डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भय वाटतं
आल्याबरोबर
माझ्या भवतालचा
सगळा पाऊस
खेचून घेशील

बोकाप्रशस्ती
मंगेश पाडगांवकर

याने त्यासि हटवावे,
त्याने यासि कटवावे,
एकमेकांसि फुटवावे 
जमेल तैसे. 

म्हणावे, "तो निश्चित गेला,
आम्हीच बुडविण्या नेला,
आपुल्या मरणानेचि मेला,
दोष त्याचा. "

यावर त्याने विचकावे दात,
ठेवून पोटावरी हात
म्हणावे, “शिकायचा वेदान्त
मीचि जाणे. "

सावज मान्यात येता चाप
ओढीन अचूक आपोआप,
तेव्हा यांना आपुला बाप
आठवेल. 

सत्तेवरून मज हटवील,
माझ्या खुर्चीवरून उठवील
माझे पोशिंदे गटवील
ऐसा कोणी नसे. 

आज याचे बोलणे छापून येते,
उद्या त्याचे बोलणे छापून येते,
परवा तिसरी अफवा तापून येते,
काही कळेना. 

बातम्या आणण्याचे यंत्र
हाती हवे हा सद्गुरुमंत्र,
शीतयुद्धाचे धूर्त तंत्र
हेचि खरे. 

घोषणांची पिसावी चक्की
धक्काबुक्की यशस्वी नक्की,
हवेत अफयांची फक्की
उडवोन द्यावी. 

आपुला घोव दिल्लीस आहे. 
जाणीव सगळ्या गल्लीस आहे,
प्रत्यय प्रत्येक बिल्लीस आहे
आपुलिया बोक्याचा. 

बोका बिलंदर गलेलठ्ठ,
पुरवील सत्तेचे सर्व हट्ट,
त्याच्यामुळे आपली घट्ट
इथली खुर्ची. 

तोचि मतांचा ओढील गट्टा,
तोचि जिभेचा चालवी पट्टा,
तोचि निवडणुकीचा सट्टा
जिंकील अखेरी. 

आपुलाचि बोका येवो,
लोणियाचे गोळे खावो,
येथ निष्ठावंतांचा भावो
वाढवो तो. 
॥ इति श्रीउदासबोधे कविजनतासंवादे बोकाप्रशस्तीनाम समास ॥
 

वारा रुणझुणू झाला
इंदिरा
 

चुरू चुरू चोखताना भुते वाऱ्याची भरारा, आभाळही सैरावैरा
वेड्या पावसाच्या धारा,पाणजंजाळ पसारा
गावकुसाच्या बाहेर भिजे चिंब तणघर
खेळे झोळीत तान्हुले तिच्या डोळ्यात कहार
दारी लाटेमागे लाट,पाणी शिरले घरात
ढासळली उतरंड, तान्हे उचली क्षणात
निया कोरड्या वेतून तान्हे उराशी लावीत
डोळ्यातून धारा धारा, ओठ मिटलेले घट्ट
बाजे धुंगुराचा वाळा पोटा लागल्या पाण्याशी
हात तान्ह्याचा खेळला,खुदू खुदू हासताना थेंब दुधाचा ओठाशी
तिने कवटाळिले तान्हे वर धरून गळ्याशी
ओढ पाण्याला लागली तोल ढळाया लागला
अशी तशी हालताना वाळा रुणझुणू झाला. 

मुखवटे
शांता ज. शेळके

मुखवटे येथे तिथे हे, मुखवटे मागेपुढे
चेहऱ्यांना झाकणारे मुखवटे चोहीकडे. 
मुखवट्यांचे मुखवट्यांशी चालले संवाद हे
आत आशय वेगळा जो ना कुणाला सापडे
मुखवट्यांनी माळलेली लखलखे दीपावली... 
आतला अंधार गिळतो दुःख येडे भाबडे
गाढ शोकाच्या कहाण्या खोल चिणलेल्या तळी
मुखवट्यांचे भाव वरती ठाम, निश्चित, रोकडे,
हिंडता गर्दीत जो तो मुखवटा अपुला जपे
वाटते भय सारखे जातील का त्याला तडे?
विसरले मीही अता माझा इमानी चेहरा
मुखवटा जग मानते है भाग्य आहे केवढे!
मुखवट्यांचा जो नियन्ता एक त्याला प्रार्थना
टाक अधू गिळुन माझे ठेव डोळे कोरडे

 

नातं
किशोर पाटक

लई झोडलं गं सये लई झोडलं ॥
तेचा देह आडमाड
हात म्हनू की कुहाड
अख्खं लाकूड ते पाठीवर फोडलं गं सये त्यानं फोडलं ॥
माजं डोरलं खेचलं
त्यानं पायानं ठेचलं
माज्या धानातून बाळ त्यानं ओळलं गं सये बाळ ओढलं ॥
बाईलीशी बळजोरी
सटवीशी अंगचोरी
माजी उसवून कूस तिचं वाढलं गं सये पोट वाढलं ।।
रती मदनाची कळ
माज्या शेजेवर वळ
माज्या जिंदगीचं सोनं त्यानं मोडलं गं बाजारात मोडलं ।।
असा बोडक्याचा देव
त्याला कशी नाही कीव
ज्यानं अशा हैवानाशी नातं जोडलं गं माझं नातं जोडलं ॥
लई झोडलं ग सये लई झोडलं... 


काळजाच्या कपारीत
अशोक बागवे

काळजाच्या कपारीत
काळजाच्या कपारीत झेललेले आघात अवघड चांदण्याचे,
तुला कुशीतून सावरून घेत थोपटलेले डोळ्यातले काजवे
रात्रभर,
मनसमजावणी करताना
आता मला जाणवतंय आतून
किनारा पाण्याला वेल्हाळत धुवाळतो तो कशासाठी?
ठणका कळ्यांचा मातीला बसतो की झाडाला?
फुलांच्या समईत सुगंधाचं तेल जळतं रात्रभर ते कुणासाठी?
चिंब ओसरून गेलेला पाऊस दंवाचा पहाटे पहाटे,
दुखरे पंख सावरून डहाळीवर गुणगुणणारं पाखरू अधेमधे,
तुझ्या आभासाची नीज मोडू नये म्हणून

 

कधी सगळे अंदाज चुकतात
वसंत सावंत

कधी सगळे अंदाज चुकतात, मी फसतो, चुकचुकतो
कधी क्षमा मागतो, कधी रोरावतो, कोपतो
कधी गप्प बसतो मूग गिळून, सभोवार टाळून चालतो
तरी नको ते नेमके भेटतात, हाकारतात, नाइलाजे थांबतो
कधी वळणावर एखादे हासू भेटते, ते चालायला लावते
कधी न दिसणारे दिसते. मौनाची भाषा करते
आतून मोडलेले मन, बाहेरून ताठ असल्याचा बहाणा
असे म्हणतात की अशातून चालतो तो शहाणा
मला वाटते मी सहसा कधी चुकत नाही
कधी वाटते हे वाटणे हीच तर एक चूक नाही?
जीवन सर्वार्थाने भरलेले असे कधी नसते
आयुष्य हीच एक आपण न केलेली भली थोरली चूक असते!

अहेव
अरुणा ढेरे

आयुष्याच्या दोंदावर पाय देऊन
गोळा केलीस भारंभार फळ,
बाई, तुझ्या ओच्यात फक्त एक टिकलं,
तेही नाशिवंत. 
छाती फुटेल एवढा दुःखाचा डोंगर पुढ्यात
अन् तुझी एवढीशी चण दिसायला. 
पण गाठी मारून नेसल्या लुगड्याचा पदर
तुझ्या डोईलाच नव्हे पुरला,
उरला सई-शेजीला, सावलीला. 
नशीब थोर तुझं, म्हणतात. 
अरदार की परदार, कुणावर भार नाही,
पैशाएवढं कुंकू लावून लखलखीत गेलीस. 
सरणाची पालखी केलीस. 
झुंज द्यायचा चिवटपणा
खोचलेला कायमचा तुझ्या कडोसरीला,
बाई तो अहेव माझ्या वाट्याला येवो,
फुकते तुझ्या जगण्याची चिमूट आठवण इथे तिथे,
तिनं सारी इडापिडा जावो. 

जन्म
नरेंद्र बोडके

सुख ओलेत्याने येते
मत्त कायेच्या काठाशी
खोल काही उतू जाते
कोण्या कुंवार देठाशी
झगमग झगमग
स्पर्शकल्लोळ विजांचे
लख्ख अगाध झुंबर
आततायी लोलकांचे
गात्रागात्रांना लुचते
शुभ्र धारोष्ण चांदणे
भरतीच्या स्रोतापाशी
सुख हिंदोळत येते
असे तुझ्यात माझ्यात
जन्म पृथ्वीचा नव्याने
होतो तुझ्या उदरात... . 
लालसेचे ओथंबणे... . 

 

 

कविता
वासंती मुझुमदार

1
तशात... 
पावसाच्या पाठोपाठ
अंगणभर झाले मी... 
आपलंच रूप
पाहिलं
धेबांमधून... 
आणि काय!
मी आपली एक लवलव
लाल ओली... . 
पण
ना भुईत
ना आकाशात
केवळ थेंबांच्या आरशातच... 
आणि त्या वेळी ना
धरित्री
नव्हतीशीच झालेली... . . 

2
तू नाहीस
तर हा
कोसळता पाऊसही
नको असायचा. 
तू नसावास
तेव्हा पाऊस मात्र असावा
असं वाटू देणाऱ्या वेळा
किती वारंवार येतात आजकाल... 

3
भय वाटतं
आल्याबरोबर
माझ्या भवतालचा
सगळा पाऊस
खेचून घेशील
आणि कपाटात कुलुपबंद करशील. 
थोडा कनवाळू हो
आणि
माझी पावसाची मख्मल
समुद्रात तरी विसर्जित कर
नाही तरी
वेळ
अर्घ्य देण्याचीच आहे... 

4
पाऊस... 
असा प्रियसखा:
त्याला कधीही
'जा' म्हणता येतं... 
त्याच्याशी कट्टी घेता येते... 
पण तो बोलभांड
झाला की
आभाळ फाटतं रे... 

5
बोलावलंस
म्हणून आले:
फुलांनी बहरलेल्या शहरात
लाल केशरी गेंदांची
सगळ्याभर फाल्गुनी
ना डोळे निवायला उसंत... 
... इतक्या दिवसांनंतर
इथं आलास
तेव्हा माझ्या नगरात
नुसता शिरवाच शिरवा... 
माझे डोळे निवलेले... 
तुझे मात्र विझलेले... 

खट्टू
नारायण कुळकर्णी-कवठेकर

बस मैं हूँ मेरी तनहाई है
असं खट्टू होऊन म्हणणारी
गुमसुम मुलगी
गुडघ्यावर हनुवटी टेकून
शून्यात पाहत बसते
त्या वर्तुळात
उगवतो एक ढग-
जो
कोलांटउड्या मारतो थट्टेच्या,
जो
गिरकी घेतो छंदाची,
जो
फिरवतो आपल्या दाढीवर हात
नव्या कवितासंग्रहाला कुरवाळावे तसा,
जो
गाणी म्हणतो लाडिकशी,
जो
सुरू करतो गुंजारव
बादल बिजली चंदन पानी
मदिर मधुर सरगम बीना
अशा लडिवाळ शब्दांचा... . 
आणि खटू मुलीचे ओठ
हसण्यासाठी विलग
होतात
तिच्या खळखळून हसण्याची
वाट-
तिच्या केसांतून
हात फिरवण्याची इच्छा
बाळगणारा वारा
वेडावून पाहत असतो... 
 

अहिल्या
जयंत पाटील

अहिल्ये,
सागरगोट्या किती चपळाईने
झेलायचीस तू... 
माझ्यावर डाव उलटवण्यात
तुला किती आनंद व्हायचा... . . 
तुझ्या खळाळत्या हास्याने
माझ्या मातीच्या घरातली
निस्तब्ध दुपार पार विस्कटून जायची... . 
... आणि एके दिवशी तुला
गौतमांकडून मागणी आली... 
सागरगोट्या अंतराळातूनच
निघून गेल्या दिगंताच्या प्रवासाला. . 
आणि अहिल्ये,
आता स्वतःशीच आट्यापाट्या... 

2
यात्रेत आईपासून हरवलेलं मूल तसा मी गुरुकुलाच्या त्या पसाऱ्यात. 
अहिल्ये,
गौतमांसाठी समिधा गोळा करताना
मी तुला पाहिले
पलाश वृक्षांच्या गर्दीतून आणि
मिटून घेतले स्वतःला
तुझ्या पापण्यांच्या कुशीत. . 
घाटावर आंघोळ करून
ओलेत्याने तू निघालीस की
तुझ्या पावलांच्या ओल्या ठशांवर
माझी लहानगी पावले ठेवून
मी यायचो तुला सोबत म्हणून
थेट तुझ्या आश्रमापर्यंत... 

3
अहिल्ये,
सारवलेल्या अंगणात रेखलेली
प्राजक्ताच्या फुलांची रांगोळी
जणू लक्ष्मणरेषाच:
तुझ्या पतिनिष्ठेची. 
त्या फुलांच्या रांगोळीत
मी पार हरवून जायचो. 
प्राजक्ताच्या गर्भाशयातला मध चुंफून
तिथेच झोपी जायचो. . 
सगळे जंगल थरथरायला लावणारी
शापवाणी गरजली गौतमांची : आणि मी जाम
पसरलेल्या केशसंभारात
तू पहुडली होतीस तृप्त कमळासारखी
गौतमांच्या रूपातला इंद्र
उभा होता एका कोपऱ्यात
तुझ्या उःशापाने लाभलेल्या
हजारो डोळ्यांनी तुला निरखीत
शेवटचा,मधाळ. 
4

अहिल्ये,
तू म्हणजे शाप उच्चारून
दिक्कालात भिरकावून देण्याची वस्तू होतीस
की हात लांब करून हस्तगत करण्याची बस
... परवाच तुला पाहिले रस्त्याच्या कडेला
बसली होतीस तू गुडध्यात मान रुतवून. . 
अहिल्ये,
. . त्या सावळ्या पदस्पर्शाने
तू फक्त जिवंत झालीस पण
कळ हरवलेल्या खेळण्यासारखी. . 
तुझ्या इतस्ततः पसरलेल्या काचा... 
गौतमांच्या शापाच्या
तुझ्या उःशापाच्या... संभोगाच्या सुखाच्या
काचाच काचा... 
मी खाली वाकून काचा उचलायला
हात पुढे केला तर
तू म्हणालीस
'राहू देत त्या काचा. 
तुझे बोट कापले तर
चिंधी फाडून द्यायला
माझ्या अंगावर काहीही नाही रे... '

नाइलाज
संध्या कर्णिक

गरम चहाचा कप
सुनेने पुढ्यात आणून ठेवला
एक शब्दही न बोलता. 
थरथरत्या हाताने
कप उचलताना
कसा कोण जाणे
सगळा चहा सांडला. 
सुनेने जमिनीवरचा
चहा पुसला
जरा वेळाने नवा कप
पुक्यात आणून ठेवला. 
एकही शब्द न बोलता. 
चपला सरकावून
ती बाहेर पडताना
त्यांनी न राहवून
विचारलंच... नेहमीसारखं
"कुठे चाललीस ग?
कधी परत येशील?
भूक लागली तर
खायला आहे ना?"
तिने दार ओढून घेतलं
एक शब्दही न बोलता. 
तेवढ्यात त्यांना
खोकल्याची उबळ आलीच. 
थोडंसं पाणी हवं होतं
कोणीतरी मायेने पाठीवर
चोळून द्यायला हवं होतं
'घाबरू नका. मी आहे ना?'
असं म्हणायला हवं होतं. 
कोणीतरी... 
जिन्याच्या शेवटच्या पायरीवर
तिला त्यांची ढास ऐकू आली
हातातली पर्स घट्ट धरून
ती चालतच राहिली
एक शब्दही न बोलता. 

घार
महेश केडुसकर

निळ्याभोर समुद्रावर
लखलखीत शुभ पट्टा
किनाऱ्याशी
गर्द हिा झाडीत
लालचुटुक तान्ही घरं
झळझळीत उन्हात न्हात... 
राजा थिबाच्या
अस्वस्थ भुताची धार
संघ तरंगतेय
आभाळात... 

कुणासाठी... 
बबन सराडकर

कुणासाठी जळताना
स्वतः व्हायचे अंधार
असा दिव्याचा संसार... 
कुणासाठी गळताना
जन्म भरडत जावा
जीव पीठ पीठ व्हावा... 
-असे दिव्याचे जात्याचे
ज्याने भोगायचे जिणे
त्याची चिंध्यांची प्राक्तने... . 

हवे कशाला
सुधांशु

हवे कशाला बोलणे
हवी कशाला भाषणे
अबोलातून स्फुरावी
दिव्य अंतर स्पंदने
हवे कशाला गायन
हवे कशाला नर्तन
स्तब्धतेत दर्वळावे
मनोदयाचे चंदन
हवे कशाला चालणे
हवे कशाला धावणे
व्हावे बसल्या ठायीच
उंच आकाश ठेंगणे
प्रगटणे, प्रवचने
विवेचने, विलोभने
श्रम हवेत कशाला
हवे शांतीचे चांदणे
अशा शीतल शांतीत
स्फुरे कैवल्याचे गीत
भरे चैतन्ये जीवित
झरे अंतरी अमृत!
फुलपाखरांचे गरुड झाले
ज. वि. पवार
तू सावित्री : एका सत्यवानाची
तुझ्याचमुळे मिळाली मुक्यांना मुक्ती. 
स्त्री शूद्रांचा तारणहार
झेलीत राहिला जन्मभर प्रहार
नाहीच स्वीकारली त्याने हार. 
व्यवस्थेवर कु-हाड मारताना
तूच त्याच्या हातात सामर्थ्य ओतलेस
दमला भागला तेव्हा
तूच धीराची पुंकर मारलीस
स्त्रीशिक्षणाची तू प्रणेती,
दगडधोंडे अन् शेणाची तुला कसली क्षिती
परेने तुझ्यावर भिरकावलेल्या दगडांचा पाया झाला
त्यावरच बांधलीस तू दास्यमुक्तीची कार्यशाळा,
तू तोडल्यास दासीच्या पायातल्या शृंखला
पाजलेस वाघिणीचे दूध तिला
केलेस समस्त अबलांना सबला
आकाशात मुक्तपणे संचार करण्याला. 
तू सावित्री : प्रवाहाविरुद्ध वाहणारी
शापितांच्या हुंदक्यांनी गलबलणारी
परित्यक्तेला जीव नकोसा झाला
तुझ्या पान्ह्यामुळे अणूंचा बांध फुटला. 
पतीचे गुणगान गाणारी तू पहिली कवयित्री,
फुलांचा तजेला अबाधित ठेवणारी
ज्योतीवरील पतंगासारखे तुझे आयुष्य होरपळले
तुझ्यावर फेकलेल्या चिखलात कमळ उमलले. 
मानहानी साहिलीस मानिनी, दात ओठ खाऊन
तुझ्या बाण्याने पाण्याचे तेजाब झाले. 
मुंग्यांनी पर्वत गिळले
फुलपाखरांचे गरूड झाले... गरूड झाले!

बाबासाहेब
सायमन मार्टिन

बाबासाहेब,
काल जी बस्ती पेटली
ती माणसांची नव्हती
भटक्यांची पालं धगधगताना
सूर्य मावळला
त्यानंतर काही काळ
वर्तमानपत्रांत टिकून राहिली धग
भाषणात जोम नव्हता
घोषणादेखील आवेशहीन
मोर्चा तसा निघालाच नाही
काही दिवस बुद्धिवंतांमध्ये
थोडीशी जाणवली सळसळ
तुम्ही जाऊन लोटली आहेत
वर्षे
हे खरं म्हणजे तेव्हाच जाणवलं
प्रकर्षानं... 
बाबासाहेब,
आंदोलन थांबलय
चढ्या आवाजात समीक्षा
रंगलेली
संमेलनाच्या मांडवात
विद्वज्जड शब्दात मांडत आहेत
विद्वान जमाखर्च
तुमच्या आयुष्याचा
सभागृह पेंगुळलंय
अवजड शब्दांनी
तीच-तीच माणसं
तेच तेच विषय
आणि दम लागेपर्यंतची
भाषणं आंदोलन थांबल्यानंतर
एवढीच प्रगती आहे. 
बाबासाहेब,
ह्या वर्षी ज्वाळ झाला
तो सत्तेत हिस्सा
वाजवीपेक्षा कमी मिळाला
म्हणून. 
यशस्वी समझोत्यानंतर
आवरता घेतलाय विषय
नेत्यांनी. 
एक पाय सत्तेवरती ठेवून
जागता पहारा ठेवलाय
तुमच्या नावावरती. 
तुमच्या नावाचे सर्वच हक
आरक्षित केलेत त्यांनी. 

वयात आली कविता
रमण रणदिवे

चार तरुण शब्दांना जेव्हा सलज भ्याली कविता
खरेच आता कळले, माझी वयात आली कविता
अता नको संबंध कोरडे आगंतुक शब्दांचे
तिला निळे आभाळ मिळाले आशयघन मेधांचे
अभिव्यक्तीच्या जळात भिजुनी तुडुंब न्हाली कविता
खरेच आता कळले, माझी वयात आली कविता
रित्या शिंपल्यापरी उताविळ शब्द खुणावत राही
मोत्यांच्या गर्दीत दवाची वर्णी लागत नाही
किती शहाणी. किती समंजस, सुजाण झाली कविता
खरेच आता कळले, माझी वयात आली कविता
दिला मुलायम हात सोडुनी कवितेने स्वप्नाचा
तिला अनावर ध्यास लागला सुंदर वास्तवतेचा
प्रकाश होउन प्रकाशाकडे अता निघाली कविता
खरेच आता कळले, माझी वयात आली कविता
नक्षत्राच्या सईवाई
नंदकुमार जगधने
असा हुंकारला मेघ, गंध मातीत भिनला
डोळा डोळ्यां लागताना, गाव साजणाचा आला ||
तारुण्याच्या परडीत, तुझे लावण्य जोगवा
दारी उभी नको राहू, आला जोगत्यांचा थवा ।।
रक्तबीज पेरण्यास, आला भुजंग देखणा
नको आणू मिरवीत, तुझा चंदनी उखाणा ॥
नाही कोठे कोरे पाणी, हाक खोल तळा गेली
तुवां कुंकवाची चिरी, भाळी कोरून रेखिली ।।
अशी कोरी सांजवेळ, काळजात गेली खूण
आता बीज हुंकारेल, टाक पाऊल जपून ।।
नक्षत्राच्या सईबाई, आता सांभाळ आभाळ
झोका थांबत चालला, दान उजेडाचं आलं ।।

रात्र म्हणजे... 
कल्याण इनामदार

रात्र म्हणजे नुसताच काही अंधार नसतो
स्वप्ने सुद्धा असतात मनात तरळणारी
उमलणाऱ्या फुलांसारखी लय धरून
जमल्यावेळा डोळ्याकाठी बरळणारी
आपण धीर जपत रहावा सदानकदा
पिलांकरता चिमण्या खोपा जपतात तसा
सगळे आभाळ मावळणारे असते म्हणून
कापू नये उजेडाचा भरला खिसा
भग्न भिंतीवरचा रंग उडतो कधी
पडल्या खपल्या पापण्यात धरून राह्यचे नसते
जखमेवरती जखम करून विव्हळताना... 
हुंदके देत खोटे गाणे गायचे नसते
दिवे देखील काजळ धरून जगतात ना... 
त्यांनी असतो उजेडाचा घेतला वसा
पुढचे मागचे सारे काही आठवताना
हातचा घ्यावा लागतो जमेस हवा तसा
सगळे सगळे मनासारखे होणार कसे?
ऐलपैल ढवळणारा मनात श्वास
आपण एक चूळ भरून शिकले पाहिजे
दाताखालचा खडा काढून खायला घास!

आठवांची नक्षी
सुवारक शेख
आमराईत दबली
नभातून उगवली
कोकिळेची हाक
पाखरांच्या दुःखावर
शिशिराचा हक्क
वेदनेची बीज
काठोकाठ भरलेले
अब्रूचे क्षितिज
सांज उतरून आली
कोरड्या तळ्यात
जीव झाला चोळामोळा
हुंदका गळ्यात
झडू लागली पालवी
पांगताना पक्षी
सुन्या सुन्या फांदीवर
आठवांची नक्षी

प्रारब्ध
बाळ राणे

श्रांत चिडीचूप डोळे
करुणात दुःखयात्रा
व्यथा व्याकूळ मनात
रित्या आयुष्याची जत्रा
झाडांच्या उगमापाशी
फूल एकेक हे गळे
या कातर काळ्या वेळी
क्षितिजही रडवेले
दिशादिशांत हंबर
कुठे गेल्या साऱ्या गाई?
तिन्हीसांजा झाल्या तरी
अंगणात दीप नाही
खिन्न, मुक्या अंधारात
काजवेही रातांधळे
झाडाझाडांत उलटी
भयाण वटवाघळे
तुजवीण अस्तंगत
उभ्या जन्माची नक्षत्रे
अंधारातही दिसती
गूढ प्रारब्धाची शस्त्रे... 

अशावेळी... 
वसंत बाहोकार

कोणत्याही खुलाशांची गरज नसते
आपलेच आपल्याभोवती चेटून आलेले बेट
गल्बत टेकलेले निवांत किनाऱ्याशी,
कुठून कसे धावत येते ओळखीतले जुने पाखरू
इच्छा नसताना त्याच्याशी अचानक गाठभेट
गाणे गायचे नसते, ना घालायची शीळ
किंबहुना जतन करायचे असतात हृदयातले पीळ
चक्क सोन्याचे उन हसू लागते पुन्हा ओळखीचे
भोवतालचे सगळेच रंग पुन्हा एकदा गडद होतात
पाखरूवेडे पुन्हा गाणे, आपल्या ओठात शीळ
गर्द टपोर कर्दळ, किती भडक प्रौढ लाल
घमघमून येतो चाफा, मोगरीचा टच वाफा
हळदगोया दुपारीही उधाणता गुलाल
किती व्हावे शहाणे, पण हाती नसते काही
देह लपेटून आठवणींची उबदार जर्द शाल
पुन्हा कुणी फितूर क्षण... वैरीण होते वेळ
समजूतदार होतात वेगळ्या होताना वाटा
लाटा उसळण्याआधी दर्या आवरतो खेळ
कसे खुलासे? पुन्हा दाटून भवताल बेट
अशा वेळी जळता कापूर, कशी गाठ कुठे भेट?
 

आभाळी प्रार्थना
-सुहासिनी इलेकर

कोणत्या किनाऱ्यावरून सुटलंय? कधी?
ठाऊक नाहीय त्याचं त्यालाही हे
कुठं जायचंय? केव्हा? तेही-
गेलंय विसरून कधीचंच!
असं-
कुठल्याही क्षणी फुटण्याचा शाप
कपाळावर मिरवीत आलेलं
हे अनादि जहाज. तरीही
चाललंब आहे युगामागून युगं
भूत आणि भविष्य धुक्यात तरंगत ठेवून,
पाहिलंस?
तुझ्या माझ्या डोक्यावर
हलतं झुलतं हसतं आभाळ... . . 
पुढं मागे इकडं तिकडं
नुसतं नुसतं नुसतं आभाळ... 
आत आभाळ बाहेर आभाळ
श्वासांत आभाळ भासांत आभाळ
आभाळाच्या डोळ्यांतून स्वप्नांचं आभाळ आभाळ... 
आता तुझे माझे शब्दच आभाळून गेलेले. 
आपला देश, आपला धर्म, आपली भाषा
नुसतं नुसतं नुसतं आभाळ!
तर आपण आभाळाच्या भाषेतच बोलू या
मी तुला स्वर देईन आभाळी आभाळी... 
तू मला रंग दे आभाळी आभाळी... 
मग हे जहाज कोणत्याही किनाऱ्यास
लागो, न लागो. खंत नाही!
स्वर्गाची इच्छा नसो; नसोच,
नसो पृथ्वीची आसक्ती मनात
अशी आभाळी प्रार्थना आपण करू. येss
 

रिंगण
अलोन

रिंगण
अगम्य आकाशी

कोठवरी जाशी?
दोरी धन्या हाती
नाचवी जो॥
गळ्यातले दावे
मोजोनी ठेवावे
चित्ती असो द्यावे
'खुंट 'ध्यान ॥
रिंगणात घेई
माफक कोलांट्या
अवध्या वेलांट्या
अधोगामी॥
 

एक चतुर्दश 'पदी'
लक्ष्मीकांत तांबोळी

अमुच्या पाट्या अमुची ओळख,
तोच आमुचा वास अबलख. 
पदनामी हा पंथ आमुचा
बदनामीला मिरवायाचा. 
कोणी
कुठला
असो कसाही,
सदा सदाशिव ही पदशाही. 
लोक असू दे राज असू दे
शाही कुठली कशी असू दे,
पद त्यामधले बहु मोलाचे,
बाकि बोल ते कढिभाताचे. 
ब्रह्मादिकही करिती हेवा,
इतर जनांचा का मग केवा?
'भज गोविंदम् भज गोविंदम्
भज भज मनुजा पदारविंदम्'. 
 

असा काळोख
प्रियदर्शन पोतदार

मी काय शोधतो आहे. 
ते मला माहीत नाही, असं नाही
आकाशाच्या असीमतेला जर कुठे दार असेल,
तर त्यातून मला बाहेर पडायचं आहे
पक्ष्यांचे पंखही जिथे अपुरे पडतील
असं दिगंत मला गाठायचं आहे. 
मी काय शोधतो आहे. 
ते मला माहीत नाही, असं नाही. 
सागराच्या तळाला जर कुठे वाट असेल,
तर त्या वाटेनं मला वाहायचं आहे. 
माशांची वल्हीसुद्धा जिथे अपुरी पडतील
अशा किनाऱ्याला मला लागायचं आहे. . 
मी काय शोधतो आहे,
ते मला माहीत नाही, असं नाही. 
माणसाच्या मनातल्या पोकळीचं जे कवच आहे
ते भेदून मला निसटायचं आहे. 
काकीपणाची नवी व्याख्या मला लिहायची आहे. 
सूर्याचे डोळेसुद्धा जिथे अपुरे पडतील
असा काळोख मला पाहायचा आहे. 
मी काय शोधतो आहे,
ते मला माहीत नाही, असं नाही. 
व्यक्तींमधल्या स्नेहबंधाला जर मर्यादा असतील
तर त्या मला उधळायच्या आहेत. 
मृत्यूची अपरिहार्यताही जिथे अपुरी पडेल
असं जन्मातीत नातं मला जोडायचं आहे. 
मी काय शोधतो आहे?

 

सहीसलामत
वासन्ती इनामदार जोशी

वस्तुस्थितीवर प्रकाश पाडणारी सत्ये शोधता शोधता
ती इथपर्यंत आलेली होती सहीसलामत... 
अर्थार्जनाची सगळी दारे तिने आपल्या कर्तृत्वाने
खाङ्खाइ करून एक एक उघडली होती... !
कुठल्याही हळव्या क्षणांच्या पायरीवर
आपला चेहरा भावात न दिसता
केवळ विचारवंतच भासेल
याची काळजीही तिने पदोपदी घेतली होती... . !
स्त्रीदास्यासंबंधी काही प्रस्थापित सूत्रे एकत्र करून
त्याची विवक्षित विभागणी करण्याचे काम तिने जारी ठेवले होते
शिवाय त्या दरम्यान
पुरुषप्रधान संस्कृतीतली चौकटही तिने मापली होती. 
स्त्रीच्या अस्मितेच्या आविष्काराचा पट मुळातच तिने
अत्यंत उत्कटतेने तयार केलेला होता. 
तेवढ्यात एकाएकी,
तिच्या काही निसर्गसिद्ध मर्यादा जोखून
तिच्या काही सैद्धान्तिक प्रतिपादनावर
त्यांनी हल्ला चढवला... . !
पण... तोही. कसा... तर... 
तिच्या उत्तुंग थोरपणाचे कौतुक करीत करीत
अनेक साधनं... आणि
गर्भजल परीक्षेसारख्या शोधांना धन्यवाद देत देत
ती... अवधी... हताश... !! या हल्ल्याने,
कौतुक नाकारण्याचे धैर्य तिला नव्हतेच. 
स्वतःची जन्मसिद्ध विशिष्ट क्षमताही नाकारता येत नव्हती. 
सत्ये शोधण्यातला फोलपणा तिला पटवून घ्यावा लागला. 
आणि... त्यांच्या कृपेने
ती सहीसलामत राहिली
अगदी सहीसलामत... . !!

 

ओंकाराएवढा एक कलंदर
राजन साटम

[निमित्त - कविवर्य विंदा करंदीकर ह्यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस]
ओंकाराएवढा एक कलंदर
वस्तू आकारात मावेनाशा झालेल्या
हिरण्मय वेळेला
अकराव्या दिशेला प्रार्थनचे धृपद
गुणगुणत आहे उभा:
ताठ मानेनं टकरा मारीत
गदागदा हलबले होते त्याने आडमुठे डोंगर
धुंकला होता अंधाराच्या मस्तीवर
स्पर्शपालवीच्या पल्याडली
उमका झाली होती त्याला आकाश अर्थाची
म्हणूनच, कधीच घरली होती आकाशमेघांनी
मस्तकावर त्याच्या अबदागीर!
नवतेच्या जातकाचा घेत शोध
परंपरेच्या मृद्गंधातून
शेंदूर खरवडीत, घेत विरूपाचा वेध
तो बागइलाही एटू लोकांच्या देशातून
काळ्या कातळावर
समुद्रवारा भिनवून
रुजतो आंबा लालमातीचा
जीवनरस पिऊन
तो तसा
फोफावलेला, झेपावलेला स्वेदगंगेच्या काठावरून
स्वतःची संहिता सिद्ध करून
आहे उभा कवितारतीला कवेत कवटाळून!
 

आठवांची नक्षी
प्रसन्नकुमार पाटील

दिसातून केव्हा-
तरी पेटे चूल
झोपडीला नाही
मोडकेही दार
कुत्री आरपार
येतीजाती ॥
पोटाची काहील
अर्धवट ।।
रो. ह. यो. चा नाही
कधी भरवसा
फाटलेल्या दिशा
दाही आता ॥
-ऊठ, ऊठ, पारू,
अधूंना आवर
अतिरेकी थोर
जन्मा घाल... 

रिकाम्या पालख्या
निरंजन उजगरे

काही ऋतूंपूर्वी,
रक्तातील मंद लयीला
शब्द अलगद उचलून घ्यायचे
आणि चंद्र झिरपलेल्या नदीच्या काठावर
रात्रीच्या मायेनं पसरून टाकायचे. 
नंतर नंतर अधिकच मुलायम होत गेली
ऋतूंच्या पदराची वीण. 
आणि शब्दांच्या पालख्यांना,
थांग लागेनासा झाला
रक्तातील मंद्र लयीचा. 
हल्ली रक्तातून झिरपत चाललाय
नदीचा अथांग किनारा
आणि मनाच्या ओवरीबर विसावल्यायत
शब्दांच्या रिकाम्या पालख्या. 

बगळ्या बगळ्या... 
मोहन माजगांवकर

बगळ्या बगळ्या कवडी दे
काळ्या घागरी झरू दे
विहीर तळे तिचे डोळे
काठोकाठ भरू दे
उरी फिरतो नांगर काटा
ओटीत हिरवळ उमलू दे
चरती अश्राप सांगाडे
त्यांच्या कासेत
दूध
दे
डोळे त्याने वटारले
काजळ माखून वाहू दे
सुकले ओठ, हासू दे
'धोंड्या' माझा भिजू दे
बगळ्या बगळ्या कवडी दे... 
 

हसऱ्या फुलास माझ्या
राम गोसावी

हसऱ्या फुलास माझ्या
का दैव ने
डोहात खिन्न काळ्या
मन जातसे बुडून
पक्षी उडून जाता
घरटे हले उदास
मधुमंजु या स्वरांचे
हृदयात स्वप्नभास
पडता कडाड बिजली
गेले जळून झाड
शोधू कुठे विसावा
माळावरी उजाड
मम ठेव ती सुखाची
आता कशी मिळावी
मूर्ती दुभंगलेली
पुन्हा कशी जुळावी
झोळीत जीर्ण माझ्या
का दान कंटकाचे
डोळ्यांसमोर आता
साम्राज्य हे धुक्याचे


रेणुका
संतोष शेणई

ती स्त्री नाहीच काही म्हणाली
किती निमूट पुरुषाच्या घृणेला बळी गेली
केवळ घृणा त्याच्यापाशी नी हत्यार
सोशिक हासू तिच्यापाशी नी जलधार
हे मुला!
तू घे जराशी चाहूल पाळण्यातच
त्या उदासीत आहे उद्याचे पाऊल
जी होती काल दुर्गा
ती उद्या असेल काळी
हा जरासा मधला दोला पित्याच्या भाळी
हे मुला!
तुझियासाठी मातेचे आशीर्वच
नी पित्याचे मरण. 
 

वाटेवर
रेणू पाचपोर

हवे असे आकार
शोधू नयेत ढगात
नकळत एकमेकांतून निसटून जाणे
असतो निसर्गाचाच आविष्कार!
आपल्याला नसतातच कळत
रेषांचे उखाणे... 
कुठलेसे गाणे,
रुतून जावे नकळत
अन् सैरभैर व्हावे
हेही आपल्या नसते हातात... 
पक्षी उडाल्या फांदीचा थरार
सलत रहावा झाडाच्या मनात
तसे बेचैन होतो कधी कधी आपण... 
फक्त एखादी चाहूल
येऊन गेलेली असते
मळलेल्या वाटेवर... 
उमटलेले पाऊल दिसते!


कवितेचे हळुवार चांदणे... 
शंतनु बिघडे
कवितेचे हळुवार चांदणे
उमलुन येते जेव्हा मनभर... 
मोरपिसान्यापरी उजळते
ओघळलेले उदास अंतर... 
वाऱ्यातुन पाझरतो पावा
काळोखाचे अंग मुलायम
फांदीमधुनी गहिवर हिरवा
पाण्यावरला तरंग निर्मम. . 
क्षितिजावर सांडते निळाई
गावांतुन हलकीशी थरथर
वाटेवर दाटता जरासे
पानांतुन विरघळते दहिवर... 
कवितेचे हळुवार चांदणे
आज कशाने मलूल... उन्मन
विझल्यावर हे मोहरवारे
उरात गाणे... शब्दांवाचुन... . !
#Weekly sadhana कवितेचे हळुवार चांदणे,शंतनु बिघडे The soft moonlight of the poem, Shantanu Bighade
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके