डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सोशलिस्ट फ्रंटच्या बैठकीसाठी 1-2 डिसेंबर रोजी कोलकात्याला गेलो होतो. हावडा स्टेशनवर बरीच सुधारणा व स्वच्छता दिसून आली. बाहेर येऊन टॅक्सी पकडणे मात्र अवघड झाले. प्री-पेडचा बूथ जिथून गाड्या बाहेर पडतात, त्या कोपर्याला आणि तिथून अलीकडे टॅक्सीवाल्यांनी तीन ओळी लावलेल्या. बूथवर जाऊन पर्ची घेतली. त्यावर टॅक्सीचा नंबर दिला होता. ती शोधणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत पार करणे. लांब शेवटी ती उभी होती. त्यामुळे बाहेर पडायला वीस मिनिटे लागली.

सोशलिस्ट फ्रंटच्या बैठकीसाठी 1-2 डिसेंबर रोजी कोलकात्याला गेलो होतो. हावडा स्टेशनवर बरीच सुधारणा व स्वच्छता दिसून आली. बाहेर येऊन टॅक्सी पकडणे मात्र अवघड झाले. प्री-पेडचा बूथ जिथून गाड्या बाहेर पडतात, त्या कोपर्याला आणि तिथून अलीकडे टॅक्सीवाल्यांनी तीन ओळी लावलेल्या. बूथवर जाऊन पर्ची घेतली. त्यावर टॅक्सीचा नंबर दिला होता. ती शोधणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत पार करणे. लांब शेवटी ती उभी होती. त्यामुळे बाहेर पडायला वीस मिनिटे लागली. ट्रॅफिक जॅम मात्र फारसा नव्हता. बऱ्याच मोठ्या रस्त्यांवरून एकेरी वाहतूक असल्याने वाहनांना बऱ्यापैकी वेग घेता येत होता. चौरंगीच्या जवळ मात्र हाताने ओढणाऱ्या रिक्षा आढळत होत्या. एकंदर मध्यमवर्गीयांचे खर्चाचे भान बेताचे दिसले. धोतरवाले बरेच- म्हणजे मुंबई- पुण्याच्या मानाने. टपरीवरचा चहा कुठे एक रुपयाला, कुठे दोनला.

एस्प्लनेडच्या चौकात धरणे चालू होते. आम्ही रवींद्र सदनवरून तिथवर मेट्रोने गेलो. फारच सुरळीत व सुखद प्रवास. गर्दीमुळे दाटीवाटीने उभे राहावे लागले, तरी रेटारेटी नसल्याने छान वाटले. तिकीट अवघे चार रुपये. जास्तीत जास्त सात. ही मेट्रो सरकारी रेल्वेची आहे. दिल्लीतील हवाई मेट्रो खाजगी कंपनीची आहे. तिथे तिकीट दर कमीत कमी आठ ते बावीस रुपये आणि घाण अर्थातच जास्त.

धरणे नंदीग्रामच्या प्रश्नावर होते. मागे मार्चमध्ये तेथे गोळीबार होऊन चौदा माणसे मारली गेली होती. देशभर निषेधाचे आवाज उठले होते. ज्यांना सरकारनेच एक-दोन एकर जमीन दिली होती व जे खूप मेहनत करून पिके घेताहेत त्यांना उखडून लावून तिथे इंडोनेशियाच्या सलीम ग्रुपला रासायनिक संकुल उभारायला जमीन द्यायची, हा सरळ सरळ उरफाटा व अन्यायी कारभार होता. अनेक बाजूंनी दडपण आल्यामुळे, सलीम ग्रुपला तिथल्याऐवजी न्यायाचार या भागात पुरेशी जमीन (बहुधा पडीक) देण्याची घोषणा मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी केली होती. मग आता परत नंदीग्रामसाठी धरणे ते काय म्हणून? हा प्रश्न मनात घोळत होता. 

गेल्या नोव्हेंबरात सीपीएमच्या कार्यांनी तेथील शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यांनी बऱ्याच जमिनी, घरे यावर जो कब्जा मिळवला होता ती योजना न्यायाचारला हलवायचे ठरल्यानंतर मूळच्या शेतकऱ्यांनी परत ताब्यात घेतली होती. त्यासाठी त्यांची भूमीउच्छेद प्रतिरोध समिती कार्यरत होती व आहे. त्याची सुरुवात स्थानिक शेतकऱ्यांनीच केली होती. तृणमूल काँग्रेस व अन्य काहीजण पक्षाचे लोक त्या समितीत शिरले असावेत. किंवा तिथल्या काही शेतकऱ्यांनी त्या पक्षाचा झेंडा उचलला असावा. माकपच्या कार्यालयांची प्रचंड हानी गेल्या मार्चमधल्या घडामोडीत झाली होती. आपण कब्जा केलेल्या जमिनी, घरे व आपली कार्यालये यांच्यावर परत ताबा मिळवण्यासाठी गेल्या नोव्हेंबरातील हल्ल्याची आखणी सीपीएमचे खासदार लक्ष्मण सेठ यांनी केली होती. तिथले सीपीएमचे आमदार सध्या अदृश्य आहेत. बाहेरून भाडोत्री गुंड आणले होते. 

गावठी बाँब, पिस्तुले यांचा सर्रास वापर करून त्यांनी मूळ कब्जेदारांना हुसकावून त्या जमिनी व घरे-वाड्यांवर परत कब्जा केला. शेतकऱ्यांनी विळ्या-कोयत्याने प्रतिकार केला. अर्थातच त्यांचे बळ कमी पडले. सीपीएमवाल्यांनी काही शेतकऱ्यांचे मुडदे पाडले. बायांवर अत्याचार फारच मोठ्या प्रमाणावर केले. त्यामुळे अनेक कुटुंबे निर्वासित होऊन एक-दोन शाळांत स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या शिबिरात राहात आहेत. तिथले राज्यपाल श्री.गोपालकृष्ण गांधी यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या भागातला दौरा करताना त्या शिबिरालाही भेट दिली. त्याआधी सीआयडी चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे झाला प्रकार वाईट होता अशी जाहीर प्रतिक्रिया त्यांनी दिली होतीच. सीपीएमचे राज्य सेक्रेटरी व काही मंत्री त्यावर खूप नाराज झाले. राज्यपालांनी आपले निवेदन मागे घ्यावे अशी मागणी केली. काँग्रेसवाल्यांना अणुकरारासाठी सीपीएमचा पाठिंबा पाहिजे असल्याने राज्यपालांना समजावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील कोलकात्याला जाऊन आले म्हणे. पण राज्यपालांनी नंदीग्रामचा ठरवलेला दौरा पार पाडलाच.

एस्प्लनेड चौकातल्या धरण्याचा मुद्दा आता मानवी हक्कांचा आहे. आम्ही गेलो तेव्हा एक पथनाट्य चालू होते. विशी तिशीतले पंधरा-सोळा स्त्री-पुरुष सादर करीत होते. अत्याचाराची दृश्ये सादर केली, त्यावेळी सभोवतालच्या प्रेक्षकांतून सहवेदना तीव्रतेने प्रकटली. एक स्त्री म्हणाली- सरळ गोळी घालून ठार करा- हे बलात्कार आता सोसत नाहीत! सगळा समुदाय क्षणभर स्तंभित झाला.

संदीप दासनी बाजूला नेले. वीस- बावीस वर्षांची एक विवाहित तरुणी बसली होती. तिचा नवरा कोठे गेला, त्याचे काय झाले, तिला माहीत नव्हते. तिच्यावर चार-पाच वेळा बलात्कार झाला होता. गावाकडे स्वत:चे झोपडे व छोटीशी वाडी. तीन-चार जनावरे, पण सगळे उद्ध्वस्त झाले. तिचे, त्यासारख्या काही शेकड्यांचे पुनर्वसन कसे करायचे?

रविवारी दिवसभरात अनेक कवी स्टेजवर आले, आपल्या नंदीग्रामविषयीच्या व एकूण विप्लवी कविता सादर केल्या. अमानी रॉय नावाचे पन्नाशीतले नाट्यकर्मी व त्यांच्या पत्नी आल्या. त्यांनी एक जळजळीत संवाद सादर केला. प्रेक्षकांचा प्रतिसाद भारी होता.

मध्येच प्रेक्षकांना विचारले जायचे- तुमच्यापैकी कुणाला काही सांगायचे आहे का? कुणी फिटर, कुणी कारकून येऊन संवाद साधायचा. नंदीग्रामात सीपीएमने जे केले त्याबद्दल सात्विक संताप मांडायचा.

तिथून परतताना मनात येत होते, 'सीपीएमवाल्यांना झालेय तरी काय? कुण्या मक्तेदार- भांडवलदाराची त्यांनी हत्या केल्याचे ऐकू येत नाही. या गरीब शेतकऱ्यांवर का तुटून पडताहेत? आणि बायांवर असले घृणास्पद अत्याचार? हा तर उघड उघड समाजवादाशी केलेला द्रोह आहे. ते विवेकभ्रष्ट झाले आहेत.

Tags: सात्विक संताप पिस्तुले गावठी बाँब हावडा स्टेशन सीपीएम नंदीग्राम सोशलिस्ट फ्रंट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके