हे सर्व बदल लक्षात घेतले तर असे दिसेल की, समाजवादाची जी उद्दिष्टे आहेत म्हणजे तळागाळातल्या लोकांचे जीवनमान सुधारणे, त्यांना मानवी अधिकार मिळवून देणे- याकरता एक वेगळी शासनपद्धती किंवा अर्थव्यवस्था आणण्याची गरज नाही. भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या जात आहेत. म्हणजे सर्व प्रश्न सुटले, असे मुळीच नाही. पण ते प्रश्न सोडवण्याकरता जुन्या समाजवादी कल्पना अपुऱ्या आहेत. त्या कल्पनांच्या पुढे न जाता आल्यामुळे झाले आहे काय की, बुद्धिवादी लोकांच्या लिखाणात एक पोकळपणा आला आहे.

साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा मंत्र जगाला दिला आणि स्वत: आचरणात आणला. त्यांना मिनी-गांधी म्हटले जाते. गांधींनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए, जो पीड परायी जाणे रे’ हा मंत्र आचरणात आणला. या दोघांच्या जोडीला मी आणखी एका थोर पुरुषाचा उल्लेख करू इच्छितो- विनोबा भावे यांचा. आध्यात्मिक साधक होता-होता ते पुढे समाजकार्यात पूर्णपणे गुंतले.
या तिघांपैकी कोणाचाही पिंड राजकारणाचा नव्हता. पण त्यांच्या काळात स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय काहीच करता येणे शक्य नव्हते. तेव्हा तिघेही राजकारणात/ समाजकारणात गुंतले. पण प्रश्न केवळ स्वातंत्र्याचा नव्हता; गरिबीचा होता, शोषणमुक्तीचा होता, सामाजिक उच्च-नीचतेचा होता. एकंदरच परिवर्तनाची गरज होती. हे परिवर्तन राजकारणाद्वारे घडवून आणण्याच्या विचाराला ढोबळपणे समाजवाद म्हणता येईल. गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांना या राजकारणाचा भाग मानता येत नाही. त्यांच्या प्रेरणा वेगळ्या होत्या, त्या प्रेरणांची चर्चा थोडी नंतर करतो. कारण पुढे काय करायला पाहिजे याचा विचार करण्याअगोदर गेल्या शंभर-दीडशे वर्षांत संबंध जगातील भांडवलशाही, तिला पाठबळ देणारा साम्राज्यवाद आणि एकंदर समाजव्यवस्था यात जे बदल झाले आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजेत. जुन्या घोषवाक्यांत आणि टिप्पण्यांत अडकून राहण्यात काही अर्थ नाही.
गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील बदल
१.भांडवलशाही-साम्राज्यशाहीतील बदल : साम्राज्यशाहीचा अस्त कधीच झाला. तिच्या बळावर आज भांडवलशाही वाढत नाही. भांडवलदार ही कल्पनासुद्धा जुनी झाली आहे. पूर्वी भांडवलदार म्हणजे एक ढेरपोटी व्यक्ती आणि कामगार म्हणजे मालकाच्या हुकूमाप्रमाणे काबाडकष्ट करणारे लोक- असे चित्रण होत होते. आज मोठ्या उद्योगात असा एकेकटा भांडवलदार राहिलेला नाही, मोठमोठ्या कंपन्या तयार झाल्या आहेत. तज्ज्ञ व्यावसायिकांच्या हाती त्यांचे व्यवस्थापन गेले आहे. भांडवलाचे महत्त्व कमी होऊन तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. एकंदर संपत्तीच्या उत्पादनात कारखानदारीचे योगदान प्रमाणाने कमी होऊन सेवा आणि बांधकाम या क्षेत्रांचे योगदान वाढले आहे. त्यामुळे निळ्या वर्दीतल्या कामगारांचे महत्त्व कमी होऊन पांढऱ्या पोषाखातील मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे आणि या मध्यमवर्गातील बरेच लोक शेअर्स खरेदी करून स्वत:च मिनी-भांडवलदार झाले आहेत.
पैसा या घटकाचे रूपही बदलले आहे. पूर्वी पैसा म्हणजे सोन्या-चांदीचे शिक्के असे समीकरण होते. पुढे असे शिक्के देण्याचे वचन देणाऱ्या नोटा आल्या. आता अशी परिस्थिती येत आहे की- पैसा म्हणजे तुम्ही समाजाला जे काही दिले असेल, त्याची फक्त एक नोंद एखाद्या संगणककेंद्रावर राहील. आणखी पुढे बघायचे म्हणजे- बिटकॉयन नावाची एक बिनसरकारी चलनव्यवस्था प्रस्थापित होऊ पाहत आहे, जिच्यावर कोणत्याही देशाच्या सरकारचे नियंत्रण राहणार नाही. पैशाच्या माध्यमातून चालणारे व्यवहार विश्वसनीय पद्धतीने चालावेत आणि उत्पादकांचा व ग्राहकांचा थेट संबंध येणे बंद झाल्यामुळे ग्राहकांना विश्वसनीय माल व सेवा मिळावी, म्हणून अनेक कायद्यांची व संस्थांची चौकट तयार झाली आहे. या व्यवस्थेतून जगात संपत्तीचे उत्पादन खूप वाढले आहे.
२. समाजव्यवस्थेतील बदल : मुख्य बदल म्हणजे लोकशाहीचा उदय आणि व्यक्तिस्वातंत्र्याला एक मूल्य म्हणून मिळालेली मान्यता. हे बदल संघर्षाशिवाय झाले नाहीत. युरोपात रूसो आणि जॉन लॉक हे व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते आणि नीत्से ‘सुपरमॅन’ या कल्पनेच्या बाजूचा होता. कार्ल मार्क्स हासुद्धा एकाधिकारशाहीच उचलून धरत होता. (इथे रा.स्व.संघाच्या एकचालकानुवर्तित्वाची आठवण होते.) शेवटी लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य ही मूल्ये जिंकली आणि त्यांचे जागतिकीकरण झाले.
या मूल्यांचा अर्थकारणावरही परिणाम झाला. व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून मुक्त व्यापारपद्धती सर्वत्र पसरली आणि ती रशियाच्या ‘कमान्ड इकॉनॉमी’पेक्षा जास्त यशस्वी ठरली. भारताने समाजवादी विचारसरणी ठेवूनसुद्धा ‘कमान्ड इकॉनॉमी’ कधी अंगीकारलीच नाही. फक्त मोक्याच्या उद्योगांवर मालकी ठेवण्याचे ठरवले. तेही धोरण विकासाच्या दृष्टीने कार्यरत होईना, म्हणून १९९१मध्ये सोडून दिले. लोकशाहीचा अर्थकारणावरील परिणाम असा झाला की, लोकशाहीत सत्ताधीश हे लोकप्रतिनिधी असतात व लोकहित जपायला बांधलेले असतात. ते कधी कधी भांडवलशहांच्या विरोधातही जातात. उदाहरणे द्यायची झाली तर- अमेरिकन सरकार तेथील भांडवलशहांच्या आऊटसोर्सिंगच्या धोरणाला विरोध करते आणि भारत सरकार शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी मुक्त व्यापाराच्या नियमांमध्ये सवलती मागते. लोकशाहीत कामगार- कल्याणासाठी कायदेही केले जातात. आणखी सांगायचे म्हणजे- प्रगत देशांमध्ये ते भांडवली देश असूनसुद्धा गरिबांच्या कल्याणासाठी भरपूर अनुदाने वगैरे दिली जातात. डेव्हिड मिल्स व ॲन्ड्रू स्कॉट हे आपल्या अभ्यासपूर्ण ग्रंथात म्हणतात की- 'The majority of government expenditure in developed countries now involves transfers... for which no value is received.' या देशातील सरकारी खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असतो. म्हणजे या देशातून राष्ट्रीय उत्पन्नाचा तब्बल २०% भाग गरिबांच्या व सामान्यांच्या कल्याणाकरता खर्च होतो. या देशांचे राष्ट्रीय उत्पन्नही खूप असते तेव्हा गरिबांकरता खर्च होणारी रक्कमही खूप असते, सन १९५६मध्ये तर तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख म्हणाले होते की- आपण समाजवादाच्या नुसत्या घोषणा देतो, खरा समाजवाद तर अमेरिकेतच आहे!
निष्कर्ष व पुढचा विचार
हे सर्व बदल लक्षात घेतले तर असे दिसेल की, समाजवादाची जी उद्दिष्टे आहेत- म्हणजे तळागाळातल्या लोकांचे जीवनमान सुधारणे, त्यांना मानवी अधिकार मिळवून देणे- याकरता एक वेगळी शासनपद्धती किंवा अर्थव्यवस्था आणण्याची गरज नाही. भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या जात आहेत. म्हणजे सर्व प्रश्न सुटले, असे मुळीच नाही. पण ते प्रश्न सोडवण्याकरता जुन्या समाजवादी कल्पना अपुऱ्या आहेत. त्या कल्पनांच्या पुढे न जाता आल्यामुळे झाले आहे काय की, बुद्धिवादी लोकांच्या लिखाणात एक पोकळपणा आला आहे. गरिबी व गरिबांच्या जीवनाचा खडतरपणा यांची वर्णने लिहायची आणि त्याचा दोष सरकारवर टाकून, सरकारच्या नीतिमत्तेविषयीच शंका घेऊन, आपण आपले कर्तव्य पूर्ण केल्याचा सुस्कारा टाकायचा, एवढेच कार्य बुद्धिवंतांकडून होत आहे. एक लेखक तर आणखी पुढे गेला आहे. अलीकडच्याच एका लेखात त्याने राजकारण्यांचा उल्लेख ‘हे हरामी नगरसेवक, आमदार, खासदार’ असाच केला आहे.
साधनाच्या संपादकांनी या परिस्थितीबद्दलचे असमाधान १६ जुलै २०१६च्या अंकात नेमकेपणाने व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘ती चर्चा (आर्थिक उदारीकरणाविषयीची) नको तितकी होते, तेव्हा त्याचा परिणाम (म्हणून) समाजात एक प्रकारचा सिनिसिझम कळत-नकळत पेरला जातो... समाजपरिवर्तनासाठी किंवा व्यवस्थेच्या बदलांसाठी आग्रही असलेल्या (लोकांनी)... होत असलेल्या व येऊ घातलेल्या बदलांचे अवलोकन करून पुढील मांडणी केली, तर त्यांचे म्हणणे अधिक गांभीर्याने घेतले जाईल.’
खरे तर हा सिनिसिझम नुसता पेरला गेला नाहीये, खूप वाढला आहे. त्याच्या जोडीला तुच्छताभाव, बकालभाव कथा-कादंबऱ्यांतून खूप दिसून येतो. कवितेत तर विशेषच. नाट्यात एक ‘थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ असा प्रकार तयार झाला आहे.
या सिनिसिझममुळे समाजाची बदलण्याची ऊर्मी कमी झाली आहे, असे साधनाचे संपादक म्हणतात. त्यापेक्षाही जास्त वाईट झाले आहे ते असे की, लोकांची कार्यनिष्ठा कमी झाली आहे. वडिलधाऱ्यांचा सिनिसिझम मुलांमध्येही उतरायला लागला आहे. नुकसान कुणाचे होते? आपलेच. समाजपरिवर्तन करायचे असेल, तर हा सिनिसिझम हटवायला पाहिजे. आणि तो जर राजकारणाच्या अतिचर्चेमुळे निर्माण होत असेल, तर राजकारणापासून दुसरीकडे मन वळवले पाहिजे. खरे तर ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा साने गुरुजींचा मंत्र राजकारणाचे सूत्र म्हणून सांगितलेला नाही, तो तुमच्या-आमच्या सर्वांच्या जीवनाचे एक मूल्य म्हणून सांगितलेला आहे. वर म्हटल्याप्रमाणे गांधी-साने, गुरुजी-विनोबा भावे यांच्यापैकी कुणाचाही पिंड राजकारण्याचा नव्हता. गांधींना तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस या राजकीय पक्षाचे विसर्जन हवे होते. अर्थात ते शक्य नव्हते, कारण लोकशाही शासनव्यवस्था राजकीय पक्षांशिवाय चालूच शकत नाही. पण मुद्दा हा की, राजकारणाच्या बाहेरसुद्धा एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे. या क्षेत्रातसुद्धा आज हजारो लोक एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहेत. पण त्यातून आमजनेतच्या कार्यनिष्ठेचा प्रश्न सुटत नाही. आमजनतेत कार्यनिष्ठेची प्रेरणा कशी निर्माण करायची, हा प्रश्न आहे.
मी इथे समाजसेवा या शब्दाऐवजी कार्यनिष्ठा हा शब्द वापरत आहे; कारण आज समाज इतका परस्परावलंबी झाला आहे की, प्रत्येक जण एका छोट्याशा क्षेत्रात काम करत असतो आणि खूपशा क्षेत्रांत समाजावर अवलंबून असते. एकेका व्यक्तीचे अंशदान सर्व समाजात वाटले जाते. तेव्हा एकेका व्यक्तीने आपले काम चोख करणे, शक्य तितके चांगले करणे, हीसुद्धा समाजसेवाच होते.
प्रश्न आहे, प्रेरणा कशी निर्माण होईल, हा. आपले तीन आदर्श पुरुष- गांधी, साने गुरुजी आणि विनोबा भावे- यांच्या प्रेरणा नि:संशयपणे संतवाङ्मयातून निर्माण झालेल्या आहेत. आपल्या संतांना वैज्ञानिक सत्याचे ज्ञान फारसे नसले, तरी मानवी जीवन सुंदर कशाने होईल याचे त्यांनी भरपूर चिंतन केले आहे. ते चिंतनच काही लोकांना अविश्वसनीय वाटते, कारण त्या तिघांनीही ईश्वराला, पुनर्जन्माला मानले आहे. आजकालचा बुद्धिवाद ईश्वर पुनर्जन्म तर मानत नाहीच; मनाला स्वातंत्र्य असे काही नसतेच, असेही मानतो. मावाचे सर्व व्यापार हे अणुरेणूंचे नियतरूपी खेळ असतात, असे त्यांचे म्हणणे. हे म्हणणे आपल्या नेहमीच्या अनुभवाविरुद्ध आहे म्हणून आपण ते सोडून देऊ. मनावर संस्कार करता येतात म्हणून तर ते कसे करायचे, याचा विचार प्रस्तुत ठरतो.
पुन्हा संत-महात्म्यांच्या चिंतनाकडे वळू. त्यांच्या चिंतनातून स्फूर्ती घेऊनच आपले आदर्श पुरुष तयार झाले आहेत. ते परंपरेत अडकून पडले नाहीत. आमचीच परंपरा श्रेष्ठ, इतरांची कनिष्ठ असा भेदभाव त्यांनी केला नाही. गांधींनी ‘ईश्वर-अल्ला तेरे नाम’ असे म्हटले. विनोबांनी गीता-प्रवचने केली, तसेच ‘इसेन्स ऑफ कुरान’ ही पुस्तिका तयार करून प्रसिद्ध केली. विवेकानंदांनी तर ‘इस्लाममधील समताभाव आणि ख्रिश्चन धर्मातील करुणा हिंदू समाजाने स्वीकारायला पाहिजे’ असे म्हटले. (साधनाच्या ३१ डिसेंबरच्या अंकातील दिलीप चव्हाण यांच्या फॅसिझमवरील लेखाच्या संदर्भात हे स्पष्टीकरण देत आहे.) सर्वांच्याच परंपरांतून जे चांगले दिसले ते त्यांनी घेतले व ते समाजात बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजपरिवर्तनाची प्रक्रिया पुढे चालवायची असेल, तर आपल्याला आपल्या परंपरांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यातला विज्ञानाशी न जुळणारा भाग काढून टाकून, आजच्या मूल्यांशी जुळणारा भाग पुढे आणला पाहिजे. भर द्यायचा तो सत्यावर नव्हे, तर मूल्यांवर- स्वत:चे जीवन सुंदर करणाऱ्या मूल्यांवर. आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून नव्हे, तर आपण स्वत:चे काही देणे लागतो म्हणून.
साधना परिवाराने साने गुरुजींच्या मातोश्रींच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘श्यामची आई’वर आधारित जे कार्यक्रम आखले आहेत, त्यात साधनाच्या १६ जुलैच्या अंकात म्हटल्याप्रमाणे ‘(समाजात) होत असलेल्या व येऊ घातलेल्या बदलांचे अवलोकन करून आणि ते मान्य करून पुढील मांडणी केली’, तर ते कार्यक्रम जास्त प्रभावी होतील. बदलांचे चित्र मी मांडले आहे. पुढील मांडणी अनेक प्रकारची राहील. ती मांडणी करण्याचे काम प्रतिभावंतांवर सोपवतो.
Tags: विनोबा भावे मिनी-गांधी साने गुरुजी भ. पां. पाटणकर सिनिसिझम साने गुरुजींच्या मातोश्रींची स्मृतिशताब्दी ॲन्ड्रू स्कॉट डेव्हिड मिल्स कामगार कल्याण कमान्ड इकॉनॉमी नीत्से जॉन लॉक रूसो बिटकॉयन समाज साम्राज्यशाही भांडवलशाही Cynicism Sane Gurujinchya Matoshrinchi Smruti Shatabdi David Mils Andrew scott Kamgar Kalyan Comman Economy Nitse John Locke Ruso bitcoin community Society samaj Samaj Capitalism Samrajyshahi Bhandvalshahi Vinoba Bhave Mini-Gandhi Sane Guruji BH. Pan. Patankar Sane Gurujinchya Paaulvatevar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या