डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्रद्धेवर वा मतलबावर विचारांचा प्रभाव पडत नाही!

जातीय, जमातीयवादाचा समर्थ मुकाबला करायचा असला तर संवाद हिंदू-मुस्लिम सामान्यजनांशी साधावा लागेल. हिंदुत्ववाद्यांचा प्रयत्न या सामान्य हिंदूंवर मुस्लिमद्वेषाचे संस्कार करण्याचा आहे. हा द्वेषभावनेचा शिरकाव हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल असलेल्या गैरसमजाद्वारे होतो. वरकरणी सत्य वाटणाऱ्या पुराव्याने हे गैरसमज हिंदुत्ववादी परिपुष्ट करतात. सामान्य हिंदू आणि मुसलमान यांच्यात भौगोलिक संपर्क कमी, सामाजिक व धार्मिक संपर्क तर त्याहून कमी. या संपर्कहीनतेतून हे गैरसमज निर्माण झाले आहेत. सामान्य हिंदूंना मुसलमानांबद्दल वस्तुस्थिती जाणून घेण्याची सोय करून देणारे विचारप्रवर्तन हा त्यावर उपाय आहे.

पी.डब्ल्यू.खांडेकर यांचा 20 ऑक्टोबर 2007च्या अंकातील ‘साधना त्या वाटेने चालू लागली आहे, म्हणून हा खटाटोप’या शीर्षकाचा पत्र वजा लेख वाचला.

त्यातील पुढील विधानाबद्दल आक्षेप नोंदवावेसे वाटते.श्री.खांडेकर म्हणतात, ‘साधना’चा हिंदुत्ववादी शक्तीबद्दल दुष्टभाव आहे.’मला वाटते शक्ती आणि विचार यांत भेद करावा. शक्ती काहीतरी घडवून आणतात. उदाहरणार्थ- गांधींचा खून, जातीय दंगली, वंशसंहारापर्यंत मजल, दुसऱ्या धर्माच्या पूजास्थानांचा विध्वंस. असल्या अधम शक्तीचा निषेध करणे हे दुष्ट भावातून नव्हे तर सुष्ट प्रवृत्तीतून, माणुसकीच्या परिपोषातून व निर्भयतेतून उद्भवते.

‘साधना’सारख्या ‘स्थापण्या समता शांती’साठी लढणाऱ्या साप्ताहिकाने अशा विचारांशी संबंध तरी ठेवावा का?

या निमित्ताने मला जाती-जमातवादाच्या मुकाबल्यासंबंधीचे माझे म्हणणे मांडायचे आहे. आज या चळवळीतील सर्वजण जमातवादावर, मुख्यत: हिंदुत्ववाद्यांवर, समोरून हल्ला करीत आहेत.हा हल्ला परिणामकारक होताना दिसत नाही आणि होईल असे वाटत नाही. कारण त्यातून हिंदुत्ववाद्यांचे मतपरिवर्तन होत नाही.हिंदुत्ववादी अन्य धर्माचे मूलतत्त्ववादी यांची भूमिका एकतर भावनाधिष्ठित, पोथीनिष्ठ श्रद्धाधारित तरी असते, किंवा पूर्णपणे मतलबी तरी. विवेकनिष्ठाच मानीत नाही, आपले विचार सशास्त्र नसून श्रद्धेतून निर्माण झालेत असे ते म्हणतात. विचारांचाच विचाराने मुकाबला करता येतो. श्रद्धेवर वा मतलबावर विचारांचा प्रभाव पडत नाही.

त्याहून एक लक्षणीय गोष्ट अशी की त्यांच्यावर प्रहार करू जाताना जो भावनिक प्रतिसाद त्यांच्याकडून येतो, त्याचे आपणही भावनेला आवाहन करतो, सत्याची झाकपाक करतो, अतिरेकी, वैचारिक संतुलन ढळल्याप्रमाणे विधाने करतो. अयोध्या आणि गुजरात या दोन्ही प्रकरणात हिंदुत्ववाद्यांनी देशाचे एवढे मोठे नुकसान केले आहे, राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रयत्नांना एवढा जबरदस्त धक्का दिला आहे, समाजस्वास्थ्य इतके बिघडवले आहे की त्यांच्याबद्दल आपल्याला अपरिमित चीड न वाटणे अशक्य आहे.अशी चीड मनात असताना वैचारिक संतुलन राखून विवेकनिष्ठा सांभाळून वाद घालणे अशक्य आहे.

याचकरिता त्यांच्याशी संवादही शक्य नाही. संवादासाठी पूर्वपक्ष मांडावा लागतो. इथे त्याकरिता हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनात शिरावे लागेल; त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगावी लागेल क्षमा करावी लागेल. आपल्यापैकी कित्येकांना हे शक्य नाही आणि एकंदर मोहिमेच्या दृष्टीने हिंदुत्ववाद्यांबद्दलची आपली ‘चीड’कमी होणे इष्टही नाही. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, चीड व द्वेष या दोन्हीगोष्टी एक नव्हेत. एकाच वस्तूबद्दल एकाचवेळी राग व भीती या दोन भावना जागृत झाल्या की द्वेष या भावनेचा उगम होतो. भीतीच्या मिश्रणामुळे द्वेष हा कृतिहीन किंवा छुप्या हीन प्रतीच्या कृतींना जन्म देतो. चीड ही चळवळीला विधायक रूप देऊ शकते.

हिंदुत्ववाद्यांशी काही महनीयांनी संवाद केलाही आहे, पण तो घातक ठरताना दिसतो. सरदार पटेल, जयप्रकाश, एस.एम. यांनी संघीयांना समजून घेण्याचा व समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘या मंडळींनी आपल्याला प्रशस्तीपत्र दिले’असा गवगवा संघीय मंडळी आजपर्यंत करीत राहिली आहेत. त्यातून भल्याभल्यांची दिशाभूल होतानाही दिसते. उदा.पी.डब्ल्यू.खांडेकरांची.

वाद आणि संवाद आजही चालूच आहे आणि त्यातून वर नमूद केलेले अनिष्टही घडते आहे. विशेष दखल घेण्यासारखे अनिष्ट असे की आपल्यापैकी कित्येकांना आपल्या निधर्मी भूमिकेचा विसर पडताना आढळतो. हिंदूंप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन यांच्यामध्येही सांप्रदायिकतेचा जोर वाढत चालला आहे. बुश यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचा दहशतवादविरोध हा त्याच्या ख्रिश्चन धर्मभावनेवरही आलेला आहे. प्रसंगी तो ख्रिश्चनांच्या धर्मभावनेला हात घालून राजकीय हित साधेल. भारतात या घडीला ख्रिश्चनांनी धर्मप्रसार व धर्मरक्षण या दोन्ही बाबतीत सुसंस्कृत मार्ग स्वीकारले आहेत. ग्रॅहम स्टेन्ससारख्या उदाहरणात तर ख्रिश्चन धर्मसंस्कृतेची परम उंची गाठतो. तरीपण ख्रिश्चन मिशनऱ्यांची, धर्मसेवकांची धर्मश्रेष्ठत्वाची भावना कित्येकदा असहिष्णु रूप धारण करते; ख्रिश्चनांत अमानुष धर्मश्रद्धा असतात. धर्माच्या नावाने असहाय भक्तांचे शोषण करणारे बुवा असतात, त्यांचा आपण जरूर तेवढा कडक निषेध करायला कच खातो, असेच इस्लाम धर्मीयांबद्दल बोलता येईल. मुस्लिमाच्या दुर्दशेला केवळ राजकीय स्थिती कारणीभूत नाही, हे पक्के माहीत असूनही इस्लाम धर्मातील अनाचारी प्रथांबद्दल बोलण्याचे आपण टाळतो; हा सर्वधर्मसमभाव नव्हे.

जातीय, जमातीयवादाचा समर्थ मुकाबला करायचा असला तर संवाद हिंदू-मुस्लिम सामान्यजनांशी साधावा लागेल. हिंदुत्ववाद्यांचा प्रयत्न या सामान्य हिंदूंवर मुस्लिमद्वेषाचे संस्कार करण्याचा आहे. हा द्वेषभावनेचा शिरकाव हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल असलेल्या गैरसमजाद्वारे होतो. वरकरणी सत्य वाटणाऱ्या पुराव्याने हे गैरसमज हिंदुत्ववादी परिपुष्ट करतात. सामान्य हिंदू आणि मुसलमान यांच्यात भौगोलिक संपर्क कमी, सामाजिक व धार्मिक संपर्क तर त्याहून कमी. या संपर्कहीनतेतून हे गैरसमज निर्माण झाले आहेत. सामान्य हिंदूंना मुसलमानांबद्दल वस्तुस्थिती जाणून घेण्याची सोय करून देणारे विचारप्रवर्तन हा त्यावर उपाय आहे.

Tags: वाद - संवाद प्रभा तुळपुळे जाती-जमातवाद हिंदुत्ववादी पी.डब्ल्यू.खांडेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रभा तुळपुळे

मालाड, मुंबई


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात