डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कुपाटीवर आवर्याचा वेळ पसार्यानं फुलत नाही 
चढत नाही गंध फुलाचा कण्हेरीतल्या गुलाबाचाही! 
वसंताची, पानगळीची, सुख-दुःखाची सृष्टी तीच की माझी!
- फ. मुं. शिंदे

तुझ्याशी बोलतो

जिऊबाई खरे तुझ्याशी बोलतो, 
मन हे खोलतो तुझ्यापाशी

नावरे हपाप केली धावाधाव, 
सारखा अभाव खेची मला.

बाहेर बाहेर होते माझे लक्ष्य, 
मीच माझे भक्ष्य न कळता.

लोक होते माझे तराजू नि माप, 
पाप, ताप, शाप सर्व काही.

माझी लाळ मला झाली अनावर, 
तिचाच वावर माझ्याहून.

मीच केले माझे फाडून कपटे, 
अस्तित्व हे फाटे सर्वकडे.

अधिक मी बोलू काय जिऊबाई, 
ओढ माझी बाही तूच आता.
- मंगेश पाडगावकर

निळ्यात थोडासा काळा...

निळ्यात थोडासा काळा मिसळला 
आणि कोरड्या कागदाव
र मेघच मेघ उतरून आले 
सहन न होणारा लखलख पांढरा झाकोळला 
विरघळला सावळ्यात-अलगद 
कागदाचे अंग चिंब झाले.

आता या ओथंबून आलेल्या 
गार थरथरत्या कागदावर 
उमटू शकेल काहीही अधिरे 
हिरवे, निळे 
लाल, जांभळे 
केशरी किंवा पिवळेही...

आता काहीही उगवून येईल 
मनासारख्या या भिजल्या कागदी पानावर 
स्वप्नसुद्धा रुजेल अगदी खोल 
निळ्यात फक्त थोडा काळा मिसळला....
-अरुणा ढेरे

आडोसा

आजकाल
फुलांना उमलायलादेखील फुरसत नसते 
अशी अफवा पसरलीय पक्ष्यांच्या सभेत
आणि
फळांना पिकायलादेखील नसतो अवसर
अशी आवई उठलीय हापूसच्या मार्केटात, 
खरंच, हे खरं आहे का?

फोनवर बोलायलासुद्धा सवड नाही
अशी अवस्था झाली असेल, तर
माझ्या दीर्घायुष्यातील दोन क्षण मित्राला आंदण द्यावेत,
इतकी ही मॅटर महत्त्वाची आणि अर्जंट नाही का वाटत?

अस्वस्थ वातावरणात
वार्याची झुळूकदेखील मिळेनाशी झालीय आजकाल
तरीपण
ज्वालामुखीनं फेकलेल्या तप्त अवशेषात देखील 
सूक्ष्म जीव आढळावा, तसा
जगतोय मी कसातरी कवितेच्या आडोशानं
वार्धक्य नावाच्या आश्रमात!
 

- श्रीरंग विष्णु जोशी


माझी शेपूट... माझी खूण-

दररोज साफ करतो मी माझी शेपूट
पॉलीश लावून चमकवतो...
माझी शेपूट हीच माझी खूण
जमेल तसे सगळे बनतो
कधी वाघ कधी बोकोबा कधी उंदीर 
कधी हत्ती तर कधी चिमणीसुद्धा
माझी शेपूट म्हणजेच मी
हळूहळू लांब होत चाललीय वाढत्या वयाबरोबर 
तिच्या लांबीनुसार बदलते खुर्चीची उंची 
टेबलाचे क्षेत्रफळ 
माझी शेपूट हा माझा एकमेव आधार 
सगळ्या इमारतींचे दरवाजे आपोआप उघडतात 
शेपूट दिसताच....
अखिल मानव जात नम्र होते 
जी हुजूर जी हुजूर करत राहते

माझी शेपूट एक दिवस एवढी लांबणार 
आहे... की हनुमानासारखा तिच्या 
शिखरावर चढून बसेन 
मग मी सोन्याची लंका जाळायला मोकळा 
ती जाळल्यानंतरही माझी पूजाच होईल 
इति शेपूटमहात्म्यम् समाप्त.
 

- ज्ञानेश्वर मुळे

[शेपूट- सनदी अधिकार्यांना भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय विदेश सेवा अशा शेपटी असतात. या शेपूट महात्म्याची कविता.]

शेजारी

दोन झाडं जोडीनं
शेजारी शेजारी वाढलेली
उन्हापावसांत न्हालेली
पूर्ण बहरात आलेली

दोन झाडं डौलानं
डुलत गप्पा करणारी 
पाखरांना आवतण देणारी 
त्यांची घरोटी जपणारी

दोन झाडं भिजलेली
तृप्त तृप्त हसणारी 
वेड्यावाकड्या पावसाला 
'नको नको' म्हणणारी

आभाळात, काळे ढग कडकडा भांडले
वीजवेलीतून तुटून पडले, कर्कश्शपणे झाडावर एका 
आता... एक झाड भयग्रस्त हिरवळतंय्  
दुसरं झाड काळं ठिक्कर 
कोळसा होत आक्रंदतंय् 
दोन झाडं... शेजारी
 

-उषा मेहता

चौकट आणि वर्तुळ

मी कोण?
मी केंद्रबिंदू
चौकट आणि वर्तुळाचा!
माझ्याभोवती
आखल्या जातात
लक्ष्मणरेषा
आणि
उभे केले जातात
चौकटींचे पहारे!

डोईवरच्या आसर्यासाठी
मी होते बंदिस्त
उंबरठ्याच्या आत
अन्
राहते फिरत
त्याच त्या वर्तुळात
युगानुयुगं!

पोखरत राहतात
तीच ती
नीतितत्त्वं
गिरमिटासारखी
मला
आयुष्यभर!

बाईच्या जातीनं
कसं खाली मुंडी घालून चालावं!

नजर भुईत गाडावी!
माझ्या फुलपाखरी नजरेवर 
आरूढ केले जातात 
जहरीतले बाण 
आणि
पायात मणामणांच्या
बेड्या!

मी भयभीत! 
थिजलेली!
किती युगं?
माहीत नाही!

आता चौकटी
किलकिल्या झाल्यात!
उघडलीत कवाडं खिडक्यांची! 
विस्तारल्यात दिशांच्या कक्षा!
माझीही पिसं 
फुलारलेली- पाखरांसारखी!

वर्तुळांची आणि चौकटींची 
दालनं ओलांडून 
मी पसरू पाहतेय पंख!

थोडा अवकाश द्या! 
द्या धीर थोडासा! 
होईल मला अस्मान ठेंगणं!

तरीही
मी या भुईची! 
या मातीची! 
या गगनभुईची 
लेक लाडकी!

चौकटींच्या पलीकडची! 
वर्तुळांच्या पलीकडची! 
लेक भुईची! 
लेक बाण्याची!!

- शैला सायनाकर


चित्र

डोळ्यांत डोळे पाहतात, 
नाहतात कोवळ्या उत्सुकतेत.

पापण्यांच्या पाखरांची 
लटकीशी लडिवाळ लवलव
असते किलबिलत अधूनमधून

कुंवार आसक्तीचे
सुकुमार कुसुंबी रंगतरंग 
विरघळत असतात गालावरच्या खळीत.

ओठांशी कळीदार स्मितही ओठंगते 
वळीव पाकळ्यांच्या उमलऊर्मीत.

हलकासा हस्तक्षेप पुन्हा पुन्हा
कपाळावरची चुटुकली हट्टी बट सावरताना, 
तर कधी चतुर बोटांचा
उन्नतपदरस्पर्शी चाळा..

बये,
हे पारदर्शी चित्र इथपर्यंतचे, 
नजरेच्या खेळातून रंगत आलेले, 
नजरबंदी करणारे- 
बेसावधपणे पुरे करायला 
मला अवधी दें.
सावध राहणे अशक्यच...
 

- पुरुषोत्तम पाटील


पराभूतांच्या पाषाणनगरीत

तिरमिरीतच तुझ्या दिशेने निघाले होते
वाट अर्धी मागे
अर्धी पुढे. प्रश्नांकित
का? कितीदा? कशासाठी?
रात्रीच्या आवेगात खुडलेली
निशिगंधाची फुलंही संभ्रमित
'का थांबलीय ही', पुटपुटत.
    
क्षणभर आठवणारा
तुझा चिरपरिचित अपरिचित चेहरा
'ये ये राणी
इथे ना कुणी
भर रानातुन
हिरवी गाणी'
म्हणत बाहू पसरशील
की शेवाळलेल्या आठवणींच्या 
कल्लोळात काळ्या, बुडवशील?

कपाळावर उमटणारी ती शिर
पुन्हा तटतटेल?

"की स्मितहास्याच्या कंसात 
मधाळ शब्द वेल्हाळत राहतील?

दूर मागे-
कठोर मुद्रेचा करडा पहाड
आणि हुंदक्यात उसवणारी-
गाईची करुण नजर
भेदरलेल्या चेहर्यांवरचे
करपत गेलेलं कोवळेपण
आणि भुरभुरत कोसळत जाणारे
जीर्ण घर क्षणोक्षण
मीच बुजवलेली परतीची वाट. कापलेत दोर.
पुढे काळोखाचा अगम्य घाट 'आ' वासून
आणि पांगुळलेले माझे पाय!

गजबजलेल्या निर्जन अरण्यात
येथपर्यंतच असणारी माझी वाटचाल
हेच एकमेव अंतिम सत्य-
हाती उरलेलं माझ्या.
आता मी एक जिवंत शिल्प

संदर्भहीन- गतिहीन
ह्या पराभूतांच्या पाषाणनगरीत
आणखी एका थडग्याची भर!

 

- सुहासिनी इर्लेकर

 

अशी अलौकिक अस्वस्थता

अशी अलौकिक अस्वस्थता कोण जन्माला घालतंय 
कुणाची कोमल ओंजळ सतत रिती होत्येय माझ्यावर 
अस्वस्थ फुलांनी?

पाऊस कोसळण्याचे प्रदेश आता दूर राहिलेत 
दूर राहिलेय आता पावसाच्या जाड पडद्यापलीकडचं 
काहीच न कळणं, नुसतंच आत्मदंग रहाणं 
न दिसणारं काही रक्तातच आपोआप उमलून येणं

आता या वाळवंटी पारदर्शकतेला अंत नाही 
वर तापलेला सूर्य, खाली पूर्ण नागवा मी, माझा एकांत 
माझ्यामागं माझ्यातून ठिबकत गेलेली दीर्घ रक्तरेषा 
वाळूत असहाय विरलेली, आरपार अपरंपार 
माझ्या वेदनांचा सुगावा गिळून टाकणारी वाळू 
हा मी चाललोय
की वाळूचा समुद्र मला वाहून नेतोय... 
सारे रंगसुगंध उडून गेलेल्या जाणत्या फुलासारखा?

कुठल्या किनाऱ्यावर मला नेतोय वाहून 
हा वाळूचा समुद्र?
- संतोष शेणई


पानगळ

झाली निंबाची पानगळ 
फुटे तांबुस पालवी 
कशी पालटली कूस 
सृष्टी जुनाट घालवी

तांबुस हलती पाने 
जशी चैतन्याची लूट 
कणाकणातून उधळण 
जागोजागी लयलूट

माझ्या दारची गं सये 
कशी बदलली हवा 
झाडं झाली उदासवाणी 
सरला गं गारवा

गद्य भरली पानांनी 
झाडं गाळती आसवं 
हरवली गं हिरवाई 
पानगळीचा उत्सव

सदा कदा डोईवर 
शोधत असे अंकुर 
माझ्या बागेचा गं सये 
कोणी खुडला बहर

झाडं झाली ओकीबोकी 
खुंटली पालवीची आशा 
चिवचिवत्या चिमण्यांनीही 
कशी बदलली दिशा

किती आवरले आसू 
नाही आली दया माया 
माझ्या फुलत्या बागेची 
कशी झाली रयाकया

शोभिवंत बागेजागी
आता उजाडल्या काड्या 
कसे टाकावे गं पाऊल 
पाचोळ्याच्या पायघड्या

- प्रतिमा इंगोले


मिसळ भिनत चाललीय

खांबावर डोकं आपटून आपटून
हिरण्यकश्यपूनं ठार मारलं अखेर नरसिंहाला
'तिच्यायलाऽऽ भक्ति-बिक्तीच्या भरोश्यावर 
उगाच मरायचो भाजून उकळत्या तेलात-' 
असं म्हणत, भक्त प्रल्हाद बसून राहिला
मख्ख
हॉटेलच्या गल्ल्यावर.

बुद्ध हसला अचानक
अणकुचीदार सुरा घेऊन
साक्षात्कार फुगत राहिला खमंग भज़ी होऊन

निखळला
ध्रुवाचा तारा
सट्टाक्- 
बिजागरातून आकाशाच्या...

|| श्री गुरुदेव दत्त || म्हणत साधू उभा
हॉटेलच्या दारासमोर 
वर्तमानाची फाटकी झोळी पसरून-

मिसळ भिनत चाललीय
माझ्या मस्तकात

तिखट झणझणीत जाळ होऊन 
नाका-तोंडातून पाणी येतंय माझ्या
पुराणकथांचं....
 

- महेश केळुसकर

माणसं जोडणं

माणसं जोडणं खरं तर किती सोपं आहे! 
नुसत्या 'हॅलो'नेही फुलाचा पूल बांधला जातो 
येता जाता मनःपूर्वक स्मित दिलं तर 
कधीकाळच्या परिचयाचा गाव सांधला जातो.

अभिनंदनाचं एकच फूल... आपल्या मनाचा सुवास 
चार ओळींचं पत्र, आपल्या आपुलकीचा प्रवास 
उन्हात चालणाऱ्याला आपल्या सावलीत घेतलं तर
आयुष्यभर आठवणीत राहील त्याला आपलं घर. 

सुख-दुःखाच्या चार गोष्टी... पावसाची रिमझिम थोडी 
थोडा चांदण्याचा शिडकावा... थोडी हिरवीगार झाडी 
माणसांचा समुद्र भोवती... हेच धन आहे
मीपण सोडणं-माणसं जोडणं, हेच जगणं आहे.

- दत्ता हलसगीकर

आठवण

गावाकडच्या आठवणींची तगमग
सगळा देह सोलून दुखावा तशी;
उन्हाळ्याशिवाय दुसरा अन्य ऋतु 
हेळसांड साकार करण्यासाठी नव्हता
मीठाचा खडा
भाकरीच्या देहावर ठेवून
डोळा भरून भाकरीकडं पहात;
दाताचं पाणी चघळण्याची
चवताळलेले दिवस
यापलीकडं भूतकाळाचं वेगळं स्पष्टीकरण नाही 
बापाच्या कंबरेला पैसा नव्हता
काळजातल्या ओलीशिवाय आईकडं दुसरं काही एक नव्हतं
घर दहा जागी तुटकं फाटकं
सर्व भावाबहिणींचे चेहरे
अज्ञानाच्या काळ्या सावलीतून झीरमीर दिसणारे 
भावकीत शहाणपणाचा पाठ नव्हता
गावाभवती गरिबीचा गाव वेढून गिळणारा गराडा होता
सर्व गाव
राबण्याची बाराखडी रोज घोकणारं
घराघरातल्या बाया
फाटक्या लुगड्यांमध्ये घुटमळत कशाबशा जगणाऱ्या 
सगळ्यांकडं लंगोटीएवढाली रानं
सगळ्यांच्या डोळ्यांत निस्तेजाची साय

प्रत्येकाचं घरदार
अवघडलेलं 
उसवलेलं
कष्टाचा लांब प्रवास स्मशानापर्यंत टेकलेला 
दारिद्र्य अंथरून दारिद्र्याच्याच कांबळीवर शांत होणारे देह
करपून कडू झालेल्या भाकरीसारखे
वर्षातले सर्व दिवस समान 
आठवणींची तगमग
सगळा देह सोलून दुखावा तशी.
 

- केशव सखाराम देशमुख

शब्द

तू मला शब्द दे
तो मी पाळीन. 
पूर्ण पोषण करीन 
मोठं करीन शब्दाला

तुझ्या कानातील कुड्यांचे वय किती 
हा प्रश्न मी का विचारू? 
मोती कोणत्या पिढीतले 
हेही मला माहीत नाही. 
वयाचा अंदाज घ्यायचाच झाला त्यांच्या तर 
ऋतुपर्णाची सळसळ बिलगून घ्यावी लागेल.
मला फक्त एकच शब्द 
हवा आहे तुझ्याकडून 
तो मी जपून ठेवीन.

तू मात्र माझा दिवा जपून ठेव 
ओलीस ठेव हवा तर.
रात्रीच्या प्रवासात
पावलाला वाट दाखवायला पुरेसा आहे तो.
एखाद्या वेळी फुलांच्या बाजारात 
पाऊल अडलेच माझे 
तर श्वास तेवढा मोकळा कर
माझ्यासाठी

मी तुझ्या दुकानातील
फुलांची किंमत विचारणार नाही 
वरफलक झाकून ठेवण्याचा
तेवढा एक शब्द दे.

ओंजळभर फुले मी घरी आणीन
डोळ्यातील थेंबभर पाण्यात भिजवत ठेवीन
भर उन्हात जरी
पडला चांदण्यांचा सडा
तरी मला हवा आहे
इतका इतका की 
मला दिलेल्या शब्दाएवढा
तो पुरेसा आहे.

- चंद्रमोहन कुलकर्णी

दोन कविता
1.
पाय थबकतात थांबतात, विसरायची असते त्यांना वाट 
लांबवरच्या मृगजळातही टाळायची असते त्यांना आंधळी पहाट! 

कवटाळून जावं, तसं तसं जातात प्रदेश पायाखालचे दुरावत 
हिरवेपणात पायदळी मुकी तशीच पडकातल्या गवताची दुखापत! 

कळायचं कसं पाखराच्या चोचीतलं कण्हत राहाणं रानाचं 
सोन्या-चांदीच्या नवसात दुधाची वाट पाहाणं मुक्या थानाचं! 
पेटत गेली फुलांची आग की पानं पळसांची जातातच गळून 
त्याचा तोच निष्पर्ण ऋतू बघत राहातो स्वतःसच वळून वळून!

2.
सृष्टीला नसावं सुख-दुःख वसंताचं, पानगळीचं 
तसं सर्वांचंच जणू चाललेलं लपवणं मुळातलं खरंही, खोटंही! 

उगवणं अवघड असतं अंकुरास कपारीच्या दगडावर 
ओसाड खोल आडात पारव्याची अंडी कोणाच्या भरोश्यावर? 

ज्याचं ते ज्याचं तसं इथं धुमसतो धुनी बदलून 
सावलीहून सावलीसारखं सावलीत खिन्न उन्हासारखं उन्हें! 

कुपाटीवर आवर्याचा वेळ पसार्यानं फुलत नाही 
चढत नाही गंध फुलाचा कण्हेरीतल्या गुलाबाचाही! 
वसंताची, पानगळीची, सुख-दुःखाची सृष्टी तीच की माझी!
- फ. मुं. शिंदे

जोगाईच्या रस्त्यावरून....
एकेका पिढीचे पक्षी उडून गेलेत,
मी अजून झोपलेली आहे;
या अभयारण्यात
अजून उजाडायचं आहे....

खोल खोल पाण्याचे डोह, आता कुठे दिसत नाहीत... 
कित्येक रंगाचे आकाराचे पक्षीही हल्ली फिरकत नाहीत 
झाडांची संख्या विरळ होत चाललेली,
अजून उजाडायचं कसं आहे?
हा काळोख मला हद्दपार करणारा...
हे चीत्कार मला हद्दपार करणारे....
या डरकाळ्या मला तोडून खाणार्या....
वेशीवर टांगल्या गेलेले पक्षाघाती पक्ष्याचे डोळे 
थोडेही कुठे सरकायला अवकाश नाही....
मी अजून झोपलेली....
कित्येक क्रांती झाल्यात; कित्येक गाव भुईसपाट झालीत् 
आकाशाचा तुकडा थोडाही कुठे कोसळत नाही. 
येथे आजही वणवे पेटतात, पाखरे दिशाहीन होतात... 
मी अजून झोपलेली...

मी झोपलेली म्हणून जिवंत असेन, 
किंवा मादी म्हणूनही असेन सुरक्षित 
कदाचित मी पृथ्वी असण्याचा हा संभव असेल 
(हे सत्यही माझ्यापुरतंच) 
झोपेत फरफटत नेऊ पाहणारे हात व 
वेशीवर टांगलेले पक्ष्याचे डोळे
एवढे ऐवज पदरी बांधून
जोगाईच्या रस्त्यावरून, माझे अखेरचे विधान
चालले आहे...
अजून उजडायचं कसं आहे?
- रेषा आकोटकर
 

पांग
उकिर्ड्यावरी ऊग्र वासात गेलो 
नव्हे बालकाण्डात त्रासात गेलो

किती ओळखीच्या खुणा हुंगल्या मी 
बिड्या आठवाच्या जुन्या झिंगल्या मी

ऊर्जा स्वतःला इथे प्राप्त केली 
चतुष्पाद सारी इथे आप्त झाली

आधारास तेव्हा कुपाटीच होती 
तीही बिचारी उपाशीच होती

फिटे पांग आता समाधान आहे 
उकिर्ड्या तुझे हे महादान आहे   
-इंद्रजित भालेराव


संतवाणी
वादळवार्यात 
हातात कंदील घेऊन
तो चालला होता,
पाहता पाहता प्रवास संपेल 
या आशेवर पावलात उत्साह

काही वेळाने 
कंदिलाच्या काचेवर

एका बाजूने काजळी धरू लागली, 
कंदिलातली बातच मूळी
बरोबर नव्हती, 
हळूहळू काजळीने प्रकाश 
गिळायला सुरुवात केली

त्याने वात मोठी केली
पण प्रकाशाच्या प्रकृतीत 
फरक नाही
कदाचित कंदिलात तेलच 
बरोबर भरलं नसावं 
अशी आशंकाही
तरंगून गेली त्याच्यात,
थोडा वेळ
तशाच आंधळ्या प्रकाशात 
तो चालत राहिला
तेल संपल्या कंदिलाची 
वात मोठी करत

पिसाळलेल्या वार्यात 
विझलेला कंदील घेऊन 
तो उभा आहे. 
काय माहीत, केव्हापासून 
आणि केव्हापर्यंत...?

माफ करा,
आता मी कुठल्या 
अंधाराची गोष्ट सांगू? 
जो अंधार त्याच्या बाहेर 
अक्राळविक्राळ पसरलाय 
की जो अंधार त्याच्या 
आतपर्यंत झिरपलाय?

कोणत्या रस्त्याचं वर्णन करू? 
ज्या रस्त्यावर 
त्याला पुढं जायचं होतं...
की ज्या रस्त्यावर 
तो आता परतू शकत नाही?
-दासू वैद्य
[सर्वेश्वर दयाल सक्सैना यांच्या कवितेचा भावानुवाद.]


गोची
आपल्याही कल्पनाशक्तीवर मात करणारे 
षड्यंत्र पाहून कवी संतापला.
त्याने ईश्वरालाच खडसावले- 
"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर." 
ईश्वराची मोठी गोची झाली.
"एखादा कुणी बाप दाखवताही आला असता... 
पण मुळात आई आहे,
हे तर सिद्ध करता यायला हवे..."
-विठ्ठल वाघ


धुके, तिचे दुःख
धुके उतरले खाली
घर आभाळ झालेले 
आता जावा कसा दिस
आत पाखरू भ्यालेले

कुणी पाहुणा श्रीमंत 
इथे थांबावा ह्या वेळी 
भूक मालवून काळी 
जावी मिटून काजळी

क्षण धुकेरी प्रश्नांचे 
उभा डोंगर शेजारी 
कंदमुळाच्या चवीत 
जिणे झालेले आजारी

रंगवेडे शालीमध्ये 
घेती सुखाला वेढून 
इथे जगण्याची ओल 
जाते क्षणात जळून

यावे उन्हाचे सोयरे 
धुके हवेत विरावे 
संध्याकाळ होण्याआधी 
तिचे दुःख न उरावे!
-रेणू पाचपोर


ठेवलेलं काळीज
चंद्रतार्यांना न पेलणारी रात्र
अशी सामोरी आली 
आणि... खाली ठेवलं काळीज
विसाव्यासाठी 
क्षणभर....!
कोंदणात ठेवलेले
भावमुग्ध क्षण
फुलांच्या गंधांच्या ताफ्यासह
या चंद्रदारी येतात
आणि... ठेवलेलं काळीज
पुन्हा उचलून घ्यावं लागतं...!
- वासंती इनामदार जोशी

युद्ध
सोपं असतं काठावरून बोलणं.
जोष असतो आवाजात, 
स्वतः काही मोलाचं करत असल्याचा निर्वाळाही मनातून...

आहे भोवऱ्यात गरगरत
बुडतही आहे कणाकणानं.
प्रतिदिन नव्यानं बुडत आहे. 
किती गहन नदी, माहीत नाही.
प्रवाह असा रुंद की, नाहीच कुठं नजर पोचत.... 
भोवरा तर क्षणाक्षणाला आत खेचतो आहे

युद्ध तर करायला हवंच.
भोवऱ्याशी आणि काठावरच्यांशीही.
नदीबरोबर कसलं युद्ध?
तिनंच तर वाढवलं आजपर्यंत
तिनंच दिलं पोषण
तिनंच भरली ओंजळ
तिच्याच गौरी आल्या घरी
आजपर्यंत.
बापाचं घर सुटलं. नवऱ्याचं घर सुटलंय आत्ता. मुलांचं घर
कधी नव्हतंच अस्तित्वात.
तेव्हा, न सुटणारा आसरा आहे, तोही
नदीचाच. माझी माय ती.

नदी आणि तिच्यातला भोवरा यांच्यातच संभवतं
युद्ध खरोखर; होईलही आता.
आणि मग
आपण निर्विकल्प मोकळे!
-वासंती मुझुमदार


अभंग
काळजाचा धर्म 
कळेना कुणाला 
ज्ञानवंत कसा
- मुका झाला?

ज्ञानवंताची वाचा 
गेली एकाएकी 
कुणाची पालखी
- खांद्यावरी?

धनिकाचा कोयता
त्याची धार न्यारी
श्रमाची भाकरी
- शिंक्यावरी.

बारमाही पाणी 
ऊस पोसलेला 
कोयता कसलेला 
- घरीदारी.

उभ्या कणसात 
चुरा अंधाराचा 
सूर्य मुळावर 
- सदाकाळ.

सदा आणि कदा 
ज्ञानियाचा जप 
मनातील मोह 
- जळेचना.
महावीर जोंधळे


नूर फातिमाचे डोळे
मला स्वप्नात अजून दिसतात 
नूर फातिमाचे डोळे

फक्त तीन पावसाळे-पाहिलेले
मला तिच्या नितळ, निरागस, डोळ्यांत 
दिसते एक निळे झळझळीत 
आभाळ. निरभ्र, ज्यात नसतात 
काटेरी तारा 'एल.ओ.सी. च्या 
आणि दिसतात उद्याचे उजळ चंद्र-सूर्य 
ज्यांची व्याकरणातही द्विवचने नसतात 
....तसे जागेपणी तर मलाही ऐकू येतात 
स्फोटांचे आवाज तुमच्याचप्रमाणे 
आणि दिसतात टॅक्सीमधून लगबगीने 
उतरणाऱ्या काळ्या आकृती-बुरखाधारी 
-पण तरीदेखील मला दिवास्वप्नांत 
दिसतात नूर फातिमाचे डोळे आणि 
त्या डोळ्यांत मला कबीराचे शाल विणणारे 
हात दिसतात.
- रवींद्र सुर्वे


ध्वंसध्वनी
मंत्र जपत यंत्र कुरकुरते 
पोटात अधाशी सामुग्री 
गरगरत पेटते ज्वाला
भाकरीची मिजास करकरते.

जमीन न्हाते कोरड्या पावसात 
पिकांना बुरशी सहकाराची 
दूध पिळून गायी आटल्या 
आकाशाचे आचळ निकामी

एक चंद्र खंगतो 
एक सूर्य खोकतो 
एक सागर धुमसतो 
एक डोंगर हमसून हमसून रडतो.

पाण्याची पातळ त्वचा 
त्यावर पांघरूण 
कधी घालायचे? 
उन्हाने तडकेल म्हणून 
आपणच ओणवे होऊन पिऊ या की 
जाऊ या तळाशी

एक कळशी वर डुचमळते आहे 
ती कधीतरी भरणार आहे काय?
- अशोक बागवे

हार
मी कोण? 
काय मी केले? 
मज माझे ठाऊक होते, 
का पुतळा होऊन बसलो 
कोपर्यात आता येथे! 
कुणी मला घालतो हार 
कुणी गुलाल लावून जाई 
मजवरती चढतच गेली- 
ही अशी गुलाबी झिलई!
मी काय सांगुनी गेलो 
'हे काय!' ऐकिले त्यांनी 
मज सजवुन धजवून ऐसे- 
विक्रीस काढले त्यांनी! 
खपलो ना विकला गेलो 
मग लिलाव माझा झाला
पण बोली बोलायला 
ना समोर कोणी आला! 
कुणितरी म्हणाले तेव्हा- 
मोडीत याजला घाला. 
हळुहळू असा हा त्यांनी- 
माझाच पराभव केला!

- या पुण्यतिथीच्या दिवशी 
मज कबूल माझी हार 
अलिकडे फुले नाराज 
होण्यास गळ्यातील हार!
-लक्ष्मीकांत तांबोळी


वेशीला वळली गाणी
विझलेला वारा भटके 
आतून पोळते गाव 
पाण्यात ठेवले कोणी 
चांदीने मढले देव

मायाळू शब्दसुखाची
प्राक्तनासारखी वाट 
गोंजारून घेण्याआधी 
सर्वत्र नवा बोभाट

प्रश्नाच्या उत्तरवेळी 
बोलावे काय कळेना 
सावलीखालचे ऊन 
अस्वस्थ उजेडाविना

प्रत्येक खुलाशापोटी 
अंधार घालतो पिंगा 
ओढावे किती आभाळ 
झाकण्याइतुके अंगा

सार्याच दिशा डोळ्यांना 
आयुष्य संपल्यावाणी 
कोणत्या युगांतासाठी 
वेशीला वळली गाणी!
- कल्याण इनामदार

परिवर्तन
कितीकदा भाजलो भिजलो 
दुःख उशाला घेऊन निजलो 
पडलो रडलो धडपडलो 
कधी देठतुटल्या 
फुलाइतका अवघडलो 
समजून उमजून घेतलं स्वतःला

कधी सदीश भटकलो 
कधी अदीश 
खूप चालणं झालं 
आणि हा असा अंतिमापाशी आलो; 
तोच चंद्र, तीच विवरं
जू वाहणारे खांदे बदलले.
-हेमकिरण पत्की


कविता
चंद्र दारी आला 
उभा पाठमोरी 
अंधार पाहुणा 
सांभाळे ओसरी 
चंद्र दारी आला 
दूध ऊतू गेले 
कडेवरी ओझे 
डोळे पाणावले 
चंद्र दारी आला 
जाईची रांगोळी 
वेडा पारिजात 
सांडतो दिवाळी 
चंद्र दारी आला 
कासावीस झाले 
दूर झाडाखाली 
हितगुज ओले 
चंद्र दारी आला 
पाहू किती किती 
जीवाची समई 
सरकाव्या वाती.
-मधु जामकर


देवाचा धावा
जे देव नाहीत
त्यांची धास्ती मी का करावी?
सोन्यारुप्यांनी मढवलेल्या ह्या मूर्ती 
जरी वाटत असले त्यांचे डोळे जिवंत 
तरीही नाही पाहू शकत ते 
गडद अंधार सभोवतालचा 
असतीलही त्यांच्या जिव्हा लालीलाल 
पण त्या नाही बोलू शकत 
त्यांच्याच प्रिय भक्तांच्या विरोधात

का इतका सोस आहे त्यांना
दागिन्यांचा?
का मढवलंय त्यांना हिरे माणकांनी? 
त्यांचे ताबेदार उतरवतात 
एक-एक दागिना 
रात्रीच्या काळोखात 
आणि चढतात वेश्येच्या माड्या 
हाती राजदंड असलेला हा देव 
त्याच्या मुखावर असलेला धुळीचा थर 
तो नाही करू शकत दूर

हत्यारबंद असूनही
तो नाही थोपवू शकत 
हाती चूड घेऊन निघालेला जमाव 
जे देव नाहीत त्यांचा धावा
मी का करावा?
फुटलेल्या मडक्याप्रमाणे
झाले आहेत ते निकामी
डोळे भरून गेले आहेत त्यांचे धुळीने 
राजाच्या नजरकैदेत असावेत गुन्हेगार 
तसे अडकून पडले आहेत ते कडीकुलपात 
दिव्यांची आरास पाहून
दिपून जातात माझे डोळे 
पण देव नाही पाहू शकत झगमगाट
अखंड सुरू आहे होमहवन 
ज्यात त्यांनी दिलीय आहुती 
निष्पापांच्या रक्ताची 
धुराने काळवंडलंय देवाचं काळीज 
लागलीय वाळवी सार्या शरीराला 
आणि बडवे म्हणतात, 
साजरी गोजरी आहे प्रतिमा देवाची.

पक्षी, चिलटं, मांजरं
कधी येऊन करून जातात विष्ठा 
देवाला नसतो थांगपत्ता 
देव नाही आवरू शकत 
रक्ताचे वाहते पाट 
महापूर 
धरणीकंप
आणि भक्ताच्या डोळ्यांतली हिंसा

देवांच्या किंमती
भडकल्या आहेत प्रचंड 
तरीही त्यातला एकही 
नाही करू शकत श्वासोच्छ्वास 
ते नाही चालू शकत एखादं पाऊल 
जे झोपले तर उठू शकत नाहीत 
त्यांची आपण का बाळगावी भीती?

त्यांच्यासमोर केलेला आक्रोश 
मृतासमोर केलेल्या 
आक्रोशसारखा नाही का?
जे राजाला हटवू शकत नाहीत सत्तेवरून 
जे आंधळ्यांना दृष्टिदान 
मुक्यांना वाचा 
बहिर्यांना देऊ शकत नाहीत कान 
जे नाही देऊ शकत विधवेला न्याय 
किंवा
घालू शकत नाहीत फुंकर 
अभाग्यांच्या वाहत्या जखमेवर 
त्यांना आम्ही का द्यावा नैवेद्य? 
सुतार आणि कारागिरांची 
निर्मिती असलेले देव 
किती काळ राहणार आहेत जिवंत?
- सायमन मार्टीन

पालखी
अशी कशी अघटित 
दैवजात ही करणी 
बुडू देत नाही दुःखा 
मनातली इंद्रायणी

शोकाकुल इंद्रियांना 
घट्ट जीवघेणा पीळ 
दुःखजड क्रूसावर 
विव्हळते जन्मकळ

दुःख असे अनिर्बंध 
वाहतसे भळभळा 
जन्मोजन्मीचा उमाळा 
येई दाटुनिया गळा

दुःखगर्भ कारंजीच 
उसळली ठाईठाई 
माझ्या रक्ताचेच थेंब 
नाचतात थुईथुई

दुःख घेई उंच झोका 
ओठांतून गाणे येई 
अंतरीच्या गाभाऱ्यात 
वाजे प्राक्तन सनई

अशी यात्रा निरामय
वाट चालते सारखी 
मला न्यावयास आता 
आली दुःखाची पालखी
- बाळ राणे


माहेरी आलेली पोरगी
न बोलताही 
खूप काही बोलते
पहिल्या सणाला माहेरी आलेली पोरगी.

तिच्या सुकून गेलेल्या
ओठांच्या पाकळ्या सांगतात बरंच काही 
स्वप्नांच्या चुराड्याविषयी
डोळे देत राहतात ग्वाही...

जेवायला बसल्यावर सवयीप्रमाणे
शोधत राहते ती शिळंपाळं 
घाबरते, भांबावते, उठते उपाशीच 
म्हणते "उठून रडू लागलंय बाळ”    

घरात वावरतानाही
तिचे पाय सारखे थरथरतात 
निसटून पडण्याच्या भीतीने 
छोट्या छोट्या वस्तूसुद्धा 
गच्च पकडतात तिचे हात...

रात्री झोपताही ती
पडते तशीच जमिनीवर 
अर्धवट झोपते, जागते, बडबडते- 
"नको नको वारंवार"

-वर्षापूर्वी टपोऱ्या फुलासारखी 
सुगंधात न्हाऊन गेलेली पोरगी 
एका वर्षात कृश होते म्हातारीसारखी 
तेव्हा आईच्या काळजात धस्स होतं 
आणि पाणावल्या डोळ्यांनी ती 
दिवा लावण्यासाठी देवघरात जाते!
-अंजूम मोमीन
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके