डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘चले जाव’ चळवळ, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि 1975 ची ‘राष्ट्रीय आणीबाणी’ या तीनही समर- प्रसंगी तुरुंगवास भोगलेले मधु लिमये (1922- 95) समाजवादी पक्षाचे आघाडीचे नेते होते. उत्कृष्ट संसदपटू अशी त्यांची ख्याती होती, त्यांनी बिहारमधील मुंगेर व बांका या लोकसभा मतदार संघांचे प्रतिनिधीत्व प्रत्येकी दोन वेळा केले आणि त्या दोन्ही मतदार संघांतून एकेकदा पराभवही त्यांच्या वाट्याला आला. आजचे व कालचे अनेक नेते व बुद्धिवंत त्यांना आपले मेंटोर मानत असत. त्यांनी समाजवाद, संविधान, लोकशाही आणि अन्य अनेक राष्ट्रीय प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमधून विपुल लेखन केले. त्यातून आकाराला आलेली लहान- मोठी अशी चार डझनांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कालच्या 1 मेपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. त्यांची स्मृती जागवणारे आणखी काही लेख पुढील वर्षभरात प्रसिद्ध होतील. ...संपादक  

भारतीय समाजवादी चळवळीतील एक झुंजार नेते, विचारवंत व लेखक या नात्याने मधु लिमयेंच्या कार्यकर्तृत्वाचा खोल ठसा भारतीय इतिहासाच्या अनेक पानांवर उमटलेला आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ 1 मे रोजी झाला आहे. त्यानिमित्ताने महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्मरण करणे उचित ठरेल. 

खानदेशात साने गुरुजींच्या सोबत 

1934 मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासात मधुजी 1936 ला ऐतिहासिक फैजपूर काँग्रेसच्या निमित्ताने आले. पुण्यात एस.एम.जोशी व ना.ग.गोरे यांनी या चुणचुणीत व अभ्यासू युवकाला पार्टीच्या बांधणीसाठी खान्देशात जायला सांगितले. तेव्हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणी एका हायस्कूलमध्ये साने गुरुजी शिक्षक म्हणून काम करत होते. लहान मुलांना गोष्टी सांगणे, कविता रचणे, वसतिगृहाचे काम पाहत असता विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित भित्तिदैनिक चालवणे, असे काम गुरुजी करीत होते. शाळेच्या व्यवस्थापकांपैकी एक असलेले प्रतापशेठ यांच्या कापड गिरणीतील कामगारांना चांगले वेतन मिळावे, कामाचे तास ठरावीक असावेत, आदी मागण्यांवर कामगार संघटना त्याच काळात काम करू लागली होती. त्यामध्ये गुरुजीही लक्ष घालत होते. गावातल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याही काही प्रश्नांवर सुरू झालेल्या संपात गुरुजींनी उडी घेतली होती. नंतर 1931 मध्ये सत्याग्रह केल्याबद्दल झालेली शिक्षा भोगायला ते त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. तेथून परत आल्यावर गुरुजींनी नोकरी न करता काँग्रेसच्या व शेतकरी कामगारांच्या चळवळीला वाहून घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांना समजदार व कामसू कार्यकर्त्याची गरज आहे, हे ओळखून एस.एम.नीं मधुजींना तिकडे पाठवले. पुढे 1936   मध्ये काँगे्रसचे राष्ट्रीय अधिवेशन पहिल्यांदाच ग्रामीण भागात घ्यायचे ठरले होते. 

राष्ट्र सेवा दलाचे पथक उभारण्यात त्यांना मधुजींची मोठी मदत झाली. पुढे शेतकऱ्यांचे मोर्चे व कामगारांच्या संघटना यांना जोर चढला होता. 1939 मध्ये युरोपात जर्मनीविरुद्ध इंग्लंडने सुरू केलेल्या युद्धात हिटलरला विरोध करायचा असला तरी भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी ब्रिटनचे राज्यकर्ते मान्य करत नसल्याने त्यांच्या विरुद्ध चळवळ चालवण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवले होते. त्या ओघात अमळनेर, खान्देश भाग व पुढे मुंबईत गुरुजींच्या कामाचा पसारा वाढला. मधुजीही त्यांच्यासोबत मुंबईत पोहोचले व तेथून पुढे तेच त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र झाले. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात गुरुजींसकट काही कार्यकर्ते भूमिगत झाले होते. तो मोठा साहसवादी व जोखीमभरल्या हालचालींचा काळ होता. मधुजींनाही तुरुंगवास घडला. पुढे 1947 मध्ये वाटाघाटीच्या मार्गाने भारताला स्वांतत्र्य मिळाले. 1917 मध्ये रशियात क्रांती होऊन अस्तित्वात आलेल्या सोव्हिएत युनियनच्या प्रयोगाबद्दल जगभरच्या चळवळ्या तरुणांचे रक्त सळसळत होते. मात्र कामगारवर्गांच्या हुकूमशाहीच्या नावाखाली तेथील सर्वंकष सत्ता अनेक ध्येयवादी नेते, कार्यकर्त्यांना सुळावर (मतभेद आहेत म्हणून) चढवू लागली. समाजवादाला व्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखणाऱ्या लोकशाहीची जोड देणे श्रेयस्कर मानलेल्या कॉ.सो.पा.ने सोव्हिएत युनियनच्या वर्चस्वातून बाजूला होऊन लोकशाही समाजवादाची वेगळी आंतरराष्ट्रीय संघटना चालवण्याचे ठरवले. 

आंतरराष्ट्रीय समाजवाद 

1948 मध्ये म्यानमार (त्या वेळच्या ब्रह्मदेशात) आँग सॉन या समाजवादी नेत्याचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ होते. आशियातील समाजवाद्यांची व्यापक एकजूट उभारण्याच्या हेतूने पहिली आशियायी समाजवादी संमेलन यांगीन (त्या वेळचा रंगून) येथे भरले होते. सीएसपीच्या शिष्टमंडळात मधु लिमये या तरुणाचा अंर्तभाव करण्यात आला होता. पुढे हेलसिंकी येथे होणाऱ्या सोशॅलिस्ट इंटरनॅशनलमध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायची संधी मधुजींना मिळाली. त्यांच्या प्रवासखर्चाची सोय गुरुजींनी केली होती. मधुजींची तेथील वार्तापत्रे ‘साधना’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अशा प्रकारची कामे करायची संधी अगदी तरुण वयात त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद, हुकूमशाही, लष्करशाही या विविध व्यवस्था व त्यांच्या मुळाशी वैचारिक दृष्टिकोन यांचा सखोल व तौलनिक अभ्यास केल्याने त्यांची स्वत:ची पक्की व सुसंगत वैचारिक बैठक तयार झाली होती. भावी आयुष्यात एका बाजूला जनसामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलने चालवणे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही समाजवादाची मूळ मांडणी कशी समाजहितकारी आहे; याबद्दलचे लिखाण त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून केले. कार्यकर्त्यांच्या भावी पिढ्यांना हे साहित्य खूपच उपयुक्त ठरत आहे. 

गोवा सत्यागृह 

1948 मध्ये सी.एस.पी. काँगे्रसच्या बाहेर पडली. त्या वेळी मुंबई, कोईमतूर, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद, कानपूर आदी ठिकाणी कापडगिरण्या कामगारांच्या संघटना समाजवादी चालवत होते. बिहार व प.बंगालमध्ये कोळशाच्या खाणी व लोखंड-पोलादाचे कारखाने, यातील  कामगार यांच्याही संघटनांत समाजवादी काम करत होते. त्या क्षेत्रात कम्युनिस्टांच्याही संघटना होत्या. त्यामुळे स्पर्धा व संघर्ष चालत असत. काँग्रेस व कम्युनिस्ट या दोहोंना समान अंतरावर ठेवून समाजवाद्यांनी आपल्या संघटना चालवाव्यात, हा लोहियांचा दृष्टिकोन मधुजी व अन्य कार्यकर्त्यांनी प्रमाण मानला होता. 

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा या छोट्याशा प्रदेशावर साडेचारशे वर्षांपासून पोर्तुगीजांचे राज्य होते व ते जास्त दडपशाही करत. तेव्हा हवाबदल व विश्रांतीसाठी लोहिया गोव्याला एका मित्रांकडे काही दिवस राहिले. त्या वेळी लोकांना आपले मत मांडण्याचे कसलेही स्वातंत्र्य वापरता येत नाही, असे अनेकांच्या बोलण्यातून आल्यामुळे लोहियांनी मडगाव येथे जाहीर सभा घेतली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तुरुंगात ठेवले. तिकडे दिल्लीत ब्रिटिश सत्ताधाऱ्यांबरोबर महत्त्वाच्या चर्चा चालू होत्या. लोहिया तिथे असावेत असे गांधींना वाटले. भारत सरकारने ब्रिटनच्या सरकारकडून पोर्तुगीजांवर दडपण आणल्याने लोहियांची सुटका झाली. त्या आधीही मुंबई व गोवेकरांची चळवळ सुरू झाली होती. गोव्यातच जाऊन सत्याग्रह करण्याचे ना.ग.गोरे, शिरुभाऊ लिमये, सुधाताई जोशी आदींनी ठरवले. मधुजीही त्या तुकडीत सामील झाले. त्या सगळ्यांना दहा-दहा वर्षांच्या शिक्षा झाल्या. पण दीड वर्षात सुटका झाली. 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

1955 च्या नोव्हेंबरमध्ये न्यायमूर्ती फजल अली आयोगाने, मुंबई शहर वेगळे ठेवून बाकीच्या मराठी भाषक तीन प्रदेशांचे एकत्रीकरण करावे, अशी शिफारस केल्याचे कळल्याबरोबर मुंबईत भडका उडाला. भांडवलदारांच्या दडपणामुळे तसे सुचवले गेले, असे वाटून मुंबईसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठी प्रचंड आंदोलन सुरू झाले. कम्युनिस्टांबरोबर एकत्र काम करायचे नाही, या भूमिकेमुळे मधु लिमये (तोपर्यंत त्यांनी प्र.सो.पा.तून बाहेर पडून सोशॅलिस्ट पार्टी सुरू केली होती.) संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील झाले नव्हते. एका विषयाबाबत मधुजींनी कमिटीसमोर त्यावर चर्चा न करता एक वादग्रस्त जाहीर पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यासाठी प्र.सो.पा.च्या शहर समितीचे सचिव प्रा.मधु दंडवते यांनी मधुजींना कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्या वेळी प्र.सो.पा.च्या राष्ट्रीय समितीचे सभासद असलेले डॉ.लोहिया यांनी मधुजींच्या बाजूने वादात उडी घेतली. कुठलीही जनआंदोलने न करणारा प्र.सो.पा. या पक्षाला पक्षाघात झाला आहे, अशी कडवट टीका करून लोहियांनी वेगळ्या सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. पक्षाचे कार्यालय हैदराबाद येथे ठेवण्यात आले. मधुजी मधूनमधून तेथे राहू लागले. मुंबई व पुणे शहरांत काही समाजवादी नव्या पक्षात गेले, पण बहुसंख्य कार्यकर्ते प्र.सो.पा.तच राहिले. स.मं. आंदोलनात सहभागी झाल्याने 1957 च्या विधानसभा निवडणुकीत प्र.सो.पा.चे सभासद चांगल्या संख्येने निवडून आले. मुंबई महापालिका निवडणुकीतही तसे झाले. मात्र सोशॅलिस्ट पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस व सोहनसिंह कोहली निवडून आले. 

1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वामुळे इतर अनेक विरोधी पक्षांबरोबर प्र.सो.पा.तलेही काही जण काँग्रेसमध्ये गेले. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये तशी पडझड झाली नाही. लोकसभा व विधानसभांत सोशॅलिस्टांची संख्या फारच कमी झाली होती. 

1962 च्या ऑक्टोबरात सगळ्या देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. चीनच्या लष्कराने आसाम व अरुणाचल प्रदेशात वीस कि.मी.पर्यंत मुसंडी मारून भारतीय सैन्याला मागे रेटले. संरक्षणमंत्रिपदी असलेले व्ही.के.कृष्णमेनन यांनी लष्कराला आवश्यक साधनसामग्री पुरवण्याबाबत हलगर्जीपणा केला, असा टीकेचा भडिमार झाला. 1947 ते 1962 या काळात नेहरूंची लोकप्रियता उंचावलेली होती तिला धक्का बसला. देशात महागाई वाढली होती. कृष्णमेनन यांच्या जागी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक झाली. त्यांनी संरक्षण सिद्धतेबाबत विशेष लक्ष घालून लष्कराचे बळ वाढवले होते. त्या वेळी झालेल्या लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांत आचार्य कृपलानी, डॉ. लोहिया व मिनू मसानी निवडून आले होते. ते सगळे नेहरूंच्या धोरणांवर कठोर टीका करत होते. 1964 मध्ये मुंगेरच्या पोटनिवडणुकीत मधु लिमये निवडून गेल्याने त्यात भर पडली. थोड्याच दिवसांत नेहरूंचे निधन झाले. लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड झाली. थोड्याच दिवसांत पाकिस्तानने कच्छमध्ये आक्रमण केले. सैन्याने त्यांचा मुकाबला केला. परत 1965 च्या सप्टेंबरात पाकिस्तानने पठाणकोट विमानतळावर हल्ला केल्याने युद्ध पेटले. अमेरिकेचे पॅटन टँक पाकिस्तानच्या सैन्यात दाखल झाले होते. मात्र भारतीय जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. आपल्या हमीद हवालदारने पायी पळत जाऊन एकामागून एक चार पॅटन रणगाड्यांचा हातबाँबने चुराडा केला. कच्छच्या वेळी ‘कच्छ में दलदल है तो लाहोर का रास्ता साफ है।’ असे लोहिया म्हणाले होते. मधुजींनी त्याचा पुनरुच्चार केला आणि आपल्या सैन्याने इच्छोगील कालव्यापर्यंत धडक मारली. लोकसभेत हे वारंवार म्हटले गेले की आता पाकिस्तानची गय न करता त्याला चांगला धडा शिकवा. काश्मीरचा प्रश्न सोडून द्यायला त्याला भाग पाडावे असे मधुजी वगैरेंनी म्हटले. रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंद येथे पाकिस्तानचे अध्यक्ष आयुबखान व भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यात वाटाघाटी झाल्या. काश्मीरच्या प्रश्नाला बगल देण्यात आली. त्याच रात्री शास्त्रीजींचे निधन झाले. काँगे्रस पक्षात ओढाताण वाढली होती तरी ज्येष्ठ मंडळींनी इंदिरा गांधींची निवड केली. त्यांना त्या पातळीवरचा अनुभव कमी होता म्हणून, मधुजींनी ‘गूँगी गुडिया’ अशी त्यांची संभावना केली होती. पुढे काही वर्षांनी मात्र त्यांना ते शब्द मागे घ्यावे लागले. 

काँग्रेस हटाव 

देशात असंतोष वाढलेला होता. मात्र काँग्रेसविरुद्ध चार-पाच पक्ष आपापले उमेदवार उभे करत होते. त्यांच्यात झालेल्या मतविभागणीमुळे काँगे्रसला सगळीकडे विजय मिळत होता. लोकांमध्ये नाराजी असूनही निवडणुकीचे निकाल तसे लागत असल्याने ‘आपण मत देऊन तरी काय उपयोग?’ अशी भावना वाढत होती. तसे झाले तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, म्हणून लोहियांनी धोरण सुचवले की काँग्रेसविरोधी निवडणुका सगळ्याच पक्षांनी एकजुटीने लढवाव्यात. काही वर्षांपूर्वी लोहियांनीच मत मांडले होते की, कम्युनिस्ट, कॉम्युनॅलिस्ट व काँग्रेस यांना सारखेच लांब ठेवावे. आता ते असे कसे बोलू लागले? या पक्षांच्या विचारसरणीत मुलभूत मतभेद आहेत. त्यांना कसे नजरेआड करता येईल? मधुजींचीही अशीच प्रतिक्रिया होती. पार्टीच्या कलकत्ता अधिवेशनात त्यांच्या भाषणांमुळे लोहियांचा ठराव फेटाळला गेला होता. कलकत्त्यांच्या अधिवेशनानंतर लोहिया मुंबईत मधुजींच्या घरी गेले. ‘‘लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाऊ नये, म्हणून मी काँग्रेस हटावचा पुरस्कार करतो आहे. तू समजून घे’’, अशी बरीच चर्चा झाल्यावर मधुजींनी लोहियांना पाठिंबा दिला. 

विविध विचारसरणी असलेल्या पक्षांचे कडबोळे सरकार कसे काय चालवू शकेल, असा प्रश्न अनेक जण विचारत होते. त्याला उत्तर देताना लोहिया म्हणाले की, आपली दूरगामी धोरणे बाजूला ठेवून जनतेचे तातडीचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने पाच-सहा कलमांवर एकजूट करून किमान समान कार्यक्रम ठरवावा. ‘सत्तेत आलो तर पहिल्या सहा महिन्यांतच त्यापैकी किमान दोन कलमांची अंमलबजावणी करावी. ते न जमल्यास मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा.’ हे धोरण कागदावर आकर्षक वाटते. पण एकदा सत्ताकारणात माणसे गुरफटली की, अशी तत्त्वनिष्ठ भूमिका घ्यायला फार थोडे लोक तयार होतील, असे अनेकांनी म्हटले. निवडणुका जवळ आल्या तरी बिगरकाँग्रेसी पक्षांत एकमत व समझोते होऊ शकले नाहीत. लोकसभेत काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे इंदिराजी कारभार चालवत होत्या. नऊ राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. बिगरकाँग्रेसी पक्षांनी संयुक्त विधायक दल (संविद) बनवून मंत्रिमंडळे स्थापन केली. उत्तर प्रदेशात चरणसिंग यांच्या प्रयत्नांमुळे तिथल्या संविद सरकारने अलाभकारी भूखंडावरील शेतसारा रद्द करण्याचा कार्यक्रम राबवला. ते सरकार बऱ्यापैकी चालले. 

पक्षापक्षांचे हे खेळ चालत राहिले, त्यांच्यावर मधुजींनी नैतिक दडपण ठेवावे, अशी अनेकांची अपेक्षा होती. (लोहियांनी त्यांना आपले उत्तराधिकारी मानले होते.) पण राजकारण्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षाचा जोर खूपच वाढला होता. 

गरिबी हटाव 

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते इंदिराजींना सुधारू देत नव्हते. लोकांचा प्रत्यक्ष पाठिंबा मिळवण्यासाठी इंदिराजींनी ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम घोषित केला. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, चौदा व्यापारी बॅकांचे राष्ट्रीयीकरण करणे, असे कार्यक्रम त्यांनी जाहीर केल्याबरोबर लोकांमध्ये उत्साह संचारला. त्यामुळे सं.सो.पा.त तीव्र मतभेद झाले. संविद काळात आपण उजव्या पक्षांबरोबर गेलो ही आपली मोठी चूक झाली, असे अनेक कार्यकर्ते म्हणू लागले. 1976 च्या डिसेंबरच्या मध्यात सं.सो.पा.चे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात झाले. उजव्यांनाही सोबत घ्यायला हरकत नाही, असे सं.सो.पा.चे एक नेते राजनारायण मांडत होते. पण त्यांच्या समर्थकांना फार वाव द्यायचा नाही, अशा प्रकारची व्यूहरचना श्री. भाई वैद्य व आम्ही केली होती. यापुढे  शक्यतो अन्य पक्षांबरोबर समझोते करायचे नाहीत. केले तर फक्त डाव्या पक्षाबराबर करायचे, असा ठराव अधिवेशनात मोठ्या बहुमताने संमत झाला. ते अधिवेशन संपतानाच दिल्लीत घोषणा झाली की, इंदिरा गांधींनी लोकसभेचे विसर्जन केले व जानेवारीत लवकरच मध्यावधी निवडणुका होणार हे स्पष्ट झाले. 

तिकडे दिल्लीत निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या. संघटना काँग्रेस, जनसंघ, स्वतंत्र आदी पक्षांनी ‘इंदिरा हटाव’ या घोषणेच्या आधारे आघाडी करायचे ठरवले आणि सोशॅलिस्ट पार्टीही त्यात सहभागी झाली, अशी बातमी आली. आम्ही सगळे हवालदिल झालो. मधुजींना फोन केला तर ते म्हणाले, ‘‘होय बाबा, तसा निर्णय झाला खरा.’’ पुढे निवडणुकीत सं.सो.पा.चे पानिपत झाले. जॉर्ज फर्नांडिस वगैरे दिग्गज नेतेही पडले. पक्षाची पार वाताहत झाली. 

नवनिर्माण आंदोलन 

1971 च्या निवडणुकीत इंदिराजींना भरघोस बहुमत मिळाले. काही महिन्यांतच पश्चिम बंगाल सरकारने पूर्व पाकिस्तानवर केलेल्या अत्याचारांमुळे बांगलादेशचे आंदोलन बळ धरू लागले. पाकिस्तानबरोबरच्या लढाईत भारताला भूषणावह विजय मिळाला. बांगलादेशची निर्मिती झाली. त्या प्रकरणी इंदिराजींनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा अनेक नेत्यांबरोबर मधुजींनीही केली. 1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांतही काँग्रेसला मोठे यश मिळाले, पण बांगलादेशातून आलेले 90 लाख निर्वासित व युद्धामुळे वाढलेली महागाई यांमुळे सामान्य माणसे त्रस्त झाली होती. अहमदाबादेत वसतिगृहाच्या मेसचे बिल अचानक वाढले व त्याचे कारण तेल गिरणीवाल्यांनी काश्मीर निवडणुकीसाठी काँग्रेसला मोठ्या देणग्या देऊन तेलाचे भाव वाढवले; हे लोकांना कळल्यावर विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण आंदोलनाचा भडका उडाला. पक्षीय राजकारणापासून अलिप्त झालेल्या जयप्रकाश नारायण यांनीही नवनिर्माण आंदोलनात उडी घेतली. फर्नांडिसांनी 1974 च्या मेमध्ये रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप केला. वातावरण चांगलेच तापू लागले. 12 जून 1974 ला इंदिराजींची लोकसभेवरील निवड रद्द करणारा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. पंतप्रधानकीचा राजीनामा द्या, असे दडपण इंदिराजींवर वाढले. शेवटी 25 जूनच्या रात्री अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्याचा आदेश राष्ट्रपतींनी काढला. रातोरात देशभर विरोधी पक्ष कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली. देशभर दडपशाहीचा वरवंटा फिरला. त्याविरुद्ध लोकसंघर्ष समिती या नावाने सुरू झालेल्या आंदोलनात समाजवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले. यामध्ये पावणेदोन वर्षे गेली. 

19 जाने. 1977 ला लोकसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याचे इंदिराजींनी जाहीर केले. झालेल्या दडपशाहीमुळे लोक विरोधी पक्षांना निर्भयपणे मतदान करतील, याबद्दल नेत्यांना भरवसा वाटला नाही. जे.पीं.च्या आग्रहाखातर संघटना काँग्रेस, जनसंघ, समाजवादी व भारतीय लोकदल या चार पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष बनवला. सोशॅलिस्ट पार्टीचे विसर्जन करू नये, असे आम्ही काही जण म्हणत होतो. पण मधुजी म्हणाले, ‘‘आपले अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आंदोलनामुळे थकले आहेत. परत मोठा संघर्ष करायला ते तयार होतील असे दिसत नाही.’’ एसेम, नानासाहेब आदी बहुतेक नेत्यांनी तसेच म्हटले, त्यामुळे सोशॅलिस्ट पार्टीचे विसर्जन झाले. 

1977 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळाला, पण पुरोगामी कार्यक्रमाचा आग्रह धरणे व त्यासाठी ध्येयनिष्ठ, कार्यक्षम कार्यकर्त्यांची मजबूत संघटना याकडे ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली. लोकसभेच्या निवडणुकीत जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले तरी समाजवादी धोरणे व चारित्र्य यांबद्दल कटिबद्ध राहून चळवळ चालवण्याचे बहुतेकांच्या मनातून बाजूला पडले. तीन नेत्यांच्या महत्त्वाकांक्षाच्या रस्सीखेचीत जनता पक्ष, तत्त्वनिष्ठ राजकारण व जनशक्ती संघटना बांधण्यासाठीची चिवट ध्येयनिष्ठा यांचा मधु लिमयेंसकट सर्वच नेत्यांनी त्याग केल्याने भारतातील समाजवादी चळवळीला खडतर दिवस आले. तरीही स्वाभिमानी, समतानिष्ठ व सर्जनशील ध्येयवाद हाच जनसामान्यांना आज ना उद्या तारणार आहे. कितीही चढउतार आले तरी लोकशाही समाजवादी विचारसरणी प्रभावशाली झाल्याशिवाय राहणार नाही, असे माझ्यासारख्याला वाटते. 

Tags: जन्मशताब्दी समाजवादी कॉंग्रेसविरोध जवाहरलाल नेहरू मधु लिमये पन्नालाल सुराणा madhu limaye pannalal surana madhu limaye birth century sadhana madhu limaye madhu limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके