या.

बाई म्हणजे माझी आई. ठाणकात (जैन श्वेतांबर स्थानक) साधू-साध्वी असले, तर दर्शनाला जाताना दादीजीजवळ थांबून पिंडऱ्या दाबत-दाबत ती पगेलागणी करायची. गवळे गल्लीतले पोटे व इतर एक-दोघांबरोबर मी सोलापूर रस्त्याला असलेल्या काँग्रेस भुवनच्या आवारात भरणाऱ्या सेवादल शाखेत जायचो. दिवेलागणीनंतर तिकडून परतताना गंगावणे वाड्यासमोर आलो की, कधी कधी हाक यायची- ‘‘बाबू, आव रे.’’ (पहिल्या मुलाला नावाने हाक मारायची नाही. बाबू म्हणायचे. नाव ऐकून कुणी दुष्टाव्याने करणी करू नये, यासाठी त्याच्या कानांवर खरे नाव जाऊ द्यायचे नाही. म्हणून बाबू हे टोपणनाव वापरायचे.) मग मी जिन्याने वर जाऊन खिडकीत बसलेल्या दादीजींच्या पाया पडायचो. आतून काकीजी बशीत काही तरी खाऊ द्यायच्या. लहर लागली की, दादीजी जुन्या आठवणी सांगायच्या.

त्यांचे नाव रामप्यारीबाई. लातुरात पापनाशीजवळ वसलेल्या भागात राहणाऱ्या व एका व्यापाऱ्याच्या दुकानात नोकरी करणाऱ्या दर्डांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. हैदराबादच्या निजामाने आपल्या प्रदेशात व्यापार-उदीम वाढावा, यासाठी काही मारवाडी व गुजराती कुटुंबांना आणून लातुरात वसवले होते. पापनाशी तळ्याजवळ आखून दिलेल्या प्रशस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांची घरे होती. व्यापारासाठी गंजगोलाईत जावे लागायचे. बार्शी हे ब्रिटिश अमदानीतील सोलापूर जिल्ह्यातील शेतमालाची मोठी उतारपेठ असलेले गाव.

लातूरच्या काही व्यापारी पेढ्यांच्या शाखा बार्शीत होत्या. त्यामुळे लोकांचे जाणे-येणे, सोयरसंबंध व्हायचे. राजस्थानातील सादडी वा तत्सम गावातून लोटा-उपरणे घेऊन निघालेले एक गृहस्थ 1885 च्या सुमारास बार्शीला येऊन स्थायिक झाले. त्यांची दोन मुले हिंमतलाल व जेठमल. हिंमतलाल माझे आजोबा. त्यांच्याशी लातूरच्या रामप्यारीबार्इंचे लग्न होऊन त्या बार्शीतल्या ऐनापूर मारुतीजवळच्या एका वाड्यातल्या बिऱ्हाडकरू बनल्या. त्यांना मिश्रीलाल, पे्रमराज व चांदमल ही तीन मुले झाली. एक मुलगी झाली होती, पण ती लवकरच गेली. दीर जेठमल दुसऱ्या खोलीत राहायचे. त्यांची बायको लवकर गेली. निपुत्रिक मेले तर माणूस नरकात जातो, अशी समजूत होती. म्हणून दादीजींचा सगळ्यात धाकटा मुलगा चांदमल हा जेठमलजींना गोद (दत्तक) दिला होता. व्यापाऱ्यांच्या दुकानात नोकरी करणाराला त्या वेळी एखादा रुपया महिना वेतन असायचे. पोरे बारा-पंधरा वर्षांची असताना हिंमतमल अचानक वारले. रामप्यारीबाई उघड्यावर पडल्या. आजूबाजूच्या माहेश्वरी कुटुंबांनी आसरा दिला. कसे तरी भाकरी-चटणी खाऊ घालून मुलांना वाढवले. तेल नसल्याने चिमणी लावता यायची नाही. दिवस मावळायच्या आत सगळे उरकायचे. मिश्रीलाल एका दुकानात काम करत होते, तर प्रेमराज दुसऱ्या दुकानात. त्यांना दर महा दोन रुपये पगार मिळायचा. बारा-पंधरा कोसांवर असलेल्या तेरखेडा गावच्या बत्ताशीबाईचा मिश्रीलालशी विवाह झाला. बार्शीतल्याच मुथाजींची मुलगी गोदाबाई पुण्याच्या किसनदास तालेराला दिली होती. त्यांची मुलगी जडाव. तिचा विवाह प्रेमराज (माझे वडील)शी झाला. चांदमलचा विवाह नगर जिल्ह्यातील विसापूरजवळील वागुंडे या छोट्याशा खेड्यातल्या नाजूबाईशी झाला होता. पे्रमराजला दोन मुलींवर मुलगा झाला, तो मी पन्नालाल. पे्रमराजने व्यापाराचे कौशल्य आत्मसात केले होते. माझ्या जन्मानंतर लगेच त्यांनी स्वत:चे किराणा दुकान चालू केले. ‘‘तुझी आई पुण्याची. चौथी पास झालेली. बाकी आम्ही सगळ्या अडाणी. त्यामुळे ती तोऱ्यात वागते. धर्मध्यान मात्र खूप करते.’’ एकाच वेळी तक्रार व कौतुक करत दादीजी सांगायच्या.

ओसवाल लोक जैनधर्मी, तर माहेश्वरी हे वैष्णवपंथी. तिरुपतीचा बालाजी वा श्रीकृष्ण हा त्यांचा देव. दादीजी जन्माने जैनधर्मी. पण लातूरला बहुतेक शेजारी माहेश्वरी. म्हणून त्यांच्याही देवळात जायचे नाही. जैनमंदिर त्या वेळी नव्हते, म्हणून तिथेही जायचे नाही. ते वळण बार्शीत आल्यावरही कायम राहिले. धर्माचे त्यांना विशेष काही नव्हते.

मिश्रीलालचा मुलगा मदन. पहिला मुलगा असल्याने त्यालाही नावाने हाक मारायची नाही. तो थोडा अशक्त होता. म्हणून दादीजी त्याला ‘रोड्या’ म्हणायच्या. जवळ घेऊन कुरवाळायच्या. तोंडावर हात फिरवून बोटे मोडत ‘इडा पिडा टळो’ म्हणायच्या.

काकाजीबाबतही ( म्हणजे प्रेमराज) त्या हळव्या होत्या. त्यांना लहानपणी देवी आल्या होत्या. त्याचे व्रण तोंडावर शेवटपर्यंत राहिले. घर ते दुकान व दुकान ते घर- असे त्यांचे असायचे. ना देवळात जायचे, ना ठाणकात. एकदा ते सोमवार पेठेतूून येताना दादीजींनी खिडकीतून पाहिले. तीन-चार दिवसांनी परत ते सोमवार पेठेतून येताना दिसल्याबरोबर दादीजींनी हाक मारली-‘‘पेमूऽऽ’’. काकाजी वर आले. मी तिथेच बसलो होतोे. दादीजींनी विचारले-‘‘कुठे गेला होता?’’ काकाजी काही बोलले नाहीत.

दादीजी जोरात बोलल्या- ‘‘चंदूबापूकडे गेला होता ना?’’

‘‘हो.’’ काकाजींनी मान खाली घालून उत्तर दिले.

‘‘कशासाठी त्यांच्याकडून रकमा उचलतोस? तुझे दुकान तर चांगले चालले आहे. सट्टा खेळायला लागलास काय?’’

काकाजी गप्पच. त्या वेळी हळदीचा वायदेबाजार जोरात चालायचा.

‘‘तू झूठ बोले’’- दादीजींचा आवाज एकदम वाढला. त्यांचे सगळे अंग थरथरायला लागले. आतून काकीजी बोलल्या- ‘‘पितर आयेडा दिसे. भायजीने पण बुलावो.’’

भायजी परगावी गेले होते. काकाजी भेदरून गेले होते. दादीजींचे पाय धरून बोलले- ‘‘चूक हुर्‌ई. माफ करजो.’’

दादीजी घुमतच होत्या. धाकटे (चांदमल)काकाजी दुकानातून आले. समोरच्या कोनाड्यात पाण्याच्या माठाजवळ मातीच्या कुंडीत गहू, ज्वारीचे अंकुर फुटलेले होते. ते पितरांचे स्मारक होते. त्यातील ओली माती घेऊन त्यांनी स्वत:च्या व काकाजींच्या कपाळाला लावली. चूक झाली, माफ करा- असे काकाजी दोन-तीनदा बोलले. काकाजींनी दादीजींच्या कपाळालाही ओल्या मातीचा टिळा लावला. थोड्या वेळाने त्या शांत झाल्या. जणू भानावर आल्या. त्यांनी विचारले. ‘‘काय झाले होते?’’

धाकटे काकाजी म्हणाले, ‘‘पितर आले होते. आम्ही त्यांची माफी मागितली. उद्या लापशीचे जेवण करू. तुम्हीही शांत राहा.’’

तेव्हापासून काकाजी चंदूबापूकडे गेले नाहीत.

नानीजी म्हणजे पुण्याच्या गोदाबाई तालेरा. आमची आई जडाव ही त्यांची एकुलती एक मुलगी. नानाजींनी सोमवार पेठेतील नरपतगीर चौकात मारुतीच्या देवळाशेजारी एक वाडा विकत घेऊन ठेवला होता. त्यातल्या एका खोलीत नानीजी राहायच्या. शेजारच्या तीन खोल्या व पुढील बाजूचे दुकान भाड्याने दिलेले. त्याच्या पलीकडे एक परीट व माडीवर एका ख्रिस्ती नोकरदाराचे बिऱ्हाड, हे भाडेकरी. दरमहा भाडे वसूल करायच्या. मात्र त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. पावत्या करून देण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशनरीचे दुकान चालवणारे व गहाणवटीचाही व्यवसाय करणारे त्यांचे दीर सुखराजजी तालेरा यांच्याकडे त्या जायच्या. त्यांचा मुलगा धनराज शाळेत शिकत होता. गोदाबाई त्याच्याकडून पावत्या लिहून घ्यायच्या.

दररोज संध्याकाळी दोन कि.मी.वरील नाना पेठेतील स्थानकात सामाईक-प्रतिक्रमणासाठी त्या जायच्या. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी तिच्याकडे जायचो. मी इंग्रजी चौथीतून पाचवीत जाणार होतो. बाई म्हणाली, ‘‘तू आता शिकायला पुण्याला नानीजीकडे जा. तिला तेवढीच सोबत होईल.’’

रास्ता पेठेतील राजा धनराजगिरजी हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला. सेवादलाची शाखा घराजवळच गाडगेमहाराज धर्मशाळेच्या पटांगणात भरायची. घरी झाडून काढायचे, पाणी भरायचे बाईने शिकवले होतेच. नानीजी मला ते फारसे करू देत नव्हती. पुढच्या महिन्याच्या चार तारखेला ती मला घेऊन सुखराज नानाजींकडे गेली. धनराजला म्हणाली- ‘‘याला पावती कशी लिहायची ते शिकवा.’’ मी ते शिकून घेतल्याने तिची महिन्याची ती फेरी वाचली. नरपतगीर चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बैलगाड्या यायच्या-जायच्या. रस्त्यावर पडलेले शेण-गोवऱ्या करण्यासाठी नानीजी आणायच्या. मीही ते काम करू लागलो. सेवादलाचा मोठा मेळावा साताऱ्याला 1947 मध्ये झाला. पुण्यातल्या सैनिकांबरोबर मीही सायकलवर गेलो. वार्षिक परीक्षा झाली. सुट्टीसाठी बार्शीला जायचे तर बाईचा (आई) निरोप आला की, दाखला घेऊनच ये. मला काही कळेना. मग नानीजी म्हणाल्या, ‘‘मी आता दीक्षा घेणार आहे. मग तू इथे एकटा कसा राहणार?’’

पुढे दीड-दोन महिन्यांतच बार्शीत तिचा दीक्षा-समारंभ झाला. पांढराशुभ्र लेंगा, ओढणी, तोंडावर मुहपत्ती, एका हातात भिक्षापात्राची झोळी व दुसऱ्यात कुंडणी घेतली. आदल्या संध्याकाळी डोक्यावरचे सगळे केस हाताने उपटून टाकले होते. (त्याला लोच म्हणतात.) समारंभ संपला. चार दिवस बार्शीतच त्यांचा टुप्पा राहिला. मग त्यांचा विहार चालू झाला. चातुर्मास सोडून इतर ॠतूत एका गावी पंधरा दिवसांपेक्षा जास्त राहायचे नाही, असा साधू-साध्वींसाठी नियम आहे.

दहा वर्षांनंतरची गोष्ट. कॉलेज संपवून मी बार्शीला आलो होतो. भायजींच्या दारात दादीजी बसलेल्या दिसल्या. ‘‘बाबूशेठ, इकडे या’’ त्यांनी हाक दिली. पाया पडून खाली बसल्याबरोबर म्हणाल्या, ‘‘काय तू बिरामणीशी लग्न करणार आहेस?’’ मी मानेने ‘हो’ म्हटले.

‘‘अरे, असे धर्माला सोडून वागू नकोस. आपल्या जातीत काय सुंदर मुली नाहीत काय?’’ मी काय बोलणार? त्यानंतर कधी त्यांच्याशी बोलणे झाले नाही. मी शिक्षणासाठी, पुढे भूदानासाठी लांब-लांबच असायचो.

शेवटचा प्रसंग आठवतोय. कॅन्सरने काकाजींना घट्ट धरले होते. धाकट्या काकाजींचा मुलगा कचरूलाल याच्या लग्नाची जान पुण्याला जायची होती. भायजींच्या वाड्यात दादीजी बसल्या होत्या. मी दिसल्याबरोबर म्हणाल्या, ‘‘काय रे, पेमू दोन-चार दिवस काढील ना?’’

‘‘मला तर वाटते, आणखी आठ-पंधरा दिवस सहज निघतील.’’

पाच-सात मिनिटे बोलत बसलो. तेवढ्यात धाकटा भाऊ बोलवायला आला. मी गडबडीने घरी गेलो. काकाजींनी शेवटचा श्वास घेतला होता. रडारड सुरू झाली होती. मला परत वाड्यावरून बोलावणे आले. दादीजीजवळ भायजी व मालू बसले होेते. मला म्हणाले, ‘‘आता कसे करायचे? जान रवाना करायची, की रद्द करायची?’’ दादीजी भडकून म्हणाल्या, ‘‘एवढा मोठा पेमू माझ्या डोळ्यांदेखत गेला अन्‌ तुम्हाला जान पाठवायचे सुचते?’’ मालुजी म्हणाले- ‘‘माजी, थोडे शांत व्हा. तुमच्या एका डोळ्यात आसू आहेत, तर दुसऱ्यात हरख (हर्ष). आपण आता मोडता घातला, तर आगल्या धन्याचा सगळा खर्च वाया जाईल.’’ भाईजी मला म्हणाले, ‘‘जा, तुझ्या बाईला विचारून ये, काय करायचे ते.’’ घरी गेलो. बाई म्हणाली, ‘‘लग्न नको रद्द करायला. यांच्या जिवाचे सोने झाले. जान रवाना करायला सांग.’’ मी परत वाड्यात जाऊन तसे सांगितले. छोट्या काकाजींना जानची तयारी करायला सांगितले. मोजके लोकच पुण्याला गेले. आम्ही सकाळच्या स्मशानयात्रेच्या तयारीला लागलो.

त्यानंतर दादीजींनी अंथरूण धरले ते कायमचे. एक-दीड महिन्यात त्याही गेल्या. काकाजी गेल्यावर बाईनेही दीक्षा घेतली. त्यांचे नाव जगतकंवरजी, तर नानीजींचे पुष्पकंवरजी. दोघींचे गुरू मात्र वेगळे होते. पुष्पकंवरजींनी आचार्य श्री आनंदॠषीजींच्या संप्रदायात दीक्षा घेतली. आचार्यश्री स्वत: साधूपणाची सगळी पथ्ये कडकपणे पाळायचे. मात्र प्रवचन केवळ मारवाडी/गुजराती जैन श्रावकांपुरते न करता परिसरातील सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांसाठी संध्याकाळी निवांत वेळी ठेवून मराठीतून बोलायचे. अहमदनगर-नाशिक-पुणे जिल्ह्यांत त्यांचा मोठा प्रभाव होता. आमच्यासारख्या सार्वजनिक कार्यकर्त्यांशीही सामाजिक प्रश्नांवर चर्चा करायचे. जगतकंवरजींनी ज्यांच्याकडे दीक्षा घेतली, ते गणेशमलजी-महाराज यांचे व्रत कठोर असायचे. ते फक्त जैन श्रावकांशी व तेही खादीधारी असले तरच बोलायचे.

वीस-पंचवीस वर्षे दोघींचे विहार वेगवेगळ्या भागांत झाले. पुष्पकंवरजींनी नव्वदी गाठली होती. त्यांच्यासोबतच्या साध्वी त्यांचा कंटाळा करायला लागल्या. बडीबाईने ते पाहून ठरवले की, त्या दोघींना एकत्र बार्शीतच ठाणापती करायचे. विहार करणे दोघींनाही शक्य नव्हते. दोन्ही संप्रदायांच्या ज्येष्ठ साधूंकडे जाऊन तसे करायला तिने त्यांची आज्ञा मिळवली. दोघी आधी सोलापूरला एकत्र आल्या. जमनाबाईने त्यांची सेवा केली. तीन-चार दिवसांनी त्या बार्शीकडे निघाल्या. आठ-नऊ दिवसांनी पोहोचल्या. तुळशीराम रस्त्याला एका श्रावकाचे घर रिकामे होते. त्यांना विचारून त्या जागेला स्थानकाचे रूप दिले. त्या दोघींना तिथे ठाणापती केले.

पुष्पकंवरजींच्या दर्शनाला मी बऱ्याच कालावधीनंतर गेलो. वंदना करून समोर बसलो. त्या म्हणाल्या, ‘‘कई श्रावकजी, कई काम करो हो?’’ (आधी त्या मला भाणू म्हणायच्या. दीक्षा घेतल्यावर नाती विसरायची असतात, म्हणून त्यांनी श्रावकजी म्हटले.) मी म्हणालो, ‘‘एका दैनिकाचा संपादक आहे.’’ त्यांना अर्थ कळला नाही, असे शेजारी बसलेल्या एका श्राविकेला वाटले. तिने त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन खुलासा केला, ‘‘लिखनारो काम करे.’’ मग पुष्पकंवरजी म्हणाल्या, ‘‘मालक चोखो पगार देवे दिखे. थाना कपडा तो चोखा हे.’’ तिथे असलेले सगळेच हसले. त्यांच्या काळात लिहिण्याचे काम करणारा म्हणजे दुकानातला मुनीम. अन्‌ त्याला पगार जेमतेम असायचा. मलाही पगार थोडाच होता. पण कपडे इस्त्रीचे घातले होते.

जगतकंवरजीमहाराजांना आपल्या आईची म्हातारपणी सेवा करायला मिळते आहे याचे मोठे समाधान होते. शांतिलालची बायको लीलाताई व मुुली हेमा-वंदना या दिवसातून दोन-तीनदा जायच्या. वीणा दिवसभराचे काम संपवून रात्री जायची. त्या दोघींचे पाय चेपायची. त्यांना ते भारी आवडायचे. एकदा पुष्पकंवरजी तिला म्हणाल्या, ‘‘थोडो धरमध्यान करता जावो.’’ जगतकंवरजी म्हणाल्या, ‘‘उने कई केवो? उरो धरमध्यान घणो बड्डो है, गोरगरीबारी घणी सेवा करे.’’ वीणेच्या अंगावर मूठभर मांस चढले.

तीन-चार महिन्यांनी पुष्पकंवरजींनी संथारा घेतला. 93 वर्षांचे आयुष्य झालेले. अंगात नुसती मूठभर हाडे राहिली होती. संथारा पाच दिवसांनी पचला. मी औरंगाबादला होतो. फोन आल्याबरोबर निघून सकाळी बार्शीला पोहोचलो. त्यांची यात्रा निघाली. त्या साध्वी असल्याने आम्ही घरवाल्यांनी काही करायचे नव्हते. जैन श्रावक संघाने सगळी तयारी व खर्च केला. छानशा डोलीत शव बसवले होते, वर नक्षीदार छत. चार खांबांवर चांदीचे छोटे कळस. रस्ताभर कुणी कुणी नाणी उधळली. जामगाव रस्त्याला एका ओढ्याच्या काठावर थोडी जागा साफसूफ केली होती. तिथे डोली टेकवली. त्या चार कळसांचे लिलाव पुकारण्यात आले. जमनाबाई मला म्हणत होती की, आम्ही जास्तीत जास्त बोली बोलून त्या पुण्य वस्तू घरात ठेवाव्यात, म्हणजे सुख-समृद्धी लाभेल. आमचा त्याच्यावर विश्वास नाही आणि खिशात तेवढे पैसेेही नव्हते. शहरातल्या चार श्रीमंत व्यापाऱ्यांनी ते कळस घेतले. त्याचे पैसे जैन स्थानकाच्या धर्मादाय खात्यात जमा झाले.

साधू-साध्वींनी प्रेतयात्रेत जायचे नसते. जगतकँवरजी स्थानकात एकट्याच होत्या. तिकडून परतल्यावर आम्ही त्यांच्या दर्शनाला गेेलो. इतक्या वर्षांची संगत तुटली होती. त्यांच्या चर्येवरील विषण्णता आमच्या काळजाला घरे पाडीत होती.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात