डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक रोगांचे जगातून उच्चाटन झाले, माणसाची आयुर्मर्यादा वाढली. सामान्यतः संशोधक आपले ज्ञान पेटंट करतात. त्या ज्ञानाचा वापर करणाऱ्यांना ते विकत घ्यावे लागते. हा नव्या संशोधनाचा व्यापारी आविष्कार. संशोधनांना व्यापारी कवच मिळाले. एकमेव अपवाद म्हणजे 1955 मध्ये डॉक्टर जोनास साल्क यांनी शोधून काढलेली पोलिओवरची लस. त्यांनी त्यावर पेटंट घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे ती लस गरिबातल्या गरीब मुलांचा जीव वाचवू शकली. डॉक्टर साल्कसारखे संशोधक आता नाहीत. विशेष म्हणजे, पेटंट देताना त्याच्या किमतीवरही आज अंकुश नाही, त्यामुळे आजच्या नव्या रामबाण औषधांच्या किमती अफाट आहेत.

 

माझा विज्ञानाशी संबंध आला तंत्रज्ञानामुळे. विज्ञान हा तंत्रज्ञानाचा पाया. विज्ञानातील प्रगती वापरून सामान्य  जीवन संपन्न करण्यासाठी तंत्रज्ञान सातत्याने वापरले गेले आहे. मात्र अनेक वेळा त्याचा उपयोग विविध प्रगत देशांनी आधुनिक शस्त्रनिर्मितीसाठी प्रथम केलेला आढळतो. अनेक दशके मोठी युद्धे होत नसली तरी विज्ञान प्रथम वापरले जाते शस्त्रास्त्रनिर्मितीत. विज्ञान संशोधनकेंद्रित आहे, तर तंत्रज्ञान प्रयोगकेंद्रित. मी वैज्ञानिक नाही, तंत्रज्ञ आहे; परंतु विज्ञानातील प्रगतीचा मागोवा मी सातत्याने करत आलो आहे. विज्ञानाची माझी आवड ही माझ्या वडिलांची देन आहे. सन 1940 ते 1960 च्या काळात पॉप्युलर मेकॅनिक्स, सायंटिफिक अमेरिकन इत्यादी अनेक शास्त्रीय मासिके घरी येत. आमच्या घरात पूर्ण वर्कशॉप होते आणि विशेष म्हणजे, काहीही करण्याचे स्वातंत्र्य होते. शाळेत असल्यापासून हाताने वस्तू बनवण्याचा माझा छंद. पुढे तो माझा व्यवसाय झाला.

मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होऊन आता 64 वर्षे झाली. व्हॅक्यूम ट्यूब ते इंटिग्रेटेड सर्किट्‌स असा हा प्रवास रोमांचकारी होता. ते तंत्रज्ञान वापरून मी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने विविध प्रकारची अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या देशात प्रथमच निर्माण केली. देशातील पहिला सॉलिड स्टेट डीसी रेग्युलेटेड पॉवरसप्लाय, मायक्रोप्रोसेसर आधारित ब्रेन सिस्टीम, यूपीएस, एटीएम हे त्यातले काही. पण आमच्या मानाने तांत्रिक बाबतीत जग किती तरी पुढे होते आणि आहे.

मी इंजिनिअर झालो, तेव्हा देशात विशेष उल्लेखनीय संशोधन कुठेही नव्हते. तंत्रज्ञाननिर्मितीही खूप कमी होती. खासगी उद्योगधंदे व्यापारी लोकांचे होते. त्या कंपन्यांत विदेशातून आयात केलेल्या जुन्या मशिनरी वापरून उत्पादन होत असे. उच्च दर्जाची उत्पादनेच नव्हती. विलायतेत मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत होते. युरोप आणि अमेरिका त्यात अग्रेसर. संशोधनही तेथेच. सन 1960 पासून जपान पुढे आला. अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आपल्या देशात होत्या, पण त्यातून नवे शोध लागत नव्हते. त्यांच्या भव्य इमारती सरकारने बांधल्या आणि मग संशोधक नेमले. उत्पादकता नगण्य. याउलट डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर साराभाई यांना केंद्रित ठेवून अणुउर्जा आणि अंतराळ संशोधन सुरू केले. परिणामी, या विचारी निर्णयाचे मूर्त स्वरूप आज दिसत आहे. मात्र जगाचा विचार केला तर, मागे वळून पाहता, गेल्या 50 वर्षांत जगात सामाजिक व्यवस्था संपूर्णपणे बदलून टाकणारे आणि माणसाला स्मिमित करणारे अनेक प्रकारचे क्रांतिकारी तंत्रज्ञान निर्माण झाले. त्या प्रगतीची झेप पाहून आजही माझे मन थक्क होते. 

विज्ञानाने साऱ्या मानवी समाजाला माणसाचे जीवन सुसह्य आणि सुखी करणाऱ्या असंख्य गोष्टी दिल्या. यंत्रयुग 1820 च्या सुमारास सुरू झाले. धरणे आली, घरातील नळाला पाणी आले. डांबरी रस्ते आले. सायकल आली, मोटार आली, रेल्वे आली, विमाने आली. विसाव्या शतकात रेडिओ आले. टेलिव्हिजन आले. विज्ञानाचा अचूक उपयोग करून तंत्रज्ञांनी पर्सनल कॉम्प्युटर, अचंबित करणारे माहितीजाल, क्षणार्धात होणारा गुगल-शोध, जनुकीय अभियांत्रिकी, मोबाईल फोनवरही प्रसारित होणारी डिजिटल माध्यमे, अणुऊर्जा, अंतराळ उड्डाण, अवयव प्रत्यारोपण, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ईबेवर पेपाल वापरून इंटरनेटद्वारा पैसे पाठवणे इत्यादी अनेक शोध एकापाठोपाठ लावले. तितक्याच झपाट्याने त्यांचे जगभर प्रसारण झाले. जग पूर्णपणे पालटून गेले.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक रोगांचे जगातून उच्चाटन झाले, माणसाची आयुर्मर्यादा वाढली. सामान्यतः संशोधक आपले ज्ञान पेटंट करतात. त्या ज्ञानाचा वापर करणाऱ्यांना ते विकत घ्यावे लागते. हा नव्या संशोधनाचा व्यापारी आविष्कार. संशोधनांना व्यापारी कवच मिळाले. एकमेव अपवाद म्हणजे 1955 मध्ये डॉक्टर जोनास साल्क यांनी शोधून काढलेली पोलिओवरची लस. त्यांनी त्यावर पेटंट घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे ती लस गरिबातल्या गरीब मुलांचा जीव वाचवू शकली. डॉक्टर साल्कसारखे संशोधक आता नाहीत. विशेष म्हणजे, पेटंट देताना त्याच्या किमतीवरही आज अंकुश नाही, त्यामुळे आजच्या नव्या रामबाण औषधांच्या किमती अफाट आहेत.

संशोधक आणि तंत्रज्ञ जर कल्पक असतील, तर ते रूढी सोडून काही तरी नवीन करतात; नव्या प्रकारे करतात. अडचणीवर मात करण्यासाठी कल्पना जागवणे जरूरीचे. तांत्रिक कामात नवी पद्धत वापरून सुलभता आणि कामाचा वेग वाढवता येतो. काम करण्याचा पूर्वी नसलेला नवा मार्ग शोधणे म्हणजे कल्पकतेला आवाहन.      

माझ्या आधीची आणि आमची पिढी यादरम्यान झालेली तांत्रिक प्रगती सीमित होती व संथपणे होत होती. पण आता वैज्ञानिक प्रगतीचा वेग अमर्याद आहे. दैनंदिन बदल होत आहेत. माझी खंत एकच की, हे सारे पश्चिमी देशांत होत आहे. भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व नाही. शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या भव्य इमारती आहेत, भारतात मिळालेली डॉक्टरेट असलेले प्राध्यापक आहेत; पण नवे संशोधन नाही, जगात प्रसिद्ध झालेले भारतीय संशोधननिबंध विशेष नाहीत. भारतात काम करून मिळवलेले विज्ञानातील नोबल प्राईज मिळवणारे कोणी नाहीत. छोट्याशा इस्रायलमध्ये आजवर 180 शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे! अलीकडले भारतीय वंशाचे नोबेलविजेते आहेत, पण ते सारे विदेशी नागरिक. त्यांना पारितोषिक मिळाले ते परदेशात केलेल्या कामाबद्दल. देशाच्या लोकसंख्येच्या मानाने आपण तंत्रज्ञानात घातलेली भर जवळजवळ नाहीच. असे का झाले? मला वाटते, याला कारणे चार. आपला भक्तिमार्गाकडे असलेला कल, आपली अल्पसंतुष्ट वृत्ती आणि आपल्या शालेय शिक्षणात असलेल्या त्रुटी व मोठ्या कंपन्यांनी संशोधनाकडे फिरवलेली पाठ.

भक्तिमार्गाकडे असलेला कल

विदेशी विचारांचा अभ्यास पाहता असे दिसते की, सामान्य नागरिक आणि बहुसंख्य शास्त्रज्ञ असे मानतात की, धार्मिक लोक विज्ञानाकडे संशयाने पाहतात. धार्मिक विचारांना विज्ञान शह देऊ पाहत आहे, अशी त्यांची भीती आहे. विज्ञान अंधविश्वास मान्य करत नाही. माझ्या मते, विश्वास हा बहुतांशी अंधच असतो. भारतातील शास्त्रज्ञांचा विचार केला, तर त्यातील बहुतेक सारे धार्मिक होते. धार्मिक विधींत ते विश्वासाने भाग घेत. दुसरीकडे काही अतिरेकी आपल्या प्रयोगशाळेत सिद्ध झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट मान्य करत नाहीत. दक्षिणेतील अनेक शास्त्रज्ञ गंध लावीत आणि आजही लावतात. धर्म आणि विज्ञान यात कुठलाही संघर्ष त्यांच्या मनात नसावा, असे दिसते. युरोप आणि अमेरिकेत मात्र बहुसंख्य शास्त्रज्ञ धर्म पाळत नाहीत. हिंदुस्थानापुरते बोलायचे तर, भक्तिमार्गाकडे असलेला कल शास्त्रज्ञांच्या संशोधनाशी विसंगत नसावा, असे दिसते.

आपली अल्पसंतुष्ट वृत्ती

शास्त्रीय संशोधन करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक साम्य असते. आपल्या अभ्यासात दिसणाऱ्या उणिवांमुळे अशी व्यक्ती अस्वस्थ होते. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. अल्प संतुष्ट व्यक्तीत असे कुतूहल नसते. कुतूहलता आणि शोधक वृत्ती ही प्रत्येक शास्त्रज्ञात प्रकर्षाने दिसते. आपल्या अज्ञानाला शास्त्रज्ञ धीटपणे आव्हान देतो. शास्त्रीय कुतूहलता शास्त्रज्ञाला संशोधनासाठी प्रवृत्त करते. उत्तर शोधल्याचा आनंद शास्त्रज्ञाला आणखी खोलात जाण्याची स्फूर्ती देतो. त्यामुळे अल्पसंतुष्ट व्यक्ती कधीही शास्त्रज्ञ बनू शकत नाही. संशोधन करणाऱ्या सरकारी संस्थेत असे अनेक गणंग संशोधनाचा आव आणताना दिसतात. त्यामुळेच आपल्याकडील अशा व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या पीएच.डी. पदवीला काडीचेही महत्त्व नसते. पीएच.डी. देणारे असे अनेक कारखाने आज आपल्या देशात आहेत.

आपल्या शालेय शिक्षणात असलेल्या त्रृटी

आज आपल्याकडील बहुतेक शिक्षण संस्था पदवी देणारे कारखाने झाले आहेत. परीक्षा पास करण्यासाठी लागणारे कमीत कमी शिक्षण तेथे दिले जाते. अशा पदवीधारकांची मुलाखत घेताना त्यांच्याकडे विषयाचे मूलभूत ज्ञानही त्यांना नसते, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे त्याचे ज्ञान जाणण्यापेक्षा मी त्याच्या बुद्धीची औकात समजावून घेण्याचा प्रयत्न करत असे. विद्यार्थ्यांत कुतूहल निर्माण करून विषय शिकवणारे शिक्षक आज नसावेत. आमच्या नूमवि शाळेत असे अनेक कल्पक शिक्षक होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर आम्हाला मिळालेल्या शिक्षणात भर होता. शिक्षणाला सोडून हस्तकलांवर भर होता.

मोठ्या कंपन्यांनी संशोधनाकडे फिरवलेली पाठ

जगात शिक्षण संस्था आणि सरकारी संशोधन संस्था सोडून संशोधन होते मोठे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये. आपले उत्पादन उच्च दर्जाचे आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त असणारे करण्यासाठी अशा परदेशी कंपन्या संशोधनावर प्रचंड खर्च करतात. पेटंटचे कुंपण असल्याने त्याद्वारे त्यांचा प्रचंड फायदा होतो. आपल्या देशातील फार्मास्युटिकल कंपन्या सोडून बहुतेक मोठ्या कंपन्या संशोधन करत नाहीत. आपल्या बहुसंख्य कंपन्या व्यापारी मंडळी चालवतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारलेल्या मोठ्या कंपन्या आजही तुरळक आहेत. संशोधन करणाऱ्या कंपन्या संशोधनावर होणारा खर्च दामदुप्पट वसूल करत असतात, पण व्यापारी वृत्तीच्या चालकांना तितका धीर आणि विश्वास नसतो.

माणूस हा विचारी प्राणी. निसर्गातील घटनांमधील अद्‌भुतता समजण्यासाठी त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी माणसाचा विज्ञानाचा पाठपुरावा सुरू झाला. अक्कलहुशारी, प्रत्यक्ष अनुभव, प्राथमिक अनुमान याचा मेळ घालून विचारी माणसे नैसर्गिक घटनांतील रहस्य समजावून घेऊ लागली. उत्सुकता आणि कल्पकता हे ज्यांचे गुण, अशी माणसे शास्त्रज्ञ वा तंत्रज्ञ झाली. सुरुवातीच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मंडळींचा विरोध पत्करून विज्ञानाचा पाठपुरावा करावा लागे. आजही तेच चालू आहे. समाज नवे विज्ञान चाचपून मग स्वीकारतो, असे आजवर दिसून आले आहे.

माणसाच्या जेनोमच्या अभ्यासानुसार, 98 टक्के माणूस चिम्पान्झीसमान आहे. त्यामुळे आज शास्त्रज्ञ दोघांच्यातील नेमका फरक जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. जेनेटिक्स अभ्यास अजून खूप अधुरा आहे. जेनेटिक कोडचे हे मोठे कोडे आहे. माणसाचे मन ही काय चीज आहे, हे अजून उमजले नाही. माणसाच्या मेंदूविषयी प्रचंड अज्ञान आहे. माणसाचा मेंदू आणि त्यातील स्मृती, भावना, अभ्यास, उमजण्याची शक्ती हे आज मोठे कोडे आहे. माणसाची बुद्धी आणि ‘शुद्धी’ म्हणजे नेमके काय, हे आज आम्हाला ठाऊक नाही. मन आणि मनातील प्रेम, द्वेष, खिन्नता, आश्चर्य, भीती आदी भावना आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आज समजलेले नाहीत. कविता स्फुरणे, अनिवार्य राग म्हणजे शरीरात काय होते, हे अगम्य आहे.

कॉम्प्युटर बरेचसे शक्तिमान झाल्यावर माणसाची उमेद वाढली आणि आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता यावर वैज्ञानिक काम जोरात चालू आहे. माणसाच्या बुद्धीला शह देणे इतके सोपे नाही, हेही आता उमजले आहे. माणूस आणि रोबोट यात अजून प्रचंड अंतर आहे. माणसाच्या शरीरात निसर्गाने वापरलेले विज्ञान अचंबित करणारे आहे. जगात कितीही संशोधन होत असले तरी शरीरात असलेला न्यूरल सुपर कॉम्प्युटर, शरीरभर वाहत ठेवलेल्या रक्ताद्वारे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी करत असलेली असंख्य कामे हे आजही न उलगडलेले कोडे आहे. मनात जागृत ठेवलेल्या भावना पहिल्या की, माणसाने केलेले संशोधन किती अपुरे आहे, हे उमजते. मी बहिर्गत वापरासाठी 1960 मध्ये पेसमेकर बनवला. केईएममधील प्रसिद्ध डॉक्टर पी.के.सेन तो वापरत असत. आज शरीरात बसवले जाणारे पेसमेकर वापरले जातात. पण मेंदूद्वारा होणारा हृदयाचा ठोका आजही शास्त्रज्ञांना समजलेला नाही.

मी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स संशोधनात 1959 ते 1962 भाग घेत असे. शरीरात होणाऱ्या न्युरॉ-मॅस्क्युलर क्रिया समजून घेणे, हा त्यातला महत्त्वाचा अभ्यास. ‘द लिव्हिंग ब्रेन’ हे ग्रे वॉल्टर याचे पुस्तक म्हणजे आमचे बायबल. शरीरात होणाऱ्या विविध क्रियांचे वैज्ञानिक महत्त्व जाणणे आणि त्यापैकी काहींची इलेक्ट्रॉनिक प्रतिकृती करणे- असा प्रयास होता. बोस्टनस्थित शास्त्रज्ञ न्युरो-फिजिशियन डॉक्टर लेले हे आमचे गाईड. न्युरॉनद्वारे शरीरात होणारे इम्पल्स प्रसारण आणि तांब्याच्या तारेवर होणारे उष्णतेचे प्रसारण यांच्यातील फरक पाहिल्यावर विज्ञानाच्या उपयोगात माणूस निसर्गापेक्षा किती मागे आहे, हे उमजले. मला परदेशात जाऊन संशोधन करण्याची इच्छा नसल्याने मी ती नोकरी सोडली आणि माझी कंपनी सुरू केली.

सर्वच शास्त्रांना अजूनही खूप मर्यादा आहेत. त्यामुळे माणसाच्या अनेक पिढ्यांत संशोधन चालू राहणार आहेत. नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ आणि तुकाराम या ज्ञान संपादनाच्या पायऱ्या आहेत. आज आपण सोपान पायरीवर आहोत.  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात