डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ध्यानाकर्षणाचे पर्व (पवनार ते दिल्ली आणि उत्तर प्रदेश यात्रा)

13 नोव्हेंबर 1951 रोजी 1272 किलोमीटर पदयात्रेनंतर विनोबा राजधानी दिल्लीत पोहोचले. पवनार ते दिल्ली दरम्यान 19,436 एकर भूदान मिळाले होते.तेलंगणात कम्युनिस्ट उपद्रवामुळे भूदान मिळाले, इतरत्र मिळेल का, या शंकेला उत्तर मिळून चुकले होते. दिल्लीकरांना एक छोटासा संदेश विनोबांनी पोहोचण्यापूर्वीच पाठवून दिला होता, ‘‘मी भिक्षा मागण्यासाठी नव्हे, तर अधिकार मागण्यासाठी येत आहे, दीक्षा देण्यासाठी येत आहे.’’विनोबा दिल्लीला पोहोचले तेव्हा लोकांनी 10-12 किलोमीटर चालत जाऊन सीमेवर त्यांचे स्वागत केले. राजघाटावर विनोबांसाठी कुटी बनवण्यात आली. या कुटीत त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपतींपासून मोठमोठ्या व्यक्ती येत, आणि बाहेर पादत्राणे काढून आत प्रवेश करत. राजशिष्टाचार कागदावरच राही.
 

तेलंगणातून परतताना विदर्भातील भागात भूदान मागण्याचा विनोबांचा इरादा नव्हता. तरीही थोडेफार भूदान मिळत गेले. अहिंसेने जमिनीचा प्रश्न कसा सुटू शकतो, याचे दर्शन तेलंगणात झाले होते. आता पुन्हा कांचनमुक्तीच्या प्रयोगात लागण्याचा विनोबांचा मानस होता. पवनारला 27 जून 1951 रोजी सायंप्रार्थनेच्या वेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली :

‘‘इथे आल्यावर लोक अशी अपेक्षा राखतात की, मी जमिनी मागत सुटेन. पण अशी काही सत्त्वपरीक्षा करण्याचा माझा विचार नाही. येथे जो कार्यक्रम करायचा आहे, तो त्याच्याहीपेक्षा कठीण आणि महत्त्वाचा आहे. भूमीची वाटणी ही समस्या मला कधीच कठीण वाटली नाही... भूमिदान-यज्ञ ही निःसंशय फार मोठी वस्तू आहे. पण माझ्यासमोर मुख्य कल्पना ही आहे की, आमच्या सामाजिक आणि व्यक्तिगत, सर्व प्रकारच्या अडचणींचा परिहार अहिंसेने कसा होईल हे शोधून काढणे. हे मुख्य कार्य आहे. आणि त्यासाठीच मी गेलो होतो... आता इथे परत आल्यानंतर भूमिदान-यज्ञाचे काम मला करायचे नाही. शक्य तर ते हैदराबाद राज्यात चालू राहावे, अशी इच्छा आहे.’’

तेलंगणात कम्युनिस्ट कैद्यांना अनेकदा विनोबा भेटले, पण त्यांनी तेव्हा तुरुंगजीवनाबाबतच्या तक्रारी तेवढ्या केल्या. कम्युनिस्ट पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांनी आता पत्र लिहून पक्षाची भूमिका विस्ताराने मांडली. विनोबांनी उत्तरात आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला : बदललेल्या परिस्थितीत हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही, आणि कम्युनिस्टांनी आपले धोरण बदलावे. पत्राच्या अखेरीस त्यांनी लिहिले, ‘‘तुम्हाला भूमिगत राहावे लागत आहे, याचे मला दुःख आहे. माझी तर अशीच इच्छा आहे की, सर्वांना विशिष्ट मर्यादेत राहून मोकळेपणे काम करता यावे.’’

हैदराबाद काँग्रेस समितीने 15 जून 1951 रोजी प्रस्ताव करून विनोबांबद्दल कृतज्ञता प्रकट केली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भूदानाचे काम चालू ठेवण्याचे आवाहन केले. अ. भा. काँग्रेसनेही 15 जुलैच्या बंगलोर अधिवेशनात विनोबा-यात्रेबद्दल संतोष व्यक्त केला. समाजवाद्यांनीही विनोबा-यात्रेची प्रशंसा केली. ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी ऑगस्टमध्ये पवनारला येऊन विनोबांशी दीर्घ चर्चा केली. विनोबांच्या दृष्टीने त्यांच्या तेलंगणातील अनुभवांचे सार होते : ‘‘आपला अनुभव कोणत्या शब्दांत व्यक्त करावा, असा मी विचार करतो, तेव्हा मला एकच शब्द सुचतो - ‘साक्षात्कार’! तेलंगणा यात्रेत मला एक प्रकारे ईश्वराचा साक्षात्कार झाला. मनुष्याच्या हृदयात भलेपणा आहे, त्याला आवाहन केले जाऊ शकते, या श्रद्धेने मी काम केले आणि ईश्वराने मला तसेच दर्शन घडवले.’’

देशात पंचवार्षिक आर्थिक नियोजनाचा प्रयत्न सुरू झाला होता. 15 मार्च 1950 रोजी योजना आयोग स्थापन झाला. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यात येत होता. त्यात शेतीविषयक कार्यक्रम बनवण्यात मुख्यतः आयोगाचे सदस्य रा. कृ. पाटील यांचा हात होता. आय्‌.सी.एस्‌. असलेल्या पाटलांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान राजीनामा दिला होता. पाटलांचे मत होते की, भूदानात भूमिहीनांना जेवढी जमीन दिली जात होती, ती आर्थिकदृष्ट्या पुरेशी नव्हती. पंडित नेहरू योजना आयोगाचे अध्यक्षही होते. त्यांनी पाटलांना विनोबांशी चर्चा करायला पाठवले. पवनारला त्यांची विस्ताराने चर्चा झाली. विनोबांनी अन्नस्वावलंबन आणि सर्वांना रोजगार देण्यावर भर दिला. जमिनीचे पुनर्वितरण करण्याची गरजही आग्रहाने मांडली. पाटलांनी नेहरूंना चर्चेचा अहवाल दिला, तेव्हा नेहरूंनी विचार केला की, विनोबांची योजना आयोगाच्या सर्व सदस्यांशी विस्ताराने चर्चा होणे योग्य ठरेल. त्यांनी विनोबांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. विनोबांनी ते स्वीकारले. दिल्लीला ते जाणार होते, पण त्यांच्या पद्धतीनेच - पदयात्रेने. 12 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी पवनारहून प्रस्थान केले. या यात्रेत ते देशाची स्थिती जवळून पाहणार होते आणि भूदानही मागणार होते. 

निघण्यापूर्वी ते म्हणाले : ‘‘उद्या सकाळी मी दिल्लीसाठी निघणार आहे. रस्त्यात एक काम माझ्यापुढे प्रामुख्याने राहील - गरिबांना जमीन देण्याचे. जे लोक आज जमिनीवर मेहनत करत आहेत, त्यांच्याजवळ जमीन नाही, ही चांगली गोष्ट नाही. यामुळे भारतात उत्पादन कमी होत आहे, भेदभाव आणि असंतोष वाढत आहेत. म्हणून शेतीत मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला जमीन मिळाली पाहिजे. ती कशी मिळणार? श्रीमंतांच्या जमिनी त्यांच्याकडून हिसकावून घेणे, ही एक पद्धत इतिहासात दिसते. परंतु ही पद्धत मानवतेच्या विरुद्ध आहे. तिच्यात कल्याण नाही. तिच्यामुळे समाजात वैर आणि द्वेष वाढतील, सुख-शांती लाभणार नाही. म्हणून लोकांनी आपल्या जमिनी प्रेमाने, खुशीने, आत्मीयतेने द्याव्या, असे प्रयत्न व्हायला हवेत.

‘‘मी जे काम सुरू केले आहे त्याचे नाव भूदान-यज्ञ आहे; केवळ ‘भूदान’ नव्हे. दान कोण करेल? जो श्रीमंत आहे तो. परंतु यज्ञात तर लहान-मोठा प्रत्येक जण भाग घेऊ शकतो. आम्हाला देशात देण्याची वृत्ती वाढवायची आहे; एक हवा निर्माण करायची आहे. तेलंगणात कम्युनिस्टांच्या उपद्रवामुळेच जमिनी मिळाल्या असतील, तर भारतात अहिंसक क्रांतीची आशाच सोडून द्यावी लागेल. परंतु मला आशा आहे की, लोक जर भूदान-यज्ञाचा मूळ विचार नीट समजून घेतील, तर गरिबांची कदर करून प्रेमपूर्वक जमिनी देतील. ही आशा सफल झाली तर अहिंसक क्रांतीला फार मोठे बळ मिळेल.’’
वर्ध्याच्या लोकांनी विनोबांना रिकाम्या हाताने निघू दिले नाही. सुरगावच्या लोकांनी साठ एकर जमीन दिली. विनोबांचे शिष्य दत्तोबा दास्ताने यांनी आपली सगळी, एकोणीस एकर, जमीन दिली. एकूण सहाशे एकर जमीन मिळाली. वाटेतही गावागावात भूदान मिळू लागले. डोंगरगावच्या गरीब गोंड शेतकऱ्यांनीही जमीन दिली. यात्रेच्या पहिल्या सात दिवसांत दोन हजार एकरांचे भूदान मिळाले. विनोबा गरिबांचा अधिकार म्हणून जमीन मागत होते :

‘‘मी गरिबांना दीन बनवू इच्छित नाही. जेव्हा त्यांना जमीन वाटली जाईल, तेव्हा मी त्यांना सांगेन की, तुमचीच जमीन तुम्हाला परत मिळत आहे.’’(5)
ते सांगत होते की हवा, पाणी व प्रकाश यांसारखी जमीन सर्वांची आहे. तिच्यावर मालकीचा दावा करणे चुकीचे आहे; मालक तर परमेश्वर आहे, ज्याने जमीन बनवली. ‘‘ज्या वस्तूचा स्वामी परमेश्वर आहे, तिच्यावर मालकी सांगणाऱ्याला गीतेने ‘असुर’ म्हटले आहे.’’ जमीन-मालकांच्या पूर्वजांना कदाचित सेवा किंवा पुरुषार्थातून जमीन मिळाली असेल, परंतु आता तिला पकडून ठेवणे विनोबांच्या दृष्टीने ‘पाप’च होते. इतक्या रोखठोक शब्दांत ते बोलत होते. त्यांना एक मिशन मिळाले होते. अहिंसक परिवर्तनाच्या सूत्राचा शोध ते घेत होते, ते आता त्यांना गवसले होते. त्यांच्या प्रतिभेला बहर आला होता आणि शब्दांतून प्रकाश फाकत होता. त्यांच्या स्वभावातदेखील बदल झाला होता : 

‘‘मी तर स्वभावतः एक जंगली प्राणी आहे. मला सभ्यता ठाऊक नाही. मी तर मोठ्या लोकांशी संपर्क करायलाही घाबरतो. परंतु मी आजकाल निःशंक होऊन कोणाच्याही घरात प्रवेश करत आहे.’’ ते प्रत्येकाशी बोलत होते, त्याच्या शंका दूर करत होते, त्याच्या आक्षेपांना उत्तर देत होते. आश्चर्य म्हणजे जमीन केवळ त्यांच्या शब्दांच्या, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे मिळत नव्हती; दूरच्या गावांहून येऊन लोक जमीन देत होते. विनोबांचे शब्द वाऱ्याबरोबर पसरत होते.

सागरला (मध्यप्रांत) 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी विनोबांनी देशापुढे पाच कोटी एकरांची पुन्हा एकदा मागणी केली. मध्यप्रांतात 6,400 एकर भूदान मिळाले.(8) प्रांतातील कार्यकर्त्यांनी एक लाख एकर प्राप्त करण्याचा संकल्प केला. प्रांतात भूदानाचे काम करण्यासाठी विनोबांनी दादाभाई नाईक, अप्पाजी गांधी आणि राजेंद्र मालपाणी यांची समिती स्थापन केली. विंध्यप्रदेशात कामाची जबाबदारी त्यांनी बनारसीदास चतुर्वेदी, लालाराम वाजपेयी आणि चतुर्भुज पाठक यांच्या समितीवर सोपवली. जमीनदारी-निर्मूलन कायद्याखाली सरकार मोबदला देऊन जमिनी अधिग्रहीत करणार होते. विनोबांनी जमीनदारांना मोबदल्यावर पाणी सोडून जमीन दान करण्याचा आग्रह केला.

16 ऑक्टोबरला यात्रेने उत्तर प्रदेशात प्रवेश केला. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांच्या चिरगावला पडाव होता. मैथिलीशरणांखेरीज त्यांचे बंधू सियारामशरण, दिनकर, महादेवी वर्मा, इलाचंद्र जोशी, यांसारखे दिग्गज साहित्यिकही तेथे उपस्थित होते. मैथिलीशरणांनी या वेळी आपली प्रसिद्ध कविता लिहिली - ‘यह धरती अचला होने से कब साथ किसी के जाती है.’ भूदानाला मैथिलीशरणां-सारख्या कवीचा आशीर्वाद मिळणे, ही विनोबांसाठी एक अविस्मरणीय घटना होती. मैथिलीशरणांनी पुढे एकदा भूदानाबद्दल आपला अभिप्राय व्यक्त करताना म्हटले होते.

‘‘जग आमच्याकडून आणखी एका चमत्काराची प्रतीक्षा करत आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही अहिंसात्मक मार्गांनी देश स्वतंत्र केला, तो पहिला चमत्कार होता. आता विनोबांच्या भूदान-यज्ञ आंदोलनाद्वारे आपण आपल्या देशाच्या विद्यमान आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत रक्तहीन क्रांती करणार आहोत.’’ ग्वाल्हेरला जहागीरदारांचे संमेलन होत होते. विनोबांनी त्यांच्याशी संवाद केला. आचार्य कृपलानींनी उत्तर प्रदेशातील विधायक कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनोबा-यात्रेस पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.

1-2 नोव्हेंबर रोजी मथुरेला झालेल्या विधायक कार्यकर्त्यांच्या संमेलनात प्रांतात पाच लाख एकर भूदान मिळवण्याचा संकल्प करण्यात आला. तोपर्यंत यात्रेत 12000 एकर भूदान मिळाले होते. तेलंगणातही विनोबा-यात्रेनंतर 3000 एकर जमीन मिळाली होती. मथुरेत विनोबांनी विधायक कार्यकर्त्यांना बाकीची सगळी कामे सोडून भूदानात शक्ती लावण्याचा आग्रह केला : ‘‘अहिंसा आजची समस्या सोडवण्यात यशस्वी झाली नाही, तर गांधीजींची सगळी कामे धोक्यात आहेत. ती यशस्वी झाली तर खादी, हरिजन-कार्य - सगळीच कामे पुढे जातील.’’ मथुरेत विनोबांनी साम्ययोगाच्या संकल्पनेचे विस्ताराने विवरण केले.

मथुरा संमेलनात बाबा राघवदासांनी भूदानाला आयुष्य वाहून घेण्याची घोषणा केली. बाबा राघवदास हे एक विलक्षण व्यक्तित्व होते. महाराष्ट्रात जन्मलेल्या राघवेंद्र पाच्छापूरकरचे सारे कुटुंब तो पाच वर्षांचा असताना प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले. वयाच्या 17व्या वर्षी अध्यात्म-साधनेची ओढ लागली, आणि भटकत भटकत ते शेवटी उत्तर प्रदेशात स्थिरावले. या निःसंग साधकाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, आणि ‘पूर्वांचलाचे गांधी’ अशी ख्याती अर्जित केली. पहिल्या निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेत निवडून आले. त्यांनी किती संस्था स्थापन केल्या आणि किती संस्थांशी त्यांचा संबंध होता, याची गणतीच नव्हती.

13 नोव्हेंबर 1951 रोजी 1272 किलोमीटर पदयात्रेनंतर विनोबा राजधानी दिल्लीत पोहोचले. पवनार ते दिल्ली दरम्यान 19,436 एकर भूदान मिळाले होते.(13) तेलंगणात कम्युनिस्ट उपद्रवामुळे भूदान मिळाले, इतरत्र मिळेल का, या शंकेला उत्तर मिळून चुकले होते. दिल्लीकरांना एक छोटासा संदेश विनोबांनी पोहोचण्यापूर्वीच पाठवून दिला होता, ‘‘मी भिक्षा मागण्यासाठी नव्हे, तर अधिकार मागण्यासाठी येत आहे, दीक्षा देण्यासाठी येत आहे.’’

विनोबा दिल्लीला पोहोचले तेव्हा लोकांनी 10-12 किलोमीटर चालत जाऊन सीमेवर त्यांचे स्वागत केले. राजघाटावर विनोबांसाठी कुटी बनवण्यात आली. या कुटीत त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपतींपासून मोठमोठ्या व्यक्ती येत, आणि बाहेर पादत्राणे काढून आत प्रवेश करत. राजशिष्टाचार कागदावरच राही. विशेषतः पाश्चिमात्य पत्रकारांच्या दृष्टीने ही आश्चर्यकारक गोष्ट होती.

राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी पहिल्याच दिवशी जाहीर केले की, त्यांच्या बिहारमधील जमिनीतील जितकी विनोबांना हवी असेल, तितकी ते घेऊ शकतात.
योजना आयोगासोबत तीन दिवस चर्चा झाली. सहा बैठका झाल्या. दोन-तीन बैठकांना पंडित नेहरूही उपस्थित राहिले. विनोबांनी आपले म्हणणे रोखठोकपणे आणि खुलासेवार मांडले. त्यांनी सांगितले की, जे आक्षेप त्यांनी पाटलांसोबतच्या चर्चेत घेतले होते, ते यात्रेच्या अनुभवाने अधिकच पक्के झाले आहेत. त्यांच्या दृष्टीने सर्वांना रोजगार देणे हा कळीचा मुद्दा होता आणि त्याचे पंचवार्षिक योजनेत आश्वासन नव्हते. परंतु,

‘‘प्रत्येकाला आजच पूर्ण काम देता येऊ शकते आणि द्यायला हवे, हे राष्ट्रीय नियोजनाचे गृहीतकृत्य (पॉस्चुलेट) असले पाहिजे; मग ते कोणत्याही अवजारांनी द्यावे. परंतु एफिशियंसी (क्षमता)च्या नावाखाली जर सर्वांना काम दिले जात नसेल, थोड्यांनाच दिले जात असेल, तर ते नॅशनल प्लॅनिंग नसून पार्शल प्लॅनिंग आहे.’’

पुढे त्यांनी एकदा या संदर्भात म्हटले होते, प्लॅनिंग जर पार्शल (आंशिक) असेल, तर ‘लेट पार्शिआलिटी बी फॉर द पुअर’ - गरिबांना झुकते माप दिले पाहिजे! रोज संध्याकाळी प्रार्थना-प्रवचनांमध्ये विनोबांनी विविध विषयांवरचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शक्तीचे अधिष्ठान राजकारणात नसून समाजसेवेत असते. सत्ता आणि शक्ती यांतला फरक त्यांनी समजावून सांगितला. राजकीय सत्तेच्या मर्यादा सांगितल्या आणि निष्पक्ष सेवकांची गरज मांडली.

भूदानामागचा खरा उद्देश त्यांनी सांगितला : ‘‘मला परिवर्तन हवे आहे. प्रथम हृदय-परिवर्तन, मग जीवन-परिवर्तन, नंतर समाज-परिवर्तन. अशा प्रकारे तिहेरी क्रांती मला हवी आहे.’’19 नोव्हेंबरला विनोबा तथाकथित गुन्हेगार जातीच्या वस्तीत गेले. तेथल्या लोकांच्या बाहेर जाण्यावर बंदी होती. विनोबांच्या सांगण्यावरून सरकारने ती काढून टाकली. दिल्ली मुक्कामी विनोबांना भेटणाऱ्या लोकांत अमेरिकेचे राजदूत चेस्टर बोल्सही होते. भूदानाने त्यांना आकर्षित केले होते.    

दिल्लीत विनोबांना 11 दिवसांत 1200 एकर भूदान मिळाले. 24 नोव्हेंबरला विनोबांनी दिल्ली सोडली. तो पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन-पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली होती. अनेकांनी विनोबांना सल्ला दिला की, निवडणूक-काळात यात्रा स्थगित ठेवावी, कारण बहुतांश कार्यकर्ते निवडणुकीत गुंतलेले असतील आणि लोकही भूदानाबाबत ऐकायला उत्सुक नसतील. परंतु विनोबा याला तयार नव्हते.

सर्व सेवा संघाने 23 नोव्हेंबर 1951 रोजी वर्धा येथील बैठकीत भूदान-यज्ञाला पूर्ण पाठिंबा दिला आणि सर्वांना या कामी सहकार्य करण्याचे आवाहन दिले. गांधीवादी कार्यकर्त्यांची फळी विनोबांच्या पाठीमागे उभी राहिली. भूदानातील क्रांति-तत्त्व जगभरात अनेकांना आकृष्ट करू लागले होते. अराज्यवादी साप्ताहिक ‘फ्रीडम’ने भूदानावर टिप्पणी करताना लिहिले, ‘‘अनेक शंका असल्या, तरी आपण या विलक्षण प्रयोगाच्या परिणामाची उत्सुकतेने प्रतीक्षा केली पाहिजे, कारण हा प्रयोग भारताच्या क्रांतिकारी समस्येच्या केंद्रस्थानी - जमिनीला - स्पर्श करतो.’’

दिल्लीहून विनोबांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केला. मेरठला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी त्यांना भेटले (28 नोव्हेंबर). ते म्हणाले, ‘‘मला ईशावास्यातील पहिल्या तीन श्लोकांचे सुरुवातीपासून आकर्षण राहिले आहे; आणि तुमचे हे काम त्याच तीन श्लोकांच्या पायावर उभे आहे.’’ मेरठ, मुझफ्फरपूर, सहारनपूर, डेहराडून वगैरे भागांतून जात यात्रा नैनीताल क्षेत्रात आली. कालाडुंगी येथे (31 डिसेंबर) एक म्हातारी स्त्री रात्री जमीन द्यायला आली आणि सर्व झोपले होते म्हणून ते उठेपर्यंत बसून राहिली! मैनपुरीचे कम्युनिस्ट पुढारी बाबूराम पालीवाल यांनीही भूदान दिले. इतर प्रांतांतही लोक भूदान देण्यास उत्सुक होत होते. एका नऊ वर्षाच्या मुलाने पंडित नेहरूंना 70 एकरांचे दानपत्र पाठवले. बंगलोरच्या सय्यद हुसेननी 1000 एकरांचे दानपत्र पाठवले.

फेब्रुवारी 1952मध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 45 टक्के मते मिळूनही काँग्रेसला लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले. तराई प्रदेशात यात्रेला अनेकदा हिमालयाजवळून जावे लागले. एक दिवस एका सायकलीच्या ठोकरीने विनोबा खाली पडले. चालणे अशक्य झाले तेव्हा त्यांना खुर्चीवर बसवून उचलून यात्रा चालू राहिली.  उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने भूदानाला पाठिंबा देणारा प्रस्ताव केला. बलिया येथे साम्यवाद्यांनी विनोबांना मानपत्र दिले. विनोबांनी त्यांना सांगितले की, ते गरिबांच्या संघटनाचेच काम करत आहेत.

केवळ दान मागून जमीन मिळेल ही गोष्ट कल्पना-शक्तीच्या पलीकडची होती. आणि म्हणून शंकांना अंत नव्हता. काहींना वाटत होते, नक्कीच खराब जमीन मिळत असणार. आणि वस्तुस्थिती स्वतः नीट पारखेपर्यंत तोंडाला लगाम देण्याचे औचित्यही त्यांच्यात नव्हते! विनोबांचे उत्तर होते, ‘‘मला आजवर एकही असा मनुष्य भेटला नाही, ज्याने जाणूनबुजून खराब जमीन दिली. हैदराबादला एका गृहस्थांनी हजार एकर जमीन दिली होती. तिच्या वितरणाच्या वेळी आमच्या कार्यकर्त्यांना दिसले की, त्यातली पाचशे एकर कसण्यालायक नाही. तेव्हा दात्याने लगेच त्याऐवजी चांगली जमीन दिली.’’ दान सार्वजनिक सभांमध्ये घोषित होत होते. कोणी खराब जमीन देत असेल तर कुजबूज होणे स्वाभाविक होते. मुद्दाम खराब जमीन दिली जात आहे, असे कळल्यानंतर विनोबा त्या दानाला नकार देत असत.

आणखी एक शंका होती की, या पद्धतीने थोडीफार जमीन मिळेलही, परंतु समस्या सोडवायला ती पुरेशी नसेल. समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहियांनी म्हटले की, या पद्धतीने समस्या सुटायला 160 वर्षे लागतील. (चुकून त्यांनी 300 वर्षे म्हटल्याची बातमी प्रसृत झाली.) विनोबा म्हणाले, त्यांच्या हिशेबाने तर 500 वर्षे लागली असती; लोहिया 300 वर्षांतच काम होईल असे म्हणताहेत, तेव्हा त्यांचा इरादा मदत करण्याचा दिसतो! आपल्या 15 एप्रिल 1952 रोजी विनोबांना लिहिलेल्या पत्रात लोहिया म्हणाले की, भूदान-यज्ञ चांगला आहे, परंतु त्याला मर्यादा आहेत; शेवटी कायदा किंवा सत्याग्रह यांची कास धरावीच लागेल. 

विनोबांचे उत्तर होते,  ‘‘हृदय-परिवर्तनाला मर्यादा असू शकते, परंतु जोपर्यंत ती सीमा आलेली नाही, तोपर्यंत मी तिचा विचार कां करावा? बुद्धीत त्या सीमेचा विचार भलेही ठेवीन, परंतु हृदयात त्या सीमेला स्थान कां द्यावे? ज्या परमेश्वराने माझ्या हृदयाला एक गोष्ट पटवली आहे, तो दुसऱ्याच्या हृदयालाही ती पटवील, असा विश्वास मी का ठेवू नये? मी माझ्या आजारी वडिलांची सेवा करत आहे. त्या सेवेने ते बरे होतील, अशी आशा ठेवूनच मी त्यांची सेवा केली पाहिजे ना? माझ्या सेवेचा इच्छित परिणाम कदाचित होणार नाही, किंवा एका मर्यादेपर्यंतच होईल, हे माझ्या डोक्यात भलेही राहो... कायदा आणि सत्याग्रह याची कास धरण्याची वेळ आली तरी धरू नये, असे तर मी कधी म्हटलेले नाही. कायद्याला मी अडवलेले नाही. उलट मला वाटते की, माझ्या कामामुळे असे वातावरण निर्माण होईल, ज्यात चांगला कायदा बनवण्यात मदत मिळू शकेल. सत्याग्रहाबद्दल माझे काही विचार आहेत. अनुभवही आहे. दृष्टीही आहे. तिन्हींच्या संदर्भात मला जेव्हा सत्याग्रह अनिवार्य वाटेल, तेव्हा मी तो टाळणार नाही, अशी मला आशा आहे.’’

13 ते 16 एप्रिल 1952 दरम्यान विनोबांच्या उपस्थितीत चौथे सर्वोदय समाज संमेलन वाराणसीजवळ सेवापुरी येथे झाले. सर्व सेवा संघाने यापूर्वीच, आपल्या 25 जानेवारी 1952च्या बैठकीत भूदान-यज्ञाचा प्रचार आणि संघटन यांची जबाबदारी घेण्याचा प्रस्ताव केला होता. सेवापुरीत याचा पुनरुच्चार करून संघाने दोन वर्षांत 5 लाख गावांत 25 लाख एकर जमीन प्राप्त करण्याचा संकल्प केला.


अवघी भूमी जगदीशाची हे पुस्तक amazon वर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: पराग चोळकर विनोबा भावे भूदान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पराग चोळकर,  नागपूर
paragcholkar@gmail.com

विनोबांचे विचार आणि जीवन कार्य हा लेखकाच्या अभ्यासाचा विषय असून त्यांनी साम्ययोग, सर्वोदय आश्रम, सर्व सेवा संघ, परंधाम प्रकाशन इत्यादी संस्थांमध्ये काम पाहिले आहे. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके