डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्यांनी या क्षेत्रात नुसतं नाव कमावलं नाही; तर दबदबा निर्माण केला, व्हिलन म्हणजे प्राण असं समीकरण तयार केलं. सिनेमातलं त्यांचं रूप पाहिलं की, कोणाचा विश्र्वास बसणार नाही की, या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात ‘रामलीला’मधल्या सीतेची भूमिका करून केली.

            

 

 अर्कचित्र : प्रभाकर भाटलेकर  

आता समीक्षक म्हणजे काही लहान मुलं नाहीत; पण प्राणच्या खलनायकी व्यक्तिमत्त्वानं त्यांचीही विकेट जायची. परवा एक ख्यातनाम समीक्षक वृत्तवाहिनीवर प्राणबद्दल बोलताना म्हणाले की, ‘प्राण पडद्यावर जरी क्रूर व्हिलन असले; तरी वास्तवात स्वभावानं अत्यंत मृदू, प्रेळ आणि सज्जन होते. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे.’ नटाची पडद्यावरील इमेज ही आपल्याकडे कशी भल्या-भल्यांना चकवते, हे यावरून दिसते.

प्राण यांनी खलनायकाची भूमिका त्या काळातल्या खलनायकाच्या प्रतिमेबरहुकूम रंगवली. हुकूम अर्थात्‌ निर्मात्यांचा. प्रतिमाही त्या निर्मात्यांच्या मनातली. त्यासाठी या मेहनती अभिनेत्यानं विशिष्ट लकबी निर्माण केल्या. तिरकी हॅट, डोळ्यांवर गॉगल, तोंडात सिगारेट आणि समोरच्या माणसावर जरब बसेल, असा आवाज. अशा शैलीत प्राणसाहेब सीनमध्ये प्रवेश करायचे. वैजयंतीमाला तिच्या पहिल्या-वहिल्या शूटिंगच्या वेळी प्राणसमोर शॉट देताना घाबरून डायलॉग विसरून गेली होती. त्या काळी खलनायकाच्या तोंडी सलीम-जावेदसारख्यांचे प्रभावी संवाद नसत. त्यामुळे आंगिक अभिनयावर सगळी भिस्त असे. नाही म्हणायला, खलनायकाच्या एन्ट्रीच्या खास जागा असायच्या आणि त्या चांगल्यापैकी थरारक असायच्या.  ऐन मोक्याच्या वेळी विघ्नसंतोषी म्हणून हे खलनायक हजर होत. निर्मात्याला अभिप्रेत असलेली ही खलनायकाची प्रतिमा प्राण यांनी आपल्या देहबोलीतून चोख साकार केली.

आता वाटते, निर्मात्यांच्या या साचेबद्ध खलनायकी संकल्पनेनं या गुणी नटाचा घात केला. जुन्या परंपरा पुढं चालू ठेवायच्या, कोणत्याही प्रकारे रिस्क घ्यायची नाही, असा तेव्हाच्या निर्मातेंडळींचा खाक्या होता. प्राणसाहेबांचा त्याला नाइलाज असणार. नायकाच्या हीरोगिरीला उठाव देण्याचं काम त्या वेळचे व्हिलन करत. सिनेमातले ताणतणाव व्हीलनच्या जोरदार पेशकशवर अवलंबून असत. कसून भूमिका वठवून सिनेमातल्या महत्त्वाच्या प्रसंगात प्राण आणायची ही जबाबदारी प्राण यांनी वेधकपणे पार पाडली. त्यांनी या क्षेत्रात नुसतं नाव कमावलं नाही; तर दबदबा निर्माण केला, व्हिलन म्हणजे प्राण असं समीकरण तयार केलं. सिनेमातलं त्यांचं रूप पाहिलं की, कोणाचा विश्र्वास बसणार नाही की, या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात ‘रामलीला’मधल्या सीतेची भूमिका करून केली.

दादासाहेब फाळके पुरस्कारानं एक सज्जन व्हिलन म्हणून त्यांच्या सिनेमातल्या चोख कारकिर्दीचा गौरव केला; त्यांच्या अभिनयाचा गौरव करायची संधी मिळाली असती, तर अधिक बरं झालं असतं.

Tags: अवधूत परळकर प्रभाकर भाटलेकर प्राण : एक सज्जन व्हिलन Avadhut Parlakar Prabhakar Bhatlekar Pran: A gentle villain weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके