डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

खरे-खोटे आकळेना 
भल्याबुऱ्यांची गल्लत 
पडे मनाला भुरळ 
आणि फसगत होत!

गौरीहार

- अशावेळी एक करावे
मनोमनीच्या आठवणींच्या बहराखालून 
अलगद पावले टाकीत फिरावे... 
फुले कशी काढावी... डहाळीवरून ओढावी की 
चिमटीने खुडावी...
जमिनीवरची हवीहवीशी वेचून घ्यावी 
फुले कशात ठेवावी... कुठे ठेवावी. कुणाला द्यावी... 

- हसऱ्या दुखऱ्या आठवणीच्या गौरीहारावर वहावी 
एक एक करीत पाची कळसात भरावी. शेवटी... 
त्यातील एक फूल हळूच उचलून घ्यावे... 
थोडेसे हसरे... थोडेसे दुखरे... परमळणारे...

- एक मागची सोबत म्हणून...
इंदिरा संत

प्रवास
आपली बोटे माझ्या बोटांत गुंतवून 
शब्दांनी मला घराबाहेर काढले, 
गोड गोड बोलून गप्पांत गुंतवीत 
स्वप्नधूसर ऐंद्रजालिक आमिषे दाखवीत 
कुठल्या कुठल्या वाटांनी दूर दूर ओढले.

भोवतालची उंच झाडे, माणसांचा गजबजाट, 
राजरस्त्यांची जिवंत चाहूल, वीजदिव्यांचा लखलखाट, 
सारे बघता बघता मागे पडले
आभाळात काळे कहर ढग चढले...

मग घनघोर अंधार, विजांचे क्रूर चमकारे, 
गच्च दाटत आलेले रान, घोंघावणारे उग्र वारे, 
आणि अचानक सुरू झालेला 
बोरांसारखा टपोर थेंबांचा निर्दय सडसडता पाऊस

घेरीत आला अंतहीन पूर. 
शब्द कधीच गेले होते दूर.

आता अवघेच भोवताल एकान्त काळा कपटी 
आणि मी आडरानात एकटी, एकटी, एकटी.

शान्ता शेळके
 

आहे अभ्र मनी
आहे अभ्र मनी तुझ्या तरि अहा ! हे ऊन सांडे मऊ 
घेई झेप तळी, जरा ढग कुठे येथे-तिथे पांगता, 
जाते आतच बेट-थेट, अवघ्या ठाऊक वाटा तया 
दारे बंद करून ठेविलि, खुली होती स्वये स्वागता!

सारे नंतर ते ऋतूच जणु की, होतात उच्छृंखल! 
केव्हा तो मधुमास गंध उधळी, केव्हा शरद् चंद्रिका, 
होई सर्व निरभ्र नील शिशिरी उत्फुल्ल हो अंतर 
व्यापाया नभ तोच येशि कशि तू घेऊन अभ्रे नवी?

मेघाक्रांत पुन्हा? भितो न मुळि मी, निःशंक आहे मनी 
झाकी संतत सूर्य, ते बल नसे हाती ढगांच्या तुझ्या!

कृ. ब. निकुम्ब
 

गगनगाज
तू भरून ऊर असा 
हुंकारत
गगनगाज ऐकत मी
मी खिळून...
चमचमशी, चुळबुळशी
भर दुपार पुळणीवर
लवलवते चैतन्यच...
सरकत ये अवनीतल
पायांना पाय नवे
मन मन घन ओथंबुन 
गर्जे जळ, वारा अन् 
कान कान नादावुन
माडांच्या झावळांत
झिळमिळते रूप तुझे... 
रंग निळा, रंग हरा 
भरभर मी, मी निरभ्र
पुळणीवर ओळंगुन
साकारुन ॐ कारच
मातीवर तू अमेय 
या भिडस्त सर्व दिशा
डोंगर हे धूसरसे
जळ चमके पाऱ्यासम 
खोल उरी जडुन पिसे 
रंध्र, रंध्र भिजलेले
भरुन ऊर गदगदतो
मी यात्री -
तू समोर
तू तसाच
घनगंभीर
चुळबुळशी -
भरुन ऊर हुंकारत
गगनगाज
ऐकत मी
मी खिळून...

वसंत सावंत
 

तो
त्याचा मुक्काम नव्हता खरं तर डाकबंगल्यावर, नव्हता देवळात 
त्याच्या सत्काराचे समारंभ नव्हते, की नव्हते गौरवलेख वृत्तपत्रांत
तो नव्हता कुणी नेता, मठाधीशही नव्हता.
तो साधासुधा, आपल्याच नादात फिरता फिरता 
त्या श्रीमंत सांस्कृतिक शहरात नुकताच आला होता.

पण असह्य झाले नामवंतांना त्याचे गावात वावरणे 
सुखदुःखाच्या गोष्टी करत त्याचे सर्वांमधे असणे,
त्याची भणंग मस्ती, आणि जखमेवर फुंकर घातल्यासारखे बोलणे.

त्यांच्या सुदर्शन मंदिरांकडे फिरकलाही नव्हता तो 
की दिली नव्हती भाषणे सभांमधून
मात्र वागणे असे की देव जणू उठला आहे निजून
आत्ता, इथे, याच्याच तर हृदयातून.

तो येऊ लागला कित्येक प्रतिष्ठितांच्या स्वप्नात, हसू लागला. 
आवरणाशिवायच्या त्याच्या उघड्या मनाचा वास त्यांना असह्य होऊ 
लागला.

खटले भरले गेलेच त्याच्यावर, प्रतिष्ठितांनी निश्वास सोडले. 
संस्कृतीला योगदान देण्यात मग पुन्हा शहर गढून गेले.

तो आहे म्हणून आहोत आम्ही सुखरूप
असे मानणारे चारदोन वेडे मात्र अजूनही बसतात त्याच्या पुढ्यात 
आणि तोही नग्न त्यांच्यासमोर, पाझरणारा आणि शांत

तो खुलं करतो वेड्यांचं हृदय अंधारासाठी,
त्यांच्या स्वप्नांवर कठोरपणे वार करतो, 
त्यांना लावतो वेदनेचा घवघवीत टिळा आणि उदास हसतो.

वेड्यांना असते माहीत की तो त्यांच्या जीवांना श्वासांची ऊब देतो 
आणि अकस्मात झळकतो जेव्हा कोवळ्या दुःखाने 
तेव्हा संस्कृतीच्या एकांतात करुणेचा चंद्र उगवतो.

अरुणा ढेरे
 

निर्माण : तीन

(1)
शब्दामागून शब्द ठिपकतात 
आणि सारी रचना होते 
जगण्याचे ओले प्रतिबिंब

जसा,
पानावरून पानावर
दव ओघळल्याचा टप् टप्
आवाज
आणि सारा साग
ओलाचिंब.

(2)
सप्तमीच्या चंद्रप्रकाशात
जंगलातले हे वृक्ष, 
हे समोरचे तळे, 
त्यापलीकडची ती पहाडी 
कशी अस्पष्ट, अरूप
पण देखणी दिसते...

तू कागदावर मला भेटण्याआधी 
माझ्या मनातही अशीच असते.

(3)
आभाळातून छातीवर पडलेला
किरण
झिरपत आत शिरतो
रुजायला बघतो.
रुजलेला किरण कोंभ 
फुटुन हातावर येतो
वाढत चढत
आभाळभर होतो.

श्रीधर शनवारे

कळेना काहीही

वाटेत काट्यांचे पडले सडे
एकेक सल...
कुणाचे कुणाला कधी का असे
पुरते बळ?
वाटच नुसती हलली असे
वाटत राही
हरेक मनात असेच सदा
येते का काही?
असते तरी का आपले मन 
आपले खरे? 
काहीही, कुठेही खुपले जरा, 
जातात चिरे 
ऋतूंचे मातीशी असते नाते 
तसेच हे का? 
कळेना काहीही असतो जसा 
प्राक्तन झोका...

वासंती मुझुमदार

 

तो हात कुठे गेला ?

पृथ्वीचे तुकडे करून 
ज्याने त्याने घेऊन टाकले 
पाण्याचेही तुकडे करून 
ज्याने त्याने वाटून घेतले. 
प्रकाश तर आधीच त्यांनी 
तारांमधून खेळवत ठेवला 
इवल्याशा बटनामध्ये
कायम डांबून ठेवला! 
वाऱ्यालाही तसे त्यांनी 
असे काही झुलवत ठेवले, 
हवे तेव्हा, हवे तसे 
इकडे तिकडे फिरवत नेले. 
आकाशही त्यांनी तसे
आधीच आपल्या मुठीत आणले 
अवकाशात उड्डाण करून
ग्रहगोल जिंकून घेतले!
तुकडे करायला काहीच नाही
म्हणून स्वतःवर घाव केला,
आणि आता शोधू लागलेत 
तो हात कुठे गेला?

लक्ष्मीकांत तांबोळी
 

छंद
मजसि जडे एक छंद 
उंच उंच जायचे!

मातीचा मजसि संग 
मातीचे मलिन अंग 
मातीची घेउनि रग
चैतन्यी न्हायचे

मी गृहस्थ सांसारिक 
याचेही मज कौतुक
वेडपरी गगनाचे
अंतरी जपायचे

न रुचे मज काहि खुजे
नित वादळ उरि गर्जे 
जे उदात्त, उन्नत ते
भक्तिने भजायचे

ते पर्वत, ते वारे 
ते रवि, शशि ते तारे 
उंच उंच जे असेल
त्यासवे रमायचे

पाय जरी पाताळी 
झेप परी आभाळी 
भूमीवर चालताहि
गगनगीत गायचे

सुधांशु
 

कालस्वर

नेहमीचे संथ तळे 
पाण्याचे अंग गार... 
उंच निळ्या आभाळी 
घिरट्या घे एक घार...

गच्च उभ्या झाडातुन
वाऱ्याचा मृदु पावा... 
अधून मधून माथ्यावर
मेघांचा शिडकावा...

क्षणिक मुक्या लाटेवर 
श्वासांची नाव डुले 
उमलून होताच कुठे 
जास्वंदीफूल गळे...

दिवसाचे मिटुन पंख 
विझू येते ही दुपार
आणि इथे अंतरात 
कवितेचा कालस्वर....!

शंतनु वसंत चिंधडे
 

कविता
गच्च हिरवट घाट 
धुंद हळदिवे ऊन्ह 
पीक भरात आलेले 
झुले अंगाग मोडून...
थोडे आभाळ वाकले
अवघडला कातळ
पाणवठ्याची उभारी
विसरली काळवेळ...
नजरेला हुकवीत
लाट काठाशी भिडली 
गर्दीतली पायवाट 
गुलमोहराला हसली...!

राजा मुकुंद
 

कबुतरं
त्यांनी खांद्यावरून शांततेची कबुतरं आभाळात सोडली 
आणि इकडे घरट्यात जातीय दंगली उसळल्या

ठराविक जातीच्याच कबुतरांना प्राधान्य दिल्याबद्दल 
इतर कबुतरांनी निषेध नोंदविला, आणि 
गिधाडांकडून प्रेते फाडण्याचे विशेष प्रशिक्षण घेऊन 
ते खांद्याच्या शोधमोहिमेवर बाहेर पडले.

शांततेच्या कबुतरांनी मोकळ्या आभाळाचं अप्रूप पिऊन घेतलं 
चंद्राच्या शीतल चांदण्यात पंख भिजवून घेतले
चोचीतले चार सलोख्याचे दाणे वाऱ्यावर भिरकावले
वैश्विक आनंदाचे नाते भूमीत रुजविले.

जडावल्या पंखांनी कृतार्थतेने कबुतरांनी परतीचा प्रवास सुरू केला 
सारा आसमंत करुणेने ओथंबून आलाय असं वाटतानाच 
अचानक
विस्फोटाच्या गुदमरत्या धुराने कबुतरं झेलपांडली 
सर्वत्र घनभेदी करुण किंकाळ्या आणि प्राणान्त आरोळ्या... 
कबुतरं भेदरली... घरट्याकडे झेपावली... तसे त्यांच्या जातीच्याच
कबुतरांनी त्यांच्यावर चोचीने प्रहार केले
रक्तबंबाळ आश्चर्याने तुटून पडलेल्या पंखांनी 
कबुतरांनी शांतीचा जयजयकार केला 
आणि त्यांच्या खांद्यावरून त्यांनी उड्डाण केले
त्यांच्याच छातीवर फुललेल्या गुलाबावर अखेरची मान टाकली.

तेव्हापासून कबुतरांनी गटागटाने खुराड्यात रहाणे पसंत केले 
त्यामुळे टोळीयुद्ध करणे सोपे झाले
मृतांचे जातीवार आकडेही देता येऊ लागले 
आणि गिधाडांचे पोट वरच्यावर भागले.

आता खांद्यावरून सोडलेली शांततेची खरी कबुतरं आम्हीच 
ह्यासाठी कबुतरं आपापसात युद्ध करतात
हौतात्म्य पत्करतात...
स्वातंत्र्यसैनिक म्हणून मानधन घेतात
आणि गुलाबाच्या कुस्करलेल्या पाकळ्यांवर खुराडे बांधून 
युद्धाचा रवंथ करीत जगाला शांतीचा संदेश देतात.
किशोर पाठक
 

माझ्यासाठी...
माझ्यासाठी लिहिते मी कविता
कुणासाठी नाही
आवडते कुणा कुणाला
हीच अपूर्वाई

कधी सुरुवात केली? कशी लिहीत गेले?
आठवत नाही
लिहू लागले तेव्हापासून
अद्याप थांबले नाही

कुणाशी बोलले कवितेतून 
काळीज खुले करून?
कुणाच्या हाती दिले
शब्द भरून भरून?

काय म्हणाले... वाचून कविता?
नाही का काही कळले? 
जाऊ दे ! भेटले कुणी तरी असेही 
ज्याच्या प्राणातून थरथरले....
शिरीष पै
 

आयुष्य
जो किनारी लागला तो उडत गेला 
मोडक्या नौकेस माझ्या हसत गेला

तो फुलांचा काळ गेला वाहुनी अन् 
सोयरा एकेक मागे गळत गेला
गाव हे परके... कुणाला दीप मागू ? 
ओळखीचा चंद्र जेव्हा कण्हत गेला

मी कुठे तक्रार मांडू काळजाची ? 
भेटला तो घाव थोडे खणत गेला
मावळाया लागले आयुष्य आता 
लाख स्वप्नांचा थवा फडफडत गेला
बबन सराडकर
 

किती दाटले... साठले
किती दाटले, साठले सखी उरात.. ओठात 
भाव व्याकूळ उदास, ओल्या करुण डोळ्यात

डोळे टिपून एकांती, खोल हुंदका सांडून 
येशी स्वागतास अशी, हसू ओठात घेऊन

आणि करशी संवाद सांगायचे ते टाळून 
देसी साखरेचे पाणी तेही गाळून गाळून

लपविशी लाख जरी, ते न लपून लपते 
माझ्या डोळ्यास... कानास सारे भावते... काचते

सखी, कळते मलाही, काय दुखते, सलते 
संस्काराच्या उंबऱ्याशी कसे पाऊल अडते

पण, बोल तू काहीसे, कढ बाहेर येऊ दे 
तुझ्या रूपाने मलाही, थोडे मोकळे होऊ दे

राजकुमार कवठेकर

सूचिपर्णी

मनात खोलवर झालेल्या जखमेमध्ये 
खस्सकन् सुई खुपसल्यासारखे 
हे बर्फगार वाऱ्याचे झोत 
घुसतायत माझ्या उबदार खोलीमध्ये.

खिडक्या-दारं बंद करून
अगदी कडेकोट बंदोबस्त केला तरी 
एखादी लहानशी फटही पुरेशी असते
वाऱ्यांच्या पात्यांना खोलीत घुसण्यासाठी

हळूहळू माझी खोली होईल
बर्फाच्छादित सूचिपर्णीचं झाड. 
पायथ्याशी गारठून पडलेल्या पक्ष्यासकट...

निरंजन उजगरे
 

तटबंदी

तुझ्याखातर म्हणून
काही काहीच आठवणार नाही आता 
शक्य तोवर निघून जाईन दूर नजरेपार.

सांजवेळच्या सप्तरंगी क्षितिजाला समजेन 
आभाळाचे ठणकते भाळ,
नि हिंदकळत्या अथांग सागराला
सुस्त पसरलेला बरड माळ,

झुळझुळत्या शीतल वाऱ्याला म्हणेन 
लपेटणारा वणवा, 
आणि थेट वनराईत शिरलेल्या
रस्त्याला भूल-चकवा;

प्रिय,
माझ्यापरीने समजावेन मनाला
पण
दाटून आलेले हे दोन थेंब 
अडवून धरणारी तटबंदी 
कुठाय ते आधी सांग...

मोहन शिंदे

उजाडण्यापूर्वी...

उजाडण्यापूर्वी निघून जातो सूर्य शहरापासून दूर 
त्याला अॅलर्जी आहे वाहनांच्या केकाटण्याची 
ध्वनीचित्र प्रक्षेपणाची, टेलिफोन, वृत्तपत्रांची.

याआधी कित्येकांनी ढकललेय त्याला नको असलेल्या 
पदव्यांसाठी शिक्षणसंस्थांमध्ये
हरवून बसलाय तो अज्ञानातलं अमूल्य सुख
मी घरी सुखरूप पोहोचल्याचे कळल्यावर निघतो तो 
पूर्वेकडून नखाशिखांत चिलखत घालून
नेमलेल्या मार्गाने

मी ऑफिसच्या खिडकीमधून दाखवत असतो त्याला 
चुकवायला हवी ती ती धोक्याची ठिकाणे.

नीळकंठ महाजन

घटना

शहराच्या हमरस्त्यावरून घरी परतताना 
ऑफिसातील कागदपत्रांचे ढीगच्या ढीग 
विरघळत जातात माझ्या शरीरातील रक्तरसात.

रस्त्यांवर आढळतात मूल्ये
कुणाच्या थुंकीतून सांडत गेलेली, तर 
कुठे कुणाची गळून पडलेली अब्रू.

जाहिरातींच्या पोस्टर्समधून सुटी झालेली अक्षरं 
पायांना बेड्या होऊन वेढली जातात तेव्हा 
मी निसटू पहातो माझ्यातून तसाच
शहरातून सुद्धा...

चौकाचौकातील ट्रॅफिक सिग्नल्स 
माझ्या मृत्यूला कैद करतात आणि 
रहदारीच्या डोळ्यातील गहिरे भाव 
माझ्या जगण्याचे श्वास होऊन जातात.

मी येतो माझ्या घराजवळ 
बुडणाऱ्या दिवसाची एक घटना बनून 
तेव्हा माझी हाक ठोकत असते दार 
माझ्या बंद मनाचे...

अशोक कोतवाल

दुःख

बागेत गेल्यावर गुलाबाच्या लाल फुलांत 
मला दिसले बापाचे झिंगलेले डोळे, 
दारू पिऊन उशीरा परतणाऱ्या बापाला 
आग्रहाने जेवू घालणाऱ्या
मायाळू हातांची हिरवळ पानांत
अन आयुष्यभर असह्य करणारी 
अडाणीपणाची ठणक फांदीवरच्या काट्यांवर.

शेतात आईबरोबर सर्वा करणाऱ्या भावंडांसारखी 
वाटलीत मला बागेतली फुलपाखरं 
अन् झाडांवरचा चिवचिवाट 
शेतातून संध्याकाळी परतणाऱ्या बायांच्या
कलकलाटासारखा

कारंज्यांच्या झाडाजवळून जाताना मला ऐकू आले 
अतिवर्षावाने गुदमरणाऱ्या शेतातील
केविलवाण्या पिकांचे श्वास
अन् दिसला सासरच्या पोरीच्या जाचाचा निरोप 
ऐकून डबडबलेला पापण्यांच्या किनाऱ्यात डोळा.

माकडांच्या पिंजऱ्याजवळ उभे राहताच
त्यांनीच मला वाकुल्या दाखविल्या 
तेव्हा मी पाहून घेतला माझ्याभोवती पिंजरा तर नाही ना ?

आता बागेतल्या मध्यवर्ती ठिकाणी कुंपणात 
अडकलेला दिसतोय आदरणीय पुरुषाचा पुतळा 
जसा चक्रवाढव्याजात बाप गुरफटलेला.

माझं दुःख
उत्साहाने पुस्तकातील मोरपीस शोधणाऱ्या 
पोराला पानं उलटविताच
चेंदामेंदा झालेलं फुलपाखरू सापडावं तसं.

प्रकाश किनगांवकर
 

ख्रिस्त
तसं पाहिलं तर
प्रत्येक जण वाहून नेत असतो
आपल्या खांद्यावरून आपलाच क्रूस अदृश्यपणे 
तेव्हा जाणवत नाही त्याचं अवजड ओझं
पण एखाद्या अटळ क्षणी
ठोकले जातात अंगभर अवजड खिळे 
तेव्हा अशक्य होतं, एक पाऊलही पुढे टाकणं 
मग क्रूसच वाहून नेतो आपलं ओझं... अटळपणे
थडग्यापर्यंत.

शरीरात खोलवर शिरलेल्या खिळ्यांचं बळ घेऊन 
वडग्यातून पुनरुत्थापित होणारा 
मात्र एखादाच ख्रिस्त असतो

अभय दमणकर
 

प्रश्न
स्वर्गीय चांदण्याला उधळीत रात्र आली 
लपसी गुहेत का तू लावूनिया मशाली

गंधावल्या फुलांनी बहरून बाग गेली 
फुलपाखरे रसीली अजुनी कशी न आली

किति अंगणात पडले कण सान तांदळाचे 
किलबील पाखरांची कानी कशी न आली 

नव मेघ जांभळे हे जमले नभी सुरम्य 
का स्तब्ध मोर ऐसे झुकवून मान खाली

आल्या वळीवधारा भिजवावया धरित्री 
का सोडिते उसासे संतप्त माति खाली 

किति वैभवात लोळे हा देव मंदिरात 
एकांति का तयाच्या येतात अश्रु गालि 

क्षितिजावरी तुझ्या रे उजळे सुवर्णरेखा 
ओठी अता कशाला गाणी उदास काळी

राम गोसावी
 

रात्र आणि इव्हाच्या दोन वंशज
मालाच्या पाट्या
डोस्क्यावरून व्हाऊन नेन्यात
हुबं ऊन उतरलं
आंगावरून.
घामिजल्या आंगानं
बेशरमीच्या धुवात
कवूळ व्हऊन केंगाटत पडलेल्या पोटच्याकडं 
जाळ उटलेल्या डोळ्यानं बगत 
हातानं भाकऱ्या थापल्या 
हाब्रीटाच्या.
पोटाची आगीन थंड करून
शिणारल्याली पाठ जिमिनीला टेकविली 
आन् त्यानं हानलेल्या लाथंनं 
कळ उलटी कंबरंत -
“कामाला जातीस का नखरं कराया मिस्त्रीसंगं?” 
सब्दानं वळं उठली हुर्द्यावर.
वाटलं खोपाट तोडून मोडून पळत जावं
झनान कुटं बी.
पर म्हंत्यात न्हवं
‘बाई म्हंजी कनकीचा गोळा 
मदी ठिवावा उंदरं टोकनत्यात
भाईर ठिवावा तर ‘कावळं'
म्हनून 'रोजचंच हाय' म्हनले न गपगार निजले 
पर डोळ्याच्या पान्यात रातर भिजायची ती भिजलीच.

ललिता गादगे

अनुभूती

ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे 
गाण्यामुळेच मीही अजुनी जिवंत आहे

नाही मुळीच खोटे रसिका विधान माझे 
गाण्यात ठेवले मी जागे इमान माझे 
कोणी म्हणोत काही, कोणास खंत आहे? 
गाण्यामुळेच मीही अजुनी जिवंत आहे

धुंदीत अक्षरांच्या गाणे कवेत आले 
वेलीस फूल तेव्हा माझ्या समेत आले 
गाण्यातुनी असा हा फुलतो वसंत आहे 
गाण्यामुळेच मीही अजुनी जिवंत आहे

नाही प्रचार केला मी दाद, वाहवांचा 
नाही विचार केला बदनाम बोलवांचा
केला फुलापरी मी काटा पसंत आहे 
गाण्यामुळेच मीही अजुनी जिवंत आहे

गाईन रोज गाणे, गेलो थकून तरिही 
दारात थांबलेल्या सांगेन मृत्यूलाही 
आता मरावयाला कोणा उसंत आहे? 
गाण्यामुळेच मीही अजुनी जिवंत आहे.

रमण रणदिवे
 

पेटते पलिते

परिवर्तनाच्या परिक्रमेतले पेटते पलिते 
बेचिराख करीत होते जातीयतेचे जंगल 
जाळून टाकीत होते पडीक जमिनीतील तृण 
मानवतेच्या शेतात सुपीक धान्य निपजावे म्हणून

तसे ते वैचारिक गुरुशिष्य
एकमेकाला न भेटताच गंडा बांधणारे 
रूढीने गंडविलेल्याना मुक्त करणारे

खरे तर सूर्याच्या मावळण्याबरोबर चंद्राने उगवावे 
येथे मात्र सारेच अघटित घडले 
क्रांतिसूर्याच्या अस्तापाठोपाठ ज्ञानसूर्य उदयास आले.

एकाच्या मृत्यूची चाहूल लागताच
दुसऱ्याने जन्म घेतला
गुरुचे अंगीकृत कार्य करण्यास देह झिजविला.

दास्यत्वाच्या शृंखला त्यांनीच तोडल्या 
पंखविहीनांना पंख त्यांनीच दिले
अबलेला सबला अन् अज्ञानाला सज्ञान त्यांनीच केले.

ते नसतेच तर मांसांच्या गोळ्यांना कणा मिळाला नसता 
अंधारयुगाला छेदणारा नवा डोळा मिळाला नसता 
त्यांच्यामुळेच ग्रंथाबाहेरच्यांच्या हाती ग्रंथ आला 
कंठ फुटल्याने देवळातला देव नाकारला गेला.

गुरू असा की त्याने हौदाच्या पाण्याला खळाळण्याचे स्वातंत्र्य दिले 
शिष्याने तर तलावात वडवानळ निर्माण केले
जन्ममृत्यूच्या शंभराव्या वर्षी पलित्यांनी पुन्हा पेट घेतलाय
जातिप्रवेची शंभरी भरल्याशिवाय ते कसे थंड होणार ?

ज. वि. पवार

असे दिलेस कशाला

असे दिलेस कशाला 
देवा, नानाविध रंग 
रंग बदलणे झाले 
त्याचमुळे रे, सवंग!

किती रंग किती छटा 
उपछटा या अनेक 
जो तो रंगवी सजवी 
बाजू आपुली सुरेख!

खरे-खोटे आकळेना 
भल्याबुऱ्यांची गल्लत 
पडे मनाला भुरळ 
आणि फसगत होत!

इथे काट्यांतून फुले 
कुठे फुलांतून काटे 
हात लावीता सहज 
जाती रक्ताळून बोटे!

दिशा कोणती धरावी 
पूर्व पश्चिम कळेना 
मति दिङ्गमूढ झाली रे, 
कुठे उत्तर मिळेना!

कृष्ण-धवल केवळ 
सारे जगत असते 
सत्य हरवून देवा, 
गेले नसते नसते!

गंगाधर हाडगे

अभिनंदन केलेच नाही

तुझ्या अभिनंदनासाठी बाहेर पडलो 
तेव्हा मनात भरून राहिली होती कोजागिरी. 
तुझ्या नक्षीच्या दारातले 
चपलांचे थारोळे बघून थबकलो. 
काय डिझाइन पण! काही चमकदार, 
उंच टाचांचे, राजस्थानी, पंपशू, कैक...

वरच्या उजेडाने न्हालेल्या
(होय, वरच्या उजेडानेच न्हालेल्या) 
तुझ्या खिडकीतून छाया सरकत होत्या 
शिरोभूषणांच्या; हेअरस्टाइलच्या; 
- अरे बापरे, एखाद-दोन पगड्यासुद्धा. 
बाहेरच्या बाहेर पळालो, तेव्हा 
कानी आले घनगंभीर रागाचे सूर, 
रुद्रध्वनी आणि लगेच एका कडक 
पोवाड्याची सादही! तुझ्या घरातून.

- अगदी पळालो. लांब
कोपऱ्यावर जरा थांबलो : वळून 
मनातल्या कोजागिरीशी बोललो : 
बापा! ह्याची आई असती, तर 
म्हटले असते बयो! या बाबावरनं 
चार मीठमोहऱ्या ओवाळून टाक!
अरुण इनामदार

आज

तू गेलीस दिवे विझले, सुने सुने झाले 
नक्षत्र विझवून, दारावर, मुके आकाश आले 
दार उघडेच...
अंधार सगळा
काय घडले?
भिंतीवर लावलेले चंद्रसूर्य 
अंधाराने पोटात घेतले. 
तू रेखीत होतीस चंद्रसूर्य
घर प्रकाशत होते 
फुले फुलत होती 
अंगणात हिरवळ होती
मन ओढ घेत होते
फुले वेचित वेचित गुणगुणलेले 
आज गाणे मुके झाले 
तू गेलीस दिवे विझले 
घर सुने सुने झाले


विनय अपसिंगकर

मेळ

ओठांवरती तिच्या अडखळतात शब्द
थरथरतात पापण्या स्थिरावतात जरा
भिरभिरत्या केसांच्या विस्कटून रांगा
अचानक थबकतो धावताना वारा
धपापतो ऊर
गालांवर पूर 
ती अशी दूर
उमाळून येते मला दुखू लागतो गळा 
दुराव्याचा दुष्ट हेका होत जातो शिळा 
कातळांच्या खोऱ्यात उफाळतो पळस
अन वृंदेच्या ज्वलनातून तरारते तुळस
खोटा झाला खेळ
मंद होतो वेळ
बसत नाही मेळ 
दारावरून वाजत जाते एक वरात
ती तिच्या घरात, मी माझ्या घरात!!


शिरीष गोपाळ देशपांडे

सर

सर,
जगणं म्हणजे काय विचारताच 
तुमचा चेहरा पांढरा पडला 
अगदी न जगल्यासारखा.

बीजगणिताच्या कुठल्याही पाठाच्या
स्वाध्यायात नव्हती म्हणून 
तुम्हीही शिकवली नाही 
सुख-दुःखाची बेरीज-वजाबाकी
कृती व भावना ह्यांचा गुणाकार भागाकार

पाठ करून घेतलात तुम्ही 
सामान्यांकडून असामान्यांचा इतिहास.

सर,
तुम्हीच सांगा,
किती शिवाजी तुम्ही छत्रपती केले?
किती टिळक जन्मसिद्ध झाले? 
‘शिका आणि मोठे व्हा’
हे वर्गातल्या पहिल्या दिवसाचे बोल 
शाळेचा निरोप घेतला त्या दिवशीही 
नवे करून घेतलेत तुम्ही.

खरंच सर,
तुम्ही धन्य आहात
स्वातंत्र्याची व्याख्या शिकवताना 
तुमची साधी बोबडीही वळू नये!


कमलाकर पाटील

डोहाळे

रंगबावऱ्या लाजऱ्या श्रावण उन्हात 
एक लडिवाळ शिरवे सरसरून गेले
त्या भिजलेल्या उन्हाचे दूध
वसुधेच्या स्तनांमध्ये थेंब थेंब जमले
लपक झपक करीत
झाडं कानातल्या कानात काहीबाही बोलली
डहाळी डहाळीने
आपल्या हातातले हिरवे रुमाल अलगद हलवले...

शीळ घालत
रानावनातून झुळझुळणाऱ्या वायुलहरी
श्रावणाच्या कानात लाडिकपणे कुजबुजल्या
तेव्हा कुठे त्या खुळ्याला कळले
वसुधेला लागलेत इंद्रधनुष्याचे डोहाळे...
डोहाळलेल्या वसुधेने

इंद्रधनुष्याचा शेला आपल्या अंगाभोवती लपेटला 
मग तर ती अधिकच डोहाळली
तिच्या मनाच्या आम्रवनात
थुई थुई नाचणारे मयूर
आपल्या प्रफुल्ल पिसाऱ्यातले
असंख्य डोळे उघडून 
पापण्यांची उघडझाप करू लागले
तेव्हा शब्दांशिवाय ती काहीबाही बोलली... 
इंद्रधनुष्याचे सप्तरंग एकमेकांत मिसळून 
लाजऱ्या श्रावण उन्हासकट
तिच्या गात्रागात्रांमध्ये पसरत गेले 
भरतीच्या मंद लाटांसारखे...

अजूनही तिच्या डोळ्यात 
गर्भवतीच्या पावलांसारखे 
जडशीळ ऊन्ह रेंगाळतेच आहे 
सुरेल, सुस्वर वारा गुणगुणतो आहे...


बाळ राणे

गीत

मोगऱ्याचा जीव माझा विठ्ठलाचा सूर व्हावा 
पंढरीचे झाड खाली चंद्रभागा पूर यावा

चांदण्याचा भाव माझा पांडुरंगी रंगलेला 
नामयाच्या पायरीला मोक्ष माझा सांडलेला

बाग माझ्या अंगणीची कीर्तनाचा नाद घेते 
गंधवेडा पवन भजनी बासरीची साद येते

नर्तनाची वेल दारी देउळाचा कळस पाही 
कार्तिकी वारीस माझ्या संतवाणी तुळस होई

मंजिरीची रागदारी मैफलीला फूल आले 
भैरवीची सांगता या विठ्ठलाचे गीत झाले.


मधु जामकर

निर्जीव बेट

तू सोबत यायचं कबूल केलंस
तेव्हा वाटलं होतं 
सापडेल मलाही एखादी वाट
माझ्याप्रत नेणारी,
पण हरवून गेलास एकाएकी
धुक्याच्या प्रदेशात,
तेव्हा पुसून टाकले 
सारे रस्ते मी
माझ्याच हातांनी,
करायचंय तरी काय आता चालून?
प्रवास सारा
निर्जीव बेटाचा
करून न करून सारखाच!


जोगिंदरकौर महाजन

बाबासाहेब आंबेडकर

पाण्याला स्पर्श केलास करारी हातांनी, 
नि गुलामगिरीचा पुरातन काळोख थरथरला.
त्याचा मागोवा घेतलास गुहांगुहांतून. 
तेव्हा रात्र अवघडलेली संवेदनविजांच्या 
प्रसवकळांनी...

पहाटेचं शिल्प घडवून
फडकविलास प्रज्ञेचा प्रखर शीतल ध्वज 
नि समुद्र बहाल केलास ओहोटीशिवायचा. 
प्रतिभेच्या डेरेदार वृक्षाखाली तुझ्या 
विसावले मानवतेचे थकिस्त पुत्र.

अस्तित्वाचं उत्खनन करतोय्
नि उचंबळत नाहीय् जिवंत झरा
हे लढाऊ रक्त
निवत तर नाहीय्?

सरोवरातील निरागस कमळांच्या
झाल्यायत रक्तलांछित जिव्हा. 
ऐकतोय स्खलन-एके-स्खलनचा गजर.
सृजनाला घडतोय् मृत्युप्रवास 
प्रकाशरथाला तुझ्या,
नाकर्तेपणाची खीळ बसलीय. 
महाकाव्याचा उजेड दुर्लक्षिला गेलाय
अथवा वर्तमानाचा काळोख दाटलाय्..

हे नवागत बीजांनो
त्याच्या श्रद्धाशील भूमीतून 

अंकुरत या!


प्रकाश खरात

असंख्य टवटवीत प्रतिबिंबे
सुरेल गीताची तान मारणारा
सुरेख पक्षी
ऐन वसंतात मातीत मिसळावा, 
तसं तिचं अनाहूत निघून जाणं.
पोखरत गेली वेदना खोलवर
डुचमळले डोळ्यात पाणी 
म्हटलं, अखेर अशाश्वताचा सघन काळोख 
अटळ आहे.
हलकेच निपटले
डोळ्यांतील तरळते पाणी आणि 
वर्तमानाला सामोरा होत
साजरे केले जीवन-मरणाचे सोहळे
साचत गेले शेवाळ डोळ्यांत
अन् कधी तरी नकळत
तिची आठवण
प्रसन्न फुलासारखी फुलत राहिली
पुन्हा पुन्हा
काळाच्या नितळ जलाशयात, 
असंख्य टवटवीत प्रतिबिंबांसह.


शंकर न. खरात

उरात माझ्या

ही वादळे व्यथांची भरली उरात माझ्या 
अन् लेखणी विजेची धरली करात माझ्या

तुमच्या सुरात मीही मिसळून जात आहे 
उरलेत जे अशांनी गावे सुरात माझ्या

माझे जिणे उन्हाचे मग चांदणेच होते 
जेव्हा मिठीत येशी होऊन रात माझ्या

तू घाव घातल्याचा उपकार मानतो मी 
तो घाव मोहरावा या अंतरात माझ्या

गर्वात जात होते गुत्त्यात जे पिणारे 
झुकवून मान आले ते मंदिरात माझ्या


मुबारक शेख

हव्यास

स्वतः धुमसण्याचा आणि
आजूबाजूला पेटवण्याचा
असा कसा हा माझा प्राणांतिक हव्यास? 
याने का उजळणार आहे, 
डोळ्यांमागे साचलेला अथांग काळोख?
या आगीने का पडणार आहे प्रकाश? 
या धगीने बसतील का चटके मुर्दाड मनांना? 
या निखाऱ्यांवरून चालण्याची ताकद 
आहे कुणाच्या पायांना?

खूप पाहिले दूर पळणारे
आणि आग विझवणारेही खूप पाहिले 
पण या ज्वालांमधून मला पहाणारे
आहेत का कोणी
जळणाऱ्याची कदर असणारे 
काळोखाची नजर असणारे
छातीमध्ये कबर असणारे

या ज्वालांमधून 
मला पहाणारे 
आहे का कोणी?


प्रियदर्शन पोतदार

मंत्रक्षण

1
जो क्षण यावा म्हणून तळमळलो 
त्या क्षणानेच घायाळ केलंय मला
कोणता मंत्रक्षण होता तो? 
प्रेमाचा? की प्रकाशाचा?
आता या अग्निपरीक्षेत 
मी जळून जाणार आहे 
की उजळून निघणार आहे
कुणास ठाऊक!

2
एकेक दिवस असा येतोय की 
असं वाटतंय
आपण पाहतोय ते स्वप्न तर नाही?

हवेच्या लहरीवर
हळुवार तरंगताना
किती प्रसन्न
किती आनंदी आहे मी.

परंतु जमिनीवर 
जेव्हा पाय टेकतील -
तेव्हा?


कधी एकदा 
दुसरा दिवस उगवतो 
असं होतं

मोगऱ्याचं
फूल फुलून यावं तसं 
मन फुलून येतं!

4
येणाऱ्या दिवसांची इतक्या आतुरतेने 
या आधी मी कधीच वाट पाहिली नाही. 
डोळ्यांतून सारखं पाणी झिरपत राहतं 
आनंदाचं की दुःखाचं, काहीच कळत नाही!

5
सुखाचे जे मूळ आहे 
तेच दुःखाचेही 
दुःखांचे जे मूळ आहे 
तेच सुखाचेही

यातून सुटका नाही !


गोविंद कुलकर्णी

मोर्चा

बर्मिंगहॅममध्ये आज निघणार आहे मोर्चा! 
समानता, स्वायत्तत्ता, शांतता, बंधुत्व....
“माँ, मी जाऊ का त्या मोर्चात? 
सगळ्यात पुढे झेंडा घेऊन?” 
“नको ग राणी; असल्या मोर्चात काय सांगावं... 
बघता बघता बंड होतं.
संगिनी उठतात, गोळ्या झडतात 
मोर्चा किनई लहान मुलांसाठी नसतो.” 
“माँ, पण असतील ना तिथे बाकीची मुले
छोट्यांवर का कोणी झाडतं गोळ्या?” 
“नकोच पण. तू आपली चर्चमध्ये जा. 
नेहमीप्रमाणे सुंदर प्रार्थनागीत गा.” 
बर्मिंगहॅममध्ये आज निघाला आहे मोर्चा... 
त्याच वेळी मंदिरात चालली होती चर्चा 
‘अथेल’ बसली पुढच्या रांगेत 
गुलाबी झगा, गुलाबी रिबीन... 
इथे कसं शांत, सुरक्षित वाटतं 
देवाचं हे मंदिर... शांत... निरामय....
तिथे मोर्चा सुरू... आणि इथे 
कानाचे पडदे फोडून टाकणारा भयानक स्फोट 
बाँब... विध्वंसक... किंकाळ्या... कल्लोळ 
धूर... आणि उखडलेली तावदाने...
बर्मिंगहॅम गावात सुरू झाला होता मोर्चा 
शांततामय सहजीवन... समता... बंधुत्व... 
धुराच्या लाटेत, राखेच्या ढिगात... 
सापडला तिला एक छोटासा गुलाबी बूट...


संध्या कर्णिक

थांबवू कोणी शकेना

भाग्यरेषा कोरल्या भालावरी आम्ही स्वहस्ते 
चंदनाने काय केव्हा गंध मागावा कुणाला 
ओंजळी अमुच्या रित्या, सौगंध आम्ही वाटतो 
आमचे सारे ऋतू हंगाम अमुचा वेगळा

आमुच्या पेल्यामध्ये तर चांदणे चंद्रोदयी 
मांडल्या नरदा पटावर डाव आम्ही मांडला
जे स्वयम् सौंदर्यशाली साज ना शृंगार ना
दिल्वरांच्या मैफलीतच डाव अमुचा रंगला

दैवते सारीच येथे थांबती घ्याया विसावा 
रान हे गंधावले मधुकंस येथे सांडलेला 
तळपत्या तेज : शलाका घेउनी हातात आम्ही
क्रांतदर्शी सांगतो आम्ही कथा साऱ्या जगाला

वाकली ना ही धनुष्ये, आयुधे पाठीवरी 
सज्ज आम्ही झुंज द्याया साथ प्रज्ञेची अम्हांला 
बंध ना बेबंद आम्ही, मुक्तिमार्गाचे प्रवासी 
थांबवू कोणी शकेना, या भडकत्या वादळाला


श्रीपाद गंगाधर कावळे

पोरी!

पोरी गवंड्याचं काम जरा भारीच असते 
तरण्या पोरीची जवानी त्याले थापीत दिसते

जरा संबाळ संबाळ तुच्या आंगाचा पदर 
त्याची हिरवी नजर जथी तथी धाव घेते

देता टोपलं भरून शिमिटाचं त्याच्या हाती 
सख्या संबेर खेट्याची त्याले सरम नसते

करमा करमानं चालते त्याचा लायघोटेपणा 
योयंब्याच्या दोरीवानी निन्हा पाह्यत बसते
संगतीच्या बाईवर नोको इसवास ठेऊ 
एक ध्यानामंधी ठेव कोणी कोनाचं नसते 
तरण्या पोरीची जवानी त्याले थापीत दिसते.


गो. रा. तायडे

सहा हायकू

वडाच्या पारंब्यांवर
कावळ्यांची कावकाव
त्यांना विचारू का गाव?
**
चिंब पावसाच्या धारा 
हातात गवताचे पाते
रुजेल ना नाते?
**
तुडुंबलेल्या डोळ्यांमधून 
सुखाचे मोती झुरले 
हे राजहंसाने कळवले?
**
क्षितिजावर फुललेत
आठवणीचे रंग
डोळे झालेत दंग
**
हा श्रावण हिरवाकंच 
दगडालाही फुलं आली 
कुणाची पुण्याई फळली?
**
तिन्हीसांज उतरली
फुलल्या जुईकळ्या 
वाट पाहतात भोळ्या


वासंती इनामदार जोशी

गोंदण

श्रावणातलं
रिमझिम अवखळ ऊन
दुपारवाटांवर
उतरत असतानाच
तू भेटलास
डोळ्यांवर पाऊस घेऊन
आणि
जाता जाता
ओठांवर एक अस्फुट
चुकार चांदणी
मात्र रुजवून गेलास 
काळ्या पापणी घनावर
तेवढंच एक गोंदण.


माधुरी हुद्देदार

कविता

डोळ्यांच्या
झाडांची सळसळ
माझ्या आत
ठिबकणारा थेंब 
तुझ्या डोळ्यांत

झाडांचा रुसवा
पाखरांचे गाणे
तुझ्या डोळ्यांत
तरळणारे चांदणे

झाडाच्या बुंध्याशी
गोष्टीचा सूर
तुझ्या डोळ्यांत
भेटीचा पूर

झाडाचा मोहोर
मन बेभान
तुझ्या डोळ्यांत
जीव गहाण

कलती सांज 
लांब सावली
तुझ्या डोळ्यांत
फुलपाखरं इवली

सभोवार घेरणारा 
काळोखाचा जोर
तुझ्या डोळ्यांत 
निजलेला मोर


प्रभाकर महाजन

गझल...

हे तुझे फूल हा सुवास तुझा 
लागला रंग या जिवास तुझा

ते तसे दुःख निर्विकार तुझे 
पण किती चेहरा उदास तुझा

मी तुझा शब्द शब्द झालो अन् 
ओठ विझवायचा प्रयास तुझा

ऐकला मी तुझा अबोलाही 
बोलला एक एक श्वास तुझा

हे नवे दुःख, या नव्या जखमा 
ही नव्हे हार हा विकास तुझा

आज देशील तू मला फाशी 
पण उद्या ओरडेल फास तुझा

मी जरी शोधली तुझी खात्री 
भेटला शेवटी कयास तुझा

मी न तो... शोधतेस ज्याला तू 
मी न केला कधी तपास तुझा

भेटणे टाळतेस जेव्हा तू 
लावतो भास मी पणास तुझा

आटते रक्त भाकरीसाठी अन् 
बुडे आसवांत घास तुझा

चंद्रशेखर सानेकर

रुजवण

सरणाच्यासाठी
वेचिता लाकडे
आयुष्य सगळे
कामा आले

अंती माझी मीच
रचिताना चिता 
कोवळी कविता
अंकूरली...

 

धुंदी
व्यथा वेदनांची 
फुले व्हावी सुकुमार 
जखमांचे ल्यावे
अंगभर अलंकार

नाचावे...नाचावे...
सख्या दुःखामध्ये चूर. 
निखळे पावेतो
वेड्या मनाचे घुंगूर...

 

दुभंग
देह अवघा वस्त्राधीन
परीटघडीच्या
जीव उभा झाडीपरी
पैलथडीच्या.

समोर उभा असून
अचूक पुन्हा दूर
मध्ये घोंघावणारा
दिशाहीन पूर

दूर सूर कुणी 
हाक देत जाय 
मुळ्या पारंब्यात 
गुंतलेले पाय...

 

येरझारा

ऐन उन्हातान्हामध्ये 
जशा गाढवाच्या खेपा 
खोल ललाटीच्या रेखा

पाठीच्या खंवंदावरी 
काठीचे फटके सक्त
मूक जन्मापरी रक्त

गोणी उतरली तरी 
पायी कळव्याचा फास 
उकंड्याचा स्वर्गवास

काठीच्याच तडाख्याने 
भंगे मूळ स्वप्न तंद्रा 
सुरू वांझ येरझारा...
 

1.
आजकाल
रस्त्यांनाही येतो
चक्क मरणाचा वास..
म्हणून,
पावलांनीही
सोडून दिलाय
चालण्यावरील
आपला विश्वास

2.
केळीचा बाग
किर्र काळोख 
एक रातकिडा
केव्हाचा
पटवून देतोय
आपली ओळख

सिसिलिया कार्व्हालो

तळहाती झेला

तळहाती झेला
कापराची वडी
विकल्पांची कोंडी
मातीमोल....

तळहाती झेला 
चंदनाचे काष्ठ 
द्वैताची ती पेठ
नामशेष...

तळहाती झेला 
आरतीची वात
लक्ष पापताप
तडीपार...

तळहाती झेला 
एक बेलपान 
मोह निर्दालन
एकटाकी...

तळहाती झेला 
आसवाचा थेंब
पाणी भरी सांब
परसात...

प्रसन्नकुमार पाटील

सावित्री

वटपौर्णिमेला
सावित्री भेटली
पिवळ्या गिरणीतील वटवृक्षाला 
मनोभावे फेऱ्या मारताना
दोऱ्यांनी गुंतविताना
ओठात पुटपुटताना 
सत्यवानासाठी सात जन्माचे 
मागणे मागताना

सत्यवानाच्या लत्ताप्रहारांनी 
किंचाळताना दिसली सावित्री
व्याकूळ तुरुंगाला
गोकूळ मानणारी
सहनशील सावित्री
वटवृक्षाच्या पारंब्या 
गळा आवळताहेत 
गुंतविलेल्या दोऱ्यात
जखडलेत पाय
तरीही,

सावित्री वाट पाहत आहे
वटपौर्णिमेची 
दोरा गुंतविण्यासाठी, 
फेऱ्या मारण्यासाठी... 
सात जन्माचे 
साकडे घालण्यासाठी....

सुरेश सावंत

 

कवीचे डोळे पुन्हा गर्भार राहिले

‘कवीचे डोळे पुन्हा गर्भार राहिले.
नि नक्षत्रांसारख्या तेजस्वी स्वप्नांचे 
त्यांना अनावर डोहाळे लागले.’ 
बंदीशाळेच्या द्वारपालांनी दिलेली ही वार्ता 
श्रवण करताच महाराजांसह राजसभा
पुन्हा एकदा अवाक् झाली.
महाराजांचे थिजत जाणारे डोळे लकाकले, 
नि आनंदातिशयाने त्यांनी टाळी पिटली. 
महामंत्र्यांच्या शासनकठोर भालप्रदेशावर 
एक सचिंत रेषा उमटली नि मिटली.
खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशवेध दुर्बिणी 
पुन्हा सरसावल्या नि त्यांचे डोळे 
अंतराळात बुडून गेले.
वाणिज्यकांनी आपले तराजू लखलखीत केले. 
ब्राह्ममुहूर्तावरील प्रयाणार्थ सौदागरांनी
रात्रीच नौका सागरात नांगरून ठेवल्या.

धर्ममार्तंडांनी पुराणांच्या जीर्ण पोथ्या झटकल्या 
नि शास्त्राधारांचे धूर्त संदर्भ लीलया सिद्ध केले. 
स्वप्न व सत्य यांतील सीमारेषा निसरड्या 
अचूक आखून अखंड विजयमुद्राधारी
साहित्यशास्त्रज्ञांनी अवघी राजसभा मंत्रमुग्ध केली.

कृष्णपक्षातील घनदाट आकाशघुमटात
निनादणारा ओंकार ऐकून उचंबळणाऱ्या 
सागरलाटांचे तांडव सुरू होताच 
बंदीशाळेत स्वप्ननक्षत्र जन्मास आले. 
नि क्षणार्धात नवजात स्वप्नवेल्हाळ 
महाराजांच्या रत्नजडित हातांत झुलू लागले. 
कवीचे डोळे जन्मांध असल्याची दंतकथा 
तेव्हाच जन्मास आली!

सुहासिनी इर्लेकर

तरीही

वेल उजवीकडे वळली काय 
आणि डावीकडे वळली काय 
तिला नसतात ‘डावे-उजवे’
असले
तकलादू संदर्भ.
लाल मातीत जन्मली म्हणून 
झाडे होत नसतात श्रेष्ठ
काळ्या मातीत
जन्मणाऱ्या झाडांनाही
लाथाडण्याची प्रथा नाही.
पावसाला मज्जाव नसतो
कोणत्याही प्रदेशात.
रस्ता भेद करीत नाही
पावला-पावलात.
लतादिदीच्या गाण्यात
दिसलेत का कधी
गर्वनिष्ठ भगव्या रंगाचे तरंग?
का कुणाला ऐकू आलेत
झाकीर हुसेनच्या तबल्यातून 
स्वार्थी मझहबचे संकुचित शब्द.
तरीही
आम्हीच आपले..
एंव-तंव...
तुझं माझं...
ठ्याँव-ढिश्याव...
गाय-डुक्कर....
 

दासू वैद्य

पिंगट ढगांखाली

गजबजलेल्या रस्त्यावरून गर्दीतून वाट काढताना 
नेहमीच वाटणारी एक अनाकलनीय भीती 
आपलं अस्तित्व हरवण्याची.
कार्स, स्कूटर्स, रिक्षा यांच्या संगीतोत्सवात, 
धुरांच्या वलयांत झुलत्या पुलासारखा
रस्ता तरंगत असलेला... दुतर्फा रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात
बुडत चाललेली दुकानं...
धडधड करीत निघून जाते मग लोकल
घामटलेल्या, सुकलेल्या चेहऱ्याची. 
घड्याळ दम कोंडल्यामुळे नाक मुरडून टिकटिकत
हात हलवून...
घामाचा तोच कुबट वास लिफ्टभर पसरत जाताना 
जाणवणारे तिचे परिचित उसासे...
सोप्यावर स्वतःला झोकून द्यायचं, एक निःश्वास 
सुटकेचा टाकून, पण दुसऱ्याच क्षणी ऐकू येतो आवाज 
मुलाच्या खोकण्याचा,
मुलगी येते समोर, प्रदूषणाबाबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरं
समजून घ्यायला....
रात्री सहज गॅलरीत उभं राहिलं की दिसतात 
पिंगट ढग आकाशावर आपला अधिकार सांगणारे
पाण्याच्या टाक्या, टीव्हीचे अँटेनाज् दिलगिरी व्यक्त करीत
चंद्र त्यांच्या मागे दडून बसल्याबाबत.
क्षणभर मनात सळसळून जातं निंबोणीचं झाड... 
धुकेरी चांदण्या निवांतपणे लटकत
नाईट-लॅप सारख्या.
थोडी दूरवर नजर टाकावी तर उभे असतात 
स्वतःच्या सावलीची लांबीरुंदी मोजत
एकाकी मर्क्युरी लॅप्स....
चकचकीत भिंतीवर खुशाल आणून लावावीत दोनचार निसर्गचित्रं 
मोकळ्या हवेची एखादी झुळुक अनुभवायला मिळेल या आशेनं 
किंवा बसवून घ्यावे एअर कंडिशनर बिनधास्त 
आणि फ्लॉवरपॉटमध्येच फुलवावे ताटवे फुलांचे 
डोळ्यांना सुखावणारे बुकेज् आणून...


अविनाश कोलारकर

थेंब

ओल्या ओल्या
आठवणी
ताजी ताजी फुले
गालावरी
मोरपीस
डुले, हले, झुले...

अर्घ्य जसा
ओंजळीत
पापणीत पाणी
उमलत्या कळ्यांतून
दर्वळती गाणी...

लोट येती अनावर
मन चिंब चिंब
दिशांतून
पाझरती
हरवले थेंब...!


श्याम कुलकर्णी

अर्थ

दारिद्र्यरेषेचा अर्थ
माणसापेक्षा कावळ्यांना अधिक
कळतो
म्हणून कावळे
रस्त्यावर वाहणाऱ्या तारांवरून 
किंवा इमारतींवरून
प्रसंगानेच उतरतात खाली.
त्यांना माहीत आहे
जमिनीवरून चालणाऱ्यांच्या
दारिद्र्याचा फुगवटा
चलनी नाण्यासारखा
वाढतच असतो पावलोपावली!


कल्याण इनामदार

मी

मी
कोसळत्या
धारांबद्दल बोलत नाही!
मी चिडीचूप झाल्या
पाखरांबद्दल बोलत नाही!

मी वाहून गेल्या 
गावांबद्दल बोलत नाही!
मी गाडल्या गेल्या
जीवांबद्दल बोलत नाही!

मी
कोसळणाऱ्या
डोंगराबद्दल बोलत नाही!

मी
पाखरांसकट चिणलेल्या 
घरांबद्दल बोलत नाही!

मी
वाहून गेल्या
आक्रोशांबद्दल बोलत नाही!

मी
त्यांनी दिलेल्या
आश्वासनांबद्दल बोलत नाही!

मी
आता
कशाबद्दलही बोलत नाही!

मी
संपत चाललेल्या
माणुसकीबद्दलही बोलत नाही!!

प्रमोद मनोहर कोपर्डे

गर्भाधान

भेगाळलेली जमीन 
थोडी नुक्ती कुठे 
भिजली आहे.
वाळून पडल्या
बिया ओल्या
नुक्त्या कुठे
आहेत झाल्या.
तोवर तुमची
भाजणावळ बांधावर
बांधून ठेवा.
मनामधले अंगार,
धगधगणारे निखारे,
विषवृक्षांचे बियाणे
कोठारातच दडवून ठेवा.

ओल्या झाल्या जमिनीवर
पाय ठेवा
मातीच्या काळजांतून
हात फिरवा
: जमिनीतून
आकाशाचे अंकुर रुजवा!


राजन साटम

टिपणे : आश्वस्त कॉलनीतली घराची

कॉलनीतील रस्त्यावर रात्री 
पांढरे शुभ दिवे असतात. 
गुरख्याच्या कर्कश व्हिसलने 
शहारत जाते एखाद्या फ्लॅटच्या
बाल्कनीतली खिडकी
तेव्हा, स्वप्नभासांचे घट्ट आवरण 
सरकत जाते आकाशातून खाली 
कदाचित त्यामुळेच मी
उशिरापर्यत जागत असतो.

माझे डोळे प्रौढ झालेत 
असं कित्येकदा
कॉलनीतल्या बाल्कन्या
न्याहाळताना वाटतं, 
रात्रीही असंच होतं
मी रस्त्यावर रात्री एकटा येतो
पहात राहतो अचेतन

अंधारातून मग्रूर घोड्यांचा कळप धावताना
नंतर, पहाटण्यापावेतो
मी जागत राहतो बिछान्यावर 
कॉलनीतील दिवे अंधारताच
नकळतच माझाही डोळा लागतो.

ही कॉलनी
तशी जुनीच
घरासमोरचा प्रौढ
म्हातारा झाला.. खचला.. गेला.
पहात राहतो मी
रस्त्याच्या दुतर्फाची झपाट्यानं वाढणारी झाडं.
कधी नकळतच
खिडकीतून डोकावलं तर 
रात्री कवितांची झाडं
वयात आल्यासारखी वाटू लागतात 
मग मी स्वतःशीच बडबडतो
रेग्यांच्या आवाजात
दर्दभरे गाणे म्हणतो
रंग विटल्या घराच्या भिंतीवर
(पंगुळल्या डोळ्यांतच)
रंग भरत राहतो.
रोजच
बाहेर व्हिसल वाजत असते
मित्रांची पत्रं उशिरापर्यंत वाचताना
घरातल्या जुन्या ऑर्गनचा
नादुरुस्त आवाज
कविता जागवत जातो.
गुलाम अलीच्या गझला
रात्रभर साद देत राहतात
तर कधी,
भैरवीचे स्वर मरणभूल पांघरतात
कदाचित म्हणूनच
मी पहाटण्याची प्रतीक्षा करत राहतो 
खिडकीकडे डोळे लावून.
मध्यंतरी
बरेच दिवस या आश्वस्त कॉलनीतील
माझ्या घराचे चित्र
मी भिंतीवर टांगून ठेवले होते. 
आता,
पुन्हा नव्याने घर उघडतो आहे. 
(चित्राचा रंगही बराच काळवंडलाय) 
सारं घर स्वच्छ करायला हवं
पाखरांची विरलेली पिसं,
भिंगोरीचे मातीचे घर, 
उंदराची बिळं,

छतावरले कोळ्याचे जाळे,
- हे सारंच नष्ट करायला हवं
पण
मला याची तर सारखी भीती वाटते


मंगेश काळे

हा माझा घोडा

त्याने आपला एक घोडा
जीन चढवून बाजारात आणला 
तेव्हा भिवया वर उचलल्या गेल्या
घोड्याचा मालक म्हणाला
हा आपकमाईचा माल आहे
बापकमाईचा नव्हे
वारा पिऊन हा उभा आहे.
खिंकाळला जरी नाही तो तरी 
त्याला शब्द समजतात 
उसने... उधार... मतलबी...
याने पृथ्वीला पालाण घालून
रामायण घडविले
आणि तरीही
तो अखंड उभाच आहे 
कुणाची का नौबत झडेना,
मनसुब्यांचे इमले उभारेनात 
हा अभंग उभाच
“याचे मोल काय?” 
असे एक सौदागर म्हणाला
तेव्हा त्या मालकाने
घोड्याचा लिलावच मांडला 
हा लिलाव चढत गेला
कारण लिलाव म्हटले
की नशा आलीच
लिलावाचा बोल संपेना
घोडाही बसेचना
मग तो पाण्यावर जाण्याची
बातच सोडा
अशा वेळी
गावठाणातील घराघरांतून 
कधी न दृष्टीस पडलेले
नवनवे घोडे
फुरफुरत बाहेर आले.
घोडे अलंकारलेले
घोडे लचकणारे
घोडे घुंगरू वाजवणारे
असा घोड्यांचा बाजार भरला
तू मी तू मी चा गहजब झाला
पण सौदा तुटेना
अखेर घोड्याच्या शेपटीतील
केसाचे तंतुवाद्य करून 
एक भिकारी 
गाणे गाऊ लागला,
"जरा सबुरीने महाराज, 
वाडगा रिकामा आहे. 
पाठ पण उघडी आहे."


म. वि. कोल्हटकर

मौन

पायाशी पडलेल्या लक्तरांसकट, 
तिच्या साऱ्या संचिताला 
त्याने निःशंकपणे लपेटून घेतले, 
तसे तिच्या ओटीतल्या
अंधाराला,
चांदणे भेटले.
आता दुणावलेल्या देहाचे
कमळ जपताना,
स्वतःचे हे आरपार नवेपण
ती पाखरासारखी टिपत राहते. 
आता केव्हा तरी दिसते.
भोवतालचं ऊन दारापार
घालवताना,
आणि एखादा चुकार कवडसा
पदरात झुलवताना!
अशा वेळी तिचे जिणे 
नक्षत्रांची झूल होते. 
तिच्या ओठी साकळलेल्या 
मौनालाही फूल येते.


पराग विनायक बाड

प्रिय...

प्रत्येक भेटीत मी
रिक्त रिक्त झालो
तुझ्या येण्याचे सोहळे करावेत
तो काळही
सरलाय मागेच

मी केव्हाच स्वीकारलंय
धारदार सुऱ्याने 
जखमी होऊन
विव्हळणे
इतकंच सांग
आता कोण हुंकारते
मध्यरात्री
अपार वेदनेने.

सायमन मार्टीन

उद्याचे सूर्य

ज्यांना
सूर्याच्या नुसत्या नावानेच
ऊन लागत असते,
उषःकालाचा अर्थ म्हणूनच
कसा कळणार त्यांना?
अहो, इथले आंधळे दिवेच तर 
उद्याचे सूर्य आहेत 
आणि म्हणून तर त्यांना 
उजेडाची दृष्ट लागत असते!
आता तर...
हे आंधळे दिवेही
पेंगू लागलेले आहेत
आणि उजेडाचे काफिलेही
म्हणून पुढे पुढेच चाललेत... 
अहो, तुमच्या बिनचेहऱ्याच्या गावात
कोण घेणार आहे उजेड 
इथले सगळेच चेहरे 
त्रयस्थ दगडी, अनोळखी 
सगळे उजेड विकायला निघालेले!

लीला धनपलवार

दोन कविता

1
कपाळावरची अंधारनक्षी
मिटवू नये स्पर्शांनी
अलगद उतरणाऱ्या स्वप्नांना 
होत असते आत्महत्येची 
बाधा...
एकदा नीज विस्कटली

की काळ्याभोर ढगांचे
अस्वस्थ मोर
अशांत सावल्या पापण्यात सोडून
भरकटत जातात दूरवर... 
उलटतात कित्येक प्रहर

हळूहळू असह्यपणा ओळखीचा
वाटू लागतो!
निवळू लागते
अंधार चांदण्याचे गढूळलेपण
गुंतवण्यातच शेवटी
होत असतो मोकळे आपण!

2
तसा दूरवर...
सर्वदूर...
सारखाच असतो पाऊस
कोसळणारा झिरझिरणारा 
अडवणारा भिजवणारा
रडणारा.
निरोपासोबत पाठवलेला
चिमूटभर पाऊस
तुला कुठे भेटला? 
थेट हृदयालाच भिडणारा!
पावसाचे स्वप्न डोळ्यांत उतरले 
म्हणजे होत असतात आठवणींचे ढग
गालांवरून झरझरू लागतात
अक्षरं मग.
तोच चिमूटभर पाऊस 
अंगणात पेरला,
काही दिवस निघून गेले
काही सरी येऊन गेल्या
पाऊस वाढत वाढत आभाळाशी गेला
भरकटत वेड्यासारखा 
तुझ्या घराशी;
ओळखीने तू
खिडकीतून अलगद घेतलास... 
हृदयाशी!

रेणू पाचपोर

 

पाच कविता

1
उडणारा काजवा
मी हळूच पकडला मात्र...
आपला उजेड माझ्या
बोटावर ठेवून
तो अलगद विझून गेला
करंगळी मात्र उजेडलेली

2
काडेपेटीतली एक काडी 
जराशी घासली मात्र.. 
लख्ख उजेड उभा राहिला
दिवा घासल्यावर
देवदूत उभा रहावा तसा 
त्या टिचभर काडीच्या
चिमुकल्या डोक्यात
प्रकाशाचा येवढा साठा
कोणी ठेवला?

3
अम्मी सांगायची
नीज बरई आता...
सारी मुलं निजली की 
चंद्र आंघोळीला उतरतो
समुद्रात...
त्याच्या स्नानाच्या विखुरलेल्या
निशाण्या म्हणजे
शंख आणि शिंपले...

4
बाहेर पावसाचा दंगा 
त्यात पुन्हा सुरू झाली 
बेडकांची शाळा 
जागोजागी त्यांनी ठेवलेल्या
पावसाळी छत्र्या
ह्यांची शाळा म्हणजे
नुसता घोर
सारखा आपला गाण्याचा
एकच तास थोर

5

बरंच रान पार करून 
जायचं आहे 
प्रवास तसा लांबचा. 
सोबतीला आहे 
एक उडणारं... रेशमी... 
फुलपाखरू... 
प्रवासातला सोबती.
 

संध्या कर्णिक

Tags: paus renu pachpor don kavita पाऊस रेणू पाचपोर दोन कविता kalena kahihi vasanti muzumdar कळेना काहीही वासंती मुझुमदार प्रतिबिंब निर्माण तीन श्रीधर शनवारे pratibimb nirman teen shridhar shanware to aruna dhere तो अरूणा ढेरे गगनगाज वसंत सावंत gagangaj vasant sawant madhumas abhra k b nikumb मधुमास अभ्र कृ. ब. निकुंब प्रवास शांता शेळके kavita pravas shanta shelke gaurihar poem indira sant गौरीहार कविता इंदिरा संत weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके